राणे नावाची महाशोकांतिका…

शेवटच्या टप्प्यात काही प्रकाशवृत्त वाहिन्यांचे काही पत्रकार आणि त्या वाहिन्यांवरचे काही तथाकथित राजकीय विश्लेषक यांचे ‘विशफूल थिंकिंग’ वगळता अपेक्षेप्रमाणे बांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नारायण राणे दणकून हरले. शेवटच्या टप्प्यात या वाहिन्यांनी ‘राणे जोरदार टक्कर देणार’, ‘कदाचित ते विजयी होणार’, असे जे ‘हाईप’ केले त्यामागची कारणे काहीही असोत पण, दस्तुरखुद्द राणेही हे कव्हरेज बघताना गालातल्या हंसत असणार, याविषयी माझ्यासारख्या असंख्याच्या मनात शंका नाही. कारण आपण हरणारी लढाई लढलो आहोत याची पक्की जाणीव प्रचार संपल्यावर नारायण राणे यांना झालेली नव्हती, हे म्हणणे भाबडेपणा तरी होता किंवा स्वत:ची शुद्ध फसवणूक तरी.

नारायण राणे यांच्याशी पहिली भेट झाली ती १९९६साली. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरु असताना तत्कालीन महसूल मंत्री सुधीर जोशी यांच्या रवी भवनातील निवासस्थानी आम्ही ब्रेकफास्ट घेत असताना पांढरे बूट, पांढरी विजार आणि अर्ध्या बाह्यांचा पांढरा शुभ्र सदरा घातलेले, लहान चणीचे नारायण राणे तेथे आले. सुधीर जोशी यांनी ओळख करून दिली तेव्हा सर्वात प्रथम मनावर ठसली ती त्यांची भेदक नजर आणि ओतप्रोत भरलेला आत्मविश्वास. नंतर हळूहळू राणे जोशात येत गेले.. त्यांच्याविषयी अनेक कथा आणि दंतकथा प्रसारित होऊ लागल्या. सुधीर जोशी यांच्या अपघातानंतर महसूल खात्याचा कारभार राणेंकडे आला. या कथात आणि दंतकथात आणखी भर पडली.. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नावं चर्चेत आले आणि दर पंधरा-वीस दिवसांनी त्यांच्या शपथविधीच्या तारखा प्रसारित होऊ लागल्या. एकदा अशीच तारीख जाहीर झालेली असताना महसूल मंत्री म्हणून नारायण राणे घेतलेल्या एका नागपूरच्या भूखंडाबाबतच्या वादग्रस्त निर्णयाची बातमी मी दिली आणि गहजब झाला. उच्च न्यायालयात त्या निर्णयाविरुद्ध एक जनहित याचिका दाखल झाली. राणे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलला गेला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ती बातमी माझ्यामार्फत पेरली असा राणे यांचा समज झाल्याचे काही पत्रकारांनी मला सांगितले. ती बातमी मला एका सनदी अधिका-याने दिलेली होती आणि ते कागद मी राणे यांच्याच कार्यालयातून मिळवले होते (माझ्या ‘डायरी’ या पुस्तकात ती हकिकत सविस्तरपणे आलेली आहे ). नंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत शासकीय विमानात प्रवास करताना दोन वेळा आणि मुख्यमंत्री झाल्यावर पत्रकार परिषदेत २/३ वेळा राणे यांची भेट झाली पण बोलणे नाही.. केवळ नमस्कार घेणे-देणे वगैरे घडले.

मुख्यमंत्री झाल्यावर राणे यांच्या कर्तबगारीचे पोवाडे काही मंत्री, काही सनदी अधिकारी आणि काही पत्रकार गाऊ लागले. त्यांची धडाकेबाज निर्णयक्षमता, एखाद्या विषयाचा अभ्यास करण्याची चिकाटी, त्यांचे (मला अनुभवायला न मिळालेले!) दातृत्व आणि जनसंपर्क, वक्तृत्व प्रभावी होण्यासाठी ते घेत असलेले श्रम… अशा अनेक बाबी त्यात ओसंडून वाहात असत. मग निवडणुका झाल्या, राणे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांची तोफ सभागृहात गर्जू लागली.. त्यांचे विस्तृत सांसदीय आकलन आणि जनाधार अफाट कसा आहे, याच्या कथा प्रसारित होऊ लागल्या.. नंतर त्यांनी शिवसेनेत केलेले बंड.. उद्धव ठाकरेंवर असंस्कृत पातळीवरचा चढवलेला तुफानी हल्ला.. काँग्रेस प्रवेश.. मग त्यांची त्या पक्षात झालेली यांनी घुसमट.. काँग्रेसमध्ये त्यांनी केलेले आणि फसलेले बंड…असा तो एकंदरीत प्रवास आहे.

एक स्पष्ट केले पाहिजे – आस्मादिकांनी एक पत्रकार म्हणून राणे यांना दुरूनच पहिले. मी कधीच त्याच्या गोटातील ‘जवळ’चा किंवा दूरवरचाही नव्हतो आणि आता तर नाहीच नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे नारायण राणे मला आवडतात ते भेदक नजरेमुळे, त्यांच्यातील चिवट अभ्यासूपणामुळे, अफाट क्षमतेमुळे, जबरदस्त जिगरबाज वृत्तीमुळे आणि समोर येईल ते, तसेच बिनधास्तपणे अंगावर घेण्याच्या शैलीमुळे. खरे सांगायचे तर.. घुसमट झाली, दुय्यम वागणूक मिळाली वगैरेमुळे शिवसेना सोडली या त्यांच्या म्हणण्यात मला सुरुवातीला तथ्य आणि उद्धव यांचे काही तरी चुकत आहे असे वाटत असे. पण, ज्या शैलीत आधी राणे यांनी उद्धव यांचा उद्धार केला आणि अजूनही करतात, तो फारच टगेगिरिचा कळस गाठणारा म्हणून, असमर्थनीय असंस्कृतपणाचा तसेच टोकाचा अशिष्टाचारसंमत आहे असे माझे मत होत गेले. त्यांच्यातली चीड तसेच मग्रुरी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेल्या मनस्वी रागातून आली असे एक वेळ (खरे तर नाहीच!) समजता येईलही पण; काही वर्षापूर्वी एकदा त्यांच्या मतदार संघात पत्रकार ही ओळख न सांगता फिरलो तेव्हा त्या ‘मग्रुरी’मागची ‘दहशत’ कळली. त्यांनी स्वत:च्या पुत्रांनाच राजकारणात संधी दिली यातील तथ्य आणि घराणेशाहीच्या आरोपांत नाही म्हटले तरी थोडे तरी तथ्य आहे पण, नारायण राणे यांची आर्थिक मग्रुरी आणि दहशत त्यांच्या पुत्रांत वडिलांपेक्षा मणभर जास्त उतरली आहे हे ऐकायला येऊ लागले. मग त्यांच्या मतदार संघात फिरताना ते अनुभवले आणि टीव्हीच्या छोट्या पडद्यावर त्याचे दर्शनच घडू लागले तेव्हा मात्र, उद्धव ठाकरे हे कोणतीही भेसळ नसलेले सुसंस्कृतच वाटले, हे मोकळेपणाने मान्य केले पाहिजे. निकालानंतर गिरीश महाजन यांची औकात काढणारे राणे यांचीच औकात जनतेला पुन्हा एकदा समजली. (अशी औकातीची भाषा यापूर्वी राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांबद्दल आणि शिवराळ टीका राहुल गांधी यांच्यापासू विलासरावांपर्यंत अनेकांवर केली आहे) मतदानाच्या दिवशी मतदार संघात फिरणाऱ्या नारायण राणे आणि त्यांचे दोन पुत्र या तिघांचीही भाषा तसेच देहबोली कोणत्याही टपोरी गावगुंडापेक्षा वेगळी नव्हती आणि गेल्या दोन पराभवातून हे तिघेही राणे काही म्हणजे काहीच शिकलेले नाहीत याची साक्ष देणारी होती, हे जास्त चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ही अशी वृत्ती फोफावली तर ते फारच भयंकर होईल म्हणूनच ‘राणेवृत्ती’ राजकारणात नको हा समज ठोस करणारी होती.

हे असे का घडत असावे किंवा घडले असावे ? सेनेत आपली घुसमट झाली आणि त्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत हा नारायण राणे यांचा समज झाला आणि तो पुढे दृढ झाला, असे घडणे ही एक मानसिक धारणा असते आणि ती दृढ झाल्यावर बदलणे कठीण असते. त्याचप्रमाणे, अंगावर घेणे आणि रक्ताचा थेंब-न-थेंब ‘शिवसैनिक’ असणे ही नारायण राणे यांची जडणघडण आहे. ही जडणघडणही शिलालेखी दीर्घायूष्यी आहे. या जडणघडणीतून नारायण राणे बाहेर पडू शकत नाहीत आणि एकाच वेळी लाचार, संधिसाधू, अस्सल-अर्क आणि बेरके कॉंग्रेसजन बनू शकत नाहीत ही खरी अडचण आहे. ‘शिवसैनिक’ असल्याची बावनकशी मानसिकता आणि रक्तच न बदलल्याने काँग्रेसजन आपली फरफट करणार याचा अंदाज राणे यांना सेना सोडताना आला नाही. याच कारणामुळे दहावर्ष कॉंग्रेसमध्ये घालवल्यावर या ‘गेम करण्याच्या’ काँग्रेसी मनोवृत्तीचा थांगपत्ता नारायण राणे यांना लागत नाहीये. म्हणून राणे नावाची महाशोकांतिका हा एका सृजनशील कवीसाठी महाकाव्य तर प्रतिभावंत नाटककारासाठी नाटक बेतण्याचा हा विषय आहे! असे काही लिहिले गेले तर ती एक वैश्विक अभिजात कलाकृती ठरेल याविषयी माझ्या मनात शंकाच नाही.

पत्रकारिता करताना विशेषत: १९९० नंतर भुजबळांपासून ते राणे-राज ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी शिवसेना सोडल्याचे पाहता आले. बाळासाहेब ठाकरे यांना घायाळ करून भुजबळ यांनी सेना सोडली त्या चित्तथरारक नाट्याचा साक्षीदार आणि वृत्तसंकलन करणाऱ्या पिढीतील मी एक. राज ठाकरे तर कधी भरून न येणारी जखम करणारा आघातच करुन गेले. भुजबळ आणि राणे यांच्यासोबत सर्वाधिक आमदार शिवसेना सोडून गेले. गणेश नाईक यांचासोबत सुरेश नवले यांच्यासारखे दुकटे गेले. सुबोध मोहिते, संजय निरुपम एकटेच सेना सोडते झाले. पण, पहिल्या फटक्यात यापैकी राणे वगळता कोणालाही निवडणुकीत विजय संपादन करता आला नाही. या सर्वांचीच सुरुवातीच्या काळात फरफट झाली. नंतर शरद पवार यांचा आधार घेत छगन भुजबळ राजकारणात स्थिरावले. राज ठाकरे यांचे यश एका विधानसभा निवडणुकीपुरते अल्पजीवी ठरल्याचे सध्या तरी दिसत आहे. नारायण राणे मात्र सेना सोडताना आमदारकीचा राजीनामा बाणेदारपणे फेकून दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नाकावर टिच्चून विधानसभा पोटनिवडणुकीत दिमाखदारपणे विजयी झाले. ते यश, ती लोकप्रियता, जनमानसावर मिळालेली ती पकड त्यांना टिकवून ठेवता आली नाही. नंतर राणे यांची घसरण सुरु झाली. याची कारणे तीन; एक- शिवसैनिक म्हणून जडणघडण विसरून त्यांनी सत्तेसाठी झालेली केलेली अगतिकसदृश्य तडजोड, दोन- टोकांधळे पुत्रप्रेम , तीन- ज्या ‘टक्केवारी’चे एकेकाळी स्वत:च पाईक आणि वाटेकरी होऊन अफाट ऐश्वर्य तसेच सत्ता प्राप्त केली त्या टक्केवारी तसेच पक्षनिष्ठेबद्दल शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर पातळी सोडून सतत केलेले वक्तव्य. या संदर्भात उल्लेखनीय म्हणजे छगन भुजबळही ठाकरेंवर टीका करत, बाळासाहेब ठाकरे तर त्यांचा ‘लखोबा लोखंडे’ असा उल्लेख करत पण, भुजबळ यांनी ‘टी बाळू’ असे काही मोजके अपवाद वगळता शिवसेना, बाळासाहेब आणि उद्धववर जहरी टीका केली नाही. गणेश नाईक यांनी तर असे कोणतेही वक्तव्य अपवादानेही केल्याची आठवत नाही. नारायण राणे मात्र सेना सोडल्यावर पहिल्या विजयाने घसरले, पुत्राच्या लोकसभेवरील विजयाने ही घसरण वेगाने झाली.. नंतर अशोक चावान मंत्री मंडळात मंत्रीपद स्वीकारण्याची अगतिकता दाखवल्यावर तर ती घसरण वेगानेच होत गेली. त्यामुळे शिवसैनिक डिवचला गेला आणि परिणामी ज्या मातोश्रीच्या अंगणात नारायण रोपटे नावाचे जन्मले.. बहरले त्याच मातोश्रीच्या अंगणात ते मुळापासून उखडले गेले… म्हणून म्हटले, नारायण राणे ही मोठी फरफट झालेली महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महाशोकांतिका आहे!

झाले गेले विसरून आणि स्वभावाला मुरड घालत या पराभवातून तरी राणे धडा स्वीकारतील अशी आशा बाळगू यात आणि नारायण राणे यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा आपण देऊ यात. कारण या माणसात अफाट क्षमता आणि सुधारणेला वाव आहे असे अजुनही वाटते. राणे स्वीकारतील की नाही याबद्दल शंका वाटते पण, अशा शुभेच्छांची पराभूतांना आणि सुधारणांवाद्यांना कितीही नाही म्हटले तरी गरज असते….

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट