बावनकुळेंची मोहिनी,रावतेंचा षटकार,फडणवीसांचे बस्तान पक्के !

मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक / उत्तरार्ध

* विनोद तावडेंची पीछेहाट

* पंकजांवर दडपण नको!

* चंद्रकांत(दादा) अडकले प्रतिमेत

उर्जाखाते आणि या खात्याशी संबधित असणाऱ्या सर्वच विभागांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची अक्षरश: मोहिनी आहे. टोकाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आयुष्याशी वाटचाल झालेली आहे की आपणही थक्क व्हावे, हा अनुभव या माणसाने विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा लढवली तेव्हा घेतला आणि मी आचंबित झालो. पुनर्वसितांच्या संघर्षातून बावनकुळे यांचे नेतृत्व उभे राहिले. मंत्रीपद स्वीकारल्यावर या माणसातल्या कथित ‘ओबड-धोबड’ व्यक्तिमत्वावर एका वृत्तपत्रात बरीच टीका झाली पण, अधिकारी-कर्मचारी-लोक मात्र बावनकुळे यांच्या अभ्यासू, कष्टाळू, स्वच्छ, मल्टीटास्क वृत्तीवर खूष आहेत! असा माणूस उर्जा खात्याला याआधीच मिळायला हवा होता असे उर्जा खात्याशी संबधित खात्यात ‘बांद्यापासून चांद्यापर्यंत’ म्हटले जाते हे त्यांचे निर्भेळ यश आहे. ‘मला काम सांगा काय ते’ हा त्यांचा बाणा आहे अन त्याकामाच्या पूर्ततेआड लक्ष्मीदर्शन, पक्ष,गट किंवा ‘नितीन गडकरी निष्ठा’ येत नाही. गेल्या वीस वर्षात विजेचे दर कमी करणारा आणि १४०० मे.वं. अपारंपरिक उर्जा निर्मितीचे धोरण निश्चित करणारा हा पहिला उर्जा मंत्री आहे. दहापैकी साडेसात गुण देताना बावनकुळे ही प्रतिमा यापुढेही मुळीच मलीन होऊ नये उलट ती आणखी उजळण्याची उर्जा मिळो अशा शुभेच्छा द्यायला हव्यात.

मुख्यमंत्रीपदासाठीची ज्यांची दावेदारी का मागे पडली याचे गूढ अद्यापही उलगडले नसलेले विनोद तावडे यांच्यात चाणाक्षपणा ठासून भरलेला आहे. नेतृत्वाच्या स्पर्धेत सध्या मागे पडलेल्या तावडे यांचा कोकणातून आलेला एक नुकतीच मिसरूड फुटलेला कार्यकर्ता ते आता मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असा राजकीय प्रवास मी पाहिलेला आहे. विधिमंडळाच्या २००४च्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या काळात एकदा गप्पांच्या ओघात दूर उभ्या असलेल्या विनोद तावडेकडे बोट दाखवत गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, ‘भाजपचा हा भावी चेहेरा आहे,मुख्यमंत्री आहे तो भावी,नीट बघून घे!’ नंतर नागपूरच्या सिव्हील लाईन्समधील जवाहर सभागृहासमोर घोळक्यात उभ्या असलेल्या तावडेंना ‘काय भावी मुख्यमंत्री ‘म्हणून कचकचीत हाक मारली तेव्हा तावडेंचा चेहेरा कावरा-बावरा झाला, मग बाजूला घेऊन मुंडे यांनीच ही ‘तारीफ’ केली असल्याचे सांगितल्यावर तावडेंचा उजळलेला चेहेरा आजही माझ्यासमोर आहे… असो.

आपली दावेदारी पुरेशी प्रभावी पडत नाही हे लक्षात आल्यावर निवडणुकीच्या धुमाळीत तावडेंनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्याची खेळी करून पहिली पण, पक्ष सत्तेत आल्यावर अखेर शिक्षण खात्यावर समाधन मानले. त्यांच्या कामाचा प्रारंभच पदवी घोटाळ्याने झाला,त्यापाठोपाठ अग्निशमन यंत्राच्या खरेदीत अडकता-अडकता ते वाचले. नितीन गडकरी,देवेंद्र फडणवीस, मुनगंटीवार यांच्याप्रमाणेच सत्तेचे आकाश कवेत घेण्याची क्षमता तावडेंत आहे,वेळ आली तर सर्वपक्षीय मराठा लॉबीही त्यांना सहाय्य करु शकते पण…सध्या तरी दमानं घेण्याशिवाय दुसरा पर्याय तावडेंसमोर उरलेला नाही हेच खरे. ते त्यांनीही पुरते ओळखल्याचे दिसते आहे. परीक्षा,निकाल,नवा कायदा आणून खाजगी शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळणे,मराठी भाषेला आभिजात्यतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी उचलेले पाऊल अशी चांगली कामगिरी त्यांच्या खात्या जमा आहे. मंत्री म्हणून विनोद तावडे या वार्षिक कामगिरीच्या आधारे साडेसहा गुणांचे धनी आहेत.

सार्वजनिक बांधकाम आणि सहकार मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील हे केंद्रातील नेत्यांचे राज्यातील कारभारावर लक्ष ठेवणारे एका अर्थाने निरीक्षकही आहेत! विशेषत: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुसक्या शांतपणे आवळतांना सहकारातील खाचाखोचा चांगल्या अवगत असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. पण, ते तिथेच थांबल्यासारखे दिसताहेत ही त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षापूर्तीतील अडचण आहे. त्यांच्याकडून राज्यातील रस्त्यांच्या कामांवर गेल्या दीड-दोन दशकात किती निधी खर्च झाला आणि प्रत्यक्षात काम किती-कसे झाले याची याची झाडाझडती अपेक्षित होती. हे काम त्यांनी अतिशय आक्रमकपणे करत राज्यातील रस्त्यांच्या कामात वर्षानुवर्षे झालेल्या खाबुगिरीबाबत दाखवत कारवाईचा बडगा उभारायला हवा,अशी दररोज खड्ड्यातून प्रवास करत तीळ-तीळ आयुष्य झिजवणाऱ्या सामान्य माणसाची अपेक्षा होती. खाबूगिरी जर थांबली तर त्यांच्या खात्याला अनेक नवे प्रकल्प हाती घेता येतील शिवाय ‘दिल्लीचे निरीक्षक’ हे प्रतिमा पुसून राज्याचा नेता अशी नवी ओळख निर्माण करता आली असती.

चुकून-माकून देवेंद्र फडणवीस यांना पद गमवावे लागले तर पक्षश्रेष्ठींची पसंती चंद्रकांत पाटील असतील त्यामुळे त्यांना अधिक सक्रिय व्हावे लागेल. युती सरकारच्या काळात नेमके हेच खाते सांभाळताना नितीन गडकरी यांनी ‘गोपीनाथ मुंडे यांना पर्याय’ अशी स्वत:ची प्रतिमा राष्ट्रीय नेत्यांच्या मनात आणि स्वत:चे नेतृत्व राज्यात प्रस्थापित केले आहे हे चंद्रकांत पाटील यांनी विसरता कामा नये. भाजपाच्या राज्य नेतृत्वाची वाट ‘हीच’ आहे, हे त्यांनी वेळीच ओळखायला हवे. स्वच्छ प्रतिमा हे त्यांचे भांडवल आहे पण, या प्रतिमा जतनाच्या नादात निर्णय होत नसल्याची त्यांच्याच पक्षाच्या आमदारांची तक्रार आहे. एक वर्षाच्या कामगिरीबद्दल चंद्रकांत पाटील दहापैकी सहा गुणांचे दावेदार ठरतात.

शिवसेनेकडे काही खाती आहेत हे भलेही मुंबई-कोकणातील लोकांना कळत असेल. उर्वरीत महाराष्ट्रात मात्र सुभाष देसाई आणि दिवाकर रावते हे सेनेचे दोनच मंत्री मंत्रीमंडळात आहेत हे जाणवते. सुभाष देसाई उद्योग तर दिवाकर रावते परिवहन मंत्री आहेत. औद्योगिक विस्तार करण्यासाठी परदेशी गुंतवणूक आणण्यात स्वत: मुख्यमंत्रीच इतका मोठ्ठा रस घेत आहेत आणि धावाधाव करत आहेत की त्यांच्यासोबत प्रवास करताना सुभाष देसाईंची सॉलिड दमछाक होता असणार! ‘पी हळद,हो गोरी’ या म्हणीप्रमाणे या जोडगोळीच्या परदेश दौऱ्यांना आजच फळे लागलेली दिसणार नाहीत पण, त्यांचे प्रयत्न गंभीरपणे सुरु असल्याचे सकृतदर्शनी तरी वाटते आहे. नागपूरचा मिहान, औरंगाबादच्या डीएमआयसीच्या संदर्भात सुभाष देसाई प्रामाणिकपणे काम करताना दिसत आहेत. या प्रयत्नाची गती वाढवणे आवश्यक आहे. परदेशी गुंतवणूक मिळवणे आणि मंदीत औद्योगिक क्षेत्राला संजीवनी मिळवून देण्यासाठी वेळ लागणार असला,तरी सुभाष देसाई यांना साडेसहा गुण द्यायला हवेतच.

उद्धव ठाकरे यांच्या खालोखाल दिवाकर रावते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असणारे सेनेचे समकालातील एक नेते आहेत असे म्हटले तर त्यात आश्चर्य वाटायला नको. मराठवाडा,विशेषत: पश्चिम विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी रस्त्यावर उतरुन केलेली आंदोलने,काढलेल्या दिंड्या-मोर्चे,कार्यकर्त्यांची उभी केलेली फळी अशी अनेक कामे याला कारणीभूत आहेत. पूर्वीही मंत्री म्हणून त्यांनी छाप पाडली होती. यावेळी सुरुवात करतानाच त्यांनी कोणाच्या का असेना सांगण्यावरून महेश झगडेंसारख्या अधिकाऱ्याशी पंगा घेऊन प्रशासनात नाहक स्वत:ची प्रतिमा मलीन करून घेतली. मात्र मराठी येणारालाच ऑटोरिक्षा परवाने देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी षटकार मारला आहे. या सरकारचा सर्वार्थाने हा पहिला सुमारे चार लाख नवे रोजगार निर्मितीचा निर्णय असल्याने आणि मराठी बाणा अशा दोन्ही अर्थाने हा निर्णय महत्वाचा आहे. एसटी प्रवाशांचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा हाही रावते यांचा निर्णय मोलाचा आहे. शिवाय नवसंजीवनी प्राप्त करून देण्यासाठी एसटी महामंडळाचा आवळलेला घसा मोकळा करण्याची पाऊले उचलली गेली आहेत. एक वर्षाची कामगिरी लक्षात घेता दिवाकर रावते नक्कीच साडेसात गुणांचे दावेदार आहेत.

प्रत्येक मंत्र्याची दखल सविस्तरपणे घेणे कठीण आहे. पण राज्य मंत्री मंडळातील कोणीही नापास झालेले नाहीत. मात्र गिरीश महाजन,रामदास कदम , बबन(राव) लोणीकर असे काही मंत्री ‘ढकलपास’ झालेले आहेत हेही स्पष्टपणे नोंदवायला हवेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान आणि मुंबईत इंदू मिळची जागा डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळवणे या सामाजिक कार्यमंत्री बोडोले यांच्या कामगिरीला दाद द्यायलाच हवी.

एक महत्वाचे म्हणजे – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावरचे त्यांचे बस्तान दिवसे-न-दिवस बळकट करत चालले आहेत असे गेल्या आठवड्यात नमूद जे केले होते, त्याची प्रचीती लगेच मिळाली. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचे संघटन सचिव म्हणून ‘चाणक्या’ची भूमिका यशस्वीपणे बजावणाऱ्या ‘केडर’मधील श्रीकांत भारतीय यांना मुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून नियुक्त करत त्यांच्याकडे पक्ष आणि सरकार यांच्यात समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. याचा अर्थ पक्षातील खासदार,आमदार,अन्य नेते, कार्यकर्ते सरकारकडून काम करून घेण्यासाठी आता श्रीकांत भारतीय यांच्याकडे जातील… प्रदेशाध्यक्षांकडे त्यांना जावे लागणार नाही… म्हणजेच रावसाहेब दानवे यांचे पंख कापण्यात आलेले आहेत. या एका साध्या वाटणाऱ्या नियुक्तीने फडणवीस यांनी अनेक हेतू साध्य करून घेतले आहेत. (गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मराठा लॉबीने काही दशके आधी केली होती तशी) देवेंद्र फडणवीसांना राजकारणातला ‘बच्चा’ समजण्याची चूक महागात पडू शकते,हा समझनेवालों को दिया गया इशारा काफी है! आता गरज आहे ती मंत्रालयात ठाण मांडून बसण्याची,याचा विसर मुख्यमंत्री म्हणून देवेंद फडणवीस यांनी पडू देता कामा नयेच.

शेवटी- मंत्र्यांच्या प्रगती पुस्तकाचा पहिला भाग प्रकाशित झाल्यावर पंकजा मुंडे यांच्या असंख्य समर्थकांचे फोन आणि संदेश आले. ‘मुंडे साहेबांप्रमाणेच पंकजाताई मास लीडर आहेत’, असे त्यांचे म्हणणे होते. जनतेचा नेता हा काही मुंडे यांना हक्काने मिळालेला राजकीय वारसा नव्हता तर ते स्थान त्यांनी सुमारे चार दशके अथक परिश्रम करून मिळवलेले होते. सत्तेपासून वंचित राहिलेल्या समाजातील विविध जाती-धर्मांच्या असंख्य छोट्या घटकांना एकत्र आणत मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी मांडणी करण्यासाठी केलेली अविश्रांत श्रमयात्रा पाहिलेल्या पत्रकारांच्या पिढीतील मी एक आहे. हयात असते आज गोपीनाथ मुंडे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ऐटीत वावरले असते याची पूर्ण खात्री असणाऱ्यांपैकी मी एक आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी निर्माण केलेला नेतृत्वाचा मुकुट पंकजा मुंडे यांना ‘पितृ संचित’ म्हणून मिळाला आहे आणि भावनात्मक पातळीवर तो त्यांनी व्यवस्थित पेलला आहे असे आज तरी दिसते आहे. त्यासाठी त्यांना दहापैकी आठ-नऊ गुण देता येतीलही पण,भावनेचे राजकारण लाटेसारखे असते हा सर्वात मोठा धोका असतो याचा विसर पडणारे नेतृत्व लाटेसारखेच अल्पजीवी ठरत असल्याचा इतिहास आहे. भावनेच्या लाटेवरून उतरत गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पंकजा कसा पेलतात हे सिद्ध होण्यासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागेल. शिवाय कटू असले तरी,मंत्री म्हणून काम करताना पंकजा यांना ‘प्रथमग्रासे मक्षिकापाता’ला सामोरे जावे लागले आहे हेही नमूद करावेच लागणार आहे. ‘मी मास लीडर आहे, मेट्रो लीडर नाही’ असे विधान जेव्हा पंकजा मुंडे यांनी केले तेव्हा, त्यांना लिहिलेल्या जाहीर पत्रात रमेश पतंगे यांनी “भाजपाच्या नेतृत्वाची वाट संघ स्वयंसेवकांच्या मान्यतेच्या पथावरून जाते”, असे म्हटले होते त्याची आठवण करून देत मी पुढे म्हणतो, पंकजा यांच्या कामाच्या मूल्यमापनासाठी एक वर्षाचा कालावधी पुरेसा नाही. अर्थात,राजकीय पटावर आणि वास्तवाच्या कसोटीवर पंकजा मुंडे यांचे कर्तृत्व भविष्यात निश्चितच झळाळून उठेल असा विश्वास बाळगायला काहीच हरकत नाही! त्यासाठी त्यांना कायम अपेक्षांच्या दडपणाखाली ठेवण्याची गरज नाही.

(इच्छुकांनी अधिक माहितीसाठी पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या संघर्षयात्रेवर वाशिमचे पत्रकार सुनील मिसर यांच्या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना वाचावी.)

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९

संबंधित पोस्ट