‘महाधिवक्ता’ श्रीहरी अणे !

अणे या आडनावामुळे वकील असणाऱ्या श्रीहरी अणे विषयी उत्सुकता निर्माण झाली. नागपूरच्या पत्रकारितेत मी डेरा टाकून जम बसवेपर्यंत निष्णात ‘कॉन्सटीट्युशनल लॉयर’ म्हणून श्रीहरी यांचं नाव झालेलं होतं. तळागाळातल्या, वंचित समाजाच्या समस्या मांडणाऱ्या विविध जनहित याचिका (स्वखर्चाने) लढवणारा आणि त्यातही महत्वाचं म्हणजे कट्टर विदर्भवादी वकील म्हणूनही श्रीहरी यांची प्रतिमा उजळ झालेली होती. या मागणीसाठी एक संघटनाही त्यांनी स्थापन केलेली होती. या प्रतिमेनेच आकर्षित होऊन एक दिवस रीतसर वेळ मागून घेऊन या वकिलाला भेटायला गेलो. असं जबर प्रोफाईल असणाऱ्या माणसाशी पत्रकाराची ओळख असायलाच हवी, या व्यावसायिक भावनेतून.

रवीनगर चौकातील एका बहुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावरच्या प्रशस्त कार्यालयात श्रीहरी अणे यांची भेट झाली. मी गेलो तेव्हा जुन्या ब्रिटीश शैलीतील, चार पायाऐवजी अर्धगोलाकार असणाऱ्या, झुलणाऱ्या ऐटबाज खुर्चीत डुलत-डुलत श्रीहरी अणे सांगत असलेला मजकूर लघुलेखक लिहून घेत होता. सुबोध धर्माधिकारी आणि अविनाश गुप्ता या नागपूर-विदर्भातील बड्या वकिलांचा मित्र असलेला पत्रकार, अशी माझी तोपर्यंत न्यायालयीन कामकाजाचे वृत्तसंकलन करणाऱ्या बीटमध्ये ओळख निर्माण झालेली होती. श्रीहरीशी पहिल्याचा भेटीत भरपूर गप्पा झाल्या आणि गप्पा मारतांना आम्ही एकमेकाशी एकेरीवर केव्हा आलो हे कळलंच नाही. श्रीहरीशी सूर जुळायला फार काही वेळ लागला नाही. दाढीपासून ते राहणीमान आणि अनेक आवडी-निवडी आमच्यात साधारणपणे समान होत्या. दोघानांही राजकारण आणि राजकारण्यांविषयी आकर्षण होतं, वर्तन आणि विचारात कोणताही टोकाचा एकारलेपणा नव्हता. मग आमच्या नियमित भेटी–गाठी होऊ लागल्या. नंतरच्या काळात लोकसत्ताची नागपूर आवृत्ती सुरु झाली. आमचं कार्यालय नेमकं रवीनगर चौकातच पहिल्या मजल्यावर होतं. हे कमी की काय म्हणून, मी जिथे बसत असे त्या डाव्या हाताला एक खिडकी होती. त्या खिडकीतून रस्त्यापलीकडे असणाऱ्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर श्रीहरीच्या केबिनची खिडकी होती. असे समोरासमोर आल्यावर आमच्यातला संपर्क आणखी वाढला.

त्या काळात नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनमध्ये व्ही. आर. मनोहर आणि अरविंद बोबडे यांचे तुल्यबळ गट होते. या दोघांनीही राज्याचं महाधिवक्तापद भूषविलेलं. या दोन्ही गोटात नसलेल्यांचा एक तिसरा गट श्रीहरी अणे याने जमा केला, अनेकांना बांधून ठेवलं. याच बळावर श्रीहरीनं एका एका अटीतटीच्या निवडणुकीत मनोहर-बोबडे गटांना ‘मान्य’ असणारा उमेदवार म्हणून चक्क नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनचं अध्यक्षपदही पटकावलं. श्रीहरी बारचा अध्यक्ष असताना न्या.अशोक देसाई यांच्याशी झालेल्या कसल्याशा वादातून मनोहर आणि अणे गट एकत्र होते. या दोन्ही गटांच्या वकिलांनी न्या. देसाई यांच्या न्यायालयावरही बहिष्कार टाकलेला होता. त्यामुळे न्यायालयीन कामकाजाच्या व्यतिरिक्त ‘चमचमीत’ बातम्या मिळत असल्याने माझी दररोज हायकोर्टाच्या बाररूम आणि परिसरात एक चक्कर असेच. या वादा दरम्यानच एका बातमीवरून मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एम. एल. पेंडसे, ‘लोकसत्ता’चे तत्कालिन संपादक अरुण टिकेकर आणि माझ्या विरुद्ध न्या. देसाई यांनी ‘सु-मोटो क्रिमिनल कन्टेप्ट’ दाखल केल्याने गहजब माजला कारण, अशा प्रकारची आपल्या देशातील ही पहिलीच घटना होती. त्या दिवसांबद्दल ‘दिवस असे की…’ या पुस्तकात (प्रकाशक ग्रंथाली, पान क्रमांक ३२ ते ३९) मी विस्तारानं लिहिलं आहे. या सुरु असलेल्या ‘धुमश्चक्री’मुळे श्रीहरी आणि मी आणखी जवळ आलो. ‘या’ बारमधले ते दिवस एक पत्रकार म्हणून विविधांगी अनुभवांनी समृद्ध करणारे तसेच आकलनाच्या कक्षा विस्तारणारे होते.

कंगव्याच्या शिस्तीला न जुमानणारे डोईवरचे केस, किंचित ठेंगणी शरीरयष्टी असलेल्या श्रीहरीचं वागणं गर्भश्रीमंत आदबशीर. राहणी नीट-नेटकी. स्वथोरवी न गाता तो समोरच्याला शांतपणे हिआरिंग दिल्यावर एक मोठ्ठा पॉझ घेऊन किंचित वरच्या पट्टीत संथपणे हव्या त्या शब्दावर जोर आणि सलगीचं हलकसं स्माईल देत स्वत:चं म्हणणं मांडण्याची श्रीहरीची पद्धत. ही मांडणी समोरच्याला ‘कन्व्हिन्स’ करणाऱ्या वळणाची, भाषा मराठी असो की इंग्रजी, कुठेही आभिजात्य वाटेवरून घसरणार नाही, त्याच्या व्यक्तिमत्वाची मिठ्ठास वाढवणाऱ्या या शैलीने पाहिल्याच भेटीत तो समोरच्याला आपलंसं करून टाकतो. त्याच्या चेम्बरमध्ये असो की, तेव्हा अस्तिव क्षीण झालेल्या आणि काहीशा टिंगलटवाळीचा विषय ठरलेल्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे व्यासपीठ असो, अत्यंत गंभीर मुद्रेने, संयमाचा अंत न होऊ देता श्रीहरी आधी ऐकणार आणि मग बोलणार. साधारण १९८५ नंतर ते २००० पर्यंत वेगळ्या विदर्भाची चळवळ राजकीय आघाडीवर थंडावल्या सारखीच होती कारण, नेतृत्व नाही आणि राजकारण्यांनी गाजराच्या पुंगीसारखा, मतापुरता या मागणीचा वापर केलेला. खुली अर्थ व्यवस्था आणि जागतिकीकरणाचे दरवाजे किलकिले झाल्यावर काही काळ यामागणीचा विसर पडल्यासारखं वातावरण निर्माण झालेलं आणि प्रत्यक्षात विकासाचा प्रश्न आणखी आक्राळविक्राळ झालेला. एकेक सहकारी निवडत, एकेक गाव पादाक्रांत करत आणि एकेक संस्था पटवत श्रीहरीने अनेकांना सोबत घेत वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पुन्हा बाळसं मिळवून दिलं. दरम्यानच्या काळात श्रीहरी खरं तर, मुंबईला शिफ्ट झाला पण, अविश्रांत प्रवास करत या मागणीसाठी त्याने अलिकडेच विदर्भातील एकेक तालुका पिंजून काढला, तालुक्याच्या बारध्ये जाऊन नव्या पिढीच्या वकिलांना वेगळ्या विदर्भाची मागणी पटवून दिली. श्रीहरी आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी राजकीय पातळीवर वेगळ्या विदर्भाचा मागणीला केवळ धुगधुगीच प्राप्त करून दिली नाही तर राजकीय पक्षांना हा मुदा अग्रक्रमावर घ्यायला लावला.

श्रीहरी आणि माझ्यातला मतभेदाचा मुद्दा हाच आहे. विकासाचा अनुशेष आहेच आणि त्याला आपलं राजकीय नेतृत्व जबाबदार आहे हा माझा युक्तिवाद असायचा/आहे. तर, वकिलीचा काळा कोट उतरवला की श्रीहरी विदर्भवादी आणि छोट्या राज्यांचा आक्रमक समर्थक ! अलिकडे एक काळ असा आला की नागपुरात ज्येष्ठांपैकी मी एकमेव संपादक संयुक्त महाराष्ट्रवादी उरलो, अगदी कार्यालयातही मी अल्पमतात होतो ! दत्ता मेघे आणि बनवारीलाल पुरोहित तर कार्यक्रम आणि विषय कोणताही असो मी समोर श्रोत्यात दिसलो तरी व्यासपीठावरुन माझ्या वेगळ्या विदर्भ विरोधावर माझं नाव घेऊन घसरणारच! श्रीहरीला मात्र मी असं घसरताना कधीच अनुभवलं नाही. हे केवळ माझ्याच बाबतीत नाही तर, अन्य कोणाही बाबत घसरणं किंवा विरोधी भूमिका घेणाऱ्याबद्दल अनुदार होण्याचा त्याचा स्वभावच नाही. म्हणूनच, आमच्यातल्या मैत्रीत मतभेदाच्या एकमेव मुद्द्याचा कधी उल्लेखही निघत नाही त्यामुळे, आमचे मैत्री जसं लोभस तसंच प्रगल्भ आहे.

अशात औरंगाबादला स्थायिक झाल्यावर मराठवाड्यात फिरताना पुन्हा एकदा लक्षात आलं की, विकासाच्या आघाडीवर विदर्भापेक्षा मराठवाड्याची स्थिती खूप जास्त गंभीर आहे.एकदा बोलताना हे मी श्रीहरीला सांगितलं तर तो म्हणाला, ‘खरंय तू म्हणतोस ते. विदर्भ आणि मराठवाड्याने एकत्र येऊन त्यासाठी लढा उभारायला हवा.
मी म्हटलं, ‘पण, मराठवाड्याला वेगळं नाही व्हायचं महाराष्ट्रातून’.
त्यावर श्रीहरी म्हणाला, ‘विकासाच्या मुद्द्यावर तर एकत्र येऊ यात. मी घेतो पुढाकार. तू निमंत्रितांची यादी तर तयार कर’.
-दरम्यान तो राज्याचा महाधिवक्ताच झाल्यानं ही मोहीम रेंगाळणार आता.

समज, संयम आणि औदार्य यांचा एक पक्व मिलाफ श्रीहरीच्या स्वभावात आहे, येणाऱ्या अनुभवांना डोळसपणे सामोरं जाण्याच्या स्वभावातून हा मिलाफ घडून आला असावा. ते काही असो, हा मिलाफ हे त्याचं बलस्थान आहे असं माझं ठाम मत आहे. त्यामुळेच तेलंगाना राज्य निर्मितीनंतर वेगळ्या विदर्भाच्या चळवळीला विश्वासार्हता, लोकमान्यता आणि मग यश मिळवण्यासाठी श्रीहरी अणे सारखा नेता हवा आणि त्याने के. चंद्रशेखर राव-‘केसीआर’ सारखं स्वत:ला झोकून द्यायला हवं असं मी लिहिलं तेव्हा अनेकांना धक्काच बसला. माझं ते मत आजही कायम आहे. एक मात्र खरं, श्रीहरीची एकदा एखादी धारणा झाली की ती बदलणं कठीण असतं, उदाहरणार्थ सर्वांगीण विकासासाठी लहान राज्य योग्य आहेत म्हणून विदर्भ वेगळा हवाच!

नागपूर, मुंबई, औरंगाबाद, दिल्ली अशा अनेक ठिकाणी कायदेतज्ज्ञ आणि एक माणूस म्हणून श्रीहरीला वावरताना बघायला मिळालं. एकदा का काळा डगला घातला की, श्रीहरीतला वेगळ्या विदर्भाचं समर्थन करणारा प्रादेशिकवाद गळून पडतो. त्या भूमिकेत तो अशीलांचं हित जपणारा वकीलच असतो. त्यामुळेच सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचं असो, विशेष अधिवक्ता म्हणून आपलं हितरक्षण श्रीहरी अणेच करू शकतात या समजाला कधीही तडा जात नाही. बाळासाहेब ठाकरे ते छगन भुजबळ असा त्याचा अशीलांचा मोठा टप्पा आहे, तो यामुळेच. कायदा हे त्याचे व्रत आहे आणि वेगळा विदर्भ ही त्याची गरज आहे. व्रत आणि गरज त्यात सरमिसळ होऊन संभ्रम निर्माण न होऊ देण्याची त्याची वृत्ती कायम तेवती आहे. त्यामुळेच राज्याचा अधिवक्ता म्हणून श्रीहरी अणेकडे विदर्भवादी चष्म्यातून पाहणे चूक ठरणार आहे.

महाधिवक्ता ही नियुक्ती राजकीय असते आणि ते पद काटेरी असतं. कोणतंही सरकार हे एका (किंवा जास्त) राजकीय पक्षाचे असतं आणि त्या पक्षीय धोरणांना सरकारसाठी कायद्याच्या चौकटीत बसवण्याची अवघड जबाबदारी या पदावर असते. त्यासाठी जशी वैयक्तीक धारणांना मुरड घालावी लागते तसंच सरकारचा राजकीय विचार आणि समाजहित हे घटनेच्या आड येणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं. आधीच्या सरकारनं घेतलेल्या काही भूमिका बदलताना, काही निर्णयाची वकिली नव्या सरकारच्या धोरणानूकुल करताना श्रीहरीचा कस लागणार आहे. धार्मिक आणि जातीय आरक्षण, प्रादेशिक विकासाचा अनुशेष, कुपोषण तसेच अनेकांचे आर्थिक हितसंबध दुखावणारे विषय त्याला महाधिवक्ता म्हणून हाताळावे लागणार आहेत. ते काहीही असो, कायद्याचा दिवा तेवत ठेवण्याची जबाबदारी श्रीहरी अतिशय काळजीपूर्वक पेलेल असा विश्वास आहे, त्यासाठी त्याला मन:पूर्वक शुभेच्छा.

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९

संबंधित पोस्ट