मुंडे नावाचा झंझावात थांबला..

मुंडे नावाचा झंझावात थांबला …

मृत्य अटळ आहे असे कितीही समर्थन केले तरी गोपीनाथ मुंडे यांच्या अनपेक्षित मृत्यूचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही . वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात असंख्य वादळांना कधी बेडरपणे, कधी समंजसपणे , कधी सोशिकपणाने तर कधी जाणीवपूर्वक सोशिकपणाने सामोरे गेलेल्या मुंडे यांचा मृत्यू एका अत्यंत किरकोळ अपघातात होतो हे एक न पचवता येणारे वास्तव आहे . बीडसारख्या आडवळणाच्या जिल्ह्यात परळीसारख्या आणखीनच आडवळणी तालुक्यात अत्यंत गरीब मुंडे कुटुंबात जन्माला आलेले गोपीनाथ नावाचे तिसरे अपत्य राज्याच्या राजकारणात प्रस्थापित समीकरणाना धक्का देत एक नवीन सूत्र निर्माण करणार आहे याची कल्पनाही कोणाच्या मनाला तेव्हा शिवली नसेल . मराठ्यांनी आणि त्यांनी फेकलेल्या तुकड्यावर ज्या अन्यांना संधी मिळाली त्यांनी राज्य करावे , ब्राह्मणांनी प्रशासन चालवावे असा तो, गोपीनाथ मुंडे जन्माला आले तेव्हाचा जमाना होता . मराठवाडा तर सामाजिक पातळीवर निझामाच्या राजवटीच्या अस्ताच्या कालखंडात झालेल्या अत्याचाराने पिचून गेलेला होता , ही आणखी एक बाजू होती . स्वातंत्र्यानंतर काही तरी वेगळे घडावे अशी उमेद नुकतीच उदयाला आलेली होती . त्या पिढीचे गोपीनाथ मुंडे एक प्रतिनिधी . हा युवक प्रमोद महाजन यांच्या सहवासात येतो काय आणि त्यांच्या राजकीय विचारसरणीचा स्वीकार करतो काय आणि मग राज्यात एका वादळाची निर्मिती होते आणि त्यां वादळाचे नाव असते गोपीनाथ मुंडे !

एका अत्यंत उपेक्षित वर्गात जन्मलेल्या आणि अभावग्रस्त परिस्थितीला टक्कर देत समोर आलेला गोपीनाथ मुंडे नावाचा एक युवक महाराष्ट्रात एक राजकीय शक्ती म्हणून उदयाला आले ते जात आणि धर्माचे एक नवीन समीकरण घेऊन . बहुजन नावाचे ते समीकरण आहे . समाजच्या राजकारण , सत्ता आणि प्रशासनासारख्या मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या जागरूक नसलेल्या समाजाला गोपीनाथ मुंडे यांनी नुसतेच जागे केले  नाही तर त्यांच्यात स्वअस्मितेचे एक  स्फुल्लिंग निर्माण केले .  तोपर्यंत आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षावर  रामभाऊ म्हाळगी , उत्तमराव पाटील , हशू अडवाणी , वसंतराव पटवर्धन , वसंतराव भागवत यांचे वर्चस्व आणि प्रभाव होता . भारतीय जनता पक्षाची राज्यातील शक्तीही याच उच्च वर्गापुरती मर्यादित होती . भटा-ब्राह्मणाचा पक्ष अशी हेटाळणी त्या काळात भारतीय जनता पक्षाची होत असे . वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या हाती पक्षाच्या महाराष्ट्र शाखेची  सूत्रे द्यायची आणि पक्षाचे बहुजनीकरण करण्याचे ठरवले तेव्हा ते    एक फाजील धाडस आहे असेच पक्ष आणि संघातील प्रस्थापितांना वाटत होते . मुंडे यांनी या पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले आणि भारतीय जनता पक्षाचा ब्राह्मणी तोंडवळा त्यांनी बदलला .  जन्मजात धाडसी वृत्ती , वादळे झेलण्याचा ; अनेकदा अशी वादळे ओढवून घेण्याची बेदरकार वृत्ती आणि जनमानसाची नस ओळखण्याची कला या आधारे  गोपीनाथ मुंडे यांनी मिळालेली संधी राजकीय वर्चस्वात कशी बदलवली हे भल्या-भल्यांना कळले नाही . भाजपचा हा पोरसवदा अध्यक्ष आणि त्याचा पक्ष आपण लोळवून टाकू असे भल्या-भल्यांनी रचलेले मांडे मनातल्या मनातच राहिले .  राजकीय धुरंधरांनी मांडणी केलेले अंदाज धुळीला मिळवले . रात्रं-दिवस दौरे , अथक परिश्रम आणि राजकीय समीकरणे कुशलपणे जुळवत , शेकडो माणसे जोडत भारतीय जनता पक्षाला ब्राह्मण,सिंधी, गुजराथी, मराठा या उच्च वर्णीयांच्या वर्चस्वातून मुंडे यांनी मोकळे केले आणि भाजपची प्रतिमा बहुजन अशी बदलत निवडणुकीत लक्षणीय यश मिळवून दिले . कोळी , महादेव कोळी , आगरी , माळी , गवळी , धनगर , तेली , कुणबी , बंजारा अशा  समाजातील अनेक अज्ञात व उपेक्षित जातीप्रवाहांना गोपीनाथ मुंडे यांनी  भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आणले . १९९०च्या विधानसभा आणि नंतरच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे ९० टक्के उमेदवार गैरब्राम्हण आणि गैरमराठा होते ! हेच बहुजन कार्ड वापरून त्यांनी १९९५त सेना-भाजप युतीला सत्तेचे द्वार खुले करून दिले . महायुतीची मोट बांधत हाच मुत्सद्दीपणा याही लोकसभा निवडणुकीत दाखवला . राज्याच्या राजकारणात अनेक राजकारणी आहेत आणि होतीलही पण बहुजनांची नस अचूक सापडलेले , प्रचंड आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे गोपीनाथ मुंडे मात्र पुन्हा निर्माण होणार नाहीत …

मुंडे यांच्याशी माझा स्नेह गेल्या चाळीस-बेचाळीस वर्षांचा . परळीहून लातुरला जायचे तर आधी अंबाजोगाई मग डावीकडे वळल्यावर  रेणापूर आणि नंतर लातूर असा प्रवास होतो . गोपीनाथ मुंडे परळीचे पण त्यांचा मतदार संघ रेणापूर . महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण करणा-या प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचा भौगोलिक भावबंध हा असा आहे आणि यात अंबाजोगाई ते रेणापूर या प्रवासात आधी लागते ते बर्दापूर . महाजन आणि मुंडे विद्यार्थी चळवळीतून समोर आले आणि राजकीय विचार वेगळा असूनही हे दोघे आणि विलासराव यांच्याशी माझी मैत्री  तेव्हापासूनची . मुंडे यांना एक राजकीय नेता म्हणून पाहता आले आणि मित्र म्हणून अनुभवता आले तरीही कौटुंबिक पातळीवर आमचे काही गुळपीठ जमले नाही . माझी पत्रकारितेतील मुशाफिरी सुरु असताना मी कोठेही असलो तरी आमच्या भेटी नियमित असत . एकदा त्यांचे राजकारण आणि माझे पत्रकारितेचे व्यवधान आटपले की प्रमोद महाजन आणि मी तसेच धनंजय गोडबोले नागपुरला अनेकदा आर्य भवन नावाच्या हॉटेलच्या तळघरातील रेस्तराँत गप्पा मारत असूत . मुंडे यांच्या भेटी आधी आमदार निवासात  होत ; नंतर सोय आणि वेळ मिळेल तशी स्थाने बदलत गेली . मुळत: प्रमोद महाजनशी मैत्री असूनही माझे सूर गोपीनाथ मुंडे यांच्याशी जास्त जुळले गेले . मुंडे महाराष्ट्रात असण्याचा तो फायदा असावा . आर्थिक स्थिती मुळीच चांगली नसणारे मराठवाड्यातील युवक तेव्हा नांदेड टेरिकॉटची विजार आणि अर्ध्या बाह्यांचा बुशशर्ट घालत , कारण ते कापड स्वस्त असे आणि टिकतही जास्त असे , शिवाय इस्त्रीची कटकट नसे . मुंडेही त्याला अपवाद   नव्हते . अनेकदा तर त्यांच्या आणि आमच्याही पायात स्लीपर्सच असत . मुंडे आणि माझ्या भेटी अनेकदा वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने होत . एसटीने धुळीच्या खकान्यात प्रवास करत वक्तृत्व स्पर्धा मारणे म्हणजे ; जिंकणे हा आमचा अर्थार्जनाचा फावल्या वेळेतला उद्योग होता . एकदा कोणत्या तरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंडे यांनी मला हरवून ५१ रुपयांचे रोख बक्षीसही पटकावले . वक्तृत्व स्पर्धा हरण्यापेक्षा ५१ रुपयांचे रोख बक्षीस गेले हे माझे दु:ख व्यापक आणि खोलवर होते . ते त्यांनी समजून घेतले होते . तेव्हाही मुंडे यांच्यानंतर भाषण देणे कठीण असायचे इतका त्यांच्या भाषणाचा प्रभाव पडायचा आणि त्यांच्याआधी आपण कितीही चांगले भाषण केले तरी मुंडे हजरजबाबीपणाने आपल्या प्रतिपादनावर बोळा फिरवणार हे नक्की असायचे .

२०१० मध्ये विनायक मेटे यांच्या लोकविकास मंचच्यावतीने देण्यात येणा-या मराठवाडा गौरव सन्मानासाठी मुंडे , मी , प्रसिद्धी खात्यातील अधिकारी श्रद्धा बेलसरे ( पूर्वाश्रमीची जयश्री खारकर ) , नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची निवड झाली . कार्यक्रमात मी आधी नंतर मुंडे आणि शेवटी प्रमुख पाहुणे असलेले विलासराव देशमुख असा भाषणाचा क्रम होता . श्रोत्यांचा मूड लक्षात घेऊन मी मूळ गंभीर भाषण बाजूला ठेऊन मुंडे आणि विलासराव यांच्यावर खुशखुशीत हल्ले चढवले . त्यात मुंडे यांनी मला वक्तृत्व स्पर्धेत कसे हरवले , मुंडे यांना लेटलतीफ ही दिलेली पदवी , मुंडे-गडकरी वाद ,  माझे आणि विलासराव यांचे गांधी वेगळे कसे वगैरे..अशा गमतीजमती आणि चिमटेही माझ्या भाषणात होत्या . मुंडे यांनी मी ‘बर्दापूरकरांना वक्तृत्व स्पर्धेत हरवले तेव्हापासून त्यांनी माझ्या विरोधात लिहायला सुरुवात केली’ अशा हजरजबाबीपणाने सुरुवात करून असा माझ्यावर काही हल्ला चढवला आणि विलासरावांना माझ्या दुप्पट असे चिमटे काढले की त्याला तोड नाही . सभागृहातून माझ्या भाषणापेक्षा चौपट टाळ्या मुंडे यांच्या भाषणाला न मिळत्या तर नवल ! विलासराव यांनी त्यावर कळस करून त्या कार्यक्रमातील आम्हा दोघांच्याही भाषणांवर बोळा फिरवला.. आमच्या तिघांच्या भाषणाची ही जुगलबंदी नंतरही चर्चेत राहिली , आजही आहे . अनेक ठिकाणी त्या जुगलबंदीची सीडी दाखवली गेली . कार्यक्रमानंतर आम्ही तिघेही आपल्या भाषणावर जाम खूष होतो . या जुगलबंदीचा ‘शो’ आपण एकदा औरंगाबाद आणि लातूरला करू यात असे मुंडे म्हणाले . त्यावर आमचे एकमत झाले   पण , ते लांबत गेले . नंतर आधी विलासराव गेले आणि आता मुंडे …आता ते राहूनच गेले कायमचे ….

‘क्लोज-अप’ आणि ‘डायरी’ या माझ्या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ औरंगाबादला माजी आमदार श्रीकांत जोशी आणि उद्योजक विवेक देशपांडे यांनी घडवून आणला . नितीन गडकरी तेव्हा नुकतेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले होते आणि गडकरी-मुंडे यांच्यातील शीतयुद्ध पक्षात तसेच मीडियात साहजिकच चर्चेचा विषय होते . या पार्श्वभूमीवर या दोघांना एक व्यासपीठावर आणावे अशी श्रीकांत जोशी यांची तीव्र इच्छा होती . गडकरी आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारीख दिली पण मुंडे यांचाशी संपर्क झाला नाही कारण काही कौटुंबिक समस्येत ते अडकलेले होते . कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी औरंगाबादला पोहोचल्यावर श्रीकांत , विवेक , डॉ. मिलिंद देशपांडे आणि मी तयारीवर अखेरचा हात फिरवत असताना श्रीकांत जोशी म्हणाले , ‘मुंडेसाहेब आहेत उद्या इथे त्यांना बोलावू यात’ . माझी काही हरकत असण्याचा प्रश्नच नव्हता .श्रीकांत आणि विवेक यांना इतक्या ऐनवेळी मुंडे यांना फोन करणे अप्रशस्त वाटत होते . शेवटी मी माझ्या पत्रकारितेतील अनुभवातून आलेल्या कोडगेपणाचा आधार घेत मुंडे यांना फोन केला आणि कार्यक्रमाचे आमंत्रण दिले , कोण प्रमुख पाहुणे आहेत तेही सांगितले .

त्यावर मुंडे म्हणाले , ‘बरोबर आहे तू तुझ्या मित्रांना आमंत्रण देणार आणि मला मात्र ऐनवेळी सांगणार !’ यातील मित्र म्हणजे नितीन गडकरी यांच्यावरून त्यांनी तो टोला लगावला होता .

मी कळवळून संपर्क कसा नाही झाला मित्रा तुझ्याशी हे सांगितल्यावर मोकळेपणाने हसत मुंडे म्हणाले , ‘मी येणार कार्यक्रमाला . माझ्या जुन्या मित्राचा कार्यक्रम आहे . नक्की येतो आणि श्रोत्यात बसून मित्राचे कौतुक बघतो’ .

कुठे बसवायचं तुम्हाला ते आम्ही ठरवतो असं म्हणत मी फोन कट  केला . लगेच श्रीकांत आणि विवेकने बँकड्रॉप , जाहिराती बदलल्या, नव्याने बातम्या पाठवल्या  . मी फोन करून कार्यक्रमाला मुंडे यांना घेऊन येण्याची जबाबदारी नितीन गडकरीवर सोपवली आणि ती त्यांनी आनंदाने स्वीकारली . मुंडे ,भुजबळ आणि गडकरी यांच्या उमदेपणाचा एक वेगळा पैलू आम्ही यावेळी अनुभवला . कार्यक्रमाला यायला मुंडे व गडकरी यांना उशीर झाला तरी उपमुख्यमंत्री भुजबळ संत एज्नाथ रंग मंदिरात वाट बघत बसले . अधिका-यांनी तक्रार केली की , शिष्टाचाराचा भंग होतोय म्हणून तर भुजबळ ताडकन म्हणाले, ‘मित्रांच्या कार्यक्रमात शिष्टाचार वगैरे काही नसतो’ .

मुंडे आणि गडकरी आल्यावर भाषणाचा क्रम ठरवायचा विषय निघाला तर गडकरी म्हणाले , ‘मी सर्वात ज्युनिअर आहे . मी पहिले बोलतो मग भुजबळसाहेब आणि शेवटी मुंडेसाहेब बोलतील’ .

भुजबळ म्हणाले , ‘नाही नितीन आता राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते सर्वात शेवटी बोलतील .

मग ठामपणे मुंडे म्हणाले , ‘तसं काहीही होणार नाही . मी आधी बोलतो मग आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेवटी भुजबळ साहेब . नितीन माझ्याआधी बोलले तर वाईट मेसेज जाईल’ . त्याचप्रमाणे मुंडे यांनी क्रम ठरवायला लावला आणि सर्वप्रथम भाषण करताना ‘मी पुस्तक वाचलेले नाही कारण बर्दापूरकरांनी त्यांच्या नागपूरच्या मित्राला ( पक्षी : नितीन गडकरी ) रीतसर आधी कळवले आणि मला मात्र ऐनवेळी . मात्र असे असले तरी बर्दापूरकर माझे मित्र आहेत असा टोला लगावत आणि कार्यक्रम औरंगाबादला होत असल्याने मी गेस्ट नाही तर होस्ट आहे’,  अशी सुरुवात करून इतके खुसखुशीत आणि हजरजबाबी भाषण केले की सुरुवातीलाच कार्यक्रम एका उंचीवर जाऊन पोहोचला ! मैत्री जपणे म्हणजे काय असते हे यानिमित्ताने मुंडे दाखवून दिले ते असे .

गोपीनाथ मुंडे माणसासारखे माणूस होते . त्यामुळे त्यांना राग-लोभ नव्हते असे म्हणणे योग्य ठरणार नाही . पत्रकारांनी केलेली जहरी टीका त्यांच्या जिव्हारी लागत असे तरी  टीका करणाराला बोलून न  दाखवण्याचा धोरणीपणा त्यांच्याकडे होता. टीकाकार जर जवळचा असेल हळूहळू त्याच्याशी असणारी सलगी ते काही दिवस कमी करत आणि हा एकतर्फी अव्यक्त राग ओसरला की पुन्हा उमदेपणाने त्याच्याशी वागायला सुरुवात करत . राजकारणातल्या विरोधकांना मात्र ते सरळ अंगावर घेत . सभागृहात तर मुंडे यांना ऐकणे हा एक अफाट अनुभव असायचा . सतत सभागृहात राहिल्याने संसदीय परंपरा , शिष्टाचार आणि नियम ते कोळून प्यायले होते . त्यामुळे ते अचानक केव्हा आणि कसा हल्ला करतील याचा अंदाज सत्ताधारी पक्षाला येत नसे . मुंडे सभागृहात असले की सत्ताधारी कायम सावध असत . उपमुख्यमंत्री असलेल्या मुंडे यांच्या एका अर्थाने हाताखाली असणारे नारायण राणे मुख्यमंत्री म्हणजे मुंडे यांचे बॉस झाले , पण मुंडे यांनी ते अत्यंत खिलाडूपणे  स्वीकारले .  राजकारणात काहीही घडू शकते असा संदेशच त्यांनी काहीही न बोलता दिला . सेना-भाजप युतीच्या काळात गणपती दुध पिण्याची घटना गाजली आणि त्यावर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अतार्किक तसेच अवैज्ञानिक प्रतिक्रिया दिली . मुंडे काही अधार्मिक नव्हते पण मनोहर जोशी यांची प्रतिक्रिया न पटणारी आणि रुचणारी होती . म्हणून त्यावर मुंडे यांनी टीका करण्याचा बेडरपणा दाखवला . पक्षात घुसमट झाली तेव्हाही कोणतीही तमा न बाळगता त्यांनी बंडाचे निशाण फडकावले . बंडखोरी त्यांच्या रक्तातच होती आणि ती बेडरपणे व्यक्त करण्याची जिगर त्यांच्यात होती .

मुंडे आणि घड्याळ यांचा काहीच संबध नसे कारण त्यांचा अफाट जनसंपर्क . आलेल्या प्रत्येकाशी दोन वाक्य तरी बोलण्याच्या अट्टाहासाने दिवस सुरु झाल्यावर तासाभरातच काळ-काम-वेग यांच्याशी असलेले त्यांचे नाते संपुष्टात येत असे . ग्रामीण भागाची नस त्यांना सापडली ती या लोकसंग्रहातूनच आणि ते जनतेच्या भावजीवनाचे एक अंग बनले नंतर या अट्टहासानेच ते लोकमान्य लोकनेते बनले . त्यामुळे राज्यात भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कोण आहे हे दुय्यम ठरायचे . कारण पक्षाचा महाराष्ट्राचा चेहेरा म्हणजे मुंडे हे समीकरण कायम झालेले होते . ते उपमुख्यमंत्री झाल्यावर तर माणसांचा राबता शतपटीने वाढला , खोटे नाही सांगत , त्याकाळात मुख्यमंत्र्यापेक्षा उपमुख्यमंत्री मुंडे यांच्याकडे जास्त गर्दी   असे . मुंडे आणि घड्याळाचा तुटलेल्या संबधाचा जास्त सर्वात त्रास प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना होत असे . बैठकाना मुंडे चार-सहा तास उशिरा पोहोचत आणि निगुतीने बैठक घेत कारण प्रदीर्घ काळ विरोधी पक्षात राहिल्याने पळवाटा चांगल्या ठाऊक होत्या..तपशीलाने ते त्रुटींवर बोट ठेवत , न दिसणा-या चुका काढत . मग बैठकही तीन-चार तास चालत असे . अनेकदा या बैठकीत मूक ( हा अलिखित करारच होता ) साक्षीदार म्हणून मी सहभागी झालो आणि मुंडे यांचे प्रशासकीय ज्ञान अनुभवताना जाणत्या अधिका-यांची बोलती कशी बंद झाली हे पहिले आहे . या उशिरा येण्याच्या सवयीने मुंडे यांना सनदी अधिकारी खाजगीत ‘लेट लतीफ’ म्हणू लागले . मुंडे यांचा दरारा असा की उघडपणे मात्र त्यांना  लेट लतीफ कोणी म्हणत नसे . मुंबईहून माझी औरंगाबादला बदली झाली आणि मराठवाड्याच्या दूरवर भागातून दौ-याहून येणा-या मुंडे यांच्यासाठी विमान कसे रोखून ठेवले जाते याच्या कथा कळल्या . एकदा तर मी तो अनुभवच घेतला आणि ‘लेट लतीफ’ मुंडे यांच्यामुळे विमान कसे रोखले प्रवशांची कशी गैरसोय झाली याची बातमी करून पाठवली . ती लोकसत्ताच्या पहिल्या पानावर आली आणि धम्माल उडाली ! मुंडे जाम वैतागले असे दोन-तीन सहकारी म्हणाले पण भेट झाल्यावर मुंडे जणू काहीच घडले नाही असे वागले . नंतर आम्ही दोघे कोठे एकाच व्यासपीठावर असलो तर आवर्जून वेळेवर येत आणि मग माझ्या फिरक्या काढत बसत . मुंडे यांच्यातला  उमदेपणा  राजकीय मतभेदांच्या सीमा पार करणारा होता . पक्षाच्याच नव्हे तर अडल्या-नाडल्या अनेकांना मदत करताना या माणसाने त्याची जात , धर्म किंवा राजकीय पक्ष बघितला नाही हे मला चांगले ठाऊक आहे . राजकारण आधी भाजपचे आणि मग बहुजनांचे पण धर्म माणुसकीचा असे आगळे मिश्रण गोपीनाथ मुंडे यांच्यात होते .

दिल्लीत आमच्या भेटी होत त्या प्रामुख्याने संसदेच्या प्रांगणात . दिल्लीच्या राजकारणाचा बाज काही त्यांच्या पचनी पडलेला नव्हता . गोडगोड बोलत खोटे बोलणे आणि पाठीमागून वार करणे हा गोपीनाथ मुंडे यांचा स्वभाव नव्हता . शरद पवार यांच्याविरुद्ध त्यांनी जो उघड पंगा घेतला त्याला तोड नाही आणि ही राजकीय ‘जंग’ त्यांनी या लोकसभा निवडणुकीपर्यंत जारी ठेवली . दिल्लीतील ‘हांजी हांजी’ राजकारण त्यांना मानवणारे नव्हते त्यामुळे कायम माणसांच्या गराड्यात रमणा-या मुंडे यांना दिल्ली परकी वाटत असे आणि काम संपायच्या आतच त्यांना राज्यात परतायची घाई होत असे . त्यांचे सर्व लक्ष राज्यावरच   होते . अशात नितीन गडकरी यांच्याशी असलेले त्यांचे पक्षांतर्गत  शीतयुद्ध बरेच शमले होते . गडकरी यांना राज्याच्या राजकारणात रस उरलेला नाही याची खात्री त्यांना पटली होती . त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवली तरी त्यांचे मन आणि हृदय महाराष्ट्रातच रेंगाळत होते . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा गोपीनाथ मुंडे यांना होती आणि ती फलद्रूप होण्याचे राजकीय संकेत मिळत असतानाच त्यांनी जगण्यातून कायमची एक्झीट घेतली आहे . एक व्हिजनरी , वादळी , बेडर राजकारणी आणि उमदा मित्र अशा गोपीनाथ मुंडे यांच्या मनावरील प्रतिमा कधीही पुसट होणार नाहीत …त्या अमीटच आहेत , अमीटच राहतील …

-प्रवीण बर्दापूरकर

संपर्कध्वनी – ९८२२०५५७९९

/ एफ १२ / चाणक्यपुरी / शहानुरमियां दर्गा रोड / औरंगाबाद ४३१००५ /

संबंधित पोस्ट

 • Datta Joshi

  खूप सुंदर. एक अनोखे नाते उलगडताना मुंडे यांच्या स्वभावाचे अनेक पदर स्पष्ट होत गेले. छान.

 • Prashant Bhalerao

  Very good written Mr Bardapurkar.I read the full article.Your friendship with Mundeji

 • ii

  complete profile..touchy too

 • pratibha jojare

  shunyatun astitva nirman karnare Mundeji yanchi sarvasamanyasathi khup garaj hoti parantu kalapudhe konchehi chalt nahi tyanchya vyaktimatvache atishya swach va jivalyache pailu apan mandalet Munde yanchya badalchya shardhet ankhi bhar padali dhanyawad

 • Kumar Khedkar

  अप्रतिम…..एका मित्राने या प्रकारे आणि या स्थितीत लिहिणे …. खरोखरच सलाम सर…!

 • Comment by Hon. Shridhar Damle, USA…Best and touchy profile. In depth with human touch..Pl include in your new book. while describing in detail about best oratory performance of Late Gopinath Munde, it is pleasant surprise to know about your specialty in field.Will pl give me cd or vcd …See More. 

 • Comment by Mr.Harshvardhan …Death cheaper for cabinet minister, costlier for Purogami Maharashtra.

 • Comment by Shri Ramesh Zavar …लेख मोठा असला तरी आवडला. काही वेळा लेखन सीमेला अपवाद करावे लागतात. मुंडेवरील लेखाचा तपम्ही केलेला अपवाद समर्थनीय आहे.

 • Comment by Mr. Prasad Jog…अतिशय सुंदर! एक व्यक्ती म्हणून, राज्यकर्ता/राजकारणी म्हणून मुंडेसाहेब कसे होते याचे बरेच तपशील गेल्या काही दिवसात वाचले. त्यांची मैत्री अनुभवलेल्या तुम्हासारख्या पत्रकाराचा लेख हा त्यावरचा कळस आहे.असा लेख लिहिण्याची आणि तो वाचण्याची वेळ इतक्या लवकर आली, हे आपल्या सर्वांचे दुर्दैव. दुसरे काय

 • Comment by Shri Shrikant Pohankar…विलासराव व गोपीनाथजी हे हजरजबाबीपणाचा आदर्श असलेले दोन कर्तृत्ववान व वक्तृत्ववान तारे निखळले व निरोप घेताना सर्वांना चटका लावून गेले. शेवटी श्रद्धांजली अर्पण करण्याशिवाय आपल्या हातात काय असतं? पराधीन आहे जगती . . . . . . .!

 • Comments on FB…Suvarna Hubekar BEST COLUMN….!!!!!PERFECT!!!!!!!!June 8 at 12:37pm · LikePrafulla P Pathak नाईलाज आहे …June 8 at 1:42pm · LikeSarang Bardapurkar Super…June 8 at 2:00pm · LikeMahesh Mohan Vaidya · 7 mutual friendsसुन्दरJune 8 at 3:02pm · LikePurushottam Kale अप्रतिम !!!June 8 at 4:05pm · LikeRavindra Patil Super.June 8 at 4:15pm · LikeSuneel Joshi खप छान …मर्मग्राही आणि हृदयस्पर्शी