निमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…

अर्धवेळ वार्ताहर ते उप-निवासी मग निवासी संपादक आणि नंतर काही वर्ष नागपूर आवृत्तीचा संपादक असा माझा ‘लोकसता’ या दैनिकातील पत्रकारितेचा प्रवास झाला. त्याकाळात प्रिंट लाईनमध्ये ‘संपादक कुमार केतकर’ सोबत ‘संपादक (नागपूर) प्रवीण बर्दापूरकर’ असा उल्लेख असे; त्याचा मला आजही सार्थ अभिमान आहे. ‘लोकसत्ता’चा संपादक होण्याचं स्वप्न मी पाहिलेलं नव्हतं, ती माझा महत्वाकांक्षाही नव्हती. ‘लोकसत्ता’त माझा कोणी गॉडफादर नव्हता तरी मला हे सर्वोच्च पद मिळालं कारण, काम बघून पदोन्नती देण्याचा निर्णय संपादकानी घ्यावा आणि व्यवस्थापनाने त्या निर्णयावर शिक्कमोर्तब करावं अशी सर्वसाधारणपणे एक्स्प्रेसच्या कामाची पद्धत आहे. मी नोकरीत असेपर्यंत तरी संपादकाची प्रतिष्ठा सांभाळणारा आणि संपादकाला त्याच्या मर्जीप्रमाणे काम करू देणारा (editor driven and dominated, असा त्यांचा इंग्रजीत उल्लेख होत असे) ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापन करणारा एक्प्रेस वृत्तपत्र समूह होता. अगदी किरकोळ बातमीचे दोन अपवाद वगळता मला कधीही व्यवस्थापनाने ‘ही बातमी घ्या’ किंवा ‘घेऊ नका’ असे सुचवले नाही. जे अपवाद आहेत त्यात एका विशिष्ट किरकोळ बातमीला ‘प्राधान्य देता आले तर बघा,’ असा निरोप व्यवस्थापकीय संचालकाच्या कार्यालयातून आलेल्या टेलेक्स संदेशात होता. कोणा व्यवस्थापक किंवा ‘अमुकतमुक’ संचालकाने बेल मारावी आणि संपादकाला चेंबरमध्ये बोलावून घ्यावं, असा संपादकाला अवमानकारक वर्तणूक देणारा मामला एक्प्रेस समुहात मी तरी कधीच अनुभवला नाही. निवासी संपादक असताना अमुक एकाला ‘का नियुक्त करतोयेस’ किंवा ‘का करत नाहीयेस’ असं संपादक असलेल्या कुमार केतकर यांनीही मला एकदाही विचारलं नाहीच. नियुक्ती-पदोन्नती-वेतनवाढीच्या मी केलेल्या प्रत्येक शिफारशीला केतकर यांनी डोळे झाकून मान्यता दिली. केस लढण्यासाठी पुरेसं तथ्य आढळलं नाही तेव्हा, प्रश्न प्रतिष्ठेचा न करता दिलगिरी व्यक्त करून मोकळं व्हावं, असं काही न्यायालयीन प्रकरणात मी सुचवलं आणि त्यात कमीपणा न मानता व्यवस्थापनानं ते मान्य केलं. हे सांगायचं कारण या, वृत्तपत्रात प्रत्येक पातळीवर संपादकाचं स्वातंत्र्य किती आहे आणि किती नाही, हे मला कसं आणि किती ठाऊक आहे हे सांगणं हे आहे.

पत्रकारितेच्या बाहेरही ‘लोकसत्ता’च्या संपादकाला मोठी प्रतिष्ठा आहे; म्हणजे होती असं आता म्हणावं लागेल. याचा एक अनुभव सांगतो- २५ मार्च २००३ला मी ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा उपनिवासी संपादक म्हणून रुजू झालो (क्रेडीट गोज टू कुमार केतकर ओन्ली!) नंतर निवासी संपादक झालो. सात-साडेसात वर्षानी नागपूरला परतलो असल्यानं भेटीगाठींचा सिलसिला सुरू होता. नागपूरला ‘लोकसत्ता’त निवासी संपादक म्हणून रुजू झालो आहे सांगण्यासाठी एकदा ग्रेस यांना फोन केला तर लगेच त्यांनी मला ‘सर’ असं संबोधनं सुरु केलं. नंतर दोन तीनदा बोलणं झालं तेव्हा लक्षात आलं की कविवर्य ग्रेस मला कटाक्षानं ‘सर’ संबोधताहेत. साहजिकच मी अस्वस्थ झालो. कारण, एक तर ग्रेस वयानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ, त्यांची प्रतिभा तर डोळे दिपवणारी, ग्रेस यांनी काही काळ पत्रकारिता केली आहे म्हणजे, ते एका अर्थाने माझे गुरु आणि त्याआधी ते मला सरळ एकेरी नावाने संबोधत असत. एक दिवस माझं अवघडलेपण आणि अस्वस्थता मी ग्रेस यांना बोलून दाखवली तर ग्रेस गंभीरपणे म्हणाले, ‘तुम्ही आता संपादक आहात आणि तेही ‘लोकसत्ता’सारख्या वृत्तपत्राचे. ती खूर्ची फार मोठ्या तोलामोलाची आहे. त्या खुर्चीचा मान प्रत्येकानं सांभाळायला हवा’. ग्रेस यांनी नागपूरच्या दैनिक ‘तरुण भारत’मध्ये काही काळ उमेदवारी केलेली आणि युगवाणी या नियतकालिकाचं त्यांनी दीर्घकाळ संपादन केलेलं आहे हे लक्षात घेता, ग्रेस यांची संपादकाविषयीची धारणा किती प्रगल्भ आहे हे लक्षात येऊन संपादकपदाच्या जबाबदारीचं आणि कोणतं संचित घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे याचं, एक वेगळं भान मला आलं. (ग्रंथालीच्या शब्दरुची या दिवाळी अंकासाठी ग्रेस यांच्यावर ‘पुराण पुरुष’ हा लेख लिहिताना हे सर्व उल्लेख मी केलेले आहेत. ग्रेस यांनी तो लेख वाचलेला आहे आणि त्याच्या झेरॉक्स प्रती काढून अनेकांना वाचायला दिल्या आहेत. ‘ग्रेस नावाचं गारुड’ या विजय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात हा लेख,पृष्ठ क्रमांक ८३ वर समाविष्ठ आहे.)

लोकसत्ताच्या विद्यमान संपादकांनी एका अग्रलेखाबाबत माफी मागत तो अग्रलेखच मागे घेण्याची दिवाळखोरीची जी अभूतपूर्व कृती केली त्यावर काही कमेंट करण्याची पार्श्वभूमी म्हणून वरील प्रतिपादन केलेलं आहे. (महत्वाचं म्हणजे, आपल्याच बिरादरीतल्या कोणावर टीका करताना अर्थातच मला मुळीच आनंद होत नाहीये!) आणखी एक- हे विद्यमान संपादक आणि माझा परिचय नाही. ते ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक झाले तेव्हा मी नागपूर आवृत्तीचा संपादक होतो. नंतर, कितीतरी आधी घेतलेल्या निर्णयानुसार मी बाहेर पडलो. त्याचा ते कार्यकारी संपादक होण्याशी संबंध नाही (अधिक माहितीसाठी माझे ‘दिवस असे की…’ या पुस्तकातील मजकूर बघावा). आम्ही दोघांनी एकमेकासोबत किंवा एकमेकाच्या हाताखाली कधीही काम केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीबद्दल अनेकांची इच्छा असूनही मी आजवर कधीच चांगली किंवा वाईट अशी कोणतीही टिपण्णी केलेली नाही. त्यांची ४/५ भाषणं श्रोत्यात बसून मी ऐकली; त्यातून प्रत्येक राजकीय, सामाजिक, आर्थिक बाबींचा तेलाच्या अर्थकारणाशी संबंध जोडण्याची त्यांना हौस आहे, असं माझ्या लक्षात आलं. ‘तेल नावाचा इतिहास’ हे त्यांचं पुस्तक मला आवडलं. ७/८ जणांना तरी मी ते पुस्तक भेट म्हणून दिलं, पण ते असो.

दृष्टीकोन, मूल्य आणि आर्थिक बाबींशी निगडीत असणाऱ्या असंख्य तडजोडी करत भारतीय पत्रकारीतेचा ‘मिशन-टू-प्रोफेशन-टू-बिझिनेस’ असा प्रवास झाला तरी एक्प्रेससारख्या वृत्तपत्र समुहात संपादकाचं निर्णय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अजूनही खूपसं अबाधित आहे. या वृत्तपत्राची विश्वासार्हता आजवर झळझळीत बावन्नकशी आणि अग्रलेखाची परंपरा निष्पक्ष, निर्भीड, खणखणीत राहिली. त्यामुळंच विद्यमान संपादक रुजू झाल्यावरच्या कालखंडात अग्रलेख पारंपारिक शैली सोडून ‘कथन’ शैलीचे झाले तरी त्याकडे निर्भीड प्रतिपादन म्हणूनचं पाहिलं गेलं. लेख, बातमी, अग्रलेख यातील काही उल्लेख किंवा चुकीच्या संदर्भामुळे किंवा स्त्रोताने माहिती चुकीची निघाल्यानं प्रत्येकच संपादकावर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ एकदा तरी किंवा काही संपादकांवर अनेकदा येते. अनेकदा तर संपादकानं ती बातमी वाचलेली किंवा तो लेख त्या बघितलेलाही नसतो तरी, अंतिम जबाबदारी म्हणून दिलगिरीचं हे ओझं संपादकाला पेलावंच लागतं. ती या व्यवसायाची एक अपरिहार्य मजबुरी आहे. पण, ‘असंताचे संत’ या अग्रलेखाच्या निमित्तानं जे काही घडलं त्यामुळं ‘दु;ख म्हातारी मेल्याचं नाही तर काळ सोकावण्याचं आहे’ हे लक्षात घ्यायला हवं. बातमी किंवा तो मजकूर मागे घेतला जाण्याचा गेल्या पावणेचार दशकांच्या पत्रकारितेत एक तरी प्रसंग घडला असल्याचं मला आठवत नाही. किमान मराठी पत्रकारितेत तरी आजवर; अगदी जुलमी ब्रिटीश राजवटीतही; अग्रलेख मागे घेतला जाण्याची नामुष्की ओढावल्याची एखादी घटना घडल्याची नोंद नाही. ‘लोकसत्ता’च्या संदर्भात ‘रिडल्स’सारखा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यावरही मजकूर मागे घेण्याचा दबाव म्हणा की जबरदस्ती, संपादक माधव गडकरी यांच्यावर केली गेली नव्हती. बोफोर्स प्रकरणात दरवाज्यात पोलीस उभे असतानाही एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहातील संपादकाचे हात त्या कृतीविरुद्ध घणाघाती अग्रलेख लिहिताना, तो अग्रलेख परत घ्यावा लागेल या भीतीनं थरथरले नव्हते… या इतिहासाचे आम्ही साक्षीदार आहोत. माझ्या हाताखालच्या एका वार्ताहराच्या बातमीच्या शीर्षकामुळे पोलीस आयुक्तांच्या दबावातून राष्ट्रद्रोहाचा (Incitement to Disaffection Act 1922) गुन्हा दाखल झाला तरी, हे व्यवस्थापन डगमगलं नाही. मी मुख्य वार्ताहर असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसह ‘लोकसत्ता’चे तत्कालिन संपादक डॉ. अरुण टिकेकर आणि माझ्याविरोधात सु-मोटो क्रिमिनल कंटेप्ट दाखल होण्याची भारतीय पत्रकारितेच्या इतिहासातील पहिलीच खळबळजनक घटना घडल्यावरही या व्यवस्थापनानं संपादकाच्या सांगण्यानुसार लढण्याची भूमिका घेतली, हे मला ठाऊक आहे. थोडक्यात ‘जर्नालिझम ऑफ करेज’ अशी स्वत:ची टिमकी न वाजवता आजवरचे संपादक धैर्यानं वागले आहेत.

