अरुवार कवी आणि माणूसही…

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे , फाटकी ही झोपडी काळीज माझे  ना . धों . महानोर

रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर समाज आणि मुद्रीत  माध्यमात वैपुल्यानं लेखन झालेलं आहे . या बहुतेक लेखनाचा भर महानोरांच्या कवितेवर आहे . आमच्या मुग्धा कर्णिकनं महानोरांच्या शब्दकळेचा उल्लेख ‘अरुवार’ या चपखल आणि लोभस  शब्दात केला आहे . ( फार म्हणजे फारच  वर्षांनी हा शब्द अवचित भेटला . ) खरं तर , केवळ कवी म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही महानोर पूर्णपणे अरुवारच होते असा अनुभव आहे .

बरंच मागे जाऊन सांगायच तर , १९६७-६८ चे ते दिवस होते . औरंगाबादच्या पांडुरंग कॉलनीत एका छोट्याशा खोलीत आम्ही राहात होतो . वडिलांचं नुकतंच निधन झालेलं होतं . आमच्यासाठी तो काळ कठीणच नाही तर विपन्नावस्थेचा होता . त्या काळात वडिलांचे एक दूरचे मावस काका उत्तम क्षीरसागर आणि प्रभाकर क्षीरसागर यांचा आम्हाला खूपच आधार मिळाला . या दोघांमुळेच मला शिक्षणाची गोडी लागली . सर्वच क्षीरसागर बंधू उच्चशिक्षित होते . उत्तम क्षीरसागर  यांना आम्ही आबा म्हणत असू तर मित्र वर्तुळात त्यांना महाराज म्हणत . ते अभिजात साहित्य प्रेमी ,वाचक आणि  कलासक्त होते . त्यांची ऊठबस त्या काळात ना. धों. महानोर , भास्कर लक्ष्मण भोळे , चंद्रकांत पाटील , नेमाडे अशा मंडळीत होती . भालचंद्र नेमाडे यांच्या गाजलेल्या ‘कोसला’ या कांदबरीच्या पहिल्या आवृत्तीचं मुखपृष्ठ महारांजांनीच रेखाटलं होतं . महाराजांकडेच मी या सर्वांना बघितले . महानोर वगळता ही सर्व मंडळी तेव्हा नुकतीच प्राध्यापकी पेशात स्थिरावत होती , तरुण होती आणि तिशीच्या उंबरठ्यावर म्हणजे माझ्यापेक्षा वयाने १२-१४ वर्षांनं ज्येष्ठ होती . यापैकी भोळे आणि महानोरांशी माझी बऱ्यापैकी गट्टी जमली . पुढे या दोघांचंही अपार ममत्व मला लाभलं .  १९७७ साली पत्रकारिता करण्यासाठी मी औरंगाबाद सोडलं आणि १९८१ साली नागपूरला पडाव टाकल्यावर भोळे आणि महानोरांची छत्रछाया माझ्यावर पुन्हा पसरली . तेव्हापासून या दोघांच्याही मी अतिशय नियमित संपर्कात आलो आणि प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या या दोघांतही असलेला माणूस मला सतत दिसत राहिला . तेव्हा आम्ही बजाजनगर मधील ‘आनंद मंगल’ या फ्लॅट्समध्ये राहत असू  . तिथल्या टेरेसवर मित्रांच्या मैफिलीत काव्य गायनांसाठी महानोर यांना  दोन वेळा आमंत्रित केलं . कोणतेही आढेवेढे न घेता ते आले इतके ते साधे होते , निगर्वी होते .नागपूरची थंडी पण पेटवलेल्या शेकोटीच्या उबेत महानोर रंगले . आधी भास्कर लक्ष्मण भोळे गेले आणि आता ना.धों . महानोरही…

ना. धों . महानोरांना नंतर अमाप प्रसिद्धी मिळाली ; अनेक मोठमोठे सन्मान लाभले . त्यांची भटकंतीही खूप झाली पण , त्यांची पावलं , त्यांचं हृदय  मात्र पळसखेडच्या भूमीत जखडूनच राहिलं  . कवी , आमदार, कथा आणि ललित लेखक , प्रयोगशील शेतकरी या पलीकडे जाऊन महानोरांना व्यसन होतं ते पळसखेडची माती , कविता आणि माणसांचं . त्यांचं हे माणूसवेडेपण जात , धर्म आणि प्रदेशाच्या सीमा ओलांडून अफाट विस्तारलेलं होतं . राजकारण , समाजकारण , प्रशासन , साहित्य , कला अशा सर्व क्षेत्रात महानोरांचा मुक्त संचार होता . त्यांना हेरलं  ते  यशवंतराव चव्हाण यांनी आणि मग हा माणूस दोन्ही ओंजळीत घेऊन निगुतीनं सांभाळला तो शरद पवार यांनी .

महानोर तसे काँग्रेस विचाराचे पण , त्यांच्या निष्ठा मात्र शरद पवारांवर होत्या . शरद पवार हाच त्यांचा राजकीय विचार होता . काँग्रेसमधून फुटून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर दीड-दोन महिन्यांनं मी एकदा पळसखेडला गेलो . गप्पांच्या ओघात महानोरांना विचारलं ‘तुम्ही काँग्रेसवादी की राष्ट्रवादी’ तेव्हा महानोर म्हणाले , ‘तुला हा प्रश्न पडलाच कसा ? मी तर कायम शरद पवारवादीचं !’ शरद पवारांप्रमाणेच कविवर्य कुसुमाग्रज , लता मंगेशकर , आशा भोसले आणि पु. ल. देशपांडे हीदेखील महानोरांची आस्थेची माणसं . गप्पा सुरु  झाल्या की , या दैवतांविषयी असंख्य हकिकती आणि आठवणी महानोर त्यांच्या खुमासदार शैलीत सांगत असत . ते ऐकतांना महानोरांचं हे कथन कधीच संपू नये असं वाटायचं .

उंच आणि भक्कम बांधा , रापलेला गोरा वर्ण , विस्तृत भालप्रदेश आणि अत्यंत साधी राहणी म्हणजे ना. धो. महानोर . पेहेराव कायम पायजामा आणि सदरा , तो बहुसंख्य वेळा धुवट  .  त्यांना  मी फारच क्वचित पॅन्ट आणि शर्टमध्ये पाहिलं तेही मॉरिशसमधे .   शिवाय आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे महानोर कायम हसतमुख असत . सर्व क्षेत्रातल्या अति सर्वोच्च पदस्थ लोकांशी घरोब्याचे संबंध असूनही आणि कुणालाही झिडकारुन टाकावं किंवा कुणालाही हिडिसफिडिस करावं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं . महानोर सालस माणूसवेडे होते . अनवाणी पायानंही  आलेल्या , फाटक्या  कुणाशीही ते आगत्यानं  बोलत . ‘पळसखेडचं तुमचं घर म्हणजे लंगर आहे ,’ असं मी त्यांना नेहमी म्हणत असे कारण त्यांच्या घरी कधीच पाच-दहा माणसांचा स्वयंपाक झाला नाही . त्यांच्या घरचा ताटांचा आकडा ५०-६० क्वचित शंभरच्याही पार जात असे . नवीन कवी आला असेल तर त्यांच्या कविता ऐकाव्या , आल्या गेल्यांना भेटावं , त्यांना शेत दाखवावं , शेतातल्या एकएका झाडाची जन्मकथा सांगावी , गप्पाची मस्त  मैफिल रंगवावी आणि त्या सर्वांना भरपेट भोजनानंद द्यावा असं  महानोरांना सात्विक व्यसन  होतं .

एकदा असेच बसलो असताना भेटायला आलेल्या कुणीतरी विचारलं , ‘ते लताफळ काय आहे ?’ महानोर लगेच उत्साहानं जमलेल्या सर्वांना घेऊन एका झाडाकडे घेऊन गेले आणि ते झाड साक्षात लतादीदींनी कसं लावलं आहे , याची आठवण त्यांनी भारावलेल्या स्वरात सांगितली . प्रत्यक्षात ते झाड होतं सीताफळाचं पण , महानोर त्या फळांना सीताफळ कधीच म्हणत नसत तर लताफळ म्हणत . त्यांच्या नजरेतून  कायमच स्नेहार्द्रता  आणि ते बोलणाऱ्या शब्दातून आपुलकी ओसंडत असे . हे मी इतक्या ठामपणे सांगतो आहे याचं कारण राज्यातच नाही तर परदेशातही महानोरांसोबत भरपूर प्रवास केल्यामुळे त्यांचा निकटचा सहवास लाभला आहे .

ना . धों . महानोरांचं बालपण अति गरिबीत गेलं ; इतक्या गरिबीत की खूप  इच्छा असूनही ते शिकू शकले नाहीत मात्र कवितेनं त्यांचं बोट फारच लवकर धरलं आणि त्यांना लिहितं  केलं . कवितेसोबतच  अक्षरश: ओसाड माळरानावर त्यांनी शेती फुलवली, ती त्यांचे प्रयत्न कल्पकता आणि अफाट श्रम यांचा संगम आहे . त्यापासून प्रेरणा घेऊन पळसखेडकरांनी जलसंवर्धनाची मोहीम आणि प्रयोगशीलता राबवून परिसर संपन्न केला . तुटक तुटकपणे हे आणि आणखी बऱ्याच गोष्टी समजत गेल्या  . नाही तरी कोणताही माणूस एकाच बैठकीत समजत नाही , तो असाच तुटक तुटक  समजत जातो .

केवळ शेतीच नाही तर पळसखेड्यात महानोरांनी ज्ञानगंगाही आणली . गावातल्या वर्गखोल्यांना त्यांनी वेगवेगळ्या कवींची नावं दिली ; त्या त्यांनी खोल्या उभारण्यासाठी लोकवर्गणी जमा केली . त्याची एक आठवण आहे– बहुधा १९८२ साल असावं . हिवाळी अधिवेशनासाठी महानोर नागपूरला येणार होते . तेव्हा ते विधान परिषदेचे सदस्य होते . महानोरांच्या वर्गखोल्या उभारण्यात नागपूरकरांचंही योगदान असावं , असं डॉ . भास्कर लक्ष्मण भोळे आणि मला सुचलं . तेव्हा भोळे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक होते आणि स्वतंत्र प्रज्ञेचा विचारवंत असा त्यांचा लौकिक होता तर मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो . मग महानोरांशी बोलून त्यांच्या काव्य गायनाचा एक कार्यक्रम करावा आणि उपस्थितांना मदतीचं आव्हान करुन निधी जमा करावा असं आम्ही ठरवलं . माहिती खात्याच्या सीताबर्डीवरील सभागृहात हा कार्यक्रम झाला . ‘टी. जी.’  या नावाने परिचित असणारे काँग्रेसचे लोकप्रिय पुढारी , पत्रकार , लेखक त्र्यं. गो. देशमुख हे  राज्याचे मंत्री होते . त्यांच्याकडे माहिती खात्याचाही कार्यभार होता . त्यामुळे सभागृह नि:शुल्क मिळालं . कार्यक्रमाच्या दिवशी दुपारी सभागृहात टी. जी. देशमुखांची भेट झाली तेव्हा त्यांनी विचारलं . ‘कार्यक्रम कसा झाला .’ मी त्यांना सांगितलं , ‘ झाला नाही अजून व्हायचा आहे . आज संध्याकाळी सहा वाजता आहे .’

महानोरांचं काव्यगायन ऐकायला रसिकांनी वेळेआधीच चांगली गर्दी केली . कार्यक्रम सुरु होण्याच्या पाच-सात मिनिटं आधी काव्य गायन ऐकायला टी. जी. देशमुखही पोहोचले . भोळे सरांनी प्रास्ताविकात पळसखेडला एक वर्गखोली बांधण्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं . काव्य गायनाचा कार्यक्रम झकास रंगला यात काही आश्चर्य नव्हतं . मंत्री असूनही टी. जी. देशमुख श्रोत्यांमध्ये खाली संतरंजीवर बसले . एवढंच नाहीतर कार्यक्रम संपल्यावर आमच्यासोबत झोळी धरुन उभे राहिले आणि नागपूरकरांच्या योगदानाची सुरुवात शंभराच्या पाच नोटा टाकून केली . ( तेव्हा ही रक्कम घसघशीतच होती . ) लोकांनीही लक्षणीय प्रतिसाद दिला . ती भरलेली झोळी टी. जीं.च्या हस्तेच आम्ही महानोरांच्या स्वाधीन केली . ‘रान  हेच संपूर्ण जगण्याचं भावजीवन असलेला कवी’ अशा शब्दांत टी  . जी. देशमुख यांनी महानोर यांचा गौरव केला होता , हे अजूनही आठवतं .

मराठी मनाच्या जागतिक नकाशावर पळसखेड हे गाव आणणाऱ्या ना . धों . महानोरांना काही पळसखेडकरांनी बऱ्यापैकी छळलंही . तो छळ असह्य झाला तेव्हा ती बाब महानोर यांनी तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांना कळवली . तेव्हा मी एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाच्या औरंगाबाद ब्युरो ऑफिसमध्ये कार्यरत होतो . गोपीनाथ मुंडे यांनी फोन करुन ते मला सांगितलं आणि पळसखेडला जाऊन चौकशी करुन वस्तुस्थिती कळवण्यास सांगितलं . मी पळसखेडला गेलो , अनेकांना भेटलो जी काय माहिती मिळाली ती मुंडे यांना कळविली . मग गोपीनाथ मुंडे स्वत: पळसखेडला आले त्यांनी त्या प्रकरणात सर्वांची समजूत घातली आणि समेट घडवून आणला. हा एकच प्रसंग जेव्हा , खिन्न महानोर बघायला मिळाले . त्यावेळी झालेल्या सभेत व्यासपीठावर महानोरांनी आग्रहानं मलाही शेजारी बसवून घेतलं होतं पण , तो समेट काही फार टिकला नाही . कोर्टकचेऱ्या झाल्या . महानोरांना त्याचा भरपूर मानसिक त्रास झाला तरी त्या काळात महानोर शांत होते . ना त्यांचा तोल सुटला , ना त्यांनी त्रागा व्यक्त केला , ना ते कुणाला अद्वातद्वा बोलले . तणावाच्या त्या काळातही ते अरुवारपणेच वागले .

अखंड गप्पाष्टक हे महानोरांचं आणखी एक व्यसन  . त्यांच्या पोतडीत असंख्य हा शब्द थिटा पडावा इतक्या असंख्यांच्या आठवणी , हकिकती आणि किस्से होते . त्यामुळे अनेकदा तर किती सांगू आणि किती नको अशी महानोरांची अवस्था होत असे . एका कोजागिरी निमित्त नागपूरच्या ‘आधार’ या संस्थेनं ना . धों . महानोरांच्या जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता . प्रारंभी छोटासा सत्कार , स्वागत आणि मग त्यांची जाहीर मुलाखत मी घ्यावी असं नियोजन होतं . ‘पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे’ असा तो कार्यक्रम होता . नागपूरला पोहोचायला महानोरांना जरा उशीर झाला आणि ते  थेट कार्यक्रम स्थळीच पोहोचले . त्यामुळे कार्यक्रमाच्या स्वरुपाबद्दल बोलणं झालं नाही . शुभदा फडणवीसचं प्रास्ताविक आटोपल्यावर भास्कर लक्ष्मण भोळेंच्या हस्ते महानोरांचा सत्कार करण्यात आला . या दरम्यान हळूच त्यांना जे सात-आठ प्रश्न काढले होते तो कागद मी दाखवला . जाहीर मुलाखत सुरु झाली आणि माझ्या पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात महानोर सलग सव्वा तास  बोलले . हकिकती , आठवणी आणि काही कवितांचं गायन अशी एक सुरेल लय त्यांच्या कथनाला लाभली होती . श्रोते मंत्रमुग्ध झाले , त्या संध्याकाळचा आसमंत महानोरांच्या त्या सुरेल कथनानं उजळून निघाला . महानोर एकदाचं बोलायचे थांबले आणि मला म्हणाले , ‘विचार तुझा पुढचा प्रश्न’ .

मी त्यांना म्हणालो ‘तुम्ही एकाच प्रश्नाच्या उत्तरात माझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली . पु. ल. देशपांडे तुम्हाला ‘धो , धो महानोर’ का म्हणत असत याची प्रचीती आली . आता आणखी कांही कविताच सादर करा .’ ’धो धो महानोर’ला श्रोते आणि महानोरांनीही जोरदार हास्याची दाद दिली . ती दादही त्यांच्या अरुवार स्वभावाला साजेशी होती . अन्य कुणी लेखक  , कलावंत असता तर त्याला नक्कीच राग आला असता .

अशात आमच्या गाठीभेटी कमी झाल्या होत्या . आम्ही दिल्ली सोडून औरंगाबादला स्थायिक झालो ते कळल्यावर एकदा

ना . धों . महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचनाबाई .

ते घरी आले . माझ्या बेगमच्या आजारपणाचं कळल्यावरही येऊन गेले . निरोप घेताना दुसऱ्या खोलीत मला नेऊन काही मदत पाहिजे का ? असं आस्थेनं विचारलं . या शेवटच्या दोन प्रत्यक्ष भेटी , बाकी अधूनमधून फोनवर बोलणं . हळूहळू त्यांचीच तब्येत बिघडत गेली . मध्यतंरी त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले, ‘मला जरा प्रवीण बर्दापूरकरांचा नंबर द्या  बरं.’ काळजात चsssर्र झालं . मग त्यांना मीच बोलत असल्याची आठवण करुन दिली . विधिमंडळात त्यांनी केलेल्या भाषणांचं पुस्तक प्रकाशित पाठवण्यासाठी माझा पत्ता त्यांना हवा होता .

सुलोचना वहिनी गेल्यापासून ते सैरभेर झाले होते , खचले होते . नभातल्या चैतन्याचं दान मराठी कवितेला देणारे अरुवार मनाचेही महानोर आता त्याच नभात विलीन झालेले आहेत…

( अरुवार – कोमल; नाजुक , मृदु , सुंदर , मऊ , हळुवार , सुकुमार . – दाते शब्दकोश )
 प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट