वसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…

वैयक्तीक आणि सार्वजनिक अशा दोन पातळ्यावर वेगवेगळं आयुष्य एकाच वेळी जगावं लागलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानं भारतीय राजकारणातलं एक मिथक वसुंधरेच्या कुशीत कायमचं विसावलं आहे. गॉसिप नाही पण, जयललिता यांचं वैयक्तीक आयुष्य असमाधान आणि अतृप्ततेचा चीरदाह होता: शापित सौंदर्यवती असंही त्यांना म्हणता येईल. मात्र एक अभिनेत्री आणि राजकारणी म्हणून त्या प्रचंड (हा शब्द तोकडा ठरवा अशा) यशस्वी होत्या. जयललिता तरुण असताना देशातल्या सर्वात जास्त मेहेनताना घेणाऱ्या सौंदर्यवती अभिनेत्री होत्या. अतृप्ततेचा चीरदाह चेहेऱ्यावर किंचितही न दिसू देता राजकारणी म्हणून त्या इतक्या महायशस्वी ठरल्या की, हयात असतानाच जयललिता यांची तामिळनाडूत देऊळे उभारली गेली; एक जितीजागती दंतकथा झालेल्या जयललिता यांना अक्षरशः देवत्व प्राप्त झालं. समकालात महाराष्ट्रात शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे वगळता इतकी अफाट लोकप्रियता देशातल्या कोणाही राजकारण्याच्या वाट्याला आलेली नाही. काहींना तुलना अप्रस्तुत वाटेल पण खरं तर, जनतेच्या गळ्यातला ताईत या निकषावर बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जयललिता तामिळनाडूत कांकणभर सरसच होत्या! प्रत्यक्षात मात्र, जयललिता यांना ना व्हायचं होतं अभिनेत्री ना राजकारणी. त्यांना भरतनाट्यमची नर्तिका म्हणून पारंगत व्हायचं होतं, विवाह करुन रीतसर संसार करायचा होता पण, ते जमलंच नाही. नाईलाजाने त्या अभिनयाच्या क्षेत्रात आल्या ते त्यांच्या आईच्या आग्रहामुळे आणि राजकारणात त्यांना ढकललं ते त्यांचे मेंटोर एम जी रामचंद्रन यांनी.

व्यक्तीपूजा, कर्मकांड आणि ब्राह्मणी वर्चस्वाच्या विरोधात रामस्वामी नायकर यांनी सुमारे सहा दशकापूर्वी सुरु केलेल्या द्रविडी कझागम चळवळीचे विरोधाभासी आणि विदारक चित्र म्हणजे जयललिता यांचं नेतृत्व होतं. रामस्वामी यांनी ही चळवळ सुरु केली आणि त्यांना जो पाठिंबा देणारा मोठ्ठा वर्ग मिळाला त्यात अण्णादुराई हे एक होते. या चळवळीचाराजकीय आघाडीवर विस्तार म्हणूनद्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षाची १९४९ साली स्थापना केली गेली आणि त्याचं नेतृत्व अण्णादुराई यांच्याकडे आलं. अण्णादुराईयांना जे राजकीय शिष्य लाभले त्यात दोन प्रमुख होते; एक- चित्रपट कथालेखक करुणानिधी आणि दुसरे- ‘एमजीआर’ या नावानं चाहत्यात प्रचंड लोकप्रिय असलेले एम जी रामचंद्रन हे चित्रपट अभिनेते. यात करुणानिधी सिनियर. करुणानिधी आणि एमजीआर यांच्यात पक्षाचा निर्विवाद नेता कोण, या मुद्द्यावर अर्थातच इर्षा होती. अण्णादुराई यांच्या मृत्यूपश्चात ही इर्षा वाढतच गेली आणि हे दोघेही. नेतृत्वाच्या कळीच्या मुद्द्यावर १९७२साली वेगळे झाले. रामचंद्रन यांना मानणारा कार्यकर्त्यांचा गट म्हणजे अभाद्रमुक तर, द्रमुकचं नेतृत्व करुणानिधी यांच्याकडे गेलं. तेव्हापासून या राज्याचं राजकारण या दोनच राजकीय पक्षांभोवती फिरतं. एम जी रामचंद्रन यांचं निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी जानकी यांनी काही काळ अभाद्रमुक पक्षाचं नेतृत्व केलं पण, जयललिता यांची मोहिनी आणि प्रभाव मोठा होता. साहजिकच जयललिता लवकरच अभाद्रमुकच्यासर्वेसर्वा झाल्या आणि शेवटपर्यंत सर्वेसर्वापदीच राहिल्या.

तामिळनाडूचं राजकारण जसं या दोन पक्षांभोवती केंद्रित झालं त्यापेक्षा ते नंतर करुणानिधी आणि जयललिता या दोन व्यक्ती तसंच त्या दोघांतील इर्षा, सुडाची भावना याभोवती जास्त फिरत राहिलं आणि तामिळनाडूची जनता त्या इर्षाचक्रात फिरत राहिली. तेव्हापासून एका निवडणुकीत अभाद्रमुक जाणार आणि द्रमुक सत्तेत येणार तर; दुसऱ्या निवडणुकीत द्रमुक म्हणजे करुणानिधी सत्ताच्युत होणार आणि अद्रमुक म्हणजे जयललिता सत्तेत येणार असं सुरु राहिलं. झोपडपट्टीतील बायका सार्वजनिक नळावर पाण्यासाठी जशा कचाकचा भांडतात अक्षरश: तसं हे दोन नेते आणि त्यांचे पक्ष वचावचा भांडायचे; एकमेकांच्या अब्रुची लक्तरं वेशीवर टांगायचे. परिणामी, तामिळनाडूतील अन्य सर्व राजकीय पक्ष कायम तिसऱ्या क्रमांकाच्या छोट्या भावाच्या भूमिकेत असायचे.

पूर्वीच्या म्हैसूर राज्यातील मेळूकोटे हे जयललिता यांचं जन्मगाव. त्यांचे वडील जयरामन हे म्हैसूरच्या राजाच्या सेवेत होते. जयरामन यांच्या वडीलांनी त्यांच्या नातीचं नाव जयललिता ठेवलं तर, आई मात्र आपल्या लेकीला ‘कोमकली’ म्हणत असे.’जयललिता जेमतेम दोन वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारले आणि आईसोबत जयललिता बंगलोरला स्थायिक झाल्या. त्यांच्या आईला चित्रपटात कामं मिळू लागली. चित्रपटसृष्टीत त्या ‘संध्या’ या नावाने ओळखल्या जात. चेन्नई (तत्कालिन मद्रास) तसंच बंगलोरच्या चित्रपटसृष्टीत जयललिता यांच्या आई प्रख्यात होत्या. आईनं चोखाळलेल्या वाटेवर चालायला सुरुवात करत वयाच्या पंधराव्या वर्षी जयललिता यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. सौंदर्यवती जयललिता आणि एम जी रामचंद्रन यांची भेट चित्रपटाच्या सेटवरच झाली. महत्वाचं म्हणजे जयललिता यांच्या बुध्दीमत्तेने एमजीआर खूपच प्रभावित झाले. इंग्रजी, तमीळ, कन्नड, मल्याळम, तेलगु आणि हिंदी अशा सहा भाषा जयललिता अत्यंत अस्खलितपणे बोलत त्याचं खूप अप्रूप एमजीआर यांना होतं. जयललिता यांचं वाचनही चौफेर होतं आणि त्यांनी बऱ्यापैकी लेखनही केलेलं आहे. नृत्य, संगीत आणि वाचनात रुची, अभिनय आणि राजकारणातील त्यांची उत्तुंग झेप पाहता रूपवती जयललिता यांचं व्यक्तीमत्व कोणालाही हेवा वाटावा असं बहुपेडी होतं, यात शंकाच नाही.

पक्षात आणि राजकारणात तत्कालिन मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन यांनीच जयललिता यांना १९८२ साली आणलं. संसदेत तामिळनाडू राज्याचे प्रश्न इंग्रजीत प्रभावीपणे मांडले जावेत म्हणून इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या जयललिता यांना एमजीआर यांनीच राज्यसभेवर पाठवलं. एम जी रामचंद्रन यांच्या निधनानंतर जयललिता दिल्लीतून तामिळनाडूत परतल्या. सुरुवातीला जयललिता यांना पक्षातच जानकी रामचंद्रन यांच्याशी स्पर्धा करावी लागली आणि जानकी तसंच जयललिता असे दोन गट निर्माण झाले. पण, १९८९च्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी जयललिता यांचा गट एम जी रामचंद्रन यांचा ‘वारस’ असल्याचा स्पष्ट कौल दिला. हे दोन्ही गट विलीन झाले आणि विरोधी पक्षनेत्या म्हणून जयललिता यांचं विधानसभेत आगमन झालं. काहीशा अंतर्मुख आणि आत्मकेंद्रित वाटणाऱ्या, कमी पण ठाम बोलणाऱ्या, विलासी जीवनशैलीत रमणाऱ्या जयललिता १९८९ नंतर द्रमुक तसेच करुणानिधी यांच्याशी कडवा संघर्ष करत राज्याच्या राजकारणातच स्थिरावल्या. राज्याच्या राजकारणात त्यांनी बहुजन आणि दलितांच्या हिताचे अनेक असे निर्णय (गरिबांसाठी स्वस्त दरात तांदूळ, तेल, मीठ, शुध्द पाणी, सिमेंट, औषधे, अत्यंत कमी दरात भोजन देणारी मदर उपाहारगृहे… असे अनेक) घेतले की, त्या जनतेच्या गळ्यातील ताईत बनल्या आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत आला. सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचा हा तामिळनाडूतळा विक्रमच ठरला. जयललिता अय्यंगार म्हणजे ब्राह्मण पण, त्यांनी दलित आणि बहुजनांसाठी राज्यात ६९ टक्के आरक्षण लागू करुन देशातील बड्याबड्या बहुजन आणि दलित नेत्यांची तोंडं बंद करुन टाकली! म्हणूनच त्यांना तामिळनाडूतील जनतेनं ‘अम्मा’ म्हणजे आईपद बहाल केलं असणार.

राज्याच्या राजकारणात प्रस्थापित होतानाच जयललिता यांनी देशाच्या राजकरणातही एक राजकीय शक्ती म्हणून त्यांचं एक स्थान, दबदबा आणि महत्व निर्माण केलं. त्यासाठी त्यांनी कधी कॉंग्रेस तर कधी भाजपशी दोस्ताना केला तर कधी दुष्मनी पत्करली; थोडक्यात या दोन्ही राष्ट्रीय पक्षानं त्यांनी पाहिजे तसं वेठीला धरलं. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तेरा महिन्यातच कोसळवण्याची किमया जयललिता यांनी करुन दाखवली. गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट तामिळनाडूत थोपवून धरणाऱ्या जयललिता या देशातील एकमेव नेत्या होत्या. तामीळांच्या प्रश्नांवर श्रीलंकेशी पंगा घेण्याचा सवयीतून त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू लागलं आणि दहशतवादी संघटनांच्याही यादीत अग्रक्रमावर गेलं.त्यामुळेच जयललिता कायम अत्याधुनिक सशस्त्र कमांडोजच्या गराड्यात आणि बुलेटप्रुफ जाकीट घालून फिरल्या.

मुख्यमंत्री म्हणून जयललिता यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. जयललिता यांना अफाट बेहिशेबी संपत्तीच्या चौकशीला केवळ सामोरेच जावे लागले नाही तर, त्या चौकशीत त्या दोषीही ठरल्या आणि चक्क तुरुंगातही गेल्या. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं; पण ‘अम्मा’ महिमा असा की. ओ. पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारनं मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत जयललिता यांचं छायाचित्र ठेवून कारभार हाकलला. (जयललिता रुग्णालयात असतानाही असंच घडलं). बेहिशेबी संपत्ती जमा केल्याच्या आरोपाखाली सुमारे दीड महिना त्या एक कैदी म्हणून तुरुंगात होत्या.बेहिशेबी संपत्ती बाळगल्याच्या आरोपातून अम्माची सुटका व्हावी म्हणून ४० हजार ठिकाणी रुद्राभिषेक तरी करण्यात आला किंवा अम्माच्या मूर्ती/छायाचित्राची पूजा करण्यात आली. बेहिशेबी संपत्ती बाळगल्याच्या आरोपावरून झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यावर जयललिता तुरुंगातून बाहेर आल्या आणि पुन्हा मुख्यमंत्री झाल्या; नुसत्या मुख्यमंत्रीच नाही झाल्या तर त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला अभूतपूर्व मताधिक्यानं विजय संपादन करून दिला.

कर्मकांड, व्यक्तिपूजा आणि ब्राह्मण्य याविरुध्द जी बहुजनांची चळवळ तामिळनाडूत सुरु झाली त्या चळवळीच्या राजकीय विस्ताराचं सर्वोच्च सत्ताकेंद्र दीर्घकाळ जयललिता नावाच्या एका कानडी ब्राह्मण-अय्यंगार, महिलेनं भूषवलं… या चळवळीचा हा केवढा अद्भूत विरोधाभासी प्रवास आहे! द्रविड कझागम चळवळीचा झालेल्या प्रवासाला लाभलेला हा विरोधाभास आकलनाच्या कवेत मावणारा नाही; एकाचवेळी एकीकडे वैयक्तीक आयुष्यात चीरदाह निमुटपणे सोसत दुसरीकडे सार्वजनिक जीवनात महायश प्राप्त करणाऱ्या ज्या अचाट आणि अतर्क्य करिष्म्याने हा विरोधाभास निर्माण केला ते, जयललिता नावाचं मिथक आता वसुंधरेच्या कुशीत कायमचं विसावलं आहे…

– प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com
9822055799 / 9011557099
भेट द्या – www.praveenbardapurkar.com
वाचा – blog.praveenbardapurkar.com

To buy them download the Dailyhunt app from the google play store on your mobile. Select Marathi language.
search the books under – BHASYA or PRAVEEN BARDAPURKAR.

 

ई-प्रत मिळवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क साधा –

pratik.puri@dailyhunt.in

संबंधित पोस्ट