राहुलसमोरील आव्हाने !

गुजरात  विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असतांना, कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुप्रतिक्षित असलेला राहुल गांधी यांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. २८ डिसेंबर १८८५रोजी स्थापन झालेल्या म्हणजे १३२ वर्षांची परंपरा असलेला कॉंग्रेसचा विचार, या विचारानं या देशाला दिलेलं राजकीय मॉडेल, हा मूळ पक्ष फुटल्यावर १९६९ साली झालेल्या काँग्रेस (आय किंवा इंदिरा) पक्ष आणि या पक्षानं देशावर सत्ता राबवताना जे काही चांगले आणि वाईटही पायंडे पाडलेले आहेत, ते भलं-बुरं संचित घेऊन या पदावर राहुल गांधी आले आहेत. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि देशाची जी काही प्रगती आज झालेली दिसते आहे त्यात नेहेरु-गांधी घराणं आणि कॉंग्रेसचं योगदान मोठं आहे; राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांनी तर या देशासाठी प्राणाचं मोल दिलेलं आहे; ते कधीच न शमणारं दु:ख उरी बाळगत राहुल गांधी एक मोठी राजकीय इनिंग्ज खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत.

हिंदुत्वाचा एकांगी विचार करणारांनी या देशात गांधी आणि नेहेरु यांची अवहेलना व द्वेष करण्याची निर्माण केलेली एक दीर्घ तिरस्करणीय परंपरा आहे; गांधी आणि नेहेरुंच्या व्यक्तीगत चारित्र्यावर असभ्य पद्धतीने शिंतोडे उडवले जाण्याचा एक अत्यंत असंस्कृत विखार त्या परंपरेत आहे. तो विखार आणि तो द्वेष राहुल गांधी यांच्याही वाट्याला आला; यापुढेही येणार आहे. पप्पू, शहजादापासून ते न झालेल्या किंवा न केलेल्या विवाह-व्यसनांपर्यंत या प्रचाराचा विस्तार आहे. सर्वधर्मसमभाव हा पाया असलेल्या या देशाच्या लोकशाहीत राहुल यांची जात आणि धर्मही प्रचाराच्या ऐरणीवर आणण्याचा अशिष्टाचार आता केला गेलेला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आधी आजी इंदिरा, नंतर पिता राजीव यांना गमावल्यावर स्वत:ची ओळख लपवून बालपण आणि तरुणपण, कायम अत्यंत असुरक्षित वातावरणात व्यतीत करावं लागण्याची आणि पोरकेपणाची भळभळती भावअवस्था राहुल यांच्या वाट्याला आलेली आहे; चहा विकणारा पंतप्रधान झाल्याची चर्चा ‘गर्व के साथ’ करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांत ती भावअवस्था समजून घेण्याइतकी सहिष्णुता नाही.

अर्थात दोष केवळ विरोधकांना देऊन चालणार नाही. काँग्रेसमध्येही दिग्विजयसिंह, माणिशंकर अय्यर असे एक से एक वरचढ वाचाळवीर आहेत (हा मजकूर लिहित असतांनाच जीभेने केलेल्या गुस्ताखीबद्दल अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय) शिवाय अजून न आलेला राजकीय समंजसपणा व प्रगल्भता यामुळे राहुल यांनीही विरोधकांच्या हाती अनेकदा कोलीत दिलेलं आहे; देशाच्या पंतप्रधानांची जाहीर अवहेलना करण्याची असभ्य पातळी त्यांनी गाठलेली होती, हे विसरता येणार नाही. असं असलं तरी, गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेत येवो वा न येवो राहुल आणि कॉंग्रेसनं नरेंद्र मोदी-अमित शहा दुक्कलीला संत्रस्त करुन सोडलेलं आहे, यावरून अलिकडच्या काळात (संघात शॉर्ट घातलेल्या मुली दिसत नाहीत हा अपवाद वगळता) राहुल यांच्यात बरीच सुधारणा दिसते आहे. नेतृत्व स्वीकारायचं किंवा नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य म्हणा की तो असला-नसला अधिकार वापरण्याची मोकळीक, सत्तेसाठी हपापलेल्या बहुसंख्य काँग्रेस नेत्यांनी आधी राजीव, मग सोनिया आणि आता राहुल गांधी यांना मिळू दिलेली नाहीये. कारण ‘गांधी’ नावाचं नेतृत्व ही या कॉंग्रेसची अगतिक अपरिहार्यता आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणा-न-कोणा गांधीला नेता म्हणून स्वीकारणं ही सर्व वयोगटातील काँग्रेसजनांची मजबुरी कशी आहे, हे समजून घेण्याचा उमदेपणा आपणही दाखवायला हवा!

१९ जून १९७०ला नवी दिल्लीत जन्मलेल्या राहुल यांनी राजकारणात प्रवेश करुन आता सुमारे दीड दशक उलटलं आहे. पक्षाचं उपाध्यक्षपद त्यांनी स्वीकारण्याला येत्या जानेवारीत चार वर्ष पूर्ण होतील. (राहुल यांच्या त्या नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या ‘राज्याभिषेकाचा’ प्रस्तुत भाष्यकार एक पत्रकार म्हणून साक्षीदार आहे!) अलिकडच्या काही वर्षात काँग्रेसचा सतत संकोच होत आलेला आहे. देशावर आघात करणारा आणीबाणीसारखा निर्णय घेतल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्यासकट अनेक दिग्गजांचा पराभव झाला तरी कॉंग्रेसला साडेचौतीस टक्के मतं मिळालेली होती. श्रीमती सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यावर तर काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तारुढ झाला. उपाध्यक्ष म्हणून नेतृत्वाची इनिंग राहुल गांधी यांनी सुरु केल्यावर झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला जेमतेम १९ टक्क्यांपेक्षा किंचित जास्त मतं आणि केवळ ४४ जागा मिळाल्या; त्यामुळे लोकसभेतील विरोधीपक्ष नेतेपदही गमवावं लागलं; दिल्ली विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला; महाराष्ट्र, उत्तरप्रदेशसह अन्य काही विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संघांच्या निवडणुकांतही कॉंग्रेसला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे; कर्नाटकसारखं एकमेव राज्य वगळता एकाही मोठ्या राज्याची सत्ता हाती नाही; गोव्याची हाती आलेली सत्ता (दिग्विजयसिंह यांच्या) गाफिलपणामुळे गमवावी लागलेली आहे…इतक्या व्यापक विपरीत परिस्थितीत आणि नैराशाच्या गर्तेत सापडलेल्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे राहुल हे पहिलेच नेते आणि ‘गांधी’ आहेत. कॉंग्रेसची अशी दुर्दशा होण्याला केवळ राहुल गांधी यांना जबाबदार धरणं बेजबाबदारपणा आहे. (या संदर्भातील सविस्तर विवेचनासाठी गावकरी या दैनिकाच्या दिवाळी अंकाला दिलेल्या मुलाखतीचा https://goo.gl/NjJvj6 या लिंकवरील मजकूर बघावा.) अलिकडे झालेल्या निवडणुकांत जनतेनं काँग्रेसला नाकारण्यामागे बेसुमार भ्रष्टाचार, नेत्यांमध्ये आलेली अक्षम्य मग्रुरी, पक्षात कार्यकर्त्याला मिळालेली दुय्यम वागणूक यासह अनेक कारणं आहेत. कारणांच्या त्या चक्रव्युहाचा भेद करण्याचं आव्हान राहुल गांधी यांच्यासमोर आहे. कॉंग्रेसचा संकोच झाला ही वस्तूस्थिती असली तरी कोणी काहीही वल्गना करो, एक राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसची पक्ष पाळंमुळं अजून देशव्यापी आणि घट्ट आहेत; नजिकच्या भविष्यात तरी ती उखडून फेकल्या जाण्याची सुतराम शक्यता नाही. गरज आहे ती, त्या पाळंमुळांचं काळजीपूर्वक संगोपन करण्याची; ती जबाबदारी आता राहुल यांच्यावर आलेली आहे.

प्रत्यक्षात राहुल गांधी यांच्या समोरील आव्हाने विरोधी पक्षांपेक्षा वैयक्तीक आणि पक्षांतर्गत जास्त आहेत. politics is a serious and full time business हे न विसरता यापुढे स्वत:तील राजकीय क्षमता, नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि प्रशासकीय पकड सिद्ध करण्यासोबतच निवडणुका जिंकून देण्याइतका स्वत:च्या नेतृत्वाचा करिष्मा राहुल गांधी यांना निर्माण करावा लागणार आहे. या सर्व गुणांचा कस आजवर लागलेलाच नव्हता; प्रशासकीय कौशल्य आत्मसात करण्याची मनमोहनसिंग यांच्याकडून शिकण्याची संधी राहुल यांनी विनाकारण गमावलेली आहे. वैयक्तिक पातळीवरचं हे आव्हान राहुल गांधी कसं पेलतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

दुसरा भाग आहे तो पक्षांतर्गत. काँग्रेस पक्ष हा जाती-धर्म-भाषा-प्रांत अशा विविध पातळ्यांवर अनेक गट, उपगट, उप-उप-गटांत विभागलेला आहे. हे एवढ्यापुरतंच मर्यादित नाही तर हा पक्ष बहुसंख्येनं बेरक्या, सत्तालोलुप, संधीसाधू आणि महत्त्वाकांक्षी लोकांचा एक कळप झालेला आहे. परत एकदा सांगतो, दिल्ली दरबारचं पाणी चोवीस तास पिण्याच्या संस्कृतीत आकंठ बुडालेल्या एका बुझुर्गाने त्यांच्या एका ‘पठ्ठ्या’ला जे हिंदीत सांगितलं ते असं- ‘नये है, शहजादे अभी भी कॉंग्रेस पार्टी में’. मग एक दीर्घ पॉझ.

मग पुढे त्यांनी विचारलं,‘कॉंग्रेस मानो पिझ्झा हैं, समझे? पिझ्झा खाते हों ना?’

त्यावर त्या पित्तूनं मान डोलावली.
नेते पुढे म्हणाले, ‘ पिझ्झा का डिब्बा चौकोनी आवत हैं. हैं क्या नही? ’

पुन्हा त्या पित्तूनं मान डोलावली आणि बुझुर्ग नेते पुढे म्हणाले, ‘ पिझ्झा का डिब्बा चौकोनी आवत हैं, पर पिझ्झा होता हैं गोल और उसे खाते हैं त्रिकोन मे. समझ गये? ठीकसें सुनो भय्या, ये अपनी कॉंग्रेस पार्टी हैं ना, पिझ्झे जैसी है. सबके जल्दी समजमें नाही आवत हैं. हमरे बाल सफेद हुए राजनीती में. शहजादे (पक्षी : राहुल गांधी!) को ये नही मालूम…’ कॉंग्रेसमधले बुझुर्ग किती इरसाल, बेरके आणि तय्यारीचे आहेत याचं हे दर्शन आहे. अशाच बहुसंख्याशी राहुल यांचा सामना आहे. या बेरक्या, इरसाल काँग्रेसजनांना सत्तेची चटक लागलेली आहे आणि ती चटक पूर्ण करणारा गांधी त्यांचा कायम प्रिय असतो; त्याच गांधीला हे बहुसंख्य संधीसाधू डोक्यावर घेतात. या अशा बेरक्यांपासून राहुल यांना कठोरपणे सावध राहावं लागणार आहे.

काँग्रेसमधे असणाऱ्या केवळ सत्तेची पदे उबवणाऱ्या बहुसंख्य ज्येष्ठांना बाजूला करणं हे राहुल यांच्यासमोरचं एक महत्वाचं आव्हान असेल. राहुल यांच्यासारख्या तरुण नेत्याकडून काही ऐकावं किंवा त्याने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मानसिकता असणारे तसंच केवळ पक्षहिताचा विचार करणारे आणि गांधी घराण्यावर अव्यभिचारी निष्ठा असणारे मनमोहनसिंग, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अशोक गहलोत, जयराम रमेश, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, राजीव सातव यांच्यासारखे नेते पक्षात कमी आहेत; अशां कोणाच्या विरोधामुळे आपल्याला अध्यक्षपद मिळण्यास विलंब लागलेला आहे, हे एव्हाना राहुल यांच्या लक्षात आलेलं असेलच. विद्यमान काळात हे असं, पदं उबवणारं वृद्ध नेतृत्व पक्षवाढीसाठी फारसं उपयोगाचं नाही हे लक्षात घेऊन अशा सर्वांना निवृत्तीचा नारळ देण्याचा धाडसीपणा राहुल यांना दाखवावा लागणार आहे. (तपशीलासाठी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लालजी टंडन यांचा मोदी-शहा या दुकलीने कसा ‘चिवडा’ केला त्याचा अभ्यास राहुल यांनी करावा.) अशा आणि पंतप्रधानपदावर डोळा ठेवलेल्या, वाचाळवीरांची संख्या पक्षात बरीच आहे. सर्वोच्च नेत्याच्या किचन कॅबिनेटमधे असणाऱ्या आणि ‘हाय कमांड’ नावाखाली या सर्वांच्या दुकानदाऱ्या आहेत; या दुकानांच्या देशभर शाखाही आहेत; दिल्ली ते गल्ली असा विस्तार असलेली ही सर्व दुकानं बंद करुन पक्षात तरुणांचा भरणा करण्यावर राहुल यांना भर द्यावा लागणार आहे. अहमद पटेल, मोतीलाल व्होरा यांच्यापासून ही सुरुवात होते आणि चिदंबरम, दिग्विजयसिंह, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, माणिशंकर अय्यर अशी ही यादी भली मोठी आहे. ही सर्व मंडळी केवळ सुगीच्या म्हणजे, सत्ता असण्याच्या दिवसात महत्वाची पदे उबवत सक्रीय असणारी अन्यथा हातावर हात ठेऊन गप्प बसणारी आहे. २०१४मध्ये पक्ष पराभूत झाल्यावर पक्षासाठी काम करण्याऐवजी आपापल्या कामधंद्यात कोणकोण मग्न झालेलं आहे याची माहिती घेतली तर, अशा सर्वांची नावे सहज कळतील. अशा ‘मनसबदारां’मुळेच कार्यकर्ता दुरावला आहे. या मनसबदारांना बाजूला सारत कार्यकर्त्याला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचं जे आश्वासन राहुल यांनी उपाध्यक्षपद स्वीकारतांना तालकटोरा स्टेडियमवर दिलं होतं ते पूर्ण करण्याची वेळ आता आलेली आहे; त्यातच पक्षाच्या वाढीची बीजं आहेत. नैराश्य आणि मरगळ यातून काँग्रेस पक्षाला उभारी देण्याची, जनमताचा पाठिंबा पुन्हा मिळवत एक राजकीय पक्ष म्हणून कॉंग्रेसच्या वाढीची सुरुवात राहुल यांना पक्षातूनच करावी लागणार आहे.

अलिकडच्या काळात आणि गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने राहुल यांनी सुरुवात तर चांगली केलेली दिसते आहे. काँग्रेस सबळ होणं म्हणजे लगेच काही भाजप सत्तेतून पायउतार होईल असा ‘भक्ती’य विचार मुळीच नाही. सबळ विरोधी पक्ष असल्यावर सत्ताधारी पक्षाच्या मनमानीवर अंकुश राहतो; सत्ताधाऱ्यांची जबाबदारीची जाणीव वाढते. म्हणून आधी एक जबाबदार विरोधी पक्ष आणि नजीकच्या भविष्यातला सत्ताधारी पक्ष म्हणून कॉंग्रेसची उभारणी करण्यासाठी राहुल गांधी यांना मन:पूर्वक शुभेच्छा!

(छायाचित्रे – गुगलच्या सौजन्याने)


-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क +९१९८२२०५५७९९ | praveen.bardapurkar@gmail.com
============================
​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी

लिंक – http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
============================

संबंधित पोस्ट