विखारी हत्त्यांचे असहिष्णु सोहोळे…

बंगळुरूच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची झालेली हत्त्या जेवढी मानवतेला काळीमा फासणारी आहे त्यापेक्षा जास्त काळीमा फासणारं वर्तन त्या हत्येनंतर बहुसंख्य भारतीय समाजाकडून घडलेलं आहे . गौरी यांच्या रक्ताचे डाग सुकण्याआधीच ज्या टोकाच्या विखारी आणि धर्मांध प्रतिक्रिया दोन्ही बाजुंनी उमटल्या आहेत ; त्यातून या समाजात सामुदायिक शहाणपण, सहिष्णुता आणि विवेक शिल्लक उरलेला आहे किंवा नाही , असा प्रश्न कुणाही संवेदनशील माणसाला पडावा अशी ही स्थिती आहे.

या हत्त्येच्या निमित्ताने माध्यमं, समाज माध्यमं आणि त्यावर व्यक्त होणारे बहुसंख्य कथित बुध्दीवंत  तसंच राजकीय नेत्यांचं वर्तन हे एकारल्या आणि विखारी कर्कश्शपणाचं उदाहरण आहे . ज्यांना (स्वघोषित) उजवे म्हणून संबोधले जातं त्यांच्यातील अनेकांनी गौरी यांच्या हत्त्येचं प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे समर्थन केलं; गौरी यांची जात काढली , त्यांचा विवाह कोणत्या धर्माच्या पुरुषाशी झालेला होता आणि तो त्यांनी कसा लपवून ठेवला याचा गौप्यस्फोट करण्यात आला , गौरी यांचा उल्लेख ‘कुत्री’ आणि आणखी बऱ्याच अश्लाघ्य अशा शब्दात करण्यात आला . ही हत्त्या आणि नंतर हे जे काही घडत होतं किंवा घडवून आणलं होतं , त्यातून एकदा सुसंस्कृत समाजावर पडलेला डाग म्हणून ज्याची लाज वाटायला हवी अशा हत्त्येचा तो मांडलेला किळसवाणा उत्सव भासत होता . अशा नृशंस हत्येचं समर्थन करणारा आणि कोणतीही चौकशी होण्याआधीच बेजबाबदारपणाची सीमा गाठत त्या हत्त्येची जबाबदारी परस्पर कुणावर तरी ढकलून देणारा हा बहुसंख्य समाज सामुदायिक शहाणपणा, सहिष्णुता आणि विवेक याबाबतीत अश्मयुगापेक्षाही जास्त अप्रगत , असंस्कृत आणि महत्वाचं म्हणजे अमानवी असल्याचं मन विदीर्ण करणारं चित्र समोर आलेलं आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या विरोधात उभे टाकलेले बहुसंख्य (स्वघोषित) पुरोगामी आणि डावे , किमान सुसंस्कृतपणानं व्यक्त झालेले नाहीत हेही स्पष्टपणे सांगायला हवं. हत्त्येचा गुन्हा नोंदवला जाण्याआधीच ही हत्या करणारे कोण आहेत हे त्यांनी जाहीर करुन टाकलं ! याचा अर्थ गौरी लंकेश यांची हत्या करणारे कोण आहेत, हे या बहुसंख्यांना माहिती होतं. मग प्रश्न उरतो की , तर मग या लोकांनी लोकांनी गौरी यांना संरक्षण पुरवण्याची संवेदनशीलता का दाखवली नाही ? या डाव्या आणि पुरोगामी असलेल्या बहुसंख्य बुध्दीवाद्यांना कोणाची तरी हत्त्या झाल्यावरच जाग का येते . अशी हत्या झाल्यावर लगेच ते न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरुन आरोपी जाहीर करण्याचा आक्रोश मांडतात . पण , ज्यांना त्यांनी आरोपी ठरवलेलं आहे त्यांच्याविरुध्द कोणतेही पुरावे आजवर असे आरोप करणारांनी दिलेले नाहीत . संकेत आणि तर्क म्हणजे एखाद्याला गुन्हेगार म्हणून सिध्द करण्याचे पुरावे नव्हेत, हे नीट उमजून घेण्याइतकंही भान त्यांना आलेलं नाहीये असाच याचा अर्थ आहे . नरेंद्र दाभोलकर , कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या नंतर नेमकं असंच घडलेलं आहे, हे विसरता येणार नाही .

समाजात झालेल्या अशा सर्वच हत्यांच्या बाबतीत ‘सिलेक्टिव्ह’ राहण्याचा संधीसाधूपणा आपण दाखवतो आहोत हेही लक्षात घेतलं पाहिजे . एखाद्या कथित पुरोगामी किंवा डाव्याची कथित हिंस्र उजव्यानी केलेली हत्याच केवळ मानवतेला काळीमा फासणारी असते आणि आयुष्यभर सेवाभावाने काम करणाऱ्या कथित उजव्या आणि प्रतिगामी स्वयंसेवकाची डाव्यांकडून झालेल्या हत्या मात्र मानवतेला काळीमा फासणाऱ्या नसतात किंवा त्या हत्या झाल्याने कुणाला दु:ख होत नाही ; ही भूमिका संधीसाधुपणाची , दुटप्पीपणाची आहे . एकीकडे ‘ऑल आर इक्वल’ असा घोष करणाऱ्यांनीच ‘…बट ओन्ली वुई आर सेल्फ डिसायडेडली मोअर इक्वल’ असं वागणं कोणत्याही मानवतेत बसणारं नाहीच .

अशा काही घटना घडल्या की , एक मेणबत्ती पेटवून आणि/किंवा समाज माध्यमांवर एखादी (आक्रस्ताळी) प्रतिक्रिया टाकून मोकळं होण्याची वृत्ती बोकाळली आहे ; सारासार विवेकाने मुळातून त्याकडे बघण्याची दृष्टी आपण अशा वेळी हरवून बसतो , हे चित्र जास्त चिंताजनक आहे. आज महाराष्ट्र आणि केंद्रात भाजप म्हणजे हिंदुत्ववाद्याचं सरकार आहे पण , नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सरकार होतं ; तर केंद्रातही कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील मनमोहनसिंग पंतप्रधान असलेलं आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते . पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री तर आर. आर. पाटील गृहमंत्री होते . हत्त्या होताच जी काही प्रारंभिक माहिती मिळाली असणार त्याआधारे पृथ्वीराज चव्हाण यांनी हत्या करणारे कोण असावेत यासंबधी काही स्फोटक संकेत स्पष्टपणे दिलेले होते होते . त्या दिशेने तपास का झाला नाही , तसा तपास करून ‘त्यांच्या’ मुसक्या आवळण्याची कामगिरी का बजावली गेली नाही , ‘त्यांच्या’ तशा मुसक्या आवळण्यात कुणी आडकाठी आणली , का ते दिले गेलेले संकेत तपासांती साफ चुकीचे ठरले ; या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कधीतरी राज्यकर्त्यांकडून मिळायला हवीत.

कलबुर्गी यांची हत्त्या झाली तेव्हा सिध्दरामय मुख्यमंत्री होते आणि आताही तेच मुख्यमंत्री आहेत . गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण आहेत ते जाहीर करणाऱ्या राहुल गांधी यांच्याच कॉंग्रेसचे सिध्दरामय आहेत ; भाजपचे नाहीत . कलबुर्गी यांच्या हत्येचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीत. अगदी दर दिवसाला तपासाचा काटेकोरपणे आढावा घेत ते मारेकरी शोधून काढण्याची तसदी सिध्दरामय यांनी का घेतली नाही , हे कोडं कुणाच डाव्या आणि पुरोगाम्यांना पडत नाही . सिध्दरामय यांच्याही काही व्यवहारांची चौकशी गौरी लंकेश करत असल्याच्या वृत्तांकडे कानाडोळा करत सिध्दरामय यांनी गौरी लंकेश यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला , याचं अप्रस्तुत कौतुक केलं जातंय . डाव्यांचं सरकार राज्यात असतांनाच केरळात रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्या झालेल्या आहेत . याचा अर्थ कट्टरपंथीयांकडून कोणाचीही हत्या होते तेव्हा सरकार कोणत्या पक्षाचं याच्याशी काहीही संबध नसतो . मात्र अशा हत्त्या झाल्या की माणुसकीचा गळा घोटला गेल्याच्या आरोपांची राळ उडवण्याएकजातहे सर्व राजकीय पक्ष स्वत:ला ‘धन्य’ मानण्याचा ढोंगीपणा करण्यात आघाडीवर असतात . अशा हत्त्यांची पुनरावृत्ती घडली की समाजातीलही अनेकांना खडबडून तात्पुरती जाग येते ; मेणबत्त्या पेटवल्या जातात , परस्परांवर एकतर्फी दोषारोपण केलं जातं आणि खरं-खोटं यातील सीमारेषा पुसट करण्याची अहमिका दोन्ही बाजूंनी सुरु होते !

आपल्या देशात बाबा-महाराज यांची चलती असून त्यांच्यामार्फत हिंदुत्वाचं संघटन केलं जातंय आणि या बाबा-महाराजांना सरकारचं संरक्षण आहे, असा एक लोकप्रिय आरोप २०१४ नंतर कायमच बहरून आलेला आहे . सकृतदर्शनी त्यात तथ्य दिसतंही . पण , ही वस्तुस्थिती नाही हे आपण कधी तरी लक्षात घेणार आहे की नाही ? हे बाबा, महाराज, त्यांचे मठ, पंथ काही २०१४ नंतर निर्माण झालेले नाहीत. हे सर्व ‘थोर’ महापुरुष आणि त्यांचे अड्डे २५-३० किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष जुने आहेत ; ते सुरु झाले तेव्हा देश व बहुसंख्य राज्यांत कॉंग्रेसची सरकारे होती . हे महापुरुष आणि त्यांचे अड्डे हे जर समाजाला लागलेली विषवल्ली आहे तर ती उखडून फेकण्याचा कणखरपणा तेव्हाच्या सरकारांनी दाखवला  नाही ; उलट बाबा आणि महाराजांच्या कच्छपी लागण्याची स्पर्धाच कॉंग्रेस नेत्यांत होती ; धीरेंद्र ब्रम्हचारी, चंद्रास्वामी, भोंडशीबाबा ते अलिकडचे युवा राष्ट्रसंत, राष्ट्रसंत यांचं पीक काढणारांत कॉंग्रेस नेत्यांचाच कायम पुढाकार राहिलेला आहे . या बाबा-महाराजांची बीजं कॉंग्रेस नेत्यांनीच रोवली आणि त्यांच्या सरकारांचंच कृपाछत्र या बाबा-महाराजांवर होतं कारण त्यांच्या मठ आणि डेऱ्यानी दिलेल्या ‘मताशीर्वादावर’ कॉंग्रेस पक्षांच्या उमेदवारांचा निवडणुकांत विजय होत होता ; हे मुलभूत वास्तव शहाणपण गहाण न टाकता समाजानं नीट समजून घेतलं पाहिजे . आता हे बहुसंख्य बाबा, महाराज आणि त्यांचे अड्डे-त्यांचे मठ भाजपच्या आश्रयाला गेलेले आहेत , ही अन्य राजकीय पक्षांची खरी पोटदुखी आहे हे ओळखता न येण्याईतपत विवेकी माणूस भाबडा नाही पाहिजे !

जे झालं, ते पुरे झालं . कोणाच्याही होवोत , या अशा हत्त्या कलंक आहेत . त्याकडे एकांगी विखारी राजकीय विचारातून , हिंस्र जात्यंध व धर्मांध नजरेतून न बघता हे करणारी विषवल्ली मुळापासून उखडून टाकणारा विवेक समाजात निर्माण व्हायला हवा आहे . तरच अशा मानवतेला काळीमा फासणाऱ्या हिंस्रतेवर नियंत्रण मिळवता येईल ; अन्यथा विखारी हत्यांचे असहिष्णु सोहोळे असेच होत राहतील.

(संदर्भ- विधिज्ञ स्नेही- उदय बोपशेट्टी / असीम सरोदे. छायाचित्रे- गुगल)


-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क +९१९८२२०५५७९९ | [email protected]
============================
​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी

लिंक – http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
============================

संबंधित पोस्ट

 • Vijaykumar Kale ….
  Zakas, Marmik & Sagalyanach Zombel Ase! !

 • Pranav Bhonde….
  ज्येष्ठ पत्रकार Praveen Bardapurkar यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सुरू असलेल्या क्रिया-प्रतिक्रियांचा अतिशय संयत आढावा घेतला आहे.
  आपली विचारसरणी काहीही असली तरी अशा विषयांत व्यक्त होताना पाळले जाणारे भान सध्या सगळ्यांकडूनच सुटते आहे. प्रवीणजी यांनी नेमका हाच धागा पकडून हा लेख लिहिला आहे. नक्की वाचा !!

 • अनिरुद्ध जोशी ·….
  डावे तर वाह्यात आहेत पण जे पढत मूर्ख स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवत आहेत त्यांनी निदान स्वतःला हिंदू म्हणवून घेवू नये. कारण, “मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं नः प्रयोजनम्। क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव॥९९-३९॥
  सांगून रावणाच्या पापांना विसरून लक्ष्मणाला अंतिम संस्कार करायला लावणाऱ्या श्रीरामाला हिंदू आदर्श मानतो.
  #GauriLankeshMurder

 • Milind Wadmare ….
  पुर्णपणे सहमत… मनीची भावना व्यक्त केली… धन्यवाद

 • Pradeep Purandare….
  घणाघाती व संतुलित.

 • Suniti Deo….
  उत्तम.
  इतका विवेक अशा प्रसंगी व्यक्त होण्याची अपेक्षा बाळगणे गैर होईल
  खून करण्याची पद्धत तीच

 • Madhav Bhokarikar ….
  आपल्या म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनातील भावना काहीही असली तरी त्याच्याशी राज्यकर्त्यांना, समाजातील पुढारी म्हणून ओळखले जाणाऱ्यांना किंवा आपण पुढारी म्हणून ओळखले जावे असे वाटणाऱ्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नसते. या घटनेचा आपल्याला लाभ कसा घेता येईल किंवा आपल्याला लाभ घेता येईल अशा घटना कशा घडतील यांकडे यांतील संधीसाधू लोकांचे लक्ष असते. या पासून मला वाटत नाही की कोणतेही क्षेत्र मुक्त असेल ! मग सामाजिक, आर्थिक वा राजकीय असो. सांस्कृतिक क्षेत्रातील घटना पण आपल्याला ऐकू येतातच !

  आपली प्रगती होण्याऐवजी आसपास घडणाऱ्या घटनांमुळे सर्वांना सोपा मार्ग सापडला आहे की आवाज कायमचा बंद करणे व दहशत पसरवणे. जग दिवसेंदिवस लहान होत असल्याने जगांत विविध ठिकाणी घडणाऱ्या घटना हे इथली उदाहरणे बनतात. या उदाहरणांचा कित्ता दोन्हीकडील मंडळी गिरवतात. आपण कित्ता गिरवला ते चांगले पण इतरांनी तसे वागू नये हे मानणे पण चुकीचेच ! आपल्या वागण्याने आपण इतरांना ‘कसे वागावे’ याचं उदाहरण घालून देत असतो.

  न्यायशास्त्रात घटनेच्या क्रमातून, कृतीच्या पद्धतीतून, घटना किंवा कृतीमागचा हेतू काय असावा यांचा शोध घेतल्यावर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. ते एक शास्त्र आहे. गेल्या अनेक वर्षांच्या पुढारी, राज्यकर्ते, ‘समाजधुरीण’ यांच्या ‘कार्याची फळे’ आता दिसू लागली आहे कारण तो रस्ता आता खूपच वापरतां झाल्याने गुळगुळीत व वाहता झालेला आहे. त्यामुळे अशा घटना आता वारंवार दिसतात व त्याचे मनातून कोणाला फारसे वाटत नाही व वाटून उपयोग नसतो. एखाद्यास फारतर हळहळ वाटते पण वाटूनही उपयोग काय हे पण समजते.

  मग अशा घटना पाहिल्यावर बऱ्याच वेळा वाटते की यांचे निकालपत्र लिहून तयार असते फक्त घटना घडायचा अवकाश की त्यांवर स्वाक्षरी होवून जाहीर केले जाते.

 • Madan Shivam….
  “There isn’t a single word in this article that I don’t agree with. Completely speaks my mind. आपण अगदी घृणास्पद अवस्थेकडे वेगाने चाललो आहोत.”
  A comment send by my friend echoing exactly my feeling too….
  Regards,

 • Leela Shinde · ….
  खरं आहे सत्यबाहेर आली तर कसं पचवणार हे दांभिक असहिष्णुता

 • शिवराज दत्तगोंडे ·….
  केरळात राजकीय दोन्ही बाजूकडून मारल्या गेलेल्या लोकांचे सामाजिक योगदान काय ? जे त्यांच्यासाठी सर्वांनी हळहळावे…मृत्यूबद्दल सहानुभूती आहेच..पण भारतात रोज शेकडो लोक मृत होतात.त्या सगळ्यावरच समाजातील मान्यताप्राप्त,विचारवंत किंवा वाहिन्या हळहळत नाहीत ..तसे करणे शक्यही नसते..
  ज्याच सामाजिक काम आहे ,जो समाजावर प्राभाव राखून आहे ,ज्याच्या जाण्याने सामाजिक नुकसान होईल अशा लोकांच्या मृत्यूवर सार्वजनिक शोक होत नाही काय ?
  राजकीय वैमनस्यातून झालेल्या हत्या चुकीच्याच पण त्याचा सर्वांनी निषेध करावा नाही केला तर तो दुटप्पीपणा हे जरा जास्त नाही काय ?

 • Narayan Haralikar ….
  Praveen Bardapurkar ji, thank you that you wrote it! It was the need of the hour.

 • Prasad Jog ….
  दुर्मिळ झालेत असे स्वच्छ आरसे हल्ली. धन्यवाद!

 • Prakash Paranjape

  ईंग्रजीत एक म्हण आहे . Call him a dog and shoot him . एका बाजूला गौरी ही किती वाईट होती हे चित्र जाणीवपूर्वक रंगवले जात होते .वर नमूद केलेल्या ईंग्रजी म्हणीचा थेट परिणाम काहिंच्या प्रतिक्रियेत असावा का ? खर तर ज्याचा खुन झाला त्याची विचारसरणी किंवा कोणतीही क्रुती कोणाला खुन करण्याचा अधिकार बहाल करत नसते .केलेल्या गुन्ह्याची कोणतीही शिक्षा ही देण्याचा आधिकार फक्त आणि फक्त न्यायालयालाच आहे , ईतर कोणालाही नाही .कायद्याचे राज्य यात हेच अभिप्रेत आहे . परंतु याचे सतत उल्लघन होतच असते .अगदी कायद्याचे राज्य असावे याची महत्वाची जवाबदारी ज्या पोलिसांवर आहे ते सुद्धा याला फार मोठ्या प्रमाणात जवाबदार आहेत . ९९% पोलीस एनकाउंटर हे खरे तर खुनच आहेत . अशा पोलिसांकडुन काय अपेक्षा ? उलट ज्याना पुराव्याची न्यायालयीन छाननी होउच नये असे वाटते अशा लोकांमधे राजकारणी आहेत , पत्रकार आहेत ,वरिष्ट आधिकारी देखिल आहेत .दंडातल्या बेटकुळ्या दाखवत , यांना लाथाच घातल्या पाहिजेत असे समर्थन करणारे आहेत .प्रतिक्रिया देतांना संयम प्रत्येकाने बाळगला पाहिजे या आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहेच .पण तरीही ही खुनाची मालिका असु शकते हा विचार मनात येतोच .अर्थात त्यात तथ्य आहे की नाही याचा तपास पोलिसांनी करणेच अपेक्षित आहे
  वाईट याचे वाटते कि झालेल्या चुकांमधून पोलीस शिकत नाहीत .मोटर सायकल वरुन दोघांनी यायचे , गोळ्या घालायच्या आणि पळून जायचे ही modus operandi झाली आहे .अशा आरोपींना घटनेपासुन जेमतेम पन्नास फुटच प्रवास केला कि त्यांना ओळखणे अत्यंत अवघड होते कारण दोन चाकी वहानांच्या नंबर प्लेट्स सदोष आहेत .औरंगाबाद मधील बहुतेक गाड्या MH 20 ने सुरु होतात ,नंतर सिरीज A ,B etc आणि नंतर चार आकडे . औरंगाबाद मधे कमितकमी शंभर सिरीजच्या गाड्या आहेत आणी पाच लाख वहाने आहेत .अगदी 2579 हे चार आकडे घेतले तरी याच नंबरच्या कमित कमी शंभर गाड्या आहेत .नंबर प्लेट रंगवण्याची पद्धत अशी कि MH 20 BY , हे बारिक अक्षरात आणि खालचा नंबर 2579मोठ्ठ्या अक्षरात . दाभोलकरांच्या खूनानंतर बातमी आली होती कि शेवटच्या आकड्यावरुन पोलिसांनी तीस चाळीस गाड्या पो. स्टे. आणल्या होत्या परंतु प्रत्यक्षदर्शिंना वहान ओळखता आले नाही. औरंगाबाद मधील परिस्थितीत नंतरही फरक पडलेला नाही.
  आपण म्हणता तसे selective criticism होतेच पण ते स्वाभाविक आहेच कारण प्रत्येकाला आपली राजकीय मते असतातच पण सभ्यतेची पातळी जे सोडतील त्याची दखल घेतलीच पाहिजे आणी त्यांची खरडपट्टी काढलीही पाहिजे .हे आपणच करु शकता.

 • I read your today’s blog. You have hit the bull’s eye.
  Exaggeration from both the sides needs to be avoided by both the sides to defuse the tension.
  Majority of journalists & so called secular intellectuals (?) , anti BJP lobby always takes a moral high ground to attack BJP for every damn thing under the sun. Media glorifies them as large population of media leans towards left ideology. This may be because if they support right wing ideology they will no longer be termed as intellectuals & can mot take moral high ground.
  No doubt BJP / its supporters also needs to show restrain & maturity which they hardly do after coming to power.
  You pulled them up appropriately.
  Your blogs are worth reading.
  Thanks & Regards,

  Vihang A Harchekar

 • Dilip Muley ….
  सद्य स्थितीवर अगदी योग्य पणे भाष्य करणारा आणि प्रकाश टाकणारा लेख..अभिनंदन 👍💐

 • Vishvas Vartak ….
  परखड विश्लेषण

 • Shrikant Deshpande · ….
  सर अतिशय सुंदर आणि संतुलित लेख,

 • Rajendra Shahapurkar · ….
  अतिशय संयमित , वस्तुनिष्ठ आणि म्हणूनच 100% सहमत

 • अुदय वसंत शेवडे ….
  समतोल विचारी लिखाण.

 • Sagar Suryawanshi ….
  अतिशय सुदंर लेख सर 👌👍

 • Rajendra Joshi ….
  सणसणीत !

 • Anand Manjarkhede ….
  Sir पण मरणारे मरून जातात आता मारणारे सपडतील असे वाटत नाही.
  याला आपण अघोषित आणिबाणी की चिकित्सा करु नका जास्त बोलू नका असे म्हणून मारणे म्हणजे घर्म असे सांगितले जाईल असे वाटते

 • Rajesh Kulkarni सर्वप्रथम प्ृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानमंडळातील उद्योगाचे स्मरण तुम्ही करून दिलेत याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन. कारण हा उल्लेख केला की हिंदुत्वाद्यांवर सवंग आरोप करण्यातली हवाच निघून जाते. आजवर काँग्रेसने नथुरामवरून संघ-जनसंघ-भाजपला गेली कित्येक दशके झोडण्याचे काम केलेले आहे, तेव्हा आताही असे बेछूट आरोप केल्याने त्यांना काही फरक पडत नाही, किंबहुना ती त्यांची पद्धतच आहे हे स्पष्ट व्हावे.
  वास्तविक दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी यांच्यात मला फारसा समान धागा दिसत नाही. विशेषत: पानसरे व दाभोळकर यांच्यात. पानसरे कम्युनिस्ट होते, त्यांनी तर शिवाजी कोण होता मध्ये शिवाजी कम्युनिस्ट होता एवढेच म्हणणे बाकी ठेवले होते.
  केवळ हत्या हे समान सूत्र बाळगत तुमचा लेख छापताना अक्षरनामाने गौरी लंकेश यांचा फोटो या त्रयीबरोबर छापण्याचे औधत्य केले आहे. असा खोडसाळपणा करणे हे त्या पोर्टलला नवे नाही.
  खोडसाळपणा म्हणायचे ते अशासाठी की गौरी लंकेश या कोणत्या प्रकारची म्हणजे पातळीची पत्रकारिता करत होत्या हे त्यांच्या विविध ट्विट्सवरून मीच दाखवलेले आहे. त्यांच्या काही फेसबुक पोस्टमधील मजकूर तर शेअरही करता येत नाही इतका भयानक आहे. तेव्हा हत्या निषेधार्हच, परंतु अशा टिनपाट म्हणजे एरवी कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या पत्रकाराला का व कोणी उचलून धरले असावे? या हत्येनंतर पत्रकार म्हणून असलेल्या त्यांच्या योग्यतेपेक्षा त्यांना कोणी मोठे केले असावे? तर त्या कम्युनिस्ट होत्या हे त्यामागचे कारण. कम्युनिस्टांचे नेटवर्क पाहता हे किती सोपे आहे हे लक्षात यावे. यापलीकडे जाऊन बिशप लोकांच्या राष्ट्रीय पातळीवरील संघाने या त्रयीसह गौरी यांचे नाव जोडून निषेधाचे पत्र जाहीर करण्याचा कांगावा केला. याच टिनपाट पत्रकाराच्या हत्येचा थेट अमेरिकेतून सरकारी पातळीवरून उल्लेख झाला. यामागे कोण असावे?
  हत्या झाल्याच्या काही तासांमध्येच युजुअल सस्पेक्ट्सनी संघाला दुषणे देऊन टाकली. एवढेच काय, पुरस्कारपरतीब्रिगेडफेम गणेश देवींसारखे महाभाग केवळ हत्येवरून नव्हे तर त्यामागे कोण आहे यावरून मोर्चा काढून मोकळे झाले.
  मारेकरी न सापडणे हे खरोखर समजण्यापलीकडचे आहे. हत्यांच्यावेळी केन्द्रात वा राज्यात कोणाचे सरकार होते यावरूनचा खेळ सोयीस्करपणे खेळला जातो. मात्र तरीदेखील कलबुर्गी व आताची हत्या या पूर्णपणे कर्नाटकमधील काँग्रेस सरकार असताना झालेल्या असूनही त्यांचा कसलाच सुगावा लागत नाही यामागचे कारण काय असेल याचा विचार करताना कोणी दिसते का? मुळात गौरी यांना संरक्षण न देण्याचा तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा किती जणानी आतापर्यंत उल्लेखला यावरूनही हे लक्षात यावे. संघाला दुषणे देणार्‍या राहूल गांधी यांना याबद्दल विचारणे कोणालाही महत्त्वाचे वाटले नाही.
  गौरी यांच्याबद्दल कुतिया म्हणणारे ट्विट करणार्‍या महाभागाला इंडियन एक्सप्रेसने सुरतमधून शोधून काढले. त्याला या असंवेदनशील भाषेत काही गैर वाटत नाही. अशी मानसिकता असलेले दोन्ही बाजूंचे लोक सर्रास सापडतात. तरीही या व्यक्तीच्या ट्विटचा केवढा गवगवा केला गेला हे आपण पाहिले. अशा लोकांना त्यांच्या पातळीवरून सोडून देऊन दुर्लक्ष करण्याऐवजी राजकारणीही त्यांना उचलून धरतात आणि आकाश कोसळल्याचा आभास निर्माण करतात. यावरून राजकारण्यांना म्ृत व्यक्तीशी काहीतरी घेणे आहे का व त्यांना नक्की काय हवे आहे हे कळू शकते. राहूल गांधी व येचुरींची नेहमीची प्रतिक्रिया तर व्यक्ती वा घटनेचे नाव बदलून तशीच्या तशी कॉपीपेस्ट करावी अशा प्रकारची असते यावरूनही हे कळते. बदनामीच्या खटल्यावरून राहूल गांधी यांचे हात पोळलेले आहेत, त्यामुळे ते संघाला थेट जबाबदार न धरता काठाकाठाने आरोप करताना दिसले.
  वर उल्लेखलेल्या त्रयीच्या हत्या व आताची गौरी यांची हत्या यांना एका सुत्रात बांधण्याचा मोह अनेकांना होतो. अक्षरनामा व बिशप संघाने तोच उद्योग केल्याचे वर म्हटलेच आहे. मात्र या लोकांना बिहारमधील पत्रकारांच्या हत्यांशी काही घेणेदेणे नसते. याचे कारणही माहित आहे. येचुरींनी वा राहूल गांधींनी शहाबुद्दीन-लालू संबंध उघड करणार्‍या पत्रकारांच्या हत्यांचे किंवा संघ-भाजपच्या कर्नाटकातील कार्यकर्त्यांच्या हत्यांचा उल्लेख जरी केला तरी यांना हवा तसा दुष्प्रचार करता येणार नाही हे यांचे दुखणे आहे. हिंदुत्वाला बदनाम करण्याचा आततायीपणा करणार्‍या कर्नाटकातील संघटनांचे कोणाला मारहाण कर किंवा इतर काही कर या उद्योगांचा केवढा मोठ्या प्रमाणावर निषेध केला जातो व त्याच कर्नाटकातील संघ-भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या यांच्याकडून कशा दुर्लक्षिल्या जातात यावरूनही हे कळावे. पुण्यातील मुस्लिम तरूणाच्या हत्येचा म्हणा किंवा अखलाखच्या हत्येचा देशभर गवगवा होतो, याही हत्या निषेधार्हच आहेत, परंतु हेच बिहारमध्ये हत्या झालेल्या पत्रकारांच्या किंवा कर्नाटकमध्ये हत्या झालेल्या भाजप-संघ कार्यकर्त्यांच्या नशिबी का नसावे?
  एकूण राजकीय वातावरण किती दूषित झालेले आहे हे पाहता व माध्यमांचा त्यातील मोठा वाटा पाहता एखादी घटना झाल्यावर संयत विधाने केली जावीत व राज्य वा केन्द्र पातळीवरील पदाधिकार्‍यांच्या प्रतिक्रियाच ग्राह्य धरल्या जाव्यात, ट्विटर व फेसबुकवरील इतरांच्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष केले जावे यासाठीचे आवाहन करताना कोणीच दिसत नाही हे पाहिले तर विखारी हत्यांचे असहिष्णु सोहळे कोणालाच नको आहेत असे नाही हे कळावे. तुम्ही उल्लेख केलेल्या बाबा-बुवांच्या संस्क्ृतीबरोबरच एकूणच राजकारणाचे गुन्हेगारीकरण अाणि माध्यमांमधील जीवघेणी स्पर्धा या गोष्टीदेखील या असहिष्णुपणाच्या मागे आहेत हे लक्षात घ्यायला हवे. त्यातल्या माध्यमांच्या क्रूरपणाबद्दल अनेकदा बोलले जाते. मात्र राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा सर्वमान्य झालेला मुद्दा सर्वांनी ग्ृहितच धरलेला आहे व त्याबाबत काही करता येण्यासारखे नाही असेच समजले जाताना दिसते. हेदेखील माझ्या द्ृष्टीने या असहिष्णुपणाचे कारण आहे. दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी मोजताना या वास्तवाकडे आपणा सर्वांचे दुर्लक्ष होते.

  • Abhijit Itolikar ….
   सर, पृथ्वीराज चव्हाण यांनी दाभोळकर यांच्या हत्येसंदर्भात कोणती शंका व्यक्त केली होती ते कळेल का?

   • गांधी हत्या करणारांकडे त्यांनी अंगुली निर्देश स्पष्टपणे केला होता .

 • Buddhiraj Chapalgaonkar ….
  Uttam lekh
  Ajun ek – Satish Shetty murder chi modus operandi suddha same hoti. Tyanche hi khoni pakadle gele nahit.
  Pan koni tyabaddal bolat nahi. Karan bahuda te dave navhte mhanun .

  [email protected]

 • Raj Kulkarni ….
  लेख पुर्ण वाचला!
  गौरी लंकेश यांच्या हत्येचा आनंद साजरा करणा-यांचा , तीला कुतिया म्हणणा-याचा , तीने आरएसएस विरोधात लिहीले नसते तर तीची हत्या नसती म्हणणा-यांचा आणि हत्येनंतर कोणताही पुराव्याविना कोण्या संघटनेला हत्येबद्दल जवाबदार धरणा-याचा गुन्हा एकसारखा नाही. दोन्ही प्रवृत्ती चुकीच्या आहेतच; पण हत्येनंतर क्रोधीत अवस्थेत हत्येला जवाबदार धरण्याची चुक, ही चुक असली तरी समजून घेता येईल कारण ती मानवी प्रवृत्ती आहे आणि मनुष्य चुकू शकतो. पण हत्येला वध म्हणणारी, हत्येवर पेढे वाटणारी, कुतीया म्हणणारी प्रवृत्ती विकृत, हिंस्र आणि अमानवी आहे. याला मानवद्रोहच म्हणावे लागेल !
  त्यामुळ त्या दोन्ही प्रवृत्तींना दोन्ही सारखेच आहेत असं पाहणे मला वाटत नाही. अशा मानवद्रोही प्रवृत्तीवर टिका करताना तटस्थता म्हणून एखाद्याच्या चुकीच्या बाबींवर टिका केल्याने मानवद्रोहासारख्या गुन्ह्याचा विरोध सौम्य होतो. दोन्ही प्रवृत्तीवर स्वतंत्रपणे टिका केली तर अधिक योग्य झाली असते.
  बाबा, बुवा प्रवृत्ती वाढण्यास कॉग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षातील नेते जवाबदार आहेत, हे खरे आहे. पण कॉग्रेस नेत्यांचे बाबा,बुवा देशातील त्यांच्या पक्षाच्या राजकीय ध्येयधोरणावर प्रभाव टाकताना तसेच टिप्पणी करताना कमी प्रमाणात आढळून येतात याउलट भाजपामधील साध्वी, योगी, मुनी, बाबा या भाजपाच्या राजकीय अजेंड्यास पुरक अशी वक्तव्ये करताना जास्त प्रमाणात आढळून येतात.
  हत्येस या वध म्हणणे हे जास्त आक्षेपार्ह आहे, असे मला वाटते.
  दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी वा गौरी यांच्या हत्या कोण सत्तेवर असताना झाल्या, याबद्दलची आपण दिलेली माहीती योग्यच आहे. ज्या कॉग्रेस सरकारच्या काळात या हत्या झाल्या, त्याबद्दल कॉग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वावरील टिका योग्यच आहे . पण हाच न्याय लावायचा म्हटलं तर महात्मा गांधींची हत्या झाली तेंव्हा नेहरू पंतप्रधान तर पटेल उपप्रधान तथा गृहमंत्री होते म्हणून त्यांना या हत्येस नथुरामपेक्षा जास्त जवाबदार धरावे लागेल. इंदीराजींची हत्यातर त्या स्वत:च पंतप्रधान असताना झाली म्हणून हत्येस मारेक-यांपेक्षा त्या जवाबदार म्हणावे लागेल!
  केरळ मधे संघ कार्यकर्त्यांच्या आणि कम्यूनिस्ट कार्यकर्त्यांच्या सतत हत्या होतात, या दोन्ही हत्या निषेधार्हच आहेत. मानवी जीवाचे हनन करणारी प्रत्येक कृती निषेधार्हच आहे.

  • Sachin Ketkar ….
   इथे बरदापुरकर हत्येसाठी नव्हे तर ढिसाळ तपासासाठी या सरकारांना जबाबदार ठरवत आहेत

   • Rajesh Kulkarni तो Sachin Ketkar….
    ‘पण हाच न्याय लावायचा म्हटलं तर महात्मा गांधींची हत्या झाली तेंव्हा नेहरू पंतप्रधान तर पटेल उपप्रधान तथा गृहमंत्री होते म्हणून त्यांना या हत्येस नथुरामपेक्षा जास्त जवाबदार धरावे लागेल. इंदीराजींची हत्यातर त्या स्वत:च पंतप्रधान असताना झाली म्हणून हत्येस मारेक-यांपेक्षा त्या जवाबदार म्हणावे लागेल!’ तुम्ही सांगता ते न समजून घेता वरीप्रमाणे म्हणणे हा त्यांचा मोठा सिक्सरच आहे.

    • विजय तरवडे ….
     केरळमध्ये हत्या झाल्यावर डावे लोक विकृतपणे आनंद व्यक्त करीत नाहीत. संस्कृती विथ अ डिफरन्स

     • Rajesh Kulkarni ….
      भंपक नेहरूवियन राज कुलकर्णी यांचे कुतियापुराण
      ‘केरळ मधे संघ कार्यकर्त्यांच्या आणि कम्यूनिस्ट कार्यकर्त्यांच्या सतत हत्या होतात, या दोन्ही हत्या निषेधार्हच आहेत.’ भंपक नेहरूवियन राज कुलकर्णी यांचे वरवर काही आक्षेपार्ह न वाटणारे हे विधान.
      हे महाशय कसे संभावितासारखे केरळमध्ये संघाच्या व कम्युनिस्टांच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांचा निषेध करतात ते पहा. राजकीय हत्या ही मुळात कम्युनिस्टांची मूळ प्रवृत्ती. बंगालमध्ये यांनी ममतांच्याआधी कसा उच्छाद घातला होता हे सर्वश्रुत आहे. तोच प्रकार केरळमध्ये. मिठाने खड्डा भरून जिवंत पुरण्याचे कम्युनिस्ट तंत्रज्ञान कुलकर्णींना माहित का नाही? केरळात काँग्रेस व कम्युनिस्टांची आलटून पालटून सरकारे येणार. तेव्हा संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांचे कोणाला पडलेले होते? काँग्रेसला तर केन्द्रातल्या हायकमांडच्या दट्ट्यामुळे स्वत:चेही नेते-कार्यकर्ते कम्युनिस्टांकडून मारले जात होते, तरी तिकडे लक्ष देणे जमले नाही. तेव्हा संघांकडून आत्मसंरक्षणार्थ-प्रतिकारात्मक झालेल्या हत्या आणि कम्युनिस्टांची राजकीय हिंसाचाराची मूलभूत प्रवृत्ती यांची या भंपक नेहरूवियनसाहेबांनी कशी एका ओळीत बरोबरी करून टाकली ते पहा.
      तेव्हा अशा पद्धतीने नेहमीचा काँग्रेसी बुद्धीभेद करणे थांबवा. आता लोक मूर्ख बनत नाहीत. तुमचे कुतियापुराण पुरे करा. तुमचेही लोक स्मृती इराणींना मोदींच्या मांडीवर बसवत असतात हे लक्षात ठेवा. तेव्हा संस्कृती वगैरे बडबड करणे तुम्हाला शोभत नाही.व
      बाकी याच विषयावरील तुमच्या खालील ऑलिंपिक उड्यांचे केव्हा स्पष्टीकरण देणार राज कुलकर्णीसाहेब?
      ‘नेहमी धर्माच्या आधारावर राजकारण करणा-या भाजपाला कर्नाटकचा स्वतंत्र ध्वज म्हणजे कन्नड अस्मितेने आव्हान उभे केले आहे. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणासाठी भाजपासाठी ही हत्या उपयुक्त ठरणारी आहे. समजा गौरी यांचे मारेकरी सापडले नाहीत तर भाजपा याचा वापर सिद्धरामयाच्या विरोधात करेल आणि समजा सापडले आणि ते हिंदुत्ववादी निघाले तर सिद्धरामयांना हिंदुधर्मविरोधी ठरवता येऊ शकते. समजा ते हिंदुत्ववादी नसले तर भाजपा याचाही वापर करून हिंदुसमाजात सहानुभूती मिळवून कॉग्रेसवर आरोप करणारच! त्याचा फायदा तो गुजरातमधेही मिळविण्याचा प्रयत्न करणार.’

     • Ashutosh Adoni….
      कडक

 • Govind Godbole….
  Rajni about indiraji assignation i had done same argument.these r very frenzy people.letus neglect them

  • Raj Kulkarni ….
   Thanks Kakaji, I used to neglect these nigligent!

   • Ashutosh Adoni ….
    Frenzy आणि nigligent !!
    वा ! विचार स्वातंत्र्याचा,सहिष्णुतेचा विजय असो !!

 • Supriya Iyer….
  कुतिया,टिनपाट…आम्ही कुठे वाहवत चाललो आहोत?

  • Rajesh Kulkarni ….
   कोठेही वाहवत चाललेलो नाही आहोत. म्ृत वा जीवित व्यक्तीला कुतिया म्हणणे गैरच आहे मात्र एखाद्या व्यक्तीने तसे म्हणण्यावरून आपण किती गळा काढतो व त्या व्यक्तीला किती महत्त्व देतो याचे काही तारतम्य ठेवायचे की नाही? ट्विटरवर असा शिवराळपणा करणारे व रस्त्यावर शिव्या देणारे यांच्यात तसा काहीच फरक नसतो. दुसर्‍या प्रकारच्या लोकांना आपण किती महत्त्व देतो, देतो का, हे पाहिले तर मी काय म्हणतोय ते लक्षात यावे.
   बाकी या पत्रकार म्हणवणार्‍या बाईंची अनेक ट्विट्स मीच त्यांच्या वॉलवरून कॉपी करून दाखवली आहेत. अत्यंत असभ्य अशा प्रकारची ट्विट्स आहेत ती. तेव्हा मुळात अशी मानसिकता असलेल्या त्या थर्ड क्लास पत्रकार होत्या. त्यांचे आताचे क्वालिफिकेशन एकच होते. मोदींविरूद्ध शक्य तेवढा असभ्यपणा स्वत: करणे व इतरांचा असभ्यपणा रिट्विट करणे. अशा बाईंची पत्रकार म्हणूनची लायकी समजून न घेता भलत्याच गोष्टींवरून गळा काढणे हेदेखील दांभिकतेचे लक्षण आहे.
   हयात असताना बाईंनी ओलांडलेल्या असभ्यपणाच्या मर्यादा पाहत असूनही त्यांना कुतिया म्हणणे गैरच आहे. बाकी त्यांच्या हत्येचे समर्थनही नको.
   मात्र आपण आपली संवेदनशीलता अस्थानी वाहते आहे का हे पहावे.
   आपणही इतर अनेकांप्रमाणे संवेदनशीलता दाखवण्याच्या नावाखाली कम्युनिस्टांचा अजेंडा राबवणार्‍या आहात की काय याची कल्पना नाही. कारण आधीच्या कमेंटमध्येही सविस्तार लिहूनही आपल्याला काय दिसले तर टिनपाट. बाकी हे आपले आपण तपासून पाहू शकतात. बाईंचा असभ्यपणा आपल्या नजरेस पडलाच नसेल तर सांगा. दाखवतो.

   • Supriya Iyer ….
    कुतिया हा शब्द जसा काळजाचा लचका तोडतो तसाच टिनपाट शब्द मनाला ओरखडे पाडतो. बस इतकंच.

    • Rajesh Kulkarni ….
     हरकत नाही. त्यांच्या पत्रकारितेला उद्देशून तो शब्द आहे एवढेच.

 • Saurabh Dharkar ….
  बहुजननां ना माहित होते हत्या करणारे ,मग आधीच का नाही संरक्षण दिले नाही… पटनायसारखे आहे…सर

 • Mangesh Paturkar ….
  सर,माफ़ करा पण केरलात जेव्हा स्वयंसेवकांची इतक्या वेळा निर्घुण हत्या झाल्या त्यावेळेला आपण आणि तथाकथित बुद्धिजीवी कधीच बोलले नाही किंवा लिहले नाही आताच हा पुळका का?हे सिलेक्टिव नाही का? हा संधिसाधुपणा नाही का? तेव्हा तुमची मानवता कुठे गेली होती.का ते स्वयंसेवक मानव नव्हते? ‘ऑल आर इक़्वल’सर.

  • Prakash Paranjape …..
   केरळमध्ये संघ आणी कम्युनिस्ट या दोघांमध्ये क्रिया प्रतीक्रिया या न्यायाने अनेक खुन पडले आहेत .दोन्हीही बाजूने सारख्याच संख्येने माणसे मेली आहेत असा रिपोर्ट आहे .तुम्ही स्वतः कम्युनिस्ट कार्यकर्ते मारले गेलेत याचा कधी तरी निषेध केला आहे का .नसेल तर तो कांगावा नव्हे ?

   • Mangesh Paturkar ….
    देश विघातक शक्ति आणि देशद्रोही मारल्या गेल्यावर विजय साजरा करायचा पण शत्रुचा ही मेल्यानंतर आदर करणे ही आपली संस्कृति आहे त्यामुळे विजय नाही आणि निषेध तर मुळीच नाही,आणि कुणाला संपवून कधीच कुणी जिंकले नाही,विचारधारा वेगळी असू शकते पण धेय्य मात्र समाज आणि देशसाठी एक असले पाहिजे.

    • Prakash Paranjape ….
     पातुरकर , आपण प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळत आहात .निषेध तुम्ही केलात का ? भंपक उत्तर नको.

     • Mangesh Paturkar ….
      भंपकबाजी वर विश्वास च नाही सर
      उत्तर तर दिले आहे.

     • Milind Wadmare ….
      पातूरकर, बर्दापूरकर यांनी ब्लॉगवर सगळेच लिहिले आहे. आणि दुसरे असे की केरळातील हत्या हा विषय आतापर्यंत सर्वसाधारण जनतेस माहित नव्हता. गौरी लंकेश यांची हत्या झाल्या झाल्या हा विषय एजेंडावर आला (किंवा आणला). यापुर्वी डॉ दाभोळकर, अॅड पानसरे किंवा कळबुर्गी यांच्या हत्या झाल्या तेंव्हा हा विषय चर्चिला गेला नव्हता.

     • Mangesh Paturkar ….
      प्रवीण सर माफ़ करा आपली पोस्ट बघून आणि ब्लॉग न वाचता प्रतिकिया दिली,ब्लॉग वाचला तेव्हा लक्षात आले.

     • Milind Wadmare ….
      अगदी बरोबर केले. सर्वसाधारणपणे उत्साहापोटी आणि एका विशिष्ट तिरीमिरीत प्रतिक्रिया येत आहेत आणि विश्लेषण करत असताना काळे-गोरे होणार हे स्विकारलेच जाईना झाले अन त्याला विरोधकच समजले जातेय.

     • Kisshor Dargalkar Mangesh ….
      Paturkar ,त्यांना असले प्रश्न विचारू नका त्याला ते कधीच उत्तर देणार नाहीत,कॉंग्रेसच्या मालिद्यावर वर जे पत्रकार झाले त्यात यांचा नंबर फार वरचा आहे

     • चला , सिध्द करा हे .
      गेल्या एकोणचाळीस वर्षांच्या पत्रकारितेत कोणाकडूनही मलिदा गिळून एक टांचणी खरेदी केलेली असली किंवा भेट मिळाली असेल शीर धडावेगळं करून आपल्या चरणी अर्पण करेन !
      स्वीकारता हे आव्हान ?
      हिम्मत असेल तर स्वीकारा , नक्की .
      फेसबुकवर पोस्ट करुन मी जाहीर करतोय ही बाब स्वतंत्रपणे !

     • Sameer Gaikwad ….
      आपली भाषा आपल्या संस्काराचा आरसा असते, बेछूट आरोप करण्याआधी आपले ज्ञान, व्यासंग, मर्यादा, आकलन जाणून अभ्यासून प्रकटावे म्हणजे आपला मुखभंग होत नाही. वर पातुरकरांनी माफी मागितलीय अन तुम्ही त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवताय… शब्द हे शस्त्र असतात जपून वापरावेत आपला आचरटपणा एखाद्याच्या साधनेला हकनाक प्रश्नांकित करतो..

     • अुदय वसंत शेवडे ….
      किशोरजी आपलं विधान अयोग्य आहे.

     • Parag Potdar ….
      Kisshor Dargalkar सरसकट विधान आणि आरोप करण्यापूर्वी व्यक्तीमत्व अभ्यासावं..
      आपण कुणाविषयी बोलतोय याच भान असावं ..
      इतकी किमान आणि रास्त अपेक्षा आहे.

     • Ayub Kadari….
      Praveen Bardapurkar सर, सुमारांना एवढे गांभीय्राने घेऊ नये, असे वाटते.

     • Prafulla Mali ….
      कुठपण काय आव्हान देता प्रवीण सर☺️ इस जमानेमे ऐसे टाईम इमोशनल नही हाेने का! वैसे भी सुबह के ट्राेल्स शाम मे क्या, कभीच वापस नही आते 😬

     • Vijaykumar Kale ….
      Police Na Mahiti Dya Te Lagech Tapas Kartil

     • Kisshor Dargalkar ….
      Vijaykumar Kale मलिदा हा फक्त आर्थिक असतो असा नाही तो इतर रूपानेही असू शिवाय आर्थिक मलिदा हा इतक्या सहसपणे कळला असता तर बरेच राजकारणी आणि पत्रकार गजाआड असते
      शिवाय त्यांनी आर्थीक मलिदा घेतलाय असा कोणताही आरोप मी केलेला नाही

     • Vijaykumar Kale ….
      Kishorji, Tika Karavayas Harkat Nahi Pratyek Nanyala 2 Baju Asatat Tasech Aapan Aarthik Nasalelya Malidyababat Bolalat Te Link Laun Sidhh Kara Anyatha Dilagiri Vyakt Karane Shreiskar Tharel Hi Suchana Aahe Uchalali Jibha Lavali Talyala Ase Hou Naye Mhanun

     • Kisshor Dargalkar ….
      Vijaykumar Kale आर्थिक बाजू बाबत मी आपली भूमिका इथे स्पष्ट केलीय.
      शिवाय असेंन मी मोदींभक्त तर त्याचा मला अभिमान आहे
      आणि याच पोस्टवर अनेकांनी माझ्या बाबतीत जी भाषा वापरली आहे त्याबद्दल तुमाला आणि pravin bardapurkar याना काय म्हणायचं

     • Vijaykumar Kale….
      Anekanche Soda Aapalya Manachi Gwahi Deun Kai Watate Te Kara Pravinjini Aapala Apaman Kela Aahe Ka? Nasel Tar 2 Hath Jodayla Kiti Vel Lagel??

     • Praveen Bardapurkar ….
      Kisshor Dargalkar…​बाकी सर्व नंतर असेल हिंमत , खरं तर दम असेल तर आव्हान स्वीकारा .
      तुम्ही कोणाचे भक्त आहात यावरून तुमची लायकी लक्षात आलेली आहे .
      तुमच्यासाठी जी भाषा वापरली गेली आहे ती अजून तरी सौम्यच आहे .
      फेसबुकच्या पोस्टवर जाऊन बघा लोक काय म्हणत आहेत माझ्याविषयी ते .​

     • Kisshor Dargalkar ….
      मोदिभक्तांकरिता, पंतप्रधान यांच्या करता आपली जर ही भाषा असेल तर काय म्हणावं, त्यातून तुम्ही माझ्याबाबतीत वापरलेयल्या भाषेचं समर्थन करताय ?

     • आणि या प्रतिक्रिया व्यक्त करणारे अनेकजण संघाचे स्वयंसेवक आहेत , भाजपचे समर्थक आहेत . पडला काही प्रकाश ?

     • Kisshor Dargalkar ….
      Praveen Bardapurkar पडला काही प्रकाश ? म्हणजे आता आपणही आक्षेपार्ह भाषा वापरताय, आणि मी ही संघ स्वयंसेवक आहे

     • चिखल कसा तुडवायचा हे चांगलं ठाऊक आहे मला पण , अब हम वो गलीया छोड आये है !
      अन्यथा भेटूनही नीट समजावून सांगितलं असतं .
      पत्रकारिता करताना संघ बीट म्हणून सांभाळलं असल्याने अनेक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले सुसंस्कृत स्वयंसेवक ठाऊक आहेत मला .
      तुमच्या सारख्या नापास स्वयंसेवकांशी कसं वागावं हे तुकारामांनी शेकडो वर्षापूर्वी सांगून ठेवलंय .
      तुकाराम माहिती नसणार तुमच्यासारख्या नापासांना म्हणून कोट करतो-
      ” विंचू देव्हाऱ्याशी आला देवपूजा नावडे त्याला
      तेथे पैजाराचे काम…”
      खात रहा आयुष्यभर !
      कंटाळा आला नापासांशी बोलण्याचा , थांबतो आता . तुम्ही चालू द्या…

     • Kisshor Dargalkar ….
      आपणही आपलीच वरील पोस्ट वाचा आणि सिंहावलोकन कराल अशी अपेक्षा ठेवतो, धन्यवाद

     • Kisshor Dargalkar ….
      Praveen Bardapurkar कालपासून तुम्ही आणि तुमचे भक्त यांनी मला भडवा, मूर्ख,बेअकल, फुंकून टाक वगैरे विशेषण लावून ट्रोल केले, आपल्याला त्यात काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही उलट आपण मला तुडवाईची भाषा केलीत, मनुष्याच्या अहंकाराला उत्तरं नसते हेच खरं
      असो,माझ्यावर संघाचे संस्कार आहेत तयाला स्मरून, माझ्या पोस्टमूळे आपल्याला काही मानसिक त्रास झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, धन्यवाद

     • माझ्या पत्रकारितेच्या संदर्भात काहीही माहिती नसताना आपण ‘मलिदा’सारखी हिणकस भाषा जर वापरली नसती तर मी दखलही घेतली नसती ( माझी ‘कडक’ कॉपी तर अजून पोस्ट केलेली नाहीये ! ) आणि लोकही इतके संतप्त झाले नसते .
      प्रक्षोभित होण्याची संधी आपणच लोकांना दिली ; आता त्यांना बोल लाऊन काय उपयोग ?
      मी समाजवादीे, हे राजकारण , समाजकारण, प्रशासन , सांस्कृतिक क्षेत्रात आणि पत्रकारितेत माहिती आहे .
      पत्रकार म्हणून रा. स्व. संघ हे बीट प्रदीर्घ काळ सांभाळलं असल्यानं स्वानुभवानं सांगतो-सच्चे स्वयंसेवक हिणकस भाषा वापरत नाहीत , सुसंस्कृतपणा सोडत नाहीत ( आणि जे करायचं ते गुपचूप करायला विसरत नाहीत !) .
      पत्रकार म्हणून माझी परखड प्रतिमा माहिती असल्यानंच संघाशी संबधितही अनेकांनी आपणाविरुध्द तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या , त्यामुळेच हे नीट समजून घ्या .
      आपल्या भाषेमुळे आपण ‘नापास’ स्वयंसेवक आहात हे लक्षात आलंय !
      आव्हान स्वीकारण्याऐवजी आपण दिलगिरी व्यक्त करताय म्हणजे चुकल्याची कबुली देत आहात .​

  • अहो, तेच लिहिलंय मी !

 • Narendra Gangakhedkar ….
  अतिशय मुद्देसूद विश्लेषण . तुम्ही जे प्रश्न उभे केले आहेत त्याची उत्तरे डाव्या सो कॉल्ड पुरोगामी मंडळींनी दिली पाहिजेत . ते सोयीचे नाही म्हणून ते तसे करणार नाहीत . उजव्यांच्याकडे बोट दाखविल्यामुळे त्यांनी आपले म्हणणे स्वच्छ भाषेत मांडले पाहिजे .
  आरोप – प्रत्यारोप चालूच आहेत . पुरावे कोणीच सादर करीत नाहीत .
  दोन्ही बाजू केवळ राजकारणासाठी ह्याचा वापर करीत आहेत .

  • Narendra Gangakhedkar ….
   अतिशय मुद्देसूद विश्लेषण . तुम्ही जे प्रश्न उभे केले आहेत त्याची उत्तरे डाव्या सो कॉल्ड पुरोगामी मंडळींनी दिली पाहिजेत . ते सोयीचे नाही म्हणून ते तसे करणार नाहीत . उजव्यांच्याकडे बोट दाखविल्यामुळे त्यांनी आपले म्हणणे स्वच्छ भाषेत मांडले पाहिजे .
   आरोप – प्रत्यारोप चालूच आहेत . पुरावे कोणीच सादर करीत नाहीत .
   दोन्ही बाजू केवळ राजकारणासाठी ह्याचा वापर करीत आहेत .

 • Sudarshan Rapatwar ….
  खुप छान..