युद्धस्य परिणाम नसती कधीच रम्या…

केवळ तोंड पाटिलकी करत युद्धस्य तु कथा रम्या’ असं म्हणणं आणि युद्धाचे परिणाम भोगणं यात फार मोठा फरक असतो आणि तो महाभीषण असतो , त्यात माणुसकीचा लोप  आणि सत्याचा कडेलोट असतो . ( महायुद्धाचे उमटलेले व्रण मध्य युरोपात आजही भळभळतांना दिसतात आणि ते बघताना अंगावर शहारा येतो . )  अर्थात सध्याच्या वातावरणात ज्यांना युद्धाचा उन्माद चढलाय त्या पिसाटलेल्या माध्यमकर्मी आणि नमो भक्तांना हे सांगून काहीही उपयोग नाही . पुलावामाच्या घटनेनंतर देशभक्तीच्या नावाखाली जो कांही धुमाकूळ बहुसंख्य संस्कारी वर्गाकडून सध्या देशात माजवला जात आहे आणि देशभक्तीचा स्टॅम्प मारायची जी घाई झालीये ती अत्यंत घातक आहे ; त्यामुळे भाजपला निवडणुकीत कांही लाभ होईलही पणखरंच युद्ध झालंच तर भारत किमान दोन-अडीच दशक मागे जाईल , हे लक्षात घ्यायला हवं .

सध्या भारत आणि पाकच्या दरम्यान जो कांही तणाव निर्माण झालेला आहे तो तसा कांही कांही नवा नाहीये . आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९४८, १९६५, १९७१ आणि १९९९ साली युद्ध झाली आणि प्रत्येक युद्धात पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागलेला आहे . मात्र या एकाही पराभवातून पाकिस्ताननं कोणताही धडा घेतलेला नाही उलट प्रत्येक युद्धानंतर दोन्ही देशातील तणाव आणि समस्यात वाढच झालेली आहे दोन्ही देशातील मुस्लिमांत असुरक्षेची भावना वाढली ; परिणामी काश्मीर प्रश्न अधिकाधिक क्लिष्ट होत गेलेला आहे याच काळात दोन्ही देशातील कट्टर पंथीयात एकमेकाच्या विरोधात लढण्याची खुमखुमीही चढया क्रमानं वाढतच गेलेली आहे . तिकडच्या देशातील धर्मांधांना वाटतं की भारताकडून झालेल्या आजवरच्या पराभवाचा दहशतवादाच्या तरी मार्गानं बदला घ्यावा तर इकडच्या देशातील धर्मांमांधांना आधीच्या पाकिस्तानवरील विजयामुळे आलेल्या नशेची चटक लागलेली आहे . यात आजवर किती सामान्य माणसांचे बळी गेले आणि किती पिढ्या व लोक दहशतीच्या छायेत सलग जगत आहेत ; दोन्ही देशांच्या सीमेलगतच्या अगणित कळ्या न उमलताच कुस्करल्या गेल्या आहेत , याची माणुसकीच्या पातळीवर मोजदाद करण्याचा प्रयत्न करण्याचं भान कुणालाच राहिलेलं नाहीये .

१९७१च्या युद्धाच्या परिणामाचे त्याचे चटके सहन करावी लागलेली हयात असलेली माझी पिढी आहे . त्या युद्धाचे परिणाम देशभर झाले होते . अधिकृत आकडेवारीनुसार त्या युद्धात भारताचे ३ हजार ८४३जवान शहीद झाले तर पाकिस्तानचे ८ हजार जवान मारले गेले ; म्हणजे एवढ्या कुटुंबातील सर्वांनी घरातलं कुणी तरी गमावल . युद्धात किती नागरिक मारले गेले आणि युद्धभूमीच्या बाहेर एकूण किती नुकसान झालं याची आकडेवारी जगातील आजवरच्या कोणत्याही युद्धानंतर कधीच जाहीर झालेली नाहीये . १९७१च्या युद्धाआधी आणि नंतरही बांगला देशातून जे निर्वासितांचे लोंढे भारतात आले त्याचा अति अतिरिक्त भार जनतेवर पडला . देशाच्या पूर्व आणि ईशान्येकडील भागात स्थानिक विरुद्ध बांगला देशीय असा नवीन संघर्ष उभा राहिला ; तो अजूनही शमलेला नाही . पूर्व पाकिस्तान नावाच्या शत्रुचं नामकरण बांगला देशी झालं एवढाच काय तो फरक पडला आणि भारत-पाकिस्तान-बांगला देश या देशातील समस्यांत भरच पडली ; सीमावाद , घुसखोरी , दहशतवाद्यांना आश्रय आणि उत्तेजन या समस्या आणखी उग्र झाल्या कारण पाकिस्तानचे तुकडे झाल्याने आणि ते तुकडे करण्यात पुढाकार घेतलेल्या भारताविरुद्ध टोकाचा द्वेष व कडवट भावना आणखी बळकट झाली या तीन देशातील धर्मांध पुजार्‍यांनी त्या भावनेचं सुडाग्नीत रुपांतर केलं .  

