भाजपच्या गोटात : मु. पो. उत्तन !

घडलं ते असं-

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा फोन आला.

उपाध्ये म्हणाले, ‘भाजपचे प्रवक्ते आणि विविध चर्चात सहभागी होणारे पक्षाचे प्रतिनिधी (पॅनेलिस्ट) यांचा एक अभ्यासवर्ग उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आयोजित केला आहे; त्यात तुम्ही एक एक्स्पर्ट म्हणून सहभागी व्हाल का ?’

मी विचारलं, ‘विषय काय आहे ?’

केशव उपाध्ये म्हणाले, ‘लेखनकला, मुद्दे मांडणी, भाषा, ब्लॉग लेखन… असं काही बोलायचं आहे’.

‘बोलण्यावर कोणतंही बंधन मान्य करणार नाही’, आस्मादिकांनी निक्षून अट सांगितली.

त्यावर केशव उपाध्ये म्हणाले, ‘अर्थातच. आमचं कोणतंही बंधन असणार नाही; यापूर्वीही कधी नव्हतं, बरं का!’

केशव उपाध्ये बरेच जुने परिचित; त्यामुळे थोड्या इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या. त्यात कळलं की, बोलण्यासाठी माध्यमातून आस्मादिक एकटेच आहेत.

भाजपच्या अभ्यास वर्गाला संबोधित करायला होकार दिला.

दोस्तयार, सर्जन डॉ. मिलिंद देशपांडे याला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी विषयी उत्सुकता होती. तोही येतो म्हणाला.

भाजपच्या एका अर्थाने माध्यमांवरचा चेहेरा असलेल्या चमूच्या अभ्यास वर्गात आणि तेही महाराष्ट्र भाजपची ‘काशी’ असलेल्या उत्तनला आस्मादिक गेले होते हे कळलं की, अनेकांच्या पोटात शूळ उठणार, काहींच्या पोटात मी ‘बाटलो’चे जंतू आनंदाने वळवळणार, तर काहींची- ‘अखेर तो नमोभक्त झाला… वाटलं होतंच किंवा खात्री होतीच आम्हाला’; अशा प्रतिक्रिया उमटणार याची जाणीव होती.

आता ही अपेक्षित चर्चा हळूहळू पसरतेय आणि अपेक्षित तश्शाच प्रतिक्रिया येताहेत पण, ते असो.

=====


अभ्यासवर्गात आस्मादिक !

भाजपच्या अभ्यास वर्गाला संबोधित करण्याचं आमंत्रण स्वीकारण्याची कारणं दोन.

१) माझा लोकशाहीवर ठाम विश्वास आहे. लोकशाही म्हणजे संवाद; लोकशाही म्हणजे परस्परांच्या विरोधी मतांचा आदर करत राखलेलं सौहार्द पण, हे अलिकडच्या काही वर्षात आपण विसरूनच गेलेलो आहोत. आपल्या राजकीय भूमिका/विचारांचे गडद रंगाचे चष्मे घालून एकमेकांवर तुफान चिखलफेक, तुटून पडणं आणि कधी तर एकमेकाच्या उरावर बसणं म्हणजे लोकशाही झालीये, वातावरणात आक्रस्ताळा कर्कश्शपणा भरलाय नुसता, असं अनुभवायला येतंय. या कर्कश्शपणपासून लांब जंगलात लोकशाहीतील आपल्या विरोधकांशी संवाद साधण्याची संधी सोडायची नाही.

२) मी भाजपचा समर्थक तर सोडाच पण हितचिंतकही नाही. भाजप (आणि त्यांच्या त्यांच्या पितृ संस्थेचाही) समाजात तेढ निर्माण करणारा धर्माधिष्ठीत राजकीय दृष्टीकोन मला पसंत नाही. तरीही त्यांनी आग्रहानं आवतन दिलं. आपल्या विरोधी विचारांच्या व्यासपीठावर जावं आणि कोणताही आततायीपणा/आक्रस्ताळेपणा न करता, उपमर्द होईल अशी भाषा न वापरता आणि महत्वाचं म्हणजे अभ्यासांती ठाम मतप्रदर्शन करावं; त्यांचा प्रतिवाद ऐकावा; स्वत:ला अपडेट करावं हा, हे आवतन स्वीकारण्यामागचा आणखी एक हेतू होता. (स्वतंत्र विदर्भ मागणाऱ्यांच्या व्यासपीठावर जाऊन स्पष्ट विरोध करण्याचे प्रसंग अनेकदा ओढावून घेतल्यानं, प्रतिवादाची धार तेज आणि जहाल तिखट कशी होऊ शकते याचा अनुभव पदरी होताच.) यात ‘अभ्यासांती’चा संदर्भ असा की- बातमीचं बीट म्हणून अस्मादिकांनी अनेक वर्ष रा. स्व. संघ; तेही मुख्यालयी म्हणजे नागपुरात आणि राजकीय वृत्तसंकलक म्हणून राज्यात तसंच दिल्लीतही भाजप बीटवर काम केलेलं आहे; तरीही महत्वाचं म्हणजे अद्यापही मन आणि मत परिवर्तन झालेलं नसल्यानं आता तर या ‘काशी’ला जाण्यात तर काहीच धोका नव्हता!

=====

उत्तनला पोहोचल्यावर स्वागतकर्ता म्हणाला, ‘व्ही. सतीशजी बसले आहेत. आधी तिकडे जाऊ यात’.

त्यावर मी म्हणालो, ‘अहो, व्ही. सतीश काय म्हणता, सतीश वेलणकर म्हणा की’. तो एकदम ​‘फ्लॅट’च झाला. ‘अहो, हे बीट सांभालंय अनेक वर्ष’, त्याला सावरताना मी म्हणालो.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे भेटले.

टिपिकल ‘संघाचं जसं असायला हवं’ तस्स व्यक्तीमत्व. त्यांनी अगत्यानं स्वागत केलं. गप्पा मारल्या. ‘त्यांच्या’ हिंदुत्ववादाला असलेल्या आस्मादिकांच्या विरोधाच्या वार्ता साठे यांच्याही कानी असाव्यातच. बोलता, बोलता रवींद्र साठे म्हणाले, तुमचे मित्र द्वेषाने लेखन करतात आणि बोलतात आमच्याविरुध्द.

‘एक वेळ द्वेषाने लिहिलं आणि बोललं तर हरकत नाही हो. ही बहुसंख्य मंडळी अज्ञानातून लेखन करतात व बोलतात आणि तुम्हा मंडळीचं मनोरंजन करतात’, अस्मादिकांनी प्रतिक्रिया दिली.

माझं म्हणणं त्यांच्या पट्कन लक्षातलं नाही. मी पुढे म्हणालो, ‘यापैकी बहुसंख्यांनी संघाची कार्यपध्दत समजून घेतलेली नाहीये, काम बघितलेलं नाहीये. ऐकीव माहितीवर लिहितात आणि उघडे पडतात. मी संघ हे बीट म्हणून सांभाळलंय… वगैरे वगैरे’.

राजकीय नेतृत्व या विषयावर सुरु करण्यात आलेल्या नव्या (Post Graduate Programme in Leadership and Governance) अभ्यासक्रमाची माहिती रवींद्र साठे यांनी दिली. नऊ महिने कालावधीच्या या अभ्यासक्रमाचं शुल्क अडीच लाख रुपये आहे आणि ४० पैकी ३०वर जागांसाठी नोदणी झालीये!

=====

मग डॉ. मिलिंद देशपांडे आणि मला तो पूर्ण परिसर दाखवण्याची जबाबदारी रवींद्र साठे यांनी संजय महाडिक यांच्यावर सोपवली.

संजय महाडिक यांचं व्हिजिटिंग कार्ड बघितलं तर त्यावर लिहिलेलं होतं – ‘मार्केटिंग ऑफिसर’. त्यांचं कामाचं स्वरूप समजून घेतल्यावर कौतुकच वाटलं. अनेक पक्ष, संस्था-संघटना अजूनही ‘बाबा आदम’च्या मानसिकतेत वावरत असतांना संघ परिवाराच्या या ‘मार्केटिंग’ बदलाला मनोमन दाद दिली.

प्रबोधिनीचं ग्रंथालय हेवा वाटावं असं आहे. खरं खोटं माहिती नाही पण, संघ आणि भाजपच्या विरोधातील सर्वाधिक पुस्तकं इथं आहेत म्हणे!

=====

भोजनाच्या वेळी माधव भांडारी, आमदार डॉ. अनिल बोंडे, गिरीश व्यास ही दीर्घ परिचित मंडळी बऱ्याच दिवसांनी भेटली. शिवराय कुळकर्णी, विवेकानंद गुप्ता, गणेश हांके, रवींद्र अमृतकर, ‘लोकसत्ता’तील जुने सहकारी दिनेश थिटे, मिलिंद चाळके हेही फारा वर्षानी भेटले; जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मजा आली.

काळ कसा उलटला बघा; शिवराय कुळकर्णी आणि आणि विवेकानंद गुप्ता यांना मी अतिशय तरुण वयात पाहिलेलं…आता ‘बाप्ये’ दिसत होते! मजा वाटली.

प्रबोधिनीत नागपूरच्या नगरसेवकांसाठीही कार्यशाळा सुरु होती. त्यासाठी आलेले आमदार अनिल सोले, निशांत गांधी, श्रीमती प्रगती पाटील आणि अन्य परिचित भेटले. आमची भेट झाली तेव्हा अनिल सोले नुकताच अपडेट झालेला माझाब्लॉग वाचत होते. एकंदरीत ‘बर्दापूरकरांची बुवाबाजी’ भाजपच्या ‘काशी’तही पोहोचलेली आहे!

=====

अभ्यास वर्ग – भाजपच्या प्रवक्ते आणि पॅनेलिस्ट यांच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेला अभ्यासवर्ग सुरु असतांना.

अभ्यास वर्गात अगदी मधू चव्हाण, माधव भांडारी, विश्वास पाठक, नीता केळकर यांच्यासारख्या ज्येष्ठांसह अनेकजण हजर आणि शांतपणे ऐकताहेत; अनेकजण तर चक्क नोंदी घेताहेत, असं चित्र.

भाजपविषयी असणारा अस्मादिकांचा विरोधी दृष्टीकोन आणि गेल्या सुमारे दीड दशकात स्वत:त झालेलं विवेकवादी परिवर्तन प्रारंभीच नमूद करुन नंतर बरंच काही बोललो. बहुसंख्य वक्ते आणि पॅनेलिस्ट यांना सरकार व प्रशासन यांच्यातील फरकच समजत नाही (तसा तर तो देवेंद्र फडणवीस यांनाही समजत नसावा कारण प्रत्येक जबाबदारी ते स्वत:वर घेतात, या टिपणीवर अत्यंत सावध आणि तोही माफक हंशाचा प्रतिसाद मिळाला). माध्यमंही प्रशासनाची जबाबदारी सरकारवर टाकतात आणि प्रवक्ते ती मान्य का करतात? सरकारची जबाबदारी निर्णय घेण्याची आणि प्रशासनाची जबाबदारी त्या निर्णयाच्या अंमलबजावणीची असते, हे तूर डाळ खरेदी ते अनेक उदाहरणं देऊन सांगितली. सरकारवर प्रशासनाचा वरचष्मा कसा जबर वाढलाय याचीही उदाहरणं दिली. सरकारचे अनेक चांगले निर्णय लोकांपर्यंत पोहोचत कसे नाहीयेत, याकडे लक्ष वेधलं. सरकारनं निर्णय जाहीर केल्यावर त्याचे आदेश जारी व्हायला ‘काही तासां’ऐवजी ‘काही दिवस’ लागतात आणि ते तालुका पातळीवर पोहोचायला दोन-दोन आठवडे लागतात याकडेही लक्ष वेधलं. विधिमंडळात मंत्री एखाद्या अधिकाऱ्याच्या निलंबनाची घोषणा करतात पण सनदी अधिकारी त्याची अंमलबजावणी करायला नकार देतात; अशी काही उदाहरणे दिली. हे सर्व तुम्ही सरकारच्या कानावर घालायलाच हवं कारण तुम्ही सरकारचे डोळे आहात, असं माझं म्हणणं होतं.

आपण जनतेचे चाकर आहोत हे बहुसंख्य नोकरशाही विसरली असून वेतन, हप्ता आणि नंतर सेवानिवृत्ती वेतन मिळवणं यासाठीच आपली सेवेत नियुक्ती झालीये अशी ठाम भावना नोकरशाहीत बहुसंख्येने बळावली आहे, याकडे लक्ष वेधलं. बहुतेकांना ते मान्य असल्याचं चेहेऱ्यावर दिसत होतं पण, मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी, असा ‘मिलियन डॉलर’ प्रश्न त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे उमटलेला दिसत होता. नंतर चहाच्या वेळी अनेकांनी ते बोलूनही दाखवलं.

सनदी अधिकारी कसे मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून पत्रकार परिषदा किंवा सार्वजनिक कार्यक्रमात बसतात हे सांगून असा औचित्यभंग करण्याची हिंमत वसंतदादा, शंकरराव चव्हाण, शरद पवार, अ. र. अंतुले, सुधाकरराव नाईक, नारायण राणे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, यांच्या कार्यकाळात कशी नव्हती याकडेही लक्ष वेधलं.

आमदार, खासदार, माजी मुख्यमंत्री यांच्याशीही उठून बोलण्याचं सौजन्य अधिकारी दाखवत नाहीत. बहुसंख्य प्रशासन मुजोर झालंय; आपले सचिव कोण असावेत याबाबत बाबू आग्रही झालेत (पक्षी : सचिव भगवान सहाय यांच्या विरुध्दचं आंदोलन); आज अमुक एक सचिव नको म्हणतात, उद्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकपदी कोण हवं ते डिक्टेट करतील आणि परवा तुमच्या पक्षातला कोण आमदार मुख्यमंत्री हवा ते ठरवण्याचा अधिकार मागतील. प्रशासनाचा हा वरचष्मा फार महाग पडेल, हे प्रवक्ते आणि पॅनेलिस्ट यांनी सरकारच्या लक्षात आणून दिलंच पाहिजे असा आग्रह धरला.

माझं म्हणणं कोणताही आततायीपणा न करता, आक्रस्ताळेपणा न करता मांडलं. प्रकाश वृत्त वाहिन्यांवरील चर्चात लोकशाही, संवाद, घटनेची चौकट या विषयावर बहुसंख्य वेळा प्रवक्ते आणि पॅनेलिस्ट बॅकफूटवर का जातात हे कळत नाही. अनेक वर्ष संघ हे बीट म्हणून कव्हर केल्यानं संघ व भाजपत त्यांची अशी एक सामुदायिक आणि त्यांच्या परीनं समंजसपणे निर्णय घेण्याची पध्दत तसंच परस्पर संवाद आहे हे मला चांगलं ठाऊक आहे. मात्र ‘ती’ निर्णय घेण्याची पध्दत आणि तो संवाद संघ तसंच भाजपच्या विरोधकांना मान्य नाही हे आवर्जून सांगताना समाजवादी आणि कॉंग्रेसचं उदाहरण दिलं. समाजवाद्यांत- तीन डोकी, चार विचार आणि पाच राजकीय पक्ष अशी लोकशाही असते तर कॉंग्रेसमध्ये हायकमांड आणि गटबाजी म्हणजे लोकशाही असते, तुमची लोकशाही मात्र ‘दक्ष’ची असते असं गंमतीनं कोट केलं. ‘तुमची लोकशाही आमच्यावर का लादता?’ असा प्रश्न तुम्ही त्यांना का विचारत नाही असा सवाल केला.

मग आमच्यात संवाद झाला; बरीच प्रश्नोत्तरं झाली. तो संवाद आणखी तासभर रंगला.

जे काही सांगायलाच हवं होतं ते मी सांगितलं; त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतलं. त्याचा संयत प्रतिसादही केला. कुठंही कर्कश्शपण आला नाही; कुठेही कलकलाट झाला नाही.

कुठेही आक्रस्ताळेपणा, आततायीपणा आला नाही. कोणाचाही सूर बेसुरा झाला नाही.

परस्परविरोधी असणारांतील संवादाची ही अशी मनात कोणतीही कटुता निर्माण न करणारी प्रक्रिया हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे; त्यासाठीच मी उत्तनला गेलो होतो.

भाजपचे लोक राजकीय विरोधक आहेत; ते आपले शत्रू नाहीत.

सर्वमान्य सांसदीय लोकशाहीच्या चौकटीत आपणच सत्तेत आलो पाहिजे अन्य कुणी नाही, हा दुराग्रह आहे. त्याच सांसदीय चौकटीत राहूनच ते सत्तेत आले आहेत, हे दुराग्रहीपणानं अमान्य करणं अ-लोकशाहीवादीच आहे.

रयतेच्या विरोधात असलेल्या त्यांच्या धोरणांना विरोध हवा, सत्तेत राहून समतेचा पुरस्कार करणारी लोकशाहीची, घटनेची चौकट खिळखिळी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर, मग मात्र त्यांना विरोध करण्यासाठी पुढे सरसावणारांत मीही असेन!

‘भाजपच्या गोटात; मु. पो. उत्तन’ या कथेचं नेमकं स्क्रिप्ट हे असं आहे!

=====

ताजा कलम – माधव भंडारी यांनी त्यांची दोन पुस्तकं भेट म्हणून दिली.

परतल्यावर माझी चार पुस्तकं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या ग्रंथालयाला भेट म्हणून पाठवली!

(छायाचित्रे सौजन्य – गुगल)

-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क +९१९८२२०५५७९९
[email protected]
==========================================
​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी

लिंक – http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
==========================================

संबंधित पोस्ट

 • Suresh Diwan….
  विचार भीन्न असूनहि अत्यंत सलोख्याने वागून, सहकार्य करून एकमेका बद्यल आदर वृंधीगत करून कसे वागावे याचा आदर्श श्री मोदी व महनीय माजी राष्ट्रपती श्री प्रणवदा यांनी देशाला नुकतेच बोलून दाखवले आहे !
  आपण त्याच परंपरेचे जूने पाईक आहात याची आम्हाला खात्री आहे .

 • Manali Mangesh Gupte ….
  तुमचा लोकशाहीवर दांडगा विश्वास असला तरी भाजपचा लोकशाहीवर कितपत विश्वास आहे हा संशोधनाचा विषय आहे…

 • Ramesh Zawar ….
  प्रवीणजी, तुमची पोस्ट आवडली. प्रोफेशनल पत्रकारांच्या नेमक्या भूमिका कशा असतात ह्याचा फारच कमी जणांना अंदाज असतो.

 • Nishikant Anant Bhalerao ….
  संवाद यात्रेला शुभेच्छा

 • Padmanabh Pathak ….
  सर्वमान्य लोकशाही चौकटीत दुसराही सत्तेत येउ शकतो, हे मान्य न करणं लोकशाही विरोधी >>>>>
  परफेक्ट !

 • Shrikant Umrikar ….
  काही मुद्दे चर्चे मधील दिले असते तर हवे होते…

 • Sarang Takalkar ….
  प्रवीणजी…उत्तम उत्तन! आपला व्यासंग आणि दृष्टीकोन याबद्दल मी नव्यानं सांगण्याची गरज नाही. आताशा पत्रकारितेत हे दिसत नाही. लोकशाही संदर्भ तसेच सरकार -प्रशासन हे मुद्दे ठसले. खूप वर्षे झाली प्रबोधिनीत गेलो त्याला. स्व. प्रमोदजींनी संदर्भ दिला आणि श्री. विनय सहस्रबुद्धे यांना प्रबोधिनीत भेटून तो परिसर पाहण्याचा योग आलाहोता..आता सगळाच बदल असणार…

 • Pallavi Dalvi ·….
  Nice

 • Krishna Shewdikar ….
  उत्तन उत्तमच,आपल्या व्यासंगाला साजेशे लिखाण,गुप्ते ताई म्हणतात तसा सत्ताधाऱ्यांचा लोकशाहीवरील विश्वास शंकास्पदच

  • सत्तेत कोणताही पक्ष असो , त्या पक्षाच्या सरकारचा लोकशाहीवरचा विश्वास कायम संकुचित आसतो कारण सत्ता जाण्याची भीती वाटते त्यांना !

 • Vikas Rayamane ….
  सर खुप वास्तव मांडलं आहत आपण यालाही सार्वजनिक प्रसिध्दी मिळाली पहिजे

 • Deepak Dharne ….
  I always hold you in high esteem.. You have had been journalism, you have closely observed its every shades of nuances and aspects….being expertise in the working methodology of RSS as you have handled its beat in Reshimbag, Nagpur as well as Delhi.. You came in contact with High profile leaders of Bjp and Padadhikari of RSS…. Number of temptations, allurments from different organizations /high profile persons must have come in your way of profession, but you always remain untouched, you kept them at bay… You never fell prey to temptations at that time and still at the present also.. Because of this highest kind of integrity, rectitude and uprightness, ingrained in your soul and mind Mahalgi Probodhani invited You as resource person to deliver speech despite having known that RSS is anathema to you in some extent .. invitations from such highly reputed institution may be one of the highest kinds of appreciative acknowledgement of your true and pure journalistic career..

 • Pradeep Purandare….
  उत्तन… उत्तम! राष्ट्रवादी काँग्रेसचा अपवाद वगळता बाकी बहुतेक सर्व राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर मी जाऊन आलो आहे. माझा अनुभव असा आहे की आपण first impression आधारे मते बनवतो.तपशीलात गेल्यावर लक्षात येते की त्यांची भूमिका वेगळीच आहे. खरे सांगायचे तर पाण्याबाबत त्यांना भूमिकाच नाही. डावे उजवे दोघांचे गैरसमज समान आहेत. चर्चा झाली तर निदान भूमिका तरी ठरतील. त्या टोकदार झाल्यावर मग खरा संघर्ष होईल. त्यावेळी कोण काय भूमिका घेतो आणि कृती करतो हे महत्त्वाचे! अगदी दहशतवाद्यांबरोबर देखील चर्चेचे मार्ग कायम खुले ठेवण्यातच शहाणपणा आहे !!

 • Vinayak Sadashiv Sutar …
  उत्तम!

 • Charudatta Kahu
  सर,
  लेख आवडला.
  लिहिण्याची शैली देखील आवडली.
  भाजपामध्ये स्लो पॉयझिंनग असते. भगव्याच्या दिशेने ही वाटचाल नाही, असे आपण म्हणताहात्‌, म्हणजे तसा लेखाचा सूर आहे. पण त्या पक्षाविषयी, त्याच्या समर्थकांविषयी थोडासा का होईना सॉफ्ट कॉर्नर आलाच असावा.
  बाकी मजेत. कुलुहलापोटी मुद्दाम लेख तातडीने वाचून काढला.

  • धन्यवाद चारु !
   “भगव्याच्या दिशेने ही वाटचाल नाही” असं मी म्हटलेलं नाही आणि तसा माझा अव्यक्तही सूरही नाहीये मुळीच .
   त्यासंदर्भात काहीही बोलण्याची संधीच नाही निर्माण झाली त्या अभ्यासवर्गात ; त्यामुळे मी सायलेंट आहे त्या मुद्द्यावर .
   पक्षाविषयी सॉफ्ट कॉर्नरसुध्दा निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .
   ( केवळ भाजपच नाही तर सर्वच राजकीय पक्षातील काही मित्रांविषयी ममत्व आहे , हे मात्र खरं ! )
   असो .

   • Charudatta Kahu….
    खरंय सर, तशी गरजही नाही. प्रत्येकाचे राजकीय इन्क्लिनेशन असावेच असा आग्रह सुद्धा असू नये. तुमचा िंपड तर तसा नाही देखील. तुम्ही िंसहाच्या गुहेत जाऊन शिकार करता. हे धाडस प्रत्येकाला जमणे नाही. असो… मनात आलेले विचार फक्त मांडले.

 • Madhav Bhokarikar ….
  भाजपचे लोक राजकीय विरोधक आहेत; ते आपले शत्रू नाहीत. ——— खरंय ! लोकशाहीत श्रद्धा असणाऱ्यांनी ही भूमिका ठेवली तर, आपण आपसातील कटुता विसरून जाऊ असे म्हणणे अवघड आहे कारण सत्तेचा प्रश्न आहे, पण आपली कटुता थोडी निवळेल. आपल्यात असलेली विचारांची शक्ती व त्यातून निर्माण होणारी कृतीची जोड आपल्याला पुढील मार्गावरील टप्प्यावर घेऊन जाईल. आपल्या या निखळ द्वेषाच्या भावनेने आपण स्वतःच आपली प्रगती खुंटवून घेत आहोत.

  आपण आपल्या स्वतःच्याच विचारात वर सांगीतले की ‘भाजप आणि त्याच्या पितृसंस्थेचा समर्थक किंवा हितचिंतकही नाही.’ — आपली ही भूमिका आणि विचार हे या भाजप आणि त्याच्या पितृसंस्थेच्या विचारांच्या सर्वांना विदित असतांना देखील, त्यांनी आपल्याला येथे त्यांच्याकडे त्यांच्या कार्यक्रमांत अगत्याने बोलावणे पाठवले आणि आपण गेलात, मी तर मनापासून गेलात असे म्हणेन. आपले विचार मांडले, त्यांनी शांततेने ऐकून घेतले. स्वाभाविक आहे. यांत त्यांच्या बाजूने आपल्यातील अभ्यासाला, अनुभवाला आणि ज्ञानाला जशी आपल्यासाठी मान्यता आहे त्याच प्रमाणे आपण आपल्या आपल्या कृतीने भाजप आणि आणि त्याच्या पितृसंस्थेच्या गुणग्राहकतेला देखील मान्यता दिलेली आहे, अर्थात आपणांस आलेल्या आजवरच्या अनुभवावरूनच असेल ! भाजपच्या पितृसंस्थेच्या ठिकाणी लोकशाहीची बीजे आहेत, वटवृक्षाच्या बीजासारखी असतात दिसत नाही, वृक्षच आल्यावर दिसतो .

  हे मात्र नक्की की ‘आमदार, खासदार आणि राज्यकर्ते हे बऱ्याच वेळा नोकरशाहीला वचकून असतात’ हा अनुभव पूर्वी मी बऱ्याच वेळा घेतलेला आहे. अलीकडे या बाबतीत विशेष काम पडत नसलेने जाणवले नसेल पण माझे तर हे निदान आहे की ‘नोकरशाहीचा वचक वाढलेला असावा’ ! राज्यकर्ते जितके विचार आणि आचारांनी स्वच्छ असतील, जनतेत त्यांचा जितका ‘खरा’ दबदबा असेल, तितके ‘नोकरशहा’ त्यांना वचकून असतात. दिवसेंदिवस आपण वातावरण गढूळ करतोय, एकटी व्यक्ती किंवा संस्था कितपत पुरी पडणार ?

  लेख छान !

 • Surendra Deshpande ….
  छान वाचनिय

 • Sunil Joshi ….
  आवडलं विश्लेषण…

 • Vijaykumar Kale ….
  Changale, Mahiti Purn Tarihi Aapali Baju Thampane Lavun Thevalyabaddal Pravinji Abhinandan Tumachi Baju Uttam Prakare Samjun Sangitalt