पंतप्रधानपद..जात्यंधता आणि मुलायमसिंह

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या चर्चा आहे ती केवळ निवडणुकीची आणि उत्सुकता आहे ती निकालाची. दिल्लीत नेहेमीच चर्चा आणि वावड्यांना ऊत आलेला असतो. यासाठी वेळ-काळ आणि ऋतुंचे बंधन तसेही नसतेच. राजकीय पक्षांची कार्यालये, नेत्यांची निवासस्थाने किंवा ही कार्यालये आणि निवासस्थाने असलेल्या परिसराच्या आसपासच्या बारमध्ये एखादी चक्कर टाकली की अनेक अफवा-गॉसिप-वावड्या; काही म्हणा कानावर पडतात. विविध सोर्सेसकडून जमा झालेली, अनेकदा नेता-अधिका-याभोवती घुटमळताना कानावर पडलेली माहिती, मनी मार्केटमधील ट्रेंड, वृत्तपत्रातल्या बातम्यां.. हे या चर्चा-गॉसिपचे आधार असतात. या चर्चा-गॉसिप म्हणा की वावड्या उडवायला केवळ राजकारण हाच विषय पुरेसा नसतो तर कोण किती पैसे कसे जमा करतो इथपासून, सध्या कोणाची कोणत्या नेत्याकडे चलती आहे, कोणाचं कोणाशी कसं ‘लफडं’ सुरु आहे आणि त्यासाठीचं ‘रांदेव्ह्ज’ कोणतं, असा त्याचा व्यापक आवाका असतो. एक मात्र खरं, यातील प्रत्येक चर्चा-वावडी-गॉसिप शंभर टक्के खोटंही नसतं, ठिणगी पडल्याशिवाय धूर निघत नाही हेही खरंच म्हणा! अशा चर्चांचा केंद्रबिंदू कालपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार किंवा नाहीत आणि काँग्रेसला देशात जागा किती मिळणार हा होता, आता त्यात भर पडली आहे ती ‘तिस-या आघाडी’चे सरकार केंद्रात सत्तारूढ होण्याची. त्यासाठी नेहेमीप्रमाणे ‘लोकप्रिय आधार’ घेतला जातो आहे तो ‘जात्यंध शक्ती’ रोखण्याचा. म्हणजेच भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यावर सर्वांचे एकमत पण त्या मोहिमेचा नेता कोण असावा याबद्दल मात्र एकमत नाही ! त्यामुळे पंतप्रधानपदासाठी अनेक इच्छुक बाशिंग बांधून तयार असतात; एकटे नरेंद्र मोदीच नाही तर ममता बँनर्जी, जयललिता, मुलायमसिंह असे अनेकजण पंतप्रधान होण्यास एका पायावर तयार आहेत. शिवाय या पदाची महत्वाकांक्षा मनात बाळगणारे शरद पवार, चिदंबरम, राजनाथसिंह आहेतच. या तिस-या आघाडीच्या चर्चेला तसेच अनेकांना पंतप्रधानपदाचं बाशिंग बांधायला बळ मिळालं ते काँग्रेसचे एक महाप्रभावी नेते अहमद पटेल यांच्या एका मुलाखतीमुळे. भारतीय जनता पक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पर्यायाने मोहन भागवत यांचा शब्द प्रमाण असतो अशी टीका विरोधकांकडून एक व्रत म्हणून मनोभावे केली जाते पण, त्यावेळी सोयीस्करपणे विसरले जाते की, सोनिया गांधी आणि राहुल यांनी मनातल्या मनातही व्यक्त केलेली इच्छाही अंतिम आदेश समजण्याची प्रथा केंद्र सरकार तसेच काँग्रेसमध्ये आहे! (राजकारण ही एक सोय आहे असं म्हणतात ते काय खोटं आहे?) सोनिया गांधी यांचा हा शब्द सरकार आणि पक्षात पोहोचवण्याचं काम मोजकं बोलणा-या अहमद पटेल यांच्याकडे असतं. अहमद पटेल बोलले ते साक्षात देववाक्य ( म्हणजे सोनिया गांधी यांचा आदेश) समजलं जातं. पत्रकारांकडे एरव्ही कटाक्षही न टाकणा-या आणि अहमद पटेल यांनी (म्हणजे सोनिया गांधी यांनी) एका मुलाखतीत निवडणुकीनंतर तिस-या आघाडीला काँग्रेस पाठिंबा देईल असं सांगितलं आणि मुलायमसिंह यांना उकळ्या फुटल्या ! याचा राजकीय अर्थ नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत येणार असा होतो आणि आपण पराभव मान्य करतो आहोत, असा होतो याचं भान त्यांना रहिलं नाही इतके ते मोदींच्या भीतीने हवालदिल झालेले आहेत! इकडे गंमत अशी की, अहमद पटेल आणि राहुल गांधी यांच्यात विस्तव जात नाही त्यामुळे काँग्रेस तिस-या आघाडीला मुळीच पाठिंबा देणार नाही असा कडक पवित्रा राहुल गांधी यांनी घेतला आणि जणू काही पंतप्रधानपदच आपल्या हातून निसटल्यासारखा थयथयाट मुलायमसिंह यांनी सुरु केला. पंतप्रधान होण्याचा निकष जात्यंध असणं/नसणं की जनमताचा कौल की विकासाची दृष्टी की राजकारणातला अनुभव की जाज्वल्य देशनिष्ठा की आणखी काही, हे काही आपल्या देशात निश्चित नाही. लोकप्रतिनिधी होण्यासाठी खरं तर वयाची वगळता कोणतीच आडकाठी नाही. असं असूनही सरपंचापासून ते पंतप्रधानपदावर येण्यासाठी आपण ‘जात्यंध नाही’ हे सिद्ध करण्यासाठी देशातील सगळेच ‘पुरोगामी’ राजकीय पक्ष जीवाचा आटापिटा करत भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला आरोपीच्या पिंज-यात उभं करतात. अगदी खरं सांगायचं तर, आपल्या देशाच्या राजकारणात वावरणारा एकही पक्ष खराखुरा पूर्ण पुरोगामी नाही आणि प्रतिगामी नाही; कोणताही पक्ष एकजिनसी नाही तर ते आहे जात-धर्म-पंथ-भाषावाद-भूमिका यांचं एक कडबोळे. सुरुवातीच्या काळात कॉंग्रेसची एकपक्षीय राजवट हा अपरिहार्य आणि अगतिकही अपवाद होता कारण तोपर्यंत राजकीय जागृती नसल्यानं काँग्रेस हा एकसंध पक्ष वाटला आणि तीच वस्तुस्थिती म्हणून आपण स्वीकारली असं मला वाटतं. आपल्या देशात एकपक्षीय सरकारही कधीच नव्हतं. अगदी १९५२पासून काँग्रेसची जी राजवट आपण एकपक्षीय समजतो ती देशातील विविध धर्म, जाती, विचार ,समाज आणि कार्यक्रम याची मोटच म्हणजे एक प्रकारचं गाठोडंच होतं. ते स्वाभाविकही होतं कारण भारताची सामाजिक रचनाच केवळ विशाल आणि वैविध्यपूर्णच आहे असं नव्हे तर या रचनेचे सामाजिक स्वरूप जटील आहे, सांस्कृतिक वीण गुंतागुंतीची आहे आणि हीच परिस्थिती म्हणजे कमी-अधिक प्रमाणात जात-धर्म आपल्या राजकीय व्यवस्थेत दिसणार हे स्पष्ट आहे. मात्र ते विसरून दुस-यावर जाती-धर्माचा शिक्का मारणं हे आपल्या राजकीय व्यवस्थेत पुरोगामित्वाचं ‘व्यवच्छेदक’ लक्षण झालं आहे आणि हे मान्य करण्याचा खुलेपणा आपल्याकडे नाही ही खरी गोची आहे! लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधानपदाची स्वप्ने दिवसाढवळ्या पडू लागलेल्या मुलायमसिंह यांना ‘भारतीय जनता पक्ष जात्यंध आहे’, हा साक्षात्कार काही आज झालेला नाही हे जितकं खर तितकंच हेही खरं की, ते आणि त्यांचा समाजवादी पक्षही भारतीय जनता पक्षाइतकाच धर्माधिष्ठित व जातीयवादी आहेत हे इतकी वर्ष राजकारणात घालवूनही उमगलं नाही असं नाटक मुलायमसिंह करत आहेत. कारण ती त्यांची मजबुरी आहे आणि गरजही. आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव केलेल्या राजनारायण यांचे शिष्य असलेल्या आणि राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी संपादन केलेल्या मुलायमसिंह यांनी त्यांच्या उत्तर प्रदेशातील राजकारणाचा श्रीगणेशाच यादव-मुस्लीम मतांची मोळी बांधून केलेला आहे आणि ही मोळी घट्ट बांधून ठेवण्यात यश आल्यानेच ते आजवर ब-यापैकी यशस्वी झालेले आहेत, हा राजकीय इतिहास आहे. १९६७च्या विधासभा निवडणुकीत पहिला राजकीय विजय संपादन केल्यावर राज्यात मंत्री, मुख्यमंत्री ते देशाचे सरंक्षण मंत्री असा चढता आलेख असणा-या पंचाहत्तर वर्षीय मुलायमसिंह यांचं राजकारण जात-धर्म आधारित तसेच गुंडगिरीवर वरदहस्त ठेवणारंच कसं आहे हे दिल्लीतील वास्तव्याच्या काळात जवळून अनुभवयाला मिळालं. नावात जरी समाजवाद असला तरी मुलायमसिंह यांचा पक्ष केवळ माजलेल्यांचा अड्डा कसा आहे याच्या कथा दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या मीडियात नित्यनेमाने प्रकाशित होत असतात. मुजफ्फरनगरच्या दंगलीच्या काळात तर मुलायमसिंह यांचा कथित समाजवादी बुरखा सैफेईच्या नृत्य-संगीत समारोहात टराटरा फाटला गेला. दंगलग्रस्तांच्या छावण्यात लोक किडा-मुंग्यासारखे जीवन जगत आणि काही जण मरतही असताना समाजवादी पक्षाची संवेदनशीलता नट-नट्यांच्या पद्न्यासावर कशी डोलत गहाण पडली होती हे जगानं पाहिलं आहे. राजकारण बहुसंख्येने लोकहितवादी राहिलेलं नाही कुटुंबहितवादीच कसं असतं याचंही मुलायमसिंह हे एक इरसाल उदाहरण आहे. त्यांचा मुलगा उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री, भाऊ राज्यात मंत्री, आणखी एक भाऊ राज्यसभेवर म्हणजे खासदार, मुलायमसिंह स्वत: तसेच सून व पुतण्या मावळत्या लोकसभेवर होते आणि पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत हे लक्षात घेतलं की, ​‘ काही मोजक्या लोकांनी काही निवडक लोकांच्या भल्यासाठी मांडलेला खेळ म्हणजे लोकशाही’, अशी जी टीका केली जाते त्यात तथ्य आहेच याची खात्री पडते! -प्रवीण बर्दापूरकर ९८२२०५५७९९ / www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट