( तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते स्त्री शक्ती पुरस्कार स्वीकारताना डॉ . सीमाताई साखरे )
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारच्या विरोधातला बुलंद आवाज असलेल्या डॉ . सीमाताई साखरे यांनी काल ( १५ ऑगस्टला ) वयाची नव्वदी पूर्ण केली . वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला तर नाव सांगताच सीमाताई एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला भेटल्या तेव्हा ज्या उत्साहानं बोलत अगदी तशाच बोलल्या . नव्वदीतही सीमाताईंचा आवाज आणि स्मरणशक्ती ठणठणीत असल्याचं जाणवलं . खरं तर खूप वर्षांनी आम्ही बोलत होतो पण , नाव सांगताच त्यांचं खळाळणं लगेच सुरु झालं .
पूर्वीही सांगितलं आहे , लिहिलं आहे पुन्हा सांगतो . नागपूरच्या नागपूर पत्रिका या दैनिकात मी रुजू झालो ते वार्ताहर म्हणून . मला खरं तर उपसंपादक व्हायचं होतो पण , कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणाले नरेश गद्रे म्हणाले , ‘तू सिटी रिपोर्टिंगमधे जॉइन हो’ आणि पर्याय नसल्यानं मी वार्ताहर झालो . नोकरीच्या पहिल्याच दिवशी पहिली असाईनमेंट केली ती रुपाताई कुलकर्णी यांची . तेव्हा धंतोलीतल्या आनंदाश्रम या लॉजवर उतरलो होतो . दुसऱ्या दिवशी सकाळी येताना पत्रकार भवनातली सीमाताई साखरे यांची पत्रकार परिषद करुन या असं आमचे मुख्य वार्ताहर दिनकर देशपांडे यांनी सांगितलं .
रुपाताई आणि सीमाताई या दोघी तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात गाजत होत्या . दोघीही स्त्रियांच्या हक्कासाठी आणि अत्याचारच्या विरोधात लढत होत्या . दोघीही उच्च विद्याविभूषित होत्या . मात्र दोघींच्याही कामाचा बाज पूर्णपणे वेगळा होता . रुपाताई म्हणजे महिलांच्या हक्कांसाठी लढणारी तेजस्वी ज्योत तर सीमाताई साखरे म्हणजे धगधगती मशाल : गेली सहा दशकं ही मशाल पेटलेली आहे !
नंतरच्या काळात सीमाताई साखरे आणि रुपाताई कुलकर्णी यांच्याशी निकट संपर्क आला . त्यांची अनेक आंदोलनं , पत्रकार परिषदा , सभा कव्हर केल्या . दोघींच्याही जवळच्या गोटात माझा समावेश झाला . मंगला आणि मी आम्हा दोघांनाही या दोघींचं अपार ममत्व लाभलं .
कुणा महिलेवर अत्याचार झाल्याची केस आली की सीमाताई न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक होत . त्यांच्यात जणू बिजली संचारत असे . समोरचा माणूस कुणी बडा धनवान आहे की बडा अधिकारी की राजकारणातलं बडं धेंड , यांचा सीमाताईंवर कोणताही परिणाम होतं नसे ; कोणी कितीही दबाव आणला तरी पीडितेच्या बाजूनं सीमाताई हिंमत बांधून ठामपणे उभ्या राहात आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करत . त्यांच्यातल्या उर्जेसाठी अफाट हा
एकच शब्द आहे . हातात आलेल्या केसचा केलेला सखोल अभ्यास , खणखणीत आवाज आणि आक्रमकता हे सीमाताईंचं भांडवल असायचं त्यामुळे समोरचे लोक त्यांना वचकून असत . पोलिस , कायदा आणि आंदोलन अशा तिन्ही पातळ्यांवर सीमाताई एकाच वेळी लढत असत . अशी त्रिस्तरीय लढाई आणि त्यासाठी पायाला चाकं लाऊन कायम दौऱ्यावर असतानाच वृत्तपत्रांतून सातत्यानं लेखन करत जनमन जागृतीचाही सीमाताई साखरे यांचा प्रयत्न सुरु असे . जात-पात आणि धर्माच्या सीमा मोडीत काढत स्त्री हक्काच्या संघर्षासाठी आवश्यक असणारं धवल चारित्र्य आणि अफाट लोकसंग्रह सीमाताईंच्या गाठीशी कायमच राहिला . खरं तर , एखाद्या वृत्तपत्रात स्तंभ लेखन करणाऱ्याचं लेखन ( क्वचित बातमीही ) अन्य वृत्तपत्रात प्रकाशित न होण्याचा साधारण संकेत त्या काळात होता ( सीमाताई तेव्हा लोकमत या दैनिकात स्त्रियांच्या अत्याचाराविरोधात स्तंभ लेखन करत ) पण , सीमाताई त्या संकेताला एकमेव सन्माननीय अपवाद होत्या . नंतरच्या काळात या सर्व अनुभवांवर आधारित एक पुस्तकही त्यांनी लिहिलं . त्या काळात संध्याकाळी प्रेस-नोट देण्यासाठी वृत्तपत्रांच्या कार्यालयात सीमाताई येत आणि संपादकीय विभागात कांही काळ ठिय्या ठोकत . संपादकीय विभागातील प्रत्येकाशी दोन शब्द तरी बोलण्याचा त्यांचा रिवाज असायचा कारण प्रत्येकाशी त्यांची ओळख होतीच .
इतक्या बिझी असल्यावर सीमाताईंना संसार , नोकरी आहे का , असल्यास प्रपंच , नोकरी त्या केव्हा करतात आणि ते करायला त्यांना वेळ केव्हा मिळतो याचं आम्हाला आश्चर्य वाटत असे . त्या सुरुवातीच्या काळात सीमाताईंच्या प्रेम विवाहची कथा एकदा ज्येष्ठ पत्रकार वामनराव तेलंग आणि आमचे मुख्य वार्ताहर दिनकर देशपांडे यांनी आम्हाला रंगवून सांगितली . लक्ष्मी भवन चौकातल्या एका चाळीतील त्यांच्या वास्तव्याच्या काळातल्या श्री अनी सौ. साखरेंच्या संसाराच्या कथा सांगितल्या . पुढे सीमाताईंच्या घरी जाणं-येणं वाढलं आणि वामनराव तेलंग तसंच दिनकर देशपांडे यांनी जे कांही सांगितलं होता त्यावर विश्वास बसला .
■
सीमाताईंशी माझं बॉंडिंग जरा वेगळं निर्माण झालं . तो प्रसंग मला अजूनही लख्ख आठवतो . त्या माझ्या आधीपासून मंगलाला ओळखत . आमच्या दोघांत कांही तरी ‘गुफ्तगू’ सुरु असल्याची चाहूल त्यांना लागलेली होती . वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या बाहेरही त्यांनी आम्हा दोघांना पाहिलेलं होतं पण , विवाहाची नोटीस दिल्यानंतरच काय व्हायचा तो बोभाटा होऊ द्यायचा हे आम्ही दोघांनी ठरवलेलं होतं . १९८४च्या जानेवारी महिन्यात नागपूरच्या विवाह नोंदणी कार्यालयात पूर्वसुचनेची नोटीस देऊन मंगला , मी आणि आमचा दोस्तयार प्रकाश निंबेकर बाहेर आलो तर , जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आणि तेही अगदी आमच्या समोरच सीमाताई उभ्या . त्यांच्या सोबत कांही महिला होत्या आणि सीमाताई नक्कीच त्यांचं कांही गाऱ्हाणं घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेल्या होत्या . त्या लगाबगीनं लगेच आमच्याकडे आल्या आणि त्यांनी विचारलं , ‘काय करताय रे तुम्ही दोघं इथं ?’
क्षणभर गप्प राहून ‘आम्ही दोघं विवाहाची नोटीस द्यायला आलो होतो’, हे मी सांगून टाकलं .
आमचं अभिनंदन करुन , ‘घरुन कांही प्रॉब्लेम नाही नं ? पण , काळजी करु नका मी आहे तमच्या पाठीशी ठाम’ असं त्या म्हणाल्या .
‘कांही प्रॉब्लेम नाही , एकच राहिलं आहे आणि ते म्हणजे मंगलानं अजून हुंडा दिलेला नाही’, असं मी गमतीनं म्हणालो .
मंगलाला जवळ घेत सीमाताई म्हणाल्या . ‘माझी लेक मोठी गुणांची आहे . हुंडा तू नुसता मागितला तरी तुला धडा शिकवेन’ .
मी म्हटलं , ‘ती नाही तर तुम्ही द्या मला हुंडा . फार नको मला एक सूट हवा आहे’ .
‘हुंडा म्हणून नाही तर भेट म्हणून तुला सूट देईन’, असं मग सीमाताईंशीनी सांगितलं . तेव्हापासून त्यांना मी कायमच सासूबाई म्हणू लागलो . काल , त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी , संवादाची सुरुवातही मी ‘काय म्हणता सासूबाई’ अशीच केली . आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या . अनेक आठवणी जाग्या झाल्या . त्यांच्या लाडक्या लेकीचा अकाली झालेला मृत्यू , मंगलाचं नसणं असे कांही हळवे पक्षी बोलण्याच्या ओघात स्वाभाविकपणे पिंगा घालून गेले आणि आम्हा दोघांच्याही आवाजात दर्द आला…
तो मूड घालवण्यासाठी इकडचं तिकडचं बोलून त्यांच्याकडून न मिळालेल्या सूटची आठवण करुन दिली . सीमाताई म्हणाल्या , ‘तू ये एकदा नागपूरला , घेऊन देते मी सूट’ . मीही आता वयाच्या सत्तरीच्या उंबरठ्यावर आलोय , कधी भेट होईल , का होणारच नाही हे सांगता येत नाही…पण ते असो .
सुमारे साडेचार दशकापूर्वी जगण्यात आलेल्या सीमाताई साखरे नावाच्या माझ्या सासूबाई आता वयाच्या नव्वदीत पोहोचल्या आहेत . त्यांना उत्तम आरोग्य लाभो .
■ प्रवीण बर्दापूरकर
Cellphone +919822055799
www.praveenbardapurkar.com
■साडेचार दशकांच्या पत्रकारितेतील अनुभव कथन ■
■लवकरच प्रकाशित होत आहे ■
■ अन्य तपशील लवकरच ■