पतंगराव : मुख्यमंत्री ‘इन वेटिंग…’

अशक्यप्राय स्वप्नाची पूर्ती करण्याची अफाट क्षमता असणारा, रांगडा स्वभाव, बिनधास्त शैली, मन निर्मळ आणि उमदेपणाचं मनोहारी रसायन पतंगराव कदम यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. पतंगराव कदम यांच्याशी ओळख होऊन तीन दशकं उलटून गेली. आमचे सूर जुळले ते भलत्याच एका बातमीनं. तेव्हाच्या अविभक्त मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या वृत्तसंकलनासाठी ‘लोकसत्ता’कडून मला तर ‘महाराष्ट्र टाइम्स’कडून धनंजय गोडबोलेला एकाचवेळी पाठवण्यात आलं. आम्ही दोघं मध्यप्रदेशात सागर या भागात फिरत असतांना कॉंग्रेसच्या ‘मदत’ वाटपात राडा झाल्याची कुणकुण लागली. मदत वाटपाची ही जबाबदारी कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील चमूवर कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी सोपवलेली होती. तेव्हा ‘शेषन नावाचा दणका’ नसल्यानं राजकीय नेते निवडणुकीच्या काळातही शासकीय विश्रामगृहात उतरत. सागर विभागातील मदत घेण्यासाठी आलेल्या कॉंग्रेसच्या इच्छुकांत शासकीय विश्रामगृहात आधी हमरातुमरी, मग मदत साहित्याची ओढाताण, हिसकाहिसकी झाली. हाताला जे लागेल ते ताब्यात घेण्याची घाई प्रत्येकाला झाली. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून मदत वाटपासाठी आलेल्या पथकातील इतरांनी पळ काढला; समजवा-समजवीचा किल्ला लढवता लढवता पतंगराव एकटेच उरले. कॉग्रेसी परंपरेतला राडा इतका वाढला की घेणाऱ्या हातांनी देणाऱ्या हातांवर हल्ला चढवला आणि पतंगराव कसेबसे तिथून निसटले…अशी ती घटना होती. पतंगराव कदम या नावामुळे या बातमीत आम्हाला रस होता. नागपूरला परतल्यावर कुठल्या तरी गफलतीतून धनंजय गोडबोलेनं माझ्याआधी या राड्याची बातमी दिली. बातमी गाजली. पतंगराव नाराज झाले. नंतर एकदा भेट झाल्यावर धनंजय गोडबोले समजून पतंगराव कदम यांनी मलाच फैलावर घेतलं. धनंजय नंतर मीही दोन दिवसांनी टोन बदलून तीच बातमी दिलेली होती पण, क्रेडीट स्वाभाविकच धनंजयला गेलेलं होतं. पतंगरावांच्या जीव्हेवर सुरु असलेलं ‘तांडव’ संपल्यावर पतंगरावांना हळूच सांगितलं, ‘मी गोडबोले नव्हे. मी तर…’

मला पुढे न बोलू देता पतंगराव कडाडले, ‘तुम्ही बर्दापूरकर आहात. माहितीये मला. तुम्हीही बातमी दिली होतीच की!…’ आणि पुन्हा त्यांच्या जीभेचा पट्टा सुरु झाला. ऐकून घेण्यातच शहाणपणा होता. थोड्या वेळानं ते शांत झाले. नेहेमीचं हंसू त्यांच्या चेहेऱ्यावर परतलं आणि कृतकोपानं ते म्हणाले, ‘अरे आमच्या इज्जतीचा पार xxx केला!’ तिथून आमच्यात स्नेहपर्व सुरु झालं. कोणावरच कायम खफा न होणं किंवा कोणाशीच कायमचं शत्रुत्व न घेणं हे पतंगराव कदम यांच्या स्वभावाचं हे वैशिष्ट्यच होतं. स्पष्ट बोलून, आला राग तो काढून ते मोकळं होत आणि कटुता विसरून जात. म्हणूनच त्यांच्यासोबत अनेकजण वर्षानुवर्षे टिकले; त्यांच्याभोवती मोठ्ठ गणगोत निर्माण झालं. पतंगराव आणि माझ्यात स्नेहभाव निर्माण झाला. तो कायम राहिला याचं कारण आमच्यातला संपर्क कायम ठेवण्याची जबाबदारी त्यांचा खाजगी सचिव सुरेश मोगल-पाटील यांच्यावर होती. आपलं लक्ष नसलं किंवा आपण लांब असलो तर, ‘ओsss बर्दापूरकर’ अशी हाळी ते घालायचे. (इथे बर्दापूरकर या जागी इतर असंख्यांना त्यांची नावं जोडण्याचा मोह होऊ शकतो, हे मला ठाऊक आहे.) तेव्हा सेलफोन नव्हते आणि पतंगराव यांच्याकडे सगळा कारभार पाटलाच्या वाड्यावर चालतो तसा, एकदम अघळपघळ! पाटील वाड्यावर असले की सदरेवरील कचेरीत सगळे माना खाली घालून कामावर आणि पाटील बाहेर गेले की उधळले, असा म्हणून सुरेश मोगलची जबाबदारी महत्वाची. पुण्यात असो की मुंबईत की अन्यत्र कुठेही पतंगराव कदमांचा दरबार कायम लोकांनी भरलेला असायचा. कितीही वेळ लागो प्रत्येकाला भेटण्याचा आणि किमान दोन तरी शब्द बोलण्याचा पतंगरावांचा कटाक्ष असायचा. वसंतदादा पाटील यांच्या कामाशी त्यांची ही शैली जुळत असे; तसाही वसंतदादा यांचा पतंगराव यांच्यावर प्रभाव होताच म्हणा!

मध्यम उंची, स्थूल बांधा, गव्हाळतेकडे झुकणारा सावळा वर्ण, वेगानं पापण्यांची उघडझाप होणारी कायम शोधक नजर आणि कपडे टिपटाप असणारे पतंगराव कदम हे जिद्द तसंच क्षमता काय अफाट असते, त्याचं मूर्तीमंत प्रतिक होते. पतंगराव कदमांचं वागणं बिनधास्तपणा आणि रांगडेपणा यांचं मिश्रण होतं पण, त्यात धसमुसळेपणा नव्हता; होती ती आत्मीयता आणि अनेकदा निरागसता; ही निरागसता त्यांच्या डोळ्यात दिसायची. अधिकाऱ्यांसह अनेकांना ते कायम ‘अरे-तुरे’करत पण, त्यात पतंगराव आपल्याला तुच्छ लेखताहेत असं कोणालाही वाटलं नाही. औरंगाबादचा एक प्रसंग आठवतो- तेव्हा मी नागपूरला होतो. कुमार केतकर आणि मी बुलढाण्याला एक कार्यक्रम आटोपून औरंगाबादला आलो. तापडिया सभागृहात संध्याकाळी केतकरांचं व्याख्यान आणि अध्यक्ष औरंगाबादचे पालकमंत्री असलेले पतंगराव कदम होते. व्याख्यान अगदी बहरात आलेलं असतांना पतंगराव अचानक उठले आणि म्हणाले, ‘कुमार थांब तू दोन मिनिटं’ आणि माईकवर येऊन म्हणाले, ‘माझ्या विमानाची वेळ झालीये. निघतो मी आता. तुम्ही मात्र कुमारचं व्याख्यान पूर्ण ऐका. कुमार मोठा विद्वान संपादक आहे. त्याच्यासाठीच तुम्ही इथं आलेले आहात, माझं अध्यक्षीय भाषण ऐकायला नाही, हे माहितीये मला. हं…कुमार कर तू पुढे सुरु, मी जातो..’ असं म्हणून लोकांना अभिवादन करुन पतंगराव निघूनही गेले! ही अशी रांगडी शैली होती पतंगरावांची.

कार्यक्रम संपल्यावर मी केतकरांना विचारलं, ‘तुम्हालाही पतंगराव ‘अरे-तुरे’ करतात? तर केतकर म्हणाले, ‘तुला त्यांची स्टाईल माहिती नाही का?’

भारती विद्यापीठ हे पतंगराव कदम यांच्या दृष्टी, अफाट श्रम आणि कवेत न मावणारी जिद्द यांचं जीतंजागतं उदाहरण आहे. अनेक पिढ्यांना त्यामुळे शिक्षणाच्या वाटा खुल्या झाल्या. अभावग्रस्त जगणं वाट्याला आलेल्या पतंगराव कदम यांनी वयाच्या विशीत लावलेलं भारती विद्यापीठ नावाचं रोपटं विशाल हा शब्द थिटा पडावा इतकं विस्तारलेलं आहे; खाजगी शिक्षण क्षेत्रातील आज देशातलं एक आदर्श मॉडेल आहे. (अगदी सुरुवातीचं या रोपट्याचं छायाचित्र सोबत दिलेलं आहे.) या विद्यापीठाची कथित अभिजनांनी केलेली टिंगलटवाळी सहन करत पतंगराव कदम यांनी केलेला हा प्रवास ही एका स्वप्नाची आश्चर्यस्तंभित पूर्ती आहे. याच रस्त्यानं चालता-चालता पतंगराव राजकारण, सहकार, प्रशासन अशा विविध क्षेत्रात स्थिरावले, आयकॉन झाले. असंख्यांना त्यांच्यामुळे शिक्षण, हाताला काम आणि पोटाला अन्न मिळालं. शेकडोंचे ते मायबाप झाले. अशी माणसं दुर्मिळ असतात म्हणूनच अनेकांसाठी पतंगराव देवमाणूसही झाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या अधिवेशनात राहुल गांधी यांचा पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून ‘शपथविधी’ झाला तेव्हा मीही दिल्लीतच होतो. महाराष्ट्रात दिग्गज समजले जाणारे आणि हा दिग्गजपणा राज्यात कवतिकानं मिरवणारे अनेक कॉंग्रेस नेते तिथे भिरभिरत्या नजरेनं पण, एकटे-दुकटे फिरत होते. पतंगरावांना मात्र तिथेही लोकांचा गराडा होता! भारती विद्यापीठ नावाच्या यशाची ती किमया होती.

मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती. मी कायम त्यांना ‘आमचे मुख्यमंत्री तर तुम्हीच’ असं म्हणत असे आणि ते सुखावत. ते मला अनेक बातम्या देत. आता खरं सांगायला हरकत नाही, अगदी मंत्री मंडळाच्या बैठकीतली माहिती, बैठकीसाठी तयार झालेली टिपणं, विषयपत्रिकाही त्यांनी मला अनेकदा दिलेली आहे. पक्षात कुठे कोण काय करतोय यावर त्यांची करडी नजर असे आणि ती टीप ते आवर्जून मला देत. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार, कोण काय उचापती करतो आहे या आणि अशा अनेक बातम्या मला मिळाल्या आणि माहिती खरी असल्यानं माझ्यावर कधी खुलासे करण्याचे वेळ आली नाही. त्यांनी दिलेल्या अनेक बातम्या पत्रकारितेत नाव कमावण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत, हे कबूल करायला मला आनंदच वाटतो.

पतंगराव कदम यांच्यात मुख्यमंत्रीपदाची क्षमता होती या अनेकांच्या म्हणण्याशी सहमती दर्शवायला मलाही निश्चितच आवडेल पण, त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन की, मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी ते पुरेसे आग्रही नव्हते; अनाग्रहीच होते आणि गंभीर तर नव्हतेच नव्हते. मुख्यमंत्रीपदासाठी डोक्यात २४ तास जुळवाजुळवीचं गणित असावं लागतं, कट कारस्थानं मनात कायम तयार ठेवावी लागतात, समर्थकांचं बळ लक्षणीय लागतं, राज्याच्या काना-कोपऱ्यात नेटवर्क आणि प्रश्नांची माहिती असावी लागते; हे जुळवून आणून दबावाचं राजकारण खेळावं लागतं. यानंतर पक्षश्रेष्ठींची मर्जी, त्यांचा पाठीवर हात आणि ‘देवाण-घेवाण’ येते. पतंगराव कदम यांच्या मनात कायम सांगली जिल्हा आणि भारती विद्यापीठच असायचं; हे त्यांचं एकीकडे मोठ्ठ यश असलं तरी मुख्यमंत्रीपदाचा विचार करता ती त्यांची मोठी मर्यादा ठरली. शिवाय कट-कारस्थानं, सहकारी किंवा कुणा नेत्याचे पाय ओढणं हा त्यांचा स्वभावच नव्हता. राजकीय गरज म्हणून त्यांनी काही पंगे घेतले, हे सर्व ज्ञात आहे पण, राजकारण संपल्यावर त्या प्रत्येकाला पुन्हा स्नेहभाव कायम ठेवला. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून त्यांना नैराश्य आलेलं किंवा अगतिक झालेलं कधी पहिलंच नाही (अपवाद एक- पुत्र अभिजीतचा अपघाती मृत्यू झाल्यावर भेटायला गेलो तर नि:शब्द पतंगरावांच्या, दु:ख अथांग भरलेल्या नजरेला नजर देणं शक्य झालं नाही…)

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रत्येक वेळी नाव मागे पडलं मग मिळेल त्या खात्याची जबाबदारी पतंगरावांनी कोणतीही खळखळ म्हणा की कुरकुर न करता निभावली. मंत्री म्हणून त्यांनी जे खातं मिळालं त्याचं कारभार नेटका केला, यात शंकाच नाही. काम नीट व्हायचं असेल तर प्रशासनाला मोकळीक देतांनाच लगाम कसा ओढायचा हे कसब त्यांना चांगलं आत्मसात होतं. कदाचित मुख्यमंत्री झाले असते तर काय सांगता, सुधाकरराव नाईक यांनी जशी छाप उमटवली तशी कदाचित; त्यापेक्षा अढळ मुद्रा पतंगराव कदम यांच्या कर्तृत्वाची उमटली असती पण, या झाल्या ‘जर-तर’च्या गोष्टी!

एक आठवण आवर्जून सांगावी अशी आहे- विलासराव मुख्यमंत्री झाले; आमच्यातलं मैत्र महाविद्यालयीन जीवनातलं. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना मंत्रालयात सहाव्या मजल्यावर जाऊन भेटलो. त्यांना भेटल्यावर पतंगराव कदम यांनाही भेटावं वाटलं म्हणून फोन केला तर सुरेश मोगलनंच उचलला. पतंगराव घरी म्हणजे मलबार हिलवरच्या ‘अग्रदूत’ या त्यांना मिळालेल्या शासकीय बंगल्यावर होते. ‘साहेब तयार होऊन दोन घास पोटात टाकून पुण्याला निघणार आहेत. गर्दी तर मुळीच नाही’, असं सुरेशनं सांगितलं. मी टाकोटाक गेलो. आमची भेट झाली. ‘आमचे मुख्यमंत्री आमच्यापुरतेच राहिले, बॅडलक’, असं मी हळहळत म्हणालो.

त्यावर पतंगराव टोला लगावताना म्हणाले, ‘तुम्ही मराठवाड्याचे लोक लै भारी बुवा. मानलं तुम्हाला’.

मी म्हटलं, ‘मी तर आता नागपूरला असतो आणि भारी म्हणाल तर ते विलासराव आहेत. मला कशाला ओढता तुमच्या स्पर्धेत?’.

त्यावर पतंगराव म्हणाले, ‘तुमचंही पाणी मराठवाड्याचंच. आम्हाला मनातलंच मुख्यमंत्री ठेवलंय तुम्ही…चला जाऊ द्या. चार घास खाऊ यात…’ असं म्हणत ओढून डायनिंग टेबल घेऊन गेले. कायम ‘सीएम इन वेटिंग’ राहिले तरी एक मान्य करायलाच हवं, मुख्यमंत्रीपद न मिळाल्याच्या वैषम्याचं तुणतुणं वाजवत न बसण्याचा पतंगरावांचा उमदेपणा सलाम करावा असाच आहे.

राजकीय वृत्तसंकलन करण्याच्या काळात शेकड्यांनी नेते भेटले. अनेकांशी स्नेह जुळला. अनेकांशी बैठ्कीतल्या मैत्रीची भट्टी जमली. अनेकजण मनाच्या गाभाऱ्यात कायमचे मुक्कामाला आले; पतंगराव कदम त्यापैकी एक. ‘लोकसत्ता’ पर्वानंतर आधी मी लेखनात गुंतलो, नंतर दिल्लीत आणि शेवटी औरंगाबादला आलो; आमच्यातला संपर्क कमी होत गेला. आता तर पतंगरावच संपर्क कक्षेच्या बाहेर गेले आहेत…असे पोशिंदे नेते खरंच दुर्मिळ असतात!

(छायाचित्रे सौजन्य- गुगल)

Cellphone ​+919822055799
www.praveenbardapurkar.com

​=​===​
‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी लिंक-
http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515 आणि ‘भाष्य’ ई-बुक्ससाठी dailyhunt शी संपर्क साधावा.
====

संबंधित पोस्ट