मराठी भावगीत रानावनात पोहोचवणा-या ‘शीळ’कर्त्या ना.घ.देशपांडे यांच्या मेहेकर यांच्या गावावरून आजवर असंख्य वेळा गेलो. काही प्रसंगी गावातही गेलो. बालाजी मंदिरामागे असलेल्या ना.घ.देशपांडे यांच्या घरीही भक्तीभावाने जाऊन आलो. सुरुवातीच्या काळात एसटी महामंडळाच्या बसने आणि नंतर कारने मेहेकर अनेकदा ओलांडलं. साडेतीन-चार दशकांपूर्वी औरंगाबादहून सकाळी सहा पन्नासला निघालेली नागपूर बस दुपारी अडीचच्या सुमारास मेहेकरबाहेर निघत असे तेव्हा ‘ना.घ.आता काय करत असतील’, असा प्रश्न पडत असे. तेव्हा मेहेकर लहान रस्त्यावर, टुमदार आणि शांत होते. एकदा या गावात विश्रामगृहात मुक्काम केला तर क्वचित जाणा-येणा-या बसेस आणि ट्रक्सच्या आवाजाने या गावाची झोपमोड होत असे, इतकं शांत! आता हे गाव हाय-वे वर आलं आहे. गावाचा शांतपणा वाढलेल्या आणि २४ तास चालणा-या वाहतुकीने ढळला आहे. विविध वाहने. हॉटेल्स-पान टप-या वाढल्या, तिथली गिऱ्हाइकांची गर्दी आणि कलकलाट वाढला आहे. वाढत्या नागरीकरणाने टुमदारपण उध्वस्त केलाय. गावातल्या प्रत्येक वास्तुवरच नाही तर प्रत्येक माणसावर धुळीची पुटे चढली आहेत.
मराठी कवितेवर प्रेम करणा-या प्रत्येकाने ना.घ.यांची कविता आणि त्यांच्या कंचनीच्या महालावर प्रेम केलं. ना.घ.देशपांडे यांची कंचनीच्या महालावरची विरूपिका कवीमनाच्या प्रत्येकाला त्याचीही आर्त गरज वाटली. कंचनी ही एक वारांगना. मेहेकरच्या त्या माळरानावर एक महाल बांधून त्याच्या वरच्या गवाक्षातून लोणारच्या कमळाई देवीच्या देवळातला दिवा पाहण्याची तिची कामना होती. तो दिवा पहिला आणि तिची शीळा झाली अशी ती दंतकथा. मराठी काव्यप्रांतात कंचनीला ना.घ.देशपांडे यांनी ‘शीळ’ इतकंच अमर केलं. आता तो महाल तर सोडाच पण बुरुजही राहिलेला नाही इतकी आमच्या असांस्कृतिक कोडगेपणा आणि बेफिकीर वृत्तीने कंचनीच्या दंतकथेची अक्षरश: माती केली. ना.घ.यांचं स्मारक व्हावं आणि कंचनीच्या महालाचं जतन व्हावं ही कविवर्य ना.धों.महानोरांची मनोमन इच्छा होती. सरकारदरबारी इतकी सेवा बजावूनही महानोर यांना मेहेकरात ना.घ. देशपांडे यांचं ना स्मारक उभारता आलं ना कंचनीचा महाल टिकवून ठेवता आला. मी संपादक असताना आमच्या श्रीमंत माने या पत्रकाराने हा विषय बराच लाऊन ठेवला, कळवळून एक मालिका ‘लोकसत्ता’त लिहिली. त्या शीळेचा फोटोही प्रकाशित केला होता.. हा मजकूर प्रकाशित झाल्यावर ‘आपण जतन करू हे सारं’, असं आश्वासन तत्कालीन सांस्कृतिक मंत्री अनिल देशमुख यांनी दिलं होतं ते पण, विसरून जाण्यासाठीच! नागपूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सावनेर इथलं राम गणेश गडकरी यांचं स्मारक आणि घर सांस्कृतिक मंत्री या नात्याने जतन करू न शकलेले अनिल देशमुख नागपूरपासून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मेहेकर गावात जाण्याचीही तसदी घेणार नाहीत हे स्पष्ट होतं आणि घडलंही तस्संच.
साल्झबर्ग सेमिनारच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासवृत्तीसाठी निवड झाली तेव्हा सर्वात प्रथम आठवला तो द ग्रेट मोझार्ट! व्हिएन्नामार्गे साल्झबर्गला उतरलो तेव्हा वाटलं विमानतळावर नक्की कुठे तरी फलक असेल, ‘हेच ते मोझार्टचं गाव’ किंवा ‘मोझार्टच्या गावात तुमचं स्वागत आहे’, पण तसं काही नव्हतं कुठेच. सलग आठ दिवस काम झाल्यावर मिळालेल्या सुटीत आम्ही गावात धाव घेतली. पाकिस्तानमधून आलेले पाकिस्तान न्यूजचा ओवेस आणि कराचीची अंदलीब यांनाही मोझार्टच्या घराला भेट देण्याची इच्छा होती. बरीच पायपीट करून गावच्या मध्यवर्ती भागात एका चौकात पोहोचलो आणि आमच्या स्वागताला समोर आला तो मोझार्टचा वाडा. वाडा म्हणणं हे अगदी आपलं मराठमोळे झालं. खरं तर तो आहे भव्य प्रासाद आणि बाह्य भिंतीपासून ते आत ठेवलेल्या प्रत्येक वस्तूपर्यंत इतका नीट नेटका की जणू, मोझार्ट कुठं तरी बाहेर गेला आहे आणि काही मिनिटातच परत येऊन वाद्यवृंद जुळवणार आहे!
आम्ही ती वास्तू पाहून आधी मनोमन नतमस्तक झालो आणि तिचे ज्या पध्दतीने जतन केले आहे ते बघून थक्क झालो. (नंतर ऑस्ट्रिया, जर्मनी आणि मध्य युरोपच्या अन्य भागात फिरताना हा अनुभव आपल्याला वारंवार येणार आहे याची कल्पना नव्हती आम्हाला. जर्मनीत ज्यूंच्या झालेल्या अनन्वित छळाची वर्णने वाचली होती, काही चित्रपट पहिले होते त्या छळांवर आधारित. प्रत्यक्षात त्या छावण्या बघताना अंगावर काटा आला आणि क्रौर्याची परिसीमा म्हणजे काय हे पटले पण, ते असो. जे छळाच्या स्मृतींचे जतन करू शकतात ते मोझार्टसारख्या संगीतकारांच्या स्मृती रत्न-माणके जपाव्यात तशा सांभाळणारच याची खात्री पटली.) सांस्कृतिक स्मृती जतन करण्याच्या त्यांच्या म्हणजे, युरोपियनांच्या रसिकतेला, समज आणि उमज यांना दाद देण्याशिवाय पर्यायच नव्हता. उण्यापु-या ३५-३६ वर्षांच्या आयुष्यात (जन्म २७ जानेवारी १७५६ आणि मृत्यू ५ डिसेंबर १७९१) मोझार्टने युरोपियन संगीत ज्या उंचीवर नेऊन ठेवले ते सुरल कर्तृत्व नंतर कोणाला जमलंच नाही. अल्पशा जगण्यात मोझार्टने अवघं शास्त्रीय संगीत कवेत घेत ४१ सिम्फनी निर्माण केल्या आणि तो अजरामर झाला. आणखी जगता तर मोझार्ट संगीताच्या क्षेत्रात आणखी किती आणि कशी आश्चर्ये निर्माण करता असा प्रश्न तो प्रासाद सोडताना मनात रुंजी घालत होता.
आम्ही बाहेर आलो आणि फुटपाथवर उभे राहून भारावल्या नजरेने त्या वास्तूकडे गारुड झाल्यासारखे बघत काही वेळ उभे राहिलो. रस्त्यावरून जा-ये करणारांना त्या प्रासादाकडे आचंबित होऊन पाहणारे पर्यटक नवीन नव्हते. तसे भाव त्यांच्या चेहे-यावर स्पष्टच दिसत होते. आम्हाला वळसा घालून ते जात होते… गारुडाचा अंमल ओसरल्यावर आम्ही पुढे काय करायचे याची आखणी करत असताना वृत्तपत्र वाचत एक मध्यमवर्गीय महिला तिच्या डॉगीला फिरवत आली. आम्हा लोकांना पाहून बहुदा त्या डॉगी पिल्लूचं कुतूहल जागृत झालं असावं. ते आमच्याभोवती रेंगाळलं. शेपटी हलवत आमचा वास घेऊ लागलं बागडू लागलं आणि बागडता बागडता अचानक ते गोल फिरू लागलं.. असं फिरणं हे डॉगीला शी लागल्याचं लक्षण असतं. ती महिला हे जाणून असावी. पटकन हातातलं वृत्तपत्र पर्समध्ये टाकत तिने पुढे ओढून नेण्याच्या आतच डॉगीने कार्यभार उरकला होता! राष्ट्रीय महत्वाची वास्तू असो की सार्वजनिक उपयोगाची की सरकारी वास्तू ; प्राणी लांब राहिले माणसानेही कुठंही तंगडी वर केल्याचे पाहण्याची आपल्याला सवय आहे, त्यामुळे आम्हाला त्याचं काहीच वाटलं नाही पण, ती महिला मात्र विलक्षण ओशाळली. ‘ओ..नो’ म्हणत तिने ‘कॅन एनीबडी होल्ड धिस?’ असं विचारत डॉगीला बांधलेली साखळी समोर केली. मी ‘श्युअर’ म्हणत ती पकडली. एव्हाना, प्रेशर गेल्याने डॉगोबा मजेत बागडत होते. त्या महिलेने पर्समधून ३/४ टिश्यू पेपर काढले. डॉगीने केलेली शी साफ नीट केली, सू पुसून टाकली.. नंतर ते टिश्यू पेपर नीट एका कागदात गुंडाळले आणि कचरा कुंडीत नेऊन टाकले… मी थक्क होऊन पाहतच राहिलो. सुसंस्कृतपणा काय असतो आणि देशाचे वैभव नागरिकच कसे जतन करू शकतात हे त्या महिलेनं आम्हाला न बोलता दाखवून दिलं. आता ओशाळे होण्याची वेळ आमच्यावर आलेली होती. हात स्वच्छ पुसून माझ्या हातून डॉगीची साखळी घेत ती म्हणाली , ‘सॉरी , ही इज लिटल नॉटी…’ आणि जणू काहीच घडले नाही अशा सहज अविर्भावात ती निघून गेली…
मोझार्टच्या गावाला भेट देऊन आल्यापासून मेहेकर ओलांडताना मला ना.घ.देशपांडे, कंचनीच्या महालाची दंतकथा आठवते आणि विलक्षण ओशाळल्यासारखं होतं.. कारमधूनही डोळे वर करून या गावाकडे मी बघू शकत नाही.
=प्रवीण बर्दापूरकर
संपर्क- ९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९