धनंजय गोवर्धने आणि अंतर्धान पावलेला परीक्षित बीडकर !

 नोंद …२३

ज्येष्ठ चित्रकार , नासिकचा अलवार वृत्तीचा धनंजय गोवर्धने माझा जीवलग मित्र आहे . धनंजय  जन्मजात सहृदय आहे . धनंजय माझापेक्षा वयाने मोठा . कलावंत म्हणून त्याचा आवाका अतिशय व्यापक . त्याच्या सहृदयतेमुळेच गेल्या ४२ -४५ वर्षांचं आमचं हे मैत्र टिकून आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही . धनंजय नासिकचा ; मी मात्र पत्रकारितेच्या निमित्तानं कायमच मुशाफिरी करीत राहिलो . कोणत्या एका गावात माझी मुळं तशी  कायमची रुजलीच नाही तरी , आमच्यातलं मैत्र अखंडीत आहे .

धनंजयची सहृदयता आणि त्याचा अलवारपणा त्याच्या चित्रातही उमटतो . अनेकदा त्याच्या सौम्य रंगछटा आपल्या मनाला व्याकुळ करुन जातात . ‘नागपूर पत्रिका’ या अस्तंगत पावलेल्या दैनिकाच्या १९८१ च्या दिवाळी अंकाचं एक कात्रण धनंजयनं अशात पाठवलं . तो ’झाडं ’ नावाचा एक लेख परीक्षित बीडकर नावाच्या लेखकाचा आहे . धनंजयनं तेव्हा त्याच्या मनात मुक्कामाला आलेल्या झाडांची असंख्य रेखाचित्र काढली होती . त्या रेखाटनांचा परीक्षित बीडकर या लेखकाला भावलेला अर्थ म्हणजे हा छोटा ललित लेख आहे . ती कात्रणं बघितली आणि स्मरणरंजनात रमलो . हा परीक्षित बीडकर नावाचा लेखकही ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाप्रमाणे कधीचाच अंतर्धान  पावलेला आहे . आता खरं सांगायला हरकत नाही , परीक्षित बीडकर म्हणजेच प्रवीण बर्दापूरकर !

एक पत्रकार म्हणून मी राजकीय वृत्त संकलनाच्या क्षेत्रात येण्याचा आधीचा तो काळ आहे . तेव्हा मी कथा , कविता एकूण लेखनाच्या क्षेत्रामध्ये आकंठ बुडालेलो होतो . कथा लेखक व्हायचं माझं स्वप्न होतं . खूप वाचत होतो . खूप लिहित होतो . इतकं लिहित होतो की , जणू लिखाणाच्या झाडावर माझा तो आकंठ विहारच सुरु होता . महत्त्वाचा भाग म्हणजे जे काही लिहित होतो ते प्रकाशित होत होतं . मराठी भाषेवर हुकमत असणाऱ्या ( पुढे बर्दापूरकर झालेल्या ) मंगला विंचुर्णे हिच्या टोकदार निकषांवर  लेखन उतरत होतं  पण , ते इतकं जास्त होत होतं की , एकाच अंकात दोन-दोन , तीन-तीन लेख माझे एकट्याचेच घ्यायचे कसे ?  मग त्यातून पर्याय निघाला टोपणनावानं लिहायचा . मी मुळचा बीड जिल्ह्यामध्ये असल्यामुळे आडनावानं बीडकर झालो मात्र परीक्षित हे नाव कुठून आलं हे आता आठवत नाही . पण , एक खरं लिहित होतो , प्रकाशित होत होतं . ते माझ्या नावानं  होतयं की , टोपणनावानं याची तमा बाळगण्याचं ते वय नव्हतं . उत्साह होता . झपाटलेपण होतं . ग्रामीण भागाशी असलेली पक्की नाळ ते नागपूरसारखं महानगर असा अनुभवाचा व्यापक पट होता . त्यातच पत्रकारितेत चांगल्यापैकी जम बसू लागलेला होता त्यामुळे लेखन होत होतं .

धनंजय गोवर्धने , तेव्हा अभियंता असलेला आणि पुढे कोयना विद्युत जल विद्युत प्रकल्पाचा मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झालेला विलास शेळके , अशात अकाली दिवंगत झालेला आमचा मित्र किशोर पाठक , शांताराम पारपल्लीवार असा हा नासिककर ग्रुप तेव्हा माझ्या गोतावळ्यात आला किंवा मी त्याच्या गोतावळ्यात गेलो असंही म्हणता येईल . तेव्हा मी चिपळूणला सागर या दैनिकात होतो आणि १९७९चा तो पूर्वार्ध होता , हे पक्कं आठवतं .  विलास शेळकेचा ‘कॉलम’ नावाचा एक छोटासा ( त्याचा उल्लेख तेव्हा मी चिमणीएवढा असा करत असे ! )  कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झालेला होता आणि त्याची अभियांत्रिकी शैलीनं केलेली मांडणी त्या काळात बराच चर्चेचा विषय ठरलेली होती . तो कवितासंग्रह सदा डुंबरेनं मला दाखवला . सदाची आणि माझीही नुकतीच ओळख झालेली होती . सदा तेव्हा ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचा मला वाटतं , कार्यकारी संपादक होता . तेव्हा किशोर कुलकर्णी तेथे वृत्त संपादक होता आणि सदा डुंबरेमुळे हा मैत्रीचा परीघ अधिक वाढत गेला . पुढे नासिकहून विलास शेळकेची बदली कोकणात अलोऱ्याला झाली . घाटाच्या मध्यावर वसलेली ते वस्ती होती .  सिंचन खात्यात कुठलं तरी कार्यालय होतं . आमची म्हणजे विलास शेळके , धनंजय गोवर्धने , किशोर पाठक मधली घसट अधिक वाढली .  ते दिवस साहित्यानं भारावणारे जसे असतात तसे होते .

धनंजय पहिल्या भेटीतच मला भावला . तसा तो अबोलच तर मी अखंड बडबड करणारा . दुसरा भाग म्हणजे तो निर्व्यसनी तर आमचं अग्निहोत्र कायम पेटलेलं . तरी आमचे सूर जुळले . लहानणापासूनच मला चित्राची ओढ होती . जरा का असेना , रंगभान होतं . त्यामुळे धनंजयशी सूर जरा जास्तच जुळले . पुढे मी चिपळूणहून नागपूरला गेलो . ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकात रुजू झालो . वार्ताहरकी करता करताच रविवार पुरवणीचीही जबाबदारी मंगलासोबत माझ्याकडे आली आणि लेखन तसंच मांडणीचे अनेक प्रयोग त्यात करण्यात आले . त्या अनेक प्रयोगात दूरदेशी असणारा धनंजय गोवर्धने हा माझा कट्टर पाठीराखा होता .

आपल्या देशातलं मुद्रणाचं तंत्र तेव्हा आतासारखं विकसित झालेलं नव्हतं . हातानं अक्षर  जुळणी किंवा मोनो/लायनो टाईप अशी अंकाची सगळी जुळवणी असायची . चित्रांचे ब्लॉग असायचे आणि हा मेळ जुळवून आणणं आताच्या तुलनेत त्या काळात फार कठीण होतं . दळणवळणाची यंत्रणाही फारशी विकसित झालेली नव्हती . तरीही आधी पत्र पाठवून किंवा एखादा फोन करुन धनंजयकडून मी चित्र मागवून घेत असे . एकदा तर , १९८२च्या  दिवाळी अंकाच्या वेळी  , आम्हाला मुखपृष्ठासाठी ज्या चित्रकारानं चित्र देण्याचं कबूल केलं होतं त्याने एनवेळी नाही म्हटलं . मी टाकोटक दादर एक्सप्रेस गाठली आणि नासिक रोडला उतरुन धनंजयच्या घरी हजर झालो . अचानक येण्याचं खरं कारण सांगितलं आणि धनंजयनं ते मोठ्या ममत्त्वाने समजूनही घेतलं . त्या काळी रंगीत मुद्रण ही एक फार मोठी प्रक्रिया होती . त्याची स्लाइड करावी लागायची .  मग वेगवेगळ्या रंगाच्या त्या छटा स्वतंत्रपणे मुद्रीत होत असत . त्याचा एकत्रित परिणाम दिसायला बराच मोठा कालावधी लागत असे . लागोलाग रात्रीच्या गाडीने तिथून मी नागपूरला परतलो . रेल्वे स्टेशनवरुनच कार्यालयात गेलो . धनंजयनं दिलेलं मुख्यपृष्ठ आम्ही अंतिम केलं आणि ते छपाईला पाठवून मगच मी घरी गेलो . असे ते छान भारावलेले दिवस होते .

पुढे मी राजकीय वृत्त संकलनात आलो . ज्येष्ठ संपादक माधवराव गडकरी यांनी मला तिकडे कसं ढकललं आणि मग मी तिकडे कसा रमलो याबद्दल मी आधीच लिहिलेलं आहे . पण , राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आलो आणि माझ्यातला ललित लेखक हळूहळू पुसट होऊ लागला . सर्वांत आधी मी दुरावलो ते कवितेपासून . आता नामवंत असणारे त्या काळातले बहुतेक सर्व नवोदित कवी , कवयित्री छान परिचयाचे होते . त्या काळात मीही कविता करत असे . माझ्या काही कविता बऱ्यापैकी प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशितही झालेल्या होत्या पण , आता हे सर्व स्वप्नवत वाटावं असं आहे .

राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आलो . राज्यात , देशात , ठिकठिकाणी फिरणं सुरु झालं . संचार सुरु झाला . माणसं भेटू लागली . अनेक अनुभव अंगावर येऊन आदळू लागले . अनुभव आदळण्याची गती भोवंडून टाकणारी होती . मग म्हणजे साधारण १९८४च्या डिसेंबरपासून असं वाटू लागलं की आपण जे काही लिहितो आहे ते फारच अपुरं , अपूर्ण आहे , व्यक्त होण्यात आपण कमी पडतो आहोत . आपलं अनुभव विश्व संकुचित आहे आणि जगात त्याच्यापलिकडे आणखी खूप काही आहे . शिवाय दुसरा एक भाग असा की , आपण जे लिहितो त्यापेक्षा अधिक चांगलं लिहायला पाहिजे अशी जाणीव टोकदार व्हायला लागली . काव्यलेखन हा आपल्या जगण्याचा श्वास व्हायला पाहिजे , ही जाणीव झाली आणि कवितेपासून मी दुरावलो . असंच काहीसं अन्य ललित लेखनाबद्दल झालं आणि ही प्रक्रिया २००० पर्यंत पुढे सुरु राहिली . पण , या सगळ्या प्रवासामध्ये जसा अचानक अवतरला तसा अचानक अंतर्धान पावला तो सगळ्यात पहिले परीक्षित बीडकर . परीक्षित बीडकरच्या जन्माची आणि अंतर्धान पावण्याची कथा ही अशी आहे . धनंजय गोवर्धनेनं पाठवलेल्या कात्रणाच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा आठवली .

२००० नंतर मी पुन्हा पत्रकारितेत लेखनाकडे वळलो . पण , हे विधानही काही तितकंसं बरोबर नाही . तसं तर मी फार काही ललित लेखन केलं नाही . एक मात्र झालं २००० नंतर माझं जे काही लेखन मग ते राजकीय अनुभवांशी संबंधित असो , राजकीय भाष्य असो किंवा त्याच्या अनुषंगाने झालेलं अन्य काही लेखन असो किंवा आत्मपर लेखन असो ; त्या लेखनात रुक्षपणा न येता थोडासा ललित बाज आला . एकदा असाच प्रदीप वर्मा आणि दिलीप चावरे यांच्याशी आमच्या औरंगाबादच्या  घरी गप्पा सुरु होत्या . कुठली तरी आठवण निघाली आणि मी ज्या पद्धतीनी रंगवून सांगितली तेव्हा प्रदीप वर्मा म्हणाला, ‘तू हे सर्व ज्या शैलीत सांगतोय त्या पद्धतीनं लिहित का नाहीस ? या चांगल्या वृत्तकथा होऊ शकतात .’ मी ते हंसण्यावारी नेलं कारण एव्हाना पत्रकारितेच्या धबडग्यात अन्य लेखन विसरुनच गेलेलो होतो . बातमी , वृत्त लेखन , वृत्त विश्लेषण , रिपोतार्ज , लेख यांच्यातच रमून गेलो होतो . नंतर बेगम मंगला आणि ‘स्वामी’ श्याम देशपांडे , औरंगाबादकर यांनी मात्र जोरदार पिच्छा पुरवला . हे दोघं जण इतके मागे लागले की , कधी कधी त्या दोघांचा रागही येत असे पण , त्यामुळे एक झालं की, प्रदीप वर्मा ‘लोकप्रभा’चा संपादक असताना त्याच्या शेवटच्या कालखंडात काही दीर्घ वृत्तकथा लिहून झाल्या . आठ-दहा महिने तो वृत्तकथांचा कॉलम चालला आणि मग लिखाणाची लय सापडली . पुढे ‘डायरी’ हे अनुभव कथन  स्तंभाच्या रुपात आलं .

डायरीबद्दलही एकदा लिहिलंय पण, पुन्हा सांगतो , ‘लोकसत्ता’त डायरी हा स्तंभ आता एबीपी माझाचा संपादक असलेल्या राजीव खांडेकरनी सुरु केला आणि सगळ्या वार्ताहरांनी त्यांचे किमान एक-एक तरी अनुभव महिन्यातून लिहावे असं काहीसं ठरलं . पण , पत्रकारितेच्या धबडग्यात वार्ताहरांचं जे होतं तेच आमच्याकडेही झालं . सगळे जण गारठळले आणि मी एकटाच लिहू लागलो . त्यात राजीव लोकसत्ता सोडून वृत्त वाहिनीत गेला आणि त्या पानाच्या नवीन प्रमुखाला म्हणजे , निवासी संपादक सुधीर जोगळेकर याला   असं वाटलं की , ‘डायरी‘ हा स्तंभ माझाच आहे आणि डायरी स्तंभ वर्षभर चालवता आला . पुढे त्याचा दुसरा भाग ‘लोकप्रभा’त लिहिता चालवता आला . पुढे  लेखनाच्या या धूनमध्येच व्यक्तिचित्र लिहून झाली वगैरे वगैरे .

सांगायचं तात्पर्य हे की , परीक्षित बीडकर जरी अंतर्धान पावला तरी , प्रवीण बर्दापूरकर मात्र जिवंत राहिला . धनंजय गोवर्धनेनं पाठलेल्या त्या कात्रणामुळे परीक्षित बीडकर असा समोर येऊन उभा ठाकला , तेच या नोंदीचं कारण .

© या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत 

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com /  praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट