निकाल गुजरातचा, इशारा महाराष्ट्रालाही!

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका एकदाच्या संपल्या. गेले काही दिवस विशेषत: गुजरातची निवडणूक हा सार्वर्त्रिक चर्चेचा विषय होता. समाज माध्यमांवर तर अनेकदा या ऊत आलेल्या चर्चेला अधिकृत/अचूकतेचा ना शेंडा असायचा ना बुडखा. या चर्चा म्हणा की, मत-मतांतराला एक तर कोणाच्या तरी टोकाचा भक्तीचा किंवा टोकाचा द्वेषाचा रंग असायचा. गुजरातच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आधी, निवडणूक सुरु असतांना आणि निकाल लागल्यावर भरपूर लिहिलं गेलेलं आहे. २१ वाढीव जागा मिळवूनही कॉंग्रेसचा पराभव झाला नसता आणि १६ जागा कमी होऊनही भाजपला सहाव्यांदा सत्ता मिळाली नसती तर जनमत पाहणी करणारांपासून ते काँग्रेस आणि भाजपच्या अनेक भक्तांची तसंच विरोधकांची चांगली पंचाईत झाली असती. कॉंग्रेसने पराजयात भावी विजय तर भाजपने कण्हत-कुंथत मिळवलेल्या विजयात पराभव अनुभवला, असा काव्यगत वाटण्यासारखा हा निकाल आहे. भावी वाटचाल करतांना काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी बोध घेण्यासारखे अनेक मुद्दे या निकालातून समोर आलेले आहेत. त्यासंदर्भात विचार करुन पुढील आखणी करण्यासाठी हे दोन्ही पक्ष पुरेसे समर्थ आहेत. या निवडणुकीच्या निमितानं प्रचाराची जी पातळी सर्वच पक्षाकडून गाठली गेली, ती आपल्या देशाच्या लोकशाहीच्या सुदृढतेच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. भाजपकडून प्रामुख्याने आणि कॉंग्रेसकडून उल्लेखनीय प्रमाणात प्रचाराची पातळी सोडली गेली; त्यात पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीचाही सहभाग असावा हे तर खेदजनक होतं. यापुढच्या निवडणुका विखारी प्रचाराच्या असतील हे संकेत गुजरातनं दिले आहेत. परस्परांच्या विरोधात कंड्या पिकवल्या जाण्याचा जो महापूर प्रचारात आणि समाज माध्यमांतून आणला गेला तोही उबग आणणारा होता, लोकशाहीविषयी संवेदनशील असणाऱ्या कुणालाही ते अस्वस्थ करणारं होतं.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालातून निघणारा अर्थ म्हणा की इशारा, महाराष्ट्रासाठीही आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी तो नीट समजून घ्यायला हवा. सध्याच्या घटकेला पक्ष आणि जनता अशा दोन्ही पातळीवर देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात टोकाच्या तीव्र भावना आहेत; फडणवीस व त्यांचे भक्त सोडून सर्वांना ते जाणवतं आहे. कर्जमाफी योजनेत झालेल्या घोळांमुळे शेतकऱ्यांचा सरकारवर तीव्र रोष आहे; हे सरकार सत्तारूढ होऊन तीन वर्ष उलटून गेली तरी कबूल केलेलं आरक्षण न मिळाल्यानं मुस्लीम, धनगर आणि मराठा समाजात टोकाची नाराजी आहे; सरकारनं जाहीर केलेल्या योजनांचे फायदे गतीनं शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नसल्यानं लोक त्रस्त आहेत; सत्तेत येण्यापूर्वी भ्रष्टाचाराला थारा देणार नाही म्हणतांना सत्तेत आल्यावर मात्र ज्यांच्याविरुद्ध सिंचन घोटाळ्यांचे आरोप केले त्यांच्याविरुद्ध अजूनही कारवाई न झाल्यानं लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि तपास करणाऱ्या यंत्रणेच्या मुसक्या आवळल्या गेलेल्या आहेत; भ्रष्टाचारला आळा घालण्याच्या यंत्रणेतलाच अधिकारी राजरोसपणे लांच घेतो आणि गृह खातं ‘स्वच्छ’ मुख्यमंत्र्यांकडे असूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, अशी वस्तूस्थिती आहे.

सरकारचा कारभार म्हणजे विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार वगळता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाभोवती केंद्रित झालेला आहे. कृषीपासून ते सहकारपर्यंत सर्वच खात्यांच्या कामकाजाची हमी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही मुख्यमंत्री अशा पद्धतीनं एकटेच घेत आहेत की, जणू त्या खात्यांना मंत्रीच नाहीये. मुख्यमंत्र्यांनी निर्माण केलेली समांतर यंत्रणा आणि राज्य सरकारची असलेली विद्यमान प्रशासन यंत्रणा यांच्यात कोणताही ताळमेळ कसा नाही, सुसंवाद नाही याची लक्तरं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेच्या निमित्तानं राज्याच्या वेशीवर टांगली गेलेली आहेत. एकनाथ खडसे नाराज आहेत, विनोद तावडे खूष नाहीत, पंकजा मुंडे यांची घुसमट झालेली आहे, पांडुरंग फुंडकर मंत्रालयात फिरकत नाहीयेत इतके वैतागलेले आहेत, शिवसेनेवर कुरघोडी करण्याची एकही संधी मुख्यमंत्री सोडत नसल्यानं सेनेच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रीमंडळ बैठकीकडे पाठ फिरवलेली आहे… ही यादी अशीच आणखी वाढतच जाणारी आहे. थोडक्यात काय तर, देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे एक खांबी तंबू झालाय आणि कामाच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या मुख्यमंत्र्यांची प्रशासनावर पकड नाहीये, अशी उघड चर्चा केवळ मंत्रालयातच नव्हे तर खुद्द पक्षातही आहे. शाखा-शाखांवर आता देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नाराजीचा सूर उमटू लागलेला आहे. राजकीय आघाडीवर यशस्वी ठरण्यासाठी बाहेरच्यांना सन्मान देण्याच्या (पक्षी : दरेकर-काकडे ते लाड मार्गे राणे!) केलेल्या खेळींमुळे निष्ठावंत डावलले गेल्याच्या अस्वस्थतेची पक्षांतर्गत धुम्मस आता गावो-गावी स्पष्ट जाणवू लागलेली आहे. तो सूर ऐकू येत नाहीये; ती धग जाणवत नाहीये फक्त ती मुख्यमंत्री फडणवीस यांना. ही वस्तूस्थिती कुणी ‘पेड’ सल्लागार, गोटातले पत्रकार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचं काम इमानेइतबारे काही बजावत नाहीये; जणू काही मुख्यमंत्र्यांना फक्त ‘परदेशी’ आणि ‘प्रवीण’ भाटांचा विळखा पडलेला असल्याचं चित्र आहे. राज्यात लगेच विधानसभेच्या निवडणुका लागल्या तर भारतीय जनता पक्षाच्या ५०ही जागा निवडून येणार नाहीत आजची अशी स्थिती आहे. इतका रोष असला तरी, देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेला डाग लागलेला नाहीये म्हणून; त्यांच्या विकासाच्या तळमळीवर अविश्वासाचे ढग दाटून आलेले नाहीयेत. अशा स्थितीत शेतकरी कर्जमाफीचा बट्ट्याबोळ उडाल्यावर गेल्या दीड-दोन महिन्यात प्रशासकीय कारभाराबाबत स्वीकारलेलं गांभीर्य कायम ठेवण्याचा आणि सर्वांच्या वाट्याचं एकट्यानंच न बोलण्याचा संयम देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे दाखवायला हवा आहे. केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आशीर्वाद असून चालत नाही; त्या दोघांच्याही तोंडाला जनता फेस आणते, हे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालातून सिद्ध झालंय हेही फडणवीस यांनी लक्षात घ्यायला हवं.

गुजरात निवडणुकीच्या निकालात राहुल गांधी यांचं नाणं चाललं म्हणून महाराष्ट्रातले काँग्रेसजन खूष झाले असले तरी त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की, गुजरातमधे राहुल गांधी यांनी त्यांची स्वत:ची अशी एक यंत्रणा उभी केलेली होती. गुजरातमधील आणि राष्ट्रीय पातळीवरील पक्षातील ‘किचन कॅबिनेटमधील सर्व स्वघोषित बड्या धेंडांना (अगदी अहमद पटेल-मोतीलाल व्होरा ते कपिल सिब्बल-मणिशंकर अय्यर; द ग्रेट ‘वाचाळ-ए-आलम’ दिग्विजयसिंह यांना तर या निवडणुकीच्या काळात नर्मदा परीक्रमा करण्याची त्यांची इच्छा पूर्ण करुन घेण्याचे आदेश देण्यात आले होते, अशी चर्चा ऐकण्यात आली.) बाजूला सारत राहुल गांधी यांनी ही निवडणूक लढवली; गुजरातची निवडणूक लढवण्यासाठी महाराष्ट्रातील खासदार राजीव सातव पासून ते अविनाश पांडे अशी सुमारे दीडशे जणांची टीम गुजरातमध्ये बाहेरच्या राज्यांतून आयात करण्यात आली; स्वतंत्र यंत्रणेमार्फत प्रत्येक इच्छुकांची माहिती मिळवून जास्तीत जास्त कार्यकर्त्याना निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली; हा इशारा महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण ते राधाकृष्ण विखे पाटील आणि विलास मुत्तेमवार ते संजय निरुपम यांनी लक्षात घ्यायला हवा. विधान परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी २०९ मते मिळवल्यावर कॉंग्रेसच्या हाती फार काही करण्यासारखं राहिलेलं नाहीये. सर्व सांसदीय आयुधांचा प्रभावी वापर करुन विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला किमान सभागृहात तरी मेटाकुटीला आणण्याची संधी राष्ट्रवादीसोबत फरफटत जात कॉंग्रेसने गमावली आहे. इतकी वर्ष पक्षामुळे सत्ता, पद आणि धन मिळालं आता कृतज्ञता म्हणून त्याची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे, याचा बहुसंख्य काँग्रेस नेत्यांना विसर पडलेला आहे. विक्रमी काळ प्रदेशाध्यक्षपदी राहून पक्ष वाढवण्यासाठी टिकली एवढंही योगदान नसणारे माणिकराव ठाकरे, जे भाजपत जाण्याची चर्चा गेली तीन वर्ष सुरु आहे ते विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कायम सत्तेच्या उबेत राहिलेल्या पतंगराव पाटील, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अशा अनेकांनी एकमेकाचे पाय ओढणं सोडून आता तरी पक्षाच्या कामासाठी झोकून द्यायला हवं; अन्यथा त्यांना उमेदवारी मिळण्याचीही मारामार होईल, हा बोध गुजरात निकालापासून घेण्याची गरज आहे. (या यादीत अशोक चव्हाण यांचं नाव नाही कारण ते ‘आदर्शग्रस्त’ आहेत!) जनमानसात कॉंग्रेसला अजूनही आधार असून आजवरच्या पराभवाच्या मळभातून काँग्रेसपक्ष कसा बाहेर येऊ शकतो, हे गुजरातच्या निकालानं दाखवून दिलं आहे. ते उमजून घेण्याची आणि आता पक्षाला काही तरी देण्याची वेळ आलेली आहे, हे कोषातील कॉंग्रेसजनांनी समजून घ्यायला हवं. अन्यथा लोकांसमोर नाईलाजाने पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचा चेहेरा आणि भाजप हा पर्याय खूला असेल.

‘कॉंग्रेसने आमच्याशी युती केली असती तर निकाल वेगळा दिसला असता’, असं गुजरातच्या निवडणुकीत ०.६ टक्के इतकी नाममात्र मतं मिळवलेल्या आणि दोनपैकी एक जागा गमावलेल्या (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं म्हणजे राजकीय कोडगेपणाचा कळस आहे. वयाची पंच्याहत्तरी उलटलेल्या शरद पवार यांना ज्या पक्षाच्या अस्तित्वासाठी गृहराज्य असलेल्या महाराष्ट्रात अजूनही रस्त्यावर उतरावं लागतं त्या (महा)राष्ट्रवादी कॉंग्रेसनं पराभवातून आणि गेल्या तीन वर्षात झालेल्या संकोचातून काहीच शिकायचं नाही; हा पक्ष राज्यव्यापी प्रभावी करायचं शरद पवार यांचं स्वप्न साकारायचं नाहीच हेच ठरवलंय असा याचा अर्थ आहे. आता कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी ‘परदेशी’ सोनिया गांधी नसल्या तरी राहुल गांधी यांना नेता म्हणून स्वीकारणं शरद पवार यांच्यासारख्या राजकारणात सहा दशकं हाडं झिजवलेल्या नेत्यासाठी अवघड आहे. त्यामुळे कामाला लागणं, हाच एकमेव पर्याय राष्ट्रवादीसमोर आहे.

गुजरातेत शिवसेनेच्या सर्व ४० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. १९९३च्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेनं अनेक राज्यात निवडणुका लढवल्या आहेत आणि अनामत रक्कम गमावण्याची परंपरा प्रस्थापित केलेली आहे. त्या कोणत्याही राज्यात शिवसेना निवडणूक लढवत असल्याची चार ओळीची बातमी आजवर आलेली पाहण्यात नाही; महाराष्ट्रातील मिडियाच त्याविषयी डरकाळ्या (?) फोडत असतो. महाराष्ट्रातील सत्तेचा त्याग करण्याचे इशारे देण्याचा ‘पंचवार्षिक बाणेदारपणा’ दाखवणाऱ्या शिवसेनेला गुजरात निवडणुकीत काही गमवायचं नव्हतं आणि निकालातून काही शिकायचंही नव्हतंच मुळी! जो काही बोध घ्यायचा आहे तो भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसलाच.

(छायाचित्रे – गुगलच्या सौजन्याने)


-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क +९१९८२२०५५७९९ | [email protected]
============================
​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी

लिंक – http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
============================

संबंधित पोस्ट

 • Suneel Joshi….
  प्रवीणजी
  आपलं निरीक्षण आणि विश्लेषण अचूक व परखड.
  पुढील निवडणूक ही शेतकरी विरुद्ध मोदी अशी राहणार आहे.
  शेती,सहकार याच क्रमाक्रमाने वाटोळं होत आहे ,हे एकदा शेतकरी ,कष्टकरी जनतेच्या मनात ठसले की भाजपचा गेम नक्की.

  थोरले पवार ही मोदिंच निमंत्रण आलंय म्हणून त्याच्या मदतीनं लोकसभा निवडणूक लढवतील हे देखील गुजरात निकाल सांगतोय,भाजप-सेना, पवार-राहुल सेपरेट लढतील असं निश्चित वाटतंय

  फडणवीस यांची घोडदौड ‘शेवटचा मालुसरा’होण्याच्या दिशेने नाही झाली म्हणजे मिळविली.
  ..
  कर्जमाफी योजना कृतीत न येण्यात अचूक ‘डाटा’
  नसणे ही मुख्य मेख आहे

 • Mulajkar Achyut ·….
  Jorat lekh sir

 • Rajendra Shahapurkar ·….
  बालासाहेबांवर चित्रपट येणार आहे 2019 मध्ये . नवाजुदीन सिद्धिकी साहेबांची भूमिका करणार आहेत त्यामुळे मुस्लिम मतदारांमध्ये ‘संदेश’ जाईल .. काँग्रेसचे सॉफ्ट हिंदुत्व सेनेला भावलेले आहेच त्याच्या जोडीला आता सेनेचे सॉफ्ट अनुनय धोरण शोभून दिसेल अशी संजयची दूरदृष्टी असावी असे दिसते .

 • Dinesh Kale ….
  nice vishletion

 • Anil Gadekar ….
  अप्रतिम।।।

 • Vijaykumar Kale ….
  Bilkul Sahi Famaya!

 • Sudhanshu Hadge ·….
  राजकारणाची पातळी फार घसरलेली आहे

 • Hemant Gharote ….
  Positive badal jaruri aahe

 • Kisshor Dargalkar …..
  मोदींच्या बाबतीतही हाच प्रवाद आहे पण राजकारण म्हणजे कानाफुसक्या नव्हेत mr Praveen Bardapurkar

 • Surendra Deshpande ….
  शाखा उल्लेख आहे कधिच गेले होते

 • Datta Joshi ….
  खडसे वगळता किती जण स्वतःच्या मतदारसंघात स्वबळावर निवडून येऊ शकतील?

  • Surendra Deshpande ….
   असं स्वबळ फार कमी असतं hi commandहेच बळ कधी इंदिरा जी आज मोदी even Pawar is not in total Maharashtra

   • या मजकुरात ; आत्ता प्रश्न निवडून येण्याचा , स्वबळाचा नाहीच केवळ नाराजीचा आहे !

    • Mohan Phule….
     बहुतेक फडणविसांनी यांच्या “दुकानदार्या” थांबवल्या असाव्यात, त्यामुळे त्यांच्यावर नाराजी….

 • Anil Jadhav Rao ·….
  जो डर गया ओ समजो मरगया| बाशिंग बांधून बसले ली मंडळी ला जनता अम्बी हळद लावेल का ,या भीती मुळे यादि वाढत असेल ही …अभ्यासु बाबुं हलवे म्हणजे वैताग कमी होईल, ही अंधश्रदा गुजरात निकाल ला सुसंगत ठरेल का.

 • Sachin Mahajan ·….
  All these names which you have mentioned are Good for Nothing….. even if they leave, there will not much of difference to Mah BJP position. Let us presume Ms.Munde quits and tries to form a new party. How many seats she will get – 1 or 2. Same is the position about other names. So its better they keep mum and get whatever they get from CM / party.

 • सुंदर लिखाण
  – सुनील नेरलकर
  प्रदेश प्रवक्ता भाजप

 • Pramod Lende Khairgaokar ….
  शिक्षणाच्या मुलभूत अधिकाराचा उभ्या बाजारात ज्याने लिल्लाव केला.पुरोगाम्यांच्या महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्था विनोदाच्या तावडीत सापडली .वारे सरकार अन् धन्य नाना फडणवीस .

 • Sajid Shaikh · ….
  वाह अगदी बरोबर

 • Suresh Bhusari ….
  Right sir

 • Salim Shaikh ·….
  अगदी बरोबर आहे

 • Gautam Suryawanshi ….
  सडेतोड प्रहार पण संबंधितांना भानावर आणणारा.

 • Rajesh Kulkarni ….
  आम्ही टाइमपास म्हणून लढवली असे म्हणायलाही कमी करायचे नाहीत आता.

 • Mahesh Upadeo ….
  भाजप ही आज पर्यत अश्याच निवडणूका लढत आले , हे विसरता येणार नाही

 • Bhalchandra Kango ….
  Role played byNCP under Prafulla Patel leadership has helped BJP as expected

 • Prasad Digambarrao Dongargaonkar ·….
  समजदार को इशारा ही काफी है…
  छान लेख…