संपादक म्हणून जे काही स्वातंत्र्य मिळालं, ते ओंजळीतला दिवा झंझावती वादळातही जपावा तसं जपायचं असतं, याचा विसर पडला आणि बहुदा हुरळून जात स्वत: फार निर्भीड बाण्याचे असल्याचा आव अनेक अग्रलेखातून विद्यमान संपादकांनी आणला पण, प्रत्यक्षात ती एक प्रकारची ‘तुच्छ मानसिकता’ होती. अनेकांवर अक्षरशः दुगाण्या झाडल्या-शेतकऱ्यांना तर बांडगुळ ठरवण्याचा उद्दामपणा केला पण, प्रत्यक्षात मात्र संपादकाचा स्वाभिमान नावची चीज त्यांच्याकडे नाही हेच ‘हा’ अग्रलेख मागे घेऊन त्यांनी दाखवून दिलं. अग्रलेख मागे घेण्याइतकं ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’सारखं कोणतं दडपण या विद्यमान संपादकावर आलं, ते माहिती नाही. पण, त्यामुळं यापुढे मोठा दबाव आणून किंवा झुंडशाही करून; न पटणारी बातमी, लेख आणि अग्रलेखही मागे घेण्याची मागणी केली जाण्याचा मार्ग प्रशस्त करून देण्याचा चुकीचा पायंडा या संपादकांनी पाडला आहे, जो पत्रकारितेसाठी अत्यंत घातक आहे. या कृतीमुळे; संपादकीय स्वाभिमान, त्या पदाचे मूल्य, प्रतिष्ठेला कायमचा तडा गेला आहे. इतरांना कायम तुच्छ लेखून दाखवला गेलेला निर्भीडपणा कचकडी असतो, ते एक ढोंग असतं, हेच या कृतीतून विद्यमान संपादकांनी दाखवून दिलं हे जास्त निंदनीय आहे. ज्याचा आम्हाला कधीच अंदाज आला नाही किंवा अंदाज येऊ शकला नाही असं, मोठ्ठं दडपण विद्यमान संपादकावर अग्रलेख मागे घेण्याचा निर्णय घेताना आलं असणार पण, असं दडपण पत्रकारितेचा एक अपरिहार्य भाग असतं आणि ते झुगारून देण्याचं धारिष्ट्य अंगी असावं लागतं. या विद्यमान संपादकात ते धारिष्ट्य नाही हेच यानिमिताने समोर आलं; हा संपादकीय स्वातंत्र्याचा आणि एका अग्रलेखाचा एक प्रकारे ‘अपमृत्य’ आहे; ‘…दु:ख काळ सोकावल्याचं आहे’, असं जे या संदर्भात म्हटलं ते यासाठीच!

‘राजीनामा द्यायला हवा होता’, हे सांगणं सोपं आहे, असं त्यावर म्हटलं जाईल; असा निर्णय घ्यायची वेळ प्रत्यक्ष आल्यावर तुम्हीही ‘असेच’ लाचार व्हाल असंही म्हटलं जाऊ शकतं. यासंदर्भात ‘लोकां सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण’ असं वागणं कसं नाहीये याचा एक स्वानुभव सांगतो- तेव्हा मी नागपूर पत्रिका या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो. माझ्याशी कोणतीही सल्लामसलत न करता बनवारीलाल पुरोहित आणि जवाहरलाल दर्डा यांच्या विरोधात एक वृत्तमालिका सुरु करण्यात आली. हे दोघेही राजकारणी आणि श्री पुरोहित ‘हितवाद’ या इंग्रजी तर श्री दर्डा हे लोकमत या मराठी दैनिकाचे सर्वेसर्वा होते. त्यांच्या विरोधातील त्या बातम्या माझ्यामार्फत न सोडता तेव्हा संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक असलेले नरेश गद्रे यांच्या संमतीनं आणि थेट त्यांच्या कार्यालयातून वृत्त संपादकाकडे पोहोचू लागल्या. एखादी मोहीम राबवण्याचा व्यवस्थापनाचा अधिकार मला मान्य होता मात्र, ‘त्या’ बातम्यातून भाषेची सुटलेली पातळी चिंताजनक होती आणि त्या बातम्या थेट सोडल्याने मुख्य वार्ताहरांबद्दल चुकीचा संदेश जाईल, असं माझं म्हणणं होतं. पण, माझं म्हणणं साफ अमान्य करण्यात आलं. अखेर व्यवस्थापनाकडून मुख्य वार्ताहराच्या अधिकारावर होणाऱ्या अधिक्षेपाचा निषेध लेखी नोंदवत मी नोकरीचा राजीनामा दिला आणि लगेच श्रमिक पत्रकार भवनाच्या कार्यालयात जाऊन माझी भूमिका पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकारांसमोर मांडली; नागपूरच्या पत्रकारितेत ही घटना तेव्हा बरीच गाजली होती. ही घटना माधवराव गडकरी यांना कळली; त्यांनी शहानिशा केली आणि मला ‘लोकसत्ता’त प्रवेश मिळाला! ‘नागपूर पत्रिकेचे दिवस’ या मजकुरात हा प्रसंग आला आहे. (उल्लेखनीय म्हणजे ज्या दिवशी दुपारी मी राजीनामा दिला त्याच दिवशी रात्री हे व्यवस्थापकीय संचालक त्यांच्या पत्नीसह आमच्याकडे भोजनास आले होते!)

हा अग्रलेख मागे घेण्याची कृती जाहीर करण्याचा निर्णय व्यवस्थापनावर सोडून, संपादकपदाचा राजीनामा देत आणि त्याबाबतचे निवेदन प्रकाशित करून स्वत:ची बाजू मांडण्याचा बाणेदारपणा दाखवला गेला असता तर ती कृती मराठी पत्रकारितेच्या इतिहासात अभिमानाने नोंदली गेली असती; हा संपादक विचारांनं ठेंगणा आणि वृत्तीनं खुजा तसंच किरटा नाही, याची खात्री पटून वाचकांनी त्याला डोक्यावर घेतलं असतं.

असंख्य स्वाभिमानी आणि विद्वान सहकारी तसंच संपादकांसोबत ज्या वृत्तपत्रात अनेक वर्ष ताठ मानेनं काम केलं, त्या वृत्तपत्राच्या स्वाभिमानशून्य विद्यमान संपादकाशी माझा परिचय नाही, याचा मला आनंद वाटतोय!

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
[email protected]
​9822055799 / 9011557099

संबंधित पोस्ट

 • Shrikant Vinchurney….

  खूपच मस्त, डिसेट लिहिले आहे. अगदी सभ्य भाषेत खरपूस समाचार घेतला आहे. . लोकांच्या मनातील भावना तू योग्य शब्दात मांडल्या आहेस. आमच्या बैठकीत अचानक एकाने हा विषय काढला त्यावर सर्वांनी संपादकांचा निषेध सोशल मिडिया द्वारे करावा आणि त्यांना कळवावे कि ह्याने एक वेगळाच पायंडा पडेल आणि त्याचा फायदा समाज कंटक घेतील. तू प्रथमच आहेस कि ज्याने तत्परतेने आणि संवेदनशीलतेने दखल घेऊन लोकमानस प्रगट केलेस. अगदी योग्य वेळी लेख लिहिल्या बद्दल आनंद झाला.
  ब्राव्हो, कीप इट अप

 • Nivedita….
  I regularly read your blog posts. And this I particularly liked. I entirely agree with your comment
  towards the end. Girish Kuber should have resigned and written for The Hoot or some such platform as to
  why he quit. Let the world know Express is not what it says, rather claims. Now the entire onus lies on
  Kuber as you rightly pointed out.
  Baaki theek. with regards,

 • Keshav Sathaye….
  Liked.I am curious to know what would have happened behind the screen to take such a shameful step.?

 • Sunil Kuhikar….
  sir lekh ekdam massttttttt. khup kami lokanni ya vishayawar itke kathor lihile aahe.

 • Kavita Mahajan…
  झकास…

 • Ravindra Marathe….
  Sir I would like to read the original editorial. Your post has the screenshot but that is not completely readable. Being in USA , don’t have access to print paper please

 • Mahajan Milind….
  Sir nusata potarthi vicharvant ahe to

 • Avadhut Prabhakar Galphade….
  तुमची अपेक्षा तीच वाचकांचीही अपेक्षा . पण असिष्णुताचा dna असलेली मानसीकता , तसे करु देत नाही . ज्यानी लोकशाही च आग्रह धरुन वाचकांना ज्ञान शिकविले तेच आता लोकशाही मार्गाने निवडुन आलेले मोदी , भाजप सरकारे या बाबत लोकशाही मान्य नाही . कायम मोदी विरोधी लिखाणाची विष्ठा हातात धरल्या शिवाय संपादकीय लिहिणे शक्य होत नाही . चुकुन लिहीले असे कान धरुन ऊठबश्या काढाव्या लागतात. निर्भीड पत्रकारिता वाले , निर्भीडता गहाण ठेवणे हाच आदर्श त्या पुर्वीच्या षंढांनी यांना दिला आहे .

 • Sanjay Patil….
  gele te din gele…

 • Abhishek Anil Waghmare ·…
  Sir, glad to see you expressing on this issue. I think in modern cultural history of Maharashtra, a state which claims to be intellectual leader of the country, this incident is most shameful and disgraceful after incidence of attack on Bhandarkar institute. But the process did not start now. Attack on Lokmat and things happened there on was an alarm bell. First Lokmat and now Loksatta failed to stand up. It’s serious as it is trying to kill aspirations of a common reader like me. You have avoided to write on reasons behind his apologies, don’t know why? Now question is who will do this investigative journalism?

  Rise in such incidences nourishing for increasing influence of social media over conventional media. This is bound to happen because conventional media forgot that they are basically there to give news ( with a pinch of opinion)in contrast to the stories blended opinions with news with former encroaching the later ,whatever may be the reason.

 • Ramesh Zawar

  मी दहा वर्षे लीडर रायटर होतो. एकदा मी विहीलेल्या अग्रलेखामुळे प्रमोद महाजन वैतागले. त्यांचा टिकेकरांना फोन आला. योगायोगाने मी केबिनमध्येच बसलो असल्याने तो फोन टिकेकरांनी माझ्या हातात दिला. प्रमोद महाजन गुजरातचे निरीक्षक होते. त्यांना गुजरातमधील परिस्थिती हाताळता आली नाही असे विधान मी अग्रलेखात केले होते. मी परिस्थिती कशी बरोबर हाताळतो आहे असे ते मला परोपरीने सांगत राहिले. मी त्यांना म्हटले माझे मत कायम आहे. तुम्हाला जो खुलासा करायचा असेल तो तुम्ही आमच्या वार्ताहराकडे करू शकता. नंतर ते नरम आले. मला म्हणाले, एकदा आपण ओव्हर दि लंच भेटू.
  तो दिवस कधी उगवला नाही.
  पंतप्रधान नरसिंह ह्यांनी मी लावलेले मौनमूर्ती हे विशेषण फारच झोंबले होते. तसे त्यांचे स्वीय सहाय्यक खांडेकर ह्यांनी टिकेकरांना फोन करून सांगितले होते. त्यानंतर जेव्हा नरसिंह रावांवर पुन्हा अग्रेलख लिहीण्याचा प्रसंग आला तेव्हा पहिली दोन वाक्य लिहीली- ‘योग योगशास्त्रात मौन हे दोन प्रकारचे असते. एक आकार मौन आणि दुसरे काष्ठ मौन. नरसिंह रावांचे मौन हे दुस-या प्रकारचे आहे.’ त्यानंतर खांडेकरांचा फोन आला नाही. नरसिंह रावांची पुढे भेट झाली तेव्हा त्यांनी अग्रलेखाचा साधा विषयदेखील काढला नाही.
  अग्रेलख मागे घेण्याची गिरीश कुबेरांची कृती मला अजब वाटली. सध्या एक्सप्रेस समूहाचे जॉर्ज व्हर्गिस हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेेत. संपादकीय कामात सहसा हात घालायचा नसतो हे त्यांना माहित नाही असे नाही. ते पुण्याचे आहेत. चांगल मराठी बोलतात. आपल्यला सर्व विषय कळतात ह्या आविर्भावात ते वावरत असतात. सध्या लोकसत्ता खपाच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकावर आहे. असो.
  -रमेश झवर

 • Anil Govilkar….
  मी मुंबई बाहेर होतो त्यामुळे आज हा लेख वाचला. फारच सुंदर आणि निर्भीड वाटला. झालेल्या प्रसंगात बहुदा काही आर्थिक गणिते असावीत किंवा प्रचंड (न पेलता येण्यासारखे) दडपण असावे. आता, जर का अजूनही “सत्य” बाहेर आले नसेल तर मात्र यापुढे येण्याची शक्यता नाही, असेच म्हणायला लागेल.

 • डॉ कुमार बोबडे….
  प्रवीणजी आताच ब्लॉग वाचला. संपादकाची नसती उठाठेव अग्रलेख छापून आला त्या दिवशीच पटली नाही.

 • Rajesh Kulkarni….
  त्यांनी कहरच केला. अग्रलेखाविरुद्धच्या चार प्रतिक्रिया छापल्या, पण अग्रलेख मागे घेण्यावरूनची एकही प्रतिक्रिया छापली नाही

 • Rajesh Bobade….
  खूपच परखड

 • Pravin Tirthgirikar….
  हेच ते तथाकथित पुरोगामी विचारवंत

 • Rahul Sandip ·…
  सर ब्लाॅग आवडला. शेअर करतोय.

 • उमेश बापूराव मुंडले · ….
  अग्रलेख मागे घेणे ही शब्दशः दिवाळखोरीच होती. तथापि त्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया देखील छापण्याचे धैर्य दाखवले गेले नाही. अगदी साळसूद पणे काही घडलेच नाही असा आव आणला आहे तो खेदजनक आहे.

 • Kiran Bade….
  पोटा साठी जग्धीषा फिरविसी ///////

 • Ganvir Prabuddha ·….
  हे फ़क्त मर्यादित पीरोगामि संपादक आहेत प्रवीण सर ।। हे वेशिला बांधील संपादक आहेत।

 • Ganvir Prabuddha ·….
  पुरोगमचा खरा अर्थ तरी कडत का या या पीरोगामि सम्पदाकाना

 • Pankaj Shirke · ….
  Mi loksatta band kela.

 • Arun B.khore….
  Praveen, nice comment n yur observations.but as a reader n journalist one thing is clear that these days editorials readable only in Loksatta.as far resignation, I disagree with yu.what happened with many good n committed editors in Maharashtra when they resigned?Pl don’t take personally.now committed journalism overtaken by corporate journalism.at least Girish kuber writing many issues which never touched by any other editor in marathi.yes but he must come out from prejudices of social issues n movements at large.in spite of criticizing loksatta editor, today’s journalism n its leaders must introspect themselves n think again.praveen thanx for yur views to share.

 • Amol Joshi ·…
  Kuberji has proved that he is a mere pawn and his masters are the media owners, it has cast a doubt on all his previous editorials whether readable or not

 • Sunil Tijare….
  सत्य

 • Prabhakar Nikum ….
  हा संपादक कोत्या मनोवृत्तीने पछाडलेला आहे.म्हणून केवळ तिरकस शेरेबाजी करणेच त्याला जमते.मोठ्या खुर्चीत बसला म्हणून तो काही मोठा होत नाही.छिद्रान्वेषी असणे म्हणजे काहीतरी आहे असा भ्रम असलेला तो माणूस आहे.तो काय बाणेदारपणा दाखवणार?

 • Ramchandra Jadhav….
  सर्व पत्रकार बांधवांना कळविण्यात आनंद होतो आहे की युनिटी अॉफ जर्नालिस्ट या पत्रकारांच्या हक्कासाठी लढा देणार्या राष्ट्रीय पत्रकार संघटना मध्ये सामील व्हायचे असल्यास त्यांनी लवकरात लवकर आपआपला अभिप्राय कळवावा ही नम्र विनंती आपला रामचंद्र जाधव युनिटी अॉफ जर्नालिस्ट महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मोबाईल 8857909393

 • Mohan Godbole ·…
  I stopped reading Loksatta editorials …. Purogamipanacha fakt aav analela ahe sampadakani

 • उमेश बापूराव मुंडले ·….
  अग्रलेख मागे घेणे ही शब्दशः दिवाळखोरीच होती. तथापि त्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया देखील छापण्याचे धैर्य दाखवले गेले नाही. अगदी साळसूद पणे काही घडलेच नाही असा आव आणला आहे तो खेदजनक आहे.

 • Anna Kadlaskar….
  गडया हे बरं न्हाय केलं!

 • Manohar Jaybhaye….
  मदर तेरसा वरिल अग्रलेख मागे घेऊन आपण किती लाचार आहोत हेच गिरिष कुबेरांनी दाखवलेय.

 • योगेश देशपांडे ….
  चाराणे आणि चाराण्याच्या लायकीचे नसलेले विचार पण कालबाह्य झालेत….
  किती वेळा सिद्ध होणार?

 • Aditi Jogalekar…
  Toofani…konitari he bolayla havach hota…

 • Gaikwad Prashant Gulabrao….
  Lok manas vyakta kelat sir

 • Swati Suranglikar ·…
  शेवट जबरदस्त

 • Prafulla Marpakwar….
  Praveen, why u get into it, ur level is different

  • . i was waiting for somebody to say it . हे कोणी तरी सांगणं गरजेचं(च) होतं कारण this act is threat to journalism …

 • विजय तरवडे….
  त्यांच्या काही अडचणी असतील? म्हणजे मला एकदम गॅलिलिओ आठवला.

 • Sumant Bandale ….
  त्या पदाची गरिमा किती मोठी आहे हे लेख वाचल्यावरचं कळलं.खुप संयमित आणि खुप स्पष्ट, सर ….

 • Vitthal Mahamuni ·….
  त्यांच्या काही अडचणी असतील?

 • Prasanna Shembekar….
  Sad news !

 • Girish Dubey….
  A shameful incident!

 • Mandar Wadekar ….
  लेखकाने विदित केलेली पत्रकारिता साधारणपणे वीस वर्षांपूर्वीच निधन पावली असून निर्भीड पत्रकारिता कोठे आहे ते दाखवावे. मिळणार नाही. लोकशाहीचा स्तंभ वगैरे तर विसराच.

 • Prakash Mogle ….
  लोकसत्ता संघाचे मुखपत्र बनत आहे.वाईट वाटते कुमार केतकरानंतर सुमार माणसे संपादक बनली की असे होणार