बावन्नकशी बर्धन !

ज्येष्ठ पत्रकाराकडून ऐकलेला एक प्रसंग असा आहे – आयटक या तत्कालीन बलाढ्य कामगार संघटनेच्या सर्वोच्च ख्यातकीर्त नेत्याला भेटण्यासाठी मुंबईचा एक पत्रकार नागपूरच्या कार्यालयात वेळेआधी पोहोचला तर तिथे एक माणूस एका बाकावर शांतपणे झोपलेला होता. त्या झोपलेल्या इसमाची झोपमोड न करता तो पत्रकार ‘त्या’ कामगार नेत्याची वाट पाहात थांबला. काही वेळाने तो झोपलेला इसम उठला आणि त्याने त्या कार्यालयाची साफसफाई सुरु केली. थोड्या वेळाने पत्रकाराने त्या इसमाला सांगितले की, तो ए.बी.बर्धन यांना भेटायला आला आहे. साफसफाई करणा-या त्या इसमाने खिशातला रुमाल काढला, हात पुसले आणि स्वत:ची ओळख करून दिली ‘मी बर्धन. बोला काय काम होतं आपलं? कोण आपण ?…’ आणि त्या पत्रकाराला चक्करच आली!

गेली ७५ पेक्षा जास्त वर्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा घेऊन राजकारणात असलेल्या अर्धेद्रू भूषण बर्धन नावाच्या आणि आता वयाच्या नव्वदी नंतर जगाला आखरी सलाम ठोकणाऱ्या माणसाची जीवनकथा अशी बावन्नकशी शुद्धतेची आहे, स्वच्छ चारित्र्याची आहे, आजच्या वातावरणात अविश्वसनीय वाटेल अशा अव्यभिचारी राजकीय निष्ठेची आहे. विविधतेत एकता हे जे आपल्या देशाचे वर्णन केले जाते त्याची साक्ष सर्वार्थाने पटवणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. २५ सप्टेबर १९२५ला तेव्हाच्या पूर्व (आणि आताच्या बांगला देश) बंगालमध्ये जन्मलेल्या अर्धेन्द्रूने १९४०मध्ये ऑल इंडिया स्टुडट फेडरेशनच्या विद्यार्थी चळवळीत प्रवेश केला. तिथे त्यांची ओळख कम्युनिझमशी झाली आणि वयाच्या १५व्या वर्षी; १९४१साली पक्षात त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जो प्रवेश केला आणि अखेरचा श्वासही त्यांनी कम्युनिस्ट म्हणूनच घेतला. पक्षाच्या सर्वोच्च महासचिवपदाची जबाबदारी सलग सोळा वर्ष सांभाळल्यानंतर बर्धन यांनी राजकारणाचा मुख्य प्रवाह सोडला. त्यांनी हे पद सोडावे असे कोणी सुचवले नाही, तशी कोणी मागणी केली नाही, त्यांच्यावर त्या पदाचा गैरवापर केल्याचा कोणताही आरोप झालेला नाही किंवा वयोमानपरत्वे त्यांच्यातला उत्साह कमी झाल्याची कोणतीही लक्षणे नव्हती; भारतीय राजकारण यूपीए आणि एनडीए भोवती केंद्रित झालेले असले तरी ते अंतिम राजकीय सत्य नाही अशी भूमिका ठणकावून सांगण्याइतकी त्याची बुद्धी शेवटपर्यंत तेज असल्याचा अनुभव प्रस्तुत लेखकाने घेतला आहे; विवेकानंद ही कोणा एकाची मक्तेदारी नाही हे परखडपणे सांगण्याइतका खमकेपणा तेव्हाही (म्हणजे वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर!) शाबूत होता तरीही, बर्धन यांनी पक्षातील सर्वोच्च पदाचा त्याग केला.

बंगाल जन्मभूमी असली तरी ए. बी. बर्धन अस्सल नागपूरकर झालेले होते. सहा फुटाची सणसणीत उंची, सावळा वर्ण, मध्यम बांधा, डोईवरचे केस मागे वळवलेले आणि काळेभोर बोलके डोळे अशी शरीरयष्टी असलेले बर्धन कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केल्यावर नागपुरात आले आणि पुढची पन्नास वर्ष ते नागपूरकर म्हणून वावरले, नागपूरच्या मातीशी एकरूप झाले, विदर्भाच्या जनजीवनाचा अभिन्न अंग झाले. मराठी, बंगाली, इंग्रजी, उर्दू आणि हिंदी अशा पाच भाषा बर्धन यांना अस्सखलित येत असत. इतक्या अस्सखलित की बर्धन यांची मातृभाषा कोणती असा संभ्रम निर्माण व्हावा. या बहुभाषकतेमुळे बर्धन यांची पाळेमुळे जनमानसात खोलवर रुजत गेली. माणूस व्यक्त होतो तो त्याच्या मातृभाषेतूनच. पाच मातृभाषांचे धनी असलेले बर्धन या बुमीतल्या सर्वसामान्यचे नेते झाले. अर्ध्या बाह्यांचा बुशकोट किंवा पूर्ण बाह्यांचा सदरा; तोही हाताच्या कोपरापर्यंत दुमडलेल्या बर्धन यांचे वक्तृत्व एकदा सुरु झाले की जणू भाषेचा प्रपात कोसळत असे, सर्व सामान्य माणसाच्या काळजाला हात घालण्याची किमया त्यांच्या वक्तृत्वात होती. वक्तृत्वाचा हा प्रपात प्रसंगी शीतल, हळवा, कोमल तर प्रसंगी कमालीचा तेज व तप्त होऊन कोसळत असे. कम्युनिस्ट असणे म्हणजे अरसिक असणे, पोथीनिष्ठा हाच अलंकार असणे आणि राजकीय एकारलेपणाच्या तालावरच कायम गुणगुणत राहणे हा जो महाराष्ट्रात सर्वमान्य समज होता त्याला विदर्भात तडा दिला तो बर्धन यांनी. बर्धन अलवार कवितांचे केवळ चाहतेच नव्हते तर त्यांना अनेक कविता मुखोद्‌गत, त्याही चार-पाच भाषांतल्या! त्यात सुरेश भट यांच्यासारखा कलंदर कवी मित्र असल्याने तर कवितेच्या गाभ्याला भिडण्याची सवय बर्धन यांना लागल्याचा अनुभव नागपूरकरांना अनेकदा आलेला आहे. कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा आणि मार्क्स जसा त्यांना तोंडपाठ तसाच गायत्री मंत्रही… आणि आणखी पुढचे पाऊल म्हणजे गायत्री मंत्रातील विज्ञान तसेच शोषणमुक्ती, बर्धन आपल्याला पटवून देणार! मराठीच्या एखाद्या प्राध्यापकाला काय ज्ञानेश्वरी उमगली असेल त्यापेक्षा जास्त बर्धन यांची ज्ञानेश्वरीवर हुकमत होती. विवेकानंद जसे आदरणीय तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांच्या साहित्य आणि क्रांतीकारक म्हणून केलेल्या कामगिरीचा बर्धन यांना अभिमान. स्वातंत्र्य लढयातील सावरकर यांचे योगदान या विषयावर बर्धन यांनी दिलेली दोन व्याख्याने आजही नागपूरकरांच्या स्मरणात आहेत.

राजकीय भूमिका घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवण्याचे बर्धन यांचे कसबही कायमच विलक्षण घरंदाज राहिले. त्यामुळे त्यांना विरोधक केवळ विचारणे होते मनाने नाही. गेल्या पिढीतील आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्या सुमतीताई सुकळीकर या ए. बी. बर्धन यांच्यासाठी त्यांच्या थोरल्या भगिनीसारख्या. या दोघांनी परस्परांविरोधात निवडणुकाही लढवल्या पण, ‘राखी’चं त्यांचं नातं सुमतीताई सुकळीकर यांच्याशी कायम राहिलं. सुमतीबाई यांचे ‘सुमतीताई’ असे नामकरणही बर्धन यांचंच.

एक कामगार नेता, आमदार आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय नेता असा बर्धन यांचा प्रवास नागपूरकरांनी जवळून बघितला आणि महाराष्ट्राने तो अनुभवला. बंगालमधून आलेल्या या माणसाची संयुक्त महाराष्ट्रासाठी असलेली व्याकुळता आणि आंदोलनाच्या आघाडीवरची आक्रमकता नागपूरकरांनी बघितली. त्यांच्या जगण्याच्या काळातच काळात देशात मोजकी दोन-तीन राज्ये वगळता कम्युनिस्ट कायम प्रभावी राहिले नाहीत किंबहुना कम्युनिस्ट सत्ता असलेल्या राज्यांचा अपवाद वगळता या विचाराचा उत्तरोत्तर संकोचच होत गेला. अशा प्रतिकूल काळात स्वत: निराश न होता कार्यकर्त्याचे मनोबल आणि आशावाद टिकवून ठेवणे काही सोपे काम नसते, नेतृत्वाच्या कसोटीचा हा कधीही न संपणारा क्षण असतो. बर्धन यांची नेतृत्वशैली आव्हानांच्या सर्व कसोट्यांना पुरून उरली. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे जो राजकीय विचार स्वीकारला त्यावरची बर्धन यांची निष्ठा एकाच वेळी विलक्षण तेजस्वी आणि सालस अशी दुहेरी होती, स्वभाव टोकाचा विनातडजोडवादी होता. तसेच बर्धन यांच्या उक्ती आणि कृतीत कोणतेच अंतर नव्हते. मानवी समतेचे केवळ गीतच या राजकीय विचारातून केवळ गाता येत नाही तर त्यातून समानता प्रत्यक्षात आणणारी राज्य व्यवस्था अंमलात येवू शकते, हा दुर्दम्य आशावाद बर्धन यांच्या मनात कायम तेवत होता आणि त्यासाठी-केवळ त्यासाठीच जगण्याचे त्यांचे आत्मबळ प्रखर होते.

१९५७चा एक अपवाद वगळता पक्षाने त्यांना विधीमंडळ किंवा संसदेच्या कोणत्याच सभागृहात सन्मानाने बसण्याची संधी दिली नाही. खरे तर, त्यांची अव्यभिचारी पक्षनिष्ठा लक्षात घेता पक्षाने राज्यसभा किंवा गेला बाजार विधान परिषदेवर तरी संधी द्यायला हवी होती असे त्यांच्या हितचिंतकांना तीव्रतेने वाटत असे पण, तसे काही घडले नाही. प्रखर आत्मबळामुळेच की काय त्याबद्दल बर्धन यांच्या मनात मात्र त्याबद्दल कोणतीही कटुता नव्हती. करिअर म्हणून राजकारणाकडे बघणा-या आणि राजकारण हे धनप्राप्तीचेच साधन आहे असे मानण्याच्या आजच्या जमान्यात बर्धन अनेकांना कालबाह्य वाटू शकतील कारण पद, सन्मान आणि धन यांच्यापासून बर्धन कायम लांब राहिले. राजकारणातले पद, सन्मान आणि धन निकटस्थ होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या लांड्यालबाड्या बर्धन यांच्या रक्तातच नव्हत्या. त्यामुळेच आयुष्यभर बर्धन यांच्या ‘राजकीय रक्ताच्या’ लाल रंगात कोणतीही भेसळ झाली नाही; तो रंग अस्सल राहिला. राजकीय निष्ठांचा बाजार मांडण्याच्या आजच्या काळात असे अस्सल असणे खूपच दुर्मिळ असते, असा दुर्मिळ नेकीचा राजकारणी होणे ए. बी. बर्धन यांना जमले ; त्यांच्या या कफल्लक असण्यातच त्यांचे वैभव आणि चारित्र्य दडलेले आहे आणि तीच त्यांची आयुष्याची पुंजी होती.

१६ वर्ष पक्षाचे शीर्षस्थ नेत्तृत्व करून आणि राजकारणी म्हणून अतिशय शुभ्रसुवर्ण प्रतिमा संपादन करून उजळ माथ्याने बर्धन यांनी हे सर्वोच्च पद सोडले. तेव्हापासून ते पक्षाच्या दिल्लीतील अजय भवनात एखाद्या व्रतस्थासारखे वास्तव्य करून होते. त्यांच्या अतिशय साध्या खोलीत त्यांच्याशी गप्पा मारताना मराठी साहित्य आणि संस्कृतीशी असणारी त्यांची नाळ कायम असल्याचे जाणवत असे. एकदा दिल्लीतील सहकारी विकास झाडे आणि मी बर्धन यांना भेटायला गेलो; गप्पांच्या ओघात आजच्या राजकारणाचा विषय आला. तेव्हा बर्धन म्हणाले, ‘देशाची परिस्थिती केवळ वाईटच नाही तर इतकी चिंताजनक होईल अशी कधी कल्पनाही केलेली नव्हती. आज राजकारणात मूल्य नाही तर पैसा महत्वाचा झाला आहे पण, माझा जनतेवर विश्वास आहे. आज नाही उद्या या देशातील जनता ही परिस्थिती बदलून टाकेल असा मला खात्री आहे’. वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावरही त्यांचा आशावाद कायम होता आणि त्यांच्या मनात विचार घोळत होता तो केवळ देशाचा.

वयाची पंच्याहत्तरी गाठली तेव्हा झालेल्या सर्वपक्षीय सत्कारात बर्धन यांचा ‘भारतीय राजकारणातला भीष्माचार्य’ असा ज्यांचा गौरवाने उल्लेख केला गेला तेव्हा, हातांच्या दोन्ही करांनी कानांची पाळी नम्रपणे पकडत भीष्माचार्य हा सन्मान स्वीकारणारे हे अजातशत्रू व्यक्तीमत्व आता कायमचे काळाच्या पडद्याआड गेले आहे.

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९

भेट द्या – www.praveenbardapurkar.com
कृपया वाचा- www.praveenbardapurkar.com/newblog

संबंधित पोस्ट