भाजपला कौल की २००४ची पुनरावृत्ती ?

आमचा गेल्या ३५-३७ वर्षांचा घनिष्ठ स्नेही आणि डॉक्टर श्याम पितळे गेल्या अनेक वर्षापासून सकाळी सायकलिंग करत दररोज त्याच्या सख्ख्या एक-दोन मित्र किंवा नातेवाईकाकडे जातो. त्या घरातल्या आरोग्यविषयक किरकोळ तक्रारींचे निवारण करतो, गरज असेल त्याचा रक्तदाब बघतो, ज्या काही सूचना आवश्यक असतील त्या देतो, आवश्यकता असेल तर सुरु असलेल्या औषधांचे डोज बदलतो, औषधांची तजवीज करून पुढे निघतो. श्याम आला की अनेक विषयावर गप्पा होतात. परवाच्या आमच्या भेटीत त्याने विचारले, ‘निवडणुकीची नेमकी स्थिती काय आहे रे? ’तुझा फीडबॅक काय आहे? मी विचारले.

‘लोकांना बदल हवा आहे असा सूर आहे पण, बेसलाईन काय जाणवते तुला ते सांग कारण, सर्व सर्व्हे एकांगी वाटताहेत’, श्याम म्हणाला.

मी त्याला सांगितले ते असे – मतदारांचा कौल जाणून घेणा-या सर्व्हेचे एक बरे असते; प्रत्येकाचे थोडे-बहुत अंदाज तरी चूक-अचूक ठरतातच! हेच तथाकथित राजकीय आणि मध्यम तज्ज्ञांचेही!! म्हणून त्याकडे फार गंभीरपणे पाहण्याची गरज असतेच असे नाही. पाच राज्याच्या निवडणुकीच्या वेळी नाऊमेद झालेला काँग्रेस पक्ष आता जरा सावरल्यासारखा दिसत असला तरी एक मात्र निश्चित खरे, देशातील जनतेला काय वाटते यापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून हवे आहेत आणि देशातील उद्योगपतीच्या मोठ्या लॉबीला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून आणण्याची घाई झालेली आहे हे आता लपून राहिलेले नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारच्या प्रचंड भ्रष्टाचाराबद्दल जनतेत चीड आहे. त्यातच झालेल्या कंबरतोड महागाईने जनता गांजलेली आहे. त्याची प्रतिक्रिया दिल्ली विधान सभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला यश देऊन जनतेने व्यक्त केली पण , आम आदमी पक्षाचा फुगा ४९ दिवसातच फुटला. हा पक्ष काँग्रेसचीच मते खाणार आहे सिद्ध झाल्याने आणि त्याच वेळी अन्य चार राज्यात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला कौल देऊन जनतेने हवा कोणत्या दिशेने वाहात आहे हे दाखवून दिले आहे… हा ‘मोदीनुकूल’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच कार्पोरेट लॉबीचा आधार आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदार​ हे आता राष्ट्रीय स्वयंसेवक ​संघ आणि देशातील कॉर्पोरेट लॉबीला हवा आहे तसा कौल देतात की २००४ची पुनरावृत्ती करतात , हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

‘तुझा २००४च्या पुनरावृत्तीचा मुद्दा पुरेसा स्पष्ट केलेला नाहीयेस तू’, डॉ. श्याम पितळेने माझ्या उत्तरपत्रिकेतील चूक ध्यानात आणून दिली. त्यावर मी उत्तरलो, या आणि २००४ लोकसभा निवडणुकांमध्ये एक समान सूत्र आहे भारतीय जनता पक्षाकडून ‘इंडिया शायनिंग’चा जोरदार प्रचार होणा-या त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या मध्यावर ‘भाजपला स्वबळावर सत्ता मिळेल’, असा दावा वेंकय्या नायडू तसेच प्रमोद महाजन या नेत्यांनी केला आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी समाजातील धास्तावलेले अल्पसंख्यांक , अहिंदुत्ववादी सर्व घटक एकवटले, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला सत्तालाभ झाला. भाजपला स्वबळावर सत्ता मिळेल हे विधान अंगलट आले असे नंतर भाजपचे नेते प्रमोद महाजन यांनी खाजगीत मान्य केले होते हे अनेक पत्रकारांना आठवत असेलच. २०१४च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना उमा भारती, अमित शहा, प्रवीण तोगडीया , गिरीराज सिंह, सेनेचे रामदास कदम या आचरट तसेच राजकीयदृष्ट्या आतिरेकी नेत्यांनी अल्पसंख्यांक समाजाविरुद्ध केलेली भडक तसेच प्रक्षोभक वक्तव्ये अंगलट येऊ शकतात असे वाटल्यानेच बहुदा भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी त्या वक्तव्याशी असहमती दर्शवली असावी. ( अतिरेकी आणि आचरटेश्वरांच्या या यादीत अन्य पक्षांच्या बेनिप्रसाद वर्मा, आझम खान, यांचाही समावेश करायला हवा. हे साम्य २००४ आणि २०१४च्या च्या निवडणुकीतील एक योगायोग आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचे संकेत हे आता मत मोजणीनंतर कळणार आहेच.

डॉ. श्याम पितळे निघून गेला गेल्यावर मी या निवडणुकीची आणखी एखादे वैशिष्टये कोणती यावर विचार करू लागलो तेव्हा लक्षात आले – पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची नाव जाहीर करून गेले साडेचार-पाच महिने भाजपने देशभरात जोरदार वातावरण निर्मिती केली आहे . सुमारे साडे-चारशे सभा, चायपे-चर्चा, व्हिडीओ कॉन्फरन्स, मुलाखती आदी माध्यमातून नरेंद्र मोदी प्रकाशझोतात आहेत आणि प्रचाराची राळ उठवली गेली. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तोडीची हा प्रचार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने सत्ता प्राप्त केली तर या मोहिमेची नोंद एक सर्वोत्कृष्ट ‘मार्केटिंग कॅम्पेन’ म्हणून होईल यात शंकाच नाही.

या निवडणुकीचे एक प्रमुख वैशिष्टय म्हणजे देशातील दोन प्रमुख पक्ष; काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातील प्रस्थापित नेतृत्वाचा झालेला अस्त हे आहे . १२८ वर्षाची परंपरा असणारा काँग्रेस हा भारतातील सर्वात जुना पक्ष. अलीकडच्या काळात नरसिंहराव यांचा अपवाद वगळता या पक्षाचे नेतृत्व आणि चेहेरा आधी नेहेरू आणि नंतर गांधी घराणे हाच राहिला. स्वातंत्र्यानंतर या पक्षाचे आणि या पक्षाच्या केंद्रात आलेल्या सरकारचे नेतृत्व अबाधितपणे नेहेरू-गांधी कुटुंबाकडेच राहिले. सोनिया गांधी यांच्याकडे पक्ष नेतृत्व आणि मनमोहनसिंग यांच्याकडे सरकारचे नेतृत्व अशी विभागणी २००४नंतर आणि प्रथमच झाली. आता पक्षाची (आणि बहुमत मिळाल्यास सरकारचीही) सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे देण्याची प्रक्रिया सोनिया गांधी यांनी सुरु केली आहे . या निवडणुकीत बहुसंख्य उमेदवार निवड तसेच प्रचारात राहुल गांधी यांचा शब्द अंतिम ठरलेला आहे. कालपर्यंत पक्ष आणि सरकारच्या निर्णय प्रक्रियेत बुजुर्ग बाजूला फेकले गेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व गेली सुमारे चाळीस वर्ष अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे निर्विवादपणे होते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचा चेहेरा वाजपेयी आणि अडवाणी हेच होते. वाजपेयी-अडवाणी या जोडगोळीने लोकसभेत दोन सदस्य ते पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार असा भारतीय जनता पक्षाचा प्रवास अविश्रांत श्रम घेऊन घडवला. २००४ नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाजपेयी बाजूला झाले तर अडवाणी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोडीत काढत नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भाजपाला दिले आहे. (खरे तर संघाला या निवडणुकीत पोस्टरवर मोदीसोबत नितीन गडकरीही हवे होते पण, तो डाव अडवाणी गटाने उधळून लावला!) उमेदवार निश्चित करण्यात यावेळी मोदी, अमित शहा, गडकरी आणि राजनाथसिंह यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. आघाडीवरचे नेते बाजूला सरले (की सरकवले ?) आणि त्यांची जागा अरुण जेटली, राजनाथसिंह, नितीन गडकरी यांनी घेतली आहे. आता देशात तुरळक अपवाद वगळता भारतीय जनता पक्षाच्या पोस्टरवर वाजपेयी-अडवाणी यांच्याऐवजी नरेंद्र मोदी यांचीच छबी ठळकपणे दिसते आहे. भाजपात सध्या वर्चस्व आहे ते नरेंद्र मोदी आणि केवळ नरेंद्र मोदी यांचेच! पक्ष, पक्षाचा राजकीय विचार तसेच धोरण, उमेदवाराचे कर्तृत्व तसेच प्रतिमा असे मुद्दे अलीकडच्या निवडणुकात हळूहळू मागे पडत चालले आणि निवडणुका व्यक्तीकेंद्रित तसेच इव्हेंट होत चालल्या होत्या. देशाच्या राजकारणातील व्यक्ती केंद्रीकरणाची ही प्रक्रिया या लोकसभा निवडणुकीत पूर्ण झाली आहे. भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना तर काँग्रेसने राहुल गांधी यांना केवळ पोस्टरवरच जागा दिलेली नाही तर निर्णयाचेही सर्व अधिकार दिले आहेत. पक्ष तसेच पक्षातील अनुभवी नेत्यांना बाजूला सारून स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा उभारून प्रचाराची परंपरागत साधने मोडीत काढत, सोशल मिडिया, मिडिया प्लानिंग, अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच नेटवर्क, वॉर-रूम अशी नवे फंडे या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी वापरले. दोन्ही पक्षातील अनुभवी धेंडांकडून नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना जबर विरोध सहन करावा लागला, हेही या संदर्भात उल्लेखनीय आहे. पण, नरेंद्र मोदी यांना सहन करणे ही कार्यकर्ते तसेच नेत्यांची अगतिकता आहे तर गांधी घराण्याचे नेतृत्व असल्याशिवाय काँग्रेसचे बहुसंख्य उमेदवार विजयी होऊ शकत नाहीत त्यामुळे, राहुल गांधी यांना स्वीकारणे ही काँग्रेसची अपरिहार्यता आहे.

कोण जिंकणार आणि कोण हरणार हे आता हाकेच्या अंतरावर आहे कारण हा मजकूर प्रकाशित होईपर्यंत ९० टक्के मतदारांनी त्यांचा कौल दिलेला आहे . आता वाट आहे ती निकालाची !

संपर्क- ९८२२०५५७९९

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट