‘नेकी’ला वाळवी आणि पवार ‘योग’ !

दिल्लीच्या वास्तव्यात आठवड्यातून पाच-सहा दिवस तरी जनपथवर फेरी व्हायचीच. दिल्लीच्या सत्तेच्या माज आणि झगमगाटात, त्यातून आलेल्या पैशाच्या गुर्मीत जनपथवर एक वास्तू अंग चोरून संकोचाने उभी आहे. या वास्तुत कधीकाळी देशाचे पंतप्रधान असलेले लालबहादूर शास्त्री यांचे वास्तव्य होते. तेथे आता संग्रहालय आहे. काही वर्षापूर्वी ते पाहिले होते. लालबहादूर शास्त्री वापरत असलेल्या अनेक वस्तू तेथे आहेतः आणि त्यात दात तुटलेला कंगवा, दाढी करण्यापूर्वी लावण्याच्या साबणाचा साधासा ब्रश, साधारण पोत असलेले काही कपडे..अशा अनेक वस्तू आहेत. तेथे एक जुनाट, गंज खाण्याच्या मार्गावरची फियाट कार होती; कदाचित अजूनही असेल. दिल्लीच्या आमच्या वास्तव्यात डोहखोल आत्मीयतेने वागणाऱ्या प्रफुल्ल पाठकने या फियाटची सांगितलेली कथा अशी- १९६४ का ६५ साली लालबहादूर शास्त्री यांनी ही कार खरेदी करण्यासाठी पंजाब बँकेकडून ५ हजार रुपये कर्ज घेतले. पुढे शास्त्री पंतप्रधान झाले आणि नंतर त्यांचे आकस्मिक निधन झाले. कारचे कर्ज फेडायचे राहिले. बँकेने कुटुंबियांना कर्जवसुलीची पाठवली. मग, लालबहादूर यांच्या पत्नी ललिता यांनी त्यांना मिळालेल्या निवृत्ती वेतनातून नेकीने हप्ते भरत ते कर्ज फेडले.. गलबलून गेलो ती कथा ऐकल्यावर. लालबहादूर शास्त्री किंवा त्यांच्या पत्नी ललिता हे, ही हकिकत ऐकल्यावर अर्थातच हयात नव्हते ; मग एकदा जाऊन मी ‘त्या’ कारच्या बोनेटवर डोकं टेकवून आलो. स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा अशा बातम्या देऊन घरी परततांना जनपथवरची ती वस्तू शरमेने मान खाली उभी आहे असे वाटायचे. ही कथा आठवण्याचे कारण महाराष्ट्रात सध्या ‘जे’ काही सुरु आहे ‘ते’ आहे.

पंकजा मुंडे, विनोद तावडे, पियुष गोयल, बबन(राव) लोणीकर,गिरीश महाजन, राज पुरोहित हे सत्ताधारी मंडळी कोणत्या-ना-कोणत्या प्रकरणात ज्या पद्धतीने अडकत चालली आहे ते पाहता ही काही ‘नेकी’चे सत्ताकारण आहे असे कोणीच म्हणू धजणार नाही. सत्तेच्या दालनात सगळे एकाच मापाने तोलले जात असतात आणि त्यांचे मोल धनातच असते; त्यांच्यात उजवे-डावे, पुरोगामी-प्रतिगामी, पार्टी वुईथ डिफरन्स आणि पार्टी वुईथ सम डिफरन्स असे काहीच नसते असे, काँग्रेस सत्तेत असताना मी जेव्हा लिहायचो/म्हणायचो तेव्हा सेना-भाजपच्या नेत्यांना राग यायचा. आता भाजप-सेनेवाले ‘तसे’ वागतात तेव्हा, तुम्ही काय वेगळे केले असे म्हणतो, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना राग येतो. भुकेला जात-धर्म नसतो असे जे म्हटले जाते त्याचा पुढे विस्तार असा की- धनाला जात-धर्म आणि राजकीय स्पृश्यास्पृश्यता नसते. धन हे धनच असते, तुम्हा-आम्हा सर्वांना ते कमवण्याचा ध्यास असतो तर सत्तेतल्या लोकांकडे धन कमवण्याची लालसा असते. पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यां-नेत्यांनी केलेले घोटाळे गाजले आता भाजप-सेनेच्या मंत्री-नेत्यांच्या घोटाळ्यांचा धूर दिसायला सुरुवात झाली आहे; हे घोटाळे अजून ‘सिद्ध’ व्हायचे आहेत एवढेच काय ते, पंधरा वर्षापूर्वी सेना-भाजप युतीचे सरकार राज्यात सत्तेत असताना किती मंत्री घोटाळ्यात सापडले होते आणि चौकशा होईपर्यंत कितींकडून राजीनामे घेतले, कोणाविरुद्ध चौकशी आयोग बसवले होते हे जरा आठवून बघा. घोटाळ्यांचे चक्र खरे तर ते तसेच आणि अव्याहत आहे ; फक्त चक्र चालवणारे लोक बदलले आहेत आणि त्यांचे राजकीय अंगरखे वेगळे आहेत, उल्लेखनीय बाब म्हणजे, राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या गैरव्यवहार / भ्रष्टाचार / बनवाबनवी / सत्तेचा माज चढल्याची प्रकरणे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून नव्हे तर मिडियाकडून उघड होत आहेत. अर्थात मिडियाला या भानगडी भाजपतील असंतुष्ट आणि प्रशासनातील काही अस्वस्थ तर काही संवेदनशील अधिकाऱ्यांनी पुरवल्या आहेत यात शंकाच नाही. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पराभवापासून काँग्रेस कोमात आहे आणि राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नेत्यांना त्यांचा ‘भुजबळ’ होण्याची भीती आहे. भुजबळांनंतरचे पुढचे प्रकरण विधि मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधी उघड होते की नंतर एव्हढीच वाट आहे आणि त्याची इतकी जबरदस्त धास्ती आहे आहे की, अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत.

या घोटाळ्यांच्या धुरात काही बाबी ‘बिटविन द लाईन’ आहेत. एक- भारतीय जनता पक्षातले जे नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते त्यांनाच प्रामुख्याने ‘फटाके’ लागलेले आहेत. यादी काढा, आधी एकनाथ खडसे यांच्यावर बितली, मग विनोद तावडे आणि आता पंकजा मुंडे. दोन- हे ‘फटाके’ उडवण्यामागे दिल्लीचा वरदहस्त आहे, अशी उघड चर्चा दिल्लीच्या भाजपच्या मुख्यालयात आहे, तीन- मुख्यमंत्री नेमके देशात किंवा महाराष्ट्रात नसताना हे फटाके फोडण्यात आले आहेत. थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीस यांना लाईन सध्या तरी क्लियर आहे ( आणि रावसाहेब दानवे यांचे ‘मनातले मांडे’ मनातच राहणार) असे तूर्तास तरी दिसते आहे. पण, याचा अर्थ चुकीच्या धारणा करवून घेऊन उगाच रागात येणे देवेंद्र फडणवीस यांना शोभा देणारे नाही. अमेरिकेच्या दौऱ्यावर जाताना विमानाला उशीर एका अधिकाऱ्यामुळे झाल्याचा दोष मुख्यमंत्र्यांनी नाहक स्वत:कडे ओढवून घेतला आणि मिडियावरचा राग मनी धरला. देवेंद्र फडणवीस यांना ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा..’सारखे सतत राग येणे शोभत नाही कारण ते मुख्यमंत्री आहेत आता, “ देवेंद्र फडणवीसबुवा, आस्मादिकांचा वडिलकीचा, अनुभवाचा ( आणि फुकटचा) एक सल्ला कायम लक्षात ठेवा- तुम्ही आज सत्तेत आहात म्हणून ‘हे अधिकारी’ तुमची हांजी हांजी करत आहेत हे विसरू नका आणि त्यांना नाहक पाठीशी घालू नका. ‘हे असे’ अधिकारी आपल्या बॉसला अडचणीत आणण्यात माहीर असतात आणि त्यांची लॉयल्टी खुर्चीशी असते, त्यात बसणाऱ्या व्यक्तीशी नाही”,

ज्यांना फटाके लागले किंवा लगावले गेले ते काही विनाकारण लावले/लगावले गेलेले नाहीत हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. ‘माझ्या बाबाना केंद्रात मंत्री करावेच लागले’ किंवा ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’, अशी वक्तव्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत पंकजा यांनी केल्यावर चिक्की कडू झाली. पंकजा मुंडे असोत की विनोद तावडे की बबन(राव) लोणीकर किंवा मुंबईतील एलईडी दिवे प्रकरणात पियुष गोयल या सर्वांना फटाके लागले एक कारण गटबाजी आहेच. चौकशीनंतर हे सर्वजण भलेही निर्दोष ठरतील पण, एक नक्की, ठिणगी पडल्याशिवाय धूर निघत नसतो, दर सूची आधीच्या सरकारने निश्चित केली होती, काही निविदांना आधीच्या सरकारची मंजुरी होती असा कांगावा संशयाच्या धुक्यात सापडलेले मंत्री करत आहेत. दर सूची, खरेदीचे ते निर्णय, पुरवठादार खरोखर सक्षम आहेत किंवा नाहीत, पुरवल्या जाणाऱ्या वस्तुंचा दर्जा कसा आहे..हे तपासण्याची जबाबदारी तर या सरकारातील मंत्र्यांची होती ना, ती खात्री करून घेऊन आणि मागच्या सरकारने ‘ठेवलेले’ दोष काढून टाकत त्यात योग्य ती सुधारणा करून खरेदी झाली असती तर धूर निघाला नसता आणि संशयाचे भूतही असे कोणाच्या मानगुटीवर बसले नसते.

आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे- राजकारणातल्या सर्वपक्षीय बहुसंख्यांचे आजचे राहणीमान..त्यांची डोळे दिपवणारी ब्रांडेड जीवनशैली..अलिशान वाहनांचा ताफा..त्यांच्या हिशेबी आणि बेहिशेबी मालमत्ता..निवडणुकीत ते करत असलेला अवाढव्य खर्च याबाद्ल लोकांच्या नजरेत दाहक दाटून असंतोष आहे ; जनतेच्या ‘मनातल्या न्यायालयात’ या असंतोषाच्या आरोपांखाली बहुसंख्य राजकारणी दोषी ठरलेले आहेत. सर्वसामान्य माणसाच्या मनात बहुसंख्य राजकारणी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्याविषयी मोठा संताप आहे..क्षोभ आहे हे लक्षात न घेणे महागात पडू शकते. नीट जमिनीवर येऊन जनतेत सामान्य माणसांसारखे फिरले तर ही जनभावना, हा क्षोभ राजकारण्यांच्या लक्षात येईल. नेमका हाच राग निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या या उन्मत्तांवर मतदारांनी कसा काढला हे जरा आठवून बघावे. राज्यात ही यादी कोकणातून सुरु होते आणि नागपुरात संपते. या पार्श्वभूमीवर मला दिल्लीच्या जनपथवरील लालबहादूर शास्त्री यांची फियाट कार आठवली..त्यांचा दांत तुटलेला कंगवा आठवला…महाराष्ट्राच्या सत्तेत ‘पार्टी वुईथ डिफरंन्स’ येऊनही काही फार मोठा फरक पडलेला नाही, पडणार नाही..कारण दिल्ली असो की महाराष्ट्र, सत्तेच्या राजकारणातल्या ‘नेकी’ला भ्रष्टाचाराची वाळवी लागलेली आहे…

योगायोग नव्हेच !

SUBRAMANIAN_SWAMY1_1257529fराजकारणात जन्म झाल्यापासून ज्यांनी शरद पवार यांना निष्ठेने साथ दिली त्या कमलकिशोर कदम सर्वेसर्वा असलेल्या अभिमत विद्यापीठाच्यावतीने शरद पवार डी.लिट.ने सन्मानित होतात आणि त्याच कमलकिशोर कदम यांच्या त्याच संस्थेत सुब्रमण्यम स्वामी यांच्या व्याख्यानाचे आयोजन त्याच कमलकिशोर कदम यांच्याकडून केले जाते हा काही योगायोग असू शकत नाही कारण ; शरद पवार यांच्या राजकारणात असे योगायोग केवळ योगायोगाने कधीच घडत नाहीत, हे काही नव्याने सांगायची गरज राहिलेलीच नाही. सुब्रमण्यम स्वामी आणि शरद पवार यांच्या स्वभाव, राजकारण आणि निष्ठा संपूर्णपणे टोकाच्या भिन्न आहेत. शरद पवार गेम-चेंजर म्हणजे गेम जुळवून आणणारे आहेत तर स्वामी ओळखले जातात ते त्यांच्या गेम उधळून लावण्याच्या तसेच कळलाव्या स्वभावासाठी. शरद पवार कमी बोलत ( आणि इतरांना त्याबद्दल वाट्टेल तो आणि तेव्हढा वाचाळपणा करू देत) एकाच वेळी बेरजेचे आणि गुगली टाकून विकेट काढण्याचे असे दुहेरी राजकारण कसे करत असतात याचा भल्या-भल्यांना पत्ता लागत नाही. कोणी नाही सापडला तर स्वामी वाऱ्याशी वाद घालतात म्हणजे; सतत बोलत असतात आणि स्वत:हून किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून सतत कोणाच्या-ना-कोणाच्या मागे लागलेले असतात. अशा या सुब्रमण्यम स्वामींना कमलकिशोर कदम व्याख्यानाचे आमंत्रण देतात, तेही औरंगाबादसारख्या काहीशा आडवळणाच्या गावी. महत्वाचे म्हणजे ते आमंत्रण सुब्रमण्यम स्वामी स्वीकारतात आणि औरंगाबादला येऊन रितसर व्याख्यानही देतात, तेव्हा भाजपचा एकही स्थानिक नेता हजर नसतो, हा काही निव्वळ योगायोग असू शकत नाही.

IndiaTvb1bb34_sharad_pawarमराठवाड्यात आता राजकारणाची नव्याने मांडणी शरद पवार करत असावेत असे संकेत त्यांनी मधुकरअण्णा मुळे यांना ज्या पद्धतीने डावलले आहे त्यातून मिळत आहेत. राज्याच्या इतर भागातही राष्ट्रवादीच्या राजकारणाची फेरमांडणी शरद पवार यांनी अशीच सुरु केली आहे का हे बघायला हवे असा याचा एक अर्थ काढता येईल. दुसरे म्हणजे, सुब्रमण्यम स्वामी यांना महात्मा गांधी मिशनच्या ( पक्षी-कमलकिशोर कदम) यांच्या व्यासपीठावर बोलावून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आता भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी जुळवून घ्यावे असेच तर पवार यांनी सुचविले नाहीये ना ? पवार स्वत:च्या खेळींबद्दल फारच कमी बोलतात आणि इतरेजन म्हणजे पत्रकार, गंभीर वृत्तीचे विश्लेषक आणि प्रकाशवृत्त वाहिन्यांवरील राजकीय विश्लेषक जो काही काथ्याकूट करतात तो वाचता-ऐकताना केवळ गालातल्या गालात हंसतात. भलेही शरद पवार हे वाचल्यावर गालातल्या गालात हंसोत पण, मला तरी पवार निष्ठावंत कमलकिशोर यांच्या व्यासपीठावर स्वामी यांनी हजेरी लावणे हा नक्कीच केवळ योगायोग वाटत नाहीये.

प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट