कणभर खरं, मणभर खोटं

‘कणभर खरं आणि मणभर खोटं’ बोलणाऱ्या सलमानखान या नटाचे दारूच्या नशेत कार चालवून पाच जणांना चिरडण्याच्या आरोपाखाली झालेली शिक्षा भोगण्यासाठी कारागृहाआड जाणे आणखी लांबले. आपल्या देशातील कायद्याच्या मार्गाने न्याय होण्याची/मिळण्याची प्रक्रिया कशी आरोपीच्या पथ्यावर पडते याचे उदाहरण म्हणून या घटनेकडे बघायला हव. शिवाय सलमान एकही दिवस जेलमध्ये न गेल्याने ही न्यायव्यवस्था आपली नाही, कायदा सर्वांना समान नाही, ‘सेलिब्रिटी धनिक’ पैशाच्या जोरावर कायदा वाट्टेल तसा वाकवू शकतात असा ‘मणभर खरा आणि कणभर खोटा’ संदेश यानिमित्ताने जनतेत गेला हे फारच चिंताजनक आहे. आपल्या देशातले बहुसंख्य लोक भासमय प्रतिमा हेच वास्तव समजून कसे भावनेच्या आहारी जाऊन वागतात आणि मीडियाचा तोल कसा ढळतो याचे जे दर्शन यानिमित्ताने घडले.

सलमानणने केलेला गुन्हा आणि एक नट म्हणून समाजात असणारी त्याची प्रतिमा या दोन्ही एकच असण्याची गल्लत समाजातील बहुसंख्यांनी केल्याने फार मोठा गोंधळ उडालेला आहे; त्यामुळे ‘सलमान’ असले की सर्व गुन्हे माफ अशी धारणा होण्याची भीती आहे. चित्र असे रंगवले जात आहे की, सलमान नशेत नव्हता, त्याच्या कारचे चाक बर्स्ट झाले आणि त्याच्याकडून काही लोकांना चिरडण्याचा गुन्हा घडला. त्यात एकजण ठार झाला आणि चारजण जखमी झाले. त्या मृताचे आप्त आणि जखमी चौघांची योग्य ती काळजी नंतर सलमानने घेतली आहे. शिवाय त्याने नंतरच्या काळात ६०० मुलांच्या शस्त्रक्रिया केल्या आणि गरजूंना ४२ कोटी रुपये मदत केली, त्याच्या हातात असणाऱ्या चित्रपटात मोठी गुंतवणूक झालेली असल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे म्हणून त्याला शिक्षा केली जाऊ नये. म्हणजे अतिमद्य प्राशन करून विनापरवाना कार ड्राईव्ह करण्याचा आणि त्यापुढे जाऊन नशेत कार बेधुंद चालवून फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडण्याची मुभा सलमानला मिळालेली आहे असा त्याचा अर्थ होतो. प्रत्यक्षात अशी कोणतीच मदत मृताचे आप्त किंवा जखमींना केलेली असल्याचा पुरावा समोर आलेला नाही असे निकालपत्रात नमूद करण्यात आलेले आहे, ते जर लक्षात घेतले तर सलमान खोटारडा आहे हेच समोर येते. खरे बोलण्याची शिक्षा म्हणून प्रचंड परवड सहन करावी लागलेल्या आणि अखेर मृत्युच्या वाटेवर कवडीमोलाने गेलेल्या रविंद्र पाटील याच्याविषयी किंचितही सहानुभूती न दाखवणारा सलमान कनवाळू काळजाचा नसणाराच आहे. शेवटच्या क्षणी स्वत:ची शिक्षा वाचावी म्हणून घटना घडली त्यावेळी अशोक हा चालक कार ड्राईव्ह करत होता असा बचावाचा पवित्रा सलमानने घेतला त्याचा अर्थ आणखी एका सामान्य माणसाला बळीचा बकरा बनवण्याची तयारी केलेली होती हे विसरता येणार नाही.

घटना घडली तेव्हा अशोक कार ड्राईव्ह करत होता असा पवित्रा शेवटच्या क्षणी जेव्हा घेतला गेला तेव्हाच चित्रपटाच्या पडद्यावर फुकाच्या बेडकुळ्या फुगवत दबंगगिरी करणारा सत्यवादी सलमान, शिक्षा होणार म्हणून प्रत्यक्षात मात्र गर्भगळीत झालेला आहे हेच संकेत मिळालेले होते. जिल्हा न्यायालयात शिक्षा सुनावली गेल्यावर काही मिनिटातच बचावासाठी याचिका घेऊन (अशीलाकडून सर्वाधिक फी आकारणारे देशातील नंबर एक अशी ज्यांची ख्याती असल्याचे बोलले जाते ते) वकील उच्च न्यायालयात पोहोचले तेव्हाच सलमानने पैशाच्या ताकदीवर किती ‘मोठ्ठी’ तयारी केलेली आहे हे स्पष्ट झालेले होते. उच्च न्यायालयात जर शिक्षेला आव्हान देणारी याचिका दाखल झाली नाही तर दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची जय्यत तयारी करण्यात आलेली होती , अशी माझी माहिती आहे . सलमान पापभिरू वगैरे नाही आणि पडद्यावर दिसतो तसा धैर्यवानही नाही . अतिधन आणि नट म्हणून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे माज चढलेला अहंकारी माणूस आहे हे यापूर्वी अनेक प्रसंगात समोर आलेले आहे . जिच्यावर तो प्रेम करतो आणि जिच्याशी तो विवाह करणार असल्याच्या चर्चा होत्या त्या सहअभिनेत्रीला शुटींगच्या वेळी मारहाण करणारा , सिगारेटचे चटके देणारा , भररात्री तिला घराबाहेर काढणारा , चाहत्यांना मारहाण करणारा आणि अशाच बेधुंद गुर्मीत काळविटाची शिकार करणारा , अशी त्यांची पार्श्वभूमी आहे .

सलमान जर खरेच कनवाळू असता तर घटना घडल्यावर पळून जाऊन दुसऱ्या दिवशीपर्यंत तोंड लपवून न बसता लगेच जखमीना मदतीचा हात देता , पडद्यावर दाखवला जातो तसा सत्यवादी असता तर ‘कर नाही तर डर कशाला’ या बाण्याने खटल्याला समोर गेला असता आणि खटला लांब-लांब-लांबवण्याचा प्रयत्न प्रचंड पैसा खर्च करून त्याने केला नसता, उलट हा पैसा गरजूंना सहाय्य म्हणून दिला असता, द्बंग आहे तर खटल्याच्या सुनावणीच्या अंतिम टप्प्यात अशोक हा चालक कार ड्राईव्ह करत होता असे व्हाऊचर फाडण्याचा प्रयत्न त्याने केला नसता, ‘दारूच्या नशेत कार ड्राईव्ह करू नका’ हा रविंद्र पाटीलचा सल्ला त्याने धुडकावून लावला नसता आणि ‘सलमाननेच दारूच्या नशेत कार ड्राईव्ह करून लोकांना चिरडले’ असा निर्भीड पवित्रा घेणाऱ्या पोलीस शिपाई रविंद्र पाटीलच्या आयुष्याची शोकांतिका होऊ न देण्याची संवेदनशीलता सलमानने दाखवली असती… यापैकी काहीही न करता सलमान प्रत्यक्षात वागला तो एखाद्या निष्ठुरासारखा. म्हणून म्हटले सलमान प्रकरण ‘एक सलमान नावाचा एक नट आहे हे ‘कणभर खरं आणि मणभर खोटं आहे’. या पार्श्वभूमीवर पडद्यावरची प्रतिमा वास्तव समजून प्रत्यक्षात मात्र पत्थराचे काळीज असणाऱ्या सलमानला शिक्षा होऊ नये म्हणून तरुणाई झुंडीने त्याच्यावर जीव ओवाळून टाकते, त्याला जामीन मिळावा म्हणून देवाला साकडे घालते, जामीन मिळाल्यावर पेढे वाटून-फटाके फोडून ही तरुणाई जल्लोष करते ही मानसिकता चिंताजनक आहे. हा जल्लोष नसून उन्माद आहे आणि तो ‘सलमानी कुप्रवृत्ती’ समाजात फोफावण्यास अनुकूल आहे हा धोक्याचा इशारा या झुंडीने आजच समजून घ्यायला हवा.

संजय दत्त पोलिसांना शरण आला तेव्हा जसा इलेक्ट्रॉनिक्स मिडियाने बेतालपणा दाखवला होता तस्सेच सलमानच्या शिक्षेच्या निमित्ताने घडले. वकिलाने केलेले बचावाचे एखादे विधान किंवा न्यायालयाने केलेली एखादी विचारणा फारच महत्वाची असल्याची परस्पर ग्वाही एखाद्या कायदेतज्ज्ञाच्या अविर्भावात देत हा जणू काही निकालाचा कल असू शकतो किंवा आहेच असेच इलेक्ट्रॉनिक्स मिडियाने ठासून सांगितले. (यात मग गमती घडल्या, आरोपी न्यायालयात मागणी करत नसतो, ते काय एखाद्या राजकीय पक्षाचे ऑफिस किंवा सरकार थोडीच आहे? उच्च न्यायालयात करावी लागते याचना आणि दखल केली जाते ती याचिका-अर्ज नव्हे, हे भानही बहुसंख्य इलेक्ट्रॉनिक्स मिडियाचे सुटले. जाणत्यांचे मनोरंजन झाले.) म्हणजे निकाल लागण्याच्या दृष्टीकोनातून काय महत्वाचे आणि काय नाही हे मिडिया ठरवणार, असे जर असेल तर देशातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स मिडिया हाऊसेस बंद करून त्यांना न्याय-निवाड्याचे काम द्यायला आणि टीआरपी वाढवण्यासाठी अशा खटल्यांचे थेट प्रक्षेपण इलेक्ट्रॉनिक्स मिडियाने करायला हरकत नाही! कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका वरिष्ठ न्यायालयाने दाखल करून घेतली की, त्या दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेचे परिणाम म्हणून झालेली त्या याचिकेचा निर्णय होईपर्यंत शिक्षा भोगण्यापासून सूट मिळालेली असते, ती शिक्षा माफ झालेली नसते. म्हणजे शस्त्रक्रियेसाठी शरीराचा कापलेला भाग डॉक्टरांना पुन्हा शिवावा लागतोच तश्शी ही प्रक्रिया आहे. काही मिडियाकडून चित्र मात्र असे रंगवले की जणू सलमानची शिक्षा संपुष्टात आली, शिक्षा टळली, सलमान राहणार मोकळा अशा हेडलाईन्स झळकू लागल्या. काही मिडियाने सलमानला मिळालेल्या जामीनाची तुलना सुब्रतो राय, आसारामबापू, तेजपाल, यांच्या जामीनाशी केलेली तुलना ‘घोर अज्ञान’ या सदरातच मोडणारी होती, कारण या सर्वाना लावलेली कलमे-त्यांचे स्वरूप वेगळे आहे. खटल्याचा निकाल, झालेली शिक्षा, आहे त्याची मुदत वाढवलेला विस्तारीत आणि नव्याने मिळणारा जामीन, सलमानला भेटणारे सेलिब्रिटी आणि त्यामुळे समाजाची धोक्यात आलेली/नआलेली नीतीमत्ता… हे सर्व कव्हरेज म्हणजे या देशाचा श्वास आहे आणि या देशासमोर अन्य काही प्रश्नच शिल्लक नाहीत असेच चित्र मिडियात होते. या देशात गरीबाला न्याय नाही आणि सलमानला (म्हणजे श्रीमंताला) मात्र पाहिजे तसे, ही गंभीर चर्चाही अशीच मूळ मुद्द्यापासून दूर गेली. न्यायव्यवस्थेतले दोष दूर करायचे असतील आणि खटले असे १३ वर्ष चालवू द्यायचेच नसतील तर कायद्यात दुरुस्त्या कराव्या लागतील. कोणता खटला किती मुदतीत पूर्ण झाला पाहिजे याचे निकष ठरवावे लागतील, त्यासाठी न्यायव्यवस्थेचे हात बळकट आणि कायदे कठोर करावे लागतील, आरोपींनी पोलिसांना दिलेला जबाब अंतिम मानला जाईल (आणि अत्यंत अपवादात्मक स्थितीत तो अमान्य करता येईल ) इतकी आपली पोलीसयंत्रणा सक्षम आणि पारदर्शी करावी लागेल. आरोपीने पोलिसांना दिलेला जबाब किंवा पोलिसांसमोर केलेले वक्तव्य मान्य केले गेले आणि ‘तारीख पे तारीख’वर मर्यादा आणली तर अर्धे खटले कमी होतील (आणि वकील मंडळी जाम नाराज होतील!), खोट्या तक्रारी किंवा खटले दखल केल्याचे सिद्ध झाले तर ते करणाराला मोठा दंड आणि कडक शिक्षेची तरतूद केली तर खटले आणखी कमी होतील… अशा अनेक मुलभूत बाबी आहेत . पण, त्या राहिल्या दूर आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडियाने गरीब-श्रीमंताचा मुद्दा अशी बगल दिली… हे म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे! इलेक्ट्रॉनिक्स मिडियाच्या अशा आततायीपणामुळे लोकांचा गैरसमज होण्याचा, दिशाभूल होण्याचा धोका आहे. ‘जे सत्य नाही तेच अटळ सत्य’ अशी स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सलमानप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक्स मिडियाही ‘कणभर खरं आणि मणभर खोटं’ वागतो/दाखवतो अशी वस्तूनिष्ठ टीका जर कोणी केली तर इलेक्ट्रॉनिक्स मिडियाने आततायीपणा न करता त्याकडे मार्गदर्शन म्हणून पाहिले पाहिजे.

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट