हे केवळ ‘देवेंद्र गेले , उद्धव आले’ नाही !

|| एक ||

शिवेसेनेनं अखेर भाजपशी काडीमोड घेतला आहे ; जे १९९९मध्ये घडायला पाहिजे होतं ते २०१९मध्ये घडतं आहे . तेव्हा ते घडलं नाही हा बाळासाहेब ठाकरे यांचा उमदेपणा होता आणि भाजपचं नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या समंजस नेत्यांकडे होतं ; युती निभावण्याची जबाबदारी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या जाणकारांकडे होती . आता युतीधर्म न निभावणं घडलं आहे कारण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारख्या हुच्च नेत्यांच्या हातात भाजपची सारी सूत्रं आहेत तर या नेत्यांचा शिवसेना संपवण्याच्या चाली ओळखणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेनेचा धनुष्य-बाण आहे .

१९९९च्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे ६९ आणि भाजपचे ५६ असे एकूण १२५ उमेदवार विजयी झालेले होते ; १६ अपक्षांचा पाठिंबा गृहीत धरता युतीला सरकार स्थापन करता येणं अगदीच कांही अशक्य नव्हतं पण , पुन्हा मुख्यमंत्री सेनेचा होणार म्हणून भाजपनं तेव्हा सरकार स्थापनेचा विचारच सोडून दिलेला होता याचा विसर किमान उद्धव ठाकरे , राज ठाकरे , मनोहर जोशी आणि नारायण राणे यांना पडलेला नसावा असं गृहीत धरायला वाव आहे . यापैकी राज ठाकरे यांनी आता सवता सुभा थाटला आहे , मनोहर जोशी जवळजवळ निवृत्त झालेले आहेत आणि नारायण राणे कॉंग्रेस मार्गे भाजपत पोहोचलेले आहेत . त्यामुळे या काडीमोडाची आणि त्यासाठी भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्याची जबाबदारी एकट्या उद्धव ठाकरे यांच्यावर होती . संजय राऊत यांना पुढे करुन उद्धव ठाकरे यांनी मोठं धाडस दाखवून ती पेलली आहे . नुसतीच पेलली नाही तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी आता सूत्रे हाती घेतलेली आहेत . आजवर सत्तेपासून लांब राहणाऱ्या ठाकरे घराण्यातल्या राजकारणाची ही नवी सुरुवात आहे ; ‘देवेन्द्र फडणवीस पायउतार झाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले  इतकाच याचा अर्थ नाही तर भविष्यात राजकारणाची समीकरणे बदलू शकण्याची बीजं या महाआघाडीत दडलेली आहेत .

भाजपत वाजपेयी-अडवानी युगाचा अस्त सुरु झाल्यावर म्हणजे अडवानी यांच्या जीना स्तुतीनंतर महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी मतावर केवळ आपलाच हक्क असावा अशी भाजपची भावना प्रबळ झाली . याची सुरुवात तशी तर त्याआधी ‘शत प्रतिशत भाजप’ या घोषणेनं प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळातच झालेली होती पण , बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्यासमोर तो घोषणा फुसकी ठरली . शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या युतीचा पाया हिंदुत्व आहे आणि हाच पाया ही युती तुटण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं . याची करणं तीन एक- भाजपच्या हिंदुत्वाचा पाया किमान महाराष्ट्रात तरी उच्चवर्णीयापुरता मर्यादित तर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा पाया बहुजनांत विस्तारला . दोन- कट्टर हिंदुत्वादी असूनही मराठी अस्मितेचा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी कायम केंद्रस्थानी ठेवला आणि तीन- मराठी सांस्कृतिक क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे यांचा कलासक्त व प्रेरणादायी वावर आणि पर्यायाने शिवसेनेची पकड हे तीन मुद्दे लक्षात घेतले की भाजपचा शिवसेनेच्या मतपेटीवर का डोळा आहे हे लक्षात येतं . बाळासाहेब ठाकरे हे जनमनावर एक अद्भुत करिष्मा असणारं नेतृत्व होतं . हयात असेपर्यंत हिंदुत्व आणि मराठी हे मुद्दे भावनात्मकतेनं तेवत ठेवत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली आणि भाजपला राज्यात कायम लहान भावाच्या परिघात राजकारण करायला लावलं .

आकडेवारीचा आधार घेतला तर २००९च्या निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा भाऊ धाकटा  झाला . २०१४ नंतर नरेंद्र मोदी , अमित शहा आणि भाजपच्या राज्यातील नेत्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही . २०१४च्या विधानसभा निवडणुकीत तर युती एकतर्फीच तोडून टाकली इतका लोकसभा निवडणुकीतील विजयाचा ताठा भाजपला आलेला होता . पण , स्वबळ मिळवता आलं नाही आणि राष्ट्रवादीनं बाहेरुन पाठिंबा देण्याची भूमिका स्वीकारल्यावर भाजप-सेनेला पुन्हा युती करण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता . या निवडणुकीत तर १४४ वर जागा मिळवण्याचा चंग भाजपनं बांधलेला होता . तसं घडलं असतं तर ही युती भाजपनं तोडली असतीच पण , परस्परांच्या जागा पाडण्याच्या नादात आणि शरद पवार यांनी घेतलेल्या अतुलनीय आणि अविश्वसनीय उभारीमुळे निवडणुकीचा निकाल भाजपच्या मनसुब्यावर पाणी फेरणारा ठरला ; आंकडे भाजपच्या विरोधात गेले . दृश्य फ्रेममधे नीट फिट झाल्याशिवाय शूट करण्याची संवय एक कुशल छायाचित्रकार म्हणून उद्धव ठाकरे यांना आहे .  सरकार स्थापन करण्याचं चित्र फ्रेममधे जस हवं तसं आलेलं आहे हे ओळखून उद्धव यांनी ‘जे ठरलं’ ते मिळालं पाहिजे यासाठी ठाम भूमिका घेतली ; संजय राऊत यांनी ती भूमिका लाऊन धरली ; शरद पवार यांनी फांसे फेकले आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या सरकारला अवघ्या ८० तासांत सुरुंग लागला .

गेल्या जवळ जवळ १५ वर्षांपासून एक पत्रकार म्हणून मी उद्धव ठाकरे यांना पाहतो आहे . राजकीय नेते म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही उद्धव विचारी , ठाम आणि ‘ठंडा करके खाओ’ वृत्तीचे संयमी आहेत ; कोणताही दावा न करता त्यांनी मुख्यमंत्रीपद कसं पटकावलं हे यासंदर्भात लक्षात घ्यायला हवं . नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी केलेल्या बंडानंतर झालेली विखारी टीका , नारायण राणे तर सभ्यपणाची पातळी सोडून टीका केल्यावरही उद्धव ठाकरे यांनी त्यांचा तोल सुटू दिला नाही . राणे आणि राज यांचे बंड , त्यातच बाळासाहेब ठाकरे यांचे प्रकृती अस्वास्थ्य आणि नंतर स्वत:ही मोठ्या दुखण्याला सामोरे गेल्यावरही उद्धव ठाकरे यांना कधी नैराश्यानं ग्रासलं नाही की ते कधी नाउमेद झाले आहेत असं कधी जाणवलं नाही . माझ्या कांही कौटुंबिक अडचणींमुळे आमच्यात अशात भेटी  नाही की बोलणंही फारसं नाही पण, आजवर जो कांही संपर्क आधी आला त्यावरुन सांगतो राजकारणी आणि सांस्कृतिक उद्धव ठाकरे भिन्न , विचारी आणि ठाम आहेत .  निर्माण झालेल्या या अकृत्रिम स्नेहातून माझ्या दोन पुस्तकांचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालेलं आहे तर त्यांची एक पूर्णपणे अ-राजकीय मुलाखत मैत्री या संस्थेसाठी मी घेतलेली आहे , हे नागपूरकरांना स्मरत असेलच . या अनुभवातून सांगतो , निवडणुकीआधी ‘जे कांही  ठरलं’ , असं उद्धव ठाकरे म्हणतात त्यात तथ्य असावं कारण माणूस आणि राजकारणी म्हणूनही उद्धव ठाकरे खोटं बोलतील असं वाटत नाही . देवेंद्र फडणवीस हेही माणूस म्हणून खोटं बोलणार नाहीत याची खात्री मला आहे पण , राजकारणी म्हणून खरं न बोलण्याचं बंधन देवेंद्र फडणवीस यांच्यावर आलेलं असावं !

माणूस म्हणून शिवसैनिकाच्या अडी-अडचणी निवारणाची वृत्ती असणारे राजकारणी उद्धव ठाकरे यांचा अगदी गावपातळीवरच्या सैनिकाशी थेट असणारा संपर्क अन दुसरीकडे सांस्कृतिक जगताबाबतची त्यांची जानकारी , त्या क्षेत्रातल्या लोकांतला वावर कसा आदबशीर आहे हे अनुभवणं हा कायमच सुखद होतं , आहेही . बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या केलेल्या शिवसेनेची उद्धव ठाकरे यांनी तळापासून नव्यानं उभारणी केली . काळाची गती ओळखून जुन्या ज्येष्ठ नेत्यांना मान देऊन अलगद बाजूला सरकवलं आणि  स्वत:ची नवीन टीम तयार केली . या पक्षाला ‘राडेबाज’ या प्रतिमेतून मुक्त करत एक गंभीर राजकीय पक्ष म्हणून स्वरुप मिळालं ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या काळात . शिवसेना वाढायची असेल तर मराठीपणाच्या कक्षेच्या बाहेर आलं पाहिजे आणि मुंबई , कोकण , औरंगाबाद , ठाण्याच्या बाहेर गेलं पाहिजे हे ओळखून उद्धव ठाकरे यांनी कामाची व्याप्ती वाढवली  . त्यासाठी दिवाकर रावते यांच्यासारख्यां अनेकांना कामाला लावत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेतली .  बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपणार अशी करण्यात आलेली भाकितं खोटी ठरली त्यामागे उद्धव ठाकरे यांनी घेतलेली अविश्रांत मेहेनत आहे . आताही सेनेतल्या कांही ज्येष्ठ नेत्यांचा कॉंग्रेससोबत जाण्यास असलेला विरोध सौम्य करतांना आणि त्याची वाच्यता न होऊ देण्यात त्यांनी दाखवलेली समज वाखाणण्यासारखी आहे . हे सर्व लक्षात घेता उद्धव ठाकरे कळसूत्री मुख्यमंत्री होतील ही शक्यता मुळीच वाटत नाही .

|| दोन ||

परस्पर विरोधी भूमिकांच्या पक्षांच्या युती आणि आघाड्या हे भारतीय राजकारणाचं व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे . माहितीसाठी म्हणून सांगतो , १९६९ मधे देशात संयुक्त विधायक दल ही पहिली कॉंग्रेसेतर आघाडी स्थापन झालेली होती ; ९ राज्यात या आघाडीची सरकारे आली होती . परस्परांच्या राजकीय उरावर  बसणारे पक्ष सत्तेसाठी एकत्र येतात आणि त्यालाच राजकारण

शरद पवार आणि उद्धव ठाकरे

म्हणण्याचा ट्रेंड आता आलेला आहे . सत्तेसाठी साधन शुचिता गुंडाळून  ठेवणं ही आता सर्वपक्षीय राष्ट्रीय अपरिहार्य अगतिकता झालेली असतांना शिवसेनेची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत झालेली आघाडी अनैसर्गिक आहे या टीकेत कांहीच अर्थ नाही किंबहुना तो निर्भेळ भंपकपणाच म्हणायला हवा . इतके दिवस अशा आघाड्या आणि युत्या कॉंग्रेसच्या विरोधात होत असत आता त्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होत आहेत हाच काय तो फरक आहे .

आघाडीची सरकारे टिकत नाहीत या भाकितात अर्थ आहेच असंही नाही कारण अटलबिहारी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातल्या सरकारने ( १३ दिवस आणि १३ महिन्याच्या अयशस्वी प्रयोगानंतर ) एक टर्म पूर्ण केलेली आहे ; केंद्रातच मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकार दहा वर्ष होतं तर तिकडे बिहारात नितीशकुमार यांचा जनता दल कधी भाजप , कधी लालूसोबत अशा सतत कोलांटउड्या मारत गेली पंधरा वर्ष सत्तेत आहेच . काश्मिरातही आघाडीचे परस्पर विरोधी विचाराचे प्रयोग झालेले आहेतच .  आजच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातलं सरकार तीन चाकी रिक्षा आहे ही टीका किंवा सरकार अस्थिर आहे , सहा महिन्यात पडेल ही  भविष्ये कुडमुड्या ज्योतिषाची ठरली तर आश्चर्य वाटणार नाही . कारण सध्या तरी महाआघाडी करण्याचा हा निर्णय डोक्यावर बर्फ ठेऊन पूर्ण विचारांती आणि प्रत्येक पक्षानं ठरवून दोन पावल मागे जाणाऱ्या तडजोडी करुन घेतला असल्याचं दिसतं आहे . ‘देवेंद्र गेले आणि उद्धव आले ‘ एवढ्यापुरते हे राजकीय नाट्य मर्यादित नाही कारण हा समंजसपणा आणि राजकीय पक्वता ( political maturity ) अशीच दाखवली गेली तर महाराष्ट्रातल्या या महाआघाडीचे अनेक गंभीर पडसाद राष्ट्रीय पातळीवरही भविष्यात उमटू शकतात आणि भाजपला शह देऊ शकतील अशी नवीन समीकरणे आकाराला येऊ शकतात ; त्यासाठी ‘​चॅनेली’य उतावीळपणा मुळीच न करता  वाट पाहण्याचा संयम दाखवणंच इष्ट आहे . भाजपला जर खरंच सत्तेपासून लांब ठेवायचं असेल तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सगळ्या वाचाळवीरांच्या मुखाला फेविकॉलचा जोड लावला आणि कोणताही आततायीपणा न करता , शांतपणे समजून-उमजून काम केलं तर या सरकारला सध्या कोणताही धोका दिसत नाहीये .

बाकी कोणत्या पक्षाची कशी कोंडी होणार आहे , आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील महाआघाडी कशी असेल/नसेल , महाआघाडीत जाऊन शिवसेनेने हाराकिरी केली आहे की नाही , कॉंग्रेसनं सेनेशी युती करुन स्वत:च्या पायावर धोंडा घालून घेतला आहे , वगैरे टीका म्हणा की भाकिते करणाऱ्या सर्वपक्षीय ‘भक्त आणि तज्ज्ञां’साठी समाज माध्यमे खुली आहेतच ; त्यांनी तिकडे धुमाकूळ घालत बसावं !

शेवटी- मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अयशस्वी  ठरले ही टीका वास्तवाला धरुन नाही असं माझं ठाम मत आहे .

-प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  ​+919822055799

संबंधित पोस्ट