उड गया ‘राजहंस’ अकेला …

‘नागपूर पत्रिके’तल्या दिवसांचं नातं ज्या अनेकांशी घट्ट जोडलेलं आहे त्यातल्या रमेश राजहंस यांच्या निधनाची बातमी अनपेक्षितच. त्या दिवसातल्या दिनकर देशपांडे, हरिहर येगावकर, शरद देशमुख असे काहीजण मृत्यू नावाच्या अज्ञाताच्या प्रदेशात निघून गेले आहेत, त्यात आता रमेश राजहंस यांची भर पडली आहे. नागपूरच्या पत्रकारितेतला माझा पहिला पडाव नागपूर पत्रिकेत पडला आणि रमेश राजहंस यांची ओळख झाली. तेव्हा ते मुख्य उपसंपादक होते, नंतर तीनेक महिन्यातच ते वृत्तसंपादक झाले. दुपारी साधारणपणे एकच्या सुमारास ते कार्यालयात येत आणि पहिली डाक आवृत्ती गेल्यावर तासाभराने म्हणजे सव्वानऊ-साडेनऊच्या सुमारास बाहेर पडत. तेव्हा नागपूरच्या वृत्तपत्राच्या डाक आवृत्ती एस टीच्या बस तसेच रेल्वेने जात. बुलढाण्याला जाणारी शेवटची बस रात्री नऊ वाजता तर दादर एक्सप्रेस पावणेदहाला नागपूरहून सुटत असे; तत्पूर्वी डाक आवृत्ती छापली जाणे आवश्यक असे.

विस्तीर्ण भालप्रदेश, दणकट बांधा, असा दणकट की राजहंस आपल्या खांद्यावर त्यांचा हात ठेऊन बोलू लागले तर दहा मिनिटात आपल्या खांद्याला रग लागत असे! तोंडात कायम पान आणि अनेकदा सोबत असलेल्या शबनम बँगमध्ये दोन-तीन तरी पुस्तकं ही राजहंस यांची काही वैशिष्ट्ये होती. अक्षर रेखीव आणि अवांतर गप्पा फार न मारता आपण बरे की आपले काम बरे ही त्यांची वृत्ती असली तरी ती काही कायम नव्हती. वाचनाचा विषय निघाला की ते हातातलं काम सोडून मंगला, प्रदीप देशपांडे आणि मी यांच्यात सुरु असलेल्या गप्पात ते सहभागी होत. वाचन आणि तेही मराठी, इंग्रजी तसंच हिंदीही असल्याने राजहंस यांचं विषयाचं भान आणि ज्ञान चौफेर असे . इंग्रजी, तत्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा तीन विषयात पदव्युत्तर पदवी असल्याने बहुदा राजहंस यांनी केलेली मांडणी किंवा प्रतिपादन नेमकं असे. त्याला नुकत्याच वाचन केलेल्या पुस्तक आणि मराठी-इंग्रजी वृत्तपत्राच्या वाचनाचा साधार असे. त्यांचा खरा विरंगुळा हरिभाऊ येगावकर असत. पानाचा तोबरा भरून गप्पा मारत बजाज नगर चौकापर्यंत पायी फिरून येणे हा राजहंस- येगावकर जोडीचा आवडता छंद आणि फारच फुरसत असेल तर दिनकर देशपांडे यांच्या फिरक्या ताणणे हा राजहंस यांचं आवडता उद्योग असे. वृत्तसंस्थांच्या बातम्यां नीट टाचणीने टाचून कनिष्ठ सहका-यांना भाषांतर करायला दिल्या की अनेकदा राजहंस वाचनतंद्री लाऊन बसत. संपादकीय बैठकांमध्येही फाफट बोलणे राजहंस यांना आवडत नसे. अशा बैठकात सहभागी होण्यासाठी त्यांनी बहुतेकवेळा एका कागदाच्या चिटो-यावर मुद्दे काढून आणलेले असत. बैठक भरकटली की पानाचा बार भरून राजहंस कंटाळवाणा भाव चेहे-यावर ओढून शांतपणे बसून राहात.

राजहंस यांचा संपादकीय वकूब वाखाणण्यासारखा. या वकुबाला अर्थातच वाचन आणि संयमाची जोड होती. आपलं म्हणणं ते हळू आवाजात आणि ठाम युक्तिवादाची जोड घेत नेमक्या शब्दात सांगत. माणसासारखा हाडामासाचा माणूस असल्याने त्यांना राग येत असे पण रागावले तरीही आवाज चढवणे नाही की वचावचा बोलणे नाही जे काही बोलायचे-रागवायचे ते मध्यम लयीत. महिला सहका-यांशी बोलताना तर राजहंस यांची आदब इतर लाळघोट्या ज्येष्ठांच्यापुढे राजहंस यांच्याविषयीचा आदर वाढवणारी असे. वयाने लहान असणा-या महिला सहका-यालाही ते ‘अगं-तूगं’ करत नसत. कनिष्ठ सहका-याने भाषांतर केलेली कॉपी दिली की मन लावून वाचणार आणि झालेल्या चुका कोणताही विद्वत्तेचा आव न आणता समजाऊन सांगणार. नवीन शब्द आला की शब्दकोश बघायला सांगणार अनेकदा येगावकर आणि तेव्हाच्या मंगला विन्चुरणे यांच्याशी चर्चा करणार, त्या शब्दाची व्युत्पत्ती शोधून काढणार. विदर्भात पहिला भालाकार भोपटकर पुरस्कार मला मिळाला. तेव्हा मराठी पत्रकारितेतला राज्यस्तरीय हा फार मोठा आणि एकमेव सन्मान होता. त्यासाठीची वृत्तमालिका माझ्या मानेवर खडा ठेऊन राजहंस यांनी लिहून घेतली. एकेका भागाचं ३/४ वेळा पुनर्लेखन करायला लावलं . कधी कधी मला त्यांचे हे अचूकतेसाठीचे वागणे अतिजाचक वाटे, कंटाळा येई पण, ते ठाम असत. त्यांनी लावलेल्या या लेखन शिस्तीचा खूप उपयोग आजही होतो आहे. असा व्यापक संपादकीय वकूब असणारा वृत्तसंपादक मला नंतरच्या आयुष्यात भेटला नाहीच.

राजहंस यांना संगीताची जाण नाही तर विलक्षण आवड आहे आणि ते गातात हे मला ठाऊक नव्हते. एकदा बोलताना तलत महमूद विषयी माझ्याकडून दिला गेलेला संदर्भ चूक होता हे लक्षात आणून देताना ‘फिर वोही श्याम, वोही गम…’ हे असं काही गाऊन दाखवलं की मी स्तंभितच झालो. मग त्यांच्या या अद्भूत पैलूची एकेक पाकळी उलगडत गेली आणि कळत गेलं की हा वृत्तपत्राच्या कंटाळवाण्या कचेरीत रमणारा हा माणूस गाण्यातला ‘दादा’ आहे. त्यांच्या या दादागिरीचे विविध पैलू नंतर सुरेलपणे उलगडत गेले. गाणं हा या माणसाचा श्वास आहे आणि पत्रकारिता हा छंद. एम.ए.ची पदवी रमेश राजहंस यांनी संगीत विषयात घेतली आहे. तत्पूर्वी लहानपणापासून त्यांनी गायनाचं रीतसर शिक्षण घेतलं आहे आणि महालात नाईक रोडवर त्यांचं घर संगीताचा चैतन्यदायी झरा आहे, नागपूरच्या संगीत क्षेत्रात रमेश राजहंस नावाचं एक घनगर्द बेट आहे …असे एक ना अनेक तपशील पुढे कळत गेले आणि रमेश राजहंस नावाच्या माणसाच्या भरजरी प्रतिमा आणखी संपन्न होत गेल्या.

पत्रकारिता करून चरितार्थ चालवला पाहिजे अशी काही निकडीची गरज राजहंस यांना नव्हती असं पुढे आमच्यातल्या वाढत गेलेल्या स्नेहातून लक्षात आलं. तरीही राजहंस एका विलक्षण ओढीने पत्रकारिता करत राहिले आणि त्याचवेळी गाणंही करत राहिले. पत्रकारितेत बहुसंख्येने सामान्य वकूब असणा-यांच्या गर्दीत राजहंस यांचा जीव कितपत रमला याविषयी मला नेहेमीच उत्सुकता वाटत असे आणि आजही वाटते आहे. त्यांच्या वरिष्ठांनाही संपादकीय आणि गाणं अशा दोन्ही आघाड्यांवरील रमेश राजहंस यांच्यातील विविधांगी गुणसंपन्नतेची कितपत जाण होती या विषयी शंका आहे. आमच्या तत्कालीन वरिष्ठांच्या वर्तनातून तरी मला तशी काही जाणीव झाली नाही. डाक आवृत्ती गेल्यावर त्यांच्यातला गायक जागा होत असे आणि मग अशा सामान्य वकुबाच्या पत्रकारांच्या मैफिलीत अनेकदा ते रमून जात. सीताबर्डीच्या एका कोप-यातल्या एका हॉटेलमध्ये या मैफिली रात्री उशिरापर्यंत ( राजहंस यांच्या खर्चाने ) रंगत.

मी नागपूर पत्रिका सोडली तरी आमचा संपर्क कायम होता. नंतर मी ‘लोकसत्ता’त रुजू झालो. त्यांच्यातले मार्दव आणि ऊब कधीच कमी झाली नाही. माझं नागपूरही सुटलं आणि आमच्यातला संपर्क क्षीण होत गेला तरी माझ्या मनावर या विलक्षण प्रतिभेच्या माणसाच्या गडद असणा-या प्रतिमांचे रंग पुसट झाले नाहीत. दरम्यान त्यांनीही पत्रकारितेत अनेक पडाव बदलेले, ‘पंडित’म्हणून त्यांना मान्यता मिळाली पण त्या वर्तुळाच्या बाहेर ते पडले नाहीत का पडू शकले नाहीत हे आजही कळलेलं नाही. मी जरी त्यांच्या संपर्कात राहिलो नाही तरी ते माझ्याविषयी अपडेट होते हे ब-याच वर्षानंतर भेटल्यावर लक्षात आले. हट्ट धरून हरिभाऊ येगावकर यांना एक लेखमाला मी लिहायला लावली तेव्हा राजहंस यांनी आवर्जून फोन केला. दिनकर देशपांडे वारल्यावर मी लिहिले तेव्हा राजहंस आणि प्रभाकर पुराणिक यांचे फोन आले. राजहंस यांचा स्वर कातर झाला बोलताना आणि मी हललो. तसंही अशात फारच क्वचित फोनवर बोलणं होत असे. होई तेव्हा त्यांच्या आवाजातला कंप आणि कातरपण अस्वस्थ करत असे.

दिल्लीहून परतल्यावर नागपूर सोडण्याआधी एकदा भेटून येऊ असं दररोज ठरवत असतानाच राजहंस यांच्या निधनाची बातमी आली. एक प्रतिभावान राजहंस एकटाच अज्ञात प्रदेशात उडून गेला. राजहंस यांच्या आवडीच्या कुमार गंधर्वांच्या ‘ उड जायेगा हंस अकेला…’ या ओळी आठवल्या. एकेकाळी राजहंस यांचे कनिष्ठ सहकारी असलेलो मी आणि माझी पत्नी मंगला त्या गतकातर आठवणींना किती तरी वेळ उजाळा देत बसलो.

नागपूरच्या पत्रकारितेत रमेश राजहंस, हरिभाऊ येगावकर, शरद देशमुख, ज्ञानेश्वर वाघमारे यांच्यासारखे बावनकशी गुणसंपन्न ज्येष्ठ सहकारी मला लाभले. यापैकी कोणीही नागपूरचे अंगण सोडून गेले नाही. हे सर्वजण रमले ते बहुसंख्येने गुणवत्ता आणि उंची किरट्या असलेल्यांच्या घोळक्यात. अंगण सोडून लांब भरारी घेतली असती तर रमेश राजहंस खूप यशवंत तसेच किर्तीवंतही झाले असते. त्यांच्यातल्या प्रतिभेला मोठी लोकमान्यता लाभली असती ही सल आता सोबतीला कायम राहणार आहे.

-प्रवीण बर्दापूरकर

संबंधित पोस्ट