पवारांनी पिसले राष्ट्रवादीचे पत्ते !

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अस्वस्थ आहेत. खरे तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे जास्त पानिपत झाले आणि त्यातून बोध न घेता काँग्रेसजण केवळ सैरावैरा धावत आहेत. राज्यात कशाबशा दोनच जागा आल्या तरी पराभवाला नेमके कोणाला जबाबदार धरायचे का नाही आणि जबाबदार धरले तर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांना बदलायचे की नाही अशा काही मुद्द्यावरून काँग्रेस नेतृत्वाने जो काही गोंधळ घातला तो शाळकरी वयातली मुले जास्त समंजसपणे वागतात याची जाणीव करून देणारा होता. त्यामानाने राष्ट्रवादीला राज्यात काँग्रेसपेक्षा जास्त जागा आणि मते मिळाली आहेत. मात्र काँग्रेसप्रमाणे न वागता शरद पवार यांनी मात्र पराभवाची नोंद तातडीने घेत विस्कटलेला डाव सावरण्यासाठी पत्ते नव्याने पिसायला सुरुवात केली आहे. त्यांनी आधी धक्कादायकपणे हरलेल्या प्रफुल्ल पटेल यांचे राज्यसभेवर पुनर्वसन केले. मग मुंडे यांच्या बहुजनीकरणाला शह देण्यासाठी आव्हाड यांना मंत्री केले, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधव यांच्याजागी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली. एक छगन भुजबळ वगळले तर अनेकांना एकाच वेळी खूष करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे (आणि कशाची तरी चाहूल लागून छगन भुजबळ तसेच गणेश नाईक यांनाही ‘तुमचे महत्व संपले’ इशारा दिला आहे ?)

आमची पिढी पत्रकारितेत आली तेव्हा शरद पवार नावाचा करिष्मा महाराष्ट्राच्या राजकारणात फुलण्यास सुरुवात झालेली होती. केवळ काँग्रेसच नव्हे तर सर्वच पक्षात त्यांच्याविषयी उत्सुकता, आस्था आणि प्रेम निर्माण झालेले होते, आणीबाणीच्या आसपासच्या काळातच ‘महाराष्ट्राचे भावी नेतृत्व’ अशी मान्यता शरद पवार यांना मिळण्यास सुरुवात झालेली होती. उजव्या आणि डाव्या, पुरोगामी आणि प्रतिगामी यासोबतच साहित्य-कला-संस्कृती क्षेत्रात पवार यांचा, यशवंतराव चव्हाण यांचा कर्तबगार मानसपुत्र म्हणून उल्लेख होत होता. आमचे पत्रकारितेतील सीनियर्स तर शरद पवार हा विषय काढला की विरघळून जात आणि समोर केलेल्या रजेच्या अर्जावर न वाचता कितीही आणीबाणीची घडी असली तरी संमतीची सही करून टाकत! याच दिवसात महाराष्ट्रात शरद पवार यांनी काँग्रेस फोडण्याचा, पर्यायाने वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडण्याचा आणि पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करून मुख्यमंत्री होण्याचा प्रयोग सादर झाला. काँग्रेसच्या वर्तुळात तो प्रयोग शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खुपसलेला खंजीर म्हणून गाजला तरीही तत्कालीन राजकीय विश्लेषक(?) तसेच अभ्यासकांना(?) या नाट्यात वाजलेली महाराष्ट्रातील भावी अस्थिर राजकारणाची नांदी ऐकू आली नाही, इतका पवार यांचा करिष्मा प्रभावी आणि गडद होता.

लोकप्रशासक म्हणून शरद पवार यांनी महाराष्ट्रात मोठी कामगिरी केली. महाराष्ट्रात स्वतंत्र महिला धोरण आणले, सिंचन तसेच सहकारी क्षेत्राला उभारी दिली, फलोत्पादनाच्या धोरणात आमुलाग्र बदल केला, राज्याच्या औद्योगिक विकासाला दिशा आणि गती दिली, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय अंमलात आणून दाखवला, रोजगार हमी योजनेत अनेक महत्वाचे बदल करून अनेकांच्या मुखी अन्नाचे चार घास भरले, प्रलयंकारी भूकंपग्रस्त लातूर-उस्मानाबादचा कायापालट केला..ही यादी आणखी लांबवता येईल इतकी पवार यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी मोलाची आहे. ‘जाणता राजा‘ असा त्यांचा आदराने उल्लेख होई, जनमाणसाची अशी अचूक नस सापडलेला राजकीय नेता अशी प्रतिमा पवार यांची राज्यात निर्माण झाली होती. १९९१ पर्यंत पवार यांच्या विरोधात जाहीरपणे एक शब्द बोलला जात नसे इतका त्यांचा राजकीय दरारा राज्यात निर्माण झालेला होता कारण, शरद पवार म्हणजे सामाजिक बांधिलकी असे सूत्र निर्माण झालेले होते.

शरद पवार यांच्यावर पहिला खराखुरा राजकीय हल्ला चढवला गोपीनाथ मुंडे यांनी, नंतर त्यांच्याच पक्षातले सुधाकर नाईक यांनी आणि मग अनेक चिल्लर-पंटर नेत्यांची त्यात भर पडली. (पहिल्या किरकोळ हल्ल्याचे मानकरी अर्थात अब्दुल रहेमान अंतुले होते.) कारण पवार यांची राजकीय भूमिका सतत बदलणारी आणि मतदारांनाच नाही तर त्यांच्या सहकारी तसेच समर्थकांनाही संभ्रमात टाकणारी राहिली. काँग्रेसमधले त्यांचे बंड, मग समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना, नंतर नरसिंहराव यांच्या विरोधात पंतप्रधानपदाची लढवलेली निवडणूक, पक्षाचे नेतृत्व करावे म्हणून सोनिया गांधी यांच्यापुढे टाकलेली नांगी, त्या पक्षाध्यक्ष व्हाव्यात यासाठी केलेली मनधरणी, नंतर घुमजाव करत सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित करत बंड पुकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केलेली स्थापना, स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुका लढवल्यावर पुन्हा ‘यु टर्न’ घेत त्याच सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसशी युती करून महाराष्ट्रात बळकावलेली सत्ता.. असा हा शरद पवार यांचा राजकीय धरसोडीचा इतिहास आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरून सरंक्षण मंत्रीपदावर तडजोड केल्यापासून पवार यांची महाराष्ट्रातील लोकप्रियता ओसरू लागली. तहात हरणारा नेता अशी त्यांची राजकीय इमेज झाली, मग भूखंडांवरून गोपीनाथ मुंडे यांनी उठवलेले रान, काही वादग्रस्त लोकांशी त्यांची असणारी मैत्री असा पवार यांच्या राजकीय –हासाचा आलेख राहिला. केंद्रीय कृषी मंत्री झाल्यावर महाराष्ट्रातील शेतक-यांच्या आत्महत्या वाढत असतानाही क्रिकेटवरील अतिप्रेमाने त्यांची प्रतिमा आणखी मलीन झाली.

शरद पवार यांच्या राजकीय मर्यादा या काळात आणखी स्पष्ट होत गेल्या त्या निवडणुकात त्यांना मिळणा-या मर्यादित यशामुळे. राष्ट्रीय पातळीवर एक महत्वाचे नेते म्हणून शरद पवार उदयाला आले पण महाराष्ट्रात मात्र आधी समाजवादी काँग्रेस असो की आताची (महाराष्ट्रापुरती मर्यादित) राष्ट्रवादी काँग्रेस असो, पवार यांच्या पक्षाला स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करता येण्याइतका कौल कधीच मिळवता आला नाही हा एक प्रमुख राजकीय अपयशाचा ठपका त्यांच्यावर कायम बसला. उत्तर प्रदेशात मुलायमसिंह, मायावती, तामिळनाडूत जयललिता आणि अगदी अशात पश्चिम बंगालात ममता यांना स्वबळाचे जे (मत)दान भरभरून मिळाले ते शरद पवार यांना कधीच मिळाले नाही. हे अपयश आणि धरसोडीचे राजकारण यामुळे शरद पवार राष्ट्रीय राजकरणात ‘महत्वाचे’ नेते ठरले पण ‘प्रभावी’ नेते म्हणून त्यांची पाहिजे तशी दखल घेतली गेली नाही. राज्यात स्वबळावर निर्विवाद सत्ता प्राप्त न करता आल्याने राष्ट्रीय राजकारणात प्रभाव निर्माण करणारा प्रादेशिक नेता अशीही त्यांची मुलायम, मायावती, ममता, जयललिता यांच्यासारखी प्रतिमा निर्माण झाली नाही आणि मधेच कोठे तरी ते लटकत राहिले! आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जनसंपर्क हा शरद पवार यांच्या राजकारणाचा कळीचा गुण होता. दिल्लीच्या दरबारी राजकारणात रमल्यापासून पवार यांचा भर थेट ‘संवादा’पेक्षा ‘रिपोर्टिंग’ कसे मिळते यावर राहिला. त्यामुळे मर्यादित कुवत असणा-या नेत्यांचे उदंड पीक राष्ट्रवादीत आले, याही एका कारणामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर व्यक्तिगत आणि पक्ष पातळीवर संपत असल्याची भेदक जाणीव होण्याची वेळ शरद पवार यांच्यासारख्या विलक्षण राजकीय भान आणि दृष्टी असणा-या सामर्थ्यवान नेत्यावर आली. अर्थात हे काही पवार यांना कळत नाही असे समजण्याचे कारण नाही. म्हणूनच त्यांनी अनेक निर्णय तातडीने घेतले आहेत. एका पराभवाने खचणारे शरद पवार नावाचे नेतृत्व असूच शकत नाही हे प्रस्तुत लेखकाने एक पत्रकार या नात्याने मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि दिल्लीत पत्रकारिता करत असताना गेल्या ३६-३७ वर्षात अनुभवले आहे, प्रकृती साथ देत नसली तरी दिवसभर अखंड कार्यरत राहू शकणारा नेता आजही महाराष्ट्रात तरी नाही. आताच्या परिस्थितीत राज्यात काँग्रेसकडे नेतृत्व नाही, गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने भारतीय जनता पक्ष राज्यात सध्या तरी नेतृत्वहीन आहे, लोकसभा निवडणुकीतील पराभवाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निराशेच्या गर्तेत ढकलले आहे आणि शिवसेनेत शैथिल्य आलेले आहे हे लक्षात घेता शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात तळागाळातून सक्रीय होण्याला एक वेगळे महत्व आहे. शरद पवार यांना कात्रजच्या घाटात अडकवणे सोपे नाही, त्या घाटात पवारच इतरांना अडकवू शकतात. शरद पवार यांनी पत्ते पिसून इशारा तर दिला आहे तो कोणाला किती आणि कसा समजला आहे हे विधानसभ निवडणुकीच्या निकालानंतर कळेलच!

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९

संबंधित पोस्ट