चलनातील ५०० आणि १००० रुपये मूल्यांच्या नोटांबाबत निर्णय झाला त्यादिवशी महाबळेश्वरला होतो. त्यानंतर हा मजकूर लिहेपर्यंत म्हणजे, गेल्या १७ दिवसापैकी सात दिवस प्रवासात आहे; तेही रस्ता मार्गे आणि कारने. सोबत १०० रुपयांची रोख कमी आणि क्रेडीट कार्डवर भर असा मामला. कुठेही ‘मी पत्रकार आहे’ किंवा सोबतच्या दोस्तयाराने तो ‘डॉक्टर आहे’ असं सांगितलेलं नाही तरी, या काळात आम्हाला नोटांअभावी कोणत्याही प्रकारे, कोणत्याही ठिकाणी अडचण भेडसावली नाही किंवा आमचा खोळंबा झाला नाही. शहरी भाग वगळता निमशहरी किंवा ग्रामीण भागात मोजके अपवाद वगळता कुठेही खूप मोठ्ठ्या रांगा दिसल्या नाहीत किंवा कोणी हताश असल्याचं जाणवलं नाही. चर्चा मात्र नोटा रद्द झाल्याची होती आणि त्याचं तण भरघोस होतं. छोटे शेतकरी, तळहातावर पोट भरणाऱ्या लोकांचे मात्र खूपच हालह झाले, किरकोळ विक्रेते हतबल झाले. हा निर्णय घेतांना या वर्गाची ससेहोलपट होणार नाही याची, पुरेशी काळजी आणि काळा पैसा पांढरा करणाऱ्या संधीसाधुंचा बंदोबस्त करण्याचा कांटेकोरपणा दाखवण्यात केंद्र सरकार कमी पडलं, हेही दिसलं.
या काळात वृत्तपत्र वाचत होतो, सर्व भाषक वृत्तवाहिन्या बघत होतो आणि समाज माध्यमांवर नियमित फेरफटका मारत होतो. थोडंसं आत्मपर सांगायला हवं, वाणिज्य शाखेत पदवी घेतांना अर्थशास्त्र हा विषय होता. पण, तेलामुळे निर्माण झालेली नवीन आर्थिक परिमाणे आणि जागतिक पातळीवर निर्माण झालेले दबावगट, जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेमुळे चाळीस वर्षापूर्वी घेतलेल्या त्या शिक्षणाचे संदर्भ संपूर्णपणे बदलून गेलेले आहेत. अर्थात ‘निष्ठा कायम-भूमिकात बदल’ या चालीवर मूलभूत शास्त्र काही बदलत नसतं हे चांगलं ठाऊक आहे. पण, या पंधरा-सोळा दिवसात हे सर्व वाचताना/ऐकतांना/बघताना आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात अर्थतज्ज्ञ (!) आहेत ही जाणीव झाली. वाचनात आलेलं बहुसंख्य लेखन उथळ, उतावीळ, एकांगी, निर्णयाचं समर्थन किंवा त्याला विरोध करतांना राजकीय विचारचे गडद रंगाचे चष्मे घातलेलं म्हणजे, ‘लोडेड’ होतं आणि अजूनही आहे. लोकमत या दैनिकाच्या १३ नोव्हेंबरच्या मंथन पुरवणीतील दीपक करंजीकर यांचा ‘भारतीय अर्थव्यवस्थेतले महत्वाचे वळण’, अभय टिळक यांचा अक्षरनामा या पोर्टलवर वाचलेला ‘मोदी सरकारचा फसलेला साहसवाद’ (लिंक अशी- http://www.aksharnama.com/client/article_detail/164) हे लेख आणि दैनिक लोकसत्ताच्या अनेक बातमीदारांनी दिलेल्या माहितीचे संकलन असणारा २२ नोव्हेंबरच्या अंकातील ‘अदलाबदलीची वेळ’ हा मजकूर याला अपवाद आहेत. दीपक करंजीकर आणि अभय टिळक यांचे लेख नेमकं काय घडलंय, बिघडलंय आणि काय घडणार आणि बिघडणार आहे याचा वेध घेणारे आहेत. दीपकच्या पायाला भिंगरी आहे आणि तो सतत भटकत असल्यानं माणसात असतो; त्यामुळे जनमानसात काय प्रतिक्रिया उमटताहेत हे त्याला चांगलं कळत असावं. हे लेख वगळता, वाचनात आलेलं वृत्तपत्रीय व समाज माध्यमात प्रकाशित झालेलं बहुसंख्य लेखन आणि वृत्तवाहिन्यांवरील चर्चा ‘आला अडाण्याचा आर्थिक गाडा’ या सदरातील आहे.
अशा निर्णयाचे तातडीचे आणि दीर्घकालीन असे दोन पातळीवरचे परिणाम असतात पण, चर्चा आणि बहुसंख्य लेखन केंद्रीत झालं ते उमटलेल्या पडसादावरच. म्हणजे; दर्शनी कमी मूल्यांच्या पुरेशा उपलब्ध नसलेल्या नोटा आणि त्यामुळे लोकांचे होणारे हाल, बँक आणि एटीएम बाहेर लागलेल्या रांगा, पॅनिक झालेले लोक वगैरे मुद्द्यावर. त्यावरून पदवीचं शिक्षण घेताना अभ्यासाच्या काळात अवांतर म्हणून वाचावा लागलेला अब्राहम मॅस्लॉव्ह नावाचा अमेरिकन अर्थतज्ज्ञ आठवला. आपल्याकडच्या राजकीय वाचाळवीरात आणि त्याच्यात बहुदा सख्ख नातं असावं. ‘गरीब लोक आळशी असतात. गरीब लोक दारुडे असतात. आळशी असल्यानं आणि कायमच खूप दारू पीत असल्यानं ते आणखी गरीब होतात’ असा एक सिध्दांत बहुदा दारुच्या नशेतच मांडून मॅस्लॉव्हनं त्याकाळात बरीच ‘गंमत’ केलेली होती. ( अच्यत गोडबोले यांच्याही एका पुस्तकात मॅस्लॉव्हचा उल्लेख आहे. ) नोटांबाबत मराठीत झालेलं बहुसंख्य लेखन आणि मॅस्लॉव्हचा अडाणी सिध्दांत एकाच जातकुळीचे आहेत, हे साम्य मला तरी फारच रोमँटिक वाटलं. एकंदरीत काय तर, अभय टिळक, दीपक करंजीकर आणि असे काही आलेले मोजके अपवाद वगळता अर्थविषयक अडाण्यांचा नुसता कल्लाच सुरु आहे.
मुळात ५०० आणि हजाराच्या नोटा सरसकट रद्द करण्यात आलेल्या नाहीत. पांढरा पैसा असलेल्या नोटा बँकात जमा करायच्या आहेत आणि ती रक्कम ठराविक पध्दतीने काही काळानंतर हप्त्याहप्त्यात काढता येणार आहे. काळा पैसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोटा तिप्पट दंड भरून अधिकृतपणे अधिकृत करुन घेता येणार आहेत; शिवाय या बेहिशेबी रकमांबाबत स्पष्टीकरणही द्यावं लागणार आहे आणि हीच खरी भीती आहे; सबळ समर्थन नसल्यानंच लोक नोटा फेकताहेत/फाडताहेत/जाळताहेत. चलनातील नोटांच्या वापराच्या संदर्भात करण्यात आलेले या बदलांच्या या प्रक्रियेला ‘नोटा रद्द’ किंवा ‘चलन बाद’ किंवा ‘नोटेचा कागद झाला’ असं सरसकट संबोधलं गेलेलं आहे आणि तो ते चूक आहे. ‘निश्चलनीकरण’ हा दैनिक लोकसत्तानं त्यासाठी केलेला शब्दप्रयोग अगदी अचूक नसला ( माझ्या मते ) तरी त्या निर्णयामुळे निघणाऱ्या अर्थाच्याजवळ जाणारा आहे. चलन कसं निर्माण होतं, चलन नियंत्रण कोण करतं, देशाचा चलन व्यवहार कसा नियंत्रित होतो आणि त्यात किती यंत्रणा गुंतलेल्या असतात, चलन व्यवहारासंबधी कायदे आणि नियम कोणते, अशा अनेक पैलूसंबधी नुसती फेकाफेकी आणि तीही मोठ्या दणक्यात माध्यमात झाली! आपण किमान अर्थसाक्षर कसे नाही आहोत याचंच हे निदर्शन होतं.
या निर्णयाची एक प्रमुख राजकीय बाजू म्हणजे, डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारख्या नामवंत अर्थतज्ज्ञ पंतप्रधानाला खरं तर हा असा धाडसी निर्णय घेणं आवडलं असतं. तत्कालिन पंतप्रधान नरसिंहराव यांच्यासोबत ज्या आर्थिक सुधारणा मनमोहनसिंग यांनी या देशात आणल्या त्या अधिक बळकट होण्यासाठी असा निर्णय आवश्यक होता. दहशतवाद आणि देशातील हिंसक कारवाया रोखण्यात काळा पैसा महत्वाची भूमिका बजावतो आहे, हे काही मनमोहनसिंग यांना उमजत नव्हतं असं नव्हे पण, त्यांच्यावर त्यांच्याच राजकीय नेतृत्वाचाही अंकुश होता; त्यात त्यांचं सरकार आघाडीचं होतं आणि त्यामुळे असा साहसी म्हणा की धाडसी, निर्णय घेण्यातील प्रमुख अडथळे होते. या अंकुशांचा गैरफायदा घेत मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात हिमालयासारखे आर्थिक गैरव्यवहार घडले. नागरीकरणाच्या रेट्याने नवश्रीमंत उदयाला आले; ते आणि पूर्वीचे श्रीमंत आणखी धनाढ्य झाले (वाईट भाग म्हणजे मस्तवालही झाले) आणि देशात एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली. म्हणूनच बहुदा राज्यसभेत बोलताना या निर्णयाच्या विरोधात कोणतंही मतप्रदर्शन मनमोहनसिंग यांनी केलेलं नाही; त्यांनी टीका केली ती निर्णयाच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रचंड मोठ्या गैरव्यवस्थापन आणि त्यामुळे जनतेला सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल. (“Moumental mismanagement असा शब्दप्रयोग त्यांनी केला.) नरेंद्र मोदी यांना स्वपक्षाच्या बळावर पूर्ण बहुमत आहे आणि सहयोगी पक्षाना गप्प बसवण्याची क्षमता मोदी यांच्यात आहे. त्यामुळे चलन व्यवहारात उलथापालथ करण्याचा निर्णय घेतांना नरेंद्र मोदी यांना तडफ दाखवता आली. नरेंद्र मोदी यांचा निर्णय योग्य का अयोग्य हे आणखी काही महिन्यात कळेलच पण, तो निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. कारण या देशाची लोकशाहीवादी व्यवस्था मान्य करुन ते निवडणुकीत रीतसर विजयी होऊन पंतप्रधान झालेले आहेत. हा निर्णय घेतांना मोदी यांनी घटनेचं उल्लंघन केलं, हा शुध्द अपप्रचार आहे.
हा निर्णय जाहीर झाल्यावर रात्री उशीरा गप्पा मारताना आमचे एक चार्टर्ड अकाऊंटंट मित्र म्हणाले, या निर्णयाला विरोध करण्यासाठी ज्याचा आवाज जितका मोठा तितक्या मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे काळा पैसा जास्त, हे पक्क! त्याचा प्रत्यय येणं दोनच दिवसांनी सुरु झालं. देशातील बहुसंख्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तोडलेले तारे आणि केलेलं वर्तन अपरिपक्वतेचाही अप्रतिम नमुना होतं. हा निर्णय घेण्याआधी किमान दहा-पंधरा दिवस तरी तरी सांगायला हवं होतं हा शिवसेना, तृणमूल कॉंग्रेस, बहुजन समाज पार्टी, डाव्या पक्षांचा दावा अर्थशास्त्राच्या निकषावर हास्यापद आणि कोणतीही भेसळ नसलेला शुध्द बावळटपणा आहे. कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी यांनी त्यात पुढाकार घेतला तो एटीएमच्या रांगेत उभं राहून. राहुल गांधी यांच्याकडे चार हजार रुपये नाहीत यावर शेंबडं मूल तरी विश्वास ठेवेल का? राष्ट्रवादी कॉंग्रेसची म्हणजे शरद पवार, शिवसेना म्हणजे उध्दव ठाकरे तसंच मायावती, ममता यांची यासंदर्भातली तळ्यात-मळ्यात भूमिकाही आपण समजून-उमजून मान्य केली पाहिजे घेतली पाहिजे, कारण ती ज्या अगतिकतेतून आली ती अगतिकता आणि मजबुरी आपल्याला चांगली परिचित आहे!
देशाच्या चलनात काही बदल करण्याचा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा निर्णय चूक आहे, असा विरोधी पक्षांचा दावा आहे. तसा दावा करण्याचा विरोधी पक्षांचा अधिकार शाबूत आहे. संसदेत त्यावर विस्तृत चर्चा करुन हा निर्णय कसा चूक आहे, हे विरोधी पक्ष सिध्द करू शकला असता पण, ते करण्याची हाती आलेली संधी विरोधकांनी घालवली आहे. चर्चेसाठी मोदी सरकार तयारही आहे पण, चर्चा करण्याआधीच मतदानाची मागणी करुन विरोधी पक्ष पळ काढत आहेत. मतदान झाले तरी लोकसभेत केंद्र सरकार पराभूत होणार नाही आणि राज्यसभेत सरकार अखेरच्या क्षणी कसेबसे जिंकेल अशी भीती विरोधी पक्षाना वाटते, म्हणूनच चर्चा टाळली जात असावी असं म्हणण्याला बळकट वाव आहे. नीट सांसदीय डावपेच आखून शेवटच्या क्षणी मतदानाची मागणी करुन सरकारला अडचणीत आणण्याची संधी का गमावली गेली; हे कोडं नाही की राजकीय असमंजसपणही नाही तर, त्यामागे ‘वेगळं इंगित’ आहे हे जनतेला चांगलं समजतं.
अर्थकारण हे एक शास्त्र आहे; शास्त्रात २+२=४ या मूळ सूत्रात कधीच बदल होत नाही. म्हणूनच कोणतंही शास्त्र भावनेच्या लाटेवर स्वार होऊ शकत नाही. राजकारण मात्र भावनेच्या लाटेवर स्वार होऊन करता येतं. चलन बदलाच्या निर्णयाबद्दल विरोधी पक्ष कांगावेखोर राजकीय भावनेच्या लाटेवर आरूढ झालेले आहेत; म्हणून त्यांचाही कल्ला अडाण्यांचाच ठरला आहे आणि सुदृढ लोकशाहीसाठी ते काही पोषक नाही. ही लाट ओसरेल तेव्हा चलनात बदल करण्याचा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय चुकला आहे, हे लक्षात आलं तरी विरोधी पक्ष काहीच करू शकणार नाही. सरकारला उघडं पाडण्याची संधी विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा गमावलेली आहे, असंच सध्या तरी चित्र आहे; कारण- आता एटीएम आणि बँकांसमोरील रांगा ओसरायला सुरुवात झालेली आहे…
– प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com
9822055799 / 9011557099
भेट द्या – www.praveenbardapurkar.com
वाचा – blog.praveenbardapurkar.com
To buy them download the Dailyhunt app from the google play store on your mobile. Select Marathi language.
search the books under – BHASYA or PRAVEEN BARDAPURKAR.