नितीन गडकरींची नाबाद साठी !

//१//

भारतीय जनता युवा मोर्चाचा शहराध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते पक्षाचा एक प्रमुख राष्ट्रीय नेता, एक आमदार ते केंद्रात प्रभावी मंत्री… असा ज्याचा प्रवास पाहता आला आणि ज्याच्या सळसळत्या तरुण वयापासून असलेलं मैत्र आजही कायम आहे, ते नितीन गडकरी येत्या शनिवार, २७ मे रोजी वयाच्या साठीत प्रवेश करत आहेत. त्यानिमित एका मोठ्ठा सोहोळा नागपुरात शरद पवार, देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. (नितीन गडकरींची जन्म तारीख २७ मे १९५८; खरं तर, वयाच्या साठीत प्रवेश हा काही ‘महा’सोहोळ्याचा प्रसंग नसतो पण, राजकारणात सर्वच माफ असतं!) त्याचा हा राजकीय प्रवास मी जसा पाहिला तसाच त्यानं एक नवशिका पत्रकार ते संपादक असा माझा प्रवास पहिला.

महत्वाचं म्हणजे, आम्ही एकमेकाच्या राजकीय विचारांचे तीव्र विरोधक आहोत. ‘तुम्ही समतावादी नाहीत, तुमचा हिंदुत्ववाद साफ अमान्य’ हा माझा प्रमुख आक्षेप तर ‘तुम्ही तीन समाजवादी एकत्र आले की चार मतं आणि पाच पक्ष,’ ही नितीनची आवडती मांडणी; आमची ही जुगलबंदी अनेकदा जाहीरपणे झालेली. त्यामुळे राजकारण, प्रशासन, पत्रकारिता आणि वृत्तपत्र वाचणाऱ्या मराठी वाचकांत आमच्या मैत्रीचं अप्रुप; इतकं की, त्या संदर्भात अजूनही प्रश्न विचारले जातात. ‘राजकारण कसं करावं हे मी गडकरींना आणि पत्रकारिता कशी करावी हे गडकरी मला सांगत नाहीत,’ हेच आमच्या मैत्रीचं गुपित आहे, हे त्यावरचं नेहेमी दिलं जाणारं आमचं उत्तर आहे.

आमचं मैत्र अकृत्रिम, निस्वार्थ आणि निरागस आहे. तो अगदी राष्ट्रीय अध्यक्ष झाला तरी एकमेकाला जाहीर कार्यक्रमातही ‘अरे-तुरे’ असं संबोधत असू, अशी आमची दोस्ती. त्याच्या राजकीय उत्कर्षाचा मला वैपुल्यानं अभिमान तर त्याला माझ्या लेखणीचा; इतका की औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर अशा तीन ठिकाणी नितीन गडकरी नावाच्या या उमद्या मित्रानं ‘प्रवीण इज नॉट मॅनेजेबल जर्नालिस्ट’ असं जाहीर कार्यक्रमात अभिमान आणि कौतुकानं सांगितलेलंय . इतकं गडद मैत्रीचं सहोदर असूनही मी नितीन गडकरी यांच्या ‘खास गोटा’तला आहे असा आमचा दोघांचाही दावा अजिबात नाही , तसा ग्रह कुणी करून घेतला तर आम्हा दोघांनाही तो मुळीच रुचणारा नाही , पण ते असो!

नितीन गडकरी दिल्लीत गेला आणि तिकडेच रमला. त्यानं दुसऱ्यांदा अध्यक्षपद (उद्विग्न होऊन) नाकारल्यानंतर मी राजकीय संपादक म्हणून दिल्लीत उमेदवारी केली. त्या काळात नितीन गडकरी नावाच्या या मित्रानं दिल्लीत भक्कमपणे रोवलेले पाय पाहिले, नितीनच्या नेतृत्वाचा प्रभाव आणि आवाका पहिला; परक्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीत त्याच्यातल्या संघटकाला जवळून पाहिलं. मग, एका क्षणी आम्ही दोघांनीही ठरवून एकमेकांचा उल्लेख जाहीरपणे ‘अहो-जाहो’, करायला सुरुवात केली आणि खाजगीत मात्र एकमेकाला बोलतांना लावलेल्या ‘जी’ची भरपूर टिंगलही केली.

//२//

नितीन गडकरी ही भाजपला परिवाराची म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, देणगी आहे आणि त्याच्यावर संघाचा (पक्षी : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत) वरदहस्त आहे; असा एक सार्वत्रिक समज आहे. काही अंशी ते खरंही आहे पण, नेतृत्वाचा कस सिध्द करतांना नितीन गडकरी यांना जो काही संघर्ष करावा, विरोध सहन करावा लागलेला आहे, त्यांचे खच्चीकरण करण्याचे जे काही प्रयत्न झाले; त्याबद्दल फारसं लिहिलं गेलेलं नाही. नितीन गडकरी यांच्या राजकीय जीवनाचे तीन टप्पे पाडता येतील. पहिल्यात टप्प्यात कार्यकर्ता ते विधान परिषद सदस्यपद. दुसऱ्या टप्प्यात राज्याच्या युती सरकारातलं मंत्रीपद, विधान परिषदेचं विरोधीपक्ष नेतेपद आणि नंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेलं काम. तिसरा टप्पा दिल्लीतला म्हणजे, राष्ट्रीय स्तरावरचा आहे. राष्ट्रीय अध्यक्ष, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचं प्रभारीपद, नरेंद्र मोदी यांची पक्षनेतृत्वाच्या सर्वोच्चपदी नियुक्ती होतांना बजावलेली ‘कळी’ची भूमिका आणि आता केंद्रीय मंत्री म्हणून कामाचा उमटवलेला ठसा, हे सर्व या तिसऱ्या टप्प्यात येतं. या तीनही टप्प्यात नितीन गडकरी चांगलेच ‘तावून-सुलाखून’ निघाले आहेत.

राजकीय पार्श्वभूमी नाही, पक्षात कोणीही ‘गॉड फादर’ नाही, त्यातच उमेदवारीच्या काळात पक्षानं भटा-ब्राह्मणांचा पक्ष या प्रतिमेची कात टाकायला केलेली सुरुवात केलेली असतांनाच आडनाव ‘गडकरी’ म्हणजे अर्थातच ब्राह्मण, अशी ही अडथळ्याची शर्यत होती. प्रत्येक टप्प्यावर यश संपादन करताना, कामाची मोहोर उमटवतांना कोणाही राजकीय नेतृत्वाला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन विरोधकांशी स्पर्धा आणि सामना करावा लागतो, ते गडकरी यांच्याही वाट्याला आलेलं आहे. हा संघर्ष करतांना तर एका क्षणी प्रचंड बदनामी नाहक वाट्याला आल्यावरही न डगमगता नितीन गडकरींनी स्वभावात तसंच कार्यशैलीत केलेली सुधारणा आणि पक्षांतर्गत तसंच पक्षाबाहेरच्या विरोधकांवर केलेली मात नीट समजून घ्यायला हवी.

कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याच्या जीवनात असते तशी पहिल्या टप्प्यातील गडकरी यांची वाटचाल आहे. गंगाधरराव फडणवीस यांच्या मृत्यूनंतर नंतर विधानपरिषदेची उमेदवारी; मग आमदारपद हा पहिला टप्पा तुलनेत संथ होता. या काळात राज्य संघटनेवर गोपीनाथ मुंडे यांची घट्ट पकड होती आणि केंद्रात राज्याचे सर्वेसर्वा प्रमोद महाजन असल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात गडकरींनी फार काही करावं किंवा महाजन-मुंडे यांनी त्यांना काही करु द्यावं अशी स्थिती नव्हती. या टप्प्यात एक अभ्यासू तरुण आमदार अशी ख्याती संपादन करतांनाच अरविंद शहापूरकर आणि त्यांच्यासारख्या अनेक सहकाऱ्यासोबत पक्षाची विदर्भात संघटनात्मक बांधणी करण्यात त्यांचं योगदान ठळक राहिलं. ‘भाजपच्या राजकारणातला एक उभरता सितारा’ अशी या काळातली त्यांची प्रतिमा होती.

दुसऱ्या टप्प्यात नितीन गडकरी राज्यात मंत्री झाले. त्यांची प्रशासनावरची पकड, कामाचा झपाटा, विकासाचं नियोजन व दृष्टी बघून सर्वच मोहित झाले. याच काळात ‘विकासाचं राजकारण’ ही संकल्पना राबवत पक्षात स्वत:ची बावनकशी पाळंमुळं रोवण्यात गडकरी चांगल्यापैकी यशस्वी झाले. विक्रमी कमी वेळेत आणि कमी खर्चात आकारास आलेला पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, मुंबईत उड्डाण पुलांचं तसंच राज्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांचं निर्माण केलेलं जाळं आणि त्यासाठी वापरलेला खासगीकरणाचा फंडा यामुळे ‘विकासाचा गडकरी पॅटर्न’ ही संकल्पना रुढ झाली. केंद्रात तेव्हा भाजपप्रणीत सरकार होतं. पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी होते; त्यांनी विकासाच्या ‘गडकरी पॅटर्न ’चं कौतुक केलं. तो पॅटर्न पुढे सुवर्ण चतुष्कोन म्हणून देशात आकाराला आला. नितीन गडकरी नावाच्या महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडे देशाचं लक्ष वेधलं गेलं, ते असं.

याच दरम्यान प्रमोद महाजन यांचं दिल्लीच्या आणि गोपीनाथ मुंडे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात तसंच सत्ता वर्तुळात वाढलेलं प्रस्थ भाजपातील अनेकांना खटकत होतं. (लालकृष्ण अडवाणी यांच्या ९८६ पानांच्या ‘माय लाईफ माय कंट्री’ या भल्या मोठ्या आत्मचरित्रात त्यांच्या सर्व राजकीय यात्रांचं यशस्वी आयोजन आणि सारथ्य करणाऱ्या प्रमोद महाजन यांचा केवळ एक फोटो आणि २ उल्लेख आहेत!) या ‘खटकबाज’ मंडळीना नितीन गडकरी हा पर्याय दिसू लागला. मित्रपक्ष असलेल्या राज्यातल्या शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे तर गडकरी यांच्यावर जाम खूषच होते. याचा परिपाक म्हणून राज्यातली युतीची सत्ता गेल्यावर अनेक ज्येष्ठांना डावलून नितीन गडकरी यांच्याकडे राज्य विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद (२३ ऑक्टोबर १९९९) ‘चालून’ आलं आणि भाजपच्या दिल्लीश्वरांकडून राज्यात एकछत्री अंमल असणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना पहिला पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उभा केला गेला. अत्यंत आक्रमकपणे विरोधी पक्षनेतेपद गाजवणाऱ्या नितीन गडकरींचं नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. स्थानिकांना प्राधान्य देणारा पूर्ती उद्योग उभारणी, वीज आणि इथेनॉल निर्मिती, साखर कारखाना अशी स्वत:च्या साम्राज्याची भक्कम बांधणीही गडकरी यांनी याच काळात केली.

प्रस्तुत लेखकाच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात डावीकडून पक्षाचे तत्कालिन अध्यक्ष नितीन गडकरी , प्रस्तुत लेखक , राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेते गोपानाथ मुंडे

राज्यात गोपीनाथ मुंडे विरुध्द नितीन गडकरी यांचे गट; असं पक्षांतर्गत राजकारण सुरु होण्याचा आणि नंतर त्या गटांनी ‘बाळसं’ धरलं जाण्याचाही तो काळ होता. त्यातच नंतर लालकृष्ण अडवाणी यांच्या पुढाकारानं नितीन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद (डिसेंबर २००४) दिलं गेलं. खरं तर, राजकारण म्हणून गोपीनाथ मुंडे यांचे पाय कापण्यात गडकरी यांना रस नव्हता; मुंडे यांचं नेतृत्व व लोकनेतेपद गडकरी यांना मान्यच होतं; पक्षासाठी मुंडे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मनात खोल कृतज्ञताच होती पण, मुंडे यांचे सर्व निर्णय प्रदेशाध्यक्ष म्हणून गडकरी यांना मान्य नसत. निर्णय प्रक्रियेत नितीन गडकरी यांनाही सहभाग हवा होता. त्यातून या दोन नेतृत्वात वर्चस्वाची अहमहमिका सुरु झाली.

नितीन गडकरी यांच्या राजकीय आयुष्यातील तिसऱ्या टप्प्याची ही सुरुवात होती. भविष्यात आपल्याला दिल्ली गाजवायची असल्याचा हा प्रारंभ आहे, हे तेव्हा गडकरी यांना ठाऊक होतं की नाही हे कळायला मार्ग नाही. तेव्हा, प्रकृती अस्वास्थ्यामुळे अटलबिहारी वाजपेयी बाजूला सरकलेले होते; त्यातच प्रमोद महाजन यांची हत्या (३ मे २००६) झाली; पक्षात गोपीनाथ मुंडे बाजूला पडण्यास म्हणा की त्यांना डावललं जाण्यास म्हणा, सहाजिक सुरुवात झाली. पाकिस्तानात जाऊन केलेल्या जिना कौतुक प्रकरणावरून संघाच्या मनातून उतरलेल्या आणि तीन लोकसभा निवडणुकात केंद्रात सत्ता आणण्यात अयशस्वी ठरलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना भाजपच्या सर्वोच्च वर्तुळातून बाजूला करण्याची योजना एव्हाना परिवारात तयार झालेली होती. ती योजना अंमलात आणण्यासाठी संघाच्या पडद्यावर डॉ. मोहन भागवत यांचं सरसंघचालक म्हणून आगमन (२१ मार्च २००९) झालेलं होतं. भाजपतील ‘अडवाणी युगा’च्या अस्ताचा तो प्रारंभ आहे, याची कल्पना तेव्हा कोणालाच आली नाही. या योजनेचाच एक भाग म्हणून २००९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून पक्षाचं गटनेतेपद काढून घेण्यात आलं आणि लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद सुषमा स्वराज यांच्याकडे (२१ डिसेंबर २००९) देण्यात आलं.

//​​३​​//

-आणि सुरु झाला नितीन गडकरी यांच्या राजकीय जीवनातला सगळ्यात कठीण तिसरा टप्पा. परिवाराने भाजपच्या अध्यक्षपदी कोणत्याही गटाचा शिक्का नसलेला, ताज्या दमाचा आणि तरुण चेहेरा देण्याचा निर्णय घेतला. शोध संपला तेव्हा तीन नावं समोर आली. त्यात नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर आणि मुरलीधर राव अशा तिघांचा समावेश होता. राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुत्रे हाती घ्यावयाची आहेत, अशी सूचना नितीन गडकरी यांना ऑक्टोबर २००९च्या विजयादशमीला दिली गेली. पक्षीय लोकशाहीचे रीतसर सोपस्कार पार पडून नितीन गडकरी यांनी १ जानेवारी २०१०ला ही सूत्रे स्वीकारली. काळाचा महिमा बघा, महाराष्ट्रात मुंडे आणि महाजन यांच्या विरोधात ज्या लालकृष्ण अडवाणी यांनी नितीन गडकरी नावाची तोफ डागली होती त्याच तोफेचा रोख आता दिल्लीत लालकृष्ण अडवाणींकडे वळला होता.

अध्यक्षपदाच्या सुरुवातीच्या काळात दिल्लीत पक्षांतर्गत विरोधकांनी नितीन गडकरी यांना ‘उभं पिसं नांदू कसं’ आणि प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धी पक्ष विरोधकांनी ‘सळो की पळो’ करुन सोडलं. नितीन गडकरी यांचा स्वभाव अस्सल वैदर्भीय अघळपघळ आणि मोकळा-ढाकळा. मनात एक आणि जनात दुसरं असा गडकरी यांचा डीएनए नाही; जे काही बोलाय-करायचं ते उघड आणि समोरच्याला भिडायचं ते थेट; दुसऱ्याची काठी, तिसऱ्याच्या हातानं समोरच्याला मारायची ही राजकीय कावेबाज वृत्ती नाही. राजकारण करतांना डोक्यावर बर्फाची लादी, तोंडात खडीसाखर आणि चेहऱ्यावरची सुरकुती हलू न देण्याची दिल्लीची पारंपारिक, बेरकी खासीयत. दिल्लीच्या वातावरणात दररोज गडकरी अडचणीत येतील अशा खेळी या ‘बेरक्यां’कडून सुरु झाल्या. या खेळी करणारात स्वपक्षीयच जास्त होते; हे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला होता कारण, अध्यक्ष म्हणून पक्षाच्या बांधणीसाठी दिल्लीत ठिय्या मारण्यापेक्षा बाहेरच गडकरी रमू लागले होते. यूपीए सरकारच्या काळात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि त्यातून निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशभर झंझावाती दौरे करुन संघटनात्मक बांधणी करून नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘लॉंचिंग पॅड’ निर्माण केलं. पक्ष निवडणुकीसाठी सज्ज करण्यावर गडकरी यांनी भर दिला. पक्षात चैतन्य निर्माण झालं. सोबतच त्यांनी औद्योगिक व व्यापारी जगतात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

ही कामगिरी बघून नितीन गडकरी यांना पक्षाध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळणार हे स्पष्ट दिसू लागलं; त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली. अडवाणी गट अस्वस्थ झाला आणि गडकरींविरुध्द ‘फटाके’ फोडण्यास सुरुवात झाली. रान जोरदार उठवलं गेलं. एकजात सर्व प्रकाश वृत्तवाहिन्यांनी तर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं. अख्ख्या राजकीय जीवनात जितकं अवमानित व्हावं लागलेलं नव्हतं त्यापेक्षा शतपट जास्त अवमान आणि आरोपांच्या फैरी नितीन गडकरींवर झाडल्या गेल्या. त्यातलं असलेलं सत्य कोपऱ्यात अंग चोरून उभं राहिलं; त्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. चौकशा मागे लागल्या. (दुसऱ्या टर्मसाठी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी आमची भेट झाली तेव्हा गडकरी प्रचंड उद्विग्न झालेले जाणवत होते; मी दुसरी टर्म घेणार नाही, असं ते म्हणाले; मला ते खरं वाटलं होतं.) पण, राजकीय कड्यावरून गडकरी यांना ‘कोसळवणं’ अजून बाकी होतं. सकाळी ते विमानाने नागपूरहून दिल्लीला जात असतानाच सीबीआय आणि आयकर खात्याच्या कथित छाप्यांच्या बातम्या आल्या…गडकरींनी अध्यक्षपदासाठी अर्जच दाखल केला नाही…पक्षांतर्गत विरोधकांनाही तेच हवं होतं…राजनाथसिंह अध्यक्ष झाले.

अशी प्रचंड बदनामी आणि अवमान वाट्याला आल्यावर भलेभले खचतात, नाउमेद होतात, लढण्याची जिद्द हरवून बसतात. गडकरी याला अपवाद होते. ते उद्विग्न झालेले होते, निराश नाही. बोलणं कमी करुन, अघळपघळपणा बंद करून त्यांनी दिल्लीतच स्वत:चं ‘मेटल’ सिध्द करण्याचं आव्हान मनोमन ठामपणे स्वीकारलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली आणि स्वत:ला त्या कामात झोकून दिलं. वॉर्ड पातळीपर्यंत विस्कळीत झालेला पक्ष रात्रं-दिवस एक करुन पुन्हा बांधला, उमेद हरवलेल्या पक्षात लढण्याची इर्षा निर्माण केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्ष बहुमताच्या काठावर आणत असतांनाच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणण्यातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली; मोदी आणि अडवाणी, अडवाणी आणि संघ, संघ आणि पक्ष यात मध्यस्थ म्हणून स्वत:चं निर्णायक स्थान निर्माण केलं. (ही कळीची कामगिरी गडकरी यांनी दिल्लीतील तीन मूर्ती मार्गावरील बंगल्यात बसून कशी बजावली त्याचा मीही एक पत्रकार म्हणून साक्षीदार आहे.) कालांतरात पूर्ती प्रकरणातील या सर्व चौकशात गडकरी निर्दोष असल्याचं सिध्द झालं आणि त्यामागे कोण आहे हेही समोर आलं; अर्थात त्याला फारशी प्रसिध्दी मिळाली नाही. थेट जनतेतून निवडून येत नाही हा शिक्का पुसून टाकत नागपूर लोकसभा मतदार संघातून मोठा विजय संपादन केला आणि आता केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची कामगिरी जनतेसमोर आहे.

राजकीय आयुष्याच्या या तिसऱ्या टप्प्यात आता गडकरी कडकडीत तावून सुलाखून निघालेले आहेत. राजकारणात आलेल्या ‘अशा’ एकेक अनुभवानंतर गडकरी अधिक प्रगल्भ आणि समंजस झालेले आहेत. नितीन गडकरी हे अपयशाच्या गर्तेत कायम रुतून बसणारं आणि यशाच्या शिखरावर असतांना हुरळून जाणारं व्यक्तीमत्व आता राहिलेलं नाही. खऱ्या अर्थाने नितीन गडकरी हे आता ‘मॅच्युअर्ड पोलिटिकल स्टफ’ म्हणून आकाराला कसे आलेले आहेत, हे त्यांनी गोव्यात पक्षाचं सरकार स्थापन करतांना केलेल्या चतुराईतून दाखवून दिलं आहे. मात्र हे काहीही असलं तरी, नितीन गडकरी यांनी केंद्रात मंत्रीपदाऐवजी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारायला हवं होतं कारण ; नेतृत्वाखाली काम करणं आणि ‘समांतर’ असणं असा तो सूक्ष्म भेद आहे , असं मला ठामपणे वाटतं .
कुटुंबियांना राजकारणापासून कटाक्षानं लांबच ठेवणाऱ्या नितीन गडकरींसाठी वयाची साठी हा काही फार मोठा टप्पा नाही. राजकारणात हे वय म्हणजे तारुण्यच! यापुढच्या वयात यापेक्षा मोठी मंझील त्यांनी गाठावी अशी अनेकांची अपेक्षा आहे; त्यासाठी एक दोस्तयार म्हणून नितीन गडकरी यांना खंडीभर शुभेच्छा!

(क्युबिक चित्र संकल्पना- विवेक रानडे, ‘शब्दरुची’च्या सौजन्याने / संदर्भ सहाय्य- गुगल)

-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क – ९८२२०५५७९९
[email protected]
www.praveenbardapurkar.com

​===========================​===========

नितीन गडकरी यांचं व्यक्तीचित्र असलेलं ‘क्लोज-अप’ हे पुस्तक इ स्वरुपात बुकगंगाने प्रकाशित केलं असून ते मिळवण्यासाठी लिंक अशी-

http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515

 

 

 

 

 

 

​===========================​===========

संबंधित पोस्ट

 • Jitendra Likhite

  सुंदर विवेचन।।। 1987। 92, नोकरी साठी नागपुर ला असताना, बर्डी वर पकोड़े वाला, कड़े श। नितिन जी न ची जुजबी अशी ओळख जाली होती।।। या मानसा कडे प्रचंड क्षमता, मेहनती वृत्ति, आणि भविष्या च वेध या गुणांची रेलचेल आहे।।। एक वैयक्तिक खंत एवधिच की महाराष्ट्रा च्या नाशिबि त्यांचे नेतृत्व लाभायला पाहिजे होते।।। त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • Suryakanta Patil….
  नीतीन गडकरी हे maharasthrala पडलेलं अफाट स्वप्न आहे जे आम्हाला अनुभवायला मिळतंय,हा फटाफट मित्र आणि राजनेता आपल्या नागपूरचा आहे ह्याचे खूप समाधान मिळते, नितीनजी तुम्हाला उदंड आयुष्य आणि आरोग्य मिळो तसेच राजकीय पदा ना न्याय देताना तुम्ही ह्या देशालाही न्याय देताय ह्याचा खूप आनंद होतोय।आपल्यात लपलेलं खट्याळ लेकरू असेच जपून ठेवा। माझ्या हार्दिक शुभेच्छा।

 • Purushottam Kale….
  योग्य विचार !!

 • Milind Wadmare….
  अतिशय सुरेख, शेअर करतोय…

 • Anil Nagapure….
  Best

 • Madhav Bhokarikar….
  छान !

 • महेश कुलकर्णी….
  उत्तम

 • Kapil Idde….
  स्वतंत्र विदर्भ राज्याच् लेखी आश्वासन दिलं होत लोकसभा निवडणुकीपूर्वी. या निमित्ताने त्याची पण आठवण व्हावी…

  • Surendra Deshpande….
   No separate state of vidarbha

   • Kapil Idde….
    देशपांडे साहेब विदर्भाच् स्वतंत्र राज्य होण्यापासुन कोणी रोखु शकणार नाही. लवकरच आपल्याला परिणाम दिसतील

 • Narayan Alies Dilip Deodhar….
  खूप अर्थपूर्ण

 • Avit Bagle….
  साधे, सोपे आणि सरळ लेखन. सुंदर!

 • Datta Jadhav ·…
  एक नंबर लेख. गडकरी साहेबांना भेटण्याची इच्छा झाली. जबरदस्त व्यक्तिमत्व.. महाराष्ट्राचा हा माणूस पंतप्रधान व्हावा हि मनापासून ईच्छा.. 💐💐💐💐

 • Dinesh Yeshwant Kashid ·….
  I am big fan of Mr Gadkari . Vary real an open minded person.

 • Subhash Gadiya …
  Excellent

 • ushar Jamwadikar
  मा.प्रविणजी,
  आपण एक छान लेख परमआदरणीय नितीनजीं बद्दल लिहीला मला खूप आवडला त्यातल नितीनजींच केलेल वर्णन तर फारच सुंदर आहे.
  आणि आता ते मा.नरेंद्र मोदीं नंतर पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार आहेत आणि होतील असा मला विश्वास आहे. आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकी नंतर त्यांना आधी मुख्यमंत्री पदाची संधी जेष्ठते नुसार पक्षाने द्यायला पाहिजे होती. मा.देवेंद्रजी पण खूप विद्वान आहेत पण मा.नितीनजी ना मुख्यमंत्री पदाची संधी देण पक्षाला आवश्यक होत अस मला वाटतं. मा.नितीनजी ना उदंड आयुष्य लाभो हीच इश्वर चरणी प्रार्थना.आमचा निरोप त्यांच्या पर्यंत पोहचवा..
  [email protected]

 • Kaustubh S Dive….
  There are some more points which I think you should include in your next blog but still blog is really good

  • i have not covered so many points like gadkari v/s munde , gadkri v/s uddhav thakre , gadkri and devendra fadnvis , gadkari in national politics , his sleepry talks … but these were not on agenda and this is not occasion too !

 • Nisar Khan Khan….
  प्रवीणजी , गडकरी साहब की योग्यता का देश के उत्थान के लिये पूर्ण उपयोग होना शेष है . सुंदर ब्लाग लिखने के लिये आपका धन्यवाद .

 • Sunil Mishra….
  2019 का प्रधानमंत्री नागपुर से होगा

 • Nitin Naigaonkar

  अप्रतिम तर आहेच.. मात्र माझ्यासारख्यांसाठी माहितीपूर्ण अधिक आहे. संदर्भ म्हणून एक मोठा ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद सर..!

 • Sameer Gaikwad….
  Ultimate write-up

 • Milind K. Alshi….
  पुष्कळदा गडकरी हे भाजपा चे शरद पवार आहेत असं वाटून जात

  • Surendra Deshpande….
   Not at all if he tried so will lost public sympathy one time he try to prove good relationship with khanjir and lost 2nd term of President

 • Abdul Aziz….
  एकच लक्ष विदर्भ माझा आणि मी विदर्भाचा लक्ष संपूर्ण जगावर सबका साथ सबका विकास स्वप्नपुर्ती हेच लक्ष

 • Vasant Pitke ….
  प्रवीणजी….. लेख अप्रतिम !!💐💐

 • Sarang Takalkar….
  प्रवीणजी..अतिशय सुरेख आणि गडकरी यांच्या व्यक्तीमत्वासारखा थेट लिखाण असलेला हा लेख उत्तम

 • Ramratan Hadge….
  Best

 • Satish Kulkarni….
  छान झाला आहे. नेत्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

 • Vikas Rayamane….
  आणि ते यसस्वी 100%होतील

 • Akash Adsule ·…
  Abvp te Bjp national president
  MLA te Central minister Asa ha pravas aapratim Pravin ji khup chan Abhad drusti aslela karyakarta kasa neta Jhala kami shabdat tumhi Mandal cement Road vala neta

 • Mangesh Duke….
  नितीनजी गडकरी भारताचे पंतप्रधान व्हावे !

 • Chandrakant Lokhande….
  Sir 100%

 • Kiran Kulkarni ….
  काम चालू आहे बोलणे बंद आहे all the best for future

 • Ajay Bhakre….
  नितीनजी गडकरी भारताचे पंतप्रधान व्हावे !

 • Manoj Tulpule….
  अडवानींच्या पुस्तकात प्रमोद महाजनांना एवढी भलीथोरली जागा दिलीय हे माहिती नव्हत. आमच्या डोळ्यापुढे कायम अडवानींसोबत उभ्या महाजनांचं इंडिया टुडेतलं छायाचित्र येतं. – बाकी मित्रावरचा लेख झकासच.

  • या आमच्या मठीत , लालकृष्ण अडवाणींचं ‘ते’ पुस्तकच देतो !

 • Milind Bhende ….
  तस पाहिले तर नितीन गडकरीच खरे जाणते राजे आणी विकासपुरुष आहेत.. बाकिचे तथाकथित …. सगळा आंनंद आहे..

 • Prakash Paranjape….
  लेख छानच आहे .आपल्यालाच फक्त अंतिम सत्य सापडले आहे असा अभिनिवेश निर्माण झाला की गुणग्राहकतेचा बळी जातो .वेगवेगळ्या विचारावर निष्टा असलेले लोकही मित्र होऊ शकतात हे आपण सिद्ध केलेच आहे .स्वार्थ नसेल तरच ही मैत्री व्रद्धिंगत होऊ शकते .

 • Rajesh Kulkarni….
  आता आणखी जबाबदारी नको असे ते नुकतेच म्हणाल्याचे पाहिले तेव्हा वाईट वाटले. त्यांच्या धडाकेबाज पद्धतीला पूर्ण पाठींबा असलेले नेत्ृत्व असताना त्यांनी आणखी उमेद बाळगायला हवी असे वाटते.

 • दुर्गाप्रसाद पांडे ….
  बहुत सुंदर है

 • ​LAXMAN KALE , Mumbai ….
  ​Nitin Gadkari is proven and time tested Leadership Material.
  But my personal feeling is that Maharashtra has lost a lot in not having him as Chief Minister .

 • Rajesh Puri ….
  गडकरी हे समाजकार्या करीता झटणारे देशातील एकमेव राजकारणी आहेत. हीच त्याची विशेषता आहे.

 • Nambeo C Kamble ….
  मा.नितीनजी दूर दृष्दीचे नेते आहेत.

 • Dhanraj Uttamrao Gawande Patil ·….
  Kathin samay yeta , Gadkarich kamas yetat..sathi to zanki hai, abhi lambi inning Baki hai..

 • Sunil Chipate ·….
  बातें कम काम जादा

 • Abhay Lanjewar….
  अप्रतिम…..

 • Sutar Subhash….
  अगदी खरंय, great नेता.

 • अविनाश लेमनराव बालपांडे · https://uploads.disquscdn.com/images/ad5aa536571bb26eb92499fd71593ef7f46f289b0c3ac7ce7973ab4fb78f3c62.jpg

 • Vitthal Deshmukh Thakare….
  छगनभाऊवर लीहा माहिती होईल

 • Changdeo Gite….
  मुंडे यांचा लोकसंग्रह गडकरी पेक्षा मोठा होता ,,

 • Virag Kulkarni ·…
  Atishay sunder Vivechan

 • Jana Mundhe ….
  मुंढे साहेब बहुजनाचेनेते होते आमचे दैवत आहे जय भगवान जय गोपीनाथ

 • Ravi Joshi ….
  Gadkari jiddi vyakti aahet. Manat aalele kaam te purna kartatach. Sobatach Vikasa sathi dhyey veda manus.

 • Raam Raam…
  नेहमीप्रमाणेच सुंदर लेख सर.

 • Pralhad Lulekar….
  लोकनेता विरुध्द व्यवस्थेने दिलेला नेता असं काही होत का ?

  • मतभेद नक्कीच होते होते पण ,अनादर मात्र मुळीच नव्हता हे मी ठामपणे सांगू शकतो .
   २००९च्या निवडणुकांनंतर असल्या-नसल्या मतभेदाची धारही खूपशी बोथट झालेली होती .
   मिडिया आणि कट्टर समर्थकांनी जे काही मतभेद होते ते फारच ‘आऊट ऑफ प्रपोर्शन’ रंगवले , असं माझं मत आहे .
   नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहातील एका कार्यक्रमात बोलतांना मुंडे यांनी माझी साक्ष काढत ही बाब सांगितली होती !
   राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर जाहीरपणे गोपीनाथ मुंडे यांचे चरणस्पर्श करुन आशीर्वाद घेतले होते , हे माझ्या स्मरणात आहे .

   • Pralhad Lulekar….
    हे बारकावे टिपणं ही महत्त्वाचे

   • Sutar Subhash….
    हो, मतभेद असतातच, पण मनभेद नसतील.

 • Swaraj D Gitte….
  मुंडे साहेबांच्या निधनानंतर त्यांच्यातील वाद आणखी वाढविण्यात आला.
  पण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींना कोणत्या basis वर दिले होते? कारण की त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात bjp ला जास्त यश मिळाले नव्हते

 • Umakant Pawaskar ….
  Sir very well written. Last bracket was not required. All are well known

 • Prashant Deshmukh ….
  Sahi…….

 • Ganesh Mohan Karad ·….
  एक तोफ तळातल्या मानसाची
  लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब

 • dattaatray

  खूप सुंदर गडकरी मांडले आहेत. एक मराठी माणूस राष्ट्रीय राजकारणात स्थिरस्थावर झाल्याचा मराठी लोकांना नक्कीच अभिमान आहे. शिवाय सर्वांना सोबत घेऊन जाणारं, राजकारणापलिकडे माणस जपणारा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे… पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते त्यांच्याशी असलेल्या स्नेहाचा अभिमानाने उल्लेख करताता.. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा…