मराठीच्या मंजुळ वातावरणासाठी…

मल्टीप्लेक्स चित्रपटगृह ही बदलत्या तंत्रज्ञान आणि आवडी-निवडीची गरज आहे. त्या व्यवसायातून इतर छोट्या-मोठ्या पूरक व्यवसायांना मिळणाऱ्या संधी ओळखून महाराष्ट्र सरकारने करात सूट देण्यापासून ते वाढीव एफएसआयपर्यंत अशा अनेक सवलती मल्टीप्लेक्स उभारणी करणारांना दिल्या. या सवलती देतांना मल्टीप्लेक्सनी ‘प्राईम टाईम’मध्ये वर्षातून किमान ३० दिवस मराठी चित्रपटांसाठी राखून ठेवण्याची अट २००१साली राज्यात तेव्हा सत्तारूढ असणाऱ्या (म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी) सरकारने टाकली होती. ती अट अर्थातच मल्टीप्लेक्सच्या मालकांनी आजवर कधीच पाळली नाही. मराठी चित्रपटासाठी कायम अत्यंत गैरसोयीच्या वेळा मल्टीप्लेक्सच्या मालकांकडून मिळत गेल्या. त्यामुळे मराठी चित्रपट उद्योग आणि प्रेक्षक अशा दोन्ही वर्गात मोठी नाराजी होती. हा ‘प्राईम टाईम’ मराठी चित्रपटांसाठी देण्यात येण्याच्या त्या अटींची अंमलबजावणी करावी असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी विधिमंडळात जाहीर करताच कायम मराठीला दुय्यम लेखणाऱ्या समाजाच्या एका गटात पोटशूळ उठला. हा वर्ग धड अभिजन नाही की इंग्रजी किंवा अन्य भाषां किंवा संस्कृतीचा मुलभूत अभ्यासक नाही, तर पंचतारांकित संस्कृतीत वावरण्याचे समाधान मानत ‘पेज थ्री’ वातावरणात वावरणारा आणि कोणत्याही एका भाषेत धडपणे न लिहू किंवा/आणि बोलू न शकणारा हिडगा वर्ग आहे. राज्य सरकारच्यावतीने मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट योग्य वेळेत दाखविण्याच्या अटींची आठवण विनोद तावडे यांनी करून देताच पोटात मळमळू लागलेला नेमका हाच वर्ग आहे. अनेकजण ज्यांचा उल्लेख कायम हयवदनी असा करतात त्या स्तंभलेखक शोभा डे यांचा या मळमळ झालेल्यात वरचा क्रम आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील आमीर खान आणि अन्य अनेकांचाही अशीच अवस्था झालेल्यांत समावेश आहे. याच वर्गातील शोभा डे यांनी हा निर्णय घेतल्याने सरकारचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस यांना ‘हुकुमशहा’ संबोधले आहे. “देवेंद्र ‘हुकुमशहा’ फडणवीस” असा तो उल्लेख आहे म्हणजे; देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांचे नाव गंगाधरराव नव्हे तर हुकुमशहा आहे असाच अत्यंत अपमानास्पद अर्थ त्याचा आहे! ‘मल्टीप्लेक्समध्ये यापुढे पॉपकॉर्न नव्हेत तर वडापाव आणि मिसळ खावी लागणार’, अशा शब्दात या मराठी खाद्य पदार्थांची हेटाळणी करत हे दोन पदार्थ ‘पेज थ्री’ संस्कृतीच्या प्रतिष्ठेचे तर नाहीतच नाही तर, ते माणसाने खाण्याच्या लायकीचे नाहीत असे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणूनच कायमच मराठीबद्दल बाष्कळ बडबड करणाऱ्या या ‘हिडग्यां’ना सुनावणे आवश्यक झालेले आहे.

मराठी भाषेची टवाळी हा या ‘पेज थ्री’ संस्कृतीचा स्थायी भाव असला तरी मराठी माणसांच्या असणाऱ्या आणि सर्व भाषकांना सन्मान देणाऱ्या राज्याच्या प्रमुखाला ‘हुकुमशहा’ संबोधने आणि त्या राज्याच्या खाद्य संस्कृतीत महत्वाचे स्थान असणाऱ्या पदार्थांची हेटाळणी हा पूर्ण मराठी अस्मिता-संस्कृती-संचिताचा अपमान आहे असे जर म्हटले गेले तर त्यात गैर मुळीच नाही. शोभा डे या जन्माने मराठी आहेत असे सांगितले जाते. इंग्रजी लेखक आणि स्तंभलेखक अशी त्यांची ख्याती आहे अशी त्यांची ओळख असल्याचे सांगितले जाते. पण, इंग्रजी साहित्यातले अभिजन तर सोडाच जाणकारही त्यांची गंभीर दाखल घेत नाहीत. सामाजिक भानाचा पूर्णपणे अभाव असणारे, मानवी मूल्य आणि माणुसकीबद्दल बांधिलकी नसणारे तसेच सामाजिक वास्तवाला थेट न भिडणारे ‘हिंग्लिश’ (म्हणजे हिंदी मिश्रित इंग्रजी) स्तंभलेखन करणाऱ्या अशी शोभा डे यांची प्रत्यक्षातली प्रतिमा आहे. हे स्तंभलेखन प्रामुख्याने ‘पेज थ्री’ संस्कृतीबद्दल चटपटीत शैलीत गॉसिप सदरात मोडणारे आहे. नातेधिष्टीत परंपरागत भावभावनांचा सन्मान तसेच कदर न करणाऱ्या बटबटीत संस्कृतीत वावरणाऱ्यापुरते ते लेखन मर्यादित असते. ‘पेज थ्री’ संस्कृती ही विविध जाती-धर्मातील काही श्रीमंत आणि नवश्रीमंत अशा उथळ लोकांचा संकर असतो. साहजिकच त्यामुळे त्यात अस्सल काहीच नसते. अशा काहीच अस्सल नसणाऱ्या हिडग्या वर्गाचे एक स्तंभलेखक म्हणून प्रतिनिधित्व शोभा डे करतात एवढेच त्यांचे त्या वर्गात महत्व आहे. एखाद्या राखी सावंत, पूजा पांडे (…अशा अनेक नट-नट्या) आणि शोभा डे यांच्यात काहीच फरक नसतो. काही तरी खळबळजनक लिहून, बोलून किंवा वागून किंवा वर्तन करून समाजाचे लक्ष वेधून घेणे हे या वर्गाचे वैशिष्टय असते आणि त्याला शोभा डे अपवाद नाहीत! फरक असला तर तो केवळ इंग्रजी आणि हिंग्लीश सफाईने लिहिता-बोलता येण्याचा आहे! लेखन प्रकाशित करणे माध्यमांनी बंद केल्यास पेज थ्री संस्कृतीत वावरणारा वर्ग शोभा डे सारख्यांना लगेच उचलून ‘डस्टबिन’मध्ये फेकून देईल. मराठीला खुजे लेखण्याची शोभा डे यांची ही काही पहिलीच वेळ नाही. आता तर मराठी टक्क्याला राजधानी मुंबईतही धोका निर्माण झालेला असताना शोभा डे यांच्यासारख्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करता कामा नये. नेहेमीप्रमाणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे असा कांगावा शोभा डे करतील आणि त्यांच्या त्या सुरात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करणारे अनेक ‘तथाकथित बुद्धिवंत’ सूर मिसळत सामूहिक रुदन करतील. पण या कांगाव्याला मराठी कोणीच बळी पडता कामा नये. मराठीला दुय्यम लेखणारी ही प्रवृत्ती ठेचूनच काढायला हवी.

याचा अर्थ, मराठी भाषा आणि संस्कृती रक्षण ही काही केवळ सरकारची जबाबदारी असे म्हणून गप्प बसून राहण्याच्या मराठी संकुचित वृत्तीचे आणि प्रत्येक मराठी उपक्रमाचे कोणा-न-कोणा मराठी माणसाकडूनच पाय ओढले जाण्याच्या कायमच हिरीरीने समोर येणाऱ्या प्रवृत्तीचेही समर्थन करता येणार नाही. कोणत्याही सरकारचे प्राधान्य कधीच ‘संस्कृती’ नव्हे तर ‘स्वसत्ता’ रक्षण हेच असते. भाषा आणि संस्कृती जपणे सरकारपेक्षा जास्त संपूर्ण समाजावर परंपरेने चालत आलेली जबाबदारी तसेच त्या प्रत्येक माणसाचे जन्मजात दायित्व असते. आपण मराठी बोलतो का, मराठी पुस्तके-वर्तमानपत्रे विकत घेतो का, मराठी वाचतो का, मराठी ऐकतो का, मराठी चित्रपट पाहतो-मराठी गाणी ऐकतो का… या प्रश्नांचे उत्तर संपूर्णपणे होकारार्थी येत नाही हे वास्तवातले विदारक चित्र आहे. आपण आपल्यातल्या ‘मराठीपणा’ला जपतो का हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाने स्वत:ला विचारायला हवा आणि त्याचे उत्तर होकारार्थी येण्यासाठी प्रयत्न करायला हवा. प्रत्येक मराठी माणसाकडून वर उल्लेख केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ज्या दिवशी होकारार्थी येईल त्या दिवशीपासून मराठीकडे डोळा तिरका करूनही पाहण्याची कोणाची हिम्मत होणार नाही.

एक चिनी कथा आहे – एक गाव असते. दर दोन वर्षानी भेट देण्याच्या प्रथेप्रमाणे त्या गावात एक चिनी संत पोहोचतो. ग्रामस्थ त्या संताभोवती जमा होतात. सद्वर्तन, सदविचार, नैतिकता आणि धर्माचरणाचा उपदेश तो संत करतो. तशा वर्तनाचे पालन गावात कसे इमाने-इतबारे होत आहे याची साक्ष गाव देतो आणि यापुढेही तशाच वर्तन आणि विचाराची ग्वाही दिली जाते. सभा संपता संपता ग्रामस्थ एक खंत सांगतात, “अन्य गावांच्या तुलनेत एक कमतरता मात्र आहे आमच्या गावात. आमच्या गावाने पक्ष्यांचे मंजुळ गाणेच ऐकू येत नाही”.

संत विचारात पडतो. दुसऱ्या दिवशीच्या उपदेशाप्रसंगी तोडगा सुचवण्याचे वचन देतो. दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांशी बोलताना संत सांगतो, “ मी दिवसभर संपूर्ण गाव फिरलो, घर न घर आणि संपूर्ण परिसर बघितला पण, गावात एकही झाड दिसलं नाही. झाड नसेल तर पक्षी येतील कसे? झाड असलं की ते बहरेल, त्याला फुले येतील, फळे येतील. फुलांतील मधुकंद आणि फळांसाठी पक्षी येतील. फुले-फळे बघून पक्षी आनंदित होतील आणि त्या फुलं-फळांचा आस्वाद घेण्यासाठी झाडांवर गर्दी करतील. तृप्त झाल्यावर त्याच झाडांवर बसून ते पक्षी गाणी गातील. त्यांच्या मंजुळ स्वराने हे गाव उजळून निघेल. म्हणून प्रत्येकाने अंगणात झाडे लावावीत”, असे सांगून तो संत प्रयाण करतो.

नंतर दोन वर्षानी तो संत त्या गावात येतो तेव्हा ग्रामस्थ सांगतात, “आता आमच्या गावात पक्ष्यांचे गाणे ऐकू येवू लागले आहे.
संत सांगतो, “आणखी दोन वर्ष थांबा हे वृक्ष मोठे झाले की तुमचे क्षितिजही पक्ष्यांच्या गाण्यांनी सुरेल झालेले असेल”.

आपण मराठी भाषा आणि संस्काराचे झाड आधी आपल्या मनात लावायला हवे. आपल्या घरात त्याचा बहर आपसूक येईल. घरा-घरातला मराठी भाषा आणि संस्कृतीचा हा बहर सर्वत्र लख्ख पसरायला मग वेळ लागणार नाही….

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
[email protected]

संबंधित पोस्ट

 • Sunil Barge

  छानच लिहील आहे

 • Uday Kulkarni

  औरंगाबादला असतो तर तुम्हाला प्रेमपूर्वक मिठी मारली असती. या भंपक स्त्रीबद्दल लिहिलेले योग्य. मात्र सेनेला निषेध कसा करावा ते माहीत नसल्याने विनाकारण या स्त्रीला भाव मिळतो. जे तुम्ही लिहिले तेच इंग्लिशमध्ये, सोशल मिडियातून त्यांनी लिहावयास हवे होते.
  सोनम कपूरने तिला तिची जागा दाखवली होती.

 • Awdhoot Parelkar ….कधी लावणार हे झाड साहेब.
  अख्खा पांढरपेशा समाज, त्यांची मुले, नातवंडे आज अमराठी भाषेत शिकताहेत.
  त्यांचा वाङ्गमयीन परिसर, सांस्कृतिक वैचारिक पर्यावरणही त्याच भाषेत आहे.
  आता हे झाड लावणार कधी? कसे? आणि त्याचा वेल बहरणार कधी?

  आपण फक्त ” अमृताते पैजा जिंकी …” चा गजर चालू ठेवायचा. … आणि तुताऱ्या फुंकायच्या.

 • Nishikant Bhalerao…
  kahi mudde yogya aahet, me de yancha virodhak aahe aani tyani aacharatpana kela he manya pan hakkabhang aanne jara jast hotey..

 • Bipin Rajan Kulkarni …
  Fantastic one…may I share it with due credits?

 • Ravi Bapat …हिडगा वर्ग । वाह् वाह् काय छान शब्द ।।

 • Hemant Gharote …Shobha De nehmi pramane kahitari sawang [cheap] aslech vidhana kartat, marathi films karata multiplex chi sakti ha aapla purna adhikar aahe tyabaddal ya blog var aapan je lihle aahe te ekdam yogyach aahe.

 • Shrikant Borwankar ·…
  आपण मराठी भाषा आणि संस्काराचे झाड आधी आपल्या मनात लावायला हवे. आपल्या घरात त्याचा बहर आपसूक येईल. घरा-घरातला मराठी भाषा आणि संस्कृतीचा हा बहर सर्वत्र लख्ख पसरायला मग वेळ लागणार नाही….

 • Prashant Bhau …एका softporn लिहिणाऱ्या बाइला फार महत्व देऊ नयें

 • Dnyandeo Shelar bare zhale kan tochale

 • Vivek Ghanekar…
  SHOBHA DAY :-
  I can talk English, I can walk English, because English is my masters language and I am “HIS MASTERS VOICE”
  I am Marathi by origin but hate it. , I am Bengali by Surname but still , I hate it. I love only ENGLISH, ENGLISH, ENGLISH.
  Thank you.

 • Bhavna Pradhan…
  Shobha De maherachya Rajadhyaksh! Batate vade,bonbil,bangade khavun vadhalya.Aata neorich zalyavar Marathi bhasha,sahtya,marathi cinema yachi tya kucheshta karat aahet.Aamhi te sahan karanar nah

 • Shrikant Borwankar ·…आपण मराठी भाषा आणि संस्काराचे झाड आधी आपल्या मनात लावायला हवे. आपल्या घरात त्याचा बहर आपसूक येईल. घरा-घरातला मराठी भाषा आणि संस्कृतीचा हा बहर सर्वत्र लख्ख पसरायला मग वेळ लागणार नाही….
  4 hrs · Like

 • Shrikant Umrikar…
  तुम्ही सभ्य असल्याने “हिंडगा” असा शब्द वापरला. माझ्या माहितीप्रमाणे ग्रामीण भागात पुरुषत्व नसणाऱ्या हांडगा म्हटले जाते. कुठलीच भाषा धड न येणाऱ्या या लोकांना भाषा आणि संस्कृती च्या बाबत मी हांडगा आशी शिवीच देतो.

  • Supriya Sarkar

   मराठीबद्दल बाष्कळ बडबड करणाऱ्या या ‘हिडग्यां’ना सुनावणे आवश्यक झालेले आहे.

   ‘हिंदाग्याना’ हा शब्द प्रयोग असभ्य आणि अप्रस्तुत आहे !!! कारण त्यांच्या ‘हिंद्ग्या ‘ असण्याचा आणि त्यांना मराठी दुय्यम वाटण्याचा संबंधाच काय ??

   • =प्रत्येकाचा प्रतिवादाचा शिवाय त्याला स्वत:चे एक मत असण्याचा अधिकार मान्य असणाऱ्या पंथातला मी एक संपादक आहे . त्यामुळे आपली प्रतिक्रिया आवर्जून समाविष्ट करत आहे .
    = मी लेखात कोणाचेच ‘पुरुषत्व’ कुठेच काढलेले नाही ; किंबहुना हा शब्दही माझ्या लेखात नाहीये . = मराठीत अभिनेविशाशिवाय बरंच काही आहे यावर माझा ठाम विश्वास आहे .
    = सुमारे साडेतीन वर्षापेक्षा काळात पत्रकारितेच्या काळात विधिमंडळ आणि संसदेचे वृत्तसंकलन वीस पेक्षा जास्त वर्ष केल्यावर ‘हिडगा’ हा शब्द असांसदीय नाहे हे नक्की सांगू शकतो .
    (= बाय द वे ,या लेखात एक उल्लेख अवमानकारक आहे पण, मी पत्नीच्या सहमतीने तो जाणूनबुजून केला आहे आणि तो अद्याप तरी कोणाच्या लक्षात आलेला नाहीये …)

 • Nilesh Kamalkishor Heda … i am sorry but, you are taking it otherwise.

  • एक खरे , मी २६ वर्ष विदर्भात पत्रकारिता केली आणि जे काही आस्मादिक आज लेखक-पत्रकार म्हणून आहेत त्यात विदर्भाचा वाटा मोठा आहे . मी तर आता औरंगाबादला स्थायिक झालेलो आहे . माझ्यात प्रादेशिक भावनेची मुळे आजवर कधीच रोवलीच गेली नाहीत . मी हे लिहिले ते मराठीची जी हेटाळण त्यांनी केली त्यामुळे…

 • Umakant Pawaskar ….
  Sir, with due respect, I do not agree with you this time.

 • Aparnarani Vichore… tine tyaa arthane naahi mhantle but, ti ek swatah la atishahaani samajnaari bai aahe. tyatun CM Vidarbhaa che .

 • Satish Kulkarni… प्रवीणजी छान झाले आहे आपले आपल्या मराठी भाषेवरचे प्रेम यातून दिसते. मला नेहमी एक प्रश्न पडतो की मी जेव्हा जेव्हा मराठी कलाकारांच्या मुलाखती पाहतो तेव्हा तेव्हा बहुतांशी मराठी कलाकार एकही वाक्य संपूर्ण मराठीत बोलू शकत नाहीत त्यांना इंग्रजी भाषेचा आधार घ्यावा लागतोच हेही तेवढेच क्लेशदायक आहे

 • Supriya Sarkar

  ‘पुरुषत्व’आणि ‘भाषा ‘ किंवा ‘संस्कृती ‘ ह्यांचा संबंधच काय !!
  शोभा डे ह्यांच्या विधाना पेक्षा हा बालिश आणि बाष्कळ लेख आहे …
  नुसता अभिनिवेश सोडला तर मराठीत इतर बरेच काही नाही आणि ह्या लेहात तर अजिबातच नाही

  • =प्रत्येकाचा प्रतिवादाचा शिवाय त्याला स्वत:चे एक मत असण्याचा अधिकार मान्य असणाऱ्या पंथातला मी एक संपादक आहे . त्यामुळे आपली प्रतिक्रिया आवर्जून समाविष्ट करत आहे .
   = मी लेखात कोणाचेच ‘पुरुषत्व’ कुठेच काढलेले नाही ; किंबहुना हा शब्दही माझ्या लेखात नाहीये . = मराठीत अभिनेविशाशिवाय बरंच काही आहे यावर माझा ठाम विश्वास आहे .
   = सुमारे साडेतीन वर्षापेक्षा काळात पत्रकारितेच्या काळात विधिमंडळ आणि संसदेचे वृत्तसंकलन वीस पेक्षा जास्त वर्ष केल्यावर ‘हिडगा’ हा शब्द असांसदीय नाहे हे नक्की सांगू शकतो .
   (= बाय द वे ,या लेखात एक उल्लेख अवमानकारक आहे पण, मी पत्नीच्या सहमतीने तो जाणूनबुजून केला आहे आणि तो अद्याप तरी कोणाच्या लक्षात आलेला नाहीये …)