श्याम देशपांडे नावाचा बुकमार्क…

प्रतिभावंत नाटककार आणि ललित लेखक महेश एलकुंचवार यांच्या ‘नेक्रोपोलीस’ या लेखात to join the majority हा शब्दप्रयोग वाचनात आला होता . ‘मरणे’ असा त्याचा अर्थ . या विश्वात हयात  असणाऱ्यांपेक्षा मृतांची ( मृतात्म्यांची म्हटलं  तरी चालेल ) संख्या जास्त असते म्हणून मरणाऱ्याने जिथे बहुसंख्य आहेत त्या जगात  प्रवेश केला , असं मानलं जातं  . याचा अर्थ ‘स्वामी’ श्याम देशपांडे बहुसंख्यांच्या  सहवासात गेला असून तिथेही तो ग्रंथ प्रसारचं काम आजवरच्या उत्साह , निष्ठा आणि निरलसपणे चालू ठेवेल यात शंका नाही ; अशी स्वत:च्या मनांची  समजूत घातली म्हणून काही श्यामच्या मृत्यूचं समर्थन होणार नाही . कारण आजवरच्या माझ्या तरी साडे-सहापेक्षा जास्त दशकांच्या जगण्यात इतका सज्जन तसंच  निरपेक्ष वृत्तीचा माणूस पाहण्यात आलेला नाही आणि आयुष्याच्या सांजपर्वातही असा दुसरा ‘स्वामी’ श्याम देशपांडे भेटणार नाही , ही जाणीव अखेरचा श्वास घेईपर्यंत मन कुरतडत राहील .
हा मजकूर प्रकाशित असताना श्याम देशपांडे याच्या निधनाला आठ दिवस झालेले असतील . श्याम कोण होता ? तर तो काही ख्यातकीर्त लेखक , कलावंत , गायक , गेला बाजार काळे धन जमा करुन दानशूर बनलेला धनवान किंवा बाजार राजकीय नेताही नव्हता तर , तो एक मध्यमवर्गीय , सकाळच्या वरणाला संध्याकाळी फोडणी देऊन खाणारा , साधं , सरळ जीवन जगणारा पण  , मनात कुणाच्याही विषयी द्वेष , आकस , सूडबुद्धी नसणारा , कुणाशीही स्पर्धा नसणारा आणि सामाजिक जाणिवांच्या बाबतीत एक हळवा माणूस होता ; हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं म्हणजे , तो अव्यभिचारी ग्रंथ प्रसारक  होता . ग्रंथप्रसार हा त्याचा ध्यास आणि वाचन संस्कृती वैपुल्याने फुलत जावी हा त्याचा श्वास होता . वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी श्याम एक सळसळती चळवळ झालेला होता ; त्यात तो आकंठ बुडालेला होता .  खरंच सांगा , इतकी सारी गुणवैशिष्ट्ये असणारा दुसरा कुणी माणूस पाहण्यात आहे ?
गेल्या चाळीसपेक्षा जास्त वर्षांचं आमचं मैत्र श्यामने १४ ऑगस्टला एकतर्फी संपुष्टात आणलं . माझ्याइतकीच त्याची माझी बेगम मंगलाशी मैत्री होती आणि तिच्या मृत्यूशी  सुरु असलेल्या प्रदीर्घ अशा प्रवासात आमच्या कुटुंबियाच्यापाठी श्याम मूकपणे व ठामपणे उभा होता . श्यामशी माझं नातं अजून एक आहे आणि ते आहे लेखनाचं . मी पत्रकारितेत आलो १९७७ साली . राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आलो ते माधवराव गडकरींमुळे १९८४ साली आणि मग राजकीय वृत्तसंकलनाच्या त्या अवाढव्य उलाढालीत आकंठ बुडालो . मी त्या बाहेर यावं म्हणजे , बातमीच्या बाहेर यावं आणि अन्य लिखाण करावं यासाठी बेगम आणि श्याम यांनी ( वैताग यावा इतकं ) टुमणं लावलं . त्यासाठी क्वचित माझा त्रागाही सहन केला . या दोघांमुळे मी लिहिता झालो त्यालाही आता सुमारे दोन दशकं होतायेत . माझ्या लेखनाच्या निर्मितीचे सूत्रधार असलेले बेगम मंगला आणि श्याम हे दोघंही आता या जगात नाहीत…अर्थातच , श्याम माझ्या लेखनाचा कट्टर वाचक आणि सौम्य समीक्षक होता  . ‘xxxx नाही आवडलं रे’ अशा शब्दात तो त्याची नाराजी गंभीरपणे  व्यक्त करत असे  . मीही तेवढ्याच गंभीरपणे ऐकून घेतल्याचं दर्शवायचो  , मग श्यामला बरं वाटायचं  .

पुस्तकं श्यामच्या जगण्याची अभिन्न अंग होती … ( हे छायाचित्र सृजन पाटोळे यांच्या भिंतीवरुन साभार )

श्यामच्या अविश्वसनीय  मृत्यूची बातमी आल्यावर सहाजिकच मन सैरभैर झालं , अगदी नकळत अश्रू अनावर झाले . हे दोस्तयार डॉ . मिलिंद देशपांडे चांगलं ओळखून होता म्हणूनच  १४ ऑगस्टची संध्याकाळ आणि रात्र मी एकटं राहू नये असा त्याचा स्वाभाविक आग्रह होता . मी त्याला म्हटलं , ‘अशात , हा सांजवेळीचा एकांतही सवयीचा झाला आहे . कारण मी एकटा नसतो . बेगम असो का श्याम यांच्यासह जगणाऱ्याची लय बिघडवणाऱ्या अनेकांच्या अनेक जीवाभावाच्या आठवणी सोबतीला असतात . कविवर्य ग्रेस यांच्या शैलीत सांगायचं तर ,  ‘छिनाल संध्याकाळी गतकातर आठवणींचे पेटलेले मंद दिवे शोकांच्या उदासीवर मंद फुंकर घालतात .
श्याम विषयी गेल्याच वर्षी एक मजकूर २० ऑक्टोबर २०१९ रोजी मी  लिहिला होता . त्यात आमच्या मैत्री पर्वाबद्दल आलेलं आहे . ( तो सोबत जशाचा तसा देतच आहे . ) तो आणि हा मजकूर वाचल्यावर ‘स्वामी श्यामराव देशपांडे , ‘राजहंस’वाले सद्गुणांचा पुतळा होता , असं मी म्हणतोय असा गैरसमज कृपया कुणीही करुन घेऊ नये . तो माणसासारखा माणूस होता . उतावीळ होणं ,  ओंजळीतला दिवा विझू नये इतक्या कटाक्षानं प्रकृतीची काळजी घेणं , हा त्याचा स्थायीभाव झालेला होता . त्याला समोरच्याचा अनेकदा राग येई . तो अनेकदा ( नाहक ) अस्वस्थही होत असे . पाच-साडेपाच वर्षांपूर्वी एका ओल्या गच्च संध्याकाळी गप्पा मारत असताना मित्र वर्तुळातील एकाने हेटाळणीयुक्त ‘पुस्तकविक्या’ अशा केलेल्या उल्लेखामुळे श्याम खूप व्यथित झाला होता ; हे सांगताना त्यांचे डोळे त्याच्या नकळत  गद्दार झालेले होते . खरं तर , शब्दांवरच्या अकृत्रिम प्रेमामुळे त्याने चांगली नोकरी सोडून जाणीवपूर्वक पुस्तक विक्रेत्याचा मार्ग निवडला होता . श्यामच्या डोळ्यांत आलेले अश्रू अंगावर शहारा उमटवणारे होते  पण , दोन दिवसांनी त्याच  मित्राला हवं ते पुस्तक मिळवून देण्यासाठी श्यामची धडपड पाहिली आणि श्याम किती , सज्जन , निरागस , अनाकस वृत्तीचा माणूस आहे याची खात्री पटली , अशी माणसं दुर्मीळच  !
श्याम  लोकशाहीवादी होता . सामाजिक समतेवर त्याची श्रद्धा होती तरी त्याच्याभोवती विविध जाती-उपजाती-पोटजाती-पोटपोट जाती , धर्म आणि राजकीय विचाराचे लोक जमा झालेले होते . ही मांदियाळी हे श्यामच्या आजवरच्या ग्रंथ असोशीच्या व्रताला आलेलं फळं होतं . इतकं चांगल राहाणं आपल्याला काही जमणार नाही . म्हणूनच श्याम देशपांडे हा कोणतीही औपचारिकता , विधी , अवडंबर , पदमोह नसलेला , मित्रांच्या हृदयातला स्वामी होता . त्याचं हे स्थान त्याच्या मित्रांच्या मनात अबाधित राहील .
■■ २० ऑक्टोबर २०१९ रोजी  लिहिलेला मजकूर ■■
चांगली माणसं हृदयाच्या गाभाऱ्यात आणि चांगली पुस्तकं स्मरणात ठेवावीत असं माझं म्हणणं आणि वागणंही असतं . मात्र , या दोन्ही ठिकाणी साठवून ठेवावी अशी माणसं कमी असतात ; त्यात एक ‘स्वामी’ उपाख्य श्याम उपाख्य श्यामराव देशपांडे , ‘राजहंस’वाले , औरंगाबादकर आहे . औरंगाबादला श्याम आणि प्राचीन दोस्त निशिकांत भालेराव यांनी एक अनौपचारिक अशा स्वरुपाचा ‘संडे क्लब’ सुरु केलेला आहे . कांही पत्रकार , साहित्यिक , विचारवंत , प्राध्यापक रविवारी सकाळी भेटतात आणि कधी गंभीर तर कधी फुटकळ चर्चा करतात , कधी औरंगाबादच्या भेटीवर आलेल्या पाहुण्याला बोलावलं जातं . दिल्ली सोडून औरंगाबादला स्थायिक झाल्यावर मीही या क्लबचा कथित सदस्य झालो . संडे क्लबच्या जागेला मी मठ म्हणतो . त्या मठाचे ‘स्वामी’ म्हणून श्याम देशपांडे याचा उल्लेख करायला सुरुवात केली . आता या मठाचं आणि श्यामराव देशपांडे यांचं ‘स्वामी’पद सर्वमान्य झालेलं आहे !
स्मरणांच्या झरोक्यातून डोकावत सांगायचं तर ,  उंचीला साजेसा शेलाटा बांधा आणि गौरवर्ण असलेल्या श्यामची माझी पहिली भेट अंबाजोगाईला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झाली ; म्हणजे त्याला आता साडेतीनवर दशकं उलटून गेली . याच संमेलनात कोलकात्याहून आलेल्या वीणा आलासे , पुण्याहूनआलेले  ह. मो. मराठे , नागपूरहून आलेले प्रकाश देशपांडे आणि मी असे चौघं , कानात वारं शिरल्यासारखं हुंदडलो . नंतर त्यात श्यामही सहभागी झाला . तेव्हा नागपूरच्या ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मी मुख्य वार्ताहर होतो आणि रविवार पुरवणीसाठी ( पुढे माझी पत्नी झालेली ) मंगला विंचुर्णे हिला सहाय्य करत असे . आमच्या ‘साकवि’ ( साहित्य , कला , विज्ञान यांचं लघु रुप ) पुरवणीसाठी तेव्हा विदर्भातले ज्येष्ठ कवी , यवतमाळ जिल्ह्यातील पोहंडूळचे नीलकंठ देशपांडे  लेखन करत . ते श्यामचे मोठे भाऊ , हे कळल्यावर श्यामशी जवळीक निर्माण झाली आणि उत्तरोत्तर ती वाढतच गेली . श्याम माझ्यापेक्षा अडीच वर्षांनी मोठा पण या जवळीकीमुळे आम्ही लगेच ‘अरे-तुरे’वर आलो .
पत्रकार , लेखक , ग्रंथ परिचयक , वाचक , संघटक आणि मित्र अशा विविध रुपात वावरणाऱ्या तसंच याही वयात देखणं हस्ताक्षर असलेल्या श्यामनं वाणिज्य शाखेत पदवी घेतली . ग्रंथालय शास्त्राचा अभ्यासक्रम केला . औरंगाबादच्या सुरुवातीच्या काळात एका संस्थेत त्याला खरं तर ‘ग्रंथपाल-संशोधन सहायक’ अशी चांगली नोकरीही होती . पण, श्याम म्हणजे स्तकं तन आणि मनात पुस्तकं भिनलेला माणूस आहे . अतिशय चांगला वाचक असणाऱ्या या माणसाला पुस्तकांविषयी ममत्व आणि योग्य पुस्तक योग्य वाचकापर्यंत पोहोचवण्याची उर्मी ( याला पर्यायी शब्द खाज असाही असू शकतो ! )  होती . त्या उर्मीपोटी श्यामरावनं औरंगाबादला तेव्हा नुकत्याच सुरु झालेल्या विद्या बुक्समधे काम सुरु केलं . नंतर श्यामराव ‘राजहंस’च्या औरंगाबाद शाखेत रुजू झाले , त्याला आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत . वृत्तीनं लाघवी , भरपूर वाचन आणि पुस्तक व संदर्भ देण्यासाठी ( अगदी झोपेतही ) तत्पर असल्यानं मराठी साहित्य क्षेत्राच्या लेखन , मुद्रितशोधन , मुद्रण , वितरण आणि वाचक अशा अशा क्षेत्रात श्यामनं या काळात अगणित माणसं महाराष्ट्रभर जोडली . महाराष्ट्रभरातले हे लहान-थोर सर्व हीच श्यामरावांची स्थावर मालमत्ता आहे .
श्यामनं केवळ माणसं जोडली नाहीत तर अनेकांची वाचनभूक ( अनेकदा पदरमोड करुन ) भागवली . वाचक आणि पुस्तक यांच्यातला श्याम दुवा आहे त्याशिवाय त्याला दुसरं कांही सुचतच नाही असा हा दुवा बळकट आहे . मराठीत कुणाचं नवीन कोणतं पुस्तकं आलंय , त्याची मांडणी कशी आहे , शैली आणि आशयाच्या बाबतीत ते किती दर्जेदार आहे आणि ते केवळ वाचलं पाहिजे की विकत घेऊन वाचून संग्रहात ठेवलं पाहिजे , हेच विचार आमच्या श्याम मनात आणि

संडेक्लबच्या एका कार्यक्रमात डावीकडून श्याम देशपांडे . डॉ . सुधीर रसाळ , नरेन्द्र उपाख्य नानासाहेब चपळगावकर आणि  रा. रं . बोराडे

बोलण्यातही कायम भुंगा घालत असतात . मराठी पुस्तकांच्या बाबतीत श्याम संदर्भाच्या शोधात नसतो तर संदर्भ मागणाऱ्यांच्या शोधात असतो . वाङ्मयीन व्यवहाराच्या समीक्षकी थाटात सांगायचं तर , वाचन संस्कृती वृद्धींगत करण्याचा ध्यास घेतलेलं झपाटलेलं झाडं म्हणजे ‘स्वामी’ श्याम देशपांडे नावाचा माणूस आहे . या झाडाला असलेली पानं , आलेली फुलं आणि लागलेली फळं शब्दांचीच आहेत !
श्यामबद्दल ‘माझी वाचनभूक भागवणारा’ असं म्हणणारे महाराष्ट्रात दोन-चार खंडीभर तर नक्कीच सापडतील ! या आघाडीवर श्याम कायम दात्याच्या भूमिकेत आहे . हा श्याम देशपांडे नावाचा माणूस जर भेटला नसता तर कदाचित माझीही वाचनभूक आणि तहानही भागली नसती . मी पडलो जन्मजात भटक्या माणूस . श्याम औरंगाबादेत तळ ठोकून तर पत्रकारितेच्या निमित्तानं मी नागपूर , मुंबई , दिल्ली , औरंगाबाद असे पडाव टाकले . त्याधी पणजी , कोल्हापूर , सातारा आणि चिपळूणच्या वेशीत मुक्काम झालेले होते ते वेगळे . पत्रकारिता आणि अन्य कार्यक्रमांच्या निमित्तानं मी सतत देश आणि परदेशात फिरत राहिलो तरी श्याम नावाच्या झाडाच्या सावलीत माझं वाचन आणि पुस्तक खरेदी सुरुच राहिली .
व्याख्यान  किंवा लेखनासाठी मराठी साहित्यविषयक कोणताही संदर्भ अडला किंवा कोणतंही पुस्तक हवं असलं की  शोध घेण्याची जबाबदारी श्यामरावांच्या ओंजळीत टाकून मी पुढचा मुक्काम गाठायला  मोकळा होतो . नागपूर , दिल्ली , मुंबईत की आता औरंगाबादेत असो , आमच्याकडच्या अनेक पुस्तकांचं आगमन श्यामरावांच्या करवी झालेलं आहे …या बाबतीत श्याम किती उदार असावा तर , त्यानं मला उधारीवर , हप्तेवारीवर आणि घरपोच पुस्तक पोहोचवली . अमेरिकेत सॅनहोजे  इथं झालेल्या पहिल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनातल्या एका कार्यक्रमात मी मुख्य वक्ता होतो . त्यादिवशी मला एक संदर्भ आठवेचना . मग मी श्यामरावला तिथूनच सेलफोनमधून शरण गेलो ; संदर्भ लग्गेच मिळाला .
अशीच आणखी एक आठवण , त्या दिवशी मी व्हिएन्नाला होतो आणि तीन दिवसांनी परतल्यावर ताबडतोब रविवारसाठी एक लेख द्यायचा होता . मजकूर डोक्यात घोळत होता . त्या लेखात ‘कोट’ करण्यासाठी मला रॉय किणीकर यांच्या ‘उत्तररात्र’ मधल्या कांही ओळी हव्या होत्या आणि आमच्याकडचा तो संग्रह तर गहाळ झालेला होता . श्यामरावना हांक मारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता . मी नागपूरला परतण्याच्या आंत ‘उत्तररात्र’चं श्याममार्गे आमच्या घरी आगमन झालेलं होतं .  श्यामरावांशी संबधित संदर्भ आणि पुस्तकांच्या अशा , माझ्याच नाही तर अनेकांच्या अनेक आठवणी आहेत .
राजकीय वृत्तसंकलनाच्या मोहमयी जगात गेलो आणि माझ्यातला कथालेखक कायमचा झोपी गेला . मी कथालेखन करायचो ही एक दंतकथा असल्याचं , माझं ते लेखन वाचलेले  दोस्तयार म्हणू लागलेले होते ! सलग १८-२० वर्ष मी बातमी आणि राजकीय लेखनाच्या व्यतिरिक्त दुसरं कांहीही लिहिलं नाही . यातून कांहीशी उसंत मिळून  मे १९९८ ते मार्च २००३ या काळात मी औरंगाबादला आणि महत्वाचं म्हणजे निवांत होतो . निर्माण झालेला वाचनाचा अनुशेष भरून काढत होतो . या काळात बेगम मंगला आणि श्याम या दोघांनी ढुशा मारुन माझ्यातला लेखक जागा केला . या दोघांनी या काळात लेखनासाठी माझा जीव ‘उभं पिसं आणि नांदू कसं’ केला नसता तर ‘डायरी’ , ‘नोंदी डायरी नंतरच्या’ , ‘दिवस असे की…’ , ‘क्लोज-अप’ या पुस्तकांतील मजकुराचं लेखन आणि अनेक संपादनांची कामं  झालीच नसती  . नंतरच्याही माझ्या प्रत्येक लेखन प्रकल्पात या दोघांचा सहभाग आहेच .
लवकर ‘एक्साईट’ होणारा श्याम देशपांडे माणूस म्हणूनही खूप भला , साधा आणि कांहीसा भाबडा आहे . तो भला असणं हे महत्वाचं आहे आणि तसं असणं त्याला शोभतंही . कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करणं ही त्याची कायम तेवती खासीयत आहे . माणूस म्हणूनही तो आमच्याशी भावनात्मक ओढीनं ‘रिलेट’ झालेला आहे . आमच्याकडच्या प्रत्येक कार्यक्रमाचा तो मूक आणि सक्रीय साक्षीदार असतो . बेगम मंगलाचं स्वास्थ्य बिघडल्यापासून मी संडे क्लबला जाणं बंद केलंय . मग , श्याम रविवारी संध्याकाळी येतो . कधी त्याच्यासोबत धनंजय चिंचोलीकर उपाख्य बब्रुवान असतो . हे दोघं आले की बेगमच्या चेहेऱ्यावर हंसू उमलतं . अधून-मधून आम्हाला एखादा न जुळलेला संदर्भ सांगत ती आमच्या मैफिलीत सामील होते . आणखी एक आज सांगूनच टाकतो , श्यामची पत्नी शुभांगी वहिनीचा हात चवदार आहे . शुभांगी वाहिनीच्या  हातचे खुमासदार चवीचे अनेक पदार्थ आमच्याकडे श्यामच्या हस्ते येतात…असं बरंच कांही .
अर्थातच , श्याम माझ्या लेखनाचा कट्टर वाचक आहे आणि सौम्य समीक्षक आहे . ‘xxxx नाही आवडलं रे’ अशा शब्दात तो त्याची नाराजी गंभीरपणे  व्यक्त करतो . मीही तेवढ्याच गंभीरपणे ऐकून घेतल्याचं दर्शवतो , मग श्यामला बरं वाटतं .
पुस्तकात वाचनाची खूण म्हणून एक बुकमार्क ठेवलेला असतो . स्वामी उपाख्य श्याम उपाख्य श्यामराव देशपांडे , ‘राजहंस’वाले , औरंगाबादकर हा एक दोस्त म्हणून माझ्याच नाही तर अनेकांच्या  जगण्यातला बुकमार्कही  आहे !
-प्रवीण बर्दापूरकर
Cellphone- 9822055799
praveen.bardapurkar@gmail.com
www.praveenbardapurkar.com

-प्रवीण बर्दापूरकर

Cellphone- 9822055799

praveen.bardapurkar@gmail.com

www.praveenbardapurkar.com

 

 

 

संबंधित पोस्ट