राज ठाकरे आणि नेमाडेंची ताशेरेबाजी !

गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत तर विलक्षण ताकदीचे कादंबरीकार डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी औरंगाबादेत केलेल्या वक्तव्यांना ‘सुमार ताशेरेबाजी’ यापेक्षा जास्त महत्व नाही. ही ताशेरेबाजी एकाच दिवशी सायंकाळी व्हावी हा एक योगायोग समजायला हवा.

//१//

‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे औरंगाबादला बोल-बोल-बोलून खाली बसतात न बसतात तोच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचं बहुप्रतिक्षित पाडवा भाषण मुंबईत शिवाजी पार्कवर झालं. राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करुन मोठ्या आशा निर्माण केल्या होत्या. राजमध्ये लोक बाळासाहेब ठाकरे यांना बघत असत, अजूनही बघतात. भावनेच्या लाटेवर स्वार असणारी वारसदाराची ती इमेज हे राजचं मुख्य भांडवल होतं. राजबद्दल तरुण तसंच महिला वर्गात मोठं आकर्षण होतं आणि आहे. त्यातच शिवसेना फुटते आहे म्हणून आनंद झालेल्या मुंबईतील पत्रकारांनी राज ठाकरे यांचा टीआरपी तेव्हा वाढवतच ठेवला.

मनसे स्थापन केल्यावर राज यांच्या होणाऱ्या सभेला सर्व लोक ‘जमवावे’ लागत नसत. लाखांचा जमाव स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करून येत असे. राज्यात सेना-भाजप युती आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीची आघाडी अशी राजकीय रचना आकाराला होती. तिसऱ्या आघाडीचं अस्तित्व नगण्य होतं. राजकारणात युती आणि आघाडी नको असणारी तसंच तिसऱ्या आघाडीला मत न देऊ इच्छिणारे मतदार होते. ती ‘स्पेस’ राज ठाकरे यांनी भरून काढली आणि राज यांना मोठा प्रतिसाद मिळाला. २००९च्या विधानसभा निवडणुकीत हा प्रतिसाद बऱ्यापैकी पाठिंब्यात बदलला, मनसेचे १३ आमदार निवडून आले, हे एकट्या राज यांच्या प्रतिमेचं यश होतं. बिनसलं ते इथंच. प्रतिसाद पाठिंब्यात बदलवण्याची प्रक्रियाच राज ठाकरे यांनी नंतर थांबवली! पक्ष उभारण्याची एकहाती क्षमता असणारे राज ठाकरे मिळालेल्या अल्प यशात खूष झाले. राज ठाकरे यांचं राजकारण लोकांच्या अपेक्षांच्या बाबतीत ‘he is trying to put square peg in round hole’या धर्तीचं झालं, राज ठाकरे गंभीर नाहीत, असा संदेश गेला. त्या यशात ते मग्न राहिल्यानं नेते सैरभैर झाले आणि कार्यकर्ते विनाकार्यक्रम फिरू लागले. भावनेची ती लाट ओसरली, मनसेला प्रत्येक निवडणुकीत फटके मिळू लागले. बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, मंगेश सांगळे असे अनेक बिनीचे शिलेदार पराभूत झाले आणि नाऊमेद झाले. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढू लागल्यानं राजकारणातली मनसेला प्रतिसाद देणारी ‘स्पेस’ भरून निघाली.


( राज ठाकरे यांच्यासोबत आस्मादिक . माझ्या ‘दिवस असे की…’ आणि ‘नोंदी डायरीनंतरच्या’ या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात . छाया- शेखर सोनी . )

तरीही राज यांचा करिष्मा अजूनही बऱ्यापैकी कायम आहे. मुंबईत मेट्रोमुळे निर्माण झालेला स्थलांतराचा प्रश्न असो की, वृक्ष तोडीचा की, बिल्डर्सनी फसवल्या गेलेल्यांचं गाऱ्हाणं असो की, सराफा व्यावसायिकांचा संप, सर्वजण राज ठाकरेंना साकडं घालतात असं चित्र आजही आहे. पक्षबळ वाढो अथवा कमी होवो राज यांना टाळून महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता येत नाही, अशी स्थिती अजूनही कायम आहे. या पार्श्वभूमीवर आणि मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असताना राज यांच्या पाडव्याला झालेल्या सभेकडे सर्वांचंच लक्ष होतं.

राज ठाकरे यांच्या सभेला प्रतिसाद मोठ्ठा मिळाला आणि त्यांनी फटकेबाजी केली चांगली पण, जेव्हा ‘कंटेंट’चा मुद्दा येतो तेव्हा हाती ताशेरेबाजीशिवाय काहीच लागत नाही. राज यांच्या राजकीय आकलनाची क्षमता मोठी आहे. (हे प्रमाणपत्र दस्तुरखुद्द ‘जाणता राजा’नं एका मुलाखतीत दिलंय!) त्याचा प्रत्यय याही भाषणात आला. त्यांनी महत्वाच्या बहुतेक सर्व मुद्द्यांना किमान स्पर्श तरी केला पण, कार्यकर्त्यांना कार्यक्रम देण्यात त्यांना पूर्ण अपयश आलं. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे उतरणार याचं स्पष्ट सूचनही राज ठाकरे यांनी का केलं नाही, हे कोडंच आहे. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर इतकी भलीमोठी (!) आगपाखड करण्याऐवजी ‘लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यात चूक झाली’ एवढ्या एकाच वाक्यात राज यांनी झालेल्या चुकीची कबुली दिली असती तरी पुरेशी होती.

स्वतंत्र विदर्भ मागणाऱ्या श्रीहरी अणे आणि महाराष्ट्राचे चार राज्यात विभाजन करावं अशी मागणी करणाऱ्या. मा.गो. वैद्य यांच्यावर ‘ठाकरी’ शैलीत टीका करणारे राज ठाकरे हे विसरले की त्यांनी शिवसेना फोडूनच मनसेची स्थापना केली आहे! वैद्य आणि अणें हे महाराष्ट्र फोडायला निघाले आहेत, तुम्ही तर सेना फोडून कधीचेच मोकळे झाले आहात, याचा सोयीस्कर विसर राज यांना पडला. संयुक्त महाराष्ट्राचा मी कट्टर समर्थक आहे तरी, लोकशाही मार्गानं वेगळा विदर्भ मागण्याचा अधिकार अमान्य करुन कोणाही विदर्भवाद्याची टिंगल किंवा उपमर्द करणं योग्य नाहीच, ही माझं ठाम मत आहे. (अर्थात याचा अर्थ, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना चोर-दरोडेखोर म्हणण्याचा किंवा केक कापून महाराष्ट्राचे तुकडे झाल्याचा संकेत देण्याचा थिल्लरपणा करणं, मुंबईत राहून स्वतंत्र विदर्भाची चळवळ चालवणाऱ्या श्रीहरी अणेंना मुळीच शोभत नाही. असं वागून श्रीहरीअणे महाराष्ट्रातील लोकांना डिवचत आहेत आणि त्याची विपरित प्रतिक्रिया उमटू शकते.) श्रीहरी अणे, मा.गो. वैद्य यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या अजातशत्रुत्वाचा उल्लेख ज्या शब्दात राज यांनी केला तो, त्यांच्या ‘ठाकरी’ शैलीत फिट्ट बसणारा असला तरी तो शिष्टाचारसंमत नाही. या अशा शेरेबाजीमुळे राज यांना फायदा होण्याऐवजी तोटाच होईल कारण इतका फटका बसूनही राज ठाकरे यांना अद्याप जाग आलेली नाही अशी भावना लोकांत आहे.

//२//

डॉ. भालचंद्र नेमाडे हे मराठीत अत्यंत महत्वपूर्ण स्थान असलेले साहित्यक, म्हणूनच त्यांचा ‘ज्ञानपीठ ते जनस्थान’ असा सन्मानप्राप्त प्रवास झालेला आहे. कसदार साहित्य निर्मितीपेक्षाही वादग्रस्त वक्तव्यामुळे नेमाडे जास्त प्रसिद्धी मिळवतात हे, आजवर अनेकदा अनुभवाला आलंय. ‘कोसला’ हिट झाल्यावर ‘कथा हा साहित्य प्रकार नाही’, या त्यांच्या वक्तव्याने सुरु झालेला आक्रस्ताळ्या वादग्रस्तपणाचा प्रवास अद्याप थांबलेला नाही. स्व निर्मित साहित्य वगळता अन्य साहित्य प्रवाह आणि ते निर्माण करणाऱ्या बहुसंख्य साहित्यिकांविषयी यथेच्छ तुच्छता, हे भालचंद्र नेमाडे यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तुच्छतेच्या बाबतीत ते कुबेर आहेत, त्यांच्या या अशा वक्तव्याला, इतिहासाचं तोकडं आकलन असणाऱ्यांकडून टाळ्या आणि सत्याविषयी आग्रही नसणाऱ्या पत्रकारांकडून प्रसिद्धी भरपूर मिळते. मराठी साहित्य वाचणाऱ्या आणि लिहिणाऱ्या सर्व प्रवाहातील बहुसंख्य साहित्यिकांनीही ‘कोसला’कारांची साहित्यिक कामगिरी आणि त्यांनी झाडलेल्या दुगाण्या कायमच अत्यंत भक्तीभावाने वाखाणत स्वीकारल्या आहेत. ज्या शहराने लेखनाचे विषय पुरवले (हे नेमाडे यांचे म्हणणे आहे) त्या औरंगाबाद शहरातीलही एकजात बड्या-बड्यांना नेमाडे यांनी केलेला ‘गोळीबार’ चुकविता आलेला नाही. ‘कोसला’ची पहिली आवृत्ती प्रकाशित करणाऱ्या देशमुख आणि कंपनीच्या हिताची काळजी घेणारांनी, भालचंद्र नेमाडे हे दुगाण्या कशा झाडतात याचे पुरावे म्हणून जो काही पत्रव्यवहार खुला केला त्यामुळे पितळ उघडे पडले तरी त्यापासून धडा न घेता ऐकणारांना चमचमीत ‘डिश’ वाटेल अशी ताशेरेबाजी कशी करावी, याचं चपखल उदाहरण म्हणजे, भालचंद्र नेमाडे यांचं औरंगाबाद शहरी नुकतंच केलेलं वक्तव्य आहे.

आमचे मित्रवर्य बाबा भांड यांनी सुरु केलेल्या भव्य पुस्तक दालनाचं उद्घाटन करण्यासाठी भालचंद्र नेमाडे नुकतेच औरंगाबादला येऊन गेले. उद्घाटन संपल्यावर बाबा भांड यांच्या स्तुतीपर चार शब्द बोलून प्रस्थान करण्याच्या पंथातील असावेत ते नेमाडे कसले ? उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यावर त्यांनी त्यांच्या औरंगाबादेतील चाहत्यांशी संवाद साधला. बाबा भांड सध्या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत. साक्षरता अभियानात केलेल्या कथित गैरव्यवहारामुळे बाबा भांड यांच्या विरोधात पंधरा-एक वर्षापूर्वी काही गुन्हे दखल झालेले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. बाबा भांड यांची साहित्य आणि संस्कृती मंडळावर नियुक्ती झाल्यावर ते गुन्हा प्रकरण उकरून काढत त्यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने काही बातम्या प्रकाशित केल्या. तो संदर्भ पकडून पत्रकारीतेवर नेमाडे यांनी ताशेरे ओढले. पुढे जाऊन, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते तेव्हा, त्यांच्या व्यसनाधीन पुत्रावर परदेशात उपचार करण्यासाठी मंडळाच्या पैशाचा वापर करण्यात आला, तरी तेव्हाचे बडे संपादक गोविंदराव तळवलकर, अरुण टिकेकर आणि अनंत भालेराव कसे गप्प बसले, म्हणजे या बड्या संपादकांचे पाय कसे ‘माती’चे होते (सूचन- तर्कतीर्थ ब्राह्मण आणि तळवलकर-टिकेकर-भालेराव हेही ब्राह्मण!) असा गौप्यस्फोट नेमाडे यांनी केला. डॉ. नेमाडे यांनी यासाठी साक्ष काढली ती समीक्षक म.द. हातकणंगलेकर यांची. यातलं अज्ञान असं की, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मंडळाचे अध्यक्ष होते, तेव्हा अरुण टिकेकर पत्रकारितेत नव्हते आणि यातील गोम अशी की नेमाडे यांनी संदर्भ दिलेल्या म.द. हातकणंगलेकर यांची साक्ष काढावी तर ते आता हयात नाहीत!

बरं, तेव्हा वार्ताहरानं तर्कतीर्थांच्या गैरव्यवहाराची बातमी दिली आणि ती बातमी तळवलकर किंवा भालेराव यांनी रोखली असं काही आजवर कधीच ऐकू आलेलं नाही. तेही सोडा, तर्कतीर्थ जोशी यांनी असा काही गैरव्यवहार केला म्हणून मंडळाच्या कोणा सदस्यानं कधी तक्रार केली किंवा मंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला, अशीही नोंद नाही. अशी ही सगळी ‘सांगोवांगी’ आहे. (म्हणून ‘तसं’ काही घडलं नसेलच असा माझा दावा नाही.) महत्वाचं म्हणजे आता, सुमारे पाच दशकांनंतर तर्कतीर्थांसंबधी काही तरी उकरून काढण्याऐवजी त्याचवेळी ही बाब नेमाडे यांनी का उघड केली नव्हती हे एक कोडंच आहे. तक्रार नाही, गुन्हा नाही आणि पुरावाही नव्हता तरी ‘कोसला’मुळे ख्यातकीर्त झालेले डॉ. भालचंद्र नेमाडे सांगतात म्हणून, तेव्हा पत्रकारांनी तेव्हा बातमी करून या प्रकरणाला वाचा नक्कीच फोडली असती!

इकडे बाबा भांड यांच्याविरोधात (आकसबुद्धीनं का असेना) गुन्हा दाखल झालेला आहे, न्यायालयात खटला दाखल झालेला आहे, आरोपपत्र सादर झालेलं आहे. गुन्हा दाखल झाला की, त्याची बातमी होणारच आणि ती तशी झाली म्हणून अकाडतांडव करण्यात काहीच मतलब नाही, हे काही नेमाडे यांना समजत नाही असं नाही. पण, खोटं रेटून बोललं की ते अनेकांना खरं भासतं आणि पार्श्वभूमी माहिती नसलेल्यांना तेच सत्य वाटतं हे चांगलं ठाऊक असल्यानं, भालचंद्र नेमाडे यांनी त्यांना वाट्टेल तशी ताशेरेबाजी केली, यापेक्षा त्यांच्या या बोलण्याला फार महत्व नाही. (एक आठवण- या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर औरंगाबाद ते बीड रस्त्यावर असलेल्या बाबा भांड यांच्या शेतातील घरावर तेव्हा पडलेल्या धाडीच्या वेळी लांच लुचपत खात्याच्या अधिकाऱ्यासोबत मीही होतो. तेव्हा मी औरंगाबादला ‘लोकसत्ता’चा खास प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो. लांच लुचपत प्रतिबंधक खात्याकडून धाड कशी टाकली जाते हे बघायला मी गेलो होतो. तेथे करण्यात आलेले पंचनामे, जप्त केलेली कागदपत्रं आणि सामानाचा मी साक्षीदार आहे. अर्थात माझी उपस्थिती ‘अधिकृत’ नव्हती पण, त्याला दुजोरा देणारे दोन अधिकारी आजही पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यापैकी एक सध्या उपायुक्त म्हणून पुण्यात तर दुसरे औरंगाबादला आहेत.)

ज्या प्रकरणात कोणी तक्रार केली नाही, चौकशी नाही, गुन्हा नाही अशा प्रकरणात भालेराव-तळवलकर-टिकेकर संपादक आलेल्याच नव्हे तर अन्य कोणीही संपादक-मालक असलेल्या वृत्तपत्रात अशा बातम्या येत नसतात हे नेमाडे यांना माहिती नाही, हाही या वक्तव्याचा अर्थ आहे. अशा सांगोवांगी घटना साहित्यात रंगवता येतात आणि फुगवूनही सांगता येतात, पत्रकारितेत नाही. तसं केलं तर कोर्ट-कचेरीला सामोरं जावं लागतं. एकूण काय तर, ‘कोसला’कारांचं हे भाषण चमचमीत बातम्यांचा विषय आणि त्यामुळं टीआरपी मिळवणारं असलं तरी ‘कंटेंट’ म्हणून शून्य होतं!

//३//

नेमाडे यांच्या वक्तव्याचे पडसाद केवळ साहित्य वर्तुळातच उमटण्याची शक्यता आहे (आणि नाहीही!) पण, त्यातून नेमाडे यांना आता गमावण्यासारखं काहीच नाही. राज ठाकरे यांना अजून मात्र बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांना महाराष्ट्राची सत्ता एकहाती हवी आहे, अशा ताशेरेबाजीतून टाळ्या नक्की मिळतील, सत्ता मिळणं मात्र अवघडच आहे, याचा विसर राज यांनी पडू देता कामा नये. त्यामुळेच, प्रतिमा आणि कुवत असणाऱ्या राज ठाकरे आणि भालचंद्र नेमाडे यांनी अभ्यासपूर्वक (?) केलेल्या या वक्तव्यांना सुमार ताशेरेबाजी वगळता काहीही महत्व नाही!

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
[email protected]
9822055799 / 9011557099
भेट द्या – www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट

 • Uday Kulkarni….
  राज ठाकरेंनी मागील निवडणुकीत ज्याप्रकारे खेळी केल्या त्यामुळे एकदम स्पष्ट झाले की केवळ शिवसेनेचे उमेदवार पाडणे हाच त्यांचा मुख्य हेतू आहे. तिथेच एकदम त्यांच्या विषयी भ्रमनिरास झाला.

 • Dr.Sharad Khare….
  Raj wouldn’t understand.

 • Pradeep Gawande….
  बुडत्याला काडीचा आधार

 • Narendra Gangakhedkar….
  Sadetod. Chhan lihilay.

 • Manas Pagar….
  सर, तुमचा ब्लाॅग मी नेहमीच वाचतो. तुमचे लिखाण अतिशय सुरेख, माहीतीपुर्ण असते.
  मला नेमाडेंबाबत एक निरीक्षण नोंदवायचे आहे. फारसे साहीत्य नसतांना मिळालेली प्रसिद्धी, त्यांचा साहीत्य प्रांतात अड्डा जमवण्याची पद्धत, इतरांना तुच्छ लेखून वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणे. आणि नेमाडे भक्त आणि विरोधक ह्या दोनच गटात त्यांचा वाचक वर्गाची होणारी विभागणी हे बघायला मिळत आहे. आमचे एक मित्र तर त्यांचावर सिनेमा देखील काढत आहे.
  प्रचंड निराशेचा भुरळ टाकण्यासाठी वापर करणे पण त्यातून काहीच हाती न लागणे हे नेहमीच त्यांचा लेखणातून जाणवते.
  नेमाडे त्यांचावर होणार्‍या टिकेला उत्तर देणे जरुरी समजत नाही..ते अनुल्लेखाने मारतात..
  देशीवाद, जातीसंस्था इ. बाबत त्यांची मते, बरेच आक्षेप आहेत…तरीही एवढी अमाप लोकप्रियता कशाचा जोरावर ?

  • काही लोकांना कायम वादग्रस्त राहण्याची सवय असते त्यात नेमाडे आहेत . यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे ते सुखावत असणार ! जाती संस्थेचं ते करत असलेलं समर्थनही मला मान्य नाही कारण आपल्या घटनेने नमूद केलेल्या समतेच्या ते विरुद्ध आहे . असो , तुमची कमेंट ब्लॉगवर समाविष्ट करतो आहे . एकदा बोलू यात .

 • Ravindra Nilawar….
  दोघेही सडेतोड आणि फटकळ.ताशेरेबाजीत तरबेज,त्यांचे विचार काही प्रमाणात कळतातही पण जणाधार मिळवण्यात यश मात्र मिळत नाही कारण बोलणे,ताशेरे मारने खुपच सोपे.आपण जे बोलतो ते प्रत्यक्षात कृतीत दिसत नाही.त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास होतो.भाषणबाजी उत्तमच…आता लोकाभिमुख कामाची अपेक्षा आहे.

 • Jitendra Sarjerao Tate ….
  13 to 1 towards Zero.

 • Surendra Deshpande….
  raj ha bal thakareche style maranyacha prayatna karato.parantu sr tharaechya kalat to paksha congress funded hota. tasi vyavastha ata nahi ani faund nasel tar kahi karu shakat nahi. raj sampun jail.

 • Amol Ravankar….
  Jay Maharashtra! !!

 • Ashok Shriram Khune….
  आवडल नाही

 • Rajesh Bobade….
  मला आवडलं बुवा

 • Ravindra Nilawar….
  खरतर हल्लीचे राजकारणी कुठल्याही पक्षाचे असोत गंभीर निश्चितच नाहीत हीच वास्तविकता आहे.एकमेकांवर चिखलफेक करण्यासाठी आणि टिंगल -टवाळी तसेच नकला करण्यासाठीच त्यांना वेळ कमी पडतो.आता नेतेच सैरभैर झालेत तर चाटूगीरी करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल न बोललेले बरे.

 • Shoeb Sayed….
  i support nemade. nemade is studied. raj thakre is opportunist and should read the books of his grandpa prabodhankar thakre, especially ‘devlancha dharm ani dharmanchi devle’

  • बलुतेदार प्रथा आणि जातीच्या उतरंडीचे समर्थन करणाऱ्या नेमाडे यांना ‘डी-क्लास’ हवं असणारे कम्युनिस्ट पाठिंबा देतात हे एक आश्चर्य !

 • Prakash Paranjape….
  एकाच दिवश़ी दोन वेगळ्या गावात दोन वक्ते बोलले म्हणजे दोघांनी फक्त पिंका टाकल्या. एकाने टाळ्या घेण्यासाठी आणि दुसर्याने सडेतोड बोलतांना मी कोणालाही फाट्यावर मारु शकतो हे सिद्ध करण्यसाठी. विद्यार्थी असताना कोसला आणि काव्यसंग्रह मेलडी वाचून मी भारावलो होतो हे कबूल. जरीला, झूल आणि आताच आलेली हिंदू मी वाचली तरीही मी नेमाडपंथी नाही. प्रश्न कंटेंटचा आला की कोण बोलला हे महत्वाचे नसतेच. Calling spade is spade , is important . तुम्ही नेमके तेच केले आहेत.

 • Dhruva Vaidya ·….
  It is always dangerous to play for ” gallery ” and i think these both persons love to do so .

 • Anil Khandekar ·….
  कोणत्याही प्रकारची शेरेबाजी न करता लेख वाचनीय झाला आहे. नेमाडे आणि राज ठाकरे यांच्या भाषणातील फोलपणा उघड केला आहेत. दोघाबद्धल फारशी अपेक्षा नाहीच आहे. नेमाडे यांच्या बद्धल वाईट वाटते कि प्रथितयश लेखककडून सुमार शेरेबाजी ऐकायला लागावी. ज्यावेळी त्यांनी लघुकथा यासाहित्य प्रकारबद्धल शेरेबाजी केली , नंतर लिहिले पण. त्यावेळी एक सामान्य वाचक म्हणून मला प्रश्न पडले. जीए च्या दीर्घकथा , अरविंद गोखले जे निष्ठेने कथालेखन करत राहिले ते आठवले. गाडगीळ, माडगुळकर , पानवलकर , कमाल देसाई — माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे मराठीकथा समृद्ध आहे. इतर भाषेतील पण कथा समृद्ध आहेत. मला प्रश्न पडला आपली आवड , जाण यामध्ये काही खोट आहे का ? मग त्यांची फटके बाजी आणि कंपूशाही जाणवू लागली . विशिष्ट लोक त्यांना सतत पाठींबा देत असतात. असे जाणवले. असो.

 • Shahu Patole…
  नेमाडेसर वैयक्तिक कसे का असेनात पण त्यांच्या ‘कादंबरयांचे’ काय करायचे ?

  • काय करायचं म्हणजे काय ? नेमाडेंच्या कादंबऱ्या वाचायच्या ! विरोध त्यांच्या वाचाळपणाला आहे त्यांच्या लेखनाला नाही !

 • Pravin D Kulkarni ….
  समाजातील नकारात्मक व्यक्ती आणि त्यांचे बोलणे यावर वेळ का वाया घालवायचा…!
  हि सर्व मंडळी म्हणजे सगळे पोपट आणि सरडे यांचे मिश्रण आहे..

 • Avadhut Prabhakar Galphade ….
  सरस्वती चा वर प्राप्त असतांना , विनाकारण सवंग प्रसीध्दी कशा साठी ? शेवटी योग्य तेच समाज स्विकारतो.

 • Jaya Natu….
  ब्लॉग वाचला . नेमाडेंवर चर्चा करून शक्तीचा अपव्यय टाळावा असे मला वाटते .

 • Narendra Gangakhedkar….
  लेखनातही तितकाच वाचाळपणा आहे . त्यांच्या पहिल्याच कादंबरीत सर्व मान्यवर साहित्यिकांना असेच झोडले आहे . ज्यांना झोडले त्यांच्या नावाचाच पुरस्कारही घेतला आहे .भंपकपणा .