ज्या बिगर मराठा नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची मुद्रा उमटवली त्यात मनोहर जोशी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल . मुंबईचे नगरसेवक ते लोकसभेचे अध्यक्ष मार्गे मुंबईचे महापौर , विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य , मुख्यमंत्री , खासदार , केंद्रीय मंत्री असं मनोहर जोशी यांचा राजकीय वाटेवरचा आणि त्याला समांतर असणारा यशस्वी शिक्षक व उद्योजक असा प्रवास आहे . हा प्रवास अतिशय खडतर होता . घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी ही वाटचाल केली . भिक्षुक , कारकून , शिक्षक अशा वाटा वळणाचा हा प्रवास होता . तो मनोहर जोशी यांनी कसा केला त्याची पुनरुक्ती करत नाही कारण त्या संदर्भात भरपूर माहिती , त्या प्रवासातील अनेक आठवणी मनोहर जोशी हयात असतांना आणि आता त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाल्या आहेत . महाराष्ट्रातील सर्वच स्तरातील आणि गटातील सर्वसामान्य ते कुणी बडा माणूस अशा सर्व लोकांना मनोहर जोशी त्यांचे वाटत आणि हे असं ‘आपला माणूस’ असल्याचं त्यांच्याबद्दल सर्वांना वाटणं हेच मनोहर जोशी नावाच्या एका जिद्दी माणसाच्या खडतर प्रवासाचं वैशिष्ट्य आहे . अशी प्रतिमा जनमानसात निर्माण होणं ही एक साधना आहे आणि ती मनोहर जोशी यांना साध्य झाली ती त्यांच्यातल्या ‘व्यवहार कुशल’ते मुळे . बाय द वे , व्यवहार कुशलता हे संबोधन आमचे मित्र राधाकृष्ण मुळी यांच्या फेसबुक पोस्टवरील आहे आणि मनोहर जोशी यांच्या व्यक्तिमत्व आणि वर्तनाचं वर्णन अत्यंत चपखलपणे करणारं आहे यात शंकाच नाही .
किंचित टक्कल , टोकदार मिशी असलेल्या , सफारी सूट परिधान केलेल्या मुंबईचे नगरसेवक असलेल्या
मनोहर जोशी यांच्याशी ओळख झाली आणि ती कलेकलेनं विस्तारतच गेली . मनोहर जोशी विधानपरिषद सदस्य झाले तेव्हा मी नागपुरात पत्रकारिता करत होतो . विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या काळात जे अगणित लोकप्रतिनिधी नागपूरला येत त्यात एक मनोहर जोशी . शिवसेनेचे मनोहर जोशी , प्रमोद नवलकर , सुधीर जोशी आणि नंतर छगन भुजबळ पत्रकारांचं लक्ष वेधून घेत ते सभागृहातील आक्रमक वागण्यानं . अर्थात छगन भुजबळ आणि या अन्य तिघांच्या आक्रमकतेची जातकुळी पूर्णपणे भिन्न असायची . याच काळात आमच्यातलं मैत्र बहरत गेलं . ( मनोहर जोशी आणि विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळावं इतकी आमच्यातलं मैत्र घट्ट झालं . ) मग मुंबईच्या बहुसंख्य पत्रकारांसारखं मीही त्यांना ‘पंत’ म्हणू लागलो . त्या काळात मुंबईला जाणं झालं की शिवसेनेची ही मंडळी आमचा ( पक्षी मी आणि धनंजय गोडबोले ) पाहुणचार करत असत आणि त्याची आगत्यानं परतफेड म्हणून ते हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला आले की एक रात्रभोज माझ्याकडे होत असेच . त्यासाठी सुरुवातीची कांही वर्ष ही मंडळी चक्क ऑटो रिक्षानं माझ्या घरी आलेली आणि परतलेली आहेत , हे अजूनही पक्क आठवतं . सभागृह असो की हे मंतरलेल्या सोनेरी पाण्यासोबतचं रात्र भोजन , मनोहर जोशी यांनी कधीही कमाल पातळी गाठल्याचं आठवत नाही . कधीही कोणताही अतिरेक होऊ न देण्याची व्यवहार कुशलता आणि दक्षताही मनोहर जोशी यांच्यात कायमच जाणवायची आणि त्यांच्या यशस्वी होण्याचं एक प्रमुख म्हणायला हवं .
राजकारणी म्हणून मनोहर जोशी तसे शब्दाला पक्के होते पण , शब्द पाळताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही . १९९५च्या निवडणुकीत सख्खा दोस्त असलेल्या आमच्या एका पत्रकाराला पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची जबर इच्छा झाली . त्यावेळी युतीत सेनेच्या बाजूनं मनोहर जोशी यांचा शब्द प्रमाण होता . आम्ही मुंबईला जाऊन मनोहर जोशी यांना भेटलो . ते म्हणाले , ‘बाळासाहेबांनी ही जागा नितीन गडकरी यांच्या आग्रहामुळे गेल्याच आठवड्यात भाजपला दिली आहे . तुम्ही दुसरी कोणतीही जागा मागा ती नक्की मिळवून देतो .’ नंतर निवडणुकीत या मतदार संघातून भाजपचे विनोद गुडधे विजयी झाले .

बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मनोहर जोशी यांची नितांत श्रद्धा होती . बाळासाहेब ठाकरे यांनी कितीही वादग्रस्त वक्तव्य केलं तर मुख्यमंत्री म्हणून तिथे हजर असलेले मनोहर यांना ते कधीच ऐकू येत नसे इतके मनोहर जोशी ‘दक्ष’ असायचे . या श्रद्धेपोटीच राज ठाकरे यांच्यासोबत न जाता मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम निभावली . अर्थात त्याचं फळ म्हणून मोठी जाहीर अवहेलना मनोहर जोशी यांना सहन करावी लागली . त्यामुळे मनोहर जोशी खचले , त्यांनी सार्वजनिक वावर कमी केला पण , त्यांनी शिवसेना सोडली नाही .
मुख्यमंत्री झाल्यावर मनोहर जोशी यांचा सार्वजनिक वावर खूपच विस्तारला पण , ते जुन्या मित्रांपासून कधीच दूर गेले नाहीत . फोन केला आणि ते नसले तर त्यांचा परत फोन आवर्जून येत असे. मंत्रालय किंवा विधीमंडळाच्या व्हरांड्यात समोरासमोर आल्यावर एक शब्द बोलून त्यांनी पत्रकार मित्रांची चौकशी केली नाही असं कधीच घडलं नाही . ‘तुम्ही पत्रकार मित्र, माझे डोळे आणि कान आहात असं ते म्हणत .’ त्या काळात मी सतत भटकत असे आणि कुठे कांही गंभीर लक्षात आलं तर त्यांची माहिती मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशी ( पुढे विलासराव देशमुख ) यांना देत असे . एकदा दिलीप चावरे आणि मी भूकंपग्रस्त लातूर आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर गेलो . त्या परिसरातल्या ४२ गावांसाठी एक पाणी योजना तयार करण्यात आली होती . टाकी बांधली , नळ टाकले पण , क्षुल्लक प्रशासकीय बाबीमुळे पाणी पुरवठा सुरुच होत नव्हता . तो प्रशासकीय उपचार मंत्रालयात अडकला होता . ते मनोहर जोशी यांना मी सांगितलं . त्यांनी लगेच रंगनाथन या सनदी अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि तो प्रश्न मार्गी लावला . मनोहर जोशी यांच्या अशा अक्षरक्ष : असंख्य आठवणी आहेत .
मनोहर जोशी आणि शरद पवार हे चांगले मित्र . ( सुधीर जोशी यांच्याऐवजी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री करावं असा शब्द बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शरद पवार यांनी टाकला , अशी वदंता तेव्हा होती ; पवार आणि जोशी या संदर्भात आजवर कधीही कांहीही बोललेले नाहीत ! ) मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्द मुंबईत फुलली तर शरद पवार यांना सारा महाराष्ट्र तोंडपाठ . म्हणूनच राजकीय शरद पवार ‘यांना काय ग्रामीण महाराष्ट्र समजतो’ किंवा ‘कांदे जमिनीच्या खाली लागतात की झाडावर लागतात’ , अशी टीका करत . तरी शरद पवार यांच्या नियोजन, दूरदृष्टहीबद्दल मनोहर जोशी आणि तेव्हा उपमुख्यमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी कधीच कुत्सितता बाळगली नाही . भूकंपग्रस्त भागाच्या पुनर्वसनासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने एक योजना राबविण्यास शरद यांनी मुख्यमंत्री असतांना सुरुवात केली होती . युतीचं सरकार आल्यावर त्यात बदल करावा अशी मागणी झाली पण , त्यात हस्तक्षेप करायला जोशी तसंच मुंडे यांनी नकारच दिला आणि कारण दिलं ‘त्यांचं ( पक्षी : शरद पवार ) नियोजन कच्च असू शकत नाही .’ असा उमदेपणा दाखवणारे राजकारणी तेव्हा होते .
अस्सल असलेले मुंबईकर मनोहर जोशी हे संपूर्ण महाराष्ट्रात संपर्क असणारे शिवसेनेचे पहिले नेते . ( त्यानंतर नंबर लागतो तो दिवाकर रावते आणि नारायण राणे यांचा . ) अतिशय परिश्रम घेत मनोहर जोशी यांनी हे काम केलं . दूरवरच्या खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांशी त्यांचा संपर्क होता आणि त्याच्या कोणत्याही कामाला मनोहर जोशी कधीच नाही म्हणाले नाहीत . आज विरोधी पक्ष नेते असलेले विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्ह्यात काम करत असताना युतीच्या सरकाराच्या काळात ते वन विकास महामंडळाचे अध्यक्ष होते . गडचिरोली जिल्ह्यातून सेनेचा एकही आमदार नव्हता हे लक्षात आल्यावर विजय वडेट्टीवार यांना विधानपरिषदेवर नियुक्त करण्यासाठी पुढाकार घेणारे मनोहर जोशीच होते . बाय द वे , त्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मनोहर जोशी यांनी केलेल्या चर्चेचा मी साक्षीदार आहे . युती सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी अपक्षांचा पाठिंबा कसा मिळवला त्याच्याही आठवणी आहेत . त्याकाळात नागपुरात माझ्याच कारमधे प्रवास करत मनोहर जोशी यांनी कांही भेटी-गाठी घेतल्या . पत्रकार दोस्त धनंजय गोडबोले हाही त्या प्रवासात सोबत होता .
मनोहर जोशी कसे व्यवहार कुशल होते यांची एक आठवण सांगतो – सेना-भाजप युतीचं सरकार सत्तारुढ झाल्यावर प्रथेप्रमाणे सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा आदेश तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी दिला . आवाजी मतदानाने विबहुमतदर्शक ठराव मंजूर झाल्यावर मतदानाची मागणी करण्याचा प्रयत्न झाला . उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे त्या मागणीला अनुकूल होते पण , मनोहर जोशी यांनी मतदानाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली . नंतर आम्हा कांही पत्रकारांशी त्याबाबत बोलतांना मनोहर जोशी म्हणाले , ‘कांही गोष्टींची मूठ बंद असलेलीच चांगली असते.
आणखी आठवण आहे – मराठी माणसानं उद्योग-व्यवसायात पडावं की नाही अशी चर्चा सुरु असतांना यशस्वी उद्योजक म्हणून आम्ही पंताना त्यांचं मत विचारलं तर ते पटकन म्हणाले , ‘कांहीही करावं पण ते आपल्या पैशांनं नाही . पैसा द्यायला बँका आहेत . उद्योग बुडाला तर पैसा बँकेचा बुडतो आपला नाही !’ केवढी ही व्यवहार कुशलता !
