बेजबाबदार आणि बेताल !

आपण बहुसंख्येने दुर्वर्तनी तसेच बेशिस्त असलेल्या आणि जबाबदारीची जाणीव नसलेल्या समाजाचे नेते आहोत, अशा या (दुर्वर्तनी, बेशिस्त आणि बेजबाबदार) समाजाला जबाबदारी, शिस्त आणि सद्वर्तनाचे धडे शिकवणे हे आपले केवळ कर्तव्यच आहे असे नाही तर, त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे बहुसंख्य नेतृत्वाला वाटत असते. नेतृत्व म्हणजे राजकारण, सरकार आणि प्रशासन, समाजकारण, साहित्य, मिडिया अशा क्षेत्रातील निवडक धुरंदर! मात्र हेच धुरंदर नेतृत्व बहुसंख्येने कसे बेताल वर्तन आणि व्यवहार करते याचे दर्शन याकुब मेमनला दिल्या जाणाऱ्या संभाव्य फाशीच्या कारवाईच्या निमित्ताने घडताना दिसत आहे. रमझानचा महिना सुरु असताना सरकारच्यावतीने याकुब मेमन याच्या संभाव्य फाशीची बातमी ‘लिक’ करणारे शासक जितके बेजाबबदार तितकेच त्या बातम्या उगाळून-उगाळून रंगवणारा मिडियाही बेजबाबदार आणि बेताल आहे. मुंबई बॉम्बस्फोटाने मुंबई-महाराष्ट्र-देशाला झालेल्या जखमा अजून ओल्या आहेत, खरे तर त्या कधीच भरून येणार नाहीत कारण, या स्फोटांनी घेतलेले बळी कोणताही धार्मिक द्वेष मनात न बाळगणाऱ्या निष्पाप जीवांचे सांडलेले रक्त आहे. ‘आपण बरे की आपले जगणे बरे’ या सरळ मार्गावर चालणारे हे सर्व चाकरमाने निष्पाप जीव होते. त्यांच्या जगण्यात धार्मिक द्वेष, तणाव आणि त्यातून भडकावल्या जाणाऱ्या सुडाच्या भावनांना स्थान नव्हते, अशा विद्वेषाचा या जीवांना कधी स्पर्शही झालेला नव्हता. भूतकाळात घडलेल्या, वर्तमानात घडवून आणल्या जाणाऱ्या आणि भविष्यातल्या आखल्या जाणाऱ्या कोणत्याही धार्मिक सूड म्हणा की बदल्याच्या घटनांशी या बिचाऱ्या सर्वसामान्य माणसाचा काहीच संबध नव्हता. माणुसकी विसरून धार्मिक विद्वेषाने क्रूर झालेल्यांकडून अश्राप आणि निष्पापांच्या झालेल्या हत्यांमुळे होणारा शोक अनावर, अनावेगी आणि दीर्घकाळ जिवंत असतो, बळी न पडलेल्या अशा जीवांना झालेल्या जखमा कायम ठसठसत राहतात, त्या जखमांतून वाहणारे रक्त साकोळत नाहे,त्या जखमां कधीच सुकत नाहीत.

याकुब मेमन हा काही कोणी संत महात्मा नाही तर या अशा लाख्खो जीवावर कधीही न भरून येणाऱ्या जखमा करणाऱ्या आणि काहींचे तर बळी घेणाऱ्या ‘मास्टर माइंड’पैकी तो एक आहे. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंट असणाऱ्या याकुब मेमन याने त्याची कुशाग्र बुद्धी निष्पाप माणसांचे जीव कसा घ्यावा याचा लेखाजोखा मांडण्यात खर्च केली. मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टर माइंड असलेल्या टायगर मेमन याच्यासोबत एकत्रित कुटुंबात याकुब राहत होता आणि कुटुंबाचे आर्थिक व्यवहार सांभाळत होता. तो राहत असलेल्या मुंबईच्या घरातच ती महासंहारक स्फोटके लपवून ठेवण्यात आलेली होती. स्फोट घडवल्यावर गुन्हेगारांना दुबईला पळून जाण्यासाठी त्यानेच विमानाची तिकिटे काढलेली होती. जर याकुब मेमन निर्दोष होता तर त्याने ही सर्व माहिती पोलिसांना कळवायला हवी होती. अशा काही देशद्रोही हालचाली सुरु आहेत हे याकुबने स्वत: उजेडात न येता पोलिसांना सांगण्याची जबाबदारी पार पाडली असती तरी केवळ बॉम्बस्फोटच टळले नसते तर त्यासाठी जबाबदार असणारे आज जे कोणी देशाबाहेर आहेत त्यांच्या मुसक्या आवळता आल्या असत्या. शिवाय या देशाने त्याला अभिमानाने डोक्यावर घेतले असते. या विषयावर फार लिहिण्याचे कारण नाही कारण, अशात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी त्यावर बराच प्रकाश टाकला आहे. शिवाय हुसैन झैदी यांच्या ‘black friday’ या पुस्तकात स्फोट आणि याकुब मेमनसंबधी विस्ताराने आलेले आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची कन्या आणि ज्येष्ठतम साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांची सून असलेल्या सायली राजाध्यक्ष हिने केलेला ‘black friday’ या पुस्तकाचा मराठी अनुवादही (प्रकाशक- चिनार प्रकाशन, पुणे) बाजारात उपलब्ध आहे.

या देशात कोणीही आणि कोणत्याही पातळीवरचा गुन्हेगार त्यांच्या हिंस्र मनमानीपणे वागू शकणार नाही आणि एकदा कायद्याच्या चौकटीत कोणी सापडला तर शिक्षेविना सुटू शकणार नाही असे, अशात न्यायालयांनी दिलेल्या काही निकालांनी सिद्ध झाले आहे, ते अतिशय आशादायक आहे. मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाच्या याकुब मेमन आणि (अभिनेता संजय दत्तसकट) अन्य आरोपींना जी शिक्षा झाली त्यामुळे, ज्यांचे बळी गेले / ज्यांचे रक्त सांडले त्यांच्या हयात असणाऱ्या आप्तांना दिलासा देणारे तसेच या देशाच्या न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढवणारे आहे. याकुब हा कोणी निरपराध नाही की माणुसकीवर नितांत श्रद्धा असणारा समाजसेवक नाही, तसे कोणी भासवले तरी त्यावर समाज आणि न्यायालये विश्वासही ठेवणार नाही हा या निकालातून मिळालेला संकेत महत्वाचा आहे. डोईवरचे केस सावरत, वृत्त वाहिन्यांच्या प्रकाशझोताच्या चकचकाटात, आपण जणू काहीच केले नाही अशा निर्विकार चेहेऱ्याने पण, मोठ्या ऐटीत तुरुंगात जाणे सज्जनपणाचे लक्षण असूच शकत नाही. अशी माणसे कधीही समाजाचे हिरो बनू शकत नाहीत किंवा ‘न्यूज मेकर’ही असू शकत नाहीत, आपण त्यांना ‘न्यूज-मेकर’ करूही नये कारण त्यांचे वर्तन आणि व्यवहार हिंस्र आहे, तो एक देशद्रोह आहे हे भान मिडियाने बाळगायलाच हवे. याकुब मेमनला न्यायालयाने ठोठावलेल्या फाशी देण्याची बातमी येताच, फाशीच्या शिक्षेबाबत न्यायालयीन प्रक्रिया माहीत करून न घेता जे काही ‘दळण’ बहुसंख्य मिडियात दळले गेले त्यामुळे एकिकडे मुंबई बॉम्बस्फोटाच्या जखमा खपल्या पडून जखमां पुन्हा भळाळून वाहू लागल्या, तर दुसरीकडे एका धर्माच्या ऐन सणांच्या दिवसात मुद्दाम ही बातमी उगाळून दाखवत त्यांना खिजवले जात आहे, अशी भावना निर्माण झाली. न्यायिक यंत्रणेशी संबधित असणाऱ्या काहींनी याकुबच्या ३० जुलैच्या संभाव्य फाशीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना / मुलाखती देताना म्हणूनच भान बाळगायला हवे होते. प्रक्रिया जाणून न घेता बातम्या दिल्या गेल्या आणि कायदेशीर प्रक्रिया संपल्यावर फाशी पुढे ढकलावी लागली असल्याचे वृत्त देण्याची नामुष्की ओढवणे हे काही जबाबदार पत्रकारितेचे लक्षण मुळीच नाही.

शासन आणि सरकार या दोन्ही पातळीवर याकुब मेमनच्या फाशीबाबत जो बेतालपणा दाखवण्यात आला तो अक्षम्य आहे. केंद्र आणि राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे आणि सत्ताधाऱ्यांचा हिंदुत्ववाद या देशातील सर्वांना सरसकट मुळीच मान्य नाही, हे जगजाहीर आहे. सत्तेत आल्यापासून या सरकारांनी घेतलेला प्रत्येक निर्णय ‘भगव्या’वर घासून घेतला जात आहे. एका धर्माच्या प्रती हे सत्ताधारी अनुदार आणि प्रतिकूल आहेत हे सर्वज्ञात असण्याच्या पार्श्वभूमीवर तर याकुब मेमनच्याच्या फाशीच्या निर्णयाबाबत खूपच सावधपणे, समंजसपणे आणि ‘सर्व’ प्रकारची खबरदारी काटेकोरपणे घेत पावले उचलली जाणे आवश्यक होते. कसाब आणि अफजल गुरूच्या फाशीच्यावेळी तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राज्यात आर.आर. पाटील यांनी जो संयम आणि मौन धारण करण्याचा धोरणीपणा दाखवला त्याच्या आसपासही कुठे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारे आहेत असे दिसले नाही. आपल्या गृहमंत्रीपदावर असण्याच्या कार्यकाळात कसाब आणि गुरु यांना फाशी दिली गेली तर त्याच्या फटका निवडणुकीत मतांच्या रुपात बसू शकतो याची पक्की जाणीव असूनही दिल्लीत सुशीलकुमार शिंदे आणि महाराष्ट्रात आर.आर. पाटील यांचे वर्तन अत्यंत वाखाणण्याजोगे होते. याकुबच्या फाशीच्या समर्थनार्थ निकाल देणारे न्यायमूर्ती आणि वकिलांनी माध्यमांना मुलाखती देण्याचे ही योग्य वेळ नव्हती. त्यातच राज्याच्याही गृह खात्याचा कारभार सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रकाशवृत्त वाहिन्यासमोर येऊन न्यायालयाच्या निर्णयाची नक्की अंमलबजावणी केली जाईल असे सांगून आगीत तेलच ओतत आहेत, अशी भावना निर्माण झाली आणि सकृतदर्शनी त्यात तथ्य असल्याचा भास निर्माण झाल्याने या विषयाचे ‘धर्माधारीत राजकारण’ केले जात आहे, या समाजवादी परतीचे अबू आझमी तसेच एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी केलेल्या जहरी टीकेला सरकारला सामोरे जावे लागले. तोंडाने जरी ‘आग’ हा शब्द उच्चारला तरी वणवा पेटेल अशी संवेदनशील आणि कसोटीची स्थिती असताना राज्यकर्त्यांनी मौन बाळगणे सर्वात इष्ट असते याचे भान देवेंद्र फडणवीस यांना राहिले नाही, हे कटू असले तरी स्पष्टपणे सांगायलाच हवे. मुख्यमंत्रीपदावर असताना अनेक बाबी न बोलता उरकायच्या असतात हे देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच शिकून घेणे आवश्यक आहे, असाच याच अर्थ आहे.

याकुब मेमनच्या संभाव्य फाशीसंबधी कसाब आणि गुरूच्या फाशीच्या आधीच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या ‘ज्वालाग्रही’ काळात केंद्र आणि राज्यातील गृह खाते तसेच राज्य पोलीस दलाने वातावरण बिघडणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून दक्षता घेत जी गोपनीयता बाळगली त्याचा मागमूसही यावेळी दिसला नाही. दररोज याकुब मेमनच्या संभाव्य फाशीबाबतचे बारीक-सारीक तपशील मिडियाला पुरवण्याची अहमहमिकाच जणू पोलीस दलामध्ये लागलेली होती. फाशी कशी दिली जाते येथपासून ते याकुबला फाशी दिली जाईल तेव्हा कोण-कोण हजर राहणार येथपर्यंत हे तपशील होते आणि ते मिळाल्यावर मिडियाने चवीने चघळले नसते तर नवलच होते. नागपूरच्या कारागृहात कालबाह्य झालेल्या ओळखपत्राच्या आधारे एक वकील याकुबला भेटतो, पोलिसांच्याच वाहनातून इस्पितळात जातो आणि नंतर राष्ट्रहिताशी संबधित काही महत्वाचे सांगत असल्याच्या आवेशात शहाजोगपणे तोंड वर करून पत्रकारांशी बोलतो, हा तर गृह खात्याच्या बेपर्वाईचा कळसच म्हणायला हवा. तो इसम अधिकृत वकील असेल-आहेच पण, त्याचे कालबाह्य ओळखपत्र कारागृह मान्य करते यावरून नागपूर कारागृहात कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही आणि आरोपी सामुहिकपणे फरार होण्याच्या नाचक्कीतून नागपूर कारागृहाचे प्रशासन अजूनही काहीच शिकलेले नाही हे समोर आले. राज्याच्या गृह खात्यावर कठोर ऑपरेशनची गरज आहे हाच याचा अर्थ आहे.

दहशतवादी कारवायांचे संकट कायमचे घोंगावत असताना आणि त्यामुळे प्रत्येक रात्र वैऱ्याची झालेली असताना गृह खात्याची अशी अक्षम्य बेपर्वाई, राज्यकर्त्यांचा बेजबाबदारपणा आणि मिडियाचा बेतालपणा आपल्याला मुळीच परवडणारा नाही. समाजाचे नेतृत्व करणारे हे निवडक धुरंदर इतरांना कायम शहाणपणा शिकवत असतात, या अशा शहाण्यांनाच आता शहाणपणा शिकवण्याची वेळ आली आहे!

-प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट