‘अम्मा’चे पुनरागमन !

एकंदरीत हा पंधरवडा सेलिब्रिटींचे ‘लाड’ होण्याचा दिसतो आहे. सक्तमजुरीची सजा होऊनही एक मिनिटसुद्धा सलमानखान नावाचा नट कारागृहाच्या गजाआड गेला नाही. संशयास्पद व्यवहार करून निकालात काढलेल्या ‘सत्यम’कडे जमा असलेल्या भागधारकांच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारणाऱ्या राजूला उच्च न्यायालयात जामीन मिळाला आणि त्यापाठोपाठ बातमी आली ती, तामिळनाडूच्या सर्वेसर्वा जयललिता यांना उच्च न्यायालयाने बेहिशेबी संपत्ती जमा केल्याच्या आरोपातून मुक्त केल्याची. कनिष्ठ न्यायालयाने बेहिशेबी संपत्तीचे जे आरोप आणि त्यापुष्ठ्यर्थ सादर करण्यात आलेले जे पुरावे ग्राह्य धरून जयललिता यांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली (परिणामी त्यांचे मुख्यमंत्रीपद-आमदारपद तडकाफडकी गेले आणि त्यांना कारागृहात मुक्कामी जावे लागले) तेच सर्व पुरावे उच्च न्यायालयात एकजात अग्राह्य कसे काय ठरले, या कोड्याचा भुंगा सामान्य माणसाच्या मनात कल्ला न घालता तरच नवल होते! ते काहीही असो, दस्तुरखुद्द उच्च न्यायालयाने ‘निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र’ दिल्याने ‘अम्मा’ उपाख्य जयललिता यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या लगेच मुख्यमंत्री होऊन तामिळनाडू विधानसभेची निवडणूक मुदतपूर्व निवडणूक घेण्याची शिफारस करतात की आणखी दोन महिन्यांनी सूत्रे घेऊन निवडणूक वेळेनुसार होऊ देतात एवढाच मुद्दा सध्या उत्सुकतेचा आहे. त्या जरी मुख्यमंत्रीपदी नव्हत्या तरी त्यांच्याच मर्जीने कारभार सुरु होता; एका अर्थाने जयललिता नावाच्या आधुनिक ‘रामा’चे मावळते मुख्यमंत्री पेनीर आधुनिक ‘भरत’ होते, असाच एकंदरीत तामिळनाडूचा कारभार सुरु होता.

व्यक्तीपूजा, कर्मकांड आणि ब्राह्मणी वर्चस्वाच्या विरोधात रामस्वामी नायकर यांनी सुमारे सहा दशकापूर्वी सुरु केलेल्या द्रविडी कझागम चळवळीचे संपूर्ण विरोधाभासी आणि विदारक चित्र म्हणजे जयललिता यांचे नेतृत्व आहे. रामस्वामी यांनी ही चळवळ सुरु केली आणि त्यांना जो पाठिंबा देणारा वर्ग मिळाला त्यात अण्णादुराई हे एक होते . त्यांनीच पुढे या चळवळीची राजकीय शाखा म्हणून द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची १९४९ साली स्थापना केली. अण्णादुराई यांना जे राजकीय शिष्य लाभले त्यात चित्रपट अभिनेते-लेखक-निर्माते करुणानिधी आणि एम जी रामचंद्रन हे प्रमुख. त्यात करुणानिधी सिनियर. तर ‘एमजीआर’ नावाने चाहत्यांत परिचित एमजी रामचंद्रन या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याचा या पक्षातला प्रवेश १९५३ सालचा. या दोघांत अर्थातच लोकप्रियता तसेच नेतृत्वाच्या कळीच्या मुद्द्यावर इर्षा होती, वाद होते. अण्णादुराई यांच्या पश्चात हे दोन्ही नट-नेते आणि त्यांचे गट राजकीय पक्ष म्हणून १९७२ साली वेगळे झाले. करुणानिधी हे द्रमुकचे नेते झाले. तर रामचंद्रन यांना मानणारा कार्यकर्त्यांचा गट म्हणजे अभाद्रमुक. तेव्हापासून या राज्याचे राजकारण या दोनच राजकीय पक्षांभोवती फिरते आहे. १९८९साली एमजी रामचंद्रन याचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी जानकी यांनी काही काळ अभाद्रमुक पक्षाचे नेतृत्व केले पण, जयललिता यांची मोहिनी आणि प्रभाव मोठा होता. सहाजिकच जयललिता अभाद्रमुकच्या सर्वेसर्वा झाल्या त्या आजवर सर्वेसर्वापदीच आहेत.

तामिळनाडूचे राजकारण जसे या दोन पक्षांभोवती केंद्रित आहे त्यापेक्षा करुणानिधी आणि जयललिता या दोन व्यक्ती, त्यांच्यातील इर्षा-स्पर्धा-सुडाची भावना याभोवती जास्त केंद्रित आहे. द्रमुक सत्तेतून जाणार आणि अभाद्रमुक येणार, पुढच्या निवडणुकीत अभाद्रमुक जाणार आणि द्रमुक सत्तेत येणार असेच सुरु आहे. सार्वजनिक नळावर झोपडपट्टीतील बायका पाण्यासाठी जशा कचाकचा भांडतात अक्षरश: तसेच हे दोघेही नेते आणि त्यांचे पक्ष वचावचा भांडतात! आणि हो , महाराष्ट्रात जसा युतीत भाजप छोट्या भावाच्या भूमिकेत असायचा अगदी तशी अवस्था तामिळनाडूत राष्ट्रीय राजकीय पक्षांची कायम असते!

जयललिता याही त्या तमीळ, तेलगु प्रादेशिक चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांची आणि एमजी रामचंद्रन यांची भेट चित्रपटाच्या सेटवरच झाली . जयललिता यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ चा. पूर्वाश्रमीच्या म्हैसूर राज्यातील मेळूकोटे हे त्यांचे जन्मगाव. वडील जयरामन हे म्हैसूरच्या राजाच्या सेवेत होते. जयललिता हे नामकरण जयरामन यांच्या वडिलांनी; म्हणजे जयललिता यांच्या आजोबांनी केले तर आई त्यांना ‘कोमकली’ म्हणत असे. जयललिता जेमतेम दोन वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारले आणि आईसोबत जयललिता बंगलोरला स्थायिक झाल्या. त्यांच्या आईला चित्रपटात कामे मिळू लागली. त्या ‘संध्या’ या नावाने आताचे चेन्नई (तत्कालिन मद्रास) तसेच बंगलोरच्या चित्रपटसृष्टीत प्रख्यात होत्या. आईने चोखाळलेल्या वाटेवर चालायला सुरुवात करत वयाच्या पंधराव्या वर्षी जयललिता याही चित्रपटात भूमिका करू लागल्या. तिथेच त्यांची एमजी रामचंद्रन यांची भेट झाली. जयललिता सौंदर्यवती तर होत्याच त्याशिवाय महत्वाचे म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेने ‘एमजीआर’ खूपच प्रभावितच झाले! इंग्रजी, तमीळ, कन्नड, मल्याळम, तेलगु आणि हिंदी अशा सहा भाषा जयललिता अत्यंत अस्खलितपणे बोलत. जयललिता यांना १९८२ साली पक्षात आणि राजकारणात एमजी रामचंद्रन यांनीच आणले . दिल्लीत-संसदेत आपल्या राज्याचे प्रश्न इंग्रजीत प्रभावीपणे मांडले जावेत म्हणून इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या जयललिता यांना तामिळनाडूचे तत्कालिन मुख्यमंत्री असणाऱ्या एमजी रामचंद्रन यांनी राज्यसभेवर पाठवले. एमजी रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्या तामिळनाडूत परतल्या. सुरुवातीला जयललिता यांना पक्षातच जानकी रामचंद्रन यांच्याशी स्पर्धा करावी लागली आणि जानकी तसेच जयललिता असे दोन गट निर्माण झाले पण, १९८९च्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी जयललिता यांचा गट एमजी रामचंद्रन यांचा वारस असल्याचा स्पष्ट कौल दिला. हे दोन्ही गट विलीन झाले आणि विधान सभेत विरोधी पक्षनेत्या म्हणून जयललिता यांचे आगमन झाले. काहीशा अंतर्मुख आणि आत्मकेंद्रित वाटणाऱ्या, कमी पण ठाम बोलणाऱ्या, श्रीमंती जीवनशैलीत रमणाऱ्या जयललिता १९८९ नंतर द्रमुक तसेच करुणानिधी यांच्याशी कडवा संघर्ष करत राज्याच्या राजकारणातच स्थिरावल्या.

राज्याच्या राजकारणात स्वत:ला गुंतवून घेताना पुढे त्यांनी देशातील एक महत्वाची राजकीय शक्ती म्हणून स्वत: आणि पक्षाला प्रस्थापित केले. त्यासाठी कधी त्यांनी त्यासाठी काँग्रेस तर कधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बिनधास्तपणे वेठीला धरले, अनेकदा तर वाकवलेही! तामीळांच्या प्रश्नांवर श्रीलंकेशी पंगा घेण्याचा सवयीतून त्यांचे नाव जसे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू लागले तसेच ते काही दहशतवादी संघटनांच्याही यादीत अग्रक्रमावर गेले . त्यामुळेच सत्ताधारी असो की विरोधी बाकावर, अम्मा नावाने ज्यांची तामिळनाडूत अक्षरशः पूजा केली जाते त्या जयललिता कायम अत्याधुनिक सशस्त्र कमांडोजच्या गराड्यात आणि बुलेटप्रुफ जाकीट घालून असतात. जयललिता काय किंवा करुणानिधी काय, या दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द कायम वादग्रस्त राहिलेली आणि परस्परांच्या भ्रष्टाचाराची कुलंगडी कोणताही विधिनिषेध न बाळगता या नेत्यांनी तामिळनाडूच्या वेशीवर धुतली आहेत. जयललिता यांना बेहिशेबी संपत्तीच्या चौकशीत करुणानिधी यांनीच राजकीय षडयंत्र म्हणून अडकवले अशी ‘अम्मा’ भक्तांची ठाम धारणा आहे. मात्र केवळ हाच नव्हे तर तानसी जमीन घोटाळासारख्या अनेक प्रकरणातही जयललिता यांचे नाव जोडले गेलेले आहे, हे विसरता येणार नाही.

कर्मकांड, व्यक्तिपूजा आणि ब्राह्मण्य याविरुद्ध जी बहुजनांची चळवळ सुरु झाली आणि ज्या चळवळीचा पुढे राजकीय विस्तार झाला तिचे सर्वोच्च्च विद्यमान सत्ताकेंद्र म्हणजे जयललिता आहेत आणि त्या कानडी ब्राह्मण आहेत… एका चळवळीचा हा केवढा विदारक काव्यगत विरोधीप्रवास आहे ! मूळ चळवळीत व्यक्तीपूजा तसेच कर्मकांड नाकारले पण आज त्याच प्रवाहाच्या जयललिता ‘अम्मा’ म्हणजे साक्षात देवीचा अवतार आहे अशी मान्यता आहे; या अम्माची पूजा केली जाते त्यासाठी देवळे उभारण्यात आलेली आहेत. ‘अम्मा’ची बेहिशेबी संपत्ती बाळगल्याच्या आरोपातून सुटका व्हावी म्हणून ४० हजार ठिकाणी रुद्राभिषेक करण्यात आला किंवा अम्माच्या छायाचित्र/मूर्तीची पूजा तरी करण्यात आली असे प्रकाशित झालेल्या बातम्यात म्हटले आहे . ते जर खरे असेल तर, द्रविड कझागम चळवळीचा झालेल्या प्रवासाला लाभलेला विरोधाभास कवेत मावणारा नाही असेच म्हणावे लागेल. काहीही असो आणि कोणाला ते आवडो अथवा न आवडो, अम्माचे पुनरागमन झालेले आहे ही वस्तुस्थिती आहे!

राजकीय आणि सामाजिक भाष्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार…
एकदा भक्त म्हटले की शरीराचा धडाच्या वरचा भाग न वापरणे हा कर्तव्याचाच भाग झाला. बातमी तामिळनाडूची आहे. जयललितांच्या एका भक्तानं स्वत:च्या मुलाचं नाव त्या न्यायाधिशांच्या नावानं (कुमारस्वामी) ठेवलंय म्हणे ज्यांनी जयललितांची निर्दोष मुक्तता केली. विजयकुमार असं या भक्ताचं नाव आहे. अम्मांच्या भक्तीत स्वत:च्या नवजात अर्भकाला ‘त्या’ न्यायाधीशांचं नाव दिलं खरं पण विजयकुमारच्या पोटी न्याय जन्माला आला की अन्याय हे अर्थात नव्या कुमारस्वामींची कारकीर्द सुरू होईल तेंव्हाच कळेल ! असो.
भक्तांचा कडवा संप्रदाय तयार होण्याचा पहिला मान दक्षिण भारताचाच. त्यातून अभिनेता जर नेता झालेला असेल तर सोने पे सुहागा! (आठवा- एमजीआर निवर्तल्या नंतर झालेल्या आत्महत्त्या) अर्थात अभिनेता हा नेता होण्याची प्रक्रिया क्वचित घडते पण नेता निवडून आला की अभिनेता होणे ही प्रक्रिया रोजचीच.
उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात भक्तिसंप्रदाय सुरू झाल्याचा काळ मात्र अलिकडचा आहे.

=प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट