तोगडियांचे नकाश्रू…

विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांना प्रकाश वृत्त वाहिन्यांवर ‘लाईव्ह’ अश्रू ढाळतांना पाहिल्यावर या माणसात कोडगेपणा खच्चून भरलेला आहे याची खात्री पटली . राम मंदिराच्या उभारणीसाठी आधी विखारी धर्मांध चळवळ आणि नंतर त्यापेक्षाही जास्त विखारी आंदोलन करतांना मरण पावलेल्या किंवा गुजरातेत झालेल्या दंगलीत बळी पडलेल्या कोण्याही जाती-धर्माच्या माणसाच्या मरणानं दु:ख होऊन किमान एखादा तरी अश्रू तोगडिया यांच्या डोळ्यातून बाहेर पडल्याचा आजवरचा अनुभव नाही . गेला बाजार , या आंदोलनाने धार्मिक विद्वेष टोकाचा वाढून समाजात फूट पडली , अस्वस्थतेचं मळभ देशात कायमचं मुक्कामाला आलं , अनेकांच्या डोळ्यातले अश्रू सुकले आणि समाजाच्या एका गटात तर अपरंपार भय निर्माण झाल्यावर तरी त्याबद्दल पश्चातापाचा एखादा तरी अश्रू प्रवीण तोगडिया यांनी गाळल्याचा एकही दाखला नाही . आता मात्र स्वत:वर आलेल्या तथाकथित मरणाच्या ( खरं तर बाजूल फेकलं जाण्याच्या ! ) सावटाने राम मंदिरासाठी प्राण देण्याची ‘शूर’ भाषा करणारे तोगडिया भयभीत झाले असून जाहीरपणे ते अश्रू ढाळत आहेत ; त्याला नकाश्रू हाच शब्द योग्य आहे !

१२ डिसेंबर १९५६ रोजी गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील एका खेडेगावात प्रवीण तोगडिया यांचा जन्म झाला आणि वयाच्या १२व्या वर्षी अहमदाबादला स्थानांतरीत झाल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची जुळलेली नाळ किमान त्यांच्या बाजूनं तरी अजूनही कायम आहे . ‘त्यांच्या बाजूनं अजूनही कायम आहे’ असं एवढ्यासाठी म्हटलं की , आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रवीण तोगडिया आपले वाटत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली असल्याचं परिवारात उघडपणे बोललं जात आहे . कारण , संघ तसंच एकेकाळचे जीवश्च्चकंठ्श्च्च मित्र नरेंद्र मोदी आणि प्रवीण तोगडिया यांच्या दुरावा निर्माण झाला आहे . अर्थात त्यासाठी कारणीभूत आहे प्रवीण तोगडिया यांचा महत्वाकांक्षी स्वभाव . याचा अर्थ नरेंद्र मोदी महत्वाकांक्षी नाहीत असा मुळीच नाही ; म्हणून जरा वेगळ्या शब्दात स्पष्टच सांगायचं तर , हा तोगडिया आणि मोदी या दोन महत्वाकांक्षामधील उफाळून आलेला संघर्ष आहे आणि नरेंद्र मोदी त्यावर मौन बाळगून आहेत !

नरेंद्र मोदी आणि डॉ. प्रवीण तोगडिया हे दोघेही रा. स्व. संघाचं ‘प्रॉडक्ट ’ . दोघंही अगदी कट्टर केडर बेस्ड . शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबादलाच घेतलेले प्रवीण तोगडिया हे कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी म्हणून ओळखले जात , त्यामुळे वैद्यक पदवी अभ्यासक्रमाला सहज प्रवेश मिळवून ते डॉक्टर ( एम बी बी एस ) झाले . पदवी मिळाल्यावर डॉ. प्रवीण तोगडिया यांनी एमएस ही पदवी संपादन केली . रुग्णाला झालेल्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियात ( Surgical Oncology ) ते पारंगत होते आणि अहमदाबादेत एक धन्वंतरी नावाचं एक रुग्णालयही त्यांनी सुरु केलेलं होतं . अर्थात वैद्यक व्यवसायापेक्षा तोगडिया यांचं मन संघाच्या कामात जास्त गुंतलेलं होतं ; हे ओघानं आलंच . संघातून डॉ. प्रवीण तोगडिया यांची १९८३साली विश्व हिंदू परिषदेकडे तर नरेंद्र मोदी यांची १९८४ साली भाजपकडे रवानगी करण्यात आली . निष्ठावान स्वयंसेवकांना परिवारातल्या विविध संस्था संघटनांकडे असं ‘डेप्युटेशन’वर पाठवण्याची संघाची परंपरा आहे . भाजपच्याही जिल्हा , राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कार्यकारिणीतही संघाचे असे स्वयंसेवक पाठवलेले असतात !

पुढे भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदी यांना दिल्लीला राष्ट्रीय पातळीवर सामावून घेतलं तर कडव्या हिंदुत्वाची धार असणारं अत्यंत आक्रमक वक्तृत्व असणारे डॉ. प्रवीण तोगडिया विश्व हिंदू परिषदेत मोठ्ठ प्रस्थ बनले . धार्मिक भावनांना थेट हात घालणारी प्रक्षोभक भाषणं आणि खाजगीतही बोलतांना विखारी , भडक भाषा हे प्रवीण तोगडिया यांचं बलस्थान बनलं . अंगार ओकणाऱ्या या भाषेतून आणि त्यातून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे राम मंदिर उभारणी चळवळीतले ते आघाडीचे ; इतके आघाडीवरचे की ‘स्टार प्रचारक’ बनले की , धार्मिक विद्वेषाचा अंगार बाळगणारे आणि तो समाज मनात पसरवणारे डॉ. प्रवीण तोगडिया झेड दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत फिरू लागले ! पुढे ते विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय आणि नंतर आंतरराष्ट्रीय अध्यक्ष झाले .

संजय जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या दोस्तीच्या कथा एकेकाळी परिवारात कौतुकाचा विषय होता . नंतर नरेंद्र मोदी यांची खपा मर्जी झाली ; ‘ती’ सीडी गाजली आणि संजय जोशी यांना भाजपनं वाळीत टाकलं ( संघ मात्र जोशी यांच्या पाठीशी होता आणि अजूनही आहे , म्हणून संजय जोशी परिवारात अजूनही नरेंद्र मोदी यांच्या नाकावर टिच्चून टिकून आहेत ! ) . असंच सौहार्द तोगडिया आणि मोदी यांच्यात होतं , म्हणे . दोघं एका स्कूटरवर कसे फिरत आणि एक ग्लास पाणीही कसं वाटून घेत अशा , प्रवीण तोगडिया आणि नरेंद्र मोदी यांच्या दोस्तीच्या कौतुक कथाही एकेकाळी परिवारात रंगलेल्या आस्मादिकांनीही एक पत्रकार म्हणून संघ बीट कव्हर कारतांना ऐकल्या आहेत . शंकरसिंह वाघेला यांनी भाजपच्या नेतृत्वाला आव्हान देण्याच्या हालचाली सुरु केल्यावर पक्षानं नरेंद्र मोदींना गुजरातेत परत पाठवलं . २००१च्या विधानसभा निवडणुका जिंकताना मोदी-जोशी-तोगडिया यांच्यात ‘ये दोस्ती हम नाही तोडेंगे’ असे घट्ट बंध होते . ती निवडणूक जिंकवून देण्यात तोगडिया यांनी कसं जीवाचं रान केलं याच्या दंतकथा कॉंग्रेस गवताप्रमाणे तेव्हा फोफावलेल्या ( का मुद्दाम पसरवल्या गेलेल्या ) होत्या . तेव्हाच विश्व हिंदू परिषद आणि राम मंदिरापेक्षा सत्तेच्या वलयाचं महत्व तोगडिया यांना समजलं आणि निवडणुका जिंकवून देण्यात मोलाची कामगिरी बजावल्यानं आपलं नेतृत्व मोदी यांनी मान्य करावं या इच्छेची बीजं प्रवीण तोगडिया यांच्या मनात अंकुरली . पुढच्या काळात प्रवीण तोगडिया यांचे समर्थक ( की पंटर ?) गोरधन झडाफिया राज्याचे गृह राज्यमंत्री झाले आणि असं म्हणतात की मंत्रालयात तोगडिया यांचा हस्तक्षेप इतका वाढला की त्यामुळे गुजरातेत मुख्यमंत्री मोदी यांना एक समांतर सत्ताकेंद्र निर्माण झालं . इथूनच मोदी आणि तोगडिया यांच्यात दुरावा वाढण्यास सुरुवात झाली . परिणामी झडाफिया यांना नरेंद्र मोदी यांना मंत्रीमंडळातून हाकललं ; नंतरच्या २०१२च्या निवडणुकीत विधानसभेची उमेदवारीही नाकारली . मग झडाफिया यांनी महागुजरात जनता पार्टीची स्थापना केली . त्यामागे अर्थातच प्रवीण तोगडिया यांचा हात होता . विधानसभा निवडणुकीत झडाफिया यांच्या महागुजरात जनता पार्टीच्या पाठीशी प्रवीण तोगडिया यांनी विश्व हिंदू परिषदेची ताकद उभी केली . तरी मोठ्या बहुमताने विजयी होण्यात नरेंद्र मोदी आणि भाजपला यश मिळालं . मोदी आणि तोगडिया यांच्यात उभा दावा सुरु झाला . मोदी यांची मर्जी खपा होणं म्हणजे समूळ उच्चाटन हा अनुभव संजय जोशी आणि झडाफिया यांना मिळाला ; पुढे तोच आघात मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यावरही कसा केला हे सर्वविदित आहे ! खरं तर राजकीय पक्षात एकमेकाला खाली ओढण्याचे प्रकार घडतच असतात आणि तो राजकारणाचा एक भाग असतो ; ‘डिफरंट’पणाचं ‘सोवळं’ पाळणारा भाजपही त्या राजकारणाला अपवाद नाहीच . राष्ट्रीय पातळीवरचा बलराज मधोक ते लालकृष्ण अडवाणी असाच कशाला महाराष्ट्रातही भाजपनं अण्णा डांगे , सूर्यभान वहाडणे , ना. स. फरांदे , मधु देवळेकर अशा अनेकांना वळचणीला टांगलं होतंच की ! आता नेमकी तशीच घुसमट आणि उपेक्षा एकनाथ खडसे यांच्या वाट्याला आलेली आहे . अगदी अशाच प्रकारे बाजूला टाकून खच्ची करण्याचे झालेले प्रयत्न गोपीनाथ मुंडे यांनी कसे उधळून टाकले हेही महाराष्ट्राला ठाऊक आहे . थोडं विषयांतर झालं ; मुख्य मुद्दा मोदी आणि तोगडिया यांच्यातील संघर्षाचा आहे . झडाफिया आणि संजय जोशी यांच्या झालेल्या ‘राजकीय शिरकाणा’ नंतरही तोगडिया धडा शिकले नाहीत कारण एव्हाना तेही विश्व हिंदू परिषदेचे मोठे नेते झालेले होते .

पण , आता बाजी उलटलेली आहे . तोगडिया यांचा विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ आता संपत आलेला आहे . तोगडिया यांना मुदतवाढ देण्यात आता संघाला मुळीच रस नाही कारण संघाच्या इशाऱ्याबरहुकूम अशोकजी चौगुले किंवा कोकजे यापैकी एकाला विश्व हिंदू परिषदेचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्यास तोगडिया यांनी विरोध केला आणि स्वत:च्या मर्जीतील राघवजी रेड्डी यांना अध्यक्ष करण्याचं राजकारण खेळल्यानंतर ठिणगी पडलेली आहे . रा. स्व. संघ प्रतिकूल झाल्यानं विश्व हिंदू परिषदेचे पुन्हा एकदा सर्वेसर्वा होण्याचे दरवाजे बंद झालेले आहेत ; भारतीय जनता पक्ष सध्या नरेंद्र मोदी यांच्या मुठीत बंद आहे त्यामुळे तिकडेही तोगडिया यांना संधी मिळण्याची कोणतीही शक्यता नाही . दोन्ही बाजुंनी अशी कोंडी झालेली असून पुन्हा वैद्यक क्षेत्रात घरवापसी असं ( आणि मिळवलेल्या वैद्यक ज्ञानाचा प्रक्षोभक , उन्मादी हिंदुत्वाच्या नादात बहुदा विसर पडल्यानं ) अंधार दाटून आलेलं भवितव्य स्पष्ट दिसत असल्यानं प्रवीण तोगडिया सैरभैर झालेले आहेत , व्याकुळले आहेत ; त्यांचा तडफडाट सुरु आहे . पद्मावत या चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेचाही विरोध ही प्रवीण तोगडिया यांची अपरिहार्य अगतिकता आणि त्यामागे मोदी सरकारला विरोध आहे हेही , आपण समजून घ्यायला हवं . पन्नास सुरक्षा जवानांच्या गराड्यातून अविश्वसनीयपणे बेपत्ता होण्याची प्रवीण तोगडिया यांची नौटंकी आणि जाहीर नकाश्रूची पार्श्वभूमी ही अशी आहे ; त्यामागे ना राम मंदिर उभारणीची कळकळ आहे ना गो-प्रेम ; आहे तो केवळ वैफल्य ओतप्रोत भरलेला कांगावा !

( छायाचित्रे ‘गुगल’च्या आणि तोगडिया यांच्या वैद्यक शिक्षणाचा संदर्भ विकिपीडियाच्या सौजन्याने )


​​-प्रवीण बर्दापूरकर

Cellphone ​+919822055799
www.praveenbardapurkar.com

​=====================================================​==========
‘डायरी’ , नोंदी डायरीनंतरच्या’ , ‘दिवस असे की…’ , ‘आई’ , ‘क्लोज-अप’ , ‘ग्रेस नावाचं गारुड’ , ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी लिंक-

http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515 आणि ‘भाष्य’ ई-बुक्ससाठी dailyhunt शी संपर्क साधावा . ​
​======================================================​==========

संबंधित पोस्ट

 • Anand Manjarkhede ….
  Sir पन अशे प्राक्तन डांगे फरंदे मुंडे खडसे यांच्या का लालटी येतात??
  हा आडनावचा इशू आहे क़ाय की आपलेपनाच?
  की वापरा आणि सोडून दया..

  • आडनाव आड येण्याचे प्रसंग अत्यंत अपवादात्मक असतात असा माझा चार दशकांच्या पत्रकारितेतील अनुभव आहे . सत्तेचं पद किंवा कोणती तरी उमेदवारी मिळाली नाही की ‘आडनावामुळे घात झाला किंवा अन्याय केला गेला’ अशी ओरड करण्याची संवय लागलेली आहे आपल्या राजकारण्यांना !

   • Ravi Waghmare ….
    माझे आडनाव वाघमारे. जात सांगाल का माझी?
    हे आडनाव ख्रिश्चनांनमधे पण आहे.

    • Ravi Waghmare>> हा प्रश्न मला असेल तर पूर्णपणे गैरलागू आहे कारण अशा बाबींपासून मी करोडो कोस लांब आहे . आईनी माझ्यावर जात-धर्माचा संस्कारच केलेला नाही . आई या पुस्तकात ( प्रकाशक- साधना ) मी माई-माझ्या आईविषयी लिहिलेलं आहे ; त्यात याबाबत उल्लेख आलेले आहेत !

     • Ravi Waghmare ….
      अरे राम वरच्या पोस्टला ऊद्देशुन आहे. मी पण जातपात मानत नाही.

     • P Gade ·….
      आमच्या नागपूरच्या नेत्यांना विचारा, ते जात काय पोटजात सुद्धा सांगतात. आडनाववरून. वाघमारे जरा अवघड आहे. तुमच्या कोण्या पूर्वजाने वाघ मारला असेल. माझ्या ओळखीचे वाघमारे माशीही मारत नाही, तरी. त्यामुळे हे नाव अनेक जातीत आहे.

 • Ravi Waghmare …
  अभ्यासू विश्लेषण

 • Pallavi Dalvi ·….
  Mast

 • Kamlakar Sontakke….
  Very vivid analysis.

 • Arvind Joshi ….
  योग्य विश्लेषण

 • Sudhanshu Hadge ·….
  Inside story or story within story is briĺliantly written. Wow congrates sir

 • Uday Dastane ….
  प्रवीण,
  एकदा मोदिंच्याच नशिबी अतूट मैत्रीची अशी शोकांतिका का येते ह्याचे सुद्धा विश्लेषण कर ना… काळजी बराक ओबामा, नेत्याहनु आणि इतर यांच्याशी असलेल्या त्यांच्या घनिष्ट मैत्री मुळे वाटते…..😢😢😢

 • Abhijit Itolikar ….
  सर लेख खूपच आवडला. महत्त्वाकांक्षेचेसुद्धा, वैयक्तिक उद्दिष्टपूर्तींसाठीची आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तींसाठीची असे पोटप्रकार करता येतील का?कारण मोदींचे वैयक्तिक उद्दिष्ट काही असेल असे वाटत नाही. आपणच सत्तेत राहिल्याशिवाय आपली सामाजिक उद्दिष्टपूर्ती होणार नाही असे मात्र त्यांना वाटत असावे. अर्थात वैचारिक लोकशाहीचा विचार करता कुणालाही असे वाटणे चूकच. पण भाजपमध्ये पंतप्रधानपदासाठी त्यांच्याइतका निःस्पृह आणि लायक सध्यातरी कुणीच नाही असे कोट्यावधी भारतीयांप्रमाणेच त्यांना स्वतःलाही वाटत असावे. आणि त्यात तथ्य नाही असे मात्र म्हणता येणार नाही.

 • Rajesh Kulkarni ….
  खडसेंनी स्वत:च स्वत:ला अडचणीत आणलेले आहे असे दिसते. भोसरी प्रकरणात ते पुरते अडकलेले आहेत असे म्हणतात.

 • Pankaj Raman Patil ….
  असुरक्षितता आली की देव, कर्मकांड वै ऐकून होतो, रडारड हे पुरुषांकरिता! नवीनच आहे,
  (सगळेच रडतात ….)

 • Anil Govilkar….
  अप्रतिम विश्लेषण!!

 • सचिन अपसिंगकर ….
  मर्मग्राही!

 • Laxman Joshi ….
  सुंदर लेख. अभिनंदन.

 • Sunil Navale ….
  छानच.
  पण मला एक प्रश्न पडलाय
  नकाश्रू की नक्राश्रू …

  • व्याकरणाप्रमाणे , नक्राशू किंवा नक्राश्रू असे हवे पण, अलिकडच्या काही दशकात हा शब्द नकाश्रू असा स्थिरावलाय . चाळीस वर्षांच्या पत्रकारितेत नकाश्रू असाच हा शब्द वाचत आणि लिहित आलोय !

 • Chandrashekhar Bardapurkar ·….
  your writing always adds to information , gives sometimes a different thinking direction & reminds of some forgotten events ( all this related to political personalities, events ). At times your blog is awaited after some happening . Its pleasure to read it.

 • Channavir Bhadreshwar math

  Sir, super perception….

 • Ramesh Kulkarni ….
  Sir dange.pharande.yana minister kele na upekshit kase