दुसरा मुद्दा म्हणजे १९७१चं युद्ध आणि मग आलेल्या दुष्काळानं या देशाच्या अर्थ व्यवस्थेचं कंबरडं मोडून टाकलं . निधी युद्धाकडे वळवला गेल्याने आणि सर्वच क्षेत्रात मंदीची लांट आली . हाताला काम नाही , खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाही अशी ती भीषण स्थिति होती . आमच्या पिढीच्या अनेकांना ते दिवस आठवले तर , रांगा लावून मिळवलेल्या मिलोच्या खाल्लेल्या भाकरी आणि नोकरीसाठी केलेली वणवण आठवून आजही अंगावर कांटा आल्याशिवाय राहणार नाही . आताही भारत-पाकचे जवान सीमांवर एकमेकाकडे बंदुका रोखून उभे आहेत . अशी युद्धजन्य किंवा कोणत्याही क्षणी भडका उडेल अशी स्थिती कारगिल युद्धाच्या आधी आणि नंतर संसदेवर हल्ला झाला तेव्हाही निर्माण झालेली होती . तेव्हा दोन्ही वेळा मिळून सीमेवर  नुसतं सैन्य उभं ठेवण्याचा खर्च १८ ते २० हजार कोटी झाला असावा असा अंदाज होता . भारताच्या १२ मिराज विमानांनी परवा बालाकोटच्या तळावर केलेल्या हल्ल्याचा खर्च ६ हजार ३०० कोटी रुपये आहे तर दोन्ही देशांची जी विमाने पडली   ( किंवा पाडली गेली ) त्याची किंमत अशीच हजार कोटींच्या घरात आहे , अशा बातम्या प्रकाशित झाल्या आहेत . याशिवाय दारुगोळ्यावर होणारा खर्च तर अफाट आहे . अगदी ०.३२ क्षमतेच्या पिस्तुलाच्या एका गोळी(बुलेट)ची किंमत किमान ५० रुपये असते . युद्धभूमीवर तर कोट्यावधी गोळ्या , बॉम्ब आणि आणि दारुगोळ्यांचा संततधार वर्षाव होत असतो ; म्हणजे एका दिवसाचा युद्धाचा खर्च कसा हजारो कोटी रुपयांचा आहे याचा अंदाज येऊ शकेल . शिवाय त्या दारुगोळ्यांमुळे मरणारे नागरिक प्राणी , पक्षी , उजाड होणारी जमीन आणि उध्वस्त होणारी शेती मरणारी झाडं , ओझोनचा स्तर आणि पावसाच्या प्रमाणात होणारी घट याचा विचार या उन्मादात कधीच होत नाही .  अणुबॉम्ब वापरला गेला तर होणारी महाभयंकर हानी आणि वातावरणाचा होणारा वातावरणाचा प्रचंड हास याचा विचार तर अंगाचा थरकाप उडवणारा आहे . जी कांही माहिती प्रकाशित होतीये त्यानुसार दोन्ही देशातील महत्वाची शहरे अणुबॉम्बचे लक्ष असतील . तसं खरंच घडलं तर काय हाहा:कार उडेल याची कल्पना तरी केली जाऊ शकते का युद्धाची भाषा करणार्‍यांनी कधी रणभूमी पहिली तरी आहे का ? एखादं शस्त्र कधी हाताळलं आहे का ? आपल्या पोलीस मामाची साधी ३०३ बंदूक घेऊन दोन तास पहारा देऊन दाखवला तर युद्धाचा उन्माद चढलेले शेंदाड नमो भक्त ,  समाज माध्यमांवरचे वाचाळवीर आणि प्रकाश वृत्त वाहिन्यावरचे बाल बुद्धीचे अॅन्कर्स चार दिवस अंग शेकत बसतील अशी स्थिती आहे आणि तरी म्हणतात युद्ध हाच पाकिस्तानला धडा शिकवण्याचा एकमेव मार्ग आहे ! ( सेवा कार्यांचा सन्माननीय अपवाद वगळता ) प्रात:शाखेत जाऊन दंड फिरवणं समाज माध्यमांवर मनाला येईल तशी बेताल कमेंट टाकणं किंवा अॅन्कर्स म्हणून बेताल बडबड करणं आणि प्रत्यक्ष युद्ध लढणं यात फार मोठ्ठं अंतर असतं हे समजून घेणं या शेंदाडांच्या आकलनाच्या पलीकडचं वास्तव आहे . 

पाकिस्तान सध्या फार मोठ्या आर्थिक खाईत आहे . युद्ध लढण्याची क्षमताच या देशात नाही . प्रकाशित झालेल्या बातम्यांवरुन दिसतं आहे की पाककडे दोन आठवडे पुरेल एवढाही इंधनाचा साठा नाही ; पुरेसा दारुगोळाही नाही . पाक सैन्यही युद्ध करण्याच्या मन:स्थितीत नाही . शिवाय युद्ध सुरु करणं सोपं असतं ते थांबवणं मात्र युद्ध लढणार्‍या देशांच्या हातात कधीच नसतं ; त्याचा एक परिणाम म्हणून अन्य देशांची अनेक आघाड्यांवर बटीक व्हावं लागतं याची जाणीव पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना असावी असं दिसतंय हे सुचिन्ह आहे . हा मजकूर लिहीत असतांना इम्रान खान यांनी विनाअट चर्चेची तयारी दर्शविताना पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या भारताच्या वैमानिकाला सोडण्याची घोषणा करुन आणि ती अंमलात आणून नमतं घेतलेलं आहे . त्यामुळे नाक ठेचलं वगैरे उन्माद न दाखवता , आपली समस्या पाकिस्तान नाही तर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आहे हे लक्षात घेऊन बालाकोटला केले तसे हल्ले करणं आणि दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करणं , मसूद अजहर , दाऊद इब्राहीम सारख्यांना कायमचा धडा शिकवणं , कुलभूषण जाधव यांची सुटका करवून घेणं आणि दहशतवादाला पाठीशी घातल्याबद्दल पाकिस्तनाची जागतिक पातळीवर आता केली आहे त्यापेक्षा सर्व बाजूने जास्तीत जास्त कोंडी करणं , ही आणि केवळ हीच नीती असायला हवी . ही प्रक्रिया दीर्घकालीन असेल तरी तीच कायमस्वरुपी असेल . माथी भडकावून युद्धज्वर निर्माण करुन देशात कायम उन्मादाचं वातावरण पेटतं ठेवणं कोणाच्याच हिताचं नाही .

राहता राहिला विद्यमान युद्ध सदृश्य वातावरणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राजकीय फायदा उठवत असल्याचा मुद्दा . पराक्रम हवाई दलानं केलाय नरेंद्र मोदी किंवा सरकारनं नाही असा विरोधकांचा दावा आहे आणि तो खराही आहे . आपल्या देशात प्रत्येकच मुद्दयाचं राजकारण करण्याची प्रथा निर्माण झालेली आहे . बांगला आणि कारगिलच्या युद्धातही सैन्यच लढलेलं होतं तरी बांगला युद्धातिल यशाचं व बांगला देशच्या निर्मितीचं श्रेय इंदिराजी गांधी आणि कारगिल विजयाचं श्रेय अटलबिहारी वाजपेयी या तत्कालीन पंतप्रधानांनाच मिळालं ; सैन्याला नाही . कोणत्याही सरकारच्या काळात झालेल्या प्रत्येक चांगल्याचं श्रेय त्या सरकारच्या नेतृत्वाला मिळतं आणि अपयशाचाही धनी तोच होतो ही वैश्विक रीतच आहे . चीन विरुद्ध झालेल्या युद्धातल्या पराभवाची जबाबदारी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी नम्रपणे आणि खळखळ न करता स्वीकारली होती . अपयशाचं श्रेय घेण्याची हिंमत इंदिराजी आणि वाजपेयी यांच्यात जशी होती तशी ती विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नाही . या काळात मोदींनी दाखवलेली विरोधी पक्षांना तुच्छ लेखण्याची वृत्तीही लोकशाहीला शोभेशी नाही . विरोधी पक्षांच्या या काळात झालेल्या बैठकींना ते उपस्थित राहण्यात पंतप्रधानपदाची शान होती . पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची चांगली कामगिरी बजावूनही त्यांची अशातली भाषण ऐकतांना ते गंभीर पंतप्रधान न वाटता नौटंकीबाज नेते वाटू लागले आहेत . निश्चलनीकरणानंतर ही निर्माण झालेली प्रतिमा विद्यमान तणावाच्या परिस्थितीत बदलण्याची संधी मोदी यांनी गमावली आहे . कारण नरेंद्र मोदी हे स्वप्रतिमेच्या आहारी गेलेले नेते आहेत !       

-प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  ​+919822055799

 www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट