‘ पंकजाची संघर्षयात्रा ’

( महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे ( १२ डिसेंबर १९४९ ते ३ जून २०१४ ) यांच्या अकाली अपघाती मृत्यूनंतर त्यांची कन्या आणि विद्यमान राज्य मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेवर आधारीत वाशीमचे पत्रकार सुनील मिसर यांनी लिहिलेलं ‘पंकजाची संघर्षयात्रा’ हे ‘रिपोर्ताज’वजा पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे . त्या पुस्तकाला लिहिलेली ही प्रस्तावना – )

‘संघर्षयात्रे’ला निघण्यापूर्वी…
सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा , कष्टाळू वृत्तीचा , कमी बोलणारा-खरे तर बराचसा भिडस्त , शरीरयष्टीने लहान चणीचा पत्रकार असलेल्या सुनील मिसर नावाच्या पत्रकाराची ओळख सुमारे अडीच दशकांची आहे . जे काही बोलायचं ते ठाम अशी त्याची लेखन आणि बोलण्याची शैली आहे . १९९८पासून तो राहणाऱ्या लोकसभा आणि जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात होणाऱ्या निवडणुकांच्या निकालाचे मतदान होण्याआधी सुनीलने व्यक्त केलेले भाकित आजवर चुकलेले नाही ; याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे आणि त्याच्या भाकिताच्या आधारावर पूर्णपणे विसंबून मी अनेकदा राजकीय लेखन केलेले आहे , हे नि:संकोचपणे एकदा सांगून टाकायलाच हवे . त्याचे हे अंदाज तंतोतंत निघतात याचे कारण, निवडणुकीआधी आणि निवडणुकीच्या काळात मतदार संघातील कळीचे प्रश्न तसेच मतदारांचा कानोसा घेण्याचे वैशिष्ट्यपूर्ण कसब त्याच्यात आहे . स्वत: कमीत कमी बोलत जनमताचा अदमास घेण्याची त्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे .
कॉंग्रेसचे १९९०च्या दशकातील ज्येष्ठ आणि अत्यंत प्रभावशाली असणारे नेते गुलाम नबी आझाद यांच्या वाशीम मतदार संघात असलेल्या दुहेरी मतदार असण्याच्या बातमीसाठी सुनील मिसर याने केलेली पायपीट, संबंधित सर्व कागदपत्रे मिळवण्यासाठी चिवटपणे घेतलेले श्रम आणि दाखवलेला सयंम मी जवळून पहिला आहे . ( ही हकिकत ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘डायरी’ या पुस्तकात विस्ताराने आलेली आहे .) ठळकपणे अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे थोडीशी जरी ‘तडजोड’ केली असती तर सुनील त्याकाळात एकदम ‘मालामाल’ झाला असता पण, त्या वाटेकडे नजरही न टाकता गुलाम नबी यांच्या विरोधात बातमी देताना त्याने पत्रकारितेवर असणारी निष्ठा ज्या पध्दतीने व्यक्त केली ती पाहून मी आधी अचंबित आणि नंतर त्याचा चाहताच झालो . या बातमीच्या पुण्याईवर मुंबई , पुणे , नागपूर , औरंगाबादसारख्या शहरात त्याला एखाद्या वृत्तपत्रात चांगली नोकरी मिळाली असती पण , तसे न करता वाशीम या आडवळणी गावात पत्रकारिता करणे त्याने पसंत केले .
भारतीय जनता पक्षाचे नेते , महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे माझे महाविद्यालयीन दिवसातले मित्र . ते पुढे राजकारणात गेले आणि मी पत्रकारितेत आलो . आमची राजकीय धारणा पूर्णपणे एकमेकाच्या विरुध्द असली आणि जगण्याच्या तसेच करीयरच्या वाटा वेगळ्या झाल्या तरी गोपीनाथ मुंडे आणि माझ्यातले मैत्र कधी म्लान झाले नाही ; आम्ही परस्परांच्या पदांना कधीही या मैत्रीत थारा दिला नाही . त्यामुळे आमच्यातल्या मैत्रीला कोणत्याही ‘हिता’ची दृष्ट लागली नाही . मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाची सूत्रे होती . तेव्हा कितीही गोपनीय बैठक सुरु असेल तरी त्यांच्या केबिनचा दरवाजा उघडून आत शिरावे , असे आमचे संबध राहिले . गप्पांच्या ओघात खाजगी म्हणून सांगितलेल्या कोणत्याही माहितीचा मुंडे यांनी संमती दिल्याशिवाय मी पत्रकारितेत वापर केला नाही . त्यामुळे आमची भेट झाली की राजकीय गोटातील माहितीचा खजिना ते खुला करत . योग्य माहिती उघड करण्याची योग्य वेळ आली की अनेकदा ते स्वत: फोन करून ‘तुला बातमी करायची असेल तर आता कर’, असं सांगत किंवा ‘आता छापू का’ असं विचारल्यावर कितीही गर्दीत असले तरीही ‘हो’/‘नाही’असं सूचक उत्तर देत . चार-चौघात असताना आम्ही कधीही एकमेकाचा’अरे-तुरे’ उल्लेख केला नाही पण , फोनवर बोलताना किंवा आम्ही केवळ दोघेच असताना खास मराठवाडी हेल काढून ‘कोणाची टोपी कशी उडवली’या गप्पा एकमेकाला टाळी देत मारत असू .
भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे विरुध्द नितीन गडकरी अशी गटबाजी होती आणि मिडियासाठी तो एक बातमीचा विषय स्वाभाविकपणे असायचा . त्यातच राजकीय स्थिती अशी काही बदलली की मुंडे यांच्यापेक्षा वयाने तसेच राजकीय अनुभवाने बरेच तरुण असणारे गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि हा दुरावा आणखी वाढला . आनंद आणि अभिमानाची बाब की मुंडे-गडकरी या दोघांशीही माझी अत्यंत छान मैत्री आणि हीच मैत्री अडचणीची तसेच दुखरी बाब होती . ‘तुझा तो मित्र’ असे टोमणे कायम मारत मुंडे आणि गडकरी हे दोघीही माझ्या या ‘दुहेरी मैत्री’चा उल्लेख करत असत . पण , आमच्या तिघांपैकी एकाच्या बाजूने या टोमण्यांनी कधी विखार गाठला नाही ; परस्परांत दुरावा निर्माण न होता ही मैत्री टवटवित राहिली . मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आघाडीवरचे नेते आमदार विनायक मेटे नेतृत्वाखालील मराठवाडा मित्र मंडळाचा ‘मराठवाडा गौरव’ सन्मान मुंडे आणि मला एकाच वेळी मिळाला . तो सन्मान प्रदान करणाऱ्या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे , विलासराव देशमुख आणि माझ्यात असंख्य टोमण्यांची अक्षरश: आतषबाजी झाली आणि धमाल उडाली . यातील गमतीचा भाग सोडून देऊ यात पण , एक लक्षात घ्यायलाच हवे ; मुंडे यांच्याबद्दल खाजगीत बोलतानाही नितीन गडकरी सन्मानाने बोलत ; अजूनही बोलतात . मुंडेंनाही राज्यात मंत्री म्हणून गडकरी यांनी बजावलेल्या कामाचे तसेच ते राष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याचे कौतुक होते . राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे निवड झाल्यावर लालकृष्ण अडवानी यांच्या पाठोपाठ वाकून गोपीनाथ मुंडे यांना पदस्पर्श करत नमस्कार करून नितीन गडकरी यांनी आशीर्वाद घेतल्याचे स्मरण मला आहे . ते काहीही घडले असले तरी , त्या दोघातील कटुता हे एक वास्तव होते . मुंडे-गडकरी वाद संपावा अशी उत्कट इच्छा असणारांपैकी मीही एक होतो . तसे काही प्रयत्न मीही केले होते..आणि त्याबद्दल नागपूरच्या एका कार्यक्रमात मुंडे यांनी जाहीर उच्चार करण्याचा मोठेपणा दाखवला पण, ते असो . अलिकडच्या काळात मुंडे-गडकरी वादात तह झाला ; गडकरी यांनी दिल्लीत कर्तृत्व गाजवावे आणि मुंडे यांनी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाल्यापासून महाराष्ट्र सांभाळावा असे ठरले त्यावेळी सर्वाधिक आनंद होणाऱ्यापैकी मी असणे स्वाभाविकच होते . तेव्हा मी दिल्लीत पत्रकारिता करत होतो आणि मुंडे यांच्या बोलण्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध कायम असत . त्यांनी मला एकदा ५२ मतदार संघांची नावे लिहून घ्यायला सांगितली . या मतदार संघातील विजय हा भाजपचा पाया असेल ; सेनेच्या मतदार संघाबद्दल बोलणे झाले नाही पण , विधानसभेत युतीचे विजयी उमेदवार २३० पर्यंत असतील असा त्यांना विश्वास होता , महाराष्ट्रात युती सरकारचे नेतृत्व करण्याची स्पष्ट उमेद होती…ते राजकीय चित्र तर स्पष्ट दिसतही होते . आपला मित्र महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे याची चाहूल स्पष्टपणे लागलेली असतानाच गोपीनाथ मुंडे यांचे आकस्मिक अपघाती निधन झाले आणि महाराष्ट्रावर आघात झाला .
त्यानंतर मुंडे यांच्या भाजपच्या महाराष्ट्रातील संभाव्य विजयाची ज्योत पेटती ठेवण्याचे आव्हान त्यांची कन्या पंकजा मुंडे-पालवे यांनी पेलले . पित्याच्या मृत्यूच्या शोकावेगावर मात करत ते आव्हान कसे पेलले याची साक्ष म्हणजे पंकजा यांनी काढलेल्या संघर्षयात्रेचा सुनील मिसर याने सादर केलेला हा रिपोर्ताज आहे . राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सांगतो , मुंडे महाराष्ट्रात लोकप्रियता अफाट होते/आहेत आणि त्यांच्यातील लोकनेतेपणाची मोहिनी महाराष्ट्रावर घनगर्द पसरलेली आहे . आकस्मिकपणे लोकनेता हरवल्याने सैरभैर झालेल्या त्यांच्या अनुयायांना शोकावेगातून बाहेर काढून पक्षाच्या यशाच्या मार्गावर चालण्यासाठी उद्युक्त करण्याची किमया करताना पंकजा यांनी दाखविलेला संयम विलक्षण आणि वडीलांचा वारसा पुढे नेण्याची जिद्द कशी दृढ आहे याचे दर्शन सुनील मिसर याचे हे पुस्तक वाचताना होते . उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या ५२ मतदार संघातील भाजपच्या महाराष्ट्रातीलसत्तेचे सुतोवाच गोपीनाथ मुंडे यांनी केले होते, त्यातील ४७ मतदार संघ पंकजा मुंडे यांच्या संघर्षयात्रेत आलेले आहेत ; पित्याच्या राजकारणाशी कन्येची नाळ कशी पक्की जुळलेली आहे याचे हे निदर्शक आहे…पंकजा मुंडे यांनी दोन टप्प्यात हे यात्रा केली आणि तीन हजार किलोमीटर्सचे अंतर कापताना अशा यात्रा काढून जनभावनेला हात घालण्याच्या पित्याच्या राजकीय कसबाचा वारसा कसा अतूट आहे हेही या पुस्तकातील मजकुराने दाखवून दिले आहे .
अशा राजकीय यात्रा या देशात नवीन नाहीत . महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेपासून त्यांचे दाखले देता येतील . लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा या देशाला धार्मिक द्वेषाच्या वाटेवर कशी घेऊन गेली हे सर्वांनाच माहिती आहे . आधी गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या आकस्मिक अपघाती निधनानंतर त्यांची कन्या पंकजा यांनी काढलेल्या यात्रा विद्वेष वाढवणाऱ्या नव्हत्या , हे लक्षात घ्यायला हवे . भूखंडाचे रूपांतर आर्थिक श्रीखंडात करणाऱ्या गैरव्यवहाराच्या विरोधात ज्यांच्या विरोधात ‘ब्र’ही काढणे कठीण होते त्या शरद पवार यांना लक्ष्य करत मुंडे यांनी मोठ्या धाडसाने पहिली संघर्षयात्रा शिवनेरी ते शिवतीर्थ अशी काढली आणि महाराष्ट्र ढवळून काढला . १९९५ साली राज्यात सेना-भाजप युतीची सत्ता येण्यात या संघर्षयात्रेने मोठी कामगिरी बजावली . अगदी अलिकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा वेशीवर टांगण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी गोदावरी परिक्रमा केली . सर्वार्थाने लोकनेता असलेली ही पितृछाया आकस्मिकपणे नाहीशी झाल्यावर पंकजा यांनी केलेल्या संघर्ष यात्रेचे वर्णन ‘परफेक्ट पोलिटिक्स ऑफ इमोशन्स’ अशा शब्दात करता येईल असेच हा मजकूर वाचल्यावर म्हणावेसे वाटते .

सुनील मिसर याचे हे पुस्तक मी रिपोर्ताज या प्रकारात समाविष्ट करेन . त्यांची भाषा आणि भावनाही पंकजा मुंडे यांच्याविषयी काहीशी भक्तीभावाची आहे , हे स्पष्टपणे जाणवते . पंकजा यांच्यात “जिजाऊंचे शौर्य , सावित्रीबाई फुले यांचे धैर्य आणि अहिल्याबाई होळकर यांचे औदार्य” असल्याच्या निष्कर्षाजवळ सुनील मिसारचे लेखन पोहोचले आहे . ते सुनीलचे मत आहे आणि त्याबद्दल त्याला दोष देता येणार नाही कारण, या संघर्षयात्रेचे वृत्तसंकलन करण्याच्या त्याच्या अनुभवांती त्याचे तसे मत झालेले आहे . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साडेतीन-चार दशके अविश्रांत श्रम घेतल्यावर मुंडे यांना ‘लोकनेते’पद प्राप्त झालेले होते . गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाची बाराखडी गिरवायला सुरुवात केली तेव्हा राज्यातच नव्हे तर देशातही त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व नाममात्र होते . भटां-ब्राह्मणांचा पक्ष या प्रतिमेतून महाराष्ट्रात भाजपची मुक्तता करत मुंडे यांनी पक्ष वाढवला . सर्वार्थाने बहु म्हणजे सर्व जाती-उपजाती-पोटजाती आणि धर्मांचा पक्ष ही प्रतिमा भाजपला मिळवून देण्यात मुंडे यांचे काम अतुलनीय आहे . मुंडे यांनी समाजातील ज्या वर्गातील लोकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले . जे लोक स्थानिक स्वराज्य मतदार संघात किंवा आमदार , खासदार म्हणून निवडून येईपर्यंत त्या अनेक जाती-उपजातीचे अज्ञात होत्या असे म्हण्यासारखी परिस्थिती होती . अशा अनेकविध राजकीय चातुर्यामुळे म्हणून मुंडे सर्वार्थाने लोकनेते झाले . गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे पंकजा यांचे संघटन कौशल्य , प्रशासकीय कर्तृत्व , राजकीय क्षमता आणि सर्व स्तरात होणारा स्वीकार अद्याप सिध्द व्हावयाचा आहे . मात्र तशी पंकजा मुंडे यांची वाटचाल सुरु झालेली आहे हे म्हणता येऊ शकेल , असे या पुस्तकातील मजकूर वाचताना दिसते .
रिपोर्ताज असल्याने आणि काही प्रसंगी राजकीय परिस्थितीचा वस्तुनिष्ठ वेध न घेता लेखन झाल्याने या पुस्तकातील मजकुरात काही ठिकाणी पुनरुक्ती आणि काहीसा त्रोटकपणही प्रतिपादनात आढळतो ; अर्थात हे लेखकाचे अपुरेपण नाही तर ती रिपोर्ताज प्रकारच्या लेखनाचीही मर्यादा आहे . सध्या पन्नाशीच्या आतले पत्रकार लेखनाचे मोठे प्रकल्प हाती न घेता प्रकाशित झालेल्या त्रोटक मजकुराला मिळालेल्या ‘बायलाईन’वर खूष असल्याचा आणि त्यांनी जे काही लिहिले आहे ते राजकीय भाष्य असल्याचा समज होण्याचं सर्वसाधारण ट्रेंड रुजलेला आहे . तो ट्रेंड मोडून काही तरी मोठा प्रकल्प हाती घेण्याचा मनसुबा सुनील मिसर याने यानिमित्ताने दाखवला ही फार चांगली बाब आहे , हे यानिमित्ताने नोंदवून ठेवायला हवे . आणखी एक ठळक आणि उल्लेखनीय बाब म्हणजे ; सुनीलने हे लेखन करताना पत्रकारांत बहुतांशी दिसणारा आत्मप्रौढीचा सूर लावलेला नाही हे फारच आशादायक आहे . त्यामुळे प्रत्येक नवीन पत्रकाराने या पुस्तकाकडे रिपोर्ताज कसा लिहावा याचे मार्गदर्शन म्हणून पाहायला हवे . ग्रामीण तसेच निमशहरी भागातील पत्रकारांचा स्थानिक परिसरातील राजकीय , सामाजिक, आर्थिक , जाती व धार्मिक व्यवस्था आणि त्यातील सूक्ष्म तणाव , सौहार्द्र तसेच परस्परात घट्ट मिसळेली हितसंबधांच्या वीणेच्या आकलनाचा आवाका मोठा असतो , हे वारंवार जाणवत असले तरी या गुंतागुंतीचे नीट दस्तावेजीकरण मात्र होताना दिसत नाही असा जो समज निर्माण झालेला आहे, त्याला या लेखनातून सुनील मिसर याने छेद दिला आहे ; हे महत्वाचे जसे आहे तसेच ते भविष्यातील मोठ्या लेखनाची नांदी आहे .
== मंद रंगातील मुखपृष्ठ ही उणीव जाणवलेल्या असलेल्या १२२ पानांच्या डबल डेमी आकारातील या पुस्तकाची निर्मिती पूर्ण रंगीत आणि आकर्षक आहे . प्रकाशक- राहुल आदित्य प्रकाशन, वाशीम . किंमत ११०० रुपये . ( या पुस्तकाच्या प्रतीसाठी कृपया थेट श्री सुनील मिसर यांच्याशी संपर्क साधावा . त्यांचा संपर्क क्रमांक ९८२२६९९१००/७०३८८५०९५५ असून इ-मेल- sudhirmisar777@gmail.com असा आहे . )
-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ /
praveen.bardapurkar@gmail.com
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट