ते भरजरी ‘वर्कोहोलिक’ दिवस…


( नाना पाटेकर आणि कुमार केतकर यांच्यासोबत टीम लोकसत्ता नागपूर )
[ ‘माधवबाग आयुर्वेद या वैद्यक शृंखलेच्या ‘आरोग्य संस्कार’ या यंदाच्या दिवाळी अंकासाठी ‘टीम वर्क’ ही संकल्पना होती आणि वृत्तपत्र हा विषय मला देण्यात आलेला होता . त्या अंकात नागपुरातून प्रकाशित होणार्‍या ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीविषयी लिहिलेला हा लेख-]
एक काळ असा होता की , वृत्तपत्रे संपादकाच्या नावानी ओळखली जायची . ‘मराठवाडा’ म्हटलं की अनंतराव भालेराव , ‘संचार’ म्हटलं की रंगाअण्णा वैद्य , ‘मराठा’ म्हटलं की आचार्य अत्रे , ‘सागर’ म्हटलं की निशिकांत जोशी , ‘सकाळ’ म्हटलं की डॉ. ना. भि . परुळेकर , ‘तरुण भारत’ म्हटलं की आधी गं. त्र्यं. माडखोलकर आणि मग मा. गो. वैद्य आणि नंतर मामासाहेब घुमरे , ‘नवाकाळ’ म्हटलं की नीळूभाऊ खाडिलकर , ‘शिवनेर’ म्हटलं की विश्वनाथ वाबळे , ‘नागपूर पत्रिका’ म्हटलं की अनंत गोपाल शेवडे , ‘प्रजावाणी’ म्हटलं की सुधाकर डोईफोडे , ‘गावकरी’ म्हटलं की पोतनीस , अशी कितीतरी संपादकांची नावं सांगता येतील . माधव गडकरी , गोविंदराव तळवलकर आणि कुमार केतकर हे त्या अर्थाने शेवटचे संपादक की ज्यांच्या नावानी त्यांची साखळी ( लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स ) वृत्तपत्रं ओळखली गेली . आजकाल बहुतेक सगळ्या वृत्तपत्रांचे निवासी/कार्यकारी /मुख्य/समूह संपादक ‘व्यवस्थापकीय’ संपादकच बनले आहेत . व्यवस्थापकीय संपादक म्हणजे ‘न्यूज’ किंवा ‘व्ह्यूज मॅनेजमेंट’ नव्हे तर त्या वृत्तपत्राच्या निर्मितीचं व्यवस्थापन कशा विविध पद्धतीनं करावं , यात निष्णात असलेली माणसं म्हणजे संपादक असं स्वरुप काही अपवाद वगळता , आता झालेलं आहे . मुळात पूर्ण लांबीचा अग्रलेख लिहिणारे संपादकही फारसे उरलेले नाहीत . संपादकीय संस्थेचं इतकं अवमूल्यन झालंय की आता अग्रलेख मागे घेणारे संपादकही आता अस्तित्वात आलेले आहेत ! पण , ते असो .
आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की , अलीकडच्या काही दशकात विशेषतः मुद्रित माध्यमांचा प्रवास , ‘मिशन-टू-प्रोफेशन-टू-बिझनेस’ असा झाला आहे . १९८०ते९० च्या दशकापर्यंत माध्यमं म्हणजे केवळ मुद्रित माध्यमं असं स्वरूप होतं . नंतर तंत्र आणि यंत्राच्या क्षेत्रात व्यापक बदल झाले , संगणक आणि माहितीचं मायाजाल म्हणजे इंटरनेट आलं ; प्रक्षेपण आणि प्रसाराची बदललेली पद्धत आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स न्यूज चॅनेल्स- प्रकाश वृत्त वाहिन्यांचं व्यापक झालेलं जाळं , सोशल मीडिया…मुद्रित माध्यमं सर्व अर्थानं व्यापक होत गेलेली आहेत .
दुसर्‍या बाजूला विशेषतः मराठीच्या संदर्भात बोलायचं झालं तर शिक्षणाचं सुलभीकरण आणि सार्वत्रिकीकरण झालं . शिक्षितांचा एक खूप मोठा नवा वर्ग तयार झाला . या नवशिक्षित वर्गाच्या ज्या गरजा होत्या त्या ओळखून मुद्रित माध्यमांना त्यानुसार वळण देण्याचं काम करणारी नवी पिढी उदयाला आली . तोपर्यंत महाराष्ट्राच्या वाचकांवर असलेलं मोजक्या वृत्तपत्राची पकड आणि वर्चस्व लोकमत , देशोन्नती , पुढारी , पुण्यनगरी अशा अनेक वृत्तपत्रांनी एका वेगळ्या अर्थानं संपुष्टात आणलं ; वेगळा अर्थ असा की हा जो नवशिक्षित मध्यमवर्ग होता , त्याला वाचक म्हणून त्यांनी ‘टार्गेट’ ठरवला . त्या वर्गाला वाचक म्हणून त्यांच्याकडे ओढून घेतलं . ‘मिशन-टू-प्रोफेशन-टू-बिझनेस’ या प्रवासातला आणखी एक महत्त्वाचा बदल असा होता की ‘मिशन’ असा असताना मुद्रित माध्यमं विचार देणारी म्हणून ओळखली जात असत आणि वाचक माध्यमांकडे जात असत . प्रोफेशन आणि बिझनेस या टप्प्यामध्ये वृत्तपत्र हे घरातल्या ८० वर्षांच्या वृद्धापासून ते १० वर्षांच्या बालकापर्यंत अशा वयोगटातल्या वाचकांचं एक ‘फॅमिली प्रॉडक्ट’ बनलं . हा जो नवसाक्षर मध्यमवर्ग आहे तो , त्यांचा ‘टार्गेट रीडर’ ठरला आणि या ‘टार्गेट रीडर’ला जे काही हवं असेल ते देण्याची स्पर्धा मग वृत्तपत्रांमध्ये सुरू झाली . दरम्यान मुद्रणाचं तंत्रज्ञान बदललं होतं त्यातून रंगीत आणि आकर्षक छपाई आली , गुळगुळीत कागद आला . या मध्यमवर्गाला जे काही हवं असेल ते म्हणजे , बाजारात नवीन ( न्यू अरायव्हल्स ) काय आलंय , फॅशन काय आहे , काय बघितलं पाहिजे , काय ऐकलं पाहिजे , काय घेतलं पाहिजे , फिल्मी गॉसिप , अशा अनेक बाबींचा मारा त्याच्यावर होऊ लागला . त्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारी विविध प्रकाराची माहिती देणं हे एकमेव ध्येय माध्यमांनी स्वीकारलं ; त्यातून कोणाच्या घरातील सत्यनारायणापासून ते कुणाच्या घरात बसणार्‍या गणपतीच्या प्रतिष्ठापनेपर्यंत , अशा अत्यंत सूक्ष्म बाबीसुद्धा माध्यमांमध्ये प्रकाशित होऊ लागल्या . एक काळ असा होता की , साहित्य , कला, संगीत अशा सांस्कृतिक तसंच राजकारण , समाजकारण , विविध विद्याशाखा यापैकी एका किंवा जास्त क्षेत्रात किमान कर्तृत्व गाजवलेलं असल्याशिवाय किंवा एक विशिष्ट उंची प्राप्त केली असेल तरच त्या व्यक्तीच्या निधनाची बातमी वृत्तपत्रात येत असे . ‘प्रोफेशन’ आणि ‘बिझनेस’ या टप्प्यामध्ये मात्र बहुतेक सगळ्या वृत्तपत्रांमध्ये निधन वार्ता हा कॉलमच सुरू झाला ! त्या त्या वृत्तपत्राच्या शहराच्या टीममध्ये ‘घाट रिपोर्टर’ नावाची नवीन जमातच (?) अस्तित्वात आली . वृत्तपत्रांचं इतक्या सूक्ष्म पद्धतीनं विकेंद्रीकरण वाढत गेलं की , राज्यस्तरीय, विभागस्तरीय हे स्वरुप जवळजवळ संपुष्टात आलं आणि वृत्तपत्राचं स्वरूप जिल्हास्तरीय झालं . एका शहरातील बातमी १०० कि. मी. अंतरावर असलेल्या दुसर्‍या शहरामध्ये वाचायला मिळत नाही , अशी परिस्थिती निर्माण झाली . केवळ सनसनाटी आणि तथाकथित वाचकमूल्य असलेल्या बातम्यांनाच राज्यभर स्थान मिळू लागलं ; त्यातून ‘कोंबडा बोलतोय’ आणि ‘चार पायाची कोंबडी’ या सारख्या बातम्यांचं पीक आलं . हे सगळं स्थित्यंतर वृत्तपत्रांमध्ये गेल्या ३०-३५ वर्षांमध्ये झालं आणि त्याचा मी एक साक्षीदार तसंच भागीदारही होतो.
====

( ‘लोकसत्ता’च्या नागपूर आणि विदर्भ वृतांतच्या प्रकाशन प्रसंगी दत्ता मेघे , आणि तेव्हा आमदार असलेले विद्यमान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासोबत .)

कोल्हापूरच्या एका सायं दैनिकापासून माझ्या पत्रकारितेला सुरुवात झाली आणि अखेर ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा संपादक म्हणून माझं मुद्रित माध्यमांमधलं अस्तित्व संपुष्टात आलं ; असा हा चाळीस वर्षांचा हा प्रवास . पणजी , कोल्हापूर , सातारा , औरंगाबाद यासोबतच नागपूर , मुंबई आणि दिल्लीतही पत्रकारीता करण्याची संधी मिळाली . ‘लोकसत्ता’चा ( विदर्भ आवृत्तीचा का होईना ) संपादक होईन अशी कधी अपेक्षाही मी केलेली नव्हती . मुळात ‘लोकसत्ता’सारख्या दैनिकात काम करायला मिळावं , अशीही माझी कधी महत्त्वाकांक्षाही नव्हती ; ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या मुख्य वार्ताहर पदात मी खुश होतो ! मात्र ‘लोकसत्ता’त ती संधी मला अनपेक्षितपणे माधव गडकरी यांच्यामुळे मिळाली आणि केवळ कुमार केतकर यांच्यामुळे मी ‘लोकसत्ता’च्या नागपुरातून प्रकाशित होणार्‍या विदर्भ आवृत्तीचा निवासी संपादक म्हणून २५ मार्च २००३ला सूत्रं घेतली . पत्रकारीतेच्या या चढत्या प्रवासात माझा कुणीच ‘गॉड फादर’ नव्हता ; जे काही मिळालं त्याचं एकमेव कारण माझा परफॉर्मन्स हेच होतं .
‘लोकसत्ता’त ‘चेंज ऑफ गार्ड’ झाला ; अरुण टिकेकरांच्या जागी कुमार केतकर यांची संपादक म्हणून नियुक्ती झाली . आमच्या त्या भेटीत नागपूरहून प्रकाशित होणार्‍या आवृत्तीची चर्चा झाली . त्या आवृत्तीच्या भरभराटीच्या दिवसांच्या संदर्भात मी बोललो आणि ही आवृत्ती अजूनही खड्ड्यातून बाहेर निघू शकते , असं कुमार केतकरांना म्हणालो . त्यावर केतकरांनी एक टिपण करून पाठवायला सांगितलं . ते टिपण मी पाठवल्यावर काही दिवसांनी केतकरांचा फोन आला आणि ‘तुला नागपूरला जायला आवडेल का ?’ असं त्यांनी विचारलं . मी खरं तर त्यांना स्पष्टपणानं नाहीच म्हणालो . कारण तोपर्यंत औरंगाबादला मी मस्त रुळलो होतो . ‘तू जर आत्ता संपादक झाला नाहीस , तर पुन्हा ती संधी तुला मिळेल की नाही आणि मिळेल तोपर्यंत तुझं वय गेलेलं असेल’ असं म्हणून मला केतकरांनी राजी केलं . ‘लोकसत्तात’ले माझे ‘ब्लॅक डेज’ कुमार केतकर आल्यामुळे पुन्हा ‘सनी’ झाले !
====
नागपुरातून प्रकाशित होणार्‍या ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीची सूत्रं मी हाती घेतली , तेव्हा त्या आवृत्तीची परिस्थिती केवळ संपादकीयच नव्हे तर प्रशासकीय , वितरण आणि जाहिरात अशा सर्वच स्तरांवर फार काही चांगली नव्हती . अगदी खरं सांगायचं तर , त्या आवृत्तीची पार दैना उडालेली होती ; सर्वच आघाड्यांवर ती आवृत्ती निर्नायकी होती . संपादकीय विभागाची परिस्थिती तर अतिशय केविलवाणी होती . सुरेश द्वादशीवार बाहेर पडून सुमारे दीड वर्षं झालेलं होतं . ‘लोकसत्ता’चा एकेकाळी लाखाच्या घरात झेपाऊ पाहणारा खप झपाट्याने कमी झालेला होता . स्वाभाविकपणे उत्पन्नही कमी होतं . त्याच वेळेस शाखा प्रमुख म्हणून रामाकृष्णन आणि निवासी संपादक म्हणून माझी नियुक्ती झाली . खरं तर माझी नियुक्ती सुरुवातीचा काही काळ उपनिवासी संपादक म्हणून होती परंतु कुमार केतकरांनी मला कधीच उपनिवासी संपादक अशा अर्थाने वागवलंच नाही . ‘तू माझा कनिष्ठ सहकारी आहे’ अशी कधी त्यांची वृत्तीच नव्हती . त्यांनी मला त्या आवृत्तीचं काम करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य शेवटपर्यंत दिलं .
एकूण ‘लोकसत्ता’च्या नागपुरातून प्रकाशित होणार्‍या विदर्भ आवृत्तीच्या एकाही आघाडीवर किमान चमकदार म्हणा की आशादायक असं चित्र नव्हतं . अजून आठवतं , लोकसत्ताचे तत्कालीन सहायक संपादक अरविंद गोखले आणि माझी राहण्याची सोय एका तारांकित हॉटेलात करण्यात आलेली होती . पहिल्या आठ दिवसांनंतर बिल आलं तेव्हा मी टाणकन उडालो कारण ते होतं पन्नास हजार रुपयांवर ! सकाळी तारांकित हॉटेलमध्ये मिळणारा फुकटचा ब्रेकफास्ट घेऊन गोखलेसाहेब आणि मी जे बाहेर पडत असू ते रात्री पहिली-म्हणजे डाक आवृत्ती गेल्यानंतर दहा-सव्वादहा नंतरच परत येत असू . आल्यावर दालफ्राय आणि रोटी खाऊन झोपून जात असू . म्हणजे आमच्या केवळ दालफ्राय आणि रोटी खाण्यासाठी तसंच रात्रीच्या ७-८तासांच्या विश्रांतीसाठी व्यवस्थापन प्रत्येक दिवशी , प्रत्येकी तीन-सव्वातीन हजार रुपये खर्च करीत होतं ; इतका बेहिशेबी हा कारभार होता . बिलं सह्या करून पाठवल्यावर ही बाब जेव्हा मी शाखा व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणली तेव्हा त्याला यातलं काहीच माहिती नव्हतं . संपादकाचा दर्जा सांभाळला पाहिजे , असं गुळमुळीत तो काही तरी बोलला पण हे बिल अति होत असल्याचं त्यानं मान्य केलं . मग मी रविभवन या विश्रामगृहात एक खोली ताबडतोब बुक केली आणि तिकडे शिफ्ट झालो.
‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीमध्ये ‘न्यूज मॅनेजमेंट’ नावाची कुठलीही शिस्त अस्तित्वात नव्हती . न्यूज रुमची अक्षरशः रया गेलेली होती ; रंग उडालेल्या भिंती , तुटलेल्या आणि कव्हर्स लोंबणार्‍या खूर्च्या , भविष्याच्या चिंतेनं चेहेरे ग्रासलेले आणि खिन्न चेहेर्‍याचे संपादकीय सहकारी…असं एकूण उदासच वातावरण होतं . दररोजच्या अंकाचं नियोजन , त्याची काटेकोर अंमलबजावणी , इतर आवृत्तींशी संवाद असं नागपूरच्या संपादकीय विभागामध्ये काहीही अस्तित्वात नव्हतं . वृत्तसंपादक असलेला माझा एक जुना सहकारी होता , परंतु त्याची एक प्रकारे दहशतच होती ; त्यालाही माझे हरकत नव्हती पण , तो कामाची नुसती पाटी टाकत होता . वार्ताहरांचं मानधन १८-२० महिन्यांचं थकलेलं होतं . विदर्भरंग या विदर्भापुरत्याच प्रकाशित होणार्‍या पुरवणीचं मानधनही वीस एक महिन्यांपासून थकलेलं होतं .
सुरुवातीलाच मी काही ठाम निर्णय घेतले – सर्व रिक्त जागा तातडीनं भरण्याची परवानगी मिळवायची . मनुष्यबळ वाढवून घेत असताना आहे त्याच सहकार्‍यांना रिक्त ज्येष्ठ पदावर संधी द्यायची ; सुमारे दहा वर्षात न झालेल्या पदोन्नत्या करायच्या ; घसघशीत वेतनवाढी मंजूर करवून घ्यायच्या ; जिल्हा वार्ताहरांचं मानधन वाढवायचं आणि जमेल तितक्या लवकर त्यांना नियमित नोकरीत सामावून घ्यायचं ( या निर्णयामुळेच तेव्हा चंद्रपूरचा वार्ताहर असलेला देवेन्द्र गावंडे नागपूरचा सध्याचा ब्यूरो प्रमुख होऊ शकला ! ) ; सर्वसाधारणपणे संपादकांमध्ये आढळते ती तुच्छता आपल्या आसपासही फिरकू द्यायची नाही ; बहुसंख्य संपादकांमध्ये एक धारणा असते की अमुक एक लेखक किंवा तमुक एक पत्रकार माझ्यामुळे घडला , तो त्यांचा खरं तर गैरसमज असतो . तो गोड गैरसमज घेऊन ते आयुष्यभर जगत असतात आणि महत्वाचं म्हणजे त्या संदर्भात बोलतही असतात . माझी त्या संदर्भातली भूमिका अशी होती की , चांगला सहकारी-मजकूर-लेख-बातमी ही त्या संपादक आणि वृत्तपत्राचीही गरज असते . चांगला मजकूर-बातमी आणि वृत्तपत्र यामधला संपादक दुवा आहे . संपादकाची भूमिका काहीशी प्रेरकाची आहे , उत्तेजन देणार्‍याची आहे ; कर्ता-करविता , दाता किंवा उपकारकर्त्याची नाही…हे मी सीनियर रिपोर्टर झाल्यापासून बोलून दाखवत असे . त्यामुळे माझे तेव्हाचे सहकारी नाराज होत . पुढे संपादक झाल्यावर याबाबत जास्त ठामपणे बोलू लागलो . शिवाय गाडं नीट मार्गी लागेपर्यन्त केबिनमध्ये नव्हे तर सर्व सहकार्‍यासोबत त्या बकाल न्यूजरूमध्ये बसून काम करण्याचा निर्णय मी घेतला . संपादकच आपल्यासोबत बसून काम करताहेत ही जी भावना मी सहकार्‍यांमध्ये निर्माण करू शकलो , त्याचा फार मोठा परिणाम झाला आणि त्याचे नंतर आम्हाला लाभही मिळाले .

( ‘डायरी’ आणि ‘दिवस असे की…’च्या प्रकाशन समारंभात राज ठाकरे आणि नितिन गडकरी यांच्यासोबत .)
निवासी संपादक म्हणून मला काय वाटतं किंवा लोकसत्ताच्या संपादक विभागाला जे वाटतं ते वाचकाला देण्यापेक्षा मी उलट्या दिशेने सुरु प्रवास सुरु केला . वाचकाला काय वाटतं , हे आधी जाणून घेण्याचं मी ठरवलं . ‘लोकसत्ता’चा मोठ्या प्रमाणावर असलेला वाचक का दुरावला हे आधी उमजून घेऊ आणि त्यानंतर अंकात सुधारणा करु , असं ठरवलं आणि त्या दिशेनं कामाला सुरुवात केली . विदर्भातील बहुसंख्य लोकांच्या मनात ‘लोकसत्ता’चं नागपुरातील प्रकाशन बंद झालेलं आहे अशी भावना निर्माण झालेली होती . ती दूर करणं प्राधान्यानं गरजेचं होतं . नोव्हेंबर २००३ ते मार्च २००४ या काळात विदर्भाच्या वेगवेगळ्या भागात आम्ही ८० पेक्षा जास्त वाचक मेळावे घेतले ; त्यात प्रमुख पाहुणा म्हणजे तोफेच्या तोंडी अर्थातच मी . हे वाचक मेळावे आयोजित करण्यासाठी तिथल्या वार्ताहरांनी जसा पुढाकार घेतला तसंच त्यात वितरण आणि जाहिरात विभागासह सर्वच विभागांना सहभागी करुन घेतलं कारण तोवर आलेल्या अनुभवानुसार वृत्तपत्र हे एका व्यक्तीच्या नावावर चालू शकेल अशी परिस्थिती उरलेली नव्हती . त्या सगळ्यांची नावं घ्यायची म्हटली तर यादी बरीच लांब होईल ; तरीही वीरेंद्र रानडे , रमेश कुळकर्णी , रमेश चरडे , हेमंत केदार , प्रसाद पुल्लीवार , अनिरुद्ध पांडे , नितीन ईश्‍वरे , विजय संत , शेखर सोनी अशा काही सहकार्‍यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करायला हवा . ही मंडळी तहानभूक विसरुन माझ्यासोबत वणवण फिरत होती . प्रत्येक वाचक मेळावा अडीच ते तीन तास चालायचा आणि त्यात वाचकांचा ‘लोकसत्ता’बद्दल असलेला तक्रारींचा पाऊस पडायचा . वाचक का दुरावलेले होते याची कारणं पहिल्या १०-१२ वाचक मेळाव्यातच लक्षात येऊ आली आणि ती कारणं खरी आहेत यावर नंतरच्या मेळाव्यात शिक्कामोर्तब झालं . वाचक मेळाव्यांच्या निमित्ताने मी वाचकांशी , आमच्या स्थानिक वार्ताहरांशी बोलत होतो ; ‘लोकसत्ता’च्या बाबतीत संपादक प्रथमच लोकांना भेटत होता , त्यांच्याशी बोलत होता हे त्या निमित्तानं लक्षात आलं . सोबतच वितरण आणि जाहिरात विभागांच्या वेगवेगळ्या क्लायंटशी संवाद साधत होतो . विदर्भातल्या जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संभाव्य जाहिरातदारांच्या रात्र भोजनाला लोकसत्ताचा संपादक म्हणून मी जातीनं उपस्थित राहिलो आणि त्यांच्याशी व्यक्तिशः संपर्क साधला . ही अशी सगळी धावपळ केल्यानंतर ‘लोकसत्ता’ री-लाँच करण्याचा एक आराखडा आम्ही तयार केला . त्या आराखड्यावर एक दिवस रात्री नागपुरातच कुमार केतकर , ब्रॅंड हेड शंकर शिंदे आणि मी असे धनंजय देवधरच्या फार्म हाऊसवर चर्चा केली ; ‘लोकसत्ता’च्या री-लाँचची तारीख ठरली . त्यासाठी आकर्षण म्हणून एखादी अभिनेत्री बोलवावी असं शंकर शिंदेचं म्हणणं होतं . मी त्याला नकार दिला . मग नाना पाटेकरला बोलवायचं ठरलं . नानाशी लगेच संपर्क साधला . नानानी होकार दिला .
विदर्भातल्या बहुसंख्य वाचकांचा ‘लोकसत्ता’वर रोष होता तो मुंबई-पुण्यात देणार्‍या येणार्‍या पुरवण्या मिळत नाहीत आणि वैदर्भीय लेखकांना मुंबईच्या अंकात मुळीच स्थान मिळत नाही तसंच विदर्भातील सांस्कृतिक उपक्रमांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळत नाहीत म्हणून . लोकमुद्रा , चतुरंग , हास्यरंग , बालरंग , चतुरा या उर्वरित महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झालेल्या पुरवण्या विदर्भात मात्र वितरित केल्या जात नव्हत्या , हे खरंही होतं . शिवाय १०-१२वीचा अभ्यासक्रम यशस्वी भव आणि गाथा हे उपक्रमही विदर्भात दिले जात नव्हते . सर्व पुरवण्या २००४च्या वर्धापनदिनापासून देण्याचा निर्णयही झाला . त्या संदर्भात व्यवस्थापनच्या पातळीवर ज्या काही हालचाली करायला हव्या होत्या आणि ज्या काही मंजुर्‍या मिळवायला हव्या होत्या त्या शंकर शिंदेनी मिळवल्या . नेमक्या त्याच वर्षी ‘लोकसत्ता’च्या नागपुरातून प्रकाशित होणार्‍या आवृत्तीचं बाराव्या वर्षात पदार्पण होतं आणि नाना पाटेकराचा ‘अबतक छप्पन’ हा चित्रपट गाजत होता . मग ‘अबतक बारह’ अशी कॅचलाइन घेऊन ‘लोकसत्ता’ मोठ्या दिमाखात री-लाँच केला गेला . नागपूरभर ‘अब तक बारह’चीच बॅनर्स झळकत होती कारण निवडणूक आचारसंहितेमुळे अन्य बॅनर्सना बंदी होती ! नाना पाटेकर दिवसभर आमच्यासोबत होता . नाना पाटेकरची कुमार केतकरांनी घेतलेली मुलाखत खूप रंगली . ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीच्या री-लाँचच्या निमित्ताने माझा जुना दोस्तयार धनंजय देवधर यानं एक खास मराठी फूड फेस्टिव्हल आयोजित केला . नंतरचे ८ दिवस क्वाई संमेलन , मराठी चित्रपट फेस्टिवल , छंदीष्टांची मांदियाळी , विविध स्पर्धा आशा असंख्य कार्यक्रमांनी ‘लोकसत्ता’चं री-लाँच गाजलं . ‘लोकसत्ता’ बंद झालेला नाही , नागपूर आणि विदर्भात पाय रोवून ठाम उभा आहे याची जाणीव वैदर्भीयांना झाली.
====
केवळ एवढं करून भागणार नव्हतं . जे दैनिक वाचकांच्या भावजीवनाचा भाग होईल , वाचकांशी संबंधित विविध उपक्रम राबवत राहील त्या दैनिकासोबत वाचक काम जुळलेले राहतात . म्हणून विदर्भातील अन्नेक उपक्रमात प्रायोजक किंवा पाहुणेपद अशा रुपात आम्ही सहभागी झालो . कोणत्याही वृत्तपत्रातील लेखनाचा दर्जा , अचूकता वाचकांच्या मनात विश्‍वासार्हता व प्रभाव निर्माण करत असते . म्हणजे दर्जा , प्रभाव आणि विश्‍वासार्हता ही कुठल्याही दैनिकाच्या लोक पसंतीची कसोटी असते . या कसोटीवर ‘लोकसत्ता’ला कोणतीच समस्या नव्हती . आम्ही सगळे नवीन जोमाने कामाला लागलो . मनुष्यबळात वाढ होऊ लागली . ‘लोकसत्ता’ री-लाँच करण्याआधी सकाळी वार्ताहरांची बैठक , दुपारी ग्रामीणची बैठक , संध्याकाळी सर्व विभागाच्या प्रमुखांची बैठक ; त्या बैठकीत निर्णय ठरविणे , मुंबई आणि पुणे आवृत्तीशी संपर्क आणि त्यानुसार अंकनिर्मिती करणं हे अनेकांना सुरुवातीला जाचकच वाटलं . तोपर्यंतची ‘लोकसत्ता’ची पद्धत रात्रपाळीचा उपसंपादक आणि निवासी संपादक जे काही ठरवतील त्याच्यावर आधारित असे . एक टीम म्हणून , कुठली बातमी कुठे जाणार आहे , का प्रकाशित झाली , का नाही या संदर्भात कुणाचा कुणाशी ताळमेळ नव्हता . संध्याकाळच्या या संपादकीय विभागाच्या बैठकीमुळे उद्याचा अंक कसा राहील याचं चित्र साधारणपणे सर्व सहकार्‍यांच्या लक्षात यायला लागलं . कारण त्याची नोंद करणारी एक पद्धत सुरू केली . शिवाय कुणी चुकला तरी हरकत नाही पण त्याच्या पाळीतील निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलं ; एखादा निर्णय चुकला किंवा चूक झाली तर सर्वांसमक्ष कुणालाही झापायचं नाही ; शिवाय त्या संदर्भात सकाळी कुणालाही घरी फोन करुन जाब विचारायचा नाही , हे कटाक्षानं पाळलं . वार्ताहरांचं आणि लेखकांचं मानधन काढून घेण्यात एच.आर.चे प्रमुख अशोक प्रधान यांच्यामुळे तुलनेनं खूपच लवकर यश मिळालं आणि पुन्हा मग आम्ही लेखकांशी संपर्क साधायला लागलो .
इथे एक अजून बाब आवर्जून नमूद करायला हवी , की ‘विदर्भ रंग’ नावाची चार पानांची पुरवणी हा संपादक विभागातील काही लोकांच्या प्रतिष्ठेचा विषय असला तरी अत्यंत भोंगळ पुरवणी कशी असावी याचं ते एक उत्कृष्ट उदाहरण होतं . चार-चार, पाच-पाच कॉलम लेख आणि तेही संदर्भहीन ! म्हणजे- मला तर एक अंक असा सापडला की ब्रिटनची युवराज्ञी डायना हिच्या अपघाती मृत्यूनंतर चार पानं प्रतिक्रिया प्रकाशित झालेल्या होत्या ! हे सगळं इररिलेव्हंट होतं . ती पुरवणी आणि वैदर्भीय लेखक-वाचक , वैदर्भीय माती याचा कुठे ताळमेळच जुळत नव्हता . चंद्रकांत ढाकुलकरला हाताशी घेत त्या पुरवणीचं नीट नियोजन केलं ; अनेक नवीन स्तंभ आणि नवीन लेखकांना लिहिण्यासाठी राजी केलं . त्यात गौरी शास्त्री-देशपांडेचा वैदर्भीय खाद्य संस्कृतीसह अन्य स्वादांचा धांडोळा घेणारा स्तंभ वाचकांनी उचलून धरला कारण , तशा प्रकारचं चमचमीत लिखाण वैदर्भीय वाचकांना प्रथमच वाचायला मिळत होतं . ‘विदर्भ रंग’चा दिवाळी अंकही जाहिरातीची पुरवणी म्हणून निघत असे . चंद्रकांत ढाकुलकर आणि सोनाली कोलारकरला हाताशी घेत त्या दिवाळी अंकालाही वाचनीय असं स्वरुप आम्ही दिलं . आयुष्यातले ‘टर्निंग पॉइंट’ , ‘जडण-घडण’ , ‘संस्कार’ , ‘खाये चला जा’ असे विषय आम्ही हाताळले आणि त्यात राज्यातील नामवंतानी लेखन केलं ; त्याला वाचकांनीच नाही तर जाहिरातदारांनीही मस्त प्रतिसाद दिला .
नंतर एका क्षणी मग मी साप्ताहिक ‘विदर्भ रंग’ पुरवणी बंद केली ( त्यामुळे व्यवस्थापन खूष कारण तेवढा कागद वाचला ! ) तरी दिवाळी अंक मात्र सुरूच ठेवला . पुरवणीच बंद करुन दररोजच्या अंकात एक स्वतंत्र पान विदर्भ रंग म्हणून द्यायला सुरुवात केली . ( चार पाने बंद करून दररोज एक पान म्हणजे आठवड्याला आठ पानं म्हणजे चार पानं जास्त आहेत असा बचाव त्या काळात मी करत असे ! ) त्यासाठी विषय वाटून घेतले . कला, साहित्य , विज्ञान , शेती हे असे प्रत्येक दिवसासाठी एक विषय आणि एक पान ठरवून वैदर्भीय लेखकांना सामील करून घेतलं . तोपर्यंतचे जे उरलेले स्तंभलेखक होते त्यांच्यात ‘अहं’ वृत्ती आलेली होती . त्याचं एक उदाहरण सांगायला हवं गायचं तात्पर्य हे की , संपादक आणि स्तंभलेखकाचाही व्यवस्थित संवाद नव्हता ; वाचक आणि संपादकाचाही संवाद नव्हता ; वृत्तपत्र आणि लोकभावनेचाही कुठे परस्पर समन्वय आहे , असं काही नव्हतं . याच दरम्यान ‘पीक अ‍ॅण्ड चुज’ ही लेखनाची पद्धत बंद केली . संपादकाचे आवडते दोन-तीन सहकारी पुरवणी किंवा संपादकीय पानासाठी लेखन करतील ही पद्धत मोडीत काढली आणि लेखनाची संधी सर्वांना असं धोरण अवलंबलं .

वैयक्तिक आयुष्यात मी पूर्णपणे अधार्मिक आहे . मी कुठल्याही देवळात जात नाही , कुठलेही धार्मिक ग्रंथ कळत्या वयानंतर पुन्हा वाचलेले नाहीत . कोणत्याही धार्मिक विधीत सहभागी होत नाही आणि दरवाजा बंद करुन कोणतीही पूजा तर मुळीच करत नाही ! आजवरच्या जगण्यात ८-१०सेकंदाचा एक अपवाद वगळता मी कधीही कुठल्याही देवळात गेलेलो नाही तरीही , गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात इव्हेंट म्हणून आपण वापरून घेतला पाहिजे असं ठरवलं आणि दररोजच्या अंकात अक्षरशः दोन पानांपर्यंत वृत्त संकलन करून घेतलं . या केवळ बातम्या नव्हत्या तर त्या निमित्तानं विविध गणेशोत्सव मंडळातर्फे राबविल्या जाणार्‍या उपक्रमांची घेतलेली ती दखल होती . हे उपक्रम जसे सामाजिक होते तसेच विधायकसुद्धा होते . त्यांची तशी दखल तोपर्यंत नागपूर-विदर्भात घेतली गेलेली नव्हती . विदर्भातले अष्टविनायक , विदर्भातल्या मानवी नवदुर्गा तसंच विदर्भातल्या दुर्गा अशा अनेक मोहिमा आणि बातम्या वाचकांच्या आस्थेचा विषय झाल्या . आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे , गळेकापू स्पर्धेमुळे वृत्तपत्र मायक्रो आणि मर्यादित झालेली होती . ‘लोकसत्ता’ला ‘कंप्लिट रिजनल न्यूजपेपर’ असं स्वरुप प्राप्त करून घेण्यासाठी पुढाकार घेतला ; केवळ राजकीय आणि गुन्हेविषयक बातम्यांना प्राधान्य न देण्याचा निर्णय घेतला . त्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या असतील त्या येतच होत्या , परंतु समाजकारण आणि सांस्कृतिक यावर जास्त भर दिला . माझं अजूनही मत आहे की, एखादा संपादक किती चांगलं राजकीय भाष्य करू शकतो यावर त्याची लोकप्रियता आणि त्या राजकीय लेखनावर वृत्तपत्राचा खप अवलंबून नसतो ; वृत्तपत्राची विश्‍वासार्हता आणि प्रभावही अवलंबून नसतो . सांस्कृतिक पातळीवर त्या भूप्रदेशाशी कशा पद्धतीनं जोडला गेलेला आहे , यावर त्या वृत्तपत्राचं यश आणि विश्‍वासार्हता अवलंबून असते . त्यामुळे साहित्य असो वा कला वा संगीत अशा सांस्कृतिक उपक्रम , बातम्या , फिचर्स संपूर्ण विदर्भभर कशी जातील याची दक्षता आम्ही कटाक्षाने लक्ष घेऊ लागलो. त्याच्यासाठी वेगवेगळे विषय शोधून काढले . विदर्भातील जुने किल्ले, गड , जुनी वाचनालये-तेथील दुर्मिळ ग्रंथ , विदर्भातील शंभर-सव्वाशे वर्षं जुन्या वास्तू , त्यांचा इतिहास , त्यांचं राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक महत्त्व यावर मोठ्या प्रमाणात लेखन करवून घ्यायला सुरुवात केली . सुमारे २५वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सनी प्रत्येक शहरात होणारे बदल ही प्रकाशित केलेली मालिका मला अतिशय आवडली होती . त्यावर आधारीत ‘स्थित्यंतर’ नावाची मालिका प्रत्येक शहरात होत गेलेल्या बदलाच्या अनुषंगाने राबविण्याचं ठरलं . एक पूर्ण पान त्यासाठी राखून ठेवण्यात आलं . तालुका हा निकष मजकुरासाठी निश्‍चित करण्यात आला आणि विदर्भातल्या प्रत्येक तालुका स्तरावरच्या शहराच्या रुपात २५ वर्षांत काय बदल झाले , २५ वर्षांपूर्वी शहर कसं होतं आणि आता काय स्थित्यंतरं झाली याचा आढावा घेणारी मालिका आम्ही केली . त्यालाही अतिशय मोठ्ठा प्रतिसाद मिळाला हे नमूद करायला हवं . याशिवाय ‘वैखरी’सारखी महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा किंवा ‘युथफूल’सारखे उपक्रम राबवून संपूर्ण विदर्भातील महाविद्यालयीन तरुणांना ‘लोकसत्ता’शी जोडण्याचा प्रयत्न आम्ही केला . ते युवक-युवती त्यांच्या भाषेत जे काही लिहित असत ते ‘युथफूल’ या पानावर आम्ही प्रकाशित करीत असू . त्या भाषेबद्दल जुनीजाणती मंडळी जरा नाराज असत कारण ती भाषा त्यांच्या पचनी पडत नसे . परंतु आम्ही तो उपक्रम अतिशय प्रेमाने आणि युवकांशी संपर्क साधण्याच्या दृष्टिकोनातून राबवत असू त्यामुळे ‘लोकसत्ता’चा जुनाजाणता वाचक आणि महाविद्यालयीन युवक असा मोठा वाचकांचा गट आमच्याकडे जमा झाला .
====

( ‘लोकसत्ता’ कार्यालयातील एका कार्यक्रमात दोन प्रतिभावान चित्रकार व छायाचित्रकार विवेक रानडे आणि अक्षर लेखनकार अच्युत पालव यांच्यासोबत .)

एक नियोजन म्हणून , रात्री डाक एडिशन गेल्याशिवाय कार्यालय सोडायचं नाही आणि ‘कुठेही’ जाऊन ड्रिंक्स घेत बसायचं नाही हे मी ठरवून टाकलं . परिणामी रात्री साडेदहा ते सकाळी पाच अशी निवांत झोप होऊ लागली आणि दररोज मी ताजातवाना राहू लागलो ; त्याचा परिणाम माझ्याही कामावर चांगला झाला . ‘डायरी’ , ‘नोंदी डायरीनंतरच्या’, ‘क्लोज-अप’ , ‘मागोवा’ , ‘भाष्य’ असे स्तंभ मी या काळात लिहिले . शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असतांना शेतीच्या आणि शेतकर्‍यांच्या उत्थानासाठी प्रभावी कामगिरी बजावली म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देण्यात येणार्‍या डिलिट समकक्ष ‘गोपाल’ सन्मानाला केलेला विरोध आणि अखेर पवार यांनी जन्मतासमोर झुकून तो सन्मान नाकारण्याची घटना ; रा. स्व . संघाचे तत्कालीन सरसंघचालक सुदर्शन यांच्याशी घेतलेला माझा पंगाही याच काळातला…असं खूप काही ! आणखी एका बाबीचा आवर्जून उल्लेख करायला हवा– संपादकीय विभागातील कोणत्याही नियुक्तीची संपादक म्हणून मी थेट शिफारस न करता त्यासाठी ज्येष्ठ सहकार्‍यांच्या समितीकडे ते काम सोपवलं ; परिणामी आपल्याही विश्वासात घेतलं जातं ही भावना निर्माण झाली . यात गोम अशी की मला ज्या कुणाला नियुक्त करायचं आहे ते नाव या समितीच्या गळी मी उतरवत असे…च ! नियुक्त्या करीत असताना तरुणांवर भर दिला आणि या तरुणांनी ‘संडे स्पेशल’नावाने जो काही धुमाकूळ घातला , तो अवर्णनीय होता .
सोनाली कोलारकर-सोनार , भक्ती सोमण , राखी चव्हाण , ज्योती तिरपुडे , पीयूष पाटील , श्रीकांत बोराडे , प्रमोद लेंडे , राजेश्वर ठाकरे , वर्षा जोशी , नयना देशपांडे , भारती अत्रे-सहस्त्रबुद्धे गौरी शास्त्री-देशपांडे ही तरुण मंडळी नुकतीच पदव्या घेऊन माध्यमांच्या बाजारात उतरलेली होती . यातील बहुतेक सगळेजण ‘लोकसत्ता’चे चाहते होतेच शिवाय माझ्याही लेखनाचे ‘पंखे’ होते . ( यापैकी भारती आणि नयना फारच लवकर दुसरीकडे गेल्या . ) सोनाली कोलारकरनं एक दिवस , दर रविवारच्या अंकात काहीतरी वेगळं देत जाऊ या , अशी कल्पना मांडली आणि त्याचं नियोजन आमच्यावर सोडा असा हट्ट धरला . तरुण मुलं स्वतःहून काही करू इच्छिताहेत हे बघून आनंद झाला पण , सर्वाधिकार देणं काही शक्य नव्हतं म्हणून अंतिम मजकूर माझ्या संमतीशिवाय जाणार नाहीही अट टाकून या मंडळींच्या हाती ‘संडे स्पेशल’ची सूत्रं सोपवली . संडे स्पेशलच्या नावाने जे काही या तरुण सहकार्‍यांनी केलं , त्यात राजकारण सोडून सगळं होतं . वैदर्भीय प्रकाशन क्षेत्राची दखल या मंडळींनी घेतली ; प्रत्येक प्रकाशन संस्थेचा इतिहास , त्यांची जडणघडण कशी झाली , भलेबुरे अनुभव , त्यांची ठळक वैशिष्ट्यं ही त्यांच्याच शब्दात वदवून घेण्याचा जो उपक्रम होता ; आगामी पुस्तकांच्या संदर्भात माहिती देण्यास सुरुवात केल्यानं साहत्यिकांचा राबता वाढला , विकास जोशी यानं नागपूरच्या चित्रकलेचा धांडोळा घेत एक महत्वाचं डाक्युमेंटेशन केलं , डॉ. सुलभा पंडित यांनी संगीताची आघाडी लढवली…त्यामुळे आम्हाला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पाय रोवण्यास खूपच मदत केली . पै पैसा जमवून समाजासाठी काही तरी विधायक करणारे , कधीही प्रसिद्धी न मिळालेले कुठले कुठले गुणीजन या मंडळींनी शोधून काढले ; त्यांचं काम प्रकाशात आणलं . ही सगळी मंडळी समाजाचा असा अबोल वर्ग होती ; त्या अबोल वर्गाला आवाज मिळवून देण्याचं काम या सगळ्या तरुण सहकार्‍यांनी करून दाखवलं . झापडबंद समज बाजूला ठेवून तरुणाच्या सोबतही उत्साहाने जाण्याचा प्रयत्न केला की काय होतं , त्याचे परिणाम कसे चांगले चांगले येतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘संडे स्पेशल’ हा उपक्रम .
मध्ये तर असा एक काळ आला की ‘लोकसत्ता’च्या रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीइतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्तच ‘संडे स्पेशल’ची लोकप्रियता विदर्भात वाढलेली होती ! जुनं आणि नव्याचा ताळमेळ घालणारा टीम वर्कचा हा जो प्रयोग होता , तो खूपच सुखावणारा होता . या टीमचा भाग नसलेले नारायण कुळकर्णी-कवठेकर , प्रतिभावान कलावंत विवेक रानडे , डॉ. सुलभा पंडित , श्रीपाद भालचंद्र जोशी , डॉ. श्रीकांत चोरघडे , डॉ. विनय वाईकर , सुनीती देव , भाग्यश्री बनहट्टी , वसंत वाहोकार , चंद्रकांत चन्ने , चित्रकार विकास जोशी , प्रमोद मुनघाटे , वणीचा डॉ. प्रा. अजय देशपांडे , सीमा सोमलवार , शुभदा फडणवीस…असे अक्षरश: अगणित सुहृद बाहेरुन या टीम ‘लोकसत्ता’त सहभागी झालेले होते . महत्वाचा भाग म्हणजे घरच्या आघाडीवर मी फारच निर्धास्त आणि बिनधास्तही होतो . मी सतत दौरे करत उंडारत असायचो । कन्या सायली काय आणि कुठे शिकते आहे ; येणार्‍या पगारात घर कसं भागतं , सण-वार , येणारे-जाणारे या सर्व आघाड्यां मंगलानं बिनबोभाट सांभाळल्या . कोर्‍या चेकबुकवर सह्या करुन नामदेव पराडकरकडे देऊन ; सर्व आर्थिक व्यवहार त्याच्यावर सोपवून आस्मादिक बिनधास्त फिरत असत . बेहिशेबी तसंच भर्राटपणे जगणारांसाठी नामदेव पराडकरसारखा हिशेब आणि कामाला चोख सहकारी मिळणं फारच महत्वाचं असतं .
====
उपनिवासी संपादक ते संपादक या प्रवासाच्या काळात विशेषतः कुमार केतकर आणि अरविंद गोखले यांच्याकडून मला जे काही कामाचं स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे ‘लोकसत्ता’ची नागपुरातून प्रसिद्ध होणारी विदर्भ आवृत्ती आम्ही पुन्हा बाजारात दिमाखानं उभी करु शकलो . एक क्षण तर असा आला की , आम्ही ७० हजारपेक्षा जास्त प्रतींचा टप्पा पार केला . तो आंकडा आम्ही पहिल्या पानावर अभिमानाने प्रकाशितही केला होता . ऐन बहरात असतांनाच व्यवस्थापनाने अचानक अनाकलनीय निर्णय घेतले . एका फटक्यात विदर्भातील ३७०/३७२ वार्ताहरांची संख्या १५० करण्यात आली . रिकाम्या होणार्‍या पूर्ण वेळ उपसंपादक आणि वार्ताहरांच्या जागा भरण्यात परवानगी मिळेनाशी झाली . नागपुरातील संपादकीय वर्गाचा आंकडा ४० वरुन १२वर घसरला . विदर्भाच्या ४४/४६ सेल्सियस उन्हात एस.टी.मध्ये प्रवास करून वितरण विभागानं उभ्या केलेल्या २५ पेक्षा कमी अंकांच्या एजन्सीज बंद करण्यात आल्या . विदर्भ वृत्तांत बंद करण्यात आला . एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाचे सर्व आर्थिक अधिकार दिल्लीत केंद्रित झाले आणि जे ‘इंडियन एक्सप्रेस’चं झालं तेच मग ‘लोकसत्ता’चं महाराष्ट्रात झालं . अर्थात माझा संबंध विदर्भापुरता आहे . २००३ ते १२ या काळामध्ये जशी सर्व विभागांनी एकत्र येऊन एकसंधतेने एक टीम म्हणून जे यश संपादन केलं होतं , त्याला हळूहळू ओहोटी लागली . हळूहळू त्याचा त्रास होऊ लागला . ते बदल , ते नवीन वातावरण खूप काळ सहन करणं शक्यही नव्हतं आणि इतक्या कमी मनुष्यबळाच्या आधारे एखादं वृत्तपत्र पूर्ण जोमानं चालविता येणंही शक्य नव्हतं . शिवाय महत्त्वाचं म्हणजे कुमार केतकर , अरविंद गोखले , सुधीर जोगळेकर सारखे माझे सहकारी ‘लोकसत्ता’तून बाहेर पडले होते…हेकटपणा आणि कर्कश्श एकारलेपणा करणारे लोक वाढलेले होते . ठरल्याप्रमाणे मग मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यातलं एक सोनेरी पर्व संपुष्टात आलं . अनेकजण वारंवार विचारतात म्हणून सांगतो , त्या काळात झालेल्या संकोचातून ‘लोकसत्ता’ सावरला की नाही याबद्दल मी आता काही बोलणं शिष्टाचारसंमत होणार नाही …

ती वर्षं मंतरलेली होती यात शंकाच नाही . अविश्रांत कामाचे , अनेक प्रयोगांचे , खूप चांगल्या नव्या-जुन्या सहकार्‍यांसोबतचे ते ‘फुल्ल टाईट वर्कोहोलिक’ भरजरी दिवस होते . मला वाईट सहकारी फार कमी लाभले आणि जे मोजके भेटले मी त्यांची फारशी दखलही घेतली नाही ; जे गुणवत्तेच्या निकषावर वाईट असतं ते आपोआप निष्प्रभ होत जातं , अशी त्यासंदर्भातली माझी धारणा आहे . शुद्ध भाषा तसंच माहितीच्या बाबतीत जास्तीत जास्त अचूक असणं या दोन्ही निकषांवर माझी हट्टी भूमिका सहकार्‍यांनी वेळोवेळी स्वीकारली आणि त्यानुसार काम केलं . अनेकांना त्याचा कदाचित रागही आला असेल ; माझ्या यहट्टी स्वभावामुळे आणि काहींना उद्धट वाटू शकणार्‍या स्पष्टवक्तेपणामुळे काही सहकारी नक्कीच दुखावले असतील . परंतु वृत्तपत्राच्या यशासाठी त्यांनी त्यांचं ते दुखावलेपण बाजूला ठेवलं यातही शंका नाही .
त्या भारलेल्या दिवसांत मी अखंड फिरत असे . देशात आणि परदेशातही . त्या काळात जगण्याला थेट भिडता आलं ; असंख्य माणसांना भेटता आलं ; राजकारण , समाजकारण , साहित्य क्षेत्रात मनसोक्त विहरता आलं ; ४०/४२ देशात कामानिमित्त फिरता आलं ; महत्वाचं म्हणजे भरपूर लिहिता आलं…माझी अनुभवाची पोतडी आणि आकलन वैपुल्यानं संपन्न करणारे ते दिवस होते .
( छायाचित्रे- शेखर सोनी )

-प्रवीण बर्दापूरकर
Cellphone +919822055799
praveen.bardapurkar@gmail.com
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट