– तो मोबाईल वापरत नाही.
– तो भ्रष्टाचार करत नाही आणि इतरांना करू देत नाही.
– तो नियम पाळतो आणि इतरांनीही ते पाळावेत असा त्याचा आग्रह करतो.
– तो ज्या संघटनेसाठी काम करतो तेथून एकाही पैशाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ घेत नाही; म्हणजे प्रवास किंवा कार खर्च नाही..मानधन काही नाही.
– आर्थिकदृष्ट्या अत्यंत सुखवस्तू, मोठा वकील आणि अत्यंत मोठ्या-महत्वाच्या पदावर असूनही दोस्तांसोबत तो टपरीवर आरामात डेरा टाकू शकतो.
– एकदा एखादी बाब एकदा का पटली तर, कोणी कितीही दबाव आणला तरी तो बदलत नाही.
– थोडक्यात काय तर, जगाला फाट्यावर मारून स्वत:च्या अटींवर जगणारा तो एक आहे.
– डोईवरचे मागे वळवलेले केस, सुखक्लांत स्थूलतेकडे झुकलेली शरीरयष्टी, विशेषत: वरचा ओठ काहीसा विलगत बोलण्याची शैली आणि समोर कोणीही असला अन अंगावर आला तर, त्याला शिंगावर घेण्याचा स्वभाव असणाऱ्या हा माणसाचं नाव आहे शशांक मनोहर!
– जगातल्या धनाढ्य समजल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचा तो नुकताच दुसऱ्यांदा अध्यक्ष झालाय! पहिल्यांदा अध्यक्ष होईपर्यंत त्याच्याकडे पासपोर्ट नव्हता.
अत्यंत किचकट वाटणारं न्यायालयीन वृत्तसंकलनाचं काम मी ८०च्या दशकाच्या सुरुवातीला सुरु केलं ते अविनाश गुप्ता आणि सुबोध धर्माधिकारी या (आता मोठं प्रस्थ असलेल्या) दोस्तयारांमुळे. सुबोध धर्माधिकारी आणि अविनाश गुप्तामुळे मला नवे अनेक मित्र बारमध्ये भेटले त्यात शशांक मनोहर हा एक. तसा शशांक वयाने आम्हा तिघांनाही धाकटा पण, तो सुरुवातीपासूनच अगदी बरोबरीच्या नात्याने वागू लागला; अविनाश आणि सुबोध प्रमाणेच तोही मला ‘प्रव्या’ म्हणून संबोधू लागला. (काहीसा फटकळ वाटणारा) हा धीटपणा ही मनोहर घराण्याची खानदानी परंपराच आहे!
देशातील समकालीन विधि व्यवसायात विलक्षण निष्णात म्हणून नावलौकिक आणि दबदबा संपादन करणाऱ्या सोराबजी, जेठमलानी, राजेंद्रसिंह यांच्यात एक ठळक असलेल्यात व्ही. आर. मनोहर यांचं नाव आहे. त्यांची स्मरणशक्ती आणि जमिनीवर पाय रोऊन असणं, दंतकथा ठरलेलं आहे. मनोहर कुटुंब नागपुरातील बडं प्रस्थ. आर्थिकदृष्ट्या अत्यंत सुस्थिर असूनही सुविद्य आणि महत्वाचं म्हणजे सुसंस्कृत. वागायला एकदम डाऊन टू अर्थ. परखडपणा हा मनोहर कुटुंबाचा खणखणीत ऐवज! नागपूरच्या कला, क्रीडा, साहित्य, संगीत जगताला कोणताही गाजावाजा न करता, व्यासपीठावर न वावरता; उत्तेजन देणारं हे कुटंब आहे. वडील व्ही. आर. मनोहर यांच्याप्रमाणेच वकिली आणि क्रिकेट या दोन्ही आघाड्यांवर शशांक धडाकेबाज फलंदाजी करतो आहे. दुसरा मुलगा सुनील हाही वडिलांचा कित्ता गिरवत वकिलीत आहे ; राज्याचा महाधिवक्ता म्हणून त्याची नियुक्ती झाली होती पण, ते पद त्यानं सोडलं; (न पटणाऱ्या ठिकाणी राहायचं नाही हा मनोहरी बाणा, दुसरं काय ?) त्या जागी आता श्रीहरी अणे आले आहेत. मनोहरांची कन्या उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आहेत.
हायकोर्ट बार असोशिएशनच्या राजकारणात एकेकाळी एखाद्या सदस्यासारखा मी सक्रीय होतो. त्यामुळे शशांकशी नियमित संपर्क येईच. नागपूरच्या वास्तव्यात आमचा डेरा टुमदार वसंत नगरातील एका छोट्या बंगलीच्या तळमजल्यावर होता. घराचं अंगण ओलांडलं की रस्ता आणि रस्त्याला लगडूनच धनवटे महाविद्यालयाचं क्रिकेट मैदान आहे. क्रिकेट खेळायचं वय ओलांडून वकिली आणि क्रिकेट व्यवस्थापनाच्या क्षेत्रात म्हणजे विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या माध्यमातून देशाच्या क्रिकेट राजकारणात स्थिरावल्यावर, या मैदानावर शशांक मनोहर अनेकदा जलदगती गोलंदाजीच्या सरावासाठी.. खरं तर गोलंदाजीची खुमखुमी जिरवायला येत असे… अजूनही येतो. या मैदानावर आमच्या भेटी होत.
या मैत्रीला साक्षी ठेऊन सांगतो, ‘कामाला चोख आणि वागायला रोखठोक’ असं शशांकचं स्वभाव वैशिष्ट्य आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेचं जामठा येथे उभारलेलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं, अत्यंत देखणं स्टेडियम हे शशांकच्या चोखपणा आणि चोखंदळचं अप्रतिम उदाहरण आहे. इतक्या कमी रकमेत, ठरलेल्या वेळेत आणि दर्जाशी कोणतीही तडजोड नसलेला प्रकल्प इतक्या कमी किंमतीत उभारला जाऊ शकतो यावर सध्याच्या काळात विश्वास बसणं कठीण आहे. कोणताही प्रकल्प ‘असा’ उभा राहू शकतो, या सार्वत्रिक राष्ट्रीय समजाला छेद म्हणजे हे स्टेडियम आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियन खेळाडू या मैदानावर पहिल्यांदा आले आणि त्यांनी आश्चर्यानं तोंडात बोटंच घातली. खरं तर हे देखणं स्टेडियम उभारताना पाच-पन्नास कोटी इकडे-तिकडे करता आले असते पण, मनोहर खानदानाची ती परंपरा नाही हेच खरं!
पहिल्यांदा बीसीसीआयचा अध्यक्ष झाला तेव्हा शशांकचा आलेला एक अनुभव आवर्जून शेअर करायला हवा असा आहे. क्रिकेटबाहेरच्या खेळाडूंना प्रतिभाशाली उदयोन्मुख शिष्यवृत्ती म्हणून मोठी रक्कम देण्याचे बीसीसीआयने ठरवलं. त्या यादीत आता ‘फुलराणी’ म्हणून ओळखली जाणारी सायना नेहवाल आणि एका महाराष्ट्रीयन-मराठी खेळाडूत चुरस होती. अर्थात हे काही मला माहिती नव्हतं. एक दिवस माझे एक सिनियर म्हणाले, ‘शशांक मनोहर एक काम करतील का ?’ मी म्हणालो, ‘सांगून बघतो. जेन्युईन कारण असल्याशिवाय तो काही माझा शब्द डावलणार नाही. तसा काही त्याचा स्वभाव नाहीये’. एक काम सांगणार आहे असं मग मी शशांकच्या कानावर घातलं. काही दिवसांनी त्या मराठी खेळाडूचे संबधित कागद माझ्याकडे आले. क्रीडा विभागातील ज्येष्ठ सहकारी उदय रंगनाथ याच्या हस्ते मी ते शशांककडे पोहोचवले.
– लगेच शशांकचा फोन आला. तो म्हणाला,‘प्रव्या हे काम होणार नाही.
– मी विचारलं,‘कारे? माझ्या बॉसनं पहिल्यांदाचा काम सांगितलंय रे मला’, मी कळवळून म्हणालो.
– शशांक म्हणाला, ‘तुझा बॉस जे नाव सजेस्ट करतोय त्यापेक्षा मेरीटवर सायना नेहवाल जास्त प्रतिभावान आहे. मी नाही सायनाला डावलून दुसऱ्या कोणासाठी वजन वापरणार!’
-‘माझा बॉस काय म्हणेल शशांक ?’ मी विचारलं तर गडगडाटी हंसत शशांक म्हणाला, ‘खड्ड्यात जा तुम्ही दोघंही!’ नंतर सायनाने काय इतिहास घडवला हे सर्वांनाच ठाऊक आहे.
दुसरी एक घटना फारच नाजूक आहे. भारतात झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत माझ्या एका सहकाऱ्याला अत्यंत गंभीर स्वरूपाचे चुकीचे वर्तन केल्याबद्दल आयसीसीने नोटीस बजावली. नोटीसीची प्रत त्याला तसंच इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाच्या व्यवस्थापनाला पाठवली. या सहकाऱ्यानं मुंबई आवृत्तीच्या संपादकाची सही घेऊन अधिस्वीकृती परस्पर मिळवलेली होती, त्याबद्दल मला याबद्दल काहीच माहिती नव्हती पण, त्याचा ‘बॉस’ आणि ‘reporting authority’ मी असल्यानं व्यवस्थापनानं ती नोटीस पुढील कारवाईसाठी माझ्याकडे पाठवली आणि त्या सहकाऱ्याने केलेली लबाडी उघडकीस आली. प्रकरण फारच गंभीर होतं आणि त्याच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आलेली होती. तो सहकारी मला भेटला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं पण, त्या नोटीसची प्रत मला मिळालेली आहे हे त्याला ठाऊक नव्हतं! या प्रकरणी ‘शशांक मनोहर आणि शरद पवार हे दोघेच मदत करू शकतात’, असं तो म्हणाला. डी.लिट.समकक्ष गोपाल सन्मान हुकल्यापासून शरद पवार याची आणि माझी भेट..गेला बाजार मी काही वेळा प्रयत्न करूनही बोलणं नाही.
मग मी शशांक मनोहरला फोन केला. त्या सहकाऱ्याचं नाव काढताच शशांकनं, मला माहिती होतं तुझा फोन येणार म्हणून असं म्हणत माहितीचा खजिनाच उघड केला. सरावाच्या दरम्यान एका परदेशी खेळाडूकडून एक कागद एका प्रेक्षकाकडे पोहोचवताना हा सहकारी सी.सी. टीव्हीच्या फुटेजमध्ये सापडला. ही अतिशय गंभीर बाब होती आणि नागपूरची ही घटना आयसीसीच्या कॅमेराने टिपून थेट दुबईला मुख्यालयात पोहोचवलेली होती. अधिस्वीकृती मिळवण्यासाठी केलेल्या अर्जासोबत जोडलेल्या फोटोवरुन या माझ्या सहकाऱ्याचा शोध घेण्यात आलेला होता आणि त्याच्याविरुद्ध केस मजबूत होती.
ही माहिती मी माझ्या त्या सहकाऱ्याला सांगितली. त्याचं म्हणणं होतं की, एका प्रेक्षकाने विनंती केली म्हणून त्या खेळाडूचा ऑटोग्राफ घेऊन, नेऊन दिला त्या प्रेक्षकाला. त्याच्या पुढच्या सांगण्यातून बऱ्याच बाबी स्पष्ट झाल्या. महत्वाचं म्हणे ही नोटीस देण्याआधी आमच्या गड्याचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं होतं ; मात्र त्या चौकशीच्या काळात सर्व काही स्वबळावर निभावून नेता येईल याची खात्री असल्यानं तो कोणाशीच काहीही बोलला नव्हता.
मी पुन्हा शशांकला फोन केला, ‘प्रव्या, प्रकरण फारच हाताबाहेर गेलंय. तो परिसरात दिसला तरी त्याला गार्डस उचलतील अशा सूचना आहेत. दुसरं म्हणजे, तुझ्या या पत्रकारानं आम्हाला फारच त्रास दिलाय. आमची मंडळी (म्हणजे विदर्भ क्रिकेटचे पदाधिकारी) त्याला धडा शिकवण्यासाठी संधीच्या शोधातच होते… वगैरे बरंच काही शशांकनं सांगितलं आणि मित्र म्हणून या विषयावर कोणतीही गळ मी घालू नये असं अगदी स्पष्टपणे सांगितलं.
सहकाऱ्याने माफी मागितली असून संबधितांशी बोलून त्याच्याविरुद्ध होणारी कारवाई आयसीसीने टाळली आहे असा बचाव करून त्याची नोकरी तर वाचवतो असं मी शशांकला सांगितलं; त्यावर ‘तुला जे करायचं ते कर’, असं म्हणत कारवाईबाबत ठाम राहण्याच्या भुमिकेपासून त्याने काही माघार घेतली नाही. प्रत्यक्षात मी त्या सहकाऱ्याकडून काही माफीनामा घेतला नाही, ‘माफीनामा नंतर पाठवतो’, असं उत्तर एचआरला देऊन मी वेळ मारून नेली. सामने संपले की विषय बाजूला पडेल हा माझा होरा होता शिवाय, ३१ मार्चला लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीच्या संपादकपदाचा राजीनामा द्यायचा माझा निर्णय झालेलाच होता; कोणाची नोकरी जाण्यास मी निमित्तमात्र ठरणार नव्हतो.
विदर्भ क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष असताना शशांकच्या चोख कारभाराचा बोलबाला सुरु झाला. त्यामुळे काही माणसं दुरावली असतील पण त्याची प्रतिमा मात्र क्रिकेटच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उजळून निघाली. पहिल्यांदा आणि आता दुसऱ्यांदाही अध्यक्ष होण्यात ‘तो पवार गटाचा आहे’, यापेक्षा ही चोख प्रतिमा जास्त उपयोगी ठरली यात शंकाच नाही. ज्या जगमोहन दालमियांच्या मृत्यूने ही खुर्ची रिकामी झाली होती त्या दालमिया यांची अध्यक्षपदी निवड होण्याच्या काळात मी दिल्लीत होतो. दिल्ली आणि कोलकातातील बहुतेक सर्व इंग्रजी, हिंदी, बंगाली दैनिकात शशांकच स्वच्छ प्रतिमेमुळे आणि चोख कारभारामुळे पुन्हा अध्यक्ष होण्यास लायक आहे अशा बातम्या झळकत असत. सलग सात-आत दिवस बातम्या वाचल्यावर एक दिवस सकाळी शशांकला फोन केला आणि म्हटलं, ‘तुझं एवढं कौतुक वाचताना मजा येते यार. अभिमानही वाटतो’. त्यावर, ‘काय झालं सकाळी सकाळी ?’ असं त्यानी विचारल्यावर मी त्याच्याविषयी आलेल्या बातम्यांबद्दल सांगितलं. दुसरा एखादा असता तर खूष झाला असता पण शशांक म्हणाला, ‘मी होणार नाही अध्यक्ष. आधीच क्लियर केलंय मी. ही स्तुती बोगस आहे बे. आपलं रोखठोक वागणं काही त्यांना पटत नाही. दालमियाला विरोध करायला म्हणून माझं नाव पुढे करतायेत हे लोक’.
आयपीएलमधील गैरव्यवहार, स्पॉट फिक्सिंग, बाजारीकरण अशा अनेक समस्या भारतीय क्रिकेटसमोर आहेत. पाकिस्तानशी सामने हा कळीचा मुद्दा आहे. यावर ‘कामाला चोख आणि वागायला ठोक’ असणारा शशांक कसा मार्ग काढतो हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
शशांकला शुभेच्छा!
-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
English version – http://gvktheblogger.blogspot.in/2015/11/blunt-and-straightforward-shashank.html