बच्चा नाही, अब बडा खिलाडी!

राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळलेल्या महाराष्ट्रात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पहिल्या फेरीच्या निकालावर भाजप आणि त्यातही प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव आहे. ही निवडणूक बरीचशी निमशहरी आणि काहीशी ग्रामीण भागातील जनतेचा कौल असल्यानं भारतीय जनता पक्षानं आता निमशहरी भागातही पाळंमुळं घट्ट केली आहेत असं म्हणायला हरकत नाही. देवेंद्र फडणवीस आतापर्यंत केवळ मुख्यमंत्री होते; या निकालांनी त्यांचं नेतृत्व राज्यभर प्रस्थापित होण्यास प्रारंभ झालेला आहे, असाच कौल जनतेनं दिला आहे, असा या निकालांचा अर्थ लावावा लागेल; तसंच भाजपच्या अनेक नेत्यांचं बस्तान त्यांच्या घरात नीट बसलेलं नाही, हेही पितळ उघडं पडलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात सत्तारुढ होऊन सव्वादोन वर्ष होताहेत. देवेंद्र यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच पक्षातून त्यांना विरोध सुरु झालेला होता. नितीन गडकरी यांच्या समर्थकांनी नागपुरात शक्तीप्रदर्शन करुन देवेंद्र यांची वाटचाल अडथळ्याच्या रस्त्यावरुन होणार याचे संकेत स्पष्टपणे दिलेले होते. भाजपातील अनेकांचा मुख्यमंत्रीपदावर स्वाभाविक डोळा होता. एकनाथ खडसे यांनी तर उघड नाराजी व्यक्त करून असंतोषाला वाट मोकळी करुन दिलेली होती…काहीजण स्वमनात तर कोणी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री होते! चाळीशीतला नवथरपणा आणि अनुभवाअभावी देवेंद्र यांनीही सुरुवातीच्या काळात काही ‘लूज बॉल’ टाकले; त्यामुळे विरोधकांना आणि मिडियाला फटकेबाजी करण्यासाठी बळ मिळालं. ‘कल का बच्चा’ अशी आणि तीही, एकेरी उल्लेखानं देवेंद्र यांची खिल्ली अनेक खाजगी बैठकात उडवली जात होती; बहुसंख्य नेते देवेंद्र यांना ‘गृहीत’ धरत होते. ( यात काही पत्रकारही होते. काही पत्रकारांनी तर देवेंद्र फडणवीस यांनी न दिलेल्या मुलाखती प्रकाशित करुन मुख्यमंत्र्यांना गृहीत धरण्याचे उद्योग केले, पण ते असो! ) भाजपातल्या अनेक रावसाहेबांना खाजगीत ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून संबोधलं जात होतं. ‘जाणता राजा’नी तर अकारण पेशवाईचा उध्दार करत राजकारणाला ब्राह्मण विरुध्द मराठा असं वळण दिलं. मग जात आणि धर्म असे मोर्चे सुरु झाले. पाहता पाहता महाराष्ट्राची त्या सावटात विलक्षण घुसमट सुरु झाली; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलले गेले. या निवडणुकांच्या ऐन पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या चलनात बदल केल्यानं जनतेला अतोनात त्रास सहन करावा लागला; निवडणुका लढवणारे उमेदवार तर महाभयंकर संकटात सापडले. त्या प्रश्नावर विरोधी पक्षांनी रान उठवण्याचा जोरदार प्रयत्न केला. यामुळे या निवडणुकीतील भाजपच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य विजयाच्या वाटेवर कांटेच जास्त आहेत, असं दिसत होतं.

नगर परिषदांच्या पहिल्या टप्प्यातील निकालांनी भाजपची महाराष्ट्रातील ताकद वाढलेली आहे हे स्पष्ट झालंय आणि त्याचं मोठ्ठ श्रेय एकट्या देवेंद्र फडणवीस यांना द्यायला हवं. विधान परिषद निवडणुकीत जळगाव आणि गोंदिया-भंडारा इथं ‘हटके’ उमेदवार देऊन आणि त्यांना निवडून आणत त्यांनी महाराष्ट्र भाजपत ‘फडणवीस युग’ सुरु झाल्याचा संदेश दिला; आता नगर परिषद आणि पंचायतींच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाने त्या संदेशावर राज्यातील जनतेनी मोहोरच उमटवली आहे. १४७ नगर परिषद आणि १४ पंचायतींत निवडणुकीआधी भाजपच्या एकूण जागा २९८ होत्या त्या आता ८५१ झालेल्या आहेत आणि ५२ शहरात भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. ही निवडणूक फडणवीस यांनी एकहाती लढवली कारण पक्षातले मुख्यमंत्रीपदाचे दानवे ते मुंडे असे सर्व दावेदार गाव पातळीवरचे आपापले बुरुज सांभाळण्यात गर्क होते! ब्राह्मण+अननुभवी+अपरिहार्य राजकीय असूया म्हणून स्वपक्षीय आणि विरोधक राजकारण्यांकडून जी वागणूक सुरुवातीला मिळाली त्यावर मात करुन जनमताचा पाठींबा मिळवण्याचं आव्हान पेलण्यात देवेंद्र फडणवीस ( ३५ टक्के यश मिळवून काठावर पास झाले या होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करून ) यशस्वी झाले आहेत, यात शंकाच नाही. मुख्यमंत्री म्हणून स्वच्छ प्रतिमा, विकासाची दृष्टी, औद्योगिकदृष्ट्या वाढीच्या राज्यात निर्माण झालेल्या संधी, जलयुक्त शिवारला आलेलं दृश्य यश, दुष्काळावर मात करण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न, जाती आणि धर्माच्या राजकारणावर मात करण्यासाठी चाणाक्षपणे केलेल्या काही खेळी ( पक्षी – डॉ. विकास महात्मे, कोल्हापूरचे छत्रपती राजे भोसले यांच्या राज्यसभेवर घडवून आणलेल्या नियुक्त्या, विनायक मेटे यांची छत्रपती स्मारक समितीवर नियुक्ती, आर्थिक दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक सवलतीच्या मर्यादेत केलेले बदल ) यातून ‘मी बच्चा नाही तर, आता बडा खिलाडी झालेलो आहे’ हा संदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. अर्थात दीर्घ काळ राज्याचं नेतृत्व करण्यासाठी ही शिदोरी काही पुरेशी नाही पण, आजच्या घटकेला तरी त्या दिशेनं पाऊलं टाकायला त्यांनी सुरुवात केलेली आहे.

नगर परिषदा आणि पंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा गड असेलेल्या पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारणाऱ्या आणि विदर्भात दणदणीत यश मिळवणाऱ्या भाजपला मराठवाड्यात फारसं यश मिळालेलं नाही; कारण पंकजा मुंडे, केंद्रातलं राज्यमंत्रीपद सोडून प्रदेशाध्यक्ष झालेले रावसाहेब दानवे, बबन(राव) लोणीकर अशा अनेक मातब्बरांना मतदारांच्या मनात जागा नाही हे निकालातून स्पष्ट झालं. यापैकी बबन(राव) लोणीकर हे काही मोठा जनाधार असलेले प्रभावी नेते किंवा सक्षम मंत्री म्हणून परिचित नाहीत आणि तसं काही व्हावं असं, त्यांच्या आजवरच्या कामगिरीतून जाणवलेलंही नाहीये. इतर अनेक नेत्यांप्रमाणे घराणेशाही निर्माण करण्याच्या लोणीकर यांच्या प्रयत्नांना मतदारांनी सुरुंगच लावला आणि त्यांच्या गावातच त्यांचं आसन बळकट नाही हा संदेश राज्याला दिला. रावसाहेब दानवे हे स्वमनातून तर पंकजा मुंडे या जनतेच्या मनातून मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार आहेत, असं तेच म्हणतात. पक्षाच्या राजकारणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गटाचे असलेले आणि दीर्घकाळ राज्य भाजपच्या राजकारणात असलेले रावसाहेब दानवे हे मनात काय चालू आहे याची पुसटशीही जाणीव चेहेऱ्यावर उमटू न देणारं ‘अर्क’ व्यक्तिमत्व आहे. याच भांडवलावर ते गेली साडेतीन दशकं आमदार आणि खासदार आहेत. त्यांचा भोकरदन हा बुरुज पुन्हा एकदा ढासळला असल्यानं आणि पक्षहिताचा विचार न करता जालना गमावण्यात ‘मोला’ची भूमिका बजावल्यानं त्यांच्या ‘राज्यस्तरीय’ क्षमतेवर प्रश्नचिन्ह उमटलं जाणं स्वाभाविक आहे. ‘गेल्या ३१ वर्षात भोकरदन शहरानं कायमच कॉग्रेसला साथ दिलेली आहे’, हे राजकीय वास्तव सांगतानाच रावसाहेब दानवे यांनी त्या शहरात पक्ष बांधण्यात त्यांना पूर्णपणे अपयशच कसं आलेलं आहे याची कबुली देत स्वत:च्या नेतृत्वाच्या मर्यादा उघड केलेल्या आहेत. लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा रंग वेगळा; असं समर्थन दानवे/लोणीकर/मुंडे यांना करताच येणार नाही. तो फरक सावधचित्त असणाऱ्या मतदारांना समजतो म्हणूनच, या तिघांनाही घरातच पराभवाला सामोरं जावं लागलं आहे आणि त्याचं फटका पक्षाला बसला आहे, याचा या तिघांनीही विसर पडू देता कामा नये. भोकरदन आणि जालना जिल्ह्यातील पक्षाच्या उमेदवारांच्या झालेल्या या पराभवातून प्रदेशाध्यक्षपद गेलं तर दानवे यांची अवस्था ‘तेल गेलं आणि तूपही गेलं’ अशी होणार आहे. अर्थात नितीन गडकरी असं काही होऊ देणार नाहीत, हा भाग वेगळा!

वडील गोपीनाथराव यांच्या अकाली निधनापासून भावनेच्या लाटेवर स्वार असणाऱ्या पंकजा मुंडे परळीच्या पराभवातून धडा शिकतील अशी गोपीनाथ मुंडे समर्थकांना आशा वाटत असेल. अलिकडेच भगवान गडावर झालेल्या मोठ्या गर्दीमुळे आणि पंकजा यांना परळीत यशाची भाबडी खात्री होती. भगवान गडावरची गर्दी ही ‘श्रध्दा’ होती आणि परळीचा निकाल हे ‘वास्तव’ आहे, हा फरक पंकजा यांनी नीट समजून घेतला पाहिजे. बहुसंख्य गर्दी जशी पंकजा यांच्याकडे जमा होते तसं तीच गर्दी पंकजा यांची पाठ वळताच धनंजय मुंडे यांच्याकडे वळते थोडक्यात; गर्दी म्हणजे समर्थक नव्हेत हे पंकजा ( आणि धनंजय यांनीही ) यांनी लक्षात घ्यायला हवं. गोपीनाथ मुंडे यांची राजकीय पुण्याई पंकजा यांना वारसा म्हणून मिळालेली आहे. त्या वारशाला आता पंकजा यांनी कर्तृत्वाची आणि नव्या तसंच ताज्या दमाच्या समर्थकांची जोड दिली पाहिजे. एक बाब मान्य करायला पाहिजे; अशात म्हणजे अलिकडच्या दोन-अडीच महिन्यात पंकजा यांच्या वर्तणुकीत समंजसपणा आलाय आणि कोणत्याही वादापासून लांब राहण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या चाहत्यांसाठी या शुभ संकेताच्या ओल्या रेषा आहेत.

नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याची खेळी निकालापुरती तरी भाजप आणि शिवसेना युती सरकारच्या ( सेनेच्या गेल्या निवडणुकीत २६४ जागा होत्या त्या आता ५१४ म्हणजे जवळजवळ दुप्पट झाल्या आहेत शिवाय; २६ शहरांचं नगराध्यक्षपद सेनेकडे मतदारांनी दिलं आहेत! ) पथ्यावर पडलेली दिसते आहे. हा प्रयोग याआधीही राज्यात दोन वेळा झाला आणि साफ फसला आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी विसरु नये. ‘शहराचा विकास म्हणजे कामं म्हणजे टेंडरायनम: म्हणजे अर्थकारण’ असं हे दुष्टचक्र राज्यात सर्वत्र फोफावलेलं आहे. राजकारण हा आता येनकेन मार्गानं पैसा कमावण्याचा राजमान्य व्यवसाय झालेला आहे. निवडणुका लढवणं ही अफाट खर्चाची बाब झालेली आहे; हे जळजळीत वास्तव आहे. त्यातच या निवडणुकांच्या ऐन पार्श्वभूमीवर निश्चलचनीकरण जाहीर झालं; यामुळे निवडणूक लढवणाऱ्या आणि राजकारणात वावरणाऱ्यावर मोठं संकट कोसळलेलं आहे; खिसे रिकामे झालेले आहेत आणि घरच्या तिजोरीत ठणठणाट झालेला आहे. त्यामुळे घरच्या तिजोऱ्या भरण्यासाठी अहमहमिका सुरु होणार आहे. त्यातच प्रत्येक शहर-गाव स्मार्ट करण्याची लाट आलेली आहे; म्हणजे बख्खळ पैसा गावात येण्याची चिन्हे आहेत; साहजिकच सत्तेतील साठमारी वाढणार आणि नगर परिषदांच्या कारभारात आर्थिक गैरव्यवहारांना ऊत येणार, हे सांगायला काही कोणा कुडमुड्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. यापूर्वी झालेल्या याच प्रयोगातून अशी आर्थिक साठमारी राजरोसपणे अनेकदा घडल्याचे दाखले आहेत. हे टाळण्यासाठी नगराध्यक्षांना अधिक आर्थिक अधिकार देण्याचा विचार देवेंद्र फडणवीस यांना करावा लागणार आहे; त्यात फायदा जितका आहे त्यापेक्षा जास्त गैरफायदा घेण्याची वृत्ती वाढण्याचा धोका आहे, हे स्पष्टच आहे. म्हणजे आपलं नेतृत्व राज्यस्तरावर प्रस्थापित करतांना आणि पक्षाचा विस्तार गांवपातळीपर्यंत करताना एक नवीन कटकट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण करुन ठेवली आहे. ‘अर्थ’कारणाशी थेट निगडीत असणारी ही कटकट देवेंद्र फडणवीस कशी निस्तरणार हे बघणं, औत्सुक्याचं ठरणार आहे!

– प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
[email protected]
9822055799 / 9011557099
भेट द्या – www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट

 • Vaishhampayan Shirin ….
  सर, अगदी योग्य विश्लेषण।

 • Madhav Bhokarikar ….
  छान !

 • Shreekant Chorghade….
  अप्रतिम विश्लेषण !

 • Rajendra Korde…. congress & NCP contest this election separately that’s why BJP gain . and lot many congress / NCP and people support BJP / Shivsena candidate because of caste card. In Vidhan parishad election 5 out of 6 are Maratha kunbis . This is ground reality . off course DevendraJi strategy works for selecting candidates and provide all necessary supports.
  Congress leaders infighting and lost battle ground . This will happens in Muncipal corporation election also .

  • Rajendra Korde…. Considering number of winning seats by congress and NCP / Independent is little less than BJP/sS
   But where is your slogan disappear “Congress Mukta Bharat ”
   After 2 year of Loksabha poll . Now vote sharing of congress/NCP /Independent local Aghadi and Bharip Bahujan party is increasing . Why ?

   • Rajendra Korde ….
    Considering number of winning seats by congress and NCP / Independent is little less than BJP/sS
    But where is your slogan disappear “Congress Mukta Bharat ”
    After 2 year of Loksabha poll . Now vote sharing of congress/NCP /Independent local Aghadi and Bharip Bahujan party is increasing . Why ?….

    • श्री राजू कोरडे ,स. न.
     आपला थोडा-फार परिचय आहे म्हणून जरा तपशीलाने लिहितो आहे .
     समोरच्याचा प्रतिवादाचा हक्क मला कायम मान्य आहे पण, मी काय लिहिलंय हे तू मुलभूतपणे समजावून घेतलेलं नाहीये , असं तुझ्या प्रतिक्रियांवरून दिसतंय .
     १-नगरपरिषदा आणि पंचायतींच्या निवडणुकीच्या निकालांच्या अनुषंगाने मी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पराभवाबद्दल काहीही कमेंट माझ्या मजकुरात केलेली नाही ( त्याबद्दल मी कदाचित नंतर लिहीन ) आणि शिवसेनेबद्दल केवळ एक कमेंट केलेली आहे . मी लिहिलंय ते या निकालातून जाणवलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या ‘मुख्यमंत्री ते राज्याचा एक नेता’ या प्रवासाबद्दल आणि काहीसं राज्य भाजप व भाजपच्या अन्य काही नेत्यांबद्दल . गेल्या सव्वादोन वर्षात प्रथमच मी देवेंद्र यांच्याबद्दल अनुकूल मजकूर लिहिलेला आहे , हेही याठिकाणी नमूद करायला हवं .
     २- तुझ्या प्रतिक्रियेला उत्तर देतांना राज्याच्या सत्तेत येण्यासाठी आधी कॉंग्रेस आणि आता भाजप-सेनेला विदर्भातील मतदारांनी दिलेल्या योगदानाबद्दल वस्तुस्थिती आणि त्याचा एक ( विदर्भातली कॉंग्रेसची पाळेमुळे भाजपने उखडून फेकली ) हा अर्थ सांगितला .
     ३-‘कॉंग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा मी कधी दिलेली नाही ( अशी घोषणा देणारा मी कोण ?) आणि अशा दिल्या गेलेल्या घोषणेचं समर्थन केलेलं नाही / करणारही नाही कारण , मी काही ‘नमोभक्त’ नाही किंवा भाजपचा समर्थकही नाही तर, माझी महात्मा गांधींवर निष्ठा आहे आणि समाजवादावर श्रध्दा आहे .
     ४- एक पत्रकार म्हणून विवेकवादी भूमिका घेऊन मी लेखन करतो . जे चांगलं/लोकहितवादी वाटतं त्याकडे आणि जे चूक/अलोकहितवादी आहे असं वाटतं त्यावर कोणत्याही राजकीय विचाराच्या चष्म्यातून न बघता लेखन करतो .
     ५-मी तुझा ‘यार’ कधी नव्हतो कारण तुझ्या माझ्या वयात ( मी वयाची एकसष्ठी पार केलीये !) आणि अनुभवात मोठ्ठं अंतर आहे ; शिवाय कायम लक्षात ठेव फेकाफाकी करणारा , आक्रस्ताळा , वाचाळवीर , बेजबाबदार लिहिणारा अशी , एक पत्रकार आणि लेखक म्हणून माझी ओळख कधीही नव्हती , नाहीये आणि भविष्यात कधीही असणारही नाही .
     तूर्तास एवढे पुरे . सुज्ञास अधिक सांगावं लागत नाही , असं म्हणतात !

     • Madhav Bhokarikar….
      वस्तुस्थिती नाकारून उपयोग नसतो तर त्याचा उपयोग करायचा असतो.

 • Vaijinath Funde ….
  देवेंद्र ना जण मत नाहीच, फक्त मेडीया आणि दलाल पत्रकार त्यांच्या बाबतीत हवा बनवतात,

 • Surendra Deshpande….
  Illiterate voting ban kRave

 • Anil Kawarkhe….
  सर वास्तव

 • Ranjeet S. Chikhalikar….
  Gelya nagar palikecha nivadnukit aji pawar khiladi hote nantar kay zal aapan pahtoch aahot……arthat media ts kahi hou denar nahi..bhagwan gadachi gardi hi gramin bhagatli aahe ….analysis thathyapasun koso dur

 • Chandrakant Chaudhari *🌞•• *🌞

  *श्रेष्ठ वही है जिसमें…..*

  दृढ़ता हो, जिद नहीं.
  बहादुरी हो, जल्दबाजी नहीं.
  दया हो, कमजोरी नहीं.
  ज्ञान हो, अहंकार नहीं
  करूणा हो, प्रतिशोध नहीं
  निर्णायकता हो, असमंजस नहीं..

  अगर लोग आपकी अच्छाई को आपकी कमजोरी समझने लगते हैं,
  *तो यह उनकी समस्या है,*
  *आपकी नहीं…*

  *🍁CN Chaudhari🍁

 • Taslim Arif….
  हो मला पण हे जानवलं भाऊ

 • Vilas Wankhade….
  Kharach ahe