सुषमा – स्वप्न ते भंगले !

एकेकाळी शिष्य असलेल्या नरेंद्र मोदी यांना लालकृष्ण अडवाणी यांनी नंतर विरोध का केला हे ललित मोदी प्रकरणाचे वार सहन करावे लागल्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना चांगलेच उमगले असणार. दोन वर्षापूर्वी ‘प्राईम मिनिस्टर इन वेटिंग’ असणाऱ्या सुषमा स्वराज सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गळ्यातील ओढणे झाल्याच्या वर्तमान चित्रातून राजकारणातील अनिश्चितता म्हणजे काय याचाही प्रत्यय यानिमित्ताने सुषमा स्वराज यांना पुरता आलेला असणार! ज्यांच्या काळात ललित मोदी रुजले-फोफावले, मग आक्राळविक्राळ होत आवाक्याच्या बाहेर जात थेट राजरोसपणे परदेशी पलायन करते झाले ते सर्व आणि भाजपतील विद्यमान अनेकांना ललित मोदी नावाचा न फेडता येणारा लबाडीच्या कर्जाचा डोंगर सुषमा स्वराज यांच्या खात्यावर जमा करण्याची घाई झालेली आहे! ललित मोदी नावाच्या कुप्रथेचे आद्य प्रणेता ‘धर्मा तेजा’ (अधिक माहितीसाठी ज्येष्ठ पत्रकार-स्नेही भाऊ तोरसेकर यांचा ब्लॉग वाचावा) कॉंग्रेसच्या नेहेरू-इंदिरा युगीन आहे; नगरवाला, चंद्रास्वामी, क्वात्रोची, सुखराम, सुरेश कलमाडी, राजा, परदेशी बँकातील पैसा ही त्या रोपट्याला आलेली फुले आणि कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा त्याची फळे आहेत; महत्वाची म्हणजे हे पीक काँग्रेसच्या शेतातले आहे. धर्म तेजा नावाचा इतका प्रभाव त्याकाळात होता की जंजीर चित्रपटाच्या खलनायकाचे नाव तेजा ठेवण्याची उर्मी लेखकाला आवरली नव्हती!

एखाद्या उत्कंठावर्धक राजकीय महाकादंबरीची महानायिका शोभावी असा सुषमा स्वराज यांचा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय राजकारणातील प्रवास अत्यंत ऐटदार, संघर्षमयी आणि अचंबितही करणारा आहे. गव्हाळ वर्णाच्या, लहान चणीच्या आणि फर्डे वक्तृत्व असलेल्या सुषमा यांचा जन्म हरियाणातील पलवाल या गावी १४ फेब्रुवारी १९५२ रोजी लक्ष्मीदेवी आणि हरदेव शर्मा या दाम्पत्याच्या पोटी झाला. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असत. त्याच वयापासून त्यांचे नाव वक्ता म्हणून गाजू लागले. कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांचे प्रेमबंध इंग्रजी वक्तृत्वात तेव्हा गाजत असलेल्या स्वराज कौशिक यांच्याशी जुळले आणि पुढे प्रशासकीय सेवेत गेलेल्या स्वराज कौशल यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. १९७७च्या लोकसभा निवडणुकीत सुषमा यांच्यावर प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली. नंतर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत सुषमा यांना उमेदवारी देण्याची शिफारस खुद्द जयप्रकाश नारायण यांनी केली आणि विजयानंतर त्या मंत्री झाल्या. कामगार मंत्री असताना त्रिपक्षीय करार करताना कामगारांची बाजू घेत हरियाणाचे मुख्यमंत्री असलेल्या देवीलाल यांच्याशी थेट पंगा घेतल्यावर त्यांनी राजीनामा दिला पण, तत्कालिन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी त्यांचा पुन्हा मंत्रीमंडळात समावेश करायला लावला. पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रशेखर यांच्याही सुषमा स्वराज विश्वासातल्या होत्या आणि त्यांच्या राजीनामा प्रकरणात चंद्रशेखर यांनी देवीलाल यांना कसे दाटले होते, यांच्या आठवणी अजूनही हरियाणाच्या राजकारणाच्या चर्चेत आहेत. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या सय्यद शहाबुद्दीन यांच्या मागणीला सुषमा यांनी ठाम विरोध दर्शवला. तरी जनता पक्षात त्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्दयावर वाजत-गाजत झालेल्या फुटीनंतरही सुषमा मात्र भारतीय जनता पक्षात सहभागी झाल्या नाही; त्या जनता पक्षातच राहिल्या. अखेर लालकृष्ण अडवाणी यांनी आग्रह केल्यावर त्यांनी १९८४त भाजपत प्रवेश केला पण, ज्या दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४रोजी सकाळी, त्या पक्षप्रवेशासाठी भाजपच्या अशोक मार्गावरील राष्ट्रीय कार्यालयात पोहोचल्या तेव्हा अडवाणी यांनी त्यांना तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे वृत्त सांगितले. या हत्येमुळे सुषमा यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करणारी पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली!

नंतर भाजप आणि देशाच्या राजकारणात सुषमा यांनी घेतलेली झेप सर्वज्ञात आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे केवळ दोन सदस्य निवडून आले; इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या लाटेनंतर विशेषत: भाजपसारख्या नव्याने सुरुवात करणाऱ्या पक्षाच्या वाढीसाठी तो अतिशय विपरित कालखंड होता होता. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत दुसऱ्या फळीतील प्रमोद महाजन, कुशाभाऊ ठाकरे यांच्याप्रमाणे सुषमा स्वराज ठाम राहिल्या. पक्ष विस्तार आणि सुषमा स्वराज यांचा बोलबाला वाढू लागला. अफाट वाचन, कुशाग्र स्मरणशक्ती आणि दिवस-रात्र न बघता काम करण्याच्या सवयीने हा बोलबाला वृद्धींगत आणि राजकीय आकलन प्रगल्भ होत गेले. दरम्यान हरियाणा सोडून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली; क्षेत्र व्यापक झाले आणि नेतृत्वाचे पंखही मग विस्तारतच गेले. त्यांची नेतृत्व निष्ठाही बावनकशी ठरली. लालकृष्ण अडवाणी यांच्या पुढाकारानेच त्यांना राज्यसभेवर संधी मिळाली आणि स्वराज ‘दिल्लीकर’ झाल्या. भारतीय जनता पक्षात ज्या मोजक्या महिला त्या काळात यशस्वी ठरल्या त्यात सुषमा स्वराज यांचे नाव अग्रक्रमावर आहे. पक्षाच्या पहिल्या महिला राष्ट्रीय सरचिटणीस, पहिल्या महिला प्रवक्त्या, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.. अशी अनेक पहिली-वाहिली पदे त्यांनी भूषविली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही केंद्रीय मंत्री मंडळाच्या त्या अविभाज्य घटक होत्या. भाजपचा केंद्रातील पहिल्या तेरा दिवसात संसदेचे कामकाज दूरदर्शनवर प्रसारित करण्यासारखा धाडसी निर्णय घेणाऱ्या सुषमा स्वराजच होत्या.

मनाला पटणारा नसला तरीही अटलबिहारी वाजपेयी आणि/किंवा लालकृष्ण अडवाणी यांनी दिलेला आदेश पाळणारा निष्ठावंत असा लौकिक दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवताना सुषमा यांनी प्राप्त केला. अशाच एका दुसऱ्या निर्णयाने त्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी आणि राष्ट्रीय नेता अशी दुहेरी मान्यता मिळाली. तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांचा आदेश आहे हे, पहाटे अडीच वाजता कळल्यावर सकाळी धाव घेत उमेदवारी अर्ज दखल करून सुषमा स्वराज यांनी नुकत्याच काँग्रेसच्या राजकारणात सक्रीय झालेल्या सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकातील बेल्लारीतून लोकसभा निवडणूक लढवली. ‘स्वदेशी’ विरुद्ध ‘विदेशी’ बहु असा हा सामना रंगला. या निवडणुकीत काँग्रेस आमदार असलेल्या विधानसभा मतदार संघात त्यांना सोनिया गांधी यांच्यापेक्षा एक लाखावर जास्त मते मिळाली. त्यांचा पराभव अपेक्षित होताच पण, सोनिया गांधी यांच्यापेक्षा तो केवळ ५६ हजार मतांनी व्हावा अशी राजकीय किमया आयुष्यात कधीही बेल्लारी न पाहिलेल्या, कन्नड भाषा न येणाऱ्या, त्या संस्कृतीशी पूर्ण अपरिचित असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी बजावली आणि पराभवातही यश असते हे दाखवून दिले. संघाच्या आदेशाप्रमाणे अडवाणी यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद सोडावे लागले आणि अडवाणी यांच्या वारस म्हणून सुषमा लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीत विराजमान झाल्या. जी महिला पंतप्रधान झाली तर ‘मुंडन करेन-श्वेत वस्त्र परिधान करेन’ असा आततायीपणा करणाऱ्या सुषमा स्वराज यांनी केला होता ‘त्याच’ सोनिया गांधी तेव्हा सभागृहात यूपीएच्या सर्वोच्च नेत्या म्हणून समोरच्या बाकावर स्थानापन्न होत्या, राजकारणातही काव्य असते त्याचा भारतीय लोकशाहीने आणून दिलेला हा प्रत्यय होता! याच काळात ‘प्राईम मिनिस्टर इन वेटिंग’ म्हणून सुषमा स्वराज यांच्याकडे पाहिले आणि बोलले जाऊ लागले. कर्नाटकातील खाण मालकांशी असलेले अर्थपूर्ण सबंध वगळता (एव्हाना भारतीय राजकरणातील प्रत्येक नेत्याची ‘ती तशी ओळख’ ही अपरिहार्यता झालेली आहे!) सुषमा यांच्या राजकीय कारकिर्दीवर डाग नव्हता तरीही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या पुरुष प्रधान संघटनेची संमती, नरेंद्र मोदी यांचा संभाव्य उदय आणि पक्षात पुरेसे ‘फॉलोइंग’ हे तीन सुषमा यांच्या ‘प्राईम मिनिस्टर इन वेटिंग’चे स्वप्न साकारण्यातील अडथळे होते.

नितीन गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्ष करून संघाने एकाचवेळी अडवाणी यांना बाजूला होण्याचा इशारा दिला आणि नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा केला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अटलबिहारी वाजपेयी एव्हाना बाजूला गेलेले होतेच, अडवाणी यांच्यापाठोपाठ त्यांचे समर्थक एकापाठोपाठ एक अडगळीत टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली. रक्ताचे पाणी करून पक्ष वाढवला त्या अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंतसिंह यांना उमेदवारीसाठी याचना करावी लागते असे दृश्य पाहायला मिळाले, अडवाणी यांचे होऊ पाहणारे बंड केव्हा मोडून काढले गेले हे कळलेच नाही. अरुण जेटली, राजनाथसिंह यांनी तलवारी म्यान केल्या. सुषमा यांनी बराच थयथयाट केला पण उपयोग झाला नाही. भारताच्या हिंदुत्ववादी राजकारणात वाजपेयी-अडवाणी युगाचा अस्त आणि ‘भागवत-मोदी युगारंभ’ झालेला होता! नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री झाल्या. जयप्रकाश नारायण-चंद्रशेखर ते वाजपेयी-अडवाणी अशा बहुपेडी, विस्तृत राजकीय संस्काराचे संचित बाळगणाऱ्या, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून एकमेव-बेल्लारीचा अपवाद वगळता दहा निवडणुका जिंकण्याचा अनुभव पाठीशी असणाऱ्या सुषमा स्वराज नावाच्या राजकीय कथेतील महानायिकेच्या पंतप्रधानपदाच्या स्वप्नाचा महाअपेक्षाभंग झालेला आहे, त्या पक्ष आणि सरकारात एकाकी पडल्या आहेत. एवढेच नाही तर, आता त्या अपेक्षाभंगाला महामानहानीचे मखर लाभण्याची चिन्हे आहेत.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर, भारतीय जनता पक्षात गेल्या वर्षभरात जे काही घडले त्याला राजकारण(च) म्हणतात. सुषमा स्वराज पंतप्रधान झाल्या असत्या तर पक्षातील विरोधकांना त्यांनी राजकारणाची खेळी म्हणून नामोहरम केले असते तेच नरेंद्र मोदी यांनी केले आहे. फरक असलाच तर तो पंख कापण्याच्या पद्धतीत आहे, नरेंद्र मोदी अशा ‘कापाकापी’च्या बाबतीत कसे धारदार प्रगल्भ आहेत हे संजय जोशी प्रकरणातून दिसले आहेच. आज जरी सरकारने सुषमा यांना अभय दिल्याचे चित्र दिसत असले असले तरी ते फसवे आहे ; त्यातून कायम नरेंद्र मोदी यांच्या अंकित राहण्याचा धोका आहे, हे सुषमा यांनाही चांगले ठाऊक आहे. असे शृंखलाबद्ध राहण्याचा स्वभाव नसल्याने आणि विरोधी पक्ष राजीनाम्याच्या मागणीसाठी संसद चालवू देणार नसल्याने ललित मोदी यांना केलेल्या मदतीची किंमत म्हणून सुषमा यांना परराष्ट्र मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागण्याचीच शक्यता जास्तच आहे…काहीही घडले ते नरेंद्र मोदी यांच्या पथ्यावरच पडणारे आहे. ललित मोदी प्रकरण नरेंद्र मोदी गटातून लिक केले गेले असण्याची बोलवा आहे. अशी गोपनीय माहिती आणि त्याच्यापुष्ट्यर्थ असणारे दस्तावेज शक्तीमानांकडेच असतात. त्या शक्तीमानांत सध्या मोदी, अमित शहा आहेतच की.

राजकारणात कोणतीच स्थिती कायम नसते म्हणून सुषमा स्वराज कायमच्या संपल्या असा निष्कर्ष आज तरी घाईघाईने काढता येणार नाही. पण, तो तसा काढला जावा अशी व्यवस्था नरेंद्र मोदी करू शकतात, हेही न विसरू शकणारे वास्तव आहे!

=प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com​

संबंधित पोस्ट