या आठवड्यात गणेशोत्सव सुरु असल्यानं बदल म्हणून अ-राजकीय ,आत्मपर आणि काहीसं गतकातर आठवणींना उजाळा देणारं ( Nostalgic ) लिहितो आहे .
||एक||
५३/५४ त्रेपन्न वर्षांपूर्वी , वयाच्या बारा-तेरा वर्षांचा असतांना मी अतिधार्मिक होतो . तसंही , घरात जे कांही चाललेलं असतं तेच मनावर बिंबत असण्याचं ते वय असतं . त्यानुसार विशेषत: अण्णा म्हणजे वडिलांच्या धार्मिक असण्याला मी फॉलो करु लागलो . माई- म्हणजे आई कांही कट्टर धार्मिक नव्हती ; उलट ज्या वयात भरपूर खावं-प्यावं , खेळावं त्या वयात मी असा कट्टर धार्मिक असणं तिला मंजूर नव्हतं ; ती ते बोलूनही दाखवायची . तेव्हा एकुणातच मध्यमवर्गीय पांढरपेशा घरात असं धार्मिक वातावरण असेच. त्यात पूजा करतांना अण्णांना घरात ‘पिन ड्रॉप’ शांतता लागे . तशी शांतता नसली आणि पूजेच्या तयारीत कांही कमी-जास्त असलं की त्यांचा प्रचंड संताप होई ; क्वचित ते हातातलं ताम्हणही भिरकावून देत . कदाचित पूजेच्या वेळी होणाऱ्या त्यांच्या या शीघ्रकोपी कृतीमुळेही मी त्या वयात धार्मिक झालो असावा . किती धार्मिक तर संकष्टी मी निर्जळी करत असे ; इतकी कडक निर्जळी की आवंढाही गिळत नसे . इतरही बरच उपास वगैरे होत .
पण, हे भूत सातवी/आठवीत असतांना उतरलं . त्याचं झालं असं- अण्णांना क्षयरोग झाल्याचं निदान झालं आणि उपचारही सुरु झाले . दरम्यान आम्ही औरंगाबादला शिफ्ट झालो आणि रोकडिया हनुमान कॉलनीत राहायला आलो . एका रात्री अण्णांची प्रकृती जास्तच बिघडली म्हणून त्यान कॉलनीतल्या डॉ. देवकर यांच्याकडे नेलं . त्यांनी उपचार केले पण , सर्व तपासण्या पुन्हा करायला सांगितल्या कारण त्यांना रोगनिदान चूक असल्याचा संशय आला होता आणि त्यांचा संशय बरोब्बर ठरला . अण्णांना कर्करोगाचं निदान झालं . औषधोपचारासोबत जे अन्य उपाय सुरु झाले त्यात देवाचा धावा होता . ती जबाबदारी मी स्वीकारली . त्या दिवसात मी सहा-सात तास देवासमोर असे आणि सांगितलेली सर्व कर्मकांडे निर्जळी करत असे , कारण देवच अण्णांना वाचवेल अशी माझी ठाम समजूत होती . गणेशोस्तवाच्या धामधुमीतच अण्णांच्या निधनाची बातमी आली तेव्हाही मी देवासामोरच होतो . अण्णा वारल्याचं कळल्यावर रडू येणं किंवा दु:ख होण्याआधी देव कुणालाच वाचवू शकत नाही ही भावना प्रबळ झाली . बसलेल्या पाटावरुन उठलो , सर्व देव जमा केले आणि एका कपड्यात गुंडाळून माळ्यावर फेकले . तेव्हापासून मी अधार्मिक झालो .
||दोन||
अण्णांची एकच सुगंधित आठवण माझ्याकडे आहे आणि ती गणेशोत्सवाशी संबंधित आहे . अण्णा गणपतीची मूर्ती सुबक आणत . बीड जिल्ह्यातल्या नेकनुराला असतांना त्यांनी औरंगाबादहून आणलेली प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती इतकी सुबक होती की अर्ध गाव ती बघायला आमच्याकडे लोटलं होतं .
गणेशाच्या मूर्तीसोबत अण्णा केवड्याचे दोन कणसं आणत . अधूनमधून पिवळी छटा असलेल्या हिरव्या कांटेरी पानातला तो केवडा नंतर अनेक दिवस आमच्या घरात सुगंध पसरवत असे . वरची पानं सुकून पिवळी पडली आणि मग सुकली की , त्या कणसांच्या आंतला पांढुरका भाग आम्ही कपड्यात ठेवत असू . तो वास आमच्या घरात डिसेंबरपर्यंत वास्तव्याला असे . केवड्याचा सुगंधाकडे साप आकर्षित होतात असं बुजुर्ग सांगत . एका वर्षी आमच्या घरात खरंच सलग दोन वेळा साप निघाला . माईनं मग केवडा घरात आणू देण्यास टोकाचा ठाम विरोध केला आणि अखेर आमच्या घरातून तेव्हापासून केवडा हद्दपार झाला .
मला सेंट किंवा परफ्युमच आकर्षण नाही . ते आवडत नाहीत आणि मी ते वापरतही नाही . मात्र , देश-परदेश दौऱ्याच्या वेळी बेगमला आवडतात म्हणून आवर्जून वेगवेगळ्या ब्रँडचे परफ्युम्स मी आणत असे . अशात दौरे बंद झाल्यानं परफ्युम्सचे खरेदीही थांबली आहे . तरी एकदा , अठ्ठावीस-तीस वर्षापूर्वी अत्तर बाजारात दिसलं म्हणून केवड्याचं अस्सल अत्तर घेतलं होतं . घरी आल्यावर मात्र त्या अत्तराला अण्णांच्या शीघ्रकोपाचा गंध येतो आहे ,असं जाम फिलिंग आलं ; त्यामुळे गांजलेली असूनही कायम सस्मित असणारी माई आठवली आणि ती महागामोलाची बाटली मी सरळ बाल्कनीतून बाहेर , मागच्या नाल्यात भिरकावून दिली .
||३||
माझी बेगम- मंगला जाम धार्मिक आहे . हे लग्नानंतर माझ्या लक्षात आलं . तिच्यासोबत आयुष्यात आणि घरात देव आले . तिच्या देवभक्तीत अवडंबर आणि कर्मकांडही नाही . देवांमुळे काय खावं प्यावं याची बंधन आमच्यावर कधीच आली नाहीत . मीही अनेकदा बेगमला ला देवळात घेऊन जात असे आणि ती परत येईपर्यंत देवळाबाहेर पुस्तक वाचत बसे किंवा धुम्रपान करत असे . आता आम्हा दोघांच्याही जगण्याच्या संध्याकाळी देवाच्या संदर्भात माझ्या म्हणण्याशी तीही सहमत झालेली आहे मात्र , त्याला गणपती अपवाद आहे .
मंगलानं अनेक गणपती जमवले आहेत . कुठंही दौऱ्यावर गेलो की तिच्यासाठी मीही गणपतीची जरा हटके मिळाली तर मूर्ती घेऊन येत असे . माती , सोनं-चांदी , अन्य धातू , पोवळं , प्लास्टिकचे वेगवेगळ्या आकार आणि मुद्रेतले शंभरावर गणपती आमच्याकडे जमा झाले होते . बदल्या आणि सामान हलवण्याच्या धबडग्यात त्यातले कांही भंगले , कांही गहाळ झाले , कांही आम्ही भेट म्हणून दिले तरी अजूनही बऱ्याच म्हणजे ४०-४५ तरी मूर्ती आहेत .
कोणत्याही हस्तकला प्रदर्शनाला गेलो की मंगला आणि माझी नजर वेगळ्या आकारातल्या गणपतीचा शोध घेत असे . २५/२६ वर्षापूर्वी ओरिसा राज्याच्या हस्तकला प्रदर्शनात आम्ही एक मूर्ती हेरली . झाडाखाली बसून गणपती वीणा वादन करत आहे , झाडावर मोर आहेत वगैरे अशी ती मिश्र धातूची सुमारे साडेतीन-चार किलो वजनाची विलक्षण देखणी , डौलदार मूर्ती आहे . विक्रेत्यांनं तिची किंमत ३५०० सांगितली . तेव्हाच्या आमच्या पगाराच्या मानानं ही किंमत खूपच होती . घासाघीस केल्यावरही घासाघीस केल्यावरही विक्रेता पहिल्या दिवशी कांही ३३०० रुपयांच्या खाली उतरायला तयार झाला नाही . आम्ही रिकाम्या हातानं परतलो पण , ती मूर्ती मनात ठाण मांडून बसली . नंतर पांच-सहा दिवस दररोज एकदा तरी जाऊन मी त्याच्याशी घासाघीस करण्याचा परिपाठ जारी ठेवला . प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशीही मी गेलो . तोपर्यंत ती मूर्ती विकली गेलेली नव्हतीच . मला पाहिल्यावर तो विक्रेता म्हणाला ‘साब धंदा बहोत मंदा है इस साल . आधा भी सेल नाही हुवा अभी तक . चलो १७०० रुपय्या दो और ये श्रीगणेश ले जाओ . शायद आपकेही घरमे रहना चाहते ही गणेशजी’ . मी पैसे दिले आणि मूर्ती घेऊन घरी आलो . ती मूर्ती पाहिल्यावर बेगमच्या चेहेऱ्यावर पसरलेला आनंद कातील होता . बेगम तेव्हापासून दरवर्षी गणेशोत्सवात त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करते , मनोभावे पूजा करते . आता तिची देवभक्ती त्या मूर्तीपुरतीच शिल्लक राहिली आहे. या वर्षीही प्रकृती अस्वास्थ्य असूनही मंगलानं तिच्या वार्षिक रिवाजाला जागत त्या मूर्तीची पूजा केली . पूजा झाल्यावर तिचे डोळे ओलावलेले होते…खरं तर ती मला सर्व सांगते पण , यावर्षी काय मागितलं गणपती बाप्पाकडे हे तिनं सांगितलं नाही .
||४||
गणेशोत्सव आणि पारिजातकाच्या फुलांचं एक निर्भेळसर गंधित नातं आहे . ती नाजूक फुलं आणि तो गंध मलाही आवडतो . कधीमधी ती चार-सहा फुलं आणून मी लेखनाच्या मेजावर ठेवतो . पारिजाताची फुलं खूप नाजूक पण , इतकी अल्पायुषी का आहेत , हे कांही आजवर समजलेलं नाही .
औरंगाबादला चाणक्यपुरीत तळमजला अधिक दोन मजले अशा एका टुमदार इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आमचा फ्लॅट आहे . आमच्या खालच्या मजल्यावर अनिता आणि रवी वैद्य तर तळमजल्यावर सीमा आणि अनंत पंढरे हे डॉक्टर दांपत्य राहतं .
सध्या सकाळी बेडरुमची खिडकी सकाळी उघडली की पारिजाताचा घमघमाट आत शिरतो . टेरेसवर जावं तर प्राजक्तासोबतच टेरेसवरच्या सोनचाफा , जास्वंद , गोकर्ण , जाईचा एक वेगळाच परिमळ आपल्यावर गारुड करतो . हा सुगंध निसर्गाचं सर्वांशी समान वागणं आणि मानवी जगण्यातली त्या संदर्भातली विसंगती नेहेमीच जाणवून देतो . माझं हे म्हणणं नीट स्पष्ट करतो-
हा पारिजात लावला आहे पंढरे कुटुंबीयांनी . पंढरे कुटुंबीय रा . स्व. संघाच्या विचारसरणीचं . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा धारणेने प्रभावित होऊन एकत्र आलेल्या डॉक्टर स्वयंसेवकानी औरंगाबादेत जे अत्याधुनिक हेडगेवार रुग्णालय उभारलं आहे त्याच्या संस्थापकांपैकी अनंत पंढरे एक आहेत . अनंतच्या पत्नी सीमा याही याच रुग्णालयात काम करतात . इकडे आस्मादिक समाजवादी ; महात्मा गांधी यांच्या विचारावर अढळ श्रद्धा असणारे . म्हणजे पंढरे आणि बर्दापूरकर यांची जगण्याची निष्ठा पूर्ण वेगळी , त्यामुळे विचार करण्याची पद्धत वेगळी , राजकीय विचारसरणीही स्वाभाविकपणे परस्परभिन्न . पण , वेगळ्या विचारसरणीचे कट्टरपंथीय जसे तलवारी उगारुन सतत एकमेकांवर धावून जातात तसे किंवा कडवट संबंध आमच्यात नाहीत ; अर्थात गुळपीठही म्हणावं अशी जवळीकही नाही . असं असलं तरी डॉ. पंढरे यांनी लावलेलं ते प्राजक्ताचं झाड आम्हा समाजवाद्यांना सुवास देताना कोणताही भेदभाव करत नाही !
असं म्हणतात , प्राजक्ताचं झाडं कृष्णानं कुठं लावावं यावरुन सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात मोठा वाद झाला . कृष्णानं झाडं लावलं सत्यभामेच्या अंगणात आणि त्या झाडाच्या फुलांचा सडा मात्र रुक्मिणीच्याही अंगणात पडू लागला . या कथेकडे मी श्रद्धा म्हणून पाहत नाही तर विद्यमान राजकीय आणि सामाजिक जीवनात निर्माण झालेल्या टोकाच्या दुषित वातावरणात कट्टर भूमिका सोडून एकमेकाशी कसं वागलं पाहिजे याचा झाडांनी ( व्यापक अर्थानं निसर्गानं 😉 दिलेला आणि मानवानं त्याकडे दुर्लक्ष केलेला धडा म्हणून पाहतो .
झाडं माणसा-माणसांत जात-धर्म-लिंग असा कोणताच भेद करत नाहीत , सर्वांना सारखीच फुलं , फळ देतात . स्वत:च अस्तित्व शाबूत ठेवत बहुविध प्रकारची झाडं जंगलात गुण्यागोविंदानं राहतात . ( निसर्ग कोपला की जात धर्म बघून किंवा श्रीमंत-गरीब असा भेद करुन फटका लगावत नाही . ) जात-धर्म-राजकीय विचार जेवढ्यास तेवढे ठेऊन आपण माणसंही झाडांसारखं सर्वांशीच समानतेनं , किमान सौहार्दानं वागायला शिकणार कधी , असा प्रश्न आजकाल दररोज सकाळी प्राजक्ताचा हा परिमळ आमच्या घरात दरवळत असतांना मला पडतो .
-प्रवीण बर्दापूरकर