ट्युशन्स – एक स्वानुभव!

(अकरावी-बारावी प्रवेशांचे दिवस पुन्हा आलेले आहेत. हवं ते महाविद्यालय मिळेल का नाही, मिळेल त्यात गंभीरपणे शिकवतील का आणि त्यात ट्युशन्स हाही एक कळीचा मुद्दा. यावरचा एक स्वानुभव…)

दहावीचा निकाल लागला, लेकीला ७९ टक्के मार्क्स मिळाले. सगळ्याच विषयात विशेष प्राविण्य मिळालं. बापाचं ५५ टक्क्यांचं तर लेकीची आई नेहेमीच फर्स्टक्लास करिअर असलेली. पण, आजवर एकूणच या खानदानात कुणी एव्हढे मार्क्स कोणी मिळवलेले नव्हते. लेकीच्या या यशानं बाप म्हणूनच जाम खूष झाला. स्वत:च्या आणि लेकीच्याही मित्र-मैत्रिणींना त्यानं दणदणीत पार्टी दिली. पार्टीची पेंग उतरलेली नसतानाच दुस-या दिवशी सकाळी लेकीनं सांगितलं,

‘आता ट्यूशन लावायला हवी.’

‘कां’, बापानं विचारलं.

‘कारण मिळाले त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळायला हवे आहेत. शिवाय अकाऊंटस, बुक किपिंग, इकॉनॉमिक्स वगैरे विषयांसाठी ट्युशन्स आवश्यकच आहेच’, लेक उत्तरली.

‘म्हणजे तू आर्टस नाही घेणार?’ आश्चर्यचकित होऊन बापानं लेकीला विचारलं.

‘not at all’, पटकन्‌ प्रतिसाद देत लेक म्हणाली, ’बी.कॉम. होणार. नंतर एम.बीए. करणार आणि managementमध्ये करियर करणार’, लेक ठाम स्वरात म्हणाली.

एवढुशी लेक आता मोठी होऊन इतक्या ठामपणे बोलताना बघून बापाला एकीकडे बरं तर, दुसरीकडे तिनं आर्टस्‌ न घेण्याबद्दल वाईट, असं संमिश्र दाटून आलं. लेकीनं इंग्रजीसह अर्थशास्त्र, राज्यशास्त्र वगैरे विषय घेऊन बी.ए./एम.ए. करावं; असं बापाचं स्वप्न होतं. मग त्यावर वाद झाला.लेक मागे हटणार नाही हे स्पष्टच होतं. ठरवल्याप्रमाणे लेकीनं कॉमर्सला प्रवेश घेतला आणि तिचं अकरावी-बारावीचं रुटीन सुरु झालं.

पुढची दोन वर्ष भुर्रकन उडणार हे स्पष्ट झालं. सकाळी सहाला उठणं आणि ट्युशन्सला पळणं मग अकरा ते दोन कॉलेज. घरी आल्यावर सकाळच्या ट्युशन्सचा अभ्यास की लगेच पुन्हा ट्युशन आणि रात्री उशिरापर्यंत पुन्हा कॉलेज तसंच संध्याकाळच्या ट्युशनचा अभ्यास. अभ्यासाला दिवसाचे २४ तास कमी पडायला लागले. स्वाभाविकच तिची हेळसांड होऊ लागली. लेकीच्या खाण्या-पिण्यातल्या हेळसांडीने चिंतित झालेल्या आईनं अभ्यास करता-करताच लेकीला खाणं भरवण्याचा उद्योग सुरु केला. दिवसातल्या तासांची संख्या वाढवायला हवी अशी तक्रार लेक करू लागली. पण, ते काही बापाच्या हातात नव्हतं! अकरावीच्या वर्षभर हे असाच सुरु राहिलं.

अकरावीच्या परीक्षेनंतर तर हे शेड्यूल आणखी बिझी झालं. उन्हाळ्याच्या सुटीतही ट्युशन्स क्लासेस होते सुरूच राहिले. त्यामुळे बाहेर कुठे भटकंती झाली नाही. कुणाकडे पार्टीला जाणं नाही, शांतपणे बसून एखादा सिनेमा पाहणं नाही; क्रिकेट खूप आवडत असूनही क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या काळातही लेक अभ्यास एकं अभ्यास करत राहिली. या काळात तिचा अविर्भाव असा की जणू तिला क्रिकेट काही कळतच नाही! एरव्ही ढणाढणा वाजणाऱ्याम्युझिक सिस्टिमवर धुळीचे थर चढली पण, त्याकडे लेकीचं लक्षच नव्हतं.

बारावीचा निकाल लागला. तसा नेहेमीप्रमाणे बोर्डातून निकाल बापाला तीन-चार दिवस आधीच कळला होता. लेकीला ८१ टक्के मार्क्स मिळाले. कॉमर्समध्ये ८१ टक्के म्हणजे चांगलेच मार्क्स होते. निकाल अधिकृतपणे कळल्यावर बहुदा लेकीला गिल्टी वाटू लागले. निकालानंतर सेलिब्रेशनचा विषयसुध्दा घरात निघाला नाही. बापाने दोन-तीनदा सुचवलं पण, लेकीनं तो विषय उडवून लावला. घरात जणूकाही एक घुसमट मुक्कामाला आलेली होती. या घुसमटीत आणखी ५/६ दिवस गेले आणि लेकीनं बापासमोर कन्फेशन दिलं, ’ट्युशन्स लाऊन खूप मोठा उपयोग झालेला नाही. इतका वेळ आणि पैसा खर्च करून दोन-अडीच टक्के मार्क्स वाढण्यात काही दम नाही!’

ट्युशन्सने फार काही फरक पडणार नाही हे मला माहीत होतं’ बाप फिस्करला.

‘तुला अनेक गोष्टी आधीच माहीत असतात पण, त्याचा मला काहीच उपयोग नसतो’, लेकीने बापाला फटकारलं पण, त्या फटकारण्यात फार काही दम नव्हता हे लगेच सिध्द झालं. तिच्या डोळ्यात ढग दाटून आले… ते केव्हाही कोसळतील अशी चिन्हे दिसू लागली. मग बापानं लेकीला कवेत घेतलं. लेकीनं अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कन्फेशनचा पुरता निचरा झाल्यावर बाप म्हणाला, ‘ दिवसाचे सतरा-अठरा तास तू अभ्यासात घालवले. ट्युशन्सच्या प्रत्येक विषयाला प्रत्येक वर्षाला बारा हजार रुपये खर्च केले. म्हणजे एका अर्थाने मार्क्स विकतच घेतले की! या पैशात आणखी लाखभर रुपयांची भर टाकून manage करून सरळ मार्क्स विकतच घेतले असते तर आठ-दहा टक्के तरी आणखी आले असते!’

‘असं manage करायचं असतं तर अभ्यास कशाला केला असता? सगळ्यांनी ट्युशन्स लावली म्हणून मलाही वाटत होतं की आपणही जावं. शिवाय पैसे हा काही प्रॉब्लेम तर नव्हता आपल्या घरात ना?’, लेकीनं बाजू मांडली.

‘प्रश्न पैशांचा नाहीच. मित्र-मैत्रिणी काय करतात यापेक्षा आपल्यात काय आहे, किती आहे आणि शिकतानाही आनंद मिळू शकतो का हे जास्त महत्वाचं. आनंद न देणा-या आणि ज्ञानाची व्याप्ती न वाढवणा-या शिक्षणाचा उपयोग तर काय?’ बाप म्हणाला.

‘म्हणजे काय?’, लेकीनं विचारलं.

इट्स व्हेरी सिम्पल, बाप सांगू लागला, ‘ गेली दोन वर्ष तू खाण्या-पिण्याची हेळसांड केली. कोणत्याही पार्टीला आली नाहीस. दर रविवारी दुपारी बाहेर जेवायला जाण्याचा आपला रिवाज गेल्या दोन वर्षात आपण पाळलेला नाही. गेल्या दोन वर्षात तू आठ-साडेआठपर्यंत अंथरुणात लोळत पडलेली नाहीस. कोणत्याही कार्यक्रमाला आली नाहीस. आवडती गाणी ऐकली नाहीस, एकही सिनेमा पहिला नाहीस, क्रिकेटचा सामना बघितला नाही, घरात आरडा-ओरडा केला नाहीस, हट्ट करुन शॉपिंग केलं नाहीस, नवे कपडे घालून मिरवली नाहीस… एक ना अनेक आणि इतकं सगळं मिस करून कमावलं काय तर अडीच टक्के मार्क्स… असा हा हिशेब आहे. अकाउंट जुळतं का कुठे? ट्युशन्स लाऊन दहा-पंधरा टक्के मार्क्स कधीच वाढत नसतात. तू स्वत:च्या बुध्दीमत्तेवर ७९ टक्के मार्क्स मिळवले होते. इतका सारा खटाटोप न करताही थोडा अभ्यास जास्त केला असतास तरी ही वाढ तू मिळवली असतीस. तसं न करता तू तुझ्या आयुष्यातली दोन वर्ष निरस केलीस, नापास केलीस.’

‘हे झालं ते तर खरं पण, आता बोलून काही उपयोग आहे का त्याचा? आणि वारंवार ते बोलून तू मला वीट आणणार, चिडवत राहणार आहेस का? एक ठरलं आता, एखाद्या विषयात नापास व्हायची भीती असेल तरी मी ट्यूशन लावणार नाही यापुढे’, लेकीनं जाहीर करून टाकलं.

‘चिडवणार तर आहेच नक्की कारण पैसे माझ्या खिशातून गेले आहेत’, बापाने जाहीर करून टाकले.

‘धिस इज नो जस्टीस. बापानं बापासारखं राहावं’, लेकीनं ठणकावलं. ’नो वे, तुझं हे असं वागणं सहन केलं जाणार नाहीचं’, असं म्हणत लेकीनं बापाच्या गळ्यात हात घातला आणि म्हणाली ‘ आय लव्ह यू बाबा..’ बापाचा सगळा विरोध साहजिकच मावळला. त्याने लेकीला लगेच प्रतिसाद दिला. मग लेक बारावी झाल्याची पार्टी देण्याच्या बेतात दोघे बुडून गेले. लेकीच्या चेहेर्‍यावर हसू आणि अंगात उत्साह संचारला. त्या घरात पुन्हा चैतन्य पसरलं.

तीन-चार दिवसांनी सगळ्याच स्थानिक वृत्तपत्रात लेकीनं लावलेल्या ट्युशन्स क्लासेसची जाहिरात होती. बारावीच्या परीक्षेत त्या क्लासेसचे जे विद्यार्थी गुणवंत ठरले त्यांची छायाचित्रं त्या जाहिरातीत होती. लेकीचा फोटो त्यात अर्थातच अग्रस्थानी होता. तो फोटो बघून बापाला सहाजिक आनंद झाला. सकाळचे नऊ वाजले तरी लोळत पडलेल्या लेकीला गदागदा हलवत त्यानं उठवलं आणि तो फोटो दाखवला. तो बघितला न बघितला करत अंक बापाकडे फेकत ती म्हणाली, असा फोटो पेपरमध्ये येण्यासाठी कराव्या लागणा-या मेहेनतीपेक्षा सकाळी नऊपर्यंत लोळणं जास्त आनंदाचं आहे. तू जा आता. मला झोपू दे’, असं म्हणत लेकीनं पांघरून ओढलं. वृत्तपत्र उचलून बाप लेकीच्या खोलीबाहेर पडला तेंव्हा त्याच्या चेहे-यावर मोठ्ठ समाधान पसरलेलं होतं.

पुढे यथावकाश लेक कोणतीही ट्युशन किंवा क्लास न लावता रीतसर एमबीए झाली. एमबीए करतांना लेकीनं सिनेमे पाहणं, क्रिकेट सामने टीव्हीवर आणि मैदानावर जाऊन पाहणं, पार्ट्यांना जाणं कायम ठेवलं तरी तिला ८० टक्के मार्क्स मिळालेच. कॅम्पसमध्ये झालेल्या मुलाखतीत तिचे निवड टाटात झाली.

आता एका बहुराष्ट्रीय कंपनीत ती बड्या हुद्द्यावर आहे. ‘एन्जॉय करा, ट्युशन नका लावू’चा धोशा सर्वांच्या मागे आता ती लावत असते.

-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क +९१९८२२०५५७९९
praveen.bardapurkar@gmail.com
==========================================
​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी

लिंक – http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
==========================================

संबंधित पोस्ट