फडणवीस आणि ठाकरे विरुद्ध पवार !

( महत्वाची सूचना-  श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत प्रकाश वृत्त वाहिनीच्या हरिष दिघोटे या पत्रकाराच्या प्रश्नावर ज्येष्ठतम नेते शरद पवार यांनी चिडचिड करण्याआधी हा मजकूर लिहिलेला आहे . )  

भाजप , शिवसेना , कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या यात्रा आणि पक्ष सोडण्याच्या नावाखाली पळापळीचा उठ(व)लेला बाजार लक्षात घेता गणेशोत्सव संपला की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागतील हे स्पष्ट आहे . यात्रांच्या निमितानं एकमेकाच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्याचे जे कांही उद्योग सध्या सुरु आहेत त्यातून ३०/४० वर्षांपूर्वी पाहिलेल्या तमाशांत रंगणारे कलगीतुरे जसे आठवतात , तसेच उडणारे फेटे आणि केली जाणारी दौलतजादाही आठवते . पूर्वी दौलतजादा तमाशातील कलावंतांवर होत असे आता ती जनतेवर विविध आश्वासनांच्या रुपात होत आहे हाच काय तो फरक आहे . इकडे या यात्रा सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याशी रंगलेल्या युद्धात शरद पवार जेरीस आलेलेल आहेत .

राजकारण हे ‘करियर’ झालेलं असल्यानं पक्षनिष्ठा , राजकीय भूमिका वगैरे बाबी आता अतिशय दुय्यम ठरल्या आहेत . निवडणुका आल्या की पक्षांतरे होतच असतात पण , सध्या घाऊक पक्षांतराचा मोठा बहरआलेला आहे .  कार्पोरेट जगतात पगार जास्त मिळणार असेल किंवा वरचे पद मिळणार असेल तर एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू होणारे आणि पक्षांतर करणारे एकाच माळेचे मणी आहेत . सत्तेशिवाय जे राहूच शकत नाहीत त्यांना एकदा या रोगाची लागण झाली की त्यावर पक्षांतर हे एकच रामबाण औषध असतं . एक वेळ मुंगीला लिपस्टिक लावता येईल पण , पक्षांतर  रोखता येणार नाही , अशी परिस्थिती आपल्या देशाच्या राजकारणात सध्या निर्माण झालेली आहे .

समकालात पक्षांतरासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला जास्त मागणी आहे आणि त्याचा फटका (महा)राष्ट्रवादी पक्षाला जास्त बसत आहे  आणि प्रत्येक पक्षांतराने कॉंग्रेस ते समाजवादी कॉंग्रेस ते कॉंग्रेस ते (महा)राष्ट्रवादी कॉंग्रेस असा प्रवास करणारे या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार घायाळ होत आहेत . किमान महाराष्ट्रात तरी पक्षांतर आणि इतर पक्ष फोडण्याचे उच्चांकी उद्योग करण्यात सर्वांचे महामेरु शरद पवारच आहेत . स्वपक्ष कॉंग्रेस फोडून त्यांनी ही खेळ सुरु केला . नंतर जनता पक्ष , शिवसेना आणि इतर कांही छोटेमोठे पक्ष ,अपक्ष घाऊक भावाने फोडण्याचा पराक्रम ज्यांच्या नावे आहे तेच शरद पवार आता त्यांच्या पक्षातून होणाऱ्या ‘आउट सोर्सिंग’ मुळे गांजलेले आहेत . छगन भुजबळ यांच्या बंडाला उत्तेजन देणारे , नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या सेना सोडण्याचं मूक समर्थन करणारे आणि पर्यायाने मित्राचाच पक्ष असलेल्या शिवसेनेचा संकोच कसा होईल याची ‘काळजी’ घेणारे शरद पवार आहेत ; बाळासाहेब ठाकरे यांची सेना मवाळ झाली असे बोचकारे काढत राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची तारीफ करणारेही शरद पवारच आहेत ; देवेंद्र फडणवीस यांची ‘चड्डी’ काढणारे आणि त्यांना ‘पेशवे’ असे ओरखाडे काढणारेही हेच शरद पवार आहेत . पण , आता  उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना जेरीस आणलेलं आहे . सहन होत नाही आणि सांगताही येत नाही , अशी त्यांची अवस्था झालेली आहे . छगन भुजबळ यांना शिवसेनेतून फोडल्यावर , राज ठाकरे बाहेर पडल्यावर बाळासाहेब ठाकरे आणि घरातून धनंजय मुंडे बाहेर गेल्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या जीवाची कशी असह्य तगमग झाली , त्यांच्या पीळवटून गेलेल्या हृदय आणि डोळ्यातल्या अश्रूंचा दाह किती होता हे आता शरद पवार यांना आता समजलं असेल…

शरद पवार यांचा महाराष्ट्रावरचा एकछत्री अंमल संपुष्टात आल्यासारखी ( हा अंमल पूर्ण संपला असं अजून  तरी मला वाटत नाही . ) स्थिती त्याच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आता निर्माण केलेली आहे . छगन भुजबळ आणि मध्यंतरी लक्ष्मणराव ढोबळे , गणेश नाईक  यांचा किंचित अपवाद वगळता कायम मराठाबहुल तसंच जोड-तोडीचं  राजकारण करणाऱ्या शरद पवार यांच्यावर हा उगवला गेलेला राजकीय सूडच म्हणायला हवा ! ( शरद पवार यांच्या साहित्य क्षेत्रातल्या भक्तांनी त्याचा उल्लेख  ‘काव्यगत न्याय’ असाही करायला हरकत नाही ! ).

ज्यांचा ‘लिंबू-टिंबू’ समजून सतत पाणउतारा केला , कधी ज्यांना विखारी व जातीयवादी बोचकारे काढले , त्या देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे सत्ता केंद्र शरद पवार यापुढे राहणार की नाहीत असा कळीचा पसवाल निर्माण केला आहे . सहा दशकांच्या राजकीय कारकिर्दीत         चार-साडेचार दशके महाराष्ट्राच्या केवळ राजकारणच नाही तर प्रशासन , उद्योग , समाजकारण , क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राचे कर्ते-करविते शरद पवारच , असं चित्र आहे . क्रीडा , सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा वावर इतका वैपुल्याने आणि विस्तृत आकलनाने होता की तेवढी समज या दोन्ही क्षेत्रातीलही अनेकांना नसायची . अलीकडच्या काळातील किमान दहा अ. भा. (?) मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आयोजक शरद पवार यांच्या गोटातील आहेत . यापैकी अनेक संमेलनांचे उद्घाटन किंवा समारोपाचे ते प्रमुख पाहुणे होते  .

सत्तेच्या राजकारणात अब्दुल रहेमान अंतुले , पृथ्वीराज चव्हाण आणि शेवटच्या काळात सुधाकरराव नाईक वगळता कॉंग्रेसचे सर्व मुख्यमंत्री पवार यांचे येनकेन प्रकारे बाहुले होते . १९९५मध्ये शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्रीपद मनोहर जोशी यांना मिळाले ते शरद पवार यांनी शब्द टाकला म्हणून ; याच काळात गोपीनाथ मुंडे यांचा अपवाद वगळता विरोधी पक्षाचा नेताही शरद पवारच ठरवत ,अन्य पक्षातले कांही उमेदवारही शरद पवार यांनीच शिफारस केलेले असायचे ; अशा अनेक चर्चा राज्याच्या राजकारणात उघडपणे होत्या आणि त्याचा कोणीच आजवर इन्कार केलेला नाहीये . फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे भक्त पत्रकार आहेत असं आज म्हटलं जातं , तशीच सर्व भाषक ‘पवार भक्त’ पत्रकारांची मोठी फौज राज्यात होती , अजूनही आहे . त्या भक्त पत्रकारांच्या खाजगी चर्चात ‘पवार महात्म्या’च्या अनेक आरत्या मोठ्या भक्तिभावानं अजूनही गायिल्या जातात आणि ‘गेले ते दिन’चे सुस्कारे सोडले जातात…

२०१४च्या नंतर हे चित्र बदलायला सुरुवात झाली , असंच  गेल्या दोन लोकसभा , एक विधानसभा आणि अन्य स्थानिक निवडणुकातील मतांची आणि विजयाची आकडेवारी सांगते . राजकारणातल्या यशाची मोजदाद करण्यासाठी शेवटी निवडणुकीतील निकाल आणि मतांची आंकडेवारी हाच निकष महत्वाचा असतो ! २०१४च्या लोकसभा निवडणुकात महाराष्ट्र भाजपचा चेहेरा गोपीनाथ मुंडे होते आणि या पक्षाने लढवलेल्या २४ पैकी २२ तर शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २० जागा लढवून १८ जागा जिंकल्या . २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचं राज्यातील चेहेरा देवेंद्र फडणवीस होते आणि भाजपने २४ पैकी २३ तर शिवसेनेने २३ पैकी १८ जागा जिंकल्या . इकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील  (महा)राष्ट्रवादीने २०१४मधे लोकसभेच्या २१ जागा लढवल्या आणि ४ जिंकल्या तर २०१९मधेही २१ पैकी चारच ! (राष्ट्रवादी पुरस्कृत नवनीत राणा अमरावतीतून विजयी झालेल्या असल्या तरी त्यात शरद पवार किंवा राष्ट्रवादीचं योगदान आहे असं म्हणणं म्हणजे गदर्भाला टायफाईड झालाय असं म्हणण्यासारखं आहे ! ) विधानसभा निवडणुकीतील चित्र तर आणखी दारुण आहे . २०१४च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस , राष्ट्रवादी , भाजप , सेना हे चारही पक्ष स्वतंत्र लढले आणि निवडणुकीचा निकाल असा- राष्ट्रवादी २८७ पैकी ४२ जागा जिंकल्या , कॉंग्रेस २७८ पैकी ४१ , शिवसेना २८२ पैकी ६३ आणि भाजपा  २६० पैकी १२२ . या तीनही निवडणुकात भाजप-सेनेच्या मतांत वाढ झालेली आहे तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मतात घट झालीआहे असे असल्यावर ज्या नेत्याची निवडणूक जिंकवून देण्याची क्षमता संपलेली आहे त्याच्या झाडाच्या मोडल्या  फांदीवरचे  कावळे उडून जाणारच !

गेल्या साडेचार वर्षात झालेल्या राज्यातील महापालिका , जिल्हा परिषदा , नगर पंचायत आणि नगर पालिका अशा सर्वच निवडणुकांच्या काळात राज्य सरकारच्या विरोधात जनतेत नाराजी आहे असा दावा सर्वच विरोधी पक्षांनी केला आणि त्यात तथ्यही होतं . ( मीही ते तथ्य मांडणारं लेखन केलं आणि प्रकाश वृत्त वाहिन्यांवर तेच  बोललो .) ही नाराजी मतांत मात्र परावर्तित झाली नाही ! महाराष्ट्रात तरी आता निवडणुका जिंकून देणारा नेता कॉंग्रेसकडे नाही ( तरी कॉंग्रेसचा किमान साडेएकवीस टक्के मतदार आहे ) , शरद पवारही उरलेले नाहीत आणि ती जागा भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे , हेच स्पष्ट  करणारी आंकडेवारी आहे ; महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र बदलेलं आहे , हेही त्यातून दिसत आहे .

आणखी एक मुद्दा म्हणजे , मतदारांचा अनुनय करण्यासाठी जी यात्रा (महा)राष्ट्रवादी कॉंग्रेसनं काढली आहे  त्याचं जू शरद पवार यांनी पक्षनिष्ठ नव्हे तर बाहेरुन आलेल्या ( की आणलेल्या ?) अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर ठेवलेलं आहे त्यामुळेही नाराजी आहे . कारण मराठाबहुल राजकारणाला अ-मराठा नेतृत्व अपवादानंच मान्य होतं , असा आजवरचा अनुभव आहे . शिवाय कोल्हे-मुंडे हे दोघे कांही विधानसभा निवडणुका जिंकून देऊ शकत नाहीत , हे कांही गुपित नाही . वर नमूद केल्याप्रमाणं कार्पोरेट जगतात ज्याप्रमाणे चांगली  संधी मिळताच लोक अन्यत्र उडी मारतात तसंच या पळापळ करणाऱ्या राजकारण्यांचं आहे कारण राजकारण हे त्यांच्यासाठी करीयर आहे . इथे नेतृत्व व  पक्षनिष्ठा , राजकीय भूमिका , मतदारांशी बांधिलकी वगैरे नैतिक मुद्दे अत्यंत दुय्यम  आहे . सत्तेत  पुन्हा संधी मिळावी म्हणूनच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधून भाजप-सेनेकडे  पळापळ सुरु आहे . उद्या देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची निवडणूक जिंकून देण्याची क्षमता म्हणा की करिष्मा की मतदारांवरील प्रभाव , ओसरला आणि तो पुन्हा शरद पवार यांनी केला की हे सर्व पुन्हा (महा)राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे परत येतील किंवा अन्य कोण्या पक्षाच्या तो नेत्याने संपादन केलेला असेल तर तिकडे हे जातील .

भाजप-शिवसेनेत गेलेल्या या सर्वांना उमेदवारी मिळेल का नाही हे आजच सांगता येणार नाही कदाचित कांही ‘वेगळं’ डील झालेलं असू शकतं पण , राजकीयदृष्ट्या महत्वाचं म्हणजे एक-त्यांना ओढून भाजप आणि सेनेनं त्या-त्या मतदार संघातील उपद्रव मूल्य कमी करण्यात आणि निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुरक्षित केलेलं आहे हे निश्चित . दुसरं म्हणजे- त्यामुळे पक्षात असंतोषाची बीजं रोवली आहेत आणि त्याचा फटका या दोन्ही पक्षांना कांहीसा बसणार आहे यात शंकाच नाही पण , त्याचा विचार झालेला असणारच . आपण त्याबद्दल कोरडे उमाळे काढून काय फायदा ?

शेवटी, अशा आघातांनी खचून जावं असं कांही शरद पवार याचं व्यक्तिमत्व नाही . तरुणांना हाती घेऊन ते अनेक राजकीय लढाया लढत आलेले आणि ७०च्या आसपास आमदारांची ताकद निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले  आहेत , असा आजवरचा अनुभव आहे . आजच्या स्थितीतून ते कसा मार्ग काढणार आहेत याचं उत्तर २०१९च्या  विधानसभा निवडणुकीच्या निकालात दडलेलं आहे .

-प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  ​+919822055799 
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट