‘मनोहर’ असलं आणि नसलं तरी…

आपण एक समंजस समाज म्हणून बहुसंख्येनं जशी चर्चा करायला हवी ती करत नाही, अनेक बाबींचा मुलभूत विचार करत नाही; अशी होणारी तक्रार रास्तच आहे. त्यामुळे जे काही तथाकथित मंथन घडत असतं ते फारच वरवरचं असतं, अनेकदा तर ती एक गल्लतच असते. थोडक्यात आभासी प्रतिमांच्या आहारी जाणं, हे आपल्या समाजातील बहुसंख्यांचं व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. यात मिडियाही आघाडीवर असतो. मिडियात व्यक्त झालेली मत ऐकून/वाचून कोणतीही खातरजमा न करता, खोलात न जाता समाजातील हे बहुसंख्य लोक त्यांचं एक पुन्हा आणखी वेगळं मत बनवतात, हा आणखी एक वेगळं लोचा असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर, सध्या आपल्या राज्यात सुरु असलेल्या मोर्चांच्या राजकारणाचं देता येईल. सर्वच मोर्चात व्यक्त झालेला संयमित आक्रोश, पाळली गेलेली शिस्त, ठेवली गेलेली शांतता, याचं आपल्याला कौतुक आहे; ते असायलाही हवंच. प्रत्यक्षात मात्र अशा, जाती-धर्मांच्या निघणाऱ्या या मोर्चाचं अर्थकारण नेमकं कसं आहे, या मोर्चानी समाज कसा दुभंगतोय, माणसं परस्परांकडे संशयाच्या नजरेनं कशी बघू लागली आहेत- प्रचंड अशी धुम्मस निर्माण झालेली आहे आणि त्यातून राज्यातली सत्ता अस्थिर होतेय, अशा अनेक मुलभूत बाबींकडे बहुसंख्यांचं जायला पाहिजे तितक्या गंभीरपणे लक्ष जातच नाही.

वैयक्तिक पातळीवरही आपण अशीच गल्लत करत असतो. म्हणजे, एखादा नेता/कलावंत/साहित्यिक बोलायला-वागायला गोड स्वभावाचा असेल, तर बहुसंख्यांना त्याच्या त्या गुणांचं जास्त कौतुक असतं. राजकीय नेतृत्व म्हणून त्याच्यात राजकीय समज, आकलन आणि कसब किती आहे, त्याचा प्रशासकीय वकूब काय आहे, त्याची दृष्टी समाजहिताचा विचार करता भविष्याचा वेध घेणारी आहे का, याचा तर्कनिष्ठ विचार न करता त्याच्या साधेपणाचंच गुणगान होत असतं, मंत्री असूनही त्याचं विमानाच्या रांगेत उभं राहणं किंवा रोखठोक बोलणं बहुसंख्यांना मोहित करतं. लेखक-कलावंताच्या सर्जनाबद्दल विचार न करता त्याच्या अहंकारी किंवा डाऊन टू अर्थ वर्तनाचा गवगवा करत होत असतो. परिणामी भक्त आणि टीकाकार, अंध भक्त आणि एकांगी डोळस, अतिरेकी अविवेकी प्रशंसक आणि आततायी अविवेकी टीकाकार असे गट/पंथ/संप्रदाय निर्माण होतात आणि ते समाज माध्यम ते खाजगी चर्चा अशा विविध ठिकाणी धुमाकूळ घालत वातावरण आणखी बिघडवत असतात.

बहुसंख्य लोकांचा भ्रमनिरास करणारात सध्या मनोहर पर्रीकर हे आघाडीवर आहेत. बडबड करण्याच्या बाबतीत दिग्विजयसिंह, कपिल सिब्बल, आझम खान, गेला बाजार- महादेव जानकर, विनोद शेलार अनुराग कश्यप, सलमानखान अशा वाचाळवीरांना मागे टाकण्याचा चंगच जणू पर्रीकर यांनी बांधला आहे. ते देशाचे संरक्षण मंत्री आहेत आणि गोव्याचे मुख्यमंत्री होते. थोडसं विषयांतर होईल तरी नमूद करतोच- मनोहर पर्रीकर आणि शरद पवार यांच्यात एक साम्य आहे. दोघेही कुठेही असोत त्या दोघांचाही जीव त्यांच्या राज्यात गुंतलेला असणं, हे ते साम्यस्थळ आहे! पवार यांना दिल्लीत जायचं होतं ते पंतप्रधान म्हणून. पण, ते स्वप्न भंगलं आणि पी. व्हि. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शरद पवार (राज्याचं मुख्यमंत्रीपद सोडून) देशाचे संरक्षण मंत्री झाले तर; गोव्यात मुख्यमंत्री म्हणून राहण्याचे मनसुबे उधळल्यावर मनोहर पर्रीकर हेही संरक्षण मंत्रीच झाले, हा एक योगायोगच म्हणायचा का शोकांतिका, हे ज्याचं त्यानं ठरवावं. शरद पवार संरक्षण मंत्री झाल्यावर त्यांनी राज्याची धुरा सुधाकरराव नाईक यांच्यावर सोपविली होती. त्यावेळी मुंबईच्या ‘शरद पवार भक्त’ पत्रकारांनी एक ‘पुडी’ अशी सोडली होती की, दररोज सकाळी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे दिल्लीला फोन करुन शरद पवार यांना आज काय काय काम करायचं ते विचारतात आणि त्याची नोंद नीट स्पायरल नोट बुकात करून घेत कारभार हाकतात. ‘पुडी’ एवढ्यासाठी म्हंटलं की, नंतर याच सुधाकरराव नाईक यांनी शरद पवार यांची रीतसर राजकीय ‘शिकार’ केली होती! सध्या गोवाचे मुख्यमंत्री दिगंबर कामत असेच आदेश मनोहर पर्रीकर यांच्याकडून घेतात अशी मिडियात चर्चा आहे. हे खरं असेल तर, मुख्यमंत्र्यांना कळसूत्री बहुल्यासारखा वागवणं हेही शरद पवार आणि मनोहर पर्रीकर यांच्यातील दुसरं साम्य आहे, असं म्हणायलं हवं. पण ते असो.

मूळ मुद्दा पाकिस्तानवर भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक’संबधी मनोहर पर्रीकर यांची अलिकडची काही उलट-सुलट, वादग्रस्त विधानं हा आहे. हे विधानं त्यांचे राजकीय विरोधक आणि मिडियाला मुळीच पटलेली नाहीत; स्वाभाविकपणे पर्रीकर बेसुमार टीकेला सामोरे जात आहेत. साधं राहणं, ‘आयआयटि’यन असणं हीच प्रतिमा असलेले पर्रीकर यांनी ‘असं’ काही बोलू नये असं त्यांच्या टीकाकारांना (यात नरेंद्र मोदी विरोधक, पर्रीकर विरोधक, भाजप-संघ आणि त्यांच्या हिंदुत्वाचे विरोधक असलेले सर्वजण आले!) वाटतंय. एका राजकीय पक्षाचे प्रमुख नेते, सरकारातील प्रमुख मंत्री आणि मुख्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाळ असलेले पर्रीकर कितीही ‘मनोहर’ असले तरी इतर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांप्रमाणेच ‘लोडेड’ बोलणार हे गृहीत धरायला कुणी तयारच नाहीये. गोव्यावरच्या सुटणाऱ्या नियंत्रणातून (पक्षी : सुभाष वेलिंगकर) आलेलं वैफल्यही त्यामागचं एक कारण आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमधील सत्ताप्राप्ती गांधी घराण्याच्या स्तुतीच्या मार्गाने जाते तर भाजपतील सत्तेचा मार्ग रा. स्व. संघाच्या संमतीच्या पथावरून जातो, असं जे म्हटलं जातं, त्यातील साम्य, हे पक्ष वेगळे असले तरी नीट समजून घेतलं पाहिजे.

गेल्या महिन्यात वयाच्या पंच्याहत्तरीनिमित्त एबीपी माझाच्या कट्ट्यावर, राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे कसे बोलत होते त्याची आठवण झाली. ‘जी सत्तेची पदे मिळाली, तो तुमचा हक्कच होता त्यात कोणाची कृपादृष्टी नव्हती’ अशा आशयाचं प्रतिपादन संपादक राजीव खांडेकर यांनी केलं तरी, ती गांधी कुटुंबियांची कृपाच होती असं सुशीलकुमार म्हणत राहिले. सुशीलकुमार शिंदे यांनी कृपा म्हणणं आणि मनोहर यांनी संघाची शिकवणूक असू शकते असं म्हणणं, यात काहीही फरक नाही, हे स्पष्टपणे नमूद करायला हवं! ‘कृपा कटाक्षा’च्या बाबतीत सर्व राजकीय पक्षात राष्ट्रीय मतैक्य आहे, फक्त हा कटाक्ष टाकणारे गांधी, संघ, ठाकरे, मुलायम, मायावती, ममता, जयललिता असे आणि तो मिळवणारे बदलत जातात, हाच काय तो फरक आहे. प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसचा (घराणेशाही, भ्रष्टाचार, असंवेदनशीलता असा) कसाही असला तरी तो सुसंस्कार ठरत असेल तर रा. स्व. संघाची कथित शिकवणूक स्वयंसेवकांसाठी दुय्यमपणाची कशी ठरणार? ‘कृपा कटाक्ष’ असणारा प्रत्येकजण प्रत्येक ‘सर्जिकल स्ट्राईक’ची प्रेरणा अन्य कोणाला तरी देणं ही परंपराच आहे, हे विसरता येणार नाही.

मनोहर गोपालकृष्ण प्रभू पर्रीकर हे मुळचे गोव्याचे. त्यांचा जन्म १९५५ सालच्या डिसेंबर महिन्यात १३ तारखेला मापुसा येथे झाला. शुध्द मराठीतून त्यांचं शिक्षण मार्गोवा येथे झालं. कुशाग्र बुध्दीच्या मनोहर पर्रीकर यांनी धातू शास्त्रातील एका शाखेची पदवी मुंबईच्या आयआयटीतून संपादन केली. तरुण वयाआधीच ते संघाच्या संपर्कात आले आणि वयाच्या २६व्या वर्षीच शाखा प्रमुख झाले. शहर संघ चालक म्हणून त्यांनी रा. स्व. संघासाठी मोठं योगदान दिलं; त्यात रामजन्म आंदोलनातील त्यांच काम उल्लेखनीय ठरलं. तेव्हा गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला पर्याय उभा केला तर भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा होऊ शकतो हे पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आलं. मनोहर पर्रीकर यांचा मग संघातून रीतसर भाजपत आणि १९९४ मध्ये गोवा विधानसभेत प्रवेश झाला. मनोहर पर्रीकर यांनी पक्षाची पाळेमुळे गोव्याच्या मातीत ‘सर्व’ प्रयत्नांती रुजवली. भाजपच पहिलं सरकार गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्याच नेतृवाखाली सत्तारूढ झालं ते ऑक्टोबर २०००मध्ये पण, ते अल्प मतातलं होतं. पुढच्या निवडणुकीत पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं बहुमत संपादन केलं. ‘आयआयटिय’न असलेले मनोहर पर्रीकर हे देशातले पहिले मुख्यमंत्री. त्यांचं साधं राहणं हीच त्याची ओळख बनली आणि ‘कुशल’ राजकारणी हा गुण झाकली मूठ राहिला. त्यांच्या या साधेपणाच्या अनेक कथा दंतकथा होऊन समाज माध्यमात आजही विहार करत असतात.

‘बोल बच्चन’गिरीबद्दल मनोहर पर्रीकर तसे परिचितच आहेत. मोहम्मद अली जिना यांची तारीफ केल्यावर आणि सलग दोन लोकसभा निवडणुकात पक्षाला सत्तेत आणण्यात अयशस्वी ठरल्यावर लालकृष्ण अडवानी यांचे पंख कापण्यास परिवाराने सुरुवात केली. लोकसभेतील नेतेपद सुषमा स्वराज यांच्याकडे देऊन या पंख छाटण्याची सुरुवात झाली. मग सुरु झाला भाजपच्या नवीन अध्यक्षाचा शोध. जी तीन नावं ‘अंतिम फेरीत’ पोहोचली त्यात मनोहर पर्रीकर, मुरलीधर राव आणि नितीन गडकरी होते. पर्रीकर हे नाव फारच प्रॉमिसिंग होतं पण, पर्रीकर यांना काही गोव्याचं मुख्यमंत्रीपद सोडण्यात रस नव्हता. त्यावेळी पर्रीकर यांनी ‘अडवानी हे नासलेलं लोणचं आहे’ अशी केलेली टीका अनेकांच्या स्मरणात अजूनही आहे. थोडक्यात काय तर ‘लोडेड’ बडबड करणं ही मनोहर पर्रीकर यांची जुनी संवय आहे! गोव्यातून दिल्लीत गेल्यानं ती संवय काही बदलणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं.

मौन हे संवादाचं सर्वश्रेष्ठ माध्यम आहे हे राजकारणातले लोक लक्षात घेत नाहीत. मौनासंबधीची आचार्य विनोबा भावे यांची एक छान आठवण आहे माझ्याकडे. पूर्वी एकदा फेसबुकवर टाकली होती. ती अशी-
आधी वेळ ठरवून त्यांची मुलाखत घ्यायला एक पत्रकार परंधाम आश्रमात गेला.
विनोबा भावे यांनी पत्रकाराला विचारलं, ‘मी कोणत्या भाषेत बोललेलं तुम्हाला समजेल ?’
त्या पत्रकारानं पत्रकारितेच्या मिजाशीत उत्तर दिलं, ‘आपल्या आवडत्या भाषेत बोला’.
विनोबांच ते… त्यांनी सरळ मौन धरण केलं!
पत्रकार चक्रावला आणि भलं मोठ्ठ प्रश्नचिन्ह त्याच्या चेहेऱ्यावर उमटलं. विनोबांनी लिहून दिलं…’ मौन ही संवादाची सर्वश्रेष्ठ भाषा!’.

आपल्या देशातल्या राजकारणातले बहुसंख्य नेते (आणि मिडिया) विनोबांची ही कथा आचरणात आणणार नाही कारण, बोलणं– त्यातही एकांगी, कर्कश्श, आततायी बोलणं हा त्यांना जडलेला असाध्य आजार आहे. पर्रीकर हेही त्याला अपवाद नाही. नुसतं नाव ‘मनोहर’ असून काय उपयोग ? नावात ‘मनोहर’ असलेल्या आणि नसलेल्याही अशा बोलभांड नेत्यांचं वैपुल्यानं आलेलं पीक, हीच भारताच्या राजकारणात गल्लीपासून दिल्लीपर्यंत निर्माण झालेली खरी अडचण आहे…

प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com
​9822055799 / 9011557099
भेट द्या – www.praveenbardapurkar.com
वाचा – blog.praveenbardapurkar.com

To buy them download the Dailyhunt app from the google play store on your mobile. Select Marathi language.
search the books under – BHASYA or PRAVEEN BARDAPURKAR.

 

ई-प्रत मिळवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क साधा –

pratik.puri@dailyhunt.in

संबंधित पोस्ट