दिलखुलास आणि ऐटदार गवई…

सत्तेच्या दालनात प्रदीर्घकाळ पत्रकारिता करताना अनेक नेत्यांना भेटता आलं.त्यात रा. सू. गवई लक्षात राहिले ते दिलखुलास, लोभस व्यक्तिमत्व, ऐटदार राहणी आणि त्यांची समन्वयवादी वृत्ती. त्यांच्या निधनाचं वृत्त आल्यावर सर्वात प्रथम आठवला तो त्यांचा पानाचा डबा.. लगेच त्यातील केशराचा गंधही दरवळला. रा. सू. गवई यांचा लवंग, विलायची, जर्दा, केशर असलेला पानाचा डब्बा विधानपरिषदेतच नाही तर संपूर्ण विधानमंडळात प्रसिध्द होता. आम्ही अनेकदा पत्रकार कक्षातून खाणाखुणा करून तो डबा मागवून घेत असू. वऱ्हाडी अगत्य आणि अघळ-पघळपणा अंगात ठासून भरलेल्या गवई यांची तो डबा पाठवायला कधी ना नसे.

अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरला जन्मलेले आणि अमरावतीला शिक्षण झालेले रा. सू. गवई म्हणजे एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व! दिवसाचे २४ तास राजकारणात अडकून पडावं असा त्यांचा पिंड नव्हता. एकदा का राजकारणापुरतं राजकारण संपलं की, गप्पांची मैफिल रंगवावी, कोणी कोणाच्या फिरक्या कशा काढल्या याची खुमासदार चर्चा करावी, असा त्यांचा खाक्या असायचा. नागपुरातलं त्यांचं तेव्हाचं आवडतं हॉटेल सीताबर्डीवरचं निडोज होतं तर मुंबईत रिट्झ. अर्थात ही काही त्यांची अट नसायची. अनेकदा अन्य हॉटेल किंवा गेला बाजार त्यांच्या निवासस्थानी या भेटीगाठी व्हायच्या. विधिमंडळाचं हिवाळी नागपूरचं अधिवेशन आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम संपला की नागपूरच्या पत्रकारांसाठी रा. सू. गवई एक जेवण आवर्जून आणि अगत्याने आयोजित करत. जेवणाची वेळ जरी रात्री आठ किंवा साडेआठची ठरलेली असली तरी गवई मात्र दहाच्या आत उगवत नसत. दिवसभराचे कामाचे बदलून, इस्त्रीचे कपडे घालून, मंदसा परफ्युम लावून गवईसाहेब येत आणि मग मैफिल रात्री अडीच-तीनपर्यंत रंगत असे. तोपर्यंत अनेक पत्रकारांचे विमान हवेत उडालेले असे. त्या हवेत उडण्याचा कोणताही त्रागा न करता गवईसाहेब स्वत: पुढाकार घेऊन ‘ते विमान’ त्याच्या घरी कसे पोहोचेल याची काळजी घेत. हिवाळी अधिवेशनाच्या काळात गवई यांच्यासाठी दुपारी जेवणाचा येणारा टिफिन चांगला आठ-दहा जणांना पुरेल एव्हढा येत असे. त्यांना एकटेपण मुळीच आवडत नसे आणि दुपारच्या जेवणाच्या काळातही (विधान परिषदेत त्यासाठी सुटी दिली जात असे तेव्हा.. आताचे माहिती नाही.) गवईसाहेबांसोबत मोठा गोतावळा असे त्यामुळे अनेकदा टिफिन कमी पडल्याने रेस्तराँतून थाळ्या मागवल्या जात. विधी मंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या आमच्या पिढीतील अनेक अविवाहितांचं दुपारचं भोजन हा रा.सू.गवई आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव यांच्या काळजीचा विषय असे. अनेकदा निरोप मिळून आम्ही पोहोचेपर्यंत ही मंडळी जेवणासाठी ताटकळत बसलेली असे..असं हे ममत्व असे.

१९९५ची लोकसभा निवडणूक कव्हर करायला महाराष्ट्रात सर्वत्र फिरत सगळ्यांच्या गाठीभेटी होतो. निवडणुकीनंतर मी दिल्लीला रुजू होण्याच्या हालचाली सुरु होत्या; पुन्हा लवकर कोणाच्या भेटी होणार नव्हत्या म्हणून सोबत पत्नी आणि कन्या होती. उन्हाळा ऐन ‘बहरात’ होता..कार वातानुकुलीत नव्हती.. खूप तापायची.. मला झोप यायची. अमरावती मतदार संघातून तेव्हा रा. सू. गवई निवडणूक लढवत होते. भेट झाल्यावर मी प्रवासातील ड्रायव्हिंगची गोची त्यांना सांगितली. आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असलेले रा. सू. गवई यांचे पुत्र भूषण तेव्हा वकिली करत असत; त्यांच्यावर चालक शोधण्याचं काम गवईसाहेबांनी यांनी सोपवलं. प्रचाराची रणधुमाळी ऐन जोशात असल्यानं ड्रायव्हर मिळणं कठीण झालं तेव्हा रा.सु. गवई यांनी त्यांच्या कारवर असणाऱ्या चालकाला माझ्यासोबत दिलं! तो चालक मला औरंगाबादला सोडून येईपर्यंत बहुदा भूषण यांनी सारथ्य निभावलं. पुढच्या दौऱ्यात दुसऱ्या चालकाची सोय आम्ही औरंगाबादला पोहोचेपर्यंत गवईसाहेबांनी करून ठेवलेली होती. असा उमदेपणा रा. सू. गवई यांच्यात होता. एकदा त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर, मिश्कीलपणे ते म्हणाले, ‘अहो तुमची नाही, तुमच्या पत्नी आणि कन्येची काळजी होती मला. त्यात पुन्हा जावई पडले नं तुम्ही आमच्या विदर्भाचे!’

रा.सू. गवई यांची राहणी अतिशय ऐटबाज असे; तो चर्चेचाही विषय असे. त्यांच्या येण्याची वर्दी मिळाली आणि लिफ्टचे दरवाजे उघडले की कॉरीडॉरमध्ये परफ्युमचा गंध दरवळत असे. बंद गळ्याचा किंवा ओपन सूट, हातात तो प्रसिद्ध पानाचा डबा चेहेऱ्यावर प्रसन्नता, लख्ख गोरेपणाकडे झुकलेल्या रसरशीत कांतीच्या गवईसाहेबांचे मग आगमन होई आणि वातावरणाला ‘लाईव्हनेस’चा एक ‘करंट’ लगत असे! राजकारणातील तेव्हाच्या परिचित टिपिकल खादीचे आणि तेही विना इस्त्रीचे कपडे, दुर्मुखलेल्या मुद्रेचे गवई आम्ही विधिमंडळात कधी पहिलेच नाहीत! सभागृहात रा. सू.गवई यांच्यातील व्यासंगी संसदपटूचा अनुभव येत असे. आधीच कायद्याचा अभ्यास झालेला, त्यात प्रदीर्घकाळ विधानपरिषदेचं सदस्यत्व असल्यानं कामकाजातील खाचाखोचा त्यांना पक्क्या अवगत होत्या, आवाका वाढलेला होता. सांसदीय कामकाजाचं ‘बायबल-कुराण-वेद’ समजलं जाणारं ‘कौल-शकधर’ ते कोळून प्यायलेले होते. सभापतीच्या खुर्चीत बसल्यावर म्हणूनच कोणाला किती मोकळं सोडायचं, कोणाला कुठं आवरायचं याबद्दलचं त्यांना अचूक भान असे. विरोधी पक्ष नेते असताना तेच निर्णय दिल्यासारखा बोलत तेव्हा सभापती असलेले जयंतराव टिळक गमतीनं विचारत, ‘आता माझ्यासाठी काही शिल्लक ठेवाल की नाही ?’ आणि सभागृहात हास्याचा कल्लोळ उठत असे.

बँरी. अब्दुल रहेमान अंतुले मुख्यमंत्री असताना रा. सू. गवई विधानपरिषदेचे सभापती होते. अंतुले यांचा सिमेंट घोटाळा परिषदेत मधु देवळेकर आणि अन्य सदस्यांनी उपस्थित केला. कितीही नाही म्हटलं तरी गवई यांचं कॉंग्रेसशी जवळचं नातं होतं, कॉंग्रेस हा त्यांचा आधार होता. त्यामुळे ते सभापती म्हणून कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष होतं. प्रसंग अतिशय बांका होता पण, सिमेंट घोटाळ्यावर चर्चा होऊ देताना गवई यांनी पीठासीन अधिकाऱ्याची भूमिका अतिशय कौशल्याने आणि ताकदीने निभावली. विरोधी आणि सत्ताधारी अशा दोन्ही बाजूच्या सदस्यांना त्यांनी योग्य त्या सीमेच्या पलीकडे जाऊ दिले नाही. आधी परिषदेचे उपसभापती मग सभापती आणि नंतर एक टर्म चक्क विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवलेले रा. सू. गवई हे देशाच्या संसदीय इतिसातील एकमेव आहेत! विधानपरिषदेचं सदस्यत्व त्यांनी सलग तीस वर्ष भूषवलं; एवढंच नाही तर एक टर्म ते राज्यसभेवरही होते. ज्या राजकीय पक्षाचे ते नेते होते त्या पक्षाचा एकही सदस्य विधानसभेत नसताना गवई यांची ही अशी सलग निवड झाली याचं कारण त्यांचा स्वभाव! सर्वार्थाने ते समन्वयवादी वृत्तीचे होते म्हणूनच एकाचवेळी ते वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, ए.आर.अंतुले, शरद पवार, नासिकराव तिरपुडे या कॉंग्रेसच्या आणि विरोधी पक्षातील ग.प्र.प्रधान, उत्तमराव पाटील, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी यांच्याशी राजकारणापलिकडे जाऊन त्यांनी संबध राखले आणि त्याचा पुरेपूर लाभ त्यांना मिळाला. एकदा ते लोकसभेवर विजयी झाले आणि तेही खुल्या मतदार संघातून. या विजयात जातीआधारीत राजकारण न करणारा नेता ही त्यांची निर्माण झालेली प्रतिमा कारणीभूत होती. कारण गवईसाहेब राजकारणात आले आणि एकदम नेतेच झाले, विधिमंडळ राजकारणात रमले. रस्त्यावर उतरून लढे उभारावेत, जनतेसोबत उन्हांतान्हात राहावं हे काही त्यांना जमलं नाही. त्यामुळे उजळ प्रतिमा आणि मोठी राजकीय समज, क्षमता असूनही त्यांच्या पक्षाला मात्र त्याचा फार काही राजकीय लाभ झाला नाही हेही, तितकंच खरं.

‘राजकीय भांडवल’ पुरेसं आणि गाठीशी अनुभव गडगंज असूनही रा. सू. गवई राज्यात मंत्री झाले नाहीत कारण त्यांचा पक्ष राज्यात ठळक अस्तित्व निर्माण करू शकला नाही. पण, विशेषत: बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांची कारकीर्द झळाळून उठली ती- अवशेष म्हणून उरलेल्या नालंदा विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनाने आणि बिहारमधील शिक्षण व्यवस्था रुळावर आणण्याच्या कामगिरीने. राज्यपाल या नात्यानं ते बिहारमधील विद्यापीठांचे कुलपती होते आणि त्या पदाचा उपयोग करत बिहारच्या शैक्षणिक क्षेत्राचा गवईसाहेबांनी कायापालट केला! राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून नव्हे तर एखाद्या तळमळीच्या शिक्षण मंत्र्यासारखे ते राब-राब राबले. यात त्यांना डॉ. कृष्णकुमार या सहकाऱ्याचा मोठा उपयोग झाला. एकेकाळी जगात नावलौकिक असलेले नालंदा विद्यापीठ ज्या राज्यात होते त्या बिहारमधले विद्यार्थी बिहारमध्ये शिकण्याचे टाळत; शिक्षण क्षेत्र रसातळाला गेलेले होते, इतकी वाईट परिस्थिती त्या राज्यात होती. बिहारच्या शैक्षणिक बदलौकिकाची प्रतिमा आज जी बदलेली दिसते त्यामागे रा. सू. गवई यांचं धोरण आणि दृष्टी आहे, हे विसरताच येणार नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला ज्या भूमीवर १४ ऑक्टोबर १९५६रोजी दलितांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली ती नंतर दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली. दीक्षेचा तो दिवस हिंदू पंचागाप्रमाणे दसरा होता. बौध्द धर्म स्वीकारल्यावर बौद्धांनी दसरा हा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी लाख्खो बौद्ध बांधव दीक्षाभूमीला भेट देतात. या जागेवर आज उभे राहिलेले स्मारक रा. सू. गवई यांच्या प्रदीर्घ प्रयत्नाचे आणि दूरदृष्टीचं प्रतिक आहे. या दीक्षाभूमीलगत असणाऱ्या बजाज नगर, अभ्यंकर नगर आणि वसंत नगरात आमचं पंचवीस तरी वर्ष वास्तव्य झालं-त्यामळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं वृत्तसंकलनाची जबाबदारी ही संपादक पदावर जाईपर्यंत माझी ‘जहागीर’ होती. आता पॉप्युलर झालेली “पाऊले चालती दीक्षाभूमीची वाट!” हे शीर्षक सर्वात आधी नागपूर पत्रिका दैनिकात १९८१मध्ये मी दिलं तेव्हा ते रा. सू. गवई यांना प्रचंडच आवडलं, कारण त्यातून दीक्षाभूमी ही पंढरपूर समकक्ष आहे असं सूचित झालं. मग गवईसाहेबांनी यांनी एका मैफिलीत माझा चक्क सत्कारच केला होता. दरवर्षी येणाऱ्या बौद्धजणांकडून जमा होणारी पुंजी आणि सरकारकडून वेळोवेळी गवईसाहेबांच्या प्रभावामुळे मिळालेले आर्थिक सहाय्य यातून ही जागतिक महत्व आणि आकर्षण ठरलेली भव्य वास्तू उभी राहिलेली आहे. सदानंद फुलझेले आणि वा.कों. गाणार यांच्यासारखे सर्वस्व झोकून देणारे सहकारी गवई यांच्यासोबत भक्कमपणे उभे राहिले. या स्मारकाच्या निर्मितीच्या निमित्तानं स्मारक निर्माण समितीत निर्माण झालेल्या वादांचा गुंता हळूहळू अलगद सोडवत गवई यांनी यासाठी घेतलेले श्रम हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ‘दीक्षाभूमीवर अनवाणी पायांनी येणारे लाख्खो बांधव हे माझी राजकीय पुंजी आहे’, असं रा. सू. गवई म्हणत. ही राजकीय पुंजी राज्यात एक प्रभावी राजकीय ताकद म्हणून रुपांतरीत करण्याचं गवईसाहेबांचं स्वप्न मात्र साकार होऊ शकलं नाही.

याही पलीकडे जाऊन रा. सू. गवई यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी कंगोरे आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वात कुटुंब प्रमुख, विद्यापीठ नामांतर, रिपब्लिकन ऐक्यातील भूमिका याही भूमिका नक्कीच आहेत. मात्र, पत्रकारांच्या आम्हाला माहिती आहेत ते दिलखुलास, उमदे, प्रसन्न व्यक्तिमत्वाचे रा. सू. गवई. या उमद्या माणसाने माझ्यासारख्या अनेक पत्रकारांची विधिमंडळ तसेच राजकीय वृत्तसंकलनाची समज विस्तारवली, राजकीय तसंच सामाजिक भान वाढवलं, जाणीवा टोकदार करण्यात भूमिका बजावली, हे स्मरण कायम माझ्या मनात आहे… आणि राहिल.

-प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
[email protected]

संबंधित पोस्ट

 • कमलाकर सोनटक्के…
  खरंच दिलखुलास ॉदिलदार नेता. मर्मग्राही आणि रसिक.
  उत्तम रसग्रहण.

 • Surendra Deshpande
  ram krishna……..gavai

 • Rajesh Bobade …
  ख्ररच खुपच छान obituary !

 • Shrikant Umrikar …
  तूमची राजकीय व्यक्तिचित्रे मला आवडतात.

 • Shuddhodhan Sardar …
  Excellent

 • Vinay Ganesh Newalkar…
  Mala aitdaar ha shabda Gavaisahebanchya sambandat aavdala…yektham fit…….

 • Azhar Husain …
  Well said

 • Ravi Bapat…
  राजकीय पुंजी , वाह् ।। बढ़िया !!

 • Anmol Shende …
  Agdich netka ni marmik vishleshan kelay sir!

 • Uday Deshpande …
  Jara thodese yakub memon cha funeral var tumchya dhadar lekhni tun kahi liha.

 • Suneel Joshi …
  खुप छान…

 • Shriram Tekale …
  खुपच सुंदर लेख आहे..
  आमच्या पिढीला हे कधीही कळले नसते

 • Meghana Wahokar…
  sundar….

 • Shridhar Damle….
  good obituary article. some time,write about his short coming, so will help history student, future journalist and researcher to evaluate objectively.

 • Pradeep S. Hirurkar…
  अगदी बरोबर.

 • लेख खूपच सुन्दर लिहिला आहे. आम्हा ठाणेकराना अपरिचित गवई इतक्या उत्तम पणे उभे केल्याबद्दल धन्यवाद
  आपला
  उमाकांत पावसकर
  9920944148
  ठाणे

 • Yashavant Harne …
  Nice article Bardapurkar saheb