‘दुहेरी’ चक्रव्यूहात राहुल गांधी !

अखिल भारतीय काँग्रेसचे एक दिवसीय अधिवेशन दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर होत असतानाचा एक प्रसंग काँग्रेसचे दिल्लीतील अधिवेशन कव्हर करण्याची माझी ही पहिलीच वेळ. त्यानिमित्ताने स्टेडियमवर करण्यात आलेल्या सोयी प्रथमच अनुभवल्या. इतकी वर्ष महाराष्ट्रात राजकीय पत्रकार म्हणून वावरताना असे पंचतारांकित आतिथ्य मी पहिले नव्हते. दिल्ली विधानसभेत काँग्रेसचा दारूण पराभव आणि नरेंद्र मोदींची भावी पंतप्रधान हवा निर्माण व्हायला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्याकडे आगामी लोकसभा निवडणुकीचे प्रचार प्रमुखपद आलेले. अधिवेशनाला ‘शहजादे’ राहुल गांधी दुपारी तीन वाजता संबोधित करणार असल्याचा निरोप आलेला, त्यामुळे स्टेडियममध्ये मोठी उत्सुकता मात्र, सव्वातीन होत आले तरी पत्रकार कक्षात शांतता. दिल्लीत अनेक वर्ष पत्रकारिता करणा-या एका ज्येष्ठाला म्हटले, इतके कमी का आपण पत्रकार आज. पत्रकाराना काही रस दिसत नाही राहुल गांधींच्या भाषणात, तर तो म्हणाला, ‘अभी उनके भाषण की रिहर्सल खतम नाही हुई है. शहजादे चार बजे आयेंगे. तबतक पत्रकार आ जायेंगे. चलो हम भी चाय मार के आते है!’, आम्ही बाहेर आलो तर बहुतेक पत्रकार दिल्लीच्या थंडीत चहा-सिगारेटचा तरी आस्वाद घेत होते नाही तर खाण्यावर तुटून पडलेले होते. ‘शहजादा आने से कोई फर्क नाही पडनेवाला अब’- हाच बहुसंख्य पत्रकारांच्या गप्पांचा सूर. काँग्रेस बीट सांभाळणारे काँग्रेसनिष्ठ काही पत्रकार मात्र, ‘तुम्हाला वाटतं तसं घडणार नाही . जनता गांधी नावावर मतदान करते. याही वेळी वेगळं काही घडणार नाही..’ वगैरे दुबळा युक्तिवाद करत होते. चारच्या साता-ठ मिनिटे आधी आम्ही सर्व पत्रकार लगबगीने स्टेडियममध्ये आलो. एक सांगितले पाहिजे, या स्टेडियममधल्या खुर्च्या अत्यंत वाईट ‘शेप’मध्ये आहेत . त्यावर कायम अवघडल्यासारखेच बसावे लागते म्हणून पत्रकार दिर्घेत तरी सर्वजण पाय-यांवरच बसतात..ही प्रथाच आहे म्हणे! सव्वाचारच्या सुमारास राहुल गांधी आले. त्यांचे (पाठ केलेल!) तडाखेबंद भाषण झाले. काँग्रेस संपवण्याची भाषा करणारेच संपतील, झाले ते झाले, म्हणजे पराभव विसरून पुन्हा उठून जोमाने कामाला लागू यात… असे अनेक मुद्दे भाषणात होते. त्यांच्या भाषणाने काँग्रेसला संजीवनी ‘मिळाली’ आणि ‘नाही मिळाली’ अशी दोहो बाजूंनी चर्चा मग परतीच्या प्रवासात घडली.

लोकसभा निवडणुका संपल्यावर विशेषत: मिडिया आणि राजकीय वर्तुळात राहुल गांधी यांच्या अपयशी ठरलेल्या नेतृत्वाविषयी भरपूर चर्चा रंगली. काही खरे आणि बहुसंख्य तथाकथित राजकीय विश्लेषक त्या चर्चात फड मारू लागले. मात्र सोनिया गांधी काय किंवा राहुल गांधी काय ही काँग्रेसजणांची मजबुरी आहे हे लक्षात घ्यायला हवे. खरे तर, या चर्चा रंगात आल्या तेव्हा त्या ऐकायला किंवा वाचायला राहुल गांधी भारतात नव्हतेच. निवडणुकीच्या प्रचाराचा शीण घालवायला आणि झालेल्या पराभवाचे दु:ख विसरण्यासाठी ते चक्क बाली बेटावर निघून गेलेले होते! झालेल्या पराभवाबाबत इतका निर्विकार (की सर्व काही ‘टेक ईट ईझी’ घेण्याचा) त्यांचा दृष्टीकोन होता!

मुळात स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रारंभीची काही वर्ष देशाच्या राजकीय क्षितिजावर शास्त्रशुद्ध राजकीय पर्यायच उपलब्ध नव्हता कारण राजकीय जागृती नव्हती. होता तो बहुप्रयत्ने स्वातंत्र्य मिळवल्याचा आनंद आणि सुखी-समृद्ध भारताचे स्वप्न. सुरुवातीच्या काळात अस्तित्वात असलेल्या काँग्रेसची एकपक्षीय राजवट हा अपरिहार्य आणि अपर्यायी अपवाद होता. त्यामुळे काँग्रेस हा एकसंध राजकीय पक्ष वाटला आणि तीच राजकीय वस्तुस्थिती म्हणून आपण स्वीकारली. आपल्या देशात एकसंध एकपक्षीय सरकारही कधीच नव्हते. अगदी १९५२पासून काँग्रेसची जी राजवट आपण एकपक्षीय समजतो ती देशातील विविध धर्म, जाती, विचार, समाज रचना आणि कार्यक्रम याची मोटच म्हणजे एक प्रकारचे गाठोडेच होते. ते स्वाभाविकही होते कारण, भारताची सामाजिक रचनाच केवळ विशाल आणि वैविध्यपूर्णच आहे असे नव्हे तर या रचनेचे सामाजिक स्वरूप जटील आहे, सांस्कृतिक वीण गुंतागुंतीची आहे आणि हीच परिस्थिती म्हणजे कमी-अधिक प्रमाणात आपल्या राजकीय व्यवस्थेत दिसणार हे स्पष्ट होते. ते तसे दिसलेही आणि तेच एक राजकीय मॉडेल समजले गेले. त्या गोडगैरसमजातच राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस देशाच्या राजकारणात स्थिरावला. धर्म, जाती, विचार आणि कार्यक्रम एक गाठोडे असल्याने कालौघात प्रबळ झालेल्या काँग्रेस पक्षात राजकारण म्हणजे सत्ताप्राप्ती आणि पुढे जाऊन सत्ता म्हणजे केवळ धनसंचय हा विचार प्रबळ झाला परिणामी, पक्षात संधीसाधूंची संख्या दिवसे-न-दिवस वाढतच गेली. अगदी तालुका पातळीवर संपन्न आर्थिक घराणेशाहीची बेटे निर्माण झाली, वर्ष-नु-वर्षे एकाच कुटुंबात सत्ता एकवटली. सामान्य कार्यकर्ता आहे त्याच सामान्य जागी राहिला. तेच ते चेहेरे सत्तेत दिसू लागले. म्हणूनच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही सामुदायिक नेतृत्वाची कास न धरता नेते स्वत:च घराणेशाहीच्या जोखडातून मुक्त व्हायला तयार नाहीत, झालेल्या पराभवाचे परखड आत्मचिंतन करण्याचीही या पक्षातील कोणाही नेत्याची तयारी नाही. या गुलामगिरीच्या (आणि संधीसाधूही) मानसिकतेतून लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया आणि राहुल गांधी यांनी दिलेले पदांचे राजीनामे फेटाळण्यात आले. राजकीय विचार, कार्यक्रम, संघटनात्मक बांधणी आणि सामुदायिक नेतृत्व यातून एखादा राजकीय पक्ष आपले स्थान बळकट करत असतो असे मानले जाते. पहिले तीन निकष जर कमकुवत ठरत असतील तर एखाद्या प्रभावी नेतृत्वाच्या करिष्म्यापुढे पक्ष प्रभावी होतो आणि अन्य निकष कमी पडत असल्याचे लक्षात येत नाही. हे निकष लागू करायचे झाले तर राजकीय पक्ष म्हणून विद्यमान काँग्रेस पक्ष कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. संघटनेनेचे नेतृत्व करणा-या नेत्याची विचारधारा काय आहे, त्याची नेतृत्वाची शैली कशी आहे, त्या नेत्याकडे आकर्षक व्यक्तिमत्व आहे किंवा नाही, त्याच्यात प्रशासकीय वकूब आहे की नाही आणि निवडणूक जिंकल्यावर त्याने सत्तेत सहभागी होणे टाळले काय आणि नाही काय, याच्याशी काँग्रेसजणांना काहीही घेणे नाही. असा विवेकी सारासार विचार करून पक्ष चालवणे ही काँग्रेसची कामाची पद्धतच नाही मुळी, असे काही असते तर हे सर्वजण मनेका गांधी याच्या नेतृत्वाखाली काम करते झाले असते पण, सोनिया गांधी यांची मते ओढून आणण्याची क्षमता जास्त असल्याने त्यांच्या चरणी निष्ठा वाहणा-या आणि बहुसंख्येने सत्तेसाठी संधीसाधू असणा-यांचे कोंडाळे म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. असा हा काँग्रेस नावाचा चक्रव्यूह आहे आणि त्यात राहुल गांधी पुरते फसले आहेत.

सोनिया गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व स्वत:कडे आणि सरकारचे नेतृत्व मनमोहनसिंग यांच्याकडे अशी विभागणी केल्यावर पंतप्रधानपदावर डोळा ठेवणारांची संख्या वाढली हे खरे राहुल गांधी यांच्यासमोरचे आव्हान आणि दुखणेही आहे. राष्ट्रपती करून प्रणब मुखर्जी यांना बाजूला सारले गेले तरीही पंतप्रधानपदासाठी चिंदबरम कसे आसुसलेले होते, सुशीलकुमार शिंदे यांचे नाव पुढे करून पक्षातील एक गट कसा सक्रीय होता आणि एकेकाळी नटवरसिंग यांनी गांधी नाव वापरून तेलाच्या बदल्यात पैसे कसे कमावले तर तिकडे, पक्ष पातळीवर अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, वाचाळवीर दिग्विजयसिंह-कपिल सिब्बल… आणि कंपू (याशिवाय राज्य पातळीवरचे कंपू वेगळेच!) पक्ष शुद्ध करण्याच्या राहुल गांधी यांच्या मोहिमेला कसा खीळ घालत होता हे दिल्लीकरांना चांगले ठाऊक आहे. परिणामी राज्या-राज्यात निर्माण झालेल्या घराणेशाहीला आळा घालणे राहुल गांधी यांना शक्यच झाले नाही. कार्यकर्त्या ऐवजी प्रस्थापित नेत्याच्या घरातच लोकसभेची उमेदवारी द्यावी लागली, त्यातून असंतोष निर्माण झाला. फार लांब कशाला, महाराष्ट्रात नेत्यांच्या मुलांची वाट लावत मतदारांनी या असंतोषाला वाचा फोडली. कार्यकर्त्याना प्रतिष्ठा आणि सत्तेत भागीदारी देणारी काँग्रेस हे राहुल गांधी यांचे स्वप्न काँग्रेसमधल्या धेंडांनीच उद्धवस्त केले ते असे!

काँग्रेसला १९८५नंतर गुजराथमध्ये यश मिळालेले नाही, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कॉंग्रेसची पार वाताहात झालेली आहे, बिहार आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसचा पार धुव्वा उडालेला आहे, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसची जोरदार पीछेहाट झालेली आहे आणि आता विधान सभा निवडणुकांचे आव्हान समोर आहे ते पक्ष पातळीवर बेबंदशाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत राहुल गांधी काँग्रेसला सोन्याचे दिवस आणून देण्याचे स्वप्न रंगवत आहेत.

राहुल गांधी लोकसभेत आक्रमक झाले (आणि गांधी घराण्याच्या चरणी निष्ठा वाहिलेल्यांचा गांधी प्रेमाचा भावनावेग अनावर झाला, त्यांना भरते आले, काही माध्यमेही त्यात हिरीरीने सहभागी झाली.) काँग्रेसला पुनरुज्जीवीत करण्यासाठी एकदा लोकसभेत आक्रमक होणे एव्हढे पुरेसे नाही. इतके वर्ष संसदेत झोपा काढणा-या आणि आयत्या उंटावरून नेतृत्वाच्या शेळ्या हाकणा-या राहुल गांधी यांना कॉंग्रेसमधील कंपूशाही आणि संधीसाधूंचा चक्रव्यूह भेदण्यासाठी अखंड आक्रमक व्हावे लागणार आहे तरच, त्यांच्या स्वप्नातल्या काँग्रेसची पक्ष म्हणून पुनर्बांधणी नीट होऊ शकेल. ती चिकाटी आणि क्षमता, तो संयम, तो राजकीय समंजसपणा, ते राजकीय भान आणि ती दूरदृष्टी राहुल गांधी यांच्याकडे आहे असे अजून तरी दिसून आलेले नाही… हाही व्यक्तिमत्वातील चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान राहुल गांधी यांच्यासमोर आहे. थोडक्यात एकाच वेळी दोन चक्रव्यूहात ते अडकलेले आहेत!

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
[email protected]

संबंधित पोस्ट