कोण हे अमित शहा ?

बिहार आणि उत्तर प्रदेशात फिरताना अनोळखी माणसाशी संभाषणाला सुरुवात केली की साधारणपणे ९०-९५ टक्के लोक प्रतिसाद देतात तो , ‘कौन जाती हो ?’ या प्रतिप्रश्नाने . रेल्वे असो की बस प्रवासात सरकून जागा करून देता-घेताना सरसकट सर्वाकडून सर्वांच्याच जातीची विचारणा होते … आपण चहाच्या ठेल्यावर किंवा पानाच्या टपरीवर असलो किंवा बाजारात तरीही हाच प्रश्न समोरून येतो , सवय नसलेली माणसे मग गांगरून जातात . उत्तर प्रदेशियांना मात्र त्याचे काही म्हणजे काहीच वाटत नाही ! याचे कारण उत्तर प्रदेशचे राजकारण , समाजकारण एवढेच कशाला सर्वसामान्य माणसाचे दैनंदिन जीवन पूर्णपणे धर्माधिष्ठित तसेच जाती आधारितच आहे आणि ते लपवून ठेवावे असे कोणालाच वाटत नाही . त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत बहुजन समाजवादी पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केलेला ‘सोशल इंजिनिअरिंग’चा केलेला प्रयोग धाडसी ठरला होता . हा प्रयोग होईपर्यंत सर्वच पक्षाची नाळ कोणत्या ना जाती-धर्माशी पक्के जोडली गेलेली होती म्हणून मायावती यांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगाला निवडणुकीत मोठ्या बहुमताचा प्रतिसाद मिळाला होता. अशा या जाती-धर्माचे प्राबल्य असलेल्या उत्तर प्रदेशाची भारतीय जनता पक्षाची सर्व सूत्रे ‘एन्काऊन्टर स्पेशालिस्ट’ म्हणून परिचित असणा-या अमित शहा यांच्याकडे पंतप्रधानपदी आरूढ होण्यास आतुर झालेल्या नरेंद्र मोदी यांनी सोपविली तेव्हा राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या . बाळासाहेब ठाकरे-प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांनी सेना-भाजपच्या सत्ताप्राप्तीसाठी मराठा लॉबीच्या विरोधात महाराष्ट्रात बहुजनांना एकत्र करण्याचा प्रयोग केला तो आता राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी याच अमित शहा यांच्या मदतीने करत आहेत म्हणूनही , अमित शहा २०१४च्या लोकसभा निवडणुकीत चर्चेत आहेत आणि अन्य राजकीय पक्षांचे टिकेचे टार्गेटही अमित शहा हेच आहेत . आता तर त्यांच्याविरुद्ध प्रचारात सुडाची भाषा केल्याबद्दल गुन्हाही दाखल झालेला आहे.

अमित शहा म्हणजे नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक एव्हढी ओळख पुरेशी नाही . हा माणूस सध्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात मोदी यांचे डोळे आणि कानही म्हणायला हरकत नाही इतका महत्वाचा झालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतातील राजकारणाचा केंद्रबिंदू अमित शहा आहेत . मोदी यांना अनुकूल ठरेल असा , हवा तो आणि हवा तसा राजकीय निर्णय घेऊन ते थेट मोदी यांनाच ‘रिपोर्ट’ करतात . म्हणूनच रामविलास पासवान यांच्या पक्षाशी युती होणार असल्याची बातमी भाजपच्या अनेक नेत्यांना वृत्तपत्रातूनच कळली . अमित शहा साधारणपणे पक्षाच्या कार्यालयात येत नाहीत आणि आले तर त्या परिसरात केवळ सन्नाटा पसरलेला असतो . ते पत्रकारांना फारसे भेटत नाहीत आणि भेटले तरी जिभेपेक्षा कानांचाच वापर जास्त करतात . या माणसाची ऐकून घेण्याची क्षमता आणि त्यासाठीचा संयम चिवट व व्यापक आहे यात शंकाच नाही . अमित शहा यांचा आदेश , सल्ला , निर्णय म्हणजे नरेंद्र मोदी यांचा हुकुम असे वातावरण आणि अमित शहा यांच्या कोणत्याही म्हणण्याकडे दुर्लक्ष म्हणजे म्हणजे जणू काही नरेंद्र मोदी यांचा अवमानच असा सार्वत्रिक ठाम समज भारतीय जनता पक्षात राष्ट्रीय स्तरावर आहे .

अमित शहा यांचा जन्म १९६४ सालचा . त्यांचे वडील अनिलचंद्र हे गुजराथेतील अहमदाबादचे एक बडे व्यावसायिक . बडे म्हणजे धनाढय म्हणता येईल असे बडे प्रस्थ . अमित शहा यांचे शिक्षण अहमदाबादलाच झाले . घरच्या प्रथा-परंपरेप्रमाणे ते लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले . शालेय शिक्षण संपल्यावर अमित शहा यांनी बायो-केमिस्ट्री या विषयात पदवी संपादन केली . महाविद्यालयात असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते होते . विद्यार्थी परिषदेचे काम करतानाच त्यांच्याकडे नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले गेले . पदवी घेतल्यावर अगदी अल्प काळ का होईना अमित शहा यांनी शेअर्स ब्रोकर म्हणून काम करत असतानाच मोदी यांनी भारतीय युवा मोर्चाची जबाबदारी सोपवत त्यांना राजकारणात आणले . याच काळात लालकृष्ण अडवाणी यांच्या संपर्कात अमित शहा आले आणि त्यांचेही उजवे हात बनले . तीन लोकसभा निवडणुकात अमित शहा हे अडवाणी यांचे निवडणूक ‘व्यवस्थापक’ होते . अडवाणी आणि तोपर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून स्थिरावलेल्या मोदी यांचा वरदहस्त असल्यावर अमित शहा यांचा वारू गुजरातच्या राजकारणात चौफेर उधळला . नंतर गुजरात आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद अमित शहा यांच्याकडे मोदी यांनी सोपविले . इतक्या महत्वाच्या महामंडळावर जेमतेम मिसरूड फुटलेल्या अमित शहा नावाच्या तरुणाची नियुक्ती केल्याबद्दल मोदी यांच्याकडे भाजपच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली , पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या . अडवाणी यांच्या रथाचे सारथ्य केलेल्या आणि गुजरातचे सर्वेसर्वा झालेल्या नरेंद्र मोदी यांनी त्या तक्रारींकडे अर्थातच साफ दुर्लक्ष साफ दुर्लक्ष केले आणि श्रेष्ठींना करायला लावले . हे कमी की काय म्हणून २००३मध्ये विधानसभेवर निवडून आणून अमित शहा यांचा मंत्रिमंडळात गृह खात्याचे राज्यमंत्रीपद देऊन समावेश केला . तेव्हा गुजराथ राज्याच्या मंत्रीमंडळातील अमित मोदी हे सर्वात तरुण सदस्य होते . अमित शहा यांना विरोध न करण्याचा संकेत कोणताही आडपडदा न ठेवता मोदी यांनी पक्षांतर्गत दिला आणि अमित शहा म्हणजे नरेंद्र मोदी हा इशाराही तेव्हाच स्पष्टपणे दिला . तेव्हापासूनच अमित शहा यांचा शब्द म्हणजे मोदी यांचा आदेश हे समीकरण गुजरात राज्यात रूढ झाले .

त्यानंतर गुजराथमधील दंगली आणि त्यांना मिळालेले नरेंद्र मोदी यांच्या धर्माधिष्ठित हिंस्र उत्तेजक समर्थनाचा काळाकुट्ट अध्याय घडला , तो जगासमोर आला . त्यात अमित शहा यांचा अर्थातच सक्रिय सहभाग होता . सोराबुद्दीन फेक एन्काऊंटरने तर सर्च बाबी लखलखितपणे समोर आल्या आणि राजकारण्यांची संवेदनशून्य , अमानवी , काळी बाजू जगासमोर आली . हे घृणित कृत्य समोर आणण्यात उमेद न हरता लढणारे कार्यकर्ते जसे हिंमतबाज आहेत तशीच आपली न्यायव्यस्था आहे त्यामुळेच अखेर अमित शहा यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला , कारागृहाची हवा चाखावी लागली आणि आता ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरात राज्याच्या बाहेर उत्तर प्रदेशात वास्तव्याला आहेत . अलीकडच्या काळात मोदी यांच्या मर्जीखातर एका तरुणीवर पाळत ठेवण्यासाठी अमित शहा यांनी पोलीस दलाचा गैरवापर केल्याची घटना उघडकीस आली . अमित शहा यांच्या खात्यावर आणखी एका वादग्रस्त घटनेची नोंद झाली आहे !

खलपुरुष म्हणून अमित शहा हे काही भारतीय राजकारणातील एकमेव उदाहरण नाही आणि भारतीय जनता पक्ष हा काही अशा एखाद्या विषवल्लीला खतपाणी घालणारा एकमेव राजकीय पक्ष नाही . काही राजकीय पक्षांचा आधारच धर्म आणि जाती द्वेष आहे तसेच सर्वच राजकीय पक्षात वेगळ्या नावाने वावरणारे ‘अमित शहा’ आहेत . भारतीय जनता पक्षाचे अमित शहा जसे फोफावले तसे फोफावण्याची अन्य राजकीय पक्षातील या प्रत्येकाची मनीषा आहे आणि तो खरा धोका आपल्या सर्वधर्मसमभावाधिष्टीत लोकशाहीसमोर आहे .

-प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट

  • Shridhar Damle Chicago

    Amit Shah did not born  in Chicago.According to Wikipedia He borned in Mumbai. due to lack of your indpth information about  active role of Amit Shah along with Narendra Modi during ‘ dark riots of Gujarat  and  fake encounters to SIT, Narendra Modi got clean chit .Regarding fake encounter, CBI doing investigation, and is in th court,Does your pseudo secular or specifically anti Hindutva or anti RSS  jealousy virus  prevent you to wait till out come of court decision and presented Amit Shah as a villian ? or are you worry that like Ayoudhya decision and Sit clean shit, Amit Shah court decision will be bitter pill to swallow ?  Before you raise ‘Snoop gate’ pl see interview of Amit Shah in Apaki Adalat in which he explained about his silence.You praised social Engineering ‘ experiment for vote bank of Mayavati, but linked Amit Shah’s attempt with caste mind set . Generally your article is objective reporting, but in this article  your belief system overshadow and prove “Reinforcement theory”  ( people select, retain and write what would like to satisfy their preconvinced  belief ) .

    • hon. damleji , i respect your opinion but can not not endorse.

  • lharshal

    Amit Shah yancha 8 A Utara vachayala dilat, tyabaddal manapasun abhari ahe. Amit Modi asa eke thikani ullekh jhala ahe, pan harkat nahi. te hi samarpak lagu hote.