आमदारांविरुद्ध मतलबी ओरड !

विधि मंडळाच्या सदस्यांचे वेतन आणि भत्ते वाढल्यावर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मिडियात अशा काही प्रतिक्रिया व्यक्त होताहेत की, जणू काही आधीच मवाली असलेल्या आमदारांनी, कुणाचा तरी खून करून राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. अर्थात, ही भावना निर्माण करण्यास बहुसंख्य राजकारण्यांचे शिसारीसदृश्य पंचतारांकित राहणीमान, सप्ततारांकित मग्रुरी आणि राजकारणाचं झालेलं बाजारीकरण जबाबदार आहे; अगदी ग्राम पंचायत स्तरापासून बहुसंख्य लोकप्रतिनिधी एका टर्ममध्ये (गैरमार्गानं) धनाढ्य होतात, अशी आजची स्थिती आहे. त्यामुळे मिडिया म्हणतो त्या, विश्वासार्हता गमावलेल्या लोकप्रतिनिधींना कशाला हवी वेतनवाढ, या भावनेचं भरघोस पीक येणं स्वाभाविकच आहे.

पत्रकारितेच्या प्रारंभीच्या ते विधिमंडळ-मंत्रालय वृत्तसंकलनातून बाजूला होईतोपर्यंत असंख्य साधे-सीधे आमदार खासदार, मंत्री पाहायला मिळाले.  आमदार-खासदारांनी एसटी महामंडळाच्या बसने फिरण्याचा तो जमाना होता. कोणतंही वाहन वातानुकुलीत असण्याचा तो काळ नव्हता! तेव्हा एसटीच्या बसमध्ये आमदार आणि खासदारांसाठी काही जागा राखीव असत. त्याकाळात अगदी पंतप्रधानही ‘नॉन एसी’ कारने फिरत आणि ती कार बहुदा अँबेसडर असे. नववीत असतानाचा ६८/६९मधला एक हृद्य प्रसंग मनावर कायमचा कोरला गेलेला आहे. माझी आई-माई नर्स होती. तिची नियुक्ती ‘मराठवाडा’कार अनंत भालेराव यांच्या खंडाळा या गावी असतानाचा हा प्रसंग आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात हे खंडाळा गाव आहे. मासिक वेतनासाठी माईला औरंगाबाद ओलांडून अडूळ या गावी जावं लागत असे. माईला अर्धशिशीचा अतित्रास होता. एकदा पगारासाठी जाण्याआधीच तिला तो त्रास सुरु झाला आणि तापही आला. पण, पगारासाठी जाणं आवश्यक होतं. कपाळाला बाम लाऊन आणि फडक्यानं कपाळ घट्ट आवळून, सोबतीला मला घेऊन ती निघाली. वैजापूरकडून बस आली आम्ही बसमध्ये चढलो. गर्दी खूप असल्यानं रेट्यानं बसच्या समोरच्या भागात पोहोचलो. समोर वातावरणात जरा आदब होती. कारण ग. प्र. प्रधान, जॉर्ज फर्नांडीस, मृणाल गोरे असे मान्यवर तिथे बसलेले होते. आम्ही त्यांना ओळखलं. ओळख नसली तरी त्यांचे फोटो आम्ही वृत्तपत्रात पाहिलेले होते. माईनं अदबीनं त्या तिघांना अभिवादन केलं. दरम्यान माईनं लावलेल्या बामचा वास पसरला. जॉर्ज यांनी चौकशी केली. आम्ही कोण आणि काय झालंय ते मी सांगितलं. मृणालताईंनी माईच्या अंगाला हात लावून बघितलं; अंगात ताप जाणवल्यावर जॉर्ज यांना ते सांगितलं. लगेच जॉर्ज उठले त्यांनी माईला जागा करून दिली. माईनं खूप विरोध केला. तरी मृणालताईंनी माईला त्या जागेवर जबरदस्तीनं बसवून घेतलं. शिरूर फाटा यायच्या आतच माईचा डोळाही लागला. जॉर्ज यांनी औरंगाबादपर्यन्तचा प्रवास उभं राहून गप्पा मारत केला, हे आजही पक्क स्मरणात आहे. पुढे पत्रकारीतेत आल्यावर आणि मृणालताई तसंच जॉर्ज यांना मी हा प्रसंग सांगितला तर त्यांना आठवत नव्हतं! कसं आठवणार, कारण ते नेते, कायम लोकांचे होते आणि लोकांसाठी वागणं हा त्यांचा डिएनए होता.

