‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध !

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील ‘एमआयएम’ या अल्पाक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या हैद्राबादच्या ‘मजलिसे इत्तिहादुल मुसलमिन’ने बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीने काहींच्या नजरा उंचावल्या आहेत तर मराठवाड्यातील बुद्धिवंत, समाजचिंतक, पत्रकार आणि आज वयाची साठी पार केलेल्यांच्या नजरा भयकंपित झालेल्या आहेत. ‘एमआयएम’ने राज्यात दोन जागी विजय संपादन केला आहे, ११ विधानसभा मतदार संघात हा पक्ष दुसऱ्या नाही तर तिसऱ्या स्थानावर आहे. देश जरी १५ ऑगस्ट १९४७ला स्वतंत्र झाला तरी मराठवाड्यात मात्र स्वातंत्र्याची ती किरणे पोहोचायला १७ सप्टेबर १९४८ ही तारीख उजाडावी लागली. तोपर्यंत मराठवाडा निझामाच्या नियंत्रणाखाली होता आणि निझाम पुरस्कृत रझाकारांनी मराठवाड्यातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार त्या काळात केले. हिंदुंच्या माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासोबतच प्रशासन, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण अशा सर्वच आघाड्यावर हा दहशतवाद तसेच अत्याचार होता आणि समाज त्या सावटात मिणमिणता जगत होता. आज वयाची साठी पार केलेल्यांच्या मनावर त्या अत्याचाराचे व्रण अद्यापही ताजे आहेत..ठसठसते आहेत. ‘एमआयएम’च्या सर्वेसर्वा असणारांची नाळ त्या अत्याचारकर्त्यांशी जुळलेली आहे हा, मराठवाड्यातील या ‘एमआयएम’च्या विजय आणि विस्तारामुळे भयकंपित झालेल्या विरोधकांचा पाया आहे. निझाम आणि रझाकार यांच्याप्रमाणेच ‘एमआयएम’ही आक्रमक धर्मांध आहे आणि हीच मराठवाड्यातील जाणत्यांच्या चिंतेची बाब आहे. (माझ्या पिढीचा जन्म मराठवाडा स्वतंत्र झाल्यावर पाच-सात वर्षांनी झाला पण आमच्या पिढीला त्या अत्याचाराच्या कमी प्रमाणत कां होईना झळा बसल्या आहेत . माझी आई नर्स होती.. तिचे त्याकाळातले भयाच्या सावटातले जगणे आजही आठवते. त्याकाळात नेकनूर, पाटोदा, डोंगरकिन्ही, धोंडराई, खंडाळा, अंधानेर अशा विविध गावी प्राथमिक शिक्षण घेताना आम्हाला उर्दू विषय बंधनकारक होता. संध्याकाळी परवचा म्हणताना शुभंकरोती, पाढे आणि उजळणीसोबतच आम्ही ‘अलीफ-बे’ म्हणतो किंवा नाही याची ‘खातरजमा’ केली जात असे. पण, ते असो.) मराठवाड्यातील बहुसंख्य लोकांची ‘एमआयएम’बद्दलची काळजी धर्म-जात-पंथ-विचार यावर आधारीत नसून अत्याचारांच्या वणव्यात पोळलेल्या संवेदनांच्या पातळीवरची ती आहे. मराठवाड्यातील आजच्या पिढीला आणि मराठवाडयाबाहेरील लोकांना ती काळीज विदीर्ण करणारी तीव्रता समजणारी नाही. म्हणूनच त्यांची ‘एमआयएम’वरील टीका आणि मराठवाड्यातील भयकंपित वर्गाची या संदर्भातली काळजी यात फार मोठी दरी आहे.

सध्या राजकीय आघाडीवर ‘एमआयएम’वर मतप्रदर्शन करण्याची आलेली खुमखुमी बहुसंख्येने उथळ आहे. प्रकाशवृत्त वाहिन्यावरील हे बहुसंख्य राजकीय विश्लेषक काय किंवा ज्यांच्या वक्तव्यावरून सध्या वादळ उठले आहे त्या, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि ‘एमआयएम’च्या उमेदवाराने प्रंचड दमछाक केल्यावर दुसऱ्यांदा विधानसभेवर विजयी झालेल्या प्रणिती शिंदे यांचे एक तर इतिहासाचे आकलन पुरेसे नाही किंवा जे आहे ते तोकडे आहे. प्रणिती शिंदे काय किंवा ऐकीव माहितीवर टीका करणारे काय; पार्श्वभूमी लक्षात न घेता ‘एमआयएम’चा विस्तार महाराष्ट्रात का झाला या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचीही तसदी घेत नाहीत हे आणखी वाईट आहे. हैद्राबादला जन्मलेल्या ‘एमआयएम’ने नांदेड महापलिकेच्या निवडणुकीत जेव्हा पाळेमुळे मराठवाड्यात आणि पर्यायाने महाराष्ट्रात रोवली तेव्हा राज्यात सत्तारूढ असणाऱ्या सरकारने प्रतिबंधात्मक पावले का उचलली नाहीत, या प्रश्नाचे उत्तर प्रणिती शिंदे यांच्या सारख्यांकडे नाही आणि ते असले तर राजकीय मजबुरी म्हणून ते त्यांना देताही येणार नाही. त्यावेळी प्रणिती शिंदे यांचे वडील सुशीलकुमार शिंदे केंद्रात गृहमंत्री होते आणि महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे सरकार होते याचे स्मरण करून देणे अनुचित ठरणार नाही. ‘आपल्या’ लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात पुरेसे स्थान मिळाले’ नाही या वस्तुस्थितीकडे आणि ‘आपल्याला’ दहशतीखाली जगावे लागते’ असा प्रचार आणि कांगावा करत केवळ धर्माच्या नावावर एक राजकीय पक्ष स्वत:ला संघटीत करतो आहे यातला धोका केंद्र आणि राज्य सरकारांच्या लक्षात आलेला नव्हता असे नाही पण, त्याकडे मतांच्या सोयीसाठी दुर्लक्ष करण्यात आले, हे कटू असले तरी सत्य आहे. विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्यावर ‘एमआयएम’ रिंगणात उतरणार आणि आपली पारंपारिक मते तिकडे वळणार हे स्पष्ट झाल्यावर राज्याच्या सत्ताधाऱ्यांनी अत्यंत घिसाडघाईने तसेच दबावाखाली मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. जास्त लोकसंख्या असणाऱ्या मुस्लिमांना कमी टक्के आरक्षण आणि कमी लोकसंख्या असणाऱ्या मराठ्यांना जास्त टक्के आरक्षण अशी पहिली चूक करण्यात आली. दुसरी चूक म्हणजे या आरक्षणाचा कोणताही फायदा या दोन्ही समाजांना लगेच मिळालाच नाही! परिणामी मुस्लिम आणि मराठे दोन्ही मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दुरावले. मराठा मतदार भाजपकडे वळले तर मुस्लिम ‘एमआयएम’कडे. त्याचा जोरदार फटका (आधी लोकसभा निवडणुकीत बसला होताच!) विधासभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला. ‘एमआयएम’चे दोन उमेदवार विजयी झाले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे ६० उमेदवार पडले; २००९च्या विधानसभेत मराठा समाजाचे १५६ सदस्य होते ती संख्या २०१४च्या निवडणुकीत १०६ पर्यंत घटली आहे! राज्याचे राज्यकर्ते किती पक्ष तसेच समाजघातकी निर्णय घेतात आणि त्यामुळे कोणत्या शक्तींना खतपाणी घातले जाते याची हे ढळढळीत उदाहारण आहे ..

‘एमआयएम’चा विस्तार हा हिंदू मते विभागल्याने झाला आहे असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे; सेना-भाजप युती तुटल्याने हिंदू मते विभागली आणि मुस्लिम मते एकवटली असा त्याचा अर्थ होतो. हे सिद्ध करण्यासाठी औरंगाबाद विधानसभा मतदार संघात विजयी झालेल्या इम्तियाज जलील यांचे उदाहरण या विश्लेषकांकडून देण्यात येते. या मतदार संघात भाजपकडून (सेनेचे माजी महापौर आणि माजी आमदार) किशनचंद तनवाणी तर शिवसेनेकडून (माजी महापौर, माजी खासदार, तत्कालिन आमदार) प्रदीप जैस्वाल लढले. हिंदू मतांची फाटाफूट झाली आणि त्याचा फायदा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या मार्गाने ‘एमआयएम’ला झाला. हे ग्राह्य धरले तर; याची म्हणजे ‘एमआयएम’च्या विजयाची जबाबदारी मग शिवसेना तसेच भारतीय जनता पक्षांवरही येते. सेनेचे माजी दिग्गज मंत्री आणि विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना स्थानिक राजकारणाची गरज आणि स्वत:चे साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी तनवाणी आणि जैस्वाल हे दोघेही नको होतो म्हणून ही म्हणजे; तनवाणी-जैस्वाल अशी लढत खासदार खैरे यांना कशी हवी होती असे जे अचूक विश्लेषण औरंगाबादचे पत्रकार महेश देशमुख यांनी केले ते जाणकारांनी जरूर वाचावे. महेश देशमुख यांच्या प्रतिपादनाचा जरी खासदार खैरे यांनी इन्कार केलेला असला तरी त्यातील तथ्य काही लपत नाही; औरंगाबादकरांना ते तथ्य चांगले ठाऊक आहे आणि निवडणुकीच्या आधीपासून त्याची गल्लीबोळात चर्चा होती; निवडणुकीच्या निकालानंतर त्या चर्चेने चागलेच बाळसेही धरले आहे! म्हणजे सत्तेतील पक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच सेना-भाजप या पक्षांसोबतच स्थानिक पातळीवर चंद्रकांत खैरे यांच्यावरही ‘एमआयएम’चे उमेदवार इम्तियाज यांच्या या विजयाची जबाबदारी येते.

आणखी एक मुद्दा म्हणजे; इम्तियाज यांना मी एक ‘चांगले’ पत्रकार म्हणून ओळखतो. मे १९९८ ते मार्च २००३ याकाळात औरंगाबादला असताना इम्तियाज यांना एक पत्रकार म्हणून बऱ्यापैकी अनुभवता आले. सामाजिक कळकळ, अभ्यासू वृत्ती आणि महत्वाचे म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल धार्मिक कडवेपणा न बाळगता पत्रकारिता करणारा पत्रकार अशी त्यांची प्रतिमा होती. प्रकाशवृत्त वाहिनीवर वावरतानाही ते कधी ‘मुस्लिम’ म्हणून वावरल्याचा माझा तरी अनुभव नाही. तरीही हा उमदा युवक ‘एमआयएम’कडे का वळला या प्रश्नाच्या उत्तराचा कोणी मागोवा घेतलेला दिसत नाहीये. मुख्य असलेल्या राजकीय पक्षात योग्य संधी नाही; एवढेच नाही तर प्रस्थापित राजकीय व्यासपीठावर आपले काय म्हणणे आहे हेही ऐकून घेतले जात नाही असा ग्रह पक्का होऊन जर मुस्लिम तरुण ‘एमआयएम’कडे वळत असतील तर ती जबाबदारी देशातील मुख्य राजकीय पक्षांची नाही का? मुस्लिम युवक कोणत्या मन:स्थितीत आहे याचे दिशादिग्दर्शन म्हणजे इम्तियाज यांचा विजय आहे हे बघण्याची आपल्या देशातील प्रमुख राजकीय पक्षांची चिकित्सक दृष्टी हरवली आहे, असा त्याचा अर्थ नाही काय? ‘एमआयएम’चे सर्वेसर्वा ओवैसी यांची काही भाषणांच्या क्लिप्स मी ऐकल्या; (काही प्रसंगी त्यांची भाषा खरेच भडक आणि कडवी आहे पण, ती आपल्या चांगल्या परिचयाची आहे!) एका ठिकाणी त्यांनी मुस्लिम आणि दलित यांनी एकत्र यावे असे आग्रही आवाहन केले आहे. खरेच तसे घडले तर मग हे आव्हान काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मृत्युघंटा आहे याची पुसटशीही जाणीव या दोन्ही पक्षांना झाल्याचे दिसत नाही. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हिंदुत्वाचे कार्ड समोर करत जर कोणी निवडणुकीत विजय मिळवत असेल तर मग तोच अधिकार मुस्लिम आणि दलित मतांच्या आधारे निवडणुका लढवणाऱ्या अन्य कोणाला नाकारता येणार नाही. लोकशाहीची जी काही चौकट आपण स्वीकारल्याचा दावा करतो त्या चौकटीत राहूनच ‘एमआयएम’णे निवडणुका लढवल्या आहेत हे आपल्याला विसरता येणार नाही. तरीही ते भारतीय लोकशाहीसाठी घातक आहेत असे जर टीकाकारांचे म्हणणे असेल तर मग दोष आपण स्वीकारलेल्या चौकटीचाही आहे, हे मोकळेपणाने मान्य करण्याचा आणि तो दोष दूर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत किंवा नाही, हा खरा मुद्दा आहे.

म्हणूनच ‘एमआयएम’चा विचार राजकीय उठावळ तसेच उथळपणे करता येणार नाही. चर्चेचा नुसता काथ्याकुट करत बसण्यापेक्षा ‘एमआयएम’ही जर राजकीय आणि सामाजिक समस्या/धमकी/भीती/धोका असेल तर त्यावर उपाय शोधण्यासाठी मुळाशी जावे लागेल. ‘एमआयएम’च्या विजयातून हाच धडा मिळाला आहे, हे आपण लक्षात घ्याला हवे.
=प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
[email protected]

संबंधित पोस्ट

 • Vinayak Bhale… “लोकशाहीची जी काही चौकट आपण स्वीकारल्याचा दावा करतो त्या चौकटीत राहूनच ‘एमआयएम’णे निवडणुका लढवल्या आहेत हे आपल्याला विसरता येणार नाही. तरीही ते भारतीय लोकशाहीसाठी घातक आहेत असे जर टीकाकारांचे म्हणणे असेल तर मग दोष आपण स्वीकारलेल्या चौकटीचाही आहे, हे मोकळेपणाने मान्य करण्याचा आणि तो दोष दूर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत किंवा नाही, हा खरा मुद्दा आहे.” मान्य. पण हा दोष दूर कसा होणार, सर?

  • धर्माचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वापर करणाऱ्यांवर आहे त्या कायद्याचा आधार घेत कोणताही राजकीय हस्तक्षेप न होऊ देता कठोर कारवाई करून . पण , असे केले तर सध्या अस्तित्वात असलेले बहुतेक सर्व पक्ष मोडीत निघतील !

 • Satish Kulkarni …AAPAN LIHALELE EK EK VAKYA BAROBAR AHE VA AAPAN YA SARVA RAJKARNYANCHA BURKHA PHADALA YA BADDAL ” DHANYAWAD “

 • Uday Sabnis …Kharetar asha sanghtana ban karayala pahijet.

 • SACHIN KETKAR​…​
  तुम्ही मराठवाड्याबद्दल लिहिले ते बरोबर आहे म्हणून कुरुंदकर यांच्यासारखे त्या अत्याचारत पोळ​लेले लोक हिन्दू मुस्लिम प्रश्न आला की हिंदुत्ववाद्यांच्या जवळपास जाणारी भूमिका घ्यायचे.

 • Suryakant Raje …ओवेसीने किती गरळ ओकले ते आपणांस ज्ञात आहे. ईथे ‘हे’ आणि ‘ते’ असे दोन परस्परविरोधी गट जाणीवपूर्वक केले जातात.(ब्रिटिशकालापासून भारतीय मानसिकतेस जडलेला ‘महारोग’ आहे हा.)ओवेसी अथवा तत्सम व्यक्तींचा विरोध करताना आपण त्याच्याही पेक्षा जास्त गरळ ओकतो याचे उदात्त देशप्रेमाच्या (उथळ) प्रदर्शनापायी आसुसलेल्यांना भानही राहत नाही. मार्क्स म्हणतो,”राजकारणी लोक धर्माचा वापर अफूच्या गोळीप्रमाणे वापर करतात.” ही गोळी खाऊन किती झिंगायच हे आपणच ठरवायचं असतं. गेल्या शतकाच्या सुरूवातीला, जेव्हा स्थिती एवढी बिघडलेली नव्हती, तेव्हा जाॅर्ज बर्नाड शाॅ यांनी म्हटलं होतं की,”राजकारण हा सैतानाचा अखेरचा आधार असतो.’आज शाॅ जिवंत असते तर ते काय म्हणाले असते? 84 मध्ये 8000 व 2002 मध्ये 2000 जणांना आपले प्राण गमवावे लागले.यातील बरेचजण निरपराध होते, त्यांचा व द्वेषाच्या भाषेचा काही संबंध नव्हता. ही माणसे आपल्यासारखीचं हाडामांसाची होती. खास म्हणजे दररोज घेतल्या जाणा-या प्रतिज्ञेनुसार ते आपले बांधव होते. हे म्हणाले म्हणून ते काहीतरी म्हणतात अन् कुणीतरी लगेच आमचीही विभागणी करून टाकतं. खरा प्रश्न आपल्या विभागल्या जाण्याचा आहे. डेव्हिड कॅमेरून ब्रिटिश पार्लमेन्टमध्ये ” आपण ख्रिश्चन असल्याचा सा-या इंग्लंडने बाळगला पाहिजे.” असं वक्तव्य केलं होतं. त्यावर तिथल्या 2/3 तरुणांची प्रतिक्रिया, “आम्हाला कोणीही धर्म शिकवण्याची काहीही गरज गरज नाही.” कदाचित ही प्रतिक्रिया काहीजणांना ऊद्धट तर काहीजणांना प्रगल्भ वाटू शकते. मला वाटतं आपल्यावर तब्बल 150 वर्षे राज्य करणारा इंग्लड आजघडीला प्रगल्भ आहे. खरा प्रश्न भारतीय मानसिकता प्रगल्भ होण्याचा आहे.

 • Umesh Kashikar…
  Wah Wa !! Brilliant insightful article.

 • Balwant Meshram…
  प्रणाली जे बोलली आणि ज्याची भीती तिने व्यक्त केली ते सर्व कांग्रेस ने फार पूर्वीच केले आहे. वारंवार भिती दाखवल्यानंतर ती भिती संपल्याने MIM फुलली किंबहुना MIM फुलायला कांग्रेसने दाखवलेली भिती कामी आली असे बोलायला वाव आहे.

 • Ravi Bapat …वडील म्हणाले भगवा आतंकवाद व कन्या म्हणाली हिरवा आतंकवाद ??? Action ची Reaction ???

 • Sandeep Mate …kharay sir, congress ne visheshtah yababat chintan karayalach hawe..

 • Surendra Deshpande …pakistan chi nirmiti asich zali hoti he sarv vicharvant visartat.ya sarv lokanna pakistancha aprataksha support ahech

 • Umakant Pawaskar…
  Sir, in my opinion RSS is more dangerous than MIM.