भरकटलेले भुजबळ…

अखेर महाराष्ट्रातील एक दिग्गज राजकीय नेते छगन भुजबळ यांना आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेऊन अटक झाली. त्याआधी त्यांचा पुतण्या, माजी खासदार समीर यांनाही याच आरोपाखाली अटक झालेली होती. मिडियात त्याविषयी बरंच काही प्रकाशित होतंय. छगन भुजबळ यांनी केलेल्या आणि न केलेल्या अनेक प्रकरणाची ‘व्हाऊचर्स’ त्यांच्या नावावर फाडली जातायेत. छगन भुजबळ यांनी केलेल्या कोणत्याही आर्थिक गैरव्यवहाराची बाजू मला घ्यायची नाही की त्या व्यवहारांचं समर्थन करायचं नाहीये कारण, राजकारणी छगन भुजबळ गेल्या सुमारे पंचवीस वर्षात ज्या ‘वेगळ्या’ वाटेवर भरकटत गेले आणि एकटे पडले त्याचं वर्णन ‘आणखी एका काकाची, आणखी एका पुतण्याने वाट लावली’, असं एका वाक्यात करता येईल! त्याकडे ‘काका-पुतण्याची ‘अर्थ’भरी दास्तां’ म्हणूनही बघता येईल, अशी स्थिती आहे.

राज्याच्या राजकारणात एक पत्रकार म्हणून गेली पावणेचार दशकं वावरताना मला जे नेते मनापासून आवडले त्यात छगन भुजबळ यांचा क्रम वरचा आहे. त्यांचा एकहाती आक्रमकपणा मला भावत असे. ते शिवसेनेत असताना आमची ओळख झाली. त्याकाळात विधिमंडळाच्या हिवाळी नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात मनोहर जोशी, छगन भुजबळ, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी हे सेनेचे दिग्गज किमान एका तरी रात्रभोजनाला आमच्या घरी येत. ऐंशीच्या दशकाचा उत्तरार्ध आणि नव्वदीच्या सुरुवातीचा तो काळ आहे. अनेकदा ऑटोरिक्षाने हे चौघे आमच्या घरी येत आणि रात्री उशीरा आमदार निवासात परत जात असत. ‘नटसम्राट’ या नाटकातील संवाद साभिनय म्हणून दाखवत भुजबळांनी त्या अनेक मैफिली स्मरणीय केल्या आहेत. नंतर ‘लोकसत्ता’तील माझा सहकारी आणि दोस्तयार धनंजय कर्णिक याच्यामुळे भुजबळ यांच्याशी असलेली ओळख ‘घट्ट’ झाली. छगन भुजबळ तेव्हा सेनेचे विधानसभेत एकमेव सदस्य होते पण, अख्खी विधानसभा ते एकटेच अक्षरशः गाजवत! त्याची विधाने सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकली तर ते बाहेर येऊन पत्रकारांशी बोलताना पुन्हा ती कामकाजातून काढून टाकलेली विधाने सांगत आणि विधानसभा अध्यक्षांचा विधाने वगळण्याचा निर्णय फुस्स करत. अरबाचे वेषांतर करून बंदी हुकुम मोडून बेळगावला जाऊन आंदोलन करणारे नेते भुजबळ तेव्हा सेनेचे हिरो होते. ‘सेनेचा ढाण्या वाघ’ असा मी त्यांचा उल्लेख अनेकदा केलेला आहे. छगन भुजबळ यांच्या संबधीचा ‘भुजबळांचे बंड’ हा लेख ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘डायरी’ या पुस्तकात (पान क्रमांक ६४ वर) आहे. सेनेतील त्यांच्या बंडाच्या अत्यंत खळबळजनक-नाट्यपूर्ण घटनेचाही एक पत्रकार म्हणून मी साक्षीदार आहे. औरंगाबाच्या एका जाहीर कार्यक्रमात, त्या बंडाच्या काळात तेव्हाचा मिडिया कसा जबाबदारीने वागला, या आठवणी जागवत छगन भुजबळ यांनी सध्याच्या पत्रकारितेला काढलेले चिमटे अजूनही अनेकांच्या चांगले स्मरणात आहेत.

मित्र म्हणून भुजबळ एकदम घनगर्द दिलदार, मैफिलबाज आणि दोस्तीला पक्के; एकदम फेविकॉल का जोड! ते कॉंग्रेसमध्ये गेले आणि महसूल मंत्री झाले, पुढे ते राष्ट्रवादीत गेले आणि उपमुख्यमंत्री झाले पण, आमच्यातला स्नेह घट्ट राहिला. एकदा, २०१०च्य ऑक्टोबरमध्ये माझ्या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाला तेव्हा उपमुख्यमंत्री असलेले भुजबळ पोहोचले पण, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी पोहोचायचे होते. भुजबळ मग माजी आमदार श्रीकांत जोशी, विवेक देशपांडे, डॉ. मिलिंद देशपांडे आणि माझ्याशी गप्पा मारत बसले. तेव्हा एका अधिकाऱ्यानं ‘राज्याच्या उपमुख्यमंत्र्यानं विरोधी पक्षातील नेत्यांची अशी वाट पाहणं हा शिष्टाचाराचा भंग होतोय’, असं लक्षात आणून दिल्यावर छगन भुजबळांनी, ‘मैत्रीत शिष्टाचार वगैरे काही नसतं. शिष्टाचार गेला उडत. मुंडे-गडकरी येईपर्यंत चहा आणा माझ्यासाठी’, असं सुनावून त्याला गप्प केलं. मला हृदयविकाराचा त्रास झाल्यावर शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल केल्यावर अत्यंत काळजीपोटी कोणालाही काहीच न सांगता रुग्णालयाकडे किशोर कान्हेरेमार्फत परस्पर ‘काळजी’ जमा करणारा हा नेता समता परिषदेच्या माध्यमातून जातीय राजकारण करतोय या म्हणण्यावर माझा कधीच विश्वास बसला नाही, कसा बसणार ? शिवसेना सोडल्यावरही बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता नाही असं सेंटीमेंटल होऊन म्हणणारे, बाळासाहेबांसारखा माया करणारा अन्य कोणीही नाहीच, असा गहिंवर काढणारे छगन भुजबळ मला चांगले ठाऊक आहेत.

एक मात्र खरं, विशेषत: राष्ट्रवादीत गेल्यावर भुजबळ झपाट्यानं बदलले. त्यांच्या आर्थिक व्यवहारांबद्दल आधी प्रशासकीय, मग राजकीय वर्तुळात आणि नंतर माध्यमात चर्चा सुरु झाली. तेलगी प्रकरणात कथित क्लीन चीट मिळवल्यावर तर याबाबतीत भुजबळ अधिक बेडर झाले असं मंत्रालयाच्या कॉरीडॉर्समध्ये उघड बोललं जाऊ लागलं. नंतर ते पुतण्या समीरच्या अतिआहारी गेले असल्याचं बोललं जाऊ लागलं आणि आणखी एक ‘पुतणे पुराण’ सुरु झालं, नंतर काय घडलं… ते सर्वांच्या समोर आहे. न सावरता आणखी भरकटतच जात एक ‘राजकीय आर्थिक साम्राज्य’ म्हणून भुजबळ कुटुंब स्थिरावत आणि बळकट होत गेलं, त्याची जाहीर चर्चा सुरु झाली तरी छगन भुजबळ यांनी फिकीर बाळगली नाही. आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याची पुतण्याची महत्वाकांक्षा दिवसेंदिवस वाढतच गेली, त्यातून होणाऱ्या कमाईची नशा चढली. त्या नशील्या ‘धन’चक्रात काका छगन भुजबळही जास्तीत जास्त गुंतत गेले-अडकत गेले आणि भरकटून वाहावत गेले. या संदर्भात म्हणजे, सार्वजनिक बांधकाम खात्यातील गैरव्यवहाराच्या अनेक ‘सुरस कथा’ विविध माध्यमांतून प्रकाशित होत होत होत्या; तेव्हा जरी छगन भुजबळ सावध झाले असते तरी आजची वेळ त्यांच्यार कदाचित आली नसती. पण, सौदे वाढले आणि एकेक जोडलेला माणूस दुखावून दूर जाऊ लागला. ‘कोण होतास तू, काय झालास तू ?’ असं भुजबळांविषयी म्हटलं जाऊ लागलं…

छगन भुजबळ केवळ श्रीमंत झाले असते तर त्यांच्या पक्षातील कोणाचीच हरकत नव्हती. पण, आर्थिक स्थैर्य जसजसं येत गेले तसंतशी छगन भुजबळ यांची सत्ताकांक्षा वाढत गेली. अतिधन आणि सत्तेची वाढती महत्वाकांक्षा या धोकादायक संगमात आपला बळी जाईल, हे छगन भुजबळ कसं काय समजलं नाही हे एक आश्चर्यच आहे. समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी एक प्रभावी नेते म्हणून देशाच्या पातळीवर स्थान संपादन करण्याचा प्रयत्न सुरु केला; हे कमी की काय म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्याशी हातमिळवणी करून (या संदर्भातील सविस्तर माहिती गोपीनाथ मुंडे यांनीच मला एकदा दिलेली होती आणि त्याचे काही तपशील यापूर्वीच्या अनेक लेखांत आलेले आहेत पण, तूर्तास तो मुद्दा नाहीये!) राज्यातील प्रस्थापित नेतृत्वाला (एक जानेमाने विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या शब्दात सांगायचं तर ‘मराठा-महार-माळी’ या सत्ता समीकरणाला) आव्हान देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आणि तेच त्यांच्या पक्षातील धुरीणांच्या डोळ्यात आलं. नागपूर-मुंबई आणि दिल्लीच्या सत्तेच्या दालनात एक पत्रकार म्हणून वावरताना छगन भुजबळ यांच्याविषयी वाढलेली असूया/नाराजी/असंतोष प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यात आणि चेहेऱ्यावर स्पष्ट दिसू लागला. वाढत्या सत्ताकांक्षेमुळे स्वपक्ष राष्ट्रवादी तसंच कॉंग्रेसमधील नाराज धुरीण आणि आर्थिक साम्राज्य उभारण्याच्या काळात जे-जे दुखावले गेले; त्या प्रत्येकानं मग सत्ता हातची गेलेल्या छगन भुजबळ यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. शिवाय त्यात कर्वे-नाईक आणि मलिक अशी फौज सहभागी होतीच. राज्यात सत्तापालट झाल्यावर नवं सरकार म्हणजे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच लांच लुचपत खात्याचे महासंचालक प्रवीण दिक्षित यांनी सार्वजनिक बांधकाम आणि सिंचन घोटाळे केंद्र सरकारच्या अर्थ खात्याच्या सक्तवसुली संचालनालया(ईडी) कडे ‘रेफर’ केले. चुकून राज्यात पुन्हा सत्तापालट झालाच तर गैरव्यवहाराची ही प्रकरणे ‘सबळ पुराव्याअभावी निर्दोष’ सिद्ध होऊ नयेत ही खबरदारी घेण्याचा दूरदर्शीपणा या निर्णयामागे होता. स्वत: छगन भुजबळ आणि त्यांचे भक्त काहीही म्हणोत आणि कोणतेही आरोप/दावे करोत, सक्त वसुली संचालनायाची कामाची पद्धत कोणतीही चौकशी सखोल पातळीवर अतिशय सूक्ष्मपणे करण्याची आहे आणि राजकारण-जात-धर्माला जुमानणारी नाही. (पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळातील मुंदडा प्रकरणापासूनचे अनेक दाखले या संदर्भात देता येतील, पण ते असो.) भले-भले या चौकशीला टरकून असतात. थोडक्यात, सध्या जे काही म्हणजे, गुन्हे दाखल तसंच अटक वगैरे झालंय ते समीर आणि छगन भुजबळ या काका-पुतण्याचं होणार असल्याचं तेव्हाच स्पष्ट झालेलं होतं. सत्तेच्या खुर्चीत प्रदीर्घ काळ बसलेल्या छगन भुजबळ यांना या परिणामांचा अंदाज आलेला नव्हता, असं म्हणणं ही आत्मवंचनाच ठरेल.

छगन भुजबळ यांनी केलेल्या आणि न-केलेल्या कोणत्याही गैरव्यवहाराचं समर्थन कदापिही नव्हे पण, या पापात प्रशासनाचा वाटा मोठ्ठाच-मोठ्ठा आहे, यात शंकाच नाही. छगन भुजबळ जन्माला येण्याआधी हा भ्रष्टाचार सुरु झालाय आणि आता भुजबळ मंत्री नाहीत तरी तो सुखनैव सुरु आहेच; फरक जो काही आहे तो गती आणि प्रमाणाचा (speed and volume) आहे. जर भुजबळ यांनी १०० रुपयांचा गैरव्यवहार केला असेल तर प्रशासनातील अधिकारी-अभियंते-कर्मचारी यांनी मिळून १० सहस्त्र रुपये ‘पचवले’ आहेत हे विसरता येणार नाही; त्यांचे हे उद्योग आजही कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहेत. या सर्वांचे उभे असलेले डोळे दिपवणारे बंगले, विविध ठिकाणी असलेल्या अलिशान सदनिका, लक्झुरीयस वाहने, ते बाळगत असलेले सोने-नाणे, ब्रांडेड जीवनशैली…हे माझ्या या म्हणण्याचे पुरावे आहेत. म्हणून या गैरव्यवहाराची शिक्षा एकट्या छगन भुजबळ यांना मिळणं सार्वत्रिक समान न्यायाचं मुळीच नाही. सखोल चौकशी झाली तर रस्त्यांच्या बांधकाम आणि दुरुस्तीत झालेला हा भ्रष्टाचार कदाचित देशातील सर्वात मोठ्ठा असेल अशी खात्री आहे. म्हणून या सर्वांचीही अशीच कठोर चौकशी झाली तर ते सर्वार्थानं समान न्यायाचं ठरेल, अशी माझी भावना आहे. गैरव्यवहाराची ही विषवल्ली राजकारणात असो की प्रशासनात, कायमची समूळ उखडून टाकलीच पाहिजे, त्याशिवाय सरकारच्या योजनांचे लाभ रयतेला कधीच मिळणार नाहीत.

छगन भुजबळ दावा करतात त्याप्रमाणे ते खरंच निर्दोष असतील तर, ते त्यांनी सिद्ध करून दाखवावं; त्याच्या निर्दोषत्वाचं स्वागतच आहे. तसं नसेल तर मग मात्र (ही शक्यता जास्त दिसते आहे) छगन भुजबळ यांनी जे काही गैर केलंय त्याची शिक्षा त्यांना मिळावी-ती मिळेलच…पण, मी मात्र छगन भुजबळ यांचा उल्लेख ‘केवळ भ्रष्टाचारी राजकारणी’ असा एकांगी करणार नाही. एक उमदा माणूस, दोस्तीला जगणारा दोस्त, नाटकावर प्रेम करणारा रसिक, कवितेत रमणारा प्रेमी, गरजूंना जात-पात-धर्म न बघता सहाय्य करणारा दाता, शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी त्यांची विविध रूपे माझ्या कायम स्मरणात आहेत. त्यांच्यातल्या या चांगुलपणावर माझं प्रेम आहे आणि ते कायम राहील. छगन भुजबळ जर रा. स्व. संघात असते तर, ‘आणखी एक स्वयंसेवक नापास झाला!’ असं म्हणता आलं असतं, पण तशीही परिस्थिती नाही. सत्ता आणि धनाच्या लाटांवर स्वार होण्याच्या महत्वाकांक्षेत बेभान होऊन भरकटलेला राजकारणी असंच माझं भुजबळांच्याविषयी मत झालेलं आहे तरी, त्यांच्याशी असलेलं मैत्र मी कधीच नाकारणार नाही… हे मैत्र नाकारणं हीदेखील आत्मवंचनाच ठरेल!
(छायाचित्र—‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेल्या प्रस्तुत लेखकाच्या दोन पुस्तकांच्या ऑक्टोबर २०१०मध्ये झालेल्या प्रकाशन समारंभात डावीकडून नितीन गडकरी , आस्मादिक-प्रवीण बर्दापूरकर , छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे .)
-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com
​9822055799 / 9011557099
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट