‘माध्यम’चं वेगळेपण आणि ‘आमादमी विदाऊट पार्टी’

सकारात्मक, विधायक काही घडत नाही, शहरी आणि त्यातही प्रामुख्यानं, मध्यमवर्गीयांची संवेदनशीलता हरवत चालली आहे, नमस्कार करावा अशी पाऊलेच दिसत नाहीत, आजची तरुण पिढी चंगळवादी झालीये, वाचन संस्कृती लोप पावते आहे… वगैरे खंत नेहेमीच कानावर पडते. प्रत्यक्षात शंभर टक्के तसं काहीच नसतं, नाहीच. समाजात खूप काही चांगलं घडत असतं पण, ते माहित नसल्यानं ही ‘लोकप्रिय’ किरकिर होत असावी. लोकही ही किरकिर एका कानानं ऐकतात आणि दुसऱ्या कानातून सोडून देतात!

‘गेल्या तीस वर्षापुर्वीचे लोक व त्यांच्या समजुती अथवा माझे प्रवासाची हकिकत (रोजनिशी)’ असं रेल्वेगाडीसारखं लांबलचक शीर्षक असलेलं गोविंद बाबाजी जोशी या लेखकाचं पुस्तक नुकतंच भेटीला आलं. मूळ पुस्तक १८९६ साली प्रकाशित झालेलं आणि सध्या अर्थातच दुर्मिळ होतं. महत्प्रयासे शोधून काढून ‘माध्यम प्रकाशन’ या मुंबईच्या प्रकाशकानं ते पुन्हा प्रकाशित केलंय. महत्वाचं म्हणजे, या पुस्तकाच्या ५०० प्रती राज्यातील ग्रंथालयांना नि:शुल्क वितरीत केल्या आहेत! गोविंद बाबाजी जोशी यांनी १८६० नंतर भारतात सुमारे एक तप आणि तीन हजार मैल केलेल्या प्रवासाची हकिकत म्हणजे हे पुस्तक आहे. पाच मैल म्हणजे आठ कि.मी. असा आजच्या हिशेबानं हा एकूण प्रवास आहे. हा प्रवास घडला तेव्हा प्रवासाची साधनं किती अपुरी होती हे वेगळं सांगायला नको. त्या काळात गोविंद बाबाजी जोशी यांनी रेल्वे आणि बैलगाडीनं २२४१, जलमार्गानं २५७, घोड्यावर बसून १९१ आणि पायी १९० मैल प्रवास करताना लिहिलेली रोजनिशी म्हणजे हे पुस्तक आहे. तत्कालिन सामाजिक जीवन आणि देशाची स्थिती समजून घेण्यासाठी हे पुस्तक फारच उपयुक्त आहे. शैली आजच्या भाषेपेक्षा पूर्णपणे अपरिचित पण, रसाळ आणि गुंगवणारी आहे. त्यातून सुमारे दीडशे वर्षापूर्वी मराठी भाषेचा बाज कसा होता, हेही समजतं; आज साठीच्या उंबरठ्यावर किंवा साठीपार असलेल्या लोकांना नष्ट झालेले अनेक मराठी शब्द या पुस्तकात भेटतील आणि ‘हरवलं ते सापडल्याचा’ आनंद मिळेल. वाचकांच्या या पिढीला, ही रोजनिशी वाचताना कालौघात स्मृतीआड झालेल्या मराठी शब्दांच्या गतकातर आठवणीत रमण्याची संधीही नक्की मिळेल. पण ते असो, कारण या पुस्तकावर लिहिण्याचं प्रयोजन नाहीये.

ग्रंथालय शास्त्राचा विद्यार्थी असल्यानं हे पुस्तक आणि त्याची महत्ती ठाऊक होती. विद्यापीठाच्या ग्रंथालयात तेव्हा हे पुस्तक पाहिल्याचंच नाही तर, उत्सुकतेनं वाचल्याची पुसटशी आणि काहीच लक्षात न राहिल्याची स्पष्ट आठवण आहे. पण, माध्यम प्रकाशनाला इतकं दुर्मिळ आणि महत्वाचं हे पुस्तक का प्रकाशित करावं, मोफत वितरीत का करावं, हे काही कळेना. पुस्तकाच्या प्रस्तावनेतून आणि नंतर उन्मेष अमृते व अमित जठार यांच्याशी बोलल्यावर या प्रकाशनाचं वेगळेपण कळलं. चित्रपट व मालिका लेखक आणि दिग्दर्शक उन्मेष अमृते, आयटी क्षेत्रातील अमित जठार. जनसंपर्क क्षेत्रातील एका परदेशी कंपनीत राजकीय शाखेतील तज्ज्ञ गिरीश ढोके, अॅडव्होकेट असलेले विनायक मुणगेकर, शिक्षण क्षेत्रातले राजेंद्र जोशी, सिव्हील इंजिनीअर असलेले गिरीश गव्हाणे आणि कॅाल सेंटर संचालक सुशांत पोळ असा हा तेवीस ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील, मुंबईतला सात जणांचा ग्रुप आहे. हे सर्वजण अर्थातच उत्तम वाचक आहेत आणि स्वाभाविकच पुस्तक प्रेमी आहेत. काही तरी वेगळं करण्याची त्यांना उमेद आहे. ‘घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याची’ त्यांची त्यासाठी सहर्ष तयारी आहे. त्यातूनच ‘माध्यम प्रकाशन’ ही कल्पना पुढे आली. या कल्पनेचं वेगळेपण म्हणजे आता उपलब्ध नसलेली, खरं तर दुर्मिळ झालेली आणि मराठी समाज-भाषा-संस्कृतीचा ऐवज असणारी पुस्तकं चोखंदळ वाचक आणि अभ्यासकांसाठी प्रकाशित करण्याचं ठरवण्यात आलं. अनेकांशी संपर्क साधून महत्वाच्या शंभर दुर्मिळ पुस्तकांची यादी तयार करण्यात आली. गोविंद बाबाजी जोशी यांची वर उल्लेख केलेली ‘रोजनिशी’ हे त्यातलं पहिलं पुस्तक. या पुस्तकासाठी गणेश चुक्कल यांनीही आर्थिक मदत केली. दीर्घ शोध घेऊन हे दुर्मिळ असलेलं पुस्तक कसं मिळवण्यात आलं, याची उन्मेष अमृते यांनी पुस्तकात कथन केलेली हकिकत वाचण्यासारखी आहे. महत्वाचं म्हणजे आता पुढे, मराठीतील अशी शंभर दुर्मिळ पुस्तकं प्रकाशित करण्याचं माध्यम प्रकाशनानं ठरवलं आहे. ‘पुणे शहराचा पेशवाई नंतरचा इतिहास’, लेखक– शा. बा. मुजुमदार. ‘पेशवेकालीन सामाजिक आर्थिक इतिहास’, लेखक– रा. वि. ओतूरकर. ‘मराठी रंगदेवतेच्या १०० वर्षाच्या मौजा’, लेखक- पांडुरंग गणेश क्षीरसागर. जनाक्का शिंदे यांचं आत्मचरित्र (जनाक्का शिंदे या महर्षि वि. रा. शिंदे यांच्या भगिनी. हे आत्मचरित्र अप्रकाशित आहे.). ‘काही रहस्यमय क्रांतिकारक’, लेखक– हरिभाऊ जोशी. ‘सत्यशोधक समाज: हिरकमहोत्सवी ग्रंथ’, संपादक- माधवराव बागल. ‘महादजी आणि नाना’, लेखक- ह. रा. नवलकर (वाईच्या धर्म मासिकात भाऊशास्त्री लेले यांनी नाना फडणविसांवर लिहिलेल्या लेखांना उत्तर म्हणजे महादजी आणि नाना). ‘दख्खनचा प्राचीन इतिहास’, लेखक– रामकृष्ण गोपाळ भांडारकर. विस्मृतीच्या खाईत गेलेल्या या पुस्तकांच्या पुनर्प्रकाशनासाठी काम सुरु झालेलं आहे. माध्यम प्रकाशन या वर्षाअखेरीस पु. ल. देशपांडे यांना भारतातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी लिहिलेली पत्रे प्रकाशित करणार आहे. ‘अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं’ व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांना ५० वर्षात आलेली पत्रं म्हणजे, तो काळ आणि ‘पु.लं.’चं काम, यांचा बहुमुल्य दस्तावेज आहे असं ‘माध्यम’कारांचं म्हणणं आहे.

प्रकाशन हा केवळ व्यवसाय नाही तर सर्जनांचं काम लोकापर्यंत पोहोचवण्याची तीही एक सर्जनशील नवनिर्मितीच असते अशी माझी धारणा आहे. व्यवसायाला प्राधान्य मिळून बहुसंख्य वेळा सर्वच प्रकाशकांकडून सर्जनशील निर्मितीचं काम होतंच असं नाही. पण, अनेकदा ते घडत असतं. माध्यम प्रकाशनानं व्यावसायिक दृष्टीकोन बाजूला ठेऊन सर्जनशील निर्मितीचं हाती घेतलेलं काम म्हणूनच अत्यंत महत्वाचं आणि कौतुक करावं असंच आहे. हे कौतुक केवळ प्रकाशनासाठी नाही तर, हे सातजण आणखी त्यापुढे गेलेले आहेत. गेली ८-९ वर्षे ‘मॉब’ या संस्थेच्या नावाखाली ते पाणी या विषयावर काम करीत आहे. रुपारेल कॉलेज, सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क, मुंबई फिल्म सिटी या काही ठिकाणी पर्जन्य जलसंधारणाचे प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आले आहेत. २-३ वर्षापूर्वी मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना, बीड जिल्ह्यातील ८ गावं दुष्काळमुक्त करण्यात संस्थेला यश आलेलं आहे. ‘मॉब’च्या प्रकल्पामुळे १७ लाख रुपये पाण्याचं बिल वाचल्याची पुण्यातील वाडिया कॉलेजने कबुली देणं, ही एक प्रकारे ‘मॉब’च्या कामाला मिळालेली पावतीच आहे. एकंदरीत काय तर, ‘वेडात दौडताहेत वीर सात’ अशी माध्यम नावाच्या या ग्रुपची कथा आहे. त्यांना त्यांचं हे ‘वेड’ कायम राखण्यासाठी शुभेच्छा.

जाता जाता एक वडिलकीचा एक सल्ला- सगळ्यांनाच दुर्मिळ खजिन्यातील पुस्तकांचा हा ऐवज नि:शुल्क देऊ नका. अनमोल, दुर्मिळ फुकट मिळाल्याची जाणीव ठेवण्याची, त्याबद्दल कृतज्ञता बाळगण्याची जाणीव आपल्या समाजात बहुसंख्यांना नाहीये!

(संपर्क – उन्मेष अमृते ९१६७९३१०६१, विनायक मुणगेकर ९८७०५५१९९१ आणि अमित जठार ९८३३४२९९२२. ई-मेल: [email protected])

 

बब्रूवान रुद्रकंठावार
आमादमी विदाऊट पार्टीआजच्या तरुणाईच्या भाषेत सांगायचं झालं तर एक ‘जबरा’ पुस्तक नुकतंच वाचनात आलं. पुस्तकाचं नाव आहे- ‘आमादमी विदाऊट पार्टी’, लेखक आहे- बब्रूवान रुद्रकंठावार आणि प्रकाशक – जनशक्ती वाचक चळवळ. बब्रूवान हे अर्थातच टोपणनाव आहे ते, धनंजय चिंचोलीकर या अत्यंत कमी बोलणाऱ्या पत्रकाराचं. संडे क्लब असो की मैफिल की कार्यक्रम, पत्रकार असूनही (!) धनंजय कमी का बोलतो याचं उत्तर, खास मराठवाडी ‘लहेजा’ असलेलं त्याचं लेखन वाचल्यावर मिळतं. ओठावरच्या भरघोस (भालचंद्र नेमाडेंची आठवण करून देणाऱ्या वळणाच्या) मिशात दडवलेल्या ओठांचा उपयोग धनंजय बोलण्यासाठी कमी करतो आणि बोलतो तेव्हा ते नेमकं असतं. श्रवण आणि निरीक्षणावर त्याचा भर असतो. ते निरीक्षण मग त्याच्या लेखनात उपहासात्मक (विनोदी नव्हे) शैलीत उतरतं. सध्या मराठी पत्रकारितेत तंबी दुराई आणि ब्रिटीश नंदी या दोघांचं झकास तिरकस शैलीतलं, अनेकांच्या टोप्या उडवणारं लेखन गाजतंय. तंबी दुराई तर ‘लोकसत्ता’त माझा सहकारी होता. पण, मोकळेपणानं कबूल करतो, तंबी दुराई, ब्रिटीश नंदी आणि असं लेखन करणाऱ्या कोणाही समकालीन लेखकांपेक्षा बब्रुवान रुद्रकंठावारचं लेखन, त्यात भरलेला भेदक उपहास सरस आणि आचंबित करणारा आहे. बब्रुवानचा भेदकपणा वास्तवाची जाणीव ज्या विषण्णता आणि अगतिकपणे करून देतो, ती पातळी खूप वरच्या दर्जाची आणि खोलवर अंतर्मुख करणारी आहे. बबऱ्या, दोस्त, बबऱ्याचा मुलगा गब्रु, दोस्ताचा मुलगा बारक्या आणि अधूनमधून बबऱ्या व दोस्त यादोघांच्या पत्नी (त्यांना नावं नाहीत !) यांच्या ठसकेबाज बोलण्यातून खणखणीत फटकेबाजी करत समुहाच्या जगण्याच्या विसंगतीवर, बब्रुवान व्रण न उमटवणारा पण, ठणका देणारा बोचकारा काढतो. ही त्याची खासीयत, त्याच्यात असलेलं सामाजिक भान आणि समंजसपणाचं लक्षण समजायला हवी. हे लेखन मोठ्या व्यासपीठावर, राज्यस्तरीय माध्यमात प्रकाशित झालं असतं तर, माझ्या म्हणण्याला बहुसंख्य मराठी वाचकांनी आनंदानं पसंतीची मान डोलावली असती, यात शंकाच नाही!

भाषा, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, आधुनिकता तसंच व्यक्ती आणि समाज याचं किती सूक्ष्म निरीक्षण आणि त्यावर विचार बब्रूवान रुद्रकंठावार करतो ते, मुळातूनच वाचण्यासारखं आहे. त्यासाठी त्यानं आज अनेकांकडून बोलल्या जाणाऱ्या अति इंग्रजीमिश्रित मराठी भाषेचा जो मराठवाडी तडका पेश केलाय तो पूर्णपणे अस्सल आणि झणझणीत आहे. इंग्रजी शब्दांचा भडीमार असूनही बब्रुवानच्या शैलीत ते इंग्रजी शब्द पूर्ण आणि सहज शरणागत होत मराठवाडी होतात, हेही या शैलीचं आणखी एक वैशिष्ट्य. इंग्रजीचं हे असं ‘मराठवाडी मराठी’ होणं, हे बब्रुवानच्या शैलीचं मोठं यश आहे. या शैलीची भुरळ पडून प्रस्तावनेचे पहिले काही परिच्छेद त्याच शैलीत लिहिण्याचा मोह ज्येष्ठ पत्रकार/लेखक अरुण साधू यांना आवरता आलेला नाही. ‘सिंथेसाईज्ड वुईथ इंग्लिश…डेडली कॉकटेल’ असं या लेखनाचं मोठं चपखल वर्णन अरुण साधू यांनी का केलंय ते समजण्यासाठी ‘आमादमी विदाऊट पार्टी’ हे पुस्तक वाचायला(च) हवं या श्रेणीतलं आहे.

धनंजय उपाख्य बब्रुवानला मी गेल्या १७-१८ वर्षांपासून ओळखतो, वाचतो आहे. आता त्याची नं वाचलेली ‘न घेतलेल्या मुलाखती’ आणि ‘बर्ट्राड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी’ ही पुस्तकं वाचायची आहेत. धनंजय आणि बब्रूवान या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.

(‘आमादमी विदाऊट पार्टी’, लेखक- बब्रूवान रुद्रकंठावार, प्रकाशक – जनशक्ती वाचक चळवळ, पुस्तकासाठी संपर्क – श्रीकांत उमरीकर – ९४२२८७८५७५)

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
[email protected]
भेट द्या – www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट