स्थित्यंतरं आणि स्थलांतरं!

(माधवबाग हॉस्पिटल्सच्या’आरोग्य संस्कार’या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख)

स्थित्यंतर ही मानवी जगण्याची अपरिहार्यता आहे. त्याशिवाय जगण्यात गंमत नाही, नाट्य नाही. स्थित्यंतर म्हणजे प्रत्येक वेळी काही तरी प्रचंड मोठी उलथापालथ घडणं, असंही समजण्याचं काहीच कारण नाही; अनेकदा सध्या-साध्या रुपात ते आपल्या समोर येत असतं. स्थित्यंतर म्हणा की बदल, उत्क्रांतीच्याही स्वरूपात आपल्याला भेटत असतं. आपण किंवा अन्य कुणी काही तरी निर्णय घेतला किंवा कोणा परिचित किंवा अपरिचितानं काही क्रिया केली तर त्याचा आपल्यावर सर्वांचा एकत्रितपणे होणारा चांगला-वाईट परिणाम म्हणजे स्थित्यंतर असतं. हा परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन पातळ्यावर होत असतो. अतिशय किरकोळ निर्णयामुळेही मानसिक पातळीवर सहज स्थित्यंतर होत असतं. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एखादं आवडतं गाणं आठवलं की चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात, सकाळ प्रसन्न होते किंवा एखाद्या कामानं मिळणारं समाधान विलक्षण असतं..हे आभासी असतं पण ती उर्जा, तो सकारात्मक परिणाम दीर्घकाळ टिकतो. एखादा निर्णय असा घेतला जातो की त्यातून आलेल्या स्थित्यंतरानं भरपूर धन, पद आणि मान-मरातब मिळून जीवनशैलीत आमुलाग्र बदल होतो; अशी स्थित्यंतरे दीर्घकालीन परिणामांची असतात.

आस्मादिकांच्या आयुष्यात स्थित्यंतरं आणि स्थलांतरं हातात हात घालून आजवर कायम सोबत आहेत. यातल्या प्रत्येक स्थित्यंतर आणि स्थलांतरानं आकलन विस्तारलं, जाणीवा टोकदार झाल्या, अनेकदा दुसरी बाजू समजल्यानं दृष्टी विस्तारली आणि या सर्वांच्या एकत्रित परिणाम म्हणून समंजसपणात वैपुल्यानं संपन्नता आली. अर्थात, हे जाणवण्याचासुध्दा एक क्षण असतो. १९७१ ते १९९८ अशी सलग २७/२८ वर्ष मी नुसता धावत होतो, काही तरी संघर्ष करत होतो, मिळेल ते अनुभव पोतडीत जमा करत होतो. त्याकडे एकदा वळून बघावं, काय करायला हवं होतं आणि काय काय नाही, याचा आढावा घ्यावा, काय चुकलं होतं हे जाणून घ्यावं…यासाठी वेळच मिळालेला नव्हता. औरंगाबादला आलो (आम्ही १० मे १९९८ ते २४ मार्च २००३ औरंगाबादला होतो.) आणि रिपोर्टिंगचा धबडगा एकदम थंडावला. तोपर्यंत फक्त रविवारी दुपारी कुटुंबीयासोबत जेवणाची संधी मिळत असे; औरंगाबादला आल्यावर प्रथमच दररोज आम्ही तिघे म्हणजे पत्नी मंगला, मुलगी सायली आणि मी दुपारी-रात्री जेवायला एकत्र भेटू लागलो. किती किरकोळ स्थित्यंतर होतं ते पण, जगण्यात समाधान दाटून आलं…काही तरी वेगळं आणि छान गवसलंय असं जाणवलं, मोठा ऐवज हाती लागलाय असं वाटू लागलं.

भटकंती बहुदा माझ्या जगण्याची मुलभूतता आहे. आई नर्स होती आणि तिच्या सतत बदल्या होतं त्यामुळे आमचं विंचवाचं बिऱ्हाड कायम पाठीवर असायचं! एचएससी होईपर्यंत सलग अडीच-तीन वर्ष एका गावात काढली असं कधी घडलंच नाही. बरं ही गावंही मोठी नाही तर ती सगळी खेडी; आकार लहान किंवा मोठा एवढाच काय तो फरक. तेव्हा हजार पाचशे वस्ती असणारी ही बहुसंख्य गावं गेल्या पन्नास वर्षात नागरीकरणाची हवा लागून वेशीबाहेर विस्तारलीयेत, अनोळखी वाटू लागली आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या अंधानेर नावाच्या गावातून मी एचएससी झालो. तोपर्यंत उन्हाळ्यात काही तरी ‘किडूक-मिडूक’ काम करुन वर्षाच्या शिक्षणाची जमेल तशी तयारी करायची, अशी आमच्या घरातली प्रथा झालेली होती. एचएससीची परिक्षा दिल्यावर नंतरची ३/४ वर्ष रोजगार हमी योजनेनी याकामी खूप साथ दिली. अर्थात आठवड्यातून एखादा अपवाद वगळता खडीबिडी फोडावी लागली नाही कारण, अक्षर छान होतं. कायमच मस्टर लिहिणं, हजेऱ्या लावणं, अहवाल तयार करणं, आठवडी पगाराच्या वेळी मदत करणं, सुकडी वाटपाचा हिशेब ठेवणं अशी कामं वाट्याला यायची. मोठ्या भावाचा मेव्हणा दिनकर लोखंडे हा तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यात होता. वाणिज्य शाखेतील पदवीच्या टप्प्यावर त्यानं मला औरंगाबादला ऑफिसमध्ये बैठा जॉब मिळवून दिला. अकाऊंटस सेक्शनला. आमचा पगार रोहयोवरून व्हायचा; तो बहुदा दिवसाला साडेतेरा किंवा पावणेचौदा रुपये होता. कामाचं स्वरूप अकाऊंटस सेक्शनला सर्वांचा सहायक! कामाचे सलग ९० दिवस पूर्ण होऊ द्यायचे नाहीत कारण मग नोकरीत कायम करावं लागायचं असा नियम होता, म्हणे. रोहयोवरच्या आम्हा सर्वांनाच ७५-८० दिवस झाले की एका आठवड्याची सक्तीची विश्रांती मिळायची. पण, मी मात्र कामावर असायचो कारण माझं अक्षर! अकाऊंटस सेक्शनचे सिनियर्स कॉन्टरीब्युट करुन त्या दिवसांची रोजी मला द्यायचे. फार चांगले सिनियर्स होते. कॉलेज, वक्तृत्व स्पर्धा, आकाशवाणीच्या असाईनमेंट लक्षात घेऊन माझी कामाची वेळ ठरवायचे. माझं सतत वाचतं राहणं, मोर्च्यात सहभागी होणं, गाणी म्हणणं, वेगवेगळ्या शिबिरात जाणं वगैरे मात्र त्यांना बिलकुल आवडायचं नाही!

मध्यमवर्गीय पांढरपेशं ब्राह्मणी आयुष्य म्हणून तेव्हा खरं तर चांगलं सुरु होतं, असं म्हणायला हवं. कारण तात्पुरती का असेना पण, भविष्यात कायम होणारी शासकीय नोकरी होती. तेच जगणं कायम ठेवलं असतं तर लवकरच नोकरीत कायम झालो असतो. व्यवस्थेचा भाग म्हणून वरकमाई करुन पैसे कमावले असते. औरंगाबादला सिडको, हडको या नवीन वस्त्यांचे वेध लागलेले होते. रीतसर हुंडा वगैरे घेऊन भरपूर मानापमान करून घेत लग्न करुन सिडको किंवा हडको भागात एखादं घर बांधलं असतं. त्याला मातृछाया,पितृछाया किंवा गेला बाजार गुरुकृपा किंवा तत्सम नाव दिलं असतं. नोकरीतून निवृत झाल्यावर गलेलठ्ठ सेवानिवृत्ती वेतन खात टिव्हीवरच्या खुनशी मराठी-हिंदी मालिका बघत रवंथ करत आरामात जगलो असतो! पण, हे व्हायचं नव्हतं. मला लेखनाचे वेध लागलेले होते, कथा लेखनानं झपाटून गेलेलो होतो. छुटपूट वृत्तपत्रीयही लेखन आणि आकाशवाणीच्या असाईनमेंट करत होतो. पत्रकारिता केली तर ती आपल्या कथा लेखनासाठी उपयुक्त ठरेल असं वाटायला लागलं होतं.

याच दरम्यान एक बाब लक्षात आली. औरंगाबादेत तेव्हा ज. रा. बर्दापूरकर हे बडं प्रस्थ होतं. ते तसे दूरचे काका होते म्हणे पण, वडिलांचं अकाली निधन झाल्यावर ज. रा. बर्दापूरकर यांच्याशी आम्हा कुटुंबियांचा संपर्क उरलेला नव्हता. समाजात त्यांचं नाव इतकं बडं व प्रतिष्ठीत आणि आम्ही मामुली. पण, कुठंही गेलं आणि नाव सांगितलं की ‘जगन्नाथरावांचा कोण?’ असं हमखास विचारलं जायचं. औरंगाबादेत राहिलं तर याच नावाच्या छायेत आपल्याला जगावं लागेल ही भीती अकारण वाटायला लागली आणि मी थेट गोव्यात पणजीला कूच केलं…तेव्हा गोमंतकचे संपादक असलेल्या माधव गडकरी यांच्याकडे!

Praveen-Bardapurkar-Family

हे आयुष्यातलं निर्णायक स्थित्यंतर होतं. मी स्वत:ला काही प्रतिभावंत लेखक वगैरे कधीच समजलो नाही, समजत नाही आणि समजणारही नाही. ज्या भाषेत ज्ञानेश्वर- तुकाराम झाले त्या भाषेत कुणी स्वत:लं चांगलं लिहिता येतं अशा वल्गना करू नयेत, अशी माझी कायम धारणा आहे. एक पत्रकार आणि संपादक म्हणून असणारा स्वत:चा वकुबही चांगला मला ठाऊक आहे. पण आज पत्रकारिता आणि लेखन, या क्षेत्रात जिथे कुठे आहे/असेन त्याचं सर्व श्रेय औरंगाबाद सोडण्याच्या निर्णयाला आहे. कधी ‘लोकसत्ता’च्या एखाद्या आवृत्तीचा निवासी संपादक आणि संपादक होईन, अशी माझी महत्वाकांक्षा कधीच नव्हती; खरं तर ‘लोकसता’ सारख्या दैनिकात नोकरी मिळवावं हेही स्वप्न नव्हतं. आपण न थांबता, न थकता परफॉर्म करत राहावं एवढंच तेव्हा समजत होतं. ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर झालो तेव्हा खूप काही साध्य केलंय/झालंय असं वाटत होतं. तिथं असतानाच माधव गडकरी यांना आम्ही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला बोलावलं. विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमात माधवरावांच्या हस्ते मला ‘युगवाणी’च्या कथा स्पर्धेचं पाहिलं पारितोषिक प्रदान झालं. त्या रात्री गप्पा मारतांना माधवरावांनी माझ्या साहित्यिक मानसिकतेच्या पार ठिकऱ्या-ठिकऱ्या उडवल्या. “मराठी पत्रकारितेत नाव मिळवायचं असेल तर केवळ साहित्य नाही तर, एकूण मराठी सांस्कृतिक जगत असं बीट कव्हर करावं लागेल. राजकीय समज चांगली असताना केवळ साहित्य बीटचा विचार हा करंटेपणा आहे…’ वगैरे वगैरे सुनावलं. त्यांनीच मला लगेच मुंबई सकाळचं काम करायला सांगितलं. पुढे मी नागपूर पत्रिका तडकाफडकी सोडल्यावर मुकुंदराव किर्लोस्कर यांनी पुणे ‘सकाळ’ आणि माधव गडकरी यांनी ‘लोकसत्ता’चं काम करायची संधी मिळवून दिली. (जयवंत दळवी यांनी शब्द टाकल्यानं गोविंदराव तळवलकर यांनी माझी त्याचवेळी महाराष्ट्र टाइम्ससाठी निवड केलेली होती. त्याबद्दल ‘नोंदी डायरीनंतरच्या’ या पुस्तकात विस्तारानं लिहिलेलं आहे.) हे स्थित्यंतर फारच क्रुशियल ठरलं कारण ‘लोकसत्ता’ आणि ‘सकाळ’मुळे विदर्भाबाहेर नाव मिळालं. पत्रकारितेत चांगल्या संधी पुढे मिळणार आहेत याची चुणूक त्या काळात केलेल्या कामामुळे लागली.

‘लोकसत्ता’चा नागपूर प्रतिनिधी म्हणून काम करायला मिळणं हेही एक महत्वाचं स्थित्यंतर होतं. तत्पूर्वी ‘मराठी बाण्या’ला स्मरून एक जाहिरात एजन्सी सुरु केलेली होती आणि तो व्यवसाय नेहेमीप्रमाणे सुरुवातीला चांगला चालून नंतर कंगाल करणारा अनुभव ठरलेला होता. गावातल्या देणेक-यांना चुकवत दिवाभीतासारखं जगणं सुरु होतं. नेमक्या याच कोसळत्या क्षणी माधवराव गडकरी यांच्यामुळे ‘लोकसत्ता’चा नागपूरचा पूर्णवेळ प्रतिनिधी म्हणून कामाला सुरुवात करता आली. ती केवळ पत्रकारितेतील मोठी संधी नव्हती तर ती आर्थिक स्थैर्याचीसुध्दा नांदी होती. नंतर ‘लोकसत्ता’ची नागपूर आवृत्ती सुरु झाली आणि कधी अपेक्षा केलेली नसताना मुख्य वार्ताहर झालो. ‘लोकसत्ता’त काम करताना आकलन आणि दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. एका विभागापुरती मर्यादित असणारी ही दृष्टी राज्यव्यापी आणि नंतर मुंबईत काम करताना तर राष्ट्रीय झाली. एखाद्या घटनेकडे राज्यव्यापी दृष्टीने कसं बघायचं, नाण्याची दुसरी बाजू लक्षात घेत (किंवा न घेताही!) विश्लेषण कसं करायचं, राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नसतं तर त्यात आर्थिक हितसंबंध अतिशय मोठ्या प्रमाणात कसे गुंतलेले असतात आणि या त्याचे ‘धागेधोरे’ अदृश्यपणे अगदी देशव्यापी कसे पसरलेले असतात याचं आकलन ‘लोकसत्ता’मुळेच झालं. वयाची चाळीशी पार केल्यावर नागपुरातून दिल्लीत जाण्याची संधी मिळणार असं वाटत असतानाच मला मुंबईत बदली मिळवावी लागली. त्यावेळी वयाच्या चाळीशीत मुंबईला जाऊ नये असं मत (मी आणि पत्नी-मंगला वगळता) बहुतेक सगळ्यांचंच होतं. आम्हाला मात्र, ही संधी सोडली तर आपल्याला करीयरमध्ये नागपुरात मोठा पल्ला गाठता येणार नाही ही खात्री होती. नागपूर सोडलं नसतं तर ‘लोकसत्ता’च्या आधी निवासी संपादक आणि नंतर नागपूर आवृत्तीच्या का असेना पण संपादकपदाची संधी मिळालीच नसती, हे नि:संशय. मुंबईहून औरंगाबादला बदली मागून घेताना तर मी निव्वळ मूर्खपणा करतोय, याबद्दल माझ्या सहकाऱ्यांच्या मनात दुसरा विचार नव्हता. मी मात्र भविष्यात कधी तरी आवृत्ती सुरु होण्याची किंचित शक्यता असणाऱ्या विभागाचा प्रमुख म्हणून मिळणाऱ्या संधीमुळे सुखावलो होतो शिवाय, एककल्ली वृत्तीच्या संपादक अरुण टिकेकर यांच्याशी दररोज समोरासमोर गाठ पडणार नाहीये म्हणजे, वाद टळणार आणि शांतता लाभणार हे समाधानही होतंच!

औरंगाबादनं काय दिलं याचा एक उल्लेख वर आला आहे पण, याच औरंगाबादेत एका श्वानानं माझ्या स्वभावात एक सकारात्मक स्थित्यंतर घडवलं, यावर चटकन कोणाचा विश्वास बसणार नाही. आमच्या जिवलग कौटुंबिक स्नेही डॉ अंजली आणि डॉ मिलिंद देशपांडे यांच्याकडे मार्शल नावाचा डॉगी होता. नासिकला असलेला माझा प्राचीन दोस्तयार डॉ. रवी आणि त्याची पत्नी पुष्पा जोशी यांच्याकडे सिमरन हे अतिगोड पामेरेरियन पिल्लू होतं. या पार्श्वभूमीवर आमच्या कन्येच्या सलग आणि साश्रू आग्रहानं आमच्याकडे अखेर कॅन्डीचं आगमन झालं. समोरचा रागावो, चीडो की प्रेम करो, आपण मात्र लळा कसा लावावा आणि ‘लळ्या’च्या त्या आनंदात कसं जगावं, हे कॅन्डीनं शिकवलं. दररोज त्याला तीन-चार वेळा ठराविक वेळी बाहेर न्यावं लागत असल्यानं माझ्याही जगण्याला शिस्त आली; म्हणजे, रात्री झोपण्या-सकाळी उठण्याच्या वेळा नियमित झाल्या, घर सोडण्याची आणि घरी परतण्याची वेळ सांभाळण्याची सवय लागली. पुढे जाऊन सांगायचं तर, एक प्रकारची सहिष्णुता आली. इतकी सहिष्णुता की, त्या काळात आठवड्यातून चार-पाच वेळा तरी घरी होणाऱ्या पार्टीची किंवा जेवायला कोणी येणार असेल तर त्या पूर्वतयारीसाठी पत्नीला सहाय्य करणं, पार्टी संपल्यावर भांडी आवरणं, क्रोकरी धुणं, आठवड्यातून एकदा तरी किचनचा ताबा घेणं अशा प्रयोगात मला रस वाटू लागला, त्यातून कुटुंबात समरस होता येतंय हे मिळणारं समाधान मस्तच होतं. आमच्या घरच्या दररोजच्या धबडग्यात ही कामं फारच किरकोळ होती पण, घरात कितीही नोकर-चाकर असले तरी गृहिणीला किती आणि कोणत्या प्रकारची कष्टाची कामं करावीच लागतात, त्यात तिचा वेळ कसा जातो आणि त्याची जाणीव आपल्याला कशी नसते, शर्टाची कॉलर स्वच्छ होण्यामागचं इंगित, तिच्या हाताला घट्टे का पडतात; असं बरंच काही समजलं. मंगला झोपायला जाईपर्यंत कॅन्डी तिच्यासोबत का जागतो याचा शोध घेतला तेव्हा घरात साबण-फिनाईल आणि घासण्या जास्त का लागतात असं बरंच काही कळलं. स्त्रीच्या उपेक्षेची ‘ही तर घर घर की कहाणी’ आहे. आपण पुरुष म्हणून किती ‘क्रूड’ वागतो हे उमजून मी चक्क ओशाळलो. रात्री उशीरा ‘आई’ एकटी काम करते तेव्हा किमान आपण तरी तिच्यासोबत जागलं पाहिजे हे एका इतकुशा प्राण्याला समजतं आणि आपल्याला नाही, ही एक चपराकच होती. आणखी एक म्हणजे, घरात कोणी आजारी असलं की कॅन्डी एकदम मनहूस होऊन जात असे. त्याच्यातलं चैतन्य कोमेजून जात असे, त्याची आमच्यातली गुंतवणूक इतकी असे की, तो त्याचं म्हणणंही खूप हळू आवाजात भुंकून सांगत असे! आपलं माणूस आजारी पडलं तर माणसांनी आपापसात कसं वागलं पाहिजे, हेच तो जणू दाखवून देत असे. हा समंजसपणा प्राण्यात उपजत आहे आणि तो आपण-माणसात नाही, याची लख्ख जाणीव कॅन्डीमुळे झाली. कॅन्डीमुळे हे उमजल्यावर घरातलंच नाही तर सहकाऱ्यांपैकी जरी कोणी आजारी पडलं तर माझं वागणं बदललं…कोणी सहकारी आजारी आहे हे कळल्यावर प्रतिक्रियेत ममत्व आलं…सर्व प्रकारच्या मदतीसाठी मन आणि हात पुढे होऊ लागला. शिकवणारा कोण आहे यापेक्षा तो काय शिकवतोय हे जास्त महत्वाचं आणि ते ‘महत्वाचं असणं’ समजून घेणं तर खूप मोलाचं असतं, हे कॅन्डीनं शिकवलं… आजही दिवसातून कॅन्डीची एकदा तरी सय येतेच.

नियोजन केल्याप्रमाणे ‘लोकसत्ता’ सोडल्यावर लेखन-वाचनात आकंठ बुडालो आणि अचानक मंगलाचं दुखणं सामोरं आलं. हे एक स्थित्यंतर आक्राळ विक्राळ आणि भोवंडूनही टाकणारं होतं. तिच्या हृदयात ८ ब्लॉकेजेस निघाले. त्यात भर म्हणजे, वारंवार स्मरण करुन देऊनही एजंट आमच्या हेल्थ इन्शुरन्सचं नूतनीकरण करायला विसरला होता. हे लक्षात येईपर्यंत आठ-एक महिने उलटलेले होते. नितीन गडकरी, मुकुंद बिलोलीकर, गिरीश गांधी, डॉ. अंजली व डॉ. मिलिंद देशपांडे आणि डॉ. अभय बंग, डॉ. प्रदीप मुळे, डॉ. रवी जोशी पाठीशी ठामपणे उभे होते; स्वत:चं दुखणं बाजूला ठेऊन धावत आलेले महेश एलकुंचवार, सुप्रिया आणि विवेक रानडे, श्रुती आणि श्रीकांत विन्चुर्णे, शुभदा फडणवीस, डॉ. अविनाश रोडे, हेमंत काळीकर यांचा मोठा मानसिक आधार लाभला आणि बायपास झाली. आयुष्यभराच्या शिलकीला मोठं खिंडार पडलं. पुन्हा नव्यानं सुरुवात करणं आलं. याच स्थित्यंतराचा पुढचा टप्पा मग भेटीला आला.

तेव्हा खासदार असलेले आणि लोकमत वृत्तपत्र समुहाचे चेअरमन विजय दर्डा हे ‘लोकमत’मध्ये रुजू व्हावं म्हणून मी ‘लोकसत्ता’ सोडल्यापासून व्यक्तिश: मागे लागलेले होते. विदर्भातील ज्येष्ठ सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांच्यावर विजयबाबू यांनी मला ‘लोकमत’मध्ये आणण्याची जबाबदारी सोपवलेली होती. आधी लेखनाचे प्रकल्प आणि मग मंगलाच्या ऑपरेशनमुळे लोकमतमध्ये जॉईन होणं मागे पडलेलं होतं. याच काळात विजय दर्डा यांच्या पत्नी ज्योत्स्ना यांचं निधन झालं. त्या उठवणा कार्यक्रमात गेलो त्या दिवशी संध्याकाळी गजानन जानभोर याच्या मार्फत निरोप देऊन विजय दर्डा यांनी दुसऱ्या दिवशी भेटीसाठी बोलावून घेतलं. भेट झाल्यावर विजयबाबू यांनी ‘जॉईन कधी होता’ अशी पृच्छा केली. पत्नीच्या आजारपणामुळे आपलं हे प्रपोजल मागे राहिलं अशी खंत त्यांनी व्यक्त केली…पत्नीच्या निधनाच्या शोकातही हा माणूस आपली आठवण ठेवतो, या जाणीवेनं मला संमोहितच केलं आणि मी दिल्लीत लोकमत वृत्तपत्र समुहाचा राजकीय संपादक म्हणून रुजू झालो. मंगलाचं झालेलं एवढं मोठं ऑपरेशन, मी वयाची अठ्ठावन्न आणि मंगलानं एकोणसाठ पूर्ण केलेल्या टप्प्यावर आम्ही दिल्लीला स्थलांतरीत होणं हा अनेकांना ‘निर्भेळ बावळटपणा’ वाटत होता; आम्ही मात्र एका नवीन अनुभवाला सामोरे जायला उत्सुक झालेलो होतो.

मी ‘लोकमत’मध्ये रुजू होऊ नये असेच प्रयत्न आणि राजकारण झालं. राजकारण करणारे माझेच जुने आणि काही नवीन सहकारी होते! (मला मराठी लिहिता येत नाही हे ‘लोकमत’मध्ये झालेलं राजकारण, हा तर राजकारणातल्या कुरुपतेचा कळस होता!) अंतर्गत राजकारणात तसंच कोणासमोरही झुकण्यात मला मुळीच रस नव्हता. मी दिल्लीत मन:पूर्वक रुळलो पण, लोकमतमध्ये नाही. त्यामुळे व्यवस्थापन आणि मी; आम्ही परस्परांबद्दल समाधानी नव्हतो. एकदा दिल्लीतच विजय दर्डा यांच्याशी गप्पा मारतांना हा विषय निघाला. हे वातावरण बरोबर नाही यावर आमचं एकमत झालं. मी विजय दर्डा यांना म्हणालो, ‘एखाद दिवशी तुम्ही भारतात नसताना टर्मिनेशनची ऑर्डर दिली गेली तर मी आहेचा पूर्णपणे नाहीच होऊन जाईन!’ आणखी थोडा वेळ काही गप्पा झाल्यावर ‘राजीनामा देतो’ असं मी सुचवलं. बहुदा माझ्याकडूनच हा निर्णय यावा याची, विजय दर्डा वाट पाहत असावेत. त्यांनी मूक संमती दर्शवली. मराठी, हिंदी आणि इंग्रजीत लेखन केलेलं आहे, ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा का होईना मी संपादक राहिलेलो आहे. दहा-बारा पुस्तकं नावावर आहेत. कोणाला तरी इंप्रेस करण्यासाठी मला पत्रकारितेत आणखी काही प्रुव्ह करायचं नव्हतं. वसंत विहारसारख्या उच्चभ्रू वस्तीतला फर्निश्ड अलिशान फ्लॅट, शोफर ड्रिव्हन होंडा ऑकॉर्ड ही अलिशान कार आणि मोठा पगार, यावर उदक सोडून आम्ही दिल्ली सोडली! एका अर्थानं हे स्थित्यंतर फसलेलं असलं तरी केंद्रातल्या मनमोहनसिंग सरकारच्या पतनाचा तसंच नरेंद्र मोदी आणि भाजपच्या उदयाचा, ‘आप’च्या कर्कश्श कल्लोळाचा तो काळ जवळून अनुभवता आला, तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासोबत रशियाची वारी झाली, विजय दर्डा यांच्या स्वभावातला उमदेपणा लक्षात आला..अनुभवाच्या पोतडीत अशा काही अस्सल चीझा जमा झाल्या. (या विषयावर सविस्तर लिहिणं अद्याप बाकी आहे.)

दिल्ली सोडल्यावर मुंबई किंवा नागपूरऐवजी औरंगाबादला स्थायिक होऊ यात असा आग्रह मंगलानं धरला. मध्यंतरी औरंगाबादला असतांना एक फ्लॅट घेऊन ठेवलेला होता. ‘आजवर लहान घरात राहिलो, आता मोठ्या घरात राहू यात’ असं मंगलाचं म्हणणं होतं. कन्या सायली मुंबईत स्थिरावलेली असल्यानं नागपूरपेक्षा औरंगाबाद सोयीचं होतं. इतक्या वर्षांच्या पत्रकारितेतील अनुभवांती ‘लोकमत’मध्ये आपला काय चिवडा होणार काय होणार याचा अंदाज रुजू होण्यापूर्वीच अर्थातच आलेला होता. अनियमित ब्लॉग लेखन बरंच आधीपासून सुरु केलेलं होतं. सर्वांचा विरोध डावलून विजय दर्डा यांच्या आग्रहामुळे ‘लोकमत’मधील ‘दिल्ली दिनांक’ हा स्तंभ सुरु झाला पण, त्याला ‘लोकसत्ता’च्या तुलनेत वाचकांचा अतिशय अल्प प्रतिसाद होता. मग, मी तो मजकूर ब्लॉगवर टाकायला सुरुवात केली आणि त्याची फेसबुकवर कॅम्पेन सुरु केली. दिल्ली सोडल्यावर त्याच ब्लॉग लेखनावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आणि गेल्या सव्वादोन वर्षात ‘ब्लॉगर’ ही माझी नवीन ओळख झाली. blog.praveenbardapurkar.com ला ५० लाखावर हिट्स मिळाल्या आहेत. संचार, उद्याचा मराठवाडा, गावकरी, श्रमिक एकजूट, लोकमुद्रा, जनमाध्यम, स्वतंत्र नागरिक अशा अनेक नियतकालिकात आणि देशातल्या सर्वात मोठ्या ‘डेलीहंट’ या पोर्टलवरही हा ब्लॉग प्रकाशित होतोय. ‘डेलीहंट’नेच ब्लॉगवरील मजकुराची ई-बुक्स प्रकाशित केली आहेत.

आता- वयाची एकसष्टी ओलांडल्यावर, आजवरच्या स्थित्यंतर म्हणा की बदलांचा आणि त्यासोबत झालेल्या स्थलांतरांचा लेखा-जोखा हा असा आहे. भटकंती अद्याप सुरुच आहे पण, बूड औरंगाबादला स्थिरावलेलं आहे. मोकळेपणानं कबूल करतो, चांगली संधी मिळाली तर औरंगाबाद सोडायची खुमखूमी अद्यापही शाबूत आहे. खरं तर, स्थित्यंतर ही मानवी जगण्यातली एक अपरिहार्य वस्तुस्थिती आहे. पण,अगतिक होऊन कण्हतकुंथत प्रारब्ध, विधिलिखित, भागध्येय, नशीब, देवाच्या मनात होतं ते… असे ठपके ठेवले जातात; त्याकडे पाहण्याची विवेकबुध्दीच आंधळी करुन टाकण्याची आपली प्रवृत्ती झालेली आहे. स्थित्यंतर आणि स्थलांतरांना सामोरा जायला विवाहापूर्वी मी एकटा होतो; आता गेली ३२ वर्ष मंगलाची सोबत आहे. प्रत्येक स्थित्यंतर आणि त्यासोबत आलेलं स्थलांतर आम्ही सकारात्मकपणे आणि नव्या उर्जेनं स्वीकारलं. कारण त्यात जी नशा आहे, ती जगण्याची खुमारी वाढवणारी आहे!

प्रवीण बर्दापूरकर
एफ-१२, चाणक्यपुरी, फेज-१, दर्गा रोड,
औरंगाबाद ४३१००१
9822055799 / 9011557099

भेट द्या – www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट

 • Alok Jatratkar
  आदरणीय सर,
  तुमची डायरी किंवा इतर पुस्तकं वाचताना जो फील होता, तसाच फील लेख वाचताना आला. आपल्या ब्लॉगलेखनाच्या तुलनेत हे लिखाण वेगळे आहे. या दोहोंतलं नेहमी जाणवणारं वेगळेपण हे की, ब्लॉगलेखन जितकं निर्भीड आणि थेट आहे, तितकंच किंबहुना, त्याहून अधिक प्रामाणिक आणि प्रांजळ असं हे लेखन असतं. निर्भीडपणा आणि संवेदनशीलता या तशा परस्परविरोधी गुणांचा आपल्या व्यक्तिमत्त्वात परस्परपूरक असा संगम झाल्याचं मला नेहमीच जाणवत राहतं. एक पत्रकार, संपादक म्हणून मी आपल्या प्रथम संपर्कात आलो, तरी एक सहृदयी माणूस म्हणूनच आपली प्रतिमा माझ्या मनात निर्माण झालेली आहे. या सहृदयतेपोटीच उत्तमोत्तम लेखन आपल्या हातून होत आहे, तेही अत्यंत अभिनिवेशविरहित, हे महत्त्वाचे!

 • Laxman Kulkarni
  सर, आपण पाठवलेली दिवालीभेट खोरोखर अमुल्य आहे,स्थित्यंतर व् स्थलांतर या साठी आजही आपण तयार आहात हे वाचून मी थोडा स्वतः लाच लाजलो, आम्ही कदाचित हे विसरलोत की प्रवाही जीवन हे जीवंत पणाचे लक्षण आहे.धन्यवाद।

 • Sopan Bongane…
  प्रिय प्रवीण ,
  स्थित्यंतरं आणि स्थलांतरं , हा तुझा लेख मी आत्ताच वाचला . तुझा जीवन प्रवास आणि माझ्या आयुष्याचा आज पर्यंतचा प्रवास यात खूप साम्य वाटले मला . मराठवाड्याच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाला हा संघर्ष करावा लागला आहे. संघर्षया शिवाय त्याला काहीही मिळाले नाही.तुझ्या सारखाच मीही आत्ताच्या हिंगोली जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलो आणि अनेक स्थित्यंतरं आणि स्थलांतरं करीतच इथं पर्यंत पोचलो. तुझ्या आणि माझ्या आयुष्यातील एक सामान धागा म्हणजे माधव गडकरी आणि अरुण टिकेकर या दोन व्यक्तींचा आपल्या आयुष्याला झालेला स्पर्श ! माधव गडकरी हि व्यक्ती माझ्या आयुष्यात आली नसती तर माझाही प्रवास कोणत्यातरी वेगळ्या दिशेनेच भरकटत गेले असते … टिकेकरांची कारकीर्द हे माझ्याही आयुष्यातील एक दुःस्वप्न होते .
  असो , पण तुझा जीवन प्रवास म्हणजे सकारात्मक आयुष्य कसे जगावे याचा उत्तम नमुना आहे . तुझ्यातील जन्मजात मिळालेली ऊर्जा आणि परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची उर्मी अशीच कायम राहो एवढीच एक मित्र म्हणून प्रभू चरणी प्रार्थना . तुला आणि घरातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

 • Anil Govilkar….
  अतिशय सुरेख आणि रम्य आठवणींनी सजलेला लेख आहे. एका अर्थी, साठी उलटल्यानंतर आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहण्याची उर्मी आणि दृष्टी प्राप्त होते आणि त्यातूनच अशा प्रकारचे लेखन आपल्या हातून घडते. वाचताना मजा आली.

 • Madan Shivam
  Dear Mr. Praveen ,
  Your article is very nice , touchy etc etc etc as usual ….
  but may be I am able ‘know’ my sister better after reading it.
  Though I am younger to U both , I could recollect my days @
  L – 90 Vasant Nagar .after reading the article…..
  Well , it is difficult to express any further …may be when we meet
  we can talk…..for time being just …Thanks…
  Warm regards,

  Madan
  9821216996

 • Nivedita Khandekar…
  नमस्कार सर,
  To get to read something from you … that too on such a topic was wonderful. आत्मपर लेखन कसं असावं …. this writing was perfect example of it.
  And guess what? Right now I am attending a Kojagiri prog where Dr Datta Harkare and his team has presented beautifully rendered songs. But your topic was such, I could not stop myself from reading it right here and now. On mobile.
  And I could so well identify with what you wrote about taking migration as a learning experience. The last para was something I also believe in.
  Looking forward to your writing on Delhi experiences. I am sure you will offer a delightfully different perspective.
  Regards,
  Nivedita
  p.s. I am sure you have noted Candy could not never be मनहूस but what she would become is मायूस.

  • प्रिय निवेदिता ,
   मनहूस हाही एक शब्द आहे–च .
   एकदा लिहिल्यावर नंतर मी ते पुन्हा शांतपणे वाचतो …मग त्यावर ‘कलाकुसर’ करतो …मग मंगला वाचते आणि मी मग पुन्हा वाचतो .
   अशी ती प्रक्रिया असते .
   या रियाझातून शब्दांचा नेमकं ‘फील’ घेता येतो…असं मला वाटतं .
   तू म्हणतेस तसं मायूस हाही शब्द आहे पण, तो इथे चपखल बसला नसता असं या प्रक्रियेत वाटलं .
   तू इतकं बारकाईनं वाचतेस हे फारच आल्हाददायक वाटलं !

   -प्रब

 • Bhagyashree Banhatti….
  मस्तच. तुम्ही कथालेखन करत होता, हेही नव्याने कळले. एखादा कथासंग्रह यावा ही अपेक्षा.
  दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

 • Suhas Bahulkar….
  प्रविणजी छान लेख तुमच्या वाटचालिचा … चांदण चालिचा… पत्नीसंगे वाटचालीचा…अभिनंदन …

 • Deepak Karanjikar….
  केवळ पारदर्शी लेख। आत्ममग्न अवस्थेच्या कड्यावरून आयुष्यात डोकावलेलं, उत्सुकता वाढवणारं लिखाण ।
  बरं वाटलं वाचून इतकेच लिहिणे म्हणजे सावध तळावरून ठोकलेले हाकारे ।त्यामुळे तसे काही करणार नाही। यातून सुटलेले तपशील वाचावेसे वाटतील अशी हुरहूर मात्र पुरी करा असा आग्रह आहे ।
  लेखणीच्या टोकावर राहता तुम्ही। आणखी काय लिहू ?
  मनस्वी धन्यवाद ।
  दीपक

 • Chorghade Shreekant….
  लेख वाचला.पुष्कळसा इतिहास माहिती होता.काही नव्या गोष्टी कऴल्या.एकूण वाचायला मजा आली.

 • Sameer Gaikwad
  नमस्कार सर,
  ‘स्थित्यंतर’ आणि ‘स्थलांतरा’वरचा हा लेख कोणत्याही सृजन व्यक्तीचं आत्मभान जागवणारा आहे..
  यातील आपली वाटचाल व जडणघडण एका प्रेरणादायी पाऊलवाटेवरून तृप्ततेच्या हमरस्त्यावर घेऊन जाते.
  संग्रही ठेवावा असा हा लेख आहे.
  ‘आई’ वाचून झाले आहे. त्यावर मी काही बोलावे किंवा लिहावे इतकी माझी योग्यता नाही. पण त्यात्तील मला भावलेले काही मुद्दे पोस्टद्वारे मांडावेत असे माझ्या मनात आहे. ती पोस्ट लिहून पूर्ण झाल्यावर आपल्याला मेल करेन. त्या पोस्टमध्ये आपणास काही अनुल्लेखनीय वाटले तर तितका मजकूर वगळून पोस्ट प्रसिद्ध करण्याची अनुमती द्यावी. तूर्त एकच सांगेन, पुस्तक वाचून मी भारावून गेलो आहे.
  शुभेच्छांसाठी धन्यवाद सर..

  • प्रिय समीर,
   तुला जे लिहायचे आहे ते तुझे स्वातंत्र्य अबाधित आहे .
   तू लिही, पोस्ट कर .
   मग मी प्रतिक्रिया कळवेन .
   मलाच नाही, कोणाला आवडेल, न आवडेल यासाठी लेखन करु नकोस , हा फुकटचा सल्ला !

   -प्रब

 • Mahesh Bardapurkar….
  सर, खूपच मस्त आणि प्रेरणादायी लिखाण. धन्यवाद

 • Vijay Tarawade….
  खूप मोकळेपणाने लिहिलंय. अगदी अनौपचारिक गप्पा मारल्याचा फील येतो.

 • Narendra Gangakhedkar….
  ब्लॉग वाचला. धडपड समजली . व्यक्तिचित्रणे आवडली . जिद्द कौतुकास्पद. सर्वच गरीब ब्राम्हण कुटुंबातील मुलांना अशीच धडपड करावी लागते. त्यामुळे मी त्यांना दलित ब्राम्हण असे संबोधत असतो. फार थोड्याना हे समजते.

 • Manas Pagar ….
  सुंदर 👌
  हा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी आहे. वयाचा अडसर कुठेही न येता तुमचा उत्साह आजही तरुणांना लाजवणारा आहे. चीरतारुण्याचे वरदान का काय म्हणतात ते हेच असावे 😉

 • Anil Hoil kar….
  या लेखावर मी आधी प्रतिक्रिया दिली नसावी असा अंदाज आहे. लेख सुरेख झाला आहे. काही गोष्टी जाणवल्या. दिल्लीत असताना जे काही राजकारण झाले त्याची तपशीलवार नोंद करता येणे अशक्य आहे का? अगदी नावांचे उल्लेख टाळून, लिहिणे जमणार नाही का? आपल्याकडे एकूणच राजकारण विषयावर फार संदिग्धता बाळगली जाते. राजकारणात ती आवश्यक असते पण जेंव्हा ललित स्वरूपात लेखन अवतरते, त्यावेळी देखील ते अवघड वाटावे का?
  एक बाब, माझा राजकारणावरील अभ्यास आणि अनुभव तुम्हाला पूर्णपणे माहीत आहे, हे ध्यानात ठेऊनच माझ्या मताची पत्रास ठेवावी!! आणखी एक, लेख वाचताना मला तरी त्यात दीर्घ निबंधाची शक्यता बरीच जाणवली. ब्लॉग लिहायचा म्हणजे मग किती लिहायचे, अशा शब्दसंख्येची मर्यादा ओढवून घ्यायला लागते, हे मान्यच आहे आणि म्हणूनच मला वाटते, दीर्घ निबंध हे माध्यम अधिक सोयीस्कर ठरू शकते.
  -अनिल

 • Adv. Laxman Kulkarni…
  सर ,,स्थित्यंतर व् स्थलांतर या साठी आजही आपण तयार आहात हे वाचून मी थोडा स्वतः लाच लाजलो, आम्ही कदाचित हे विसरलोत की प्रवाही जीवन हे जीवंत पणाचे लक्षण आहे.धन्यवाद।