माझ्या पिढीनं विधिमंडळ रिपोर्टिंग सुरु केलं तेव्हा, हिवाळी अधिवेशनासाठी बहुसंख्य आमदार रेल्वे आणि बसनं मुंबई-नागपूरला ये-जा करत. आमदार निवासात राहात. हावडा मेल आणि एक्स्प्रेस, महालक्ष्मी-महाराष्ट्र एक्स्प्रेसला त्यासाठी फर्स्टक्लासचा जादा डबा जोडला जात असे. त्यांना आमदार निवासात घेऊन येण्यासाठी आणि पुन्हा रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी बसेस असत. अनेकदा मतदार संघातून आलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन नागपूरच्या आमदार निवास आणि विधानभवन परिसरातील साध्याशा उपाहारगृहात हे आमदार गप्पांची मैफिल रंगवत जेवतांना दिसत असत. मुंबई आणि नागपुरात, आमदार निवासातून आमदारांना विधिमंडळात जाण्यायेण्यासाठी बस सुटत आणि या बसनेच बहुतेक सर्व आमदार प्रवास करत असत. तोपर्यंत ‘माजी मुख्यमंत्री’ झालेल्या शरद पवार यांनाही या बसमध्ये काही वेळा पाहिल्याचं पक्क स्मरण आहे. ग. प्र. प्रधान मास्तर, सुदाम देशमुख, प्रभाकर संझगिरी, नरसय्या आडम, डि.बी. पाटील, दत्ता पाटील, गणपतराव देशमुख, केशवराव धोंडगे,माणिकराव सबाने, निशिकांत जोशी, बी. टी. देशमुख,निहाल अहमद, मधू देवळेकर, सूर्यभान वहाडणे, बबनराव ढाकणे, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, राम नाईक, भाई वैद्य, भाई सावंत, नरेंद्र तिडके, विठ्ठलराव हांडे, अण्णा डांगे, (सुरुवातीच्या काळात नांदेड टेरीकॉटची पॅन्ट आणि शर्ट घातलेले) गोपीनाथ मुंडे तसंच मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर, रजनी सातव, सूर्यकांता पाटील, यांच्यासारखे अन्नेक ‘डाऊन टू अर्थ’ आमदार तर अनेकदा सरळ कोणासोबत तरी गप्पा मारत पायी जा-ये करत. जाता येता ही मंडळी उपोषणकर्त्यांनाही भेटत. तोंडात कायम पानाचा तोबरा असणारे गंगाधर फडणवीस स्कूटर चालवत सतत घाईत असत. आता मुळी नागपूरच्या आमदार निवासात आमदार राहतच नाहीत. नागपूरची सर्व तारांकित हॉटेल्स अधिवेशनाच्या काळात आमदार आणि त्यांच्या ‘पंटर्स’नी बळकावलेली असतात. ‘त्या’ बसच्या फेऱ्याही बंद पडल्यात कारण प्रत्येकाकडे किंमती, अलिशान बनावटीची कार आहे. त्यामुळे आता नागपूरच्या विधानभवन परिसरात पार्किंगला जागाच उरलेली नाहीये.

राजकारणातले लोक किती ‘साधे’ होते, यावर आता कितीही सांगितलं तरी पट्कन विश्वास बसणार नाही. १९७७च्या एप्रिलमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर मुंबईत कुठं राहायचं असा प्रश्न शंकरराव चव्हाण यांना भेडसावत होता कारण, तोपर्यंत त्यांचं मुंबईत घरच नव्हतं. मुख्यमंत्रीपद गेल्यावर पहिल्यांदा औरंगाबादला येण्यासाठी एक टॅक्सी करून ते मुंबई स्टेशनवर आले, स्वत:च स्वत:ची बॅग सांभाळत रेल्वेने औरंगाबादला आले! मराठवाडा या दैनिकात तेव्हा पहिल्या पानावर आलेली ही बातमी अजूनही आठवते. एकदा संध्याकाळी प्रधान मास्तरांना आमदार निवासात भेटायला गेलो. तर दरवाजा उघडा पण, मास्तरांचा प्रतिसाद मिळेना म्हणून आत गेलो तर..मास्तर कपडे धूत बसलेले. मी म्हटलं, ‘अधिवेशनाच्या काळात आमदारांचे कपडे तर फुकट धुवून मिळतात’. तर मास्तर म्हणाले, ‘आपले कपडे धुवायला कशाला दुसरं कुणी पाहिजे?’. प्रधान मास्तरांचे कपडेही अनेकदा इस्त्री न केलेले असत. कविवर्य ना. धों. महानोरांचही तस्सच. महानोर तर नागपूरला आल्यावर अनेकदा माझ्या किंवा भास्कर लक्ष्मण भोळे यांच्या स्कूटरवर मागच्या सीटवर बसून फिरत.

सुरुवातीच्या दोन टर्ममध्ये नितीन गडकरींचा नागपूरभर संचार कायनेटिक होंडा या स्कूटरवर असे. नितीनची पहिली कार सेकंडहॅन्ड अँबेसडरहोती, हे अनेकांना ठाऊक नसेल. मंत्री झाल्यावरही शासकीय विश्रामगृहाची बिले स्वत:च्या खिशातून देतांना मी अनेकांनी अनेकदा गडकरींना बघितलेलं आहे. मुंबईत अनेकांच्या पाहुणचाराचा आस्वाद मिळत असल्यानं नागपूरला अधिवेशन असलं की आमदार स्नेह्यांना मी रात्रभोजनासाठी बोलावत असे. मुंबईतल्या पाहुणचाराची किंचित उतराई होणं तसंच, स्नेह आणखी बळकट व्हावा आणि राजकारण ‘ऑफ द रेकॉर्ड’ समजावं, असे अनेक हेतू त्यामागे असत. त्यापैकी मनोहर जोशी, छगन भुजबळ, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर हे अनेकदा आमच्याकडे ऑटोरिक्षाने आले आणि ऑटोरिक्षानेच आमदार निवासात परतलेले आहेत, यावर आज कुणाचा विश्वास बसणार नाही. मंत्री झाल्यावरही महसूल मंत्री असलेले सुधीरभाऊ शेजारी बसलेले आहेत, मी मारुती व्हॅन चालवतोय, मागच्या सीटवर धनंजय गोडबोले आणि धनंजय देवधर, अशी आमची भटकंती रात्री उशीरापर्यंत अनेकदा झालेली आहे.

शरद पवार यांची जनतेशी नाळ पक्की जोडलेली होती. लोकांसाठी कायम उपलब्ध असणं आणि साधं राहण्यावर त्यांचा कटाक्ष आणि ते त्यांचं वैशिष्ट्यही होतं. अर्ध्या बाह्यांचा पांढरा बुशशर्ट, पांढरी पॅन्ट किंवा पांढरा पायजमा-कुर्ता, पायात साध्याशा चपला आणि हातात एखादी फाईल, असं वावरणारे शरद पवार आजही डोळ्यासमोर आहेत. कॉंग्रेसमधून फुटून निघाल्यावर त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला. जनता पक्ष, कम्युनिस्ट पक्षाप्रमाणे त्यांच्या समाजवादी कॉंग्रेसच्या बैठका, अधिवेशनं आमदार निवासच्या सभागृहात खाली बैठक घालून झालेली पाह्यला मिळाली आहेत. कठीण समय आल्यावर तर शरद पवार जीवाची पर्वा न करता पुढे होत. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा नागपूरकडे मोठा पूर आला. बुटीबोरी परिसराला जोरदार फटका बसला. पाऊस पडतोय, खूप चिखलही आहे म्हणून ड्रायव्हरची हिंमत होईना तर, त्याला बाजूला सारून उघडी जीप चालवत पूरग्रस्तांच्या सांत्वनासाठी शरद पवार धाऊन गेले. भूकंपग्रस्त उस्मानाबाद-लातूर परिसरात त्या काळात पवार आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केलेली धावधाव अजूनही डोळ्यासमोर आहे. महापुरानं अर्ध मोवाड वाहून गेलं आणि अर्ध मोवाड उद्ध्वस्त झालं. मंत्री, मुख्यमंत्री ढिगा-यांमुळे गावात जाऊ शकले नाही पण, संरक्षणमंत्री असलेले शरद पवार मात्र, पायाच्या पोटरीला लागेपर्यंत असलेला चिखल तुडवत, तो भलामोठा ढिगारा चढून गावात पोहोचले. काही माजी आमदारांची आर्थिक विपन्नावस्था बघून शरद पवार यांनी माजी आमदारांसाठी सेवानिवृत्ती वेतन सुरु करण्यासाठी पाऊलं उचलली, असं आमचे सिनियर्स सांगत. मात्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणाचे अभ्यासक रत्नाकर महाजन म्हणाले, आमदारांना सेवानिवृत्ती वेतन ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना लागू झालं.

धुवट कपडे घालून वावरणारे, बांधणीच्या वहाणा घालणारे त्र्यं. सी. कारखानीस तीन टर्म आमदार होते पण, दोनदा निवडून आल्यावरही ते कोल्हापुरात भाड्याच्या घरात राहात. तिसऱ्या टर्मच्या आधी त्यांना कोल्हापुरात म्हाडाची चारशे-साडेचारशे चौरस फुटांची सदनिका मिळाली. त्यांना त्या घरात मी भेटलो आहे. शंकरराव गेडाम यांचीही कथा अशीच. ते आमदार तर होतेच आणि चक्क मंत्रीही होते पण, अखेरपर्यंत ते नागपूरला म्हाडाच्या छोट्याशा सदनिकेत राहिले. राहणीमान पूर्ण मध्यमवर्गीय. लेख किंवा प्रतिक्रिया देण्यासाठी ते स्वत: आमच्या कार्यालयात दोन जिने चढून येत. नगरसेवक, पंचायत आणि जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांनी केवळ एका टर्ममध्ये धनाढ्य होण्याची परंपरा अलिकडच्या वीस पंचवीस वर्षातली.

ते दिवस राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचे एक सनदशीर साधन अशी काही बहुसंख्यांची धारणाच नव्हती; म्हणूनच हे असं साधं राहणं त्यांना जमत असे. अलिकडच्या काही वर्षात राजकारणाचा बाज बदलला ; राजकारण हे धन  कमावण्याचं साधन झालंय. निवडणुकांसाठी अफाट पैसा लागू लागलाय. त्याला आपणही जबाबदार आहोत कारण, आपण लोकही बदललो आहेत. लोकांच्या अपेक्षा बदलल्यात. नगरसेवक-आमदार-खासदारानं सोसायटीला रंग काढून द्यावा, डिश अन्टेना बसवून द्यावा, गणेशोत्सव-नवरात्र-सप्ताहाला-देऊळ-समाज भवन  उभारायला मोठी देणगी द्यावी अशी अपेक्षा बाळगली जाते. ती पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी लोक बाहेर पडतात. सरळ मताची किंमत घेण्याची पद्धत बहुसंख्य मतदार संघात रुढ झालेली आहे. एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सांगत होते, मी मुंबईत असलो की घरी दिवसभरात सात-आठशे कप चहा होतो, शंभर दीडशे लोक ब्रेकफास्टला असतात, दिवसभरात पन्नास-शंभर जेवायला असतात. गावीही असंच असतं. एवढा किमान पाहुणचार नाही केला तर, दूरदूरहून आलेले कार्यकर्ते, आलेले लोक नाराज होतात. एक आमदार पत्नी सांगत होत्या, ‘तुमचे मित्र घरी असो वा नसो, दररोज इतका चहा होतो की आठ-दहा लिटर दूध लागतंच!’

लोकप्रतिनिधींकडूनच नाही तर कोणाकडूनही होणाऱ्या भ्रष्टाचाराचं समर्थन कधीच करता येणार नाही पण, ‘आम्ही बिघडलो, तुम्हीही बिघडा’ अशी स्थिती सार्वत्रिक आहे. समाजाचा प्रत्येक घटक बहुसंखेनं ‘येनकेन मार्गा’नं पैशाच्या मागे लागलाय. आमदार-खासदार याच समाजाचे आधी घटक आणि मग प्रतिनिधी आहेत. ‘जसा समाज तसे त्याचे प्रतिनिधी’ हे कसं काय विसरता येईल? पत्रकारितेचा प्रवास ‘मिशन टू प्रोफेशन टू बिझिनेस’ असा झाला, पेड लेख आणि बातम्या आल्या. त्याबद्दल मिडिया अवाक्षरानं बोलत नाही आणि इकडे ‘आमदारांनी सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला’ असा वाचाळपणा करून मोकळा होतो!

गेल्या दहा-वीस वर्षात आपला पगार किती वाढला याचा विचार नीरक्षीरपणे करणारे विवेकीजन ‘आमदारांनी राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकला’ ही भाषा उच्चारणार नाहीत, उच्चारुच शकत नाहीत. फार लांब जायला नको, कोणत्याही ‘फॉर्म’मध्ये मत विकत देणार नाही हे समाजानं एकमुखानं ठरवलं तर भ्रष्टाचार निम्मा कमी होईल. पण, ‘मी सोडून इतर सर्व चारित्र्यानं स्वच्छ, वर्तनानं सुसंस्कृत तसंच  शिस्तबद्ध, नियम व कायदे काटेकोरपणे पाळणारे असावेत’, अशी आपली सामुहिक मानसिकता झालेली आहे. ‘शिवाजी’ कोणालाच आपल्या घरात जन्मायला नकोय… ही खरी कोंडी आहे.

परिस्थिती अगदीच काही हाताबाहेर गेलेली नाही. श्रीकांत देशपांडे,रामनाथ मोते, दत्तात्रय सावंत, विक्रम काळे, डॉ. सुधीर तांबे आणि कपिल पाटील  या आमदारांनी वेतनवाढ न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय, बच्चू कडू यांनी वेतनवाढीला विरोध केलाय, एखादे का असेना गिरीश गांधी निवृत्तीवेतन घेत नाहीत, त्यांचं निवृत्तीवेतन दरमहा मुख्यमंत्री निधीत जमा होतं. अशांची संख्या वाढवायची असेल तर आपणच स्वच्छ आणि भानावर असणं गरजेचं आहे!

– प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या- www.praveenbardapurkar.com

 

मराठी पत्रकारितेतील ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापुरकर यांची मोबाईल   ई-बुक्स

भाष्य – भाग १ ते ८ 

‘डेलीहंट’ एप्लिकेशनवर लवकरच प्रकाशित होत आहेत. 
ई-प्रत मिळवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क साधा –

– pratik.puri@dailyhunt.in

संबंधित पोस